अशानं ती आगावू, उर्मट, संस्कारहीन ठरते; बेताल, वाह्यात ठरते?
अर्धेजग - महिला दिन विशेष
शुभांगी गबाले
  • या लेखातील सर्व छायाचित्रं प्रातिनिधिक आहेत
  • Fri , 10 March 2017
  • अर्धे जग women world जागतिक महिला दिन International Women's Day हॅप्पी विमेन्स डे Happy Women's Day

ती रोज जीन्समध्ये वावरते. अधेमधे स्कर्ट आणि शॉर्टही घालते. नवऱ्याला हवं म्हणून नव्हे तर तिलाच सहज वाटलं तर तलम पैठणी नेसून खुललेल्या नवऱ्याच्या डोळ्यातली आपली छबी न्याहाळू बघते. तिच्याच आवडीच्या साड्या-दागिन्यांनी स्वतःला ती सजवतेही कधीमधी. तसं तिला आवडतं बागकाम करायला. खूपशी झाडं, वेली वाढवायला. त्याच फुलांचे गजरे माळायला. त्यातलाच एखादा कधी मिश्किलपणे नवऱ्याच्या हातात गुंफायला, तर कधी आई-सासूच्या केसांत माळायलाही. तिला नाही आवडत धुणी-भांडी, केरफरशी. निगुतीन कापलेली आणि नजाकतीनं रंगवलेली नखं मळवून टाकतात ही कामं. तिला स्वयंपाकही रोज रोज आणि तोच तोच नकोच असतो. छान मूड असेल तर भन्नाट चविष्ट असं काहीतरी खास बनवून ती मोकळी होते, कोणताही गाजावाजा न करता. आणि मनभरून खिलवतही राहते जीवलगांना. वर्षभराची लोणची-पापड, वाळवण हे तिच्या गावीही नसतं. पण रेडी फूड्सच्या स्टॉलवर ती रेंगाळते. हे सारं घेत राहते.  आवडीनं. चवीनं. पण दिवसाचे तीन प्रहर 'किचन क्वीन' बनून राहणं मनापासून नकोसंच वाटतं तिला. 

तिला वेळ हवा असतो शहरातल्या दुकानांमधून नवनवी पुस्तकं धुंडाळत फिरण्यासाठी. त्यांचा मनसोक्त फडशा पाडण्यासाठी. एकटीनंच कधी दूरवर निवांतपणानं भटकत राहण्यासाठी. एखादं नाटक पाहण्यासाठी. एकटीनं एकांतात एखादा सिनेमा अनुभवण्यासाठी. मित्र-मैत्रिणींच्या संगतीत हॉटेलिंगची मौज करण्यासाठी. कॅफेजमधून गप्पांच्या अड्ड्यात रमण्यासाठी.  

दोन भुवयांमधली  टिकली म्हणजे नवरा असल्या खुळचट कल्पनांना तीच्या लेखी कुठलाच थारा नाही.  गळ्यात त्याच्या नावाचं मंगळसूत्रही ती कधी मिरवत नाही. स्पेशल ऑकेजन्सला त्यानं अवचित कधी गिफ्ट म्हणून हातात ठेवलेलं छानस ब्रेसलेट मात्र ती पुन्हा पुन्हा घालत राहते आणि त्याच्या गळ्यांत हात टाकताना त्याकडे हळूच पाहूनही घेते. कविता आणि ग़ज़ल हे तिचं विसावण्याचं मुख्य ठिकाण आणि शब्दांशी चाललेलं अहोरात्रीच द्वंद्व हे तिनं मानलेलं गंभीर अन अखंड व्रत. सोशल मीडियाशी, तिथल्या वेळकाळ नसलेल्या डिजिटल युगाशी, बिनचेहऱ्याच्या व्हर्च्युअल दुनियेशी तिचा घनिष्ट दोस्ताना. 

