महाराष्ट्राचा खराखुरा व्हॅलेंटाइन!
पडघम - सांस्कृतिक
टीम अक्षरनामा
  • पं. मधुकर अनंत मेहेंदळे
  • Tue , 14 February 2017
  • सांस्कृतिक Sanskrutik पं. मधुकर अनंत मेहेंदळे Madhukar Anant Mehendale प्रेमदिन Valentine Day

आज १४ फेब्रुवारी. व्हॅलेंटाइन डे. प्रेमदिवस. एकमेकांविषयी प्रेम व्यक्त करण्याचा दिवस. ते तुम्ही आम्ही आपण सगळेच आपापल्या परीनं व्यक्त करूच. पण आज एका व्यक्तीचा वाढदिवसही आहे, असं तुम्हाला सांगितलं तर? तुमची पहिली प्रतिक्रिया काय असेल? पुढे असंही सांगितलं की, हा त्या व्यक्तीचा ९९वा वाढदिवस आहे. म्हणजे त्या व्यक्तीनं आजच शंभराव्या वर्षांत पर्दापण केलं आहे. गेल्या चार-पाच वर्षांपर्यंत कार्यरत असणाऱ्या, लेखन-संशोधनात गढून गेलेल्या, आंतरराष्ट्रीय पातळीवर संस्कृत अभ्यासकांमध्ये अतिशय आदर असलेल्या या व्यक्तीचं नाव आहे – मधुकर अनंत मेहेंदळे.

संस्कृत, प्राकृत, निरुक्त, महाभारत; तसंच अवेस्ता या पारशी धर्मग्रंथाचे अभ्यासक, प्रकांड पंडित असलेल्या मेहेंदळे यांच्या कामाची नुसती यादी करायची म्हटली तरी एक मोठा ग्रंथ होईल. डेक्कन कॉलेज, भांडारकर प्राच्यविद्या संस्था या ठिकाणी त्यांनी प्रदीर्घ काळ काम केलं. ‘डिक्शनरी ऑफ संस्कृत ऑन हिस्टॉरिकल प्रिन्सिपल्स’ आणि ‘कल्चरल इंडेक्स ऑफ महाभारता’ ही त्यांची छाती दडपून टाकणारी कामं आंतरराष्ट्रीय पातळीवर वाखाणली गेली आहेत. वेद, महाकाव्य, महाभारत, निरुक्त, ऐतिहासिक भाषाशास्त्र हे त्यांचे अभ्यासाचे विषय आहेत. त्यांनी संस्कृत, इंग्लिश आणि मराठी या तिन्ही भाषांमध्ये ग्रंथलेखन व पुस्तकलेखन केलं आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर अतिशय आदर असलेल्या या प्रकांड पंडिताविषयी महाराष्ट्रात फारसं कुणाला काही माहीत नसतं. डॉ. अशोक केळकर, कृष्ण अर्जुनवाडकर यांच्याविषयी तरी कुठं माहीत असतं! तर ते असो. मेहेंदळे यांनी आपलं बहुतांश लेखन इंग्रजी, संस्कृतमध्ये केलं असलं तरी त्यांनी मराठीमध्येही अनेक लेख व काही पुस्तकंही लिहिली आहेत. ‘नवभारत’, ‘सत्याग्रही विचारधारा’ या मासिकांतून त्यांनी केलेलं लेखन आवर्जुन वाचावं असं आहे.

