रेनकोट आणि शॉवर कॅप
सदर - ‘कळ’फलक
संजय पवार
  • रेखाचित्र - संजय पवार
  • Tue , 14 February 2017
  • ‘कळ’फलक Kalphalak संजय पवार Sanjay Pawar नरेंद्र मोदी Narendra Modi मनमोहनसिंग Manmohan Singh सोनिया गांधी Sonia Gandhi भाजप BJP

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उत्तम वक्ते आहेत, यावर कुणाचं दुमत असू शकणार नाही. त्यांच्या याच भाषणबाजीवर खूश होऊन २०१४च्या लोकसभा निवडणुकीत लोकांनी भरपूर मतं देऊन, लोकसभेत भाजपला निर्विवाद बहुमताच्या पुढे नेत, मोदींना थेट पंतप्रधानपदी विराजमान केलं.

गुजरातची सलग तीन टर्म कमांड सांभाळलेल्या मोदींनी आमदारकीशिवाय मुख्यमंत्री (नंतर आमदारकी) होण्याचा विक्रम केला, तसाच प्रथमच खासदार म्हणून निवडून आल्यावर थेट पंतप्रधानपद स्वीकारण्याचा विक्रमही त्यांच्या नावावर आहे!

मोदींच्या या यशात आधीच्या युपीए सरकारचा निष्क्रिय कारभार, काँग्रेससह मित्रपक्षांच्या मंत्र्यांची भ्रष्टाचाराची प्रकरणं, मनमोहनसिंग यांचं ‘मौनी बाबा’ म्हणून हेटाळलं गेलेलं व्यक्तिमत्त्व, सोनिया गांधींचा दरबारी हस्तक्षेप, अण्णा हजारे-अरविंद केजरीवाल यांच्या आंदोलनांना माध्यमांनी दिलेलं क्रांतिकारी स्वरूप आणि नंतरची मोदींची नियोजनबद्ध, बहुआयामी खर्चिक प्रचार यंत्रणा, स्वत:ला ब्रँड म्हणून विकसित करण्यात आलेलं यश, नव्या तंत्रयुगाचा, डिजिटल माध्यमाचा आकर्षक वापर, यातून सत्ताबदल घडला. मनमोहनसिंग, सोनिया गांधी यांच्या तुलनेत नरेंद्र मोदींच्या भाषणांनी मतदारांवर छाप पाडली.

मोदींचा उत्साह, शैली, त्याला साजेसे पोशाख, मंचाची सजावट यामुळे डिजिटल माध्यमांत मोदींनी अक्षरक्ष: मोहिनी घातली. त्यात भाजपचं हिंदुत्व, संघाची रणनीती आणि युपीएच्या बुडत्या जहाजातून प्रमुख उद्योगपतींनी मारलेल्या उड्या, यामुळे मोदी ब्रँड तयार झाला. सध्याच्या बाजारकेंद्री वातावरणात प्रथमच अशा एखाद्या राजकीय नेत्याचं मार्केटिंग तंत्रानं ब्रँडिंग करून निवडणुका जिंकल्या गेल्या.

गुजरात दंगलीमुळे आपली डागाळलेली प्रतिमा या काळात मोदींनी पूर्णपणे स्वच्छ करून घेतली. त्यात भरीस भर म्हणून शपथविधीला सार्क देशांच्या प्रमुखांना, खास करून पाकिस्तानी पंतप्रधानांना विशेष निमंत्रित करणं, संसदेत प्रवेश करताना पायऱ्यांवर डोकं ठेवणं आणि नंतरचे लागोपाठ विदेश दौरे… तिथं पुन्हा तोच जोश, आवेश, आवेग आणि नाट्यमय भाषणांची रेलचेल… मंत्री, सचिव, सरकारी बाबू यांना कामाला लावल्याच्या प्रसिद्ध केलेल्या बातम्या, यामुळे मोदींचा बाजारभाव इतका वाढला की, त्यापुढे भाजप हा पक्ष व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही मातृसंघटनाही दिसेनाशी झाली.

या सर्व वातावरणामुळे, लोकप्रियतेमुळे मोदींचा आत्मविश्वास अति आत्मविश्वासात बदलला. भाषणबाजीचं व्यसन जडावं इतकी त्यांची भाषणबाजीची हौस वाढली. त्यात पुन्हा वाद-प्रतिवाद, चर्चा यापेक्षा एकतर्फी भाषणबाजीचा चढलेला कैफ व अडीच वर्षांनंतरही ‘मोदी मोदी’ असा स्वत:लाच ऐकू येणारा स्वनामाचा गजर यातून मोदींचा पूर्वीचा आश्वासक, आत्मविश्वासाचा स्वर हळूहळू अहंकारात बदलत गेला. लागोपाठ वादविवाद स्पर्धा जिंकणाऱ्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यासारखा त्यांचा भाषणाचा उत्साह… सभा जिंकण्याचr, टाळ्यांची नि हंशाची व स्वनामाच्या गजराची नशा इतकी चढलीय की, त्यांना आता आपण काय व कुठे बोलतो याचं भानचं उरलं नाही. अलीकडेच संसदेत त्यांनी माजी पंतप्रधान मनमोहनसिंगांवर ‘रेनकोट घालून आंघोळ करण