बाकी घरकामात तिला इंटरेस्ट कमीच. आवडत्या नोकरीतलं काम मात्र ती जीव ओतून करत राहते. मुलाबाळांनी सजलेली सरधोपट संसाराची तीच पुराणी चौकट तिला अमान्यच. ती इथं या शहरात एकटी राहते. नवरा दूरच्या निराळ्या शहरात. त्याच्या त्याच्या क्षेत्रात कामयाबी शोधू बघणारा.  लहानगी आवडतात तिला अगदी आतून. पण तिला स्वतःला आई होणं, ते आईपण साजर करत अख्खं आयुष्य लेकरांभोवती बांधून घेणं एकुणातच फारसं नाही भावत. तिनं आई न होण्याचा रितसर निर्णय घेऊन टाकलाय त्यातूनच. ती खुश असते तिच्या तिच्या कामात आणि बिनकामाच्या अनंत व्यापातही. हरेकाला विचारांची, आत्मिक, भावनिक अभिव्यक्तीची, तत्त्वांशी निष्ठा राखण्याची, आपल्यापुरत्या मताग्रहांची पुरेशी स्पेस मिळावी याबाबत ती ठाम आहे. हक्कांचीही तिला कमालीची जाण आहे. जबाबदारीचंही तिला पुरतं भान आहे. एकाच शहरातल्या सासर-माहेरच्या घरांपासून काही अंतरावर ती राहते तिच्या स्वतःच्या घरात, एकच आभाळ शेअर करत एकटीनंच. एकत्र कुटुंबातला मनाविचारांनी साचलेला कोंडवाडा टाळण्यासाठी आणि एकमेकांचं असणं मनापासून जपण्यासाठी. एखाद्या सुट्टीच्या दिवशी रमून जाते ती याच माणसांमध्ये. हवं तेव्हा हवं तितकं. असं व्यक्तीस्वातंत्र्य निभावू देणारं हे तिचं कुटुंबच ठरतं अखेर तिला तिच्या एकूण एक पेचात बळ पुरवणारं. समंजस सोबत करणारं. तिच असणं मुळासकट स्वीकारणारं.

ती देवळात जात नाही. मशिदीत वा कुठल्याच समाजमंदिरात माथा टेकवत नाही. ती देव मानत नाही. इतरांची भीडही त्याकरता बाळगत नाही. आदर्श बाई म्हणवून घ्यायला ती कधीच धडपडत नाही. त्यासाठी नकोसं वाटणारं, तिला इंटरेस्ट नसणारं, मुळीच न पटणारं काहीबाही समाजाखातर बिलकूल ती स्वीकारत नाही.     

सणवार, घरगुती सोहळे यात रमायला, मिरवायला नाही जमत तिला फार. व्रतवैकल्यं, उपासतापास अशा रूढीबाज उपचारांवर तिनं कधीच फुली मारलीय. तिच्या विश्वासाच्या पोतडीत त्यांना कधी जागाच नाही मिळू शकली. रक्तदान मात्र ती नेमानं करते. आणि शाळांमधून वाचनप्रियता वाढावी म्हणून मोफत शिबिरही घेते. परंपरा पाळत नाही म्हणून ती टोकाची डावीही नाही तशी. माणसाची मन शांतवणारी आध्यात्मिकता ती मान्य करते म्हणूनच. फक्त आधुनिकता म्हणजे निखळ पुरोगामीत्व यालाही तिचा साफ नकारच आहे. या दोन्हींना सांधणारा तंतू कुठे गवसतोय का हा तिचा अथक शोध स्वतःशीच सुरू आहे. बाई निव्वळ पिचत जगणारीच आणि पुरुष केवळ तिला पिळून-पिचून घेणाराच अशी दुहेरी विभागणी तिला कधीच मान्य नाही. बाई-पुरुषाच्या नात्यातल्या किमान पन्नासेक ग्रे शेड्स म्हणूनच तिला खुणावतात. त्या ती चाचपडत राहते आशाळभूतपणानं, विश्वासानं. समजुतीचा, मानवतेचा धागाच त्यांचं एकमेकातलं मिसळून जाणं समृद्ध, सजीव करेल या आशावादाची ती निस्सीम पाईक आहे ते याखातरच.  

नवरा तिचा सोबती आहे, सहचर आहे, तिनं न होऊ दिलेल्या तिच्या मुलांचा बाप आहे आणि मुख्य म्हणजे आई बनून तिच्यावर माया करणारा, काळजी वाहणारा तिचा सर्वांत जवळचा सखा आहे. तिचं नारीपण गृहीत न धरणारा आणि नात्याचं मोल जाणून असणारा उमदा दिलखुलास पुरुष आहे. 