शिक्षणानं, पेशानं आणि कर्मानं पुणेकर असलेले मेहेंदळे मूळचे मध्यप्रदेशमधील. तेथील निमार जिल्ह्यातील हरसूड या गावी मेहेंदळे यांचा १४ फेब्रुवारी १९१८ रोजी जन्म झाला. त्यांचे वडील तिथं रेल्वेमध्ये नोकरीला होते. प्राथमिक शिक्षणानंतर मात्र मेहेंदळे बडोद्याला आले. १९३७ साली त्यांनी पदवी मिळवली. नंतर पदव्युत्तर शिक्षणासाठी ते मुंबईच्या विल्सन कॉलेजमध्ये दाखल झाले. तर १९४३ साली पुण्याच्या डेक्कन कॉलेजमधून त्यांनी ‘हिस्टॉरिकल ग्रामर ऑफ इन्स्क्रिप्शनल प्राकृत’ या विषयात पीएच.डी. केली. शेवटपर्यंत ते पहिल्या श्रेणीत उत्तीण झाले. त्यांचा पीएच.डी.चा प्रबंध डेक्कन कॉलेजने १९४८ झाली प्रकाशित केला. त्याच वर्षी त्यांचं ‘अशोकन इन्स्क्रिप्शन्स इन इंडिया’ हे पुस्तकही प्रकाशित झालं.

मेहेंदळे हे त्यांच्या कुटुंबातले पहिलेच डॉक्टरेट पदवी मिळवणारे. शिक्षणानंतर कर्नाटकातील बागलकोटमधील बसवेश्वर कॉलेजमध्ये ते प्रपाठक म्हणून जॉइन झाले, परंतु लवकरच म्हणजे १९४५ साली नवसारीला परत येऊन एस.बी. घरडा  कॉलेमध्ये संस्कृतचे प्राध्यापक झाले. १९५१ पर्यंत त्यांनी तिथं काम केलं. त्या दरम्यान त्यांनी वेद आणि संस्कृत ग्रंथावर लेख लिहायला सुरुवात केली. १९५१ साली मेहेंदळे पुण्याच्या डेक्कन कॉलेजमध्ये रीडर म्हणून जॉईन झाले, सात वर्षांनी तिथंच प्राध्यापक झाले. याशिवाय देशातील आणि परदेशातील अनेक विद्यापीठांमध्ये व्याख्यानं दिली आहेत.  

१९५२-५४ साली त्यांना जर्मनीतील Goettingen विद्यापीठाने अभ्यागत प्राध्यापक म्हणून बोलावलं. तिथं त्यांनी प्रा. ई. Waldschmidt यांना प्राकृतावरील संशोधनात मदत केली. १९५७-५८ साली त्यांना अमेरिकेच्या रॉकफेलर फाउंडेशनची प्रतिष्ठेची शिष्यवृत्ती मिळाली. १९७३ साली त्यांची ‘डिक्शनरी ऑफ संस्कृत ऑन हिस्टॉरिकल प्रिन्सिपल्स’ या शब्दकोशावर संपादक म्हणून नेमणूक झाली. ए.एम.घाटगे मुख्य संपादक होते. हा शब्दकोश संस्कृतच्या अभ्यासकासाठीच उपयुक्त आहे असे नाही तर वेद-उपनिषदांची परंपरा, त्यांचा अर्थ, त्यातील संज्ञा समजावून घेण्यासाठीही हा शब्दकोश विश्वसनीय दस्तवेज आहे. चार हजारांहून अधिक पानांचा हा शब्दकोश जगभरातील संस्कृतचे अभ्यासक वापरतात.

निवृत्तीनंतर रा.ना.दांडेकरांनी मेहेंदळे यांना भांडाकर प्राच्यविद्या संशोधनसंस्थेत ‘एपिलॉग ऑफ द महाभारत’चा संपादक म्हणून बोलावलं. तिथं त्यांनी पुढे ‘कल्चरल इंडेक्स ऑफ महाभारत’ हा महत्त्वाकांक्षी प्रकल्पही पूर्ण केला. सलग पंचवीस वर्षं त्यांनी कुठलाही मोबदला न घेता या प्रकल्पावर काम केलं. पाचेक वर्षांपूर्वी त्यांनी भांडारकरसाठी काम करणं थांबवलं. वाचन आणि नातवांसाठी वेळ देता यावा म्हणून. नातवांसाठी त्यांनी ‘द लिटल प्रिन्स’ या जगप्रसिद्ध बालकांदबरीचा मराठी अनुवादही केला.

महाभारत हा मेहेंदळे यांच्या सर्वाधिक आवडीचा विषय. त्याविषयी त्यांनी काही वर्षं ‘सत्याग्रही विचारधारा’ या मासिकात सदरही लिहिलं आहे. ‘महाभारताविषयीच्या अनिवार प्रेमामुळे रामायणाचा अभ्यास करायचा राहून गेला’, असं त्यांनी म्हटलं आहे, पण त्यांचा रामायणाचाही चांगला अभ्यास होता. ‘नवभारत’ मासिकाच्या मे-जून १९८८च्या अंकात मेहेंदळे यांचा ‘रामायण : समज आणि गैरसमज’ हा तब्बल २१ पानांचा लेख आहे. या लेखात त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ‘रिडल्स इन रामायणा’ या पुस्तकाचा साधार व तपशीलवार प्रतिवाद केला आहे. असाच प्रतिवाद त्यांनी भाऊ धर्माधिकारी यांच्या ‘गीताचिकित्सा’ या पुस्तकाचाही (नवभारत, नोव्हें-डिसेंबर १९९२) केला आहे. खरं तर ही दोन्ही भाषणं आहेत. त्यांच्या अभ्यासाचा आवाका, त्यातील बारकावा आणि ऋजुता या निवडक लेखांतून जाणून घेता येईल. खरा संशोधक नेहमीच नम्र असतो, पण तो तितकाच परखडही असतो. नम्रता व्यक्ततेत असते आणि स्पष्टता विचारांत असते, याचा नितांतसुंदर प्रत्यय त्यांच्या लेखनातून येतो. ऑक्टोबर १९९६च्या अंकात मेहेंदळे यांनी विनोबा भावे यांच्या ‘उपनिषदांचा अभ्यास’ या पुस्तकाचं सविस्तर परीक्षण केलं आहे. त्याच्या शेवटी ते म्हणतात – “विनोबांनी उपनिषदांचा सूक्ष्म अभ्यास आणि त्यावर दीर्घकाळ चिंतन केले आहे ह्यात संशय नाही. खेरीज त्यांचे अनुभवविश्वही फार मोठे आहे. त्यामानाने माझे वाचन आणि अनुभवविश्व मर्यादित आहे. माझ्याजवळ जी शिदोरी आहे तिच्या आधारे वरील परीक्षण केले आहे. ते पूर्ण झाल्यावर फिरून एकदा म्हणावेसे वाटते की, प्रस्तुत ग्रंथ हे विनोबांचे ओमकार-उपनिषद आणि शान्ति-उपनिषद आहे. त्यांत उपनिषदांत सांगितलेले जसे आहे, तसेच उपनिषदांत न सांगितलेले पण विनोबांनी आपल्या परिणतप्रज्ञेने कल्पिलेले असे बरेचसे आहे. उपनिषदांत ओमकार आणि शान्ति ह्याविषयी काय कल्पना आहे, किंवा काय कल्पना असावी असे विनोबांना वाटते, हे ह्या ग्रंथवाचनाने समजू शकते.”

तुम्हाला वाटेत असेल की, संस्कृत, प्राकृत, वेद, उपनिषदं, महाभारत यांवर इंग्रजी-मराठी-संस्कृतमध्ये लेखन करणारा संशोधक अतिशय बोजड लिहीत असेल. तर तुमची समजूत अतिशय चुकीची आहे असंच म्हणावं लागेल. विनोबा भाव्यांविषयीच्या वरील परिच्छेदातून त्याची कल्पना येऊ शकेल. मेहेंदळे यांचं मराठी लेखन अतिशय सोपं, सुगम आणि विचारगर्भ असतं. मराठीच्या प्राध्यापकांनी मेहेंदळे यांचं लेखन आवर्जुन वाचायला हवं. अतिशय विद्वताप्रचूर विषयांवरही किती साध्या, सोप्या पद्धतीने लिहिता येतं, याचा वस्तुपाठ म्हणून मेहेंदळे यांच्या लेखनाचा हवाला देता येईल.

आयुष्यभर लेखन-संशोधनात गढून गेलेले मेहेंदळे यांचं त्यांच्या पत्नीवर निरतिशय प्रेम होतं. त्या काळी त्यांनी जातीबाहेर जाऊन त्यांच्याशी लग्न केलं. त्यांचं सहजीवनही गांधीवादी विचारानं समृद्ध झालेलं होतं. त्यांचं नाव कुसुम काशिनाथ परळीकर. १४ डिसेंबर १९४१ रोजी त्यांचा विवाह झाला. गांधीवादी असणाऱ्या कुसुमताईंनी शेवटपर्यंत खादीची वस्त्रं वापरली. मेहेंदळेही खादीची वस्त्रं वापरतात. कुसुमताईंनी डेक्कन कॉलेजमध्ये सहाय्यक ग्रंथपाल म्हणून काम केलं. त्यांना अशोक आणि प्रदीप अशी दोन मुलं आहेत. काही वर्षांपूर्वी कुसुमताईंचं निधन झालं. आजच्या या शतायुषीप्रवेशाच्या वेळी त्या मेहेंदळे यांच्यासोबत नाहीत, याची खंत त्यांना जाणवत असेल.

आज मेहेंदळे यांना त्यांचे कुटुंबीय त्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देतील. याही वयात विनोदबुद्धी राखून असलेल्या, ऐकायला कमी येत असलं तरी स्मरणशक्ती बऱ्यापैकी खणखणीत असलेल्या मेहेंदळे यांचा शतकप्रवेश साजरा केला जाईल. त्यांच्या प्रकृतीच्या कारणास्तव त्यांच्याकडे जाऊन त्यांना शुभेच्छा देता येणंही अनेकांना शक्य होईलच असं नाही. पण त्यांच्याविषयी आदर व्यक्त करणं, प्रेम व्यक्त करणं हे आपलं कर्तव्य आहे. संत व्हॅलेटाइनबद्दल आपल्याला माहिती असो नसो, पं. मधुकर अनंत मेहेंदळे यांच्याविषयी माहिती करून घ्यायला काहीच हरकत नाही. कारण मेहेंदळे हे अख्ख्या महाराष्ट्राचे खरेखुरे व्हॅलेंटाइन आहेत!

डॉ. मधुकर मेहेंदळे यांच्या कुटुंबीयांनी ही त्यांच्याविषयीची फिल्म केली आहे.

म. अ. मेहेंदळे यांची काही इंग्रजी पुस्तके : १.) हिस्टॉरिकल ग्रामर ऑफ इन्स्क्रिप्शनल प्राकृत, १९४८, २.) निरुक्त नोटस, भाग १, १९६५, ३.) निरुक्त नोटस, भाग २, १९७८, ४.) वेदा मॅन्युस्क्रिप्टस, १९६४, ५.) सम अॅस्पेक्टस ऑफ इंडो-आर्यन लिंग्विस्टिक्स, १९८६, ६.) डिक्शनरी ऑफ संस्कृत ऑन हिस्टॉरिकल प्रिन्सिपल्स – डॉ. घाटगे-मेहेंदळे, १९७३, ७.) रिफ्लेक्शन्स ऑफ संस्कृत ऑन हिस्टॉरिकल प्रिन्सिपल्स – डॉ. घाटगे-मेहेंदळे, १९७३, ८.) मधुविद्या, २००१

मराठी पुस्तके : १.)  ऋग्वेद संहिताकार आणि फादर इस्तेलर, १९७६, २.) मराठीचा भाषिक अभ्यास, १९७९, ३.) प्राचीन भारत – समाज आणि संस्कृती, २००१, ४.) वैदिक वाङ्मयातील प्रश्नोत्तरे, १९८०, ५.) वरुणविषयक विचार, ६.) खेळ मांडीयेला मूळ लेखिका व्हर्जनिया एम. अॅक्सलिन, स्वैर अनुवाद डॉ. म. अ. मेहेंदळे,  डॉ. संजय ओक, २००६, ७.) वेदार्थनिर्णयाचा इतिहास

.............................................................................................................................................

editor@aksharnama.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘जातवास्तव’ स्वीकारल्याशिवाय सत्ता आणि संसाधनांचा जातीय ‘असमतोल’ दूर करता येणार नाही. उमेदवारांची नावे जातीसकट जाहीर करणे, हा एक ‘सकारात्मक प्रयोग’ आहे

महायुतीच्या ३८ उमेदवारांपैकी १९ मराठा आहेत. विशेष म्हणजे हे सगळे श्रीमंत मराठे आहेत. महाविकास आघाडीच्या ३९ उमेदवारांपैकी २४ मराठा आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या ३२ उमेदवारांपैकी ५ अनुसूचित जाती, १३ ओबीसी आणि ४ मराठा आहेत. यावरून एक गोष्ट लक्षात येते की, मविआ असो वा महायुती एका विशिष्ट समाजाकडेच सत्ताबळ झुकलेले दिसते. मात्र वंबआने उमेदवारी देताना जात समतोल पाळलेला दिसतो.......

स्वयंपाकघरात टांगलेल्या कॅलेंडरवरच्या चित्राइतकीच थरारकता वा जाहिरातीतून एखादं उत्साहवर्धक पेय विकणार्‍या म्हातार्‍या अमिताभ बच्चनइतकीच विश्वासार्हता, दहा वर्षं राष्ट्रीय व्यासपीठावर वावरलेल्या मोदींच्या व्यक्तिमत्त्वामध्ये उरली आहे...

प्रचारसभांमधून दिसणारे पंतप्रधान दमले-भागलेले, निष्प्रभ झालेले आहेत. प्रमाणापलीकडे वापरलेली छबी, अतिरिक्त भलामण आणि अतिश्रम, यांमुळे त्यांची ‘रया’ गेल्यासारखी वाटते. एखाद्या ‘टी-ट्वेंटी’ सामन्यात जसप्रीत बूमराला वीसच्या वीस षटकं गोलंदाजी करायला लावावी, तसं काहीसं हे झालेलं आहे. आक्रसत गेलेला मोदींचा ‘भक्तपंथ’ टिकून असला, तरी ‘करिष्मा’ उर्फ ‘जादू’ मात्र चाकोरीबद्ध झालेली आहे.......

भाजपच्या ७६ पानी ‘जाहीरनाम्या’त पंतप्रधान नरेंद्र मोदींची तब्बल ५३ छायाचित्रं आहेत. त्यामुळे हा जाहीरनामा आहे की, मोदींचा ‘छायाचित्र अल्बम’ आहे, असा प्रश्न पडतो

काँग्रेसच्या ४८ पानी जाहीरनाम्यात राहुल गांधींची फक्त पाच छायाचित्रं आहेत. त्यातली तीन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत आहेत. याउलट भाजपच्या जाहीरनाम्याच्या मुखपृष्ठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीमागे बळंच हसताहेत अशा स्वरूपाचं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचं छायाचित्र आहे. त्यातली ‘बिटवीन द लाईन’ खूप सूचक आणि स्पष्टता सूचित करणारी आहे.......

जर्मनीत २० हजार हत्तींचा कळप सोडण्याची धमकी एका देशाने दिली आहे, ही ‘हेडलाईन’ जगभरच्या प्रसारमाध्यमांमध्ये गाजतेय सध्या…

अफ्रिका खंडातील बोत्सवाना हा मुळात गरीब देश आहे. त्यातच एवढे हत्ती म्हणजे दुष्काळात तेरावा महिना. शेतांमध्ये येऊन हत्ती मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान करत असल्याने शेतकरी वैतागले आहेत. याची दखल बोत्सवानाचे अध्यक्ष मोक्ग्वेत्सी मेस्सी यांनी घेतली आहे. त्यामुळेच त्यांनी संतापून एक मोठी घोषणा केली आहे. ती म्हणजे तब्बल २० हजार हत्तींचा कळप थेट जर्मनीमध्ये पाठवण्याची. अनेक माध्यमांमध्ये ही ‘हेडलाईन’ गाजते आहे.......