जब मिलते है यार, और बॅगपायपर (?) सोडा!
सदर - लक्ष्मणरेषेवरून
डॉ. कुंदा प्रमिला निळकंठ
  • या लेखातील सर्व छायाचित्रं प्रातिनिधिक आहेत
  • Fri , 10 March 2017
  • लक्ष्मणरेषेवरून कुंदा प्रमिला निळकंठ Kunda Pramila Nilakanth ड्रग्ज Drug उडता पंजाब Udta Punjab लैंगिकता sexuality लिंगभाव Gender

२०१२ सालातली गोष्ट. पार्ल्यातल्या एका उच्चभ्रू कॉलेजातल्या मीडिया कोर्सला शिकवत होते. विभागप्रमुख म्हणून काम करत असल्याने तिन्ही वर्षांचे विद्यार्थी मला चांगले माहीत होते. त्या कॉलेजात श्रीमंत गुजराती, जुहूमधल्या अनेक सेलेब्रिटींची मुलं असतात. एक दिवस संध्याकाळी लेक्चर्स संपवून मी स्कूटर काढायला इमारतीच्या मागच्या बाजूला गेले, तिथं एका कट्ट्यावर काळा हिजाब घातलेली साजिदा एकटीच बसली होती. अशी एकटी बसलेली मी तिला कधीच पाहिलं नव्हतं. बऱ्याच वेळा ती मित्र, जिग्नेशबरोबर किंवा शेवटच्या वर्षाची एकमेव मुस्लीम मैत्रीण, यास्मिन बरोबर असायची. साजिदाबद्दल मला विशेष सहानुभूती होती, कारण सुतारकाम करणाऱ्या वडिलांशी भांडून आर्थिक परिस्थिती नसतानाही तिने बारावीच्या पुढे शिकण्याचा निर्णय घेतला होता. तेही फील्डवर्क असतं हे माहीत असूनही मीडिया कोर्सला प्रवेश घेतला होता आणि तिन्ही वर्ष प्रथम श्रेणी मिळवली होती. फक्त तिची गोची अशी झाली होती की, तिचं एका हिंदू मुलावर प्रेम जडलं होतं. तिचा मित्र जिग्नेश दिसायला देखणा होता, स्मार्ट होता आणि अतिशय समजूतदार व सर्वांशी आदरानं वागणारा मुलगा होता. पण तो राजस्थानातील उच्च जातीतील एका उद्योगपतीचा मुलगा होता. मी स्कूटर काढताना तिच्याकडे पाहून थोडं हसले, तशी ती उठून माझ्याकडे आली. म्हणाली, “मॅम, एक बात करनी थी, करू क्या?”

साजिदाच्या चेहऱ्यावर खूप अस्वस्थता होती. त्यामुळे मी तिला म्हटलं, ‘बोल की बिनधास्त’! ती सांगू लागली. ती आणि तिचा मित्र जिग्नेश, शेवटच्या वर्षाची परीक्षा संपल्यावर पळून जाऊन लग्न करणार होते. कारण अगदी स्पष्ट होतं. दोघांच्या घरी टोकाचा विरोध असणार हे मी गृहीत धरलं होतं. पण साजिदाने मला पुढं जे सांगितलं ते जरा जास्तच धक्कादायक होतं. ती म्हणाली, “जिग्नेश मला खूप आवडतो, कारण तो खूप समजूतदार आहे. मवाळ आहे. एकदम जंटलमॅन. पण हल्ली तो मित्राच्या संगतीनं खूप बदललाय.” मी विचारलं, ‘बदललाय म्हणजे काय?’ तर ती म्हणाली,

“आजकल वो बहोत पीने लगा है. और हररोज शाम को लेक्चर खतम होने के बाद वो फ्रेंड्स के साथ ‘बरिस्ता’ बार में जाके बैठता है. मैं कुछ भी बोलू तो चिडचिडा बनता है.”

सुशिक्षित उच्चभ्रू घरातला १९ वर्षांचा तरुण मुलगा दररोज दारू पितो हे ऐकून मला जरा धक्काच बसला. मी जिग्नेशला एक आदर्श विद्यार्थी म्हणून ओळखत होते. साजिदाची अवस्था ‘इकडे आड, तिकडे विहीर,’ अशी झाली होती. त्यामुळे तिच्या मनाची घालमेल चालली होती. तिच्या पाठीवर हात ठेवून मी म्हटलं की, “मी पाहते काय करायचं ते. तू आता परीक्षेचा नीट अभ्यास कर. नंतर सांगते काय करायचं ते.”

तिथून निघाल्यावर मी थेट ‘बरिस्ता’ बारमध्ये पोहोचले. तिथल्या काउंटरवरच्या माणसाशी बोलल्यावर त्याने मागच्या बाजूच्या लॉबीचा हळूच पडदा उघडून मला दाखवलं. आश्चर्य म्हणजे तिथं त्याच्यासोबत कॉलेजातील जवळ जवळ २५-३० मुलं दारू पीत होती. ती कोवळी, किशोरवयीन मुलं हसत-खिदळत दारू पीत होती. नुकतंच मिसरूड फुटलेला एक मुलगा हातात बियरचा फेसाळता ग्लास घेऊन दुसऱ्याला म्हणत होता, “ए भोंचू, चल ले चल!, चल, झुम ले थोडासा! इत्तेसे, कुछभी नहीं होता यार!”

‘तरुणांनी दारू पिणं वाईट असतं’ अशा पारंपरिक नैतिकतेच्या चौकटी माझ्या डोक्यात नसल्या तरी त्या मुलांच्या चेहऱ्यावरील बेपर्वाईचे भाव मला खटकले. लाख विचार मनात येऊन गेले. या मुलांशी नीट बोलायला हवं, समजावून सांगायला हवं असा विचार करून मी घरी परतले. घरी आल्यावर एका तरुण मानसोपचार तज्ज्ञ मैत्रिणीला, मीराला फोन केला. ती ‘अल्कोहोलिक अॅनॉनिमस’ केंद्रात काम करते, तिच्याशी तासभर बोलले.

मीराने जे सांगितलं ते तर याहूनही धक्कादायक होतं. ती म्हणाली, “आजकाल मुंबईसारख्या गजबजलेल्या शहरातील १५ ते २० या वयोगटातील जवळजवळ ६८ ते ७२ टक्के तरुण मुलं-मुली (हो, मुलीसुद्धा!) आठवड्यातून एकदातरी म्हणजे विकेंड पार्टीत दारू पितात. तर ३५ टक्के मुलं अगदी दररोज नियमितपणे दारू पितात. जेव्हा या मुलांचं हे दारू पिणं आई-वडिलांच्या लक्षात येईपर्यंत वाढतं, तेव्हा ती पालकमंडळी मुलांना घेऊन आमच्या केंद्रात येतात. खरं तर, सुरुवातीला आपला मुलगा किंवा मुलगी दारू पितात हे सत्य पालक स्वीकारायला तयार नसतात. पण जेव्हा त्यांच्या मुलानं कारच्या अपघातात किंवा मोटारबाईक सूसाट वेगानं चालवून कुणाला तरी उडवलेलं असतं, तेव्हा या मुलांच्या श्वास, रक्त, लघवी टेस्ट होतात. त्यामध्ये अल्कोहल सापडतं, तेव्हा सत्य पुढे येतं. समुपदेशन केंद्राचं प्रमाणही आता आम्हाला वाढवावं लागलं आहे. खरं तर, सरकारने आणि युजीसीने प्रत्येक कॉलेजमध्ये समुपदेशन केंद्र उघडण्याची सक्ती केली आहे, पण आश्चर्य म्हणजे संपूर्ण मुंबईत सात-आठ कॉलेजस वगळता कोठेच समुपदेशनाची केंद्रं उघडलेली नाहीत. जी आहेत तीही नावाला. नॅक अॅक्रिडेशनपुरती. वास्तविकत: समुपदेशन हे एकदाच करून संपत नसतं, ते नियमितपणे होणं गरजेचं असतं. शहरांमध्ये किशोरवयीन आणि महाविद्यालयीन युवकांचं दारू आणि ड्रग्जच्या व्यसनाधीनतेचं वाढतं प्रमाण लक्षात घेता, आम्ही तर असा विचार करत आहोत की, शाळांमध्येसुद्धा काउन्सिलिंगची केंद्रं काढणं सक्तीचं केलं पाहिजं.”

थोडक्यात, दारू आणि ड्रग्ज हा ‘सामाजिक अढी’चा किंवा सोशल टॅबूचा मुद्दा राहिलेला नाही. ग्रामीण भागात असू शकतो, पण निदान शहरात तरी नाही. पालकसुद्धा मुलांच्या विकएन्ड पार्टीला फारसा विरोध करताना दिसत नाहीत. सुशिक्षित मध्यमवर्गीय आणि उद्यमी (बिझिनेसमन) आई-वडिलांची मुलं तर उघडपणे विकएन्ड पार्टीला हजेरी लावत असतात. सोशल मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमातील अनेक चर्चांतून ‘मुलांचे पालक नव्हे मित्र बना’ अशा आधुनिक विचारांचा मारा झाल्यामुळे बहुतेक सुशिक्षित पालक मित्र बनण्याच्या धडपडीत मुलांच्या या व्यसनांकडे जाणीवपूर्वक कानाडोळा करू लागलेले दिसतात.

आताच शहरातील मुलांचं व्यसनाधीनतेचं प्रमाण ६५ ते ७२ टक्क्यांवर गेलेले दिसतं. साधारण तीसेक वर्षापूर्वी बेताची आर्थिक परिस्थिती असणाऱ्या किंवा सुखवस्तू कुटुंबातील मध्यमवर्गीय युवकांना दारूचं एवढं व्यसन लागलेलं नव्हतं. ड्रगचं व्यसन दिसायचं, पण ते श्रीमंत घरातील किंवा उच्च मध्यमवर्गीय तरुणांमध्ये. ही संख्या त्यावेळी अगदी अत्यल्प म्हणजे पाच टक्के इतकीच होती. आपल्याला माहीत असलेलं संजय दत्त हे त्याचं ज्वलंत उदाहरण होतं. नर्गिस दत्तने संजयसारख्या मुलांना ड्रगच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी एनजीओजना कशी मदत केली हेही माहीत होतं. त्यामुळे ड्रगच्या विळख्यात सापडलेल्या तरुण मुलांची आकडेवारीदेखील त्या निमितानं पुढे आली होती.

मात्र, तीस वर्षांपूर्वी कष्टकरी वर्गात किंवा शहरातील झोपडपट्टीत अफू, गांजा किंवा गर्दचं व्यसन असायचं ते पाहिलं होतं. ८०-९०च्या दशकात मी मुंबईतील ऑर्थर रोडला सफाई कामगारांच्या वस्तीत स्त्रियांसोबत काम करत होते. त्यावेळी तिथल्या काही किशोरवयीन मुलांना गर्द, हिरॉईन, ब्राऊन शुगर या नशिल्या पदार्थांच्या विळख्यात सापडलेलं पाहिलं होतं. त्याचं महत्त्वाचं कारण होतं, वस्तीतल्या किशोरवयीन मुलांचा वापर अंडरवल्डचे स्मगलर तस्करी करण्यासाठी ‘वाहक’ म्हणून करायचे. अशा नशेचं व्यसन लागलेल्या मुलांच्या आयांची सगळ्यात जास्त ओढाताण व्हायची. नवरा आणि गैरमार्गाला लागलेला आपला मुलगा या दोघांनाही सावरण्याची तारेवरची कसरत असायची. खरं तर दारू पिऊन नवऱ्याकडून मारपीट झालेल्या स्त्रियांचे व्यसनाशी संबधित मुख्य प्रश्न असायचे ते हिंसेबाबत. हिंसक होऊन या मुलांनी केलेल्या हाणामाऱ्या, दंगा वगैरेंमुळे नेहमी पोलीस दारात यायचे म्हणून चिंता वाटायची. नवऱ्याचा मार तर रोजचाच आहे, म्हणून स्त्रिया एकवेळ तो मार सहन करतील, पण आपल्या किशोरवयीन मुलांनी नशेच्या मार्गानं जाऊ नये म्हणून स्त्रिया आटोकाट प्रयत्न करत असत. मला वाटायचं की, दारू आणि नशा या दोन्ही गोष्टी तिथल्या वेदनादायी परिस्थितीमुळे अगदी अपरिहार्य आहेत. झोपडपट्टीत राहणारे, गटाराचं  घाणीचं काम करणारे हे गरीब कामगार शरीराच्या वेदना विसरण्यासाठी दारू पितात आणि व्यसनी बनतात. त्यामुळे अशा हिंसक वातावरणात वाढलेली मुलं साहजिकच दु:ख विसरण्याचा प्रयत्न म्हणून लहान वयात विविध व्यसनांच्या आहारी जातात.

पण अलीकडच्या काळात सुशिक्षित सुखवस्तू कुटुंबातील युवकांचं ड्रग्ज आणि दारू यांच्या व्यसनांच्या आहारी जाणं पाहिल्यावर वाटतं की, ही व्यसनांची पारंपरिक कारणं अगदी निरर्थक, अनाकलनीय आहेत. एक थ्रील म्हणून सुरुवात झालेला हा अनुभव मुलांच्या नकळतपणे व्यसनात परिवर्तीत होत असावा. उपभोक्तावादी मूल्यावर आधारित भांडवली व्यवस्थेनं राबवलेल्या ‘भोगवादी’ नीतीमध्ये या पिढीच्या बरबादीची कारणं दडलेली आहेत.

नॅशनल इन्स्टिट्यूट अल्कोहल अॅब्यूज या केंद्र सरकारच्या संस्थेनं केलेल्या एका सर्व्हेमध्ये असंही आढळलं की, दारू पिण्याशी संबंधित तीन-चार कॉम्प्यूटर गेम्ससुद्धा उपलब्ध आहेत. उदा. ब्रिंज ड्रिंकिंग किंवा बॉटमस अप यासारख्या किशोरवयीन मुलांमध्ये कमी वेळात जास्तीत जास्त अल्कोहोल घेण्याला पॉइंटस आहेत. शिवाय सोड्याच्या नावावर केलेल्या दारूच्या ज्या जाहिराती (त्याला सरोगेट जाहिराती म्हणतात!) प्रसारमाध्यमांतून व सिनेमांतून केल्या जातात, त्यातही बॅगपायपर आणि मित्र परिवार साथीला असेल तर जगात कोणतीही मर्दुमकी गाजवता येते. शौर्य, मर्दानगी आणि जबरदस्त क्षमता या सगळ्याला बढावा देणारं पेय म्हणजे दारू, असं ठसवलं जातं. परिणामी सगळ्यातून वेगवेगळ्या प्रकारे त्याविषयीची आवड वाढीला लागते. एकदा गोडी लागली की, हळूहळू तिचं रूपांतर व्यसनात होतं, असा आपला माझा अंदाज.  

या विषयासंदर्भात मला सगळ्यात जास्त आश्चर्य वाटलं ते प्राध्यापक मंडळींचं. एकदिवस कॉलेजच्या स्टाफरूममध्ये मी काही जणांशी या विषयावर चर्चा केली. त्यावर आलेल्या बऱ्याच जणांच्या प्रतिक्रिया अगदी उथळ आणि पारंपरिक नैतिक चौकटीतून आलेल्या होत्या.

“काही नाही हो, मुलांच्या व्यसनाधीनतेला मुख्यत: पालकच जबाबदार आहेत. ते आपल्या मुलांना अजिबात चांगले संस्कार देत नाहीत.”, “आधी पालकांना नीतीमत्तेचे धडे द्यायला हवेत.”,

“अहो, आधुनिकतेचं आकर्षण आहे हे. आजकाल बायका आणि ‘मुलीसुद्धा’ (??) पबमध्ये दारू पितात, कारण त्यांना दाखवायचं असतं आपण कसे मॉडर्न आहोत ते. तोकडे कपडे घालायचे आणि जायचं दारू प्यायला!”, “अहो, ही सगळी चंगळवादी संस्कृती आहे. दुसरं काय? आई-बाप, मुलांना दुखवायचं नाही म्हणून मुलं मागतील तसे पैसे पुरवतात आणि मुलं तो नशापाण्यात उडवतात. मी म्हणतो कॉलेजच्या मुलांच्या हातात क्रेडिट कार्ड द्यावंच कशाला? आमच्या काळात असं नव्हतं इ.इ.!”

या सगळ्या प्रतिक्रिया या एक विशिष्ट नैतिकतेचा बुरखा पांघरून दिलेल्या होत्या. ही मंडळी फक्त वास्तवाचं वर्णन करत होती. किंबहुना त्यात तमाम ‘पालकांवर’, ‘व्यवस्थेवर’ शेरेबाजी होती. समस्या सोडवणुकीसाठी कुणीही काहीही विचारच करायला तयार नव्हतं. काही महिन्यांपूर्वी आमच्या कॉलेजमधल्या बारावीतल्या एका मुलानं मधल्या सुट्टीत पाचव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली होती. खरं म्हणजे ती बिघडलेल्या परिस्थितीची एक धोक्याची घंटा होती. कुणी म्हणालं, त्याचं प्रेमप्रकरण होतं. कुणी म्हणालं, प्राध्यापिकेचा ओरडा मिळाल्याने त्याला वाईट वाटलं. अनेक कारणं सांगितली गेली. पण कुणीही त्याच्या व्यसनाधीनतेचा उच्चारही करत नव्हतं.

जे वास्तव आहे ते एका नैतिक चौकटीत बसून नाकारायचंच ही जी दांभिकता आपल्या भारतीय संस्कृतीत खोलवर रुजलीय, त्यामुळे आपण समस्येच्या सोडवणुकीकडे जात नाही. काही महिन्यांपूर्वी ‘उडता पंजाब’ नावाचा एक महत्त्वाचा सिनेमा येऊन गेला. त्यावर पंजाब राज्याच्या सरकारने बंदी घालण्याची एकमुखी मागणी केली होती. काय होतं त्यात बंदी घालण्यासारखं? संस्कृती रक्षकांच्या मते त्यात पंजाब हा नशिल्या पदार्थांच्या वाहतुकीची कर्मभूमी असल्याचं दाखवलं आहे आणि पंजाबची सगळी तरुणाई ही त्या ड्रग्जच्या विळख्यात सापडली आहे, असं दाखवून पंजाब राज्याची बदनामी केली गेली आहे. हे कारण देऊन ‘उडता पंजाब’ चित्रपटावर बंदी घालण्यासाठी अनेक माणसं रस्त्यावर उतरली.

वास्तविकत: ड्रग्जच्या विळख्यात पंजाबची तरुणाई सापडल्यामुळे गेल्या दहा वर्षांत राज्यात सामाजिक स्वास्थ्य आणि त्या अनुषंगानं कायदा सुव्यवस्थेची खूप गंभीर परिस्थिती त्या राज्यात उद्भवलेली आहे. २०१५ मध्ये केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय आणि रोजगार या विभागातर्फे नॅशनल ड्रग्ज डिपेंन्डट ट्रिटमेंट सेंटर (NDDT) आणि सोसायटी फॉर प्रमोशन ऑफ युथ अँड मासेस (SPYM) या दोन संस्थांनी मिळून एक सर्वेक्षण समोर आणलं. त्यात असं म्हटलं होतं की, सुमारे २ लाख ३० हजार पंजाबी लोक हे अंमली पदार्थाच्या आहारी गेले आहेत. त्यातील ७६ टक्के हे १८-३५ वयोगटातील युवक आहेत. यातील १५ टक्के युवक हे महागडे इंजेक्शन रूपातले अंमली पदार्थ घेतात, तर उरलेले ५९ टक्के अफू, गांजा, फक्की, दोडा अशा नशिल्या पदार्थांशिवाय जगूच शकत नाहीत. हे अंमली पदार्थ खरेदी करण्यासाठी त्यांनी अनेक गुन्हे केले आहेत, म्हणून ज्यांना तुरुंगात ठेवलं आहे. त्या सगळ्या युवकांनी कबूल आहे की, तुरुंगातही ते हे पदार्थ मिळवून सेवन करतात. अंमली पदार्थांच्या सेवनामुळे युवक वर्ग मोठ्या प्रमाणावर विविध गुन्ह्यांत अडकला गेला आहे. इतका की पाकिस्तानच्या बॉर्डर वरूनदेखील तो आयात करण्यासाठी त्यांची धडपड असते. हे देशाच्या दृष्टीनं जास्तच धोकादायक आहे. ही सारी माहिती केंद्र सरकारच्या NDDT आणि SPYM यांच्या अधिकृत वेबसाईटवर सहा महिने उपलब्ध होती, पण ‘उडता पंजाब’च्या निर्मात्यांनी जेव्हा हा सिनेमा सरकारी माहितीच्या आधारेच बनवला आहे असं न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केलं त्याबरोबर ‘अति-संवेदनशील माहिती’ या नियमाचा आधार घेऊन ती सरकारतर्फे वेबसाईटवरून काढून टाकण्यात आली.         

सरकारच्या या संस्कृतीरक्षक भूमिकेमुळे युवकांच्या व्यसनाधीनतेच्या समस्येकडे आपण डोळसपणे पाहू शकत नाही असं दिसतं. आणि हे खेदजनक आहे. मुळात हे मान्य करायला हवं की, घराबाहेरील परिस्थितीला दोष देण्यापूर्वी आपणच ही समस्या वाढवायला कारणीभूत आहोत. ८० टक्के भारतीय कुटुंबांत वयाच्या चौथ्या वर्षीच याच्या प्रशिक्षणाला सुरुवात होते. दारू, सिगारेट आणि ड्रग्ज यांची सवय शत्रुप्रेमातून होते. कारण आपल्याकडे सांस्कृतिकदृष्ट्या या तिन्ही गोष्टी शत्रूसारख्या कमालीच्या निषिद्ध मानल्या जातात. खूप लपवाछपवी चालते. दारूचं, सिगारेटचं किंवा ड्रग्जचं नावही अगदी घरात दबकून घेतलं जातं. पण त्याच वेळी आपण हेही विसरतो की, कित्येक ब्राह्मणेतर घरातले पुरुष संध्याकाळी ७ ते ९ या वेळात रात्रीच्या जेवणापूर्वी घरातल्या एखाद्या कोपऱ्यात किमान दोन पेग तरी दारू घेताना दिसतात किंवा बाहेरून घेऊन येतात. बापाने टाकलेले सिगारेटचं थोटूक त्या घरातील मुलानं एखादा झुरका मारल्याशिवाय टाकलं असेल का? ग्लासात उरलेले दारूचे थेंब एकदा तरी चाखून पाहिले नसतील का? घरातले हे व्यसन न पाहता मुलं मोठी होतात, असं मानणं म्हणजे डोळ्यावर पट्टी बांधण्यासारखं आहे.

जसं अलीकडच्या काळात लैंगिकतेचं शिक्षण शाळेपासून मुलांना द्यायला हवं, हे तत्त्व बहुतांशी मान्य झालं आहे आणि बऱ्याच शाळांमध्ये त्याच्या प्रशिक्षणाला सुरुवातही झाली आहे. अगदी तसंच दारू, सिगारेट आणि अंमलीपदार्थ सेवनाविषयीची माहिती व प्रशिक्षण शाळेपासूनच मुलांना द्यायला हवं. लैंगिक शिक्षणात लैंगिक अनुभव हा आनंददायी असतो, हे जसं आपण सांगतो, वास्तव नाकारत नाही, पण तो कधी, कसा, केव्हा, कुठे, कोणत्या वयाला, त्यातील अयोग्य, असुरक्षितता, हिंसक, विकृत घातक काय आहे याचं समग्र भान देण्याचा जसा प्रयत्न लैंगिक शिक्षणात केला जातो, तसाच काही क्षणांची धुंदी देणारं, मेंदूला वेगळ्या विश्वात घेऊन जाणारं, हे अंमलीपदार्थांचं सेवन म्हणजे काय आहे याचं समग्र भान द्यायला हवं.

सरसकटपणे दारू वाईट असते असं म्हणून कसं चालेल? जेव्हा तुमच्या आसपासची ७० ते ८० टक्के प्रौढ माणसं वेगवेगळ्या पार्ट्यांना दारू पिताना दिसतात. गावात, कोपऱ्याकोपऱ्यात, गल्लीबोळात दारूची दुकानं आणि गुत्ते उघडपणे चालत असताना, टीव्हीवर उघडपणे जाहिराती दिसत असताना, दारू वाईट आहे, अनैतिक आहे, हे कोणत्या आधारावर तुम्ही सांगता? मुळात अनैतिकतेची अशी खोटी व्याख्याच बदलून टाकायला हवी. कारण जर प्रौढांना दारू पिण्यानं एका धुंदीचा आनंद मिळत असेल तर उमलत्या तरुणांना का नाही?

इथं प्रश्न नशेचा आनंद घेणं आणि नशा करणं हे चूक की बरोबर हा नाहीच आहे. प्रश्न कुणी कधी, केव्हा, किती यांचा आहे. उमलत्या वयात शरीरावर होणाऱ्या दुष्परिणामांचा आहे. नशेच्या अंमलाखाली उमलत्या वयातील सर्जनशीलता, नवनिर्माणक्षमता नष्ट होण्याचा आहे. व्यसनाधिन झाल्यावर रक्तात भिनत जाणाऱ्या अल्कोहोलमुळे दुबळ्या होत जाणाऱ्या स्नायुंचा आहे. देशातील तरुणाईच्या जोशपूर्ण सहभागाच्या अभावी, उन्मुक्त ऊर्जेच्या अभावामुळे राष्ट्र नवनिर्माणाच्या कामात जो निरुत्साह, जे जडत्व, जी उदासीनता येत जाणार आहे, तो आपल्या सर्वांचाच मोठा तोटा आहे. कदाचित आपल्या प्रगतीच्या मार्गातला तो मोठा धोंडा असणार आहे.

प्रश्न या नशिल्या द्रव्यांमुळे आकाशात उडू पाहणाऱ्या स्वप्नांच्या अवास्तव दुनियेत धुंदीच्या झोपाळ्यावर झोके घेत असताना आपण काहीतरी पुरुषार्थ गाजवत आहोत, या कृतक जाणीवेनं फुगून जाण्याचा आहे. या प्रकियेत एक मोठं बिलंदर ‘मर्दानगीचं मूल्य’ लपलेलं आहे.  

“अरे, डरता क्या है? मैं भी देखुं तेरा कपॅसिटी कितनी है! एक पेग, दो पेग? दो पेग में तू तो औरत जैसा ढिला पड जाता है, तो उसमें तेरी क्या मर्दानगी है? अरे, यदि तू सही मर्द है ना, तो, ये ले तिसरा पेग. ले, चल उड ले! दिखा दे दुनियाको तेरी मर्दानगी!”

‘बरिस्ता बार’मध्ये जिग्नेशला उद्देशून केलेलं त्याच्या मित्राचं वरील संभाषण मी आजही विसरू शकत नाही. त्यानंतर एकदिवस माझी लेक्चर्स संपल्यावर साजिदा मला येऊन भेटली. त्यावेळी मी तिला जिग्नेश आंणि तिच्या नात्याची खूप काळजी वाटत असल्याचं सांगितलं. एकतर दोघांच्याही आई-बापाविरुद्ध जाऊन जरी दोघांनी पळून जाऊन लग्न केलंच तरी जिग्नेश तुझ्याशी कसा वागणार आहे हा प्रश्नच आहे. कारण एकतर जाट जातीत जन्मल्याने रक्ताच्या कणाकणांत ठासून भरलेलं क्षत्रियत्व, त्यात मर्दानगी दाखवण्यासाठी हातात मिळालेले दारूचे ग्लास या दोन्ही गोष्टी सहजासहजी सुटणं अशक्यच. अशा व्यसनाधीन मुलांना जबाबदारीची जाणीव कधीतरी होतेच, नाही असं नाही, पण तेव्हा वेळ निघून गेलेली असते. ऐन उमेदीच्या काळात, वयाच्या २५ ते ३०च्या वयात, रक्तात भिनलेल्या त्या विषारी द्रावाने मेंदूसहित साऱ्या शरीराचा कब्जा घेतलेला असतो. उमेदीच्या वर्षात सर्जनशीलतेची ऊर्जा एकीकडे बहरत असतानाच मेंदू आणि हातपाय पुकारा करू लागतात ‘दिल मांगे मोअर’! ते मिळाल्यावर निश्चयाने ठरवलेले साऱ्या कमिटमेंटस, सारं काम कसे आपोआप झूम आउट होत जातं. 

लेखिका सामाजिक कार्यकर्त्या आहेत.

kundapn@gmail.com

Post Comment

Bhagyashree Bhagwat

Mon , 13 March 2017

अप्रतिम! आवर्जून वाचावा असा लेख!


Anil Sawant

Fri , 10 March 2017

व्यसनाधिनता जातीनिहाय नसते हे बरोबर आहे. मात्र रोज संध्याकाळी पिण्याचा कार्यक्रम करणा-यांमधे ब्राह्मणेतरांचे प्रमाण बहुसंखेने असते.


anuya ahire

Fri , 10 March 2017

लेख खूपच उद्बोधक आहे ;पण ब्राह्मणेतर पुरुष..... या वाक्यापासून सुरु होणार विचार पटला नाही;कारण कारण व्यसनाधीनता जातीनिहाय नसते' ती जातीच्या पलीकडे पोचलेली असते. बाकी संपूर्ण लेखाला अनुमोदन आहे... व्यसनाधीनता पाहिलेली,अनुभवलेली स्त्री म्हणून! अनुया


anuya ahire

Fri , 10 March 2017

लेख खूपच उद्बोधक आहे ;पण ब्राह्मणेतर पुरुष..... या वाक्यापासून सुरु होणार विचार पातळ नाही;कारण कारण व्यसनाधीनता जातीनिहाय नसते' ती जातीच्या पलीकडे पोचलेली असते. बाकी संपूर्ण लेखाला अनुमोदन आहे... व्यसनाधीनता पाहिलेली,अनुभवलेली स्त्री म्हणून! अनुया


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

जर नीत्शे, प्लेटो आणि आइन्स्टाइन यांच्या विचारांत, हेराक्लिट्स आणि पार्मेनीडीज यांच्या विचारांचे धागे सापडत असतील, तर हे दोघे आपल्याला वाटतात तेवढे क्रेझी नक्कीच नाहीत

हे जग कसे सतत बदलते आहे, हे हेराक्लिटस सांगतो आहे आणि या जगात बदल अजिबात होत नसतात, हे पार्मेनिडीज सिद्ध करतो आहे. आपण डोळ्यांवर अवलंबून राहण्यापेक्षा आपल्या बुद्धीवर अवलंबून राहिले पाहिजे, असे पार्मेनिडीजचे म्हणणे. इंद्रिये सत्याची प्रमाण असू शकत नाहीत. बुद्धी हीच सत्याचे प्रमाण असू शकते. यालाच बुद्धिप्रामाण्य म्हणतात. पार्मेनिडीज म्हणजे पराकोटीचा बुद्धिप्रामाण्यवाद! हेराक्लिटस क्रेझी वाटतो, पण.......