बाईचीच म्हणवली जाणारी अन पुरुषांनी अंग काढून घेतलेली काहीबाही कामं तिला नाही मानवत फारशी. ते दोघं एकत्र असताना तो चहा-नाश्ता उरकून टाकतो फटाफट आणि ती घरामागच्या टेकडीवरून नुकतीच आलेली असते रपेट मारून. लंचसाठी तो खरपूस पोळ्या बनवतो आणि ती भाजी करून मोकळी होते. गप्पांगप्पांत किचनपासून ते खोल्यांमधला सगळाच पसारा कधी आवरून होतो ते तिलाही  कळत नाही. तिकडे त्यानं सवयीनं भांडी लख्ख घासून ठेवलेली असतात ओट्यावर. घर सजवायची, ते कायम अवरलेलं, नीटनेटकं ठेवायची तिची शिस्त घरात भरून राहिलेली. म्हणूनच त्यानं केलेला पसारा ती फिरफिरून आवरत राहणारी. घरासकट साऱ्या पै-पाहुण्यांना या सगळ्याची सवय होऊन गेलेली. ती पेपर वाचत सोफ्यावर पडलेली असते निवांत,  तो खाण्याकरता काही बनवत असतो स्वयंपाकघरा, याचं फारसं नवल नाही वाटत आताशा कुणाला. तिनं बनवलेल्या सूपमध्ये वरून पेरलेली कोथिंबीर त्यानंच चिरलेली असणार वा पोह्यातला कांदा त्यानंच चिरून दिलेला असणार हे हमखास ठाऊक असतं त्यांना. 

ती प्रश्न विचारत राहते. अव्याहत अन अथक. भवतालाला, परिस्थितीला, परंपरेला, इतिहासाला आणि वर्तमानालाही. तसंच तिच्या बाईपणाला, सोबतच्या पुरुषपणाला, तिच्या स्त्रीधर्माला, बाई-पुरुषातल्या अनवट  नात्याला, त्यांच्यात वसणाऱ्या आसक्तीला, एकूणच माणसा-माणसांतल्या ताण्याबाण्याला, बाई म्हणूनच्या तिच्या शारीर उपचारांना, हव्या नकोशा संवेदनांना. आणि अर्थातच कोड ऑफ कंडक्टचा सीसीटीव्ही चालवणाऱ्या एकंदरच व्यवस्थेला ती प्रश्न करत राहते. तिच्या सत्त्वालाच ती राहूनराहून कुरतडत राहते. अशानं ती आगावू ठरते, उर्मट ठरते, संस्कारहीन ठरते,  बेताल ठरते, वाह्यात ठरते. फार थोड्यांना ती खरीखुरी कळून येते. ती मात्र बेफिक्रे बनत उत्तरांच्या शोधात प्रश्नांचा तळ ढवळत राहते.

 

लेखिका स्त्रीप्रश्नाच्या अभ्यासक आहेत.

shubhangigabale@rediffmail.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘लव जिहाद’ असो की ‘समान नागरी कायदा’, यांचा मूळ हेतू स्त्रियांना दुय्यम ठेवण्याचा आहे. त्यामुळेच त्यांना राजकारणात महत्त्व प्राप्त होते. स्त्रियांनी हे सत्य जाणून भानावर यायला हवे

हे दोन्ही कायदे स्त्री-स्वातंत्र्य मर्यादित करणारे आणि स्त्रियांवर पुरुषसत्ताक गुलामी कायम ठेवणारे आहेत. ‘लवजिहाद’चा कायदा स्त्रियांना आपला जीवनसाथी निवडण्याचा मूलभूत अधिकार नाकारतो; ‘समान नागरी कायदा’ लग्न, घटस्फोट, पोटगी, दत्तक आणि वारसा याबाबतीत भरवसा देऊन स्त्रीला ‘पत्नी’ म्हणून मर्यादित करतो. आपली गुलामी आणि दुय्यम स्थान संपवणारे राजकारण स्त्रियांना ओळखता आले पाहिजे.......