तुमचं आमचं सेम असतं?
अर्धेजग - कळीचे प्रश्न
शर्मिष्ठा भोसले
  • प्रातिनिधिक छायाचित्र
  • Tue , 14 February 2017
  • अर्धे जग women world valentine day प्रेम love ट्रान्सजेंडर Transgender राइट टू लव्ह Right to Love नितिन आगे Nitin Aage

कुणाला कुणाबद्दल वाटणारं प्रेम कितीही खासगी असलं तरी जरा खोल गेलं तर जाणवतं, ‘पर्सनल इज पॉलिटीकल’चा नियम इथंही लागू पडतोच की! कुणी कुणावर प्रेम करावं, ते व्यक्त करावं की नाही, ते कसं करावं, कधी करावं हे सतत इथली एक अदृश्य, पण प्रबळ असणारी यंत्रणा ठरवत असते.

कुणाच्या स्वप्नातला राजकुमार किंवा राजकुमारी कशी असावी वा नसावी याचाही एक साचाच मनात पक्का होऊन जातो. मग त्याला वा तिला अगदी मुभाच नसते त्या वर्णनाबाहेरचं असण्याची. आपल्या प्रिय व्यक्तीचं त्याहून वेगळं दिसणं-असणं समोरच्यानं स्वीकारलंच तरी आजूबाजूचा भवताल ते काही फारसं आवडलं नसल्याचे मॅसेजेस देत राहतो.

भारतासारख्या जात-धर्म-वर्ग-वर्ण-लिंगाच्या संदर्भानं येणाऱ्या धारणा प्रचंड तीव्र असलेल्या देशात तर प्रेम ही सर्वार्थानं एक राजकीय कृतीच आहे. ते दोन भिन्नलिंगी व्यक्तींचं असेल तरी होणारा प्रचंडच गदारोळ पाहिला की, वाटतं समलिंगी जोडप्यांबाबत काय होत असेल? इतरही बहुलिंगी असण्याची आयडेंटीटी वागवत असलेल्यांचं काय होत असेल?

माझा एक मित्र आणि मैत्रीण गेल्या चार वर्षांपासून लग्न करून एकत्र राहतात. त्यांचा संसार सुखाचा चाललाय, पण घरच्यांचा विरोध मावळत नाही. कारण मित्राची बायको ट्रान्सजेंडर आहे. मित्र सांगतो, ‘मला माझी साथीदार व्यक्ती म्हणून माझ्यासाठी योग्य वाटली. अर्थात आमच्या एकत्र येण्याला, सोबत राहण्याला अजूनही खूप विरोध होतो आहे. पण तो आम्ही गृहीतच धरलाय. प्रेम जाती-धर्माच्या पलीकडं पाहायला शिकवतं असं लोकं म्हणतात. मला तर प्रेमानं लिंगाच्याही पलीकडं पहायला शिकवलं असं मी म्हणेन. समाजाला कदाचित बंडखोरीपण ‘सिलेक्टिव्ह’ प्रकारचीच आवडते. आमच्या सहजीवनाच्या मर्यादाही आम्हाला माहीत आहेत. येत्या काळात एक मूल दत्तक घ्यायचं ठरवलंय.’ मित्राची जोडीदार सांगते, ‘आम्ही राहतो ती दलित-मुस्लीम मिश्र वस्ती आहे. आम्ही चांगले कमावत असलो, आमचा आर्थिक स्तर बरा असला तरी या शहरातल्या ‘सभ्य’ म्हणवणाऱ्या वस्तीत आम्हाला घर मिळणार नाही हे माहीत होतं. आमच्या अंदाजाप्रमाणेच इथं ते मिळालं.’ ऐकल्यावर वाटून गेलं, समाजातले शोषित-वंचित आणि बिनचेहऱ्याचे लोक प्रेमाबाबत जास्त सहिष्णू आणि जगण्याबाबत जास्त खुले असतात का?  

प्रेमप्रकरणात होणाऱ्या हत्या किंवा हिंसेच्या मागे काय काय असेल? प्रत्येक पिढ्यांनी ऐकलेल्या ‘खानदान की इज्जत’ आणि ‘लोग क्या कहेंगे’च्या पलीकडं जात ते शोधायचा प्रयत्न करायला हवा.

सगळ्या वर्तमानपत्रांतून प्रेमदिनाचा माहोल सांगणाऱ्या बातम्या आणि लेख आता येत असतात. एका वृत्तपत्राच्या रविवार पुरवणीच्या संपादकाने मला फोन केला. म्हणाले, ‘आजची पिढी प्रेमाबद्दल काय विचार करते, प्रेम या संकल्पनेशी तिचं नातं काय असं लिहिणारं तरुण पिढीतलं एखादं नाव मला सुचवशील का? मी काही नावं सांगितली. पण हे सगळे लेखक-कवी खूप वेगळ्या, कमालीच्या वास्तववादी पातळीवर जाऊन प्रेमाचा विचार करू पाहणारे आहेत. त्यांचं सगळं लिहिणं-बोलणं अगदी आजच्यासाठीचं आहे. जसं की, ‘सायकोच्या ब्रेकोत्तर तेराव्या प्रेयसीसाठी’ अशा शीर्षकाची कविता लिहिणारा स्वप्नील शेळके.’ यावर संपादक म्हणाले, ‘असं असेल तर नको. आमचा वाचक मुळात अगदीच मध्यमवर्गीय, प्रेमाविषयी विशिष्ट कल्पना बाळगलेला आहे. त्याला या तरुण पिढीचं प्रेमाबाबतचं असं व्यक्त होणं कितपत पटेल, पचेल ते सांगता येत नाही. त्यामुळे ते जाऊ दे.’ त्यांनी मग एका त्यांना परवडेबल ललित लेखकाला तो लेख लिहायला सांगितला.

हे सगळं सांगायचं इतक्यासाठीच की, आज सगळ्याच जगण्यात, स्त्री-पुरुष नातेसंबंधात इतकी दृश्यादृश्य उलथापालथ होत असताना प्रेम या संकल्पनेकडं तरुणांनी त्याच ‘पारंपरिक’ अंदाजात पाहावं, त्याला निव्वळ गुलाबी रंगातच रंगवावं हा अट्टहास योग्य आहे का?

खर्ड्याच्या नितीन आगेची कथित प्रेमप्रकरणातून हत्या झाली तेव्हा मी गावाकडून नुकतीच पुण्यात शिकायला गेले होते. शहरातल्या ठरलेल्या अड्ड्यांवर संध्याकाळी तासनतास बसणारी जोडपी नजरेला तोवर सवयीची झाली होती. दुसरीकडे गावी ‘प्रेम’ या संकल्पनेला असणारा पूर्वग्रहांचा विळखासुद्धा पाहिला होता. विशेषत: जातजाणीवेतून होणारा विरोध दुरून ऐकला पाहिला होता. पुण्याहून खर्ड्याला ‘लाँग मार्च’ काढताना वाटेत ‘हे प्रेम आणि ते प्रेम’ असा संघर्ष मनात खूप उफाळून आला. नितीनच्या प्रकरणात नाव जोडली गेलेली ती मुलगी मराठा होती. मी अपघाताने मराठा जातीत जन्मले म्हणून माझं अनेक सामाजिक बाबतीत लाभार्थी असणं, जातीचे काच सोसावे न लागणं याचा एक गिल्ट आला. त्याचं काय करायचं हेही नीट उमगलं नाही. प्रेमाचा हा रंग नक्की कुठला म्हणायचा मग?

खर्ड्याची घटना झाल्यानंतर पुण्यात अभिजित कांबळे, सुशांत आशा आणि अशा काही मित्रमैत्रिणींनी मिळून ‘राईट टू लव्ह’ची चळवळ सुरू केली. केवळ प्रेमाला ग्लोरिफाय न करता इतर अनेक हेतू ठेवत त्यांनी या चळवळीचा विस्तार केलाय. जसं की, भारतीय संविधानानं दिलेल्या मूलभूत अधिकारांना अधोरेखित करणं, स्त्री आणि पुरुषांचा जोडीदार निवडीचा हक्क स्पष्ट करणं, प्रेमाची स्त्री-पुरुष संबंधापलीकडं जात असलेली व्यापकता सांगणं. आज पुण्यातल्या गुडलक चौकातून दुपारी चार वाजता हा मार्च निघणार आहे. यात कुणीही सहभागी होऊ शकतं.

उर्दूला ‘प्रेमाची भाषा’ म्हणतात. आजघडीला ती ‘मुसलमानी भाषा’ होऊन बसलीय. औरंगाबादचे शायर शमीम खान म्हणतात, ‘लोगों ने उर्दू को बेवजह कलमा पढा दिया.’ तर, जिगर मुरादाबादी साहेबांनी लिहून ठेवलंय, ‘इक लफ्जे मोहब्बत का अदना सा फसाना है, सिमटे तो दिले, आशिक फैले तो जमाना है’ अगदी लहानशी गोष्ट सांगतो असं म्हणत जिगरसाहेबांनी पसायदान मांडलंय. ते लिहितात, ‘अख्ख्या पृथ्वीवरच्या कुण्या एका प्रिय माणसाबाबत वाटणारं मर्यादित प्रेम जर विस्तारायचं ठरवलं तर ते सगळ्या सजीव-निर्जीवांना कवेत घेऊ शकतं.’  

लव्ह जिहाद, दलित-सवर्ण संघर्ष, मोर्चे-प्रतिमोर्चे या अशा द्वेषपेरणीच्या हंगामात तुमच्या-माझ्या मनातही जिगरसाहेबांना अपेक्षित असलेलं प्रेम उगवावं! आमेन!!

 

लेखिका मुक्त पत्रकार आहेत.

sharmishtha.2011@gmail.com

Post Comment

Shubham Kulkarni

Wed , 15 February 2017

Special लेख आहे .साधारण प्रेमदिन म्हणजे फ़क्त भिन्न लिंगाच्या व्यक्तींचा दिवस असा आशय घेऊन अनेक लेख़क लेख लिहितात पण तुमच्या शोधक वृत्तिने अश्या समाजातील घटकांच्या मनाचा ठाव घेतला जो बहुदा नाकारल्याच् जातो


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘लव जिहाद’ असो की ‘समान नागरी कायदा’, यांचा मूळ हेतू स्त्रियांना दुय्यम ठेवण्याचा आहे. त्यामुळेच त्यांना राजकारणात महत्त्व प्राप्त होते. स्त्रियांनी हे सत्य जाणून भानावर यायला हवे

हे दोन्ही कायदे स्त्री-स्वातंत्र्य मर्यादित करणारे आणि स्त्रियांवर पुरुषसत्ताक गुलामी कायम ठेवणारे आहेत. ‘लवजिहाद’चा कायदा स्त्रियांना आपला जीवनसाथी निवडण्याचा मूलभूत अधिकार नाकारतो; ‘समान नागरी कायदा’ लग्न, घटस्फोट, पोटगी, दत्तक आणि वारसा याबाबतीत भरवसा देऊन स्त्रीला ‘पत्नी’ म्हणून मर्यादित करतो. आपली गुलामी आणि दुय्यम स्थान संपवणारे राजकारण स्त्रियांना ओळखता आले पाहिजे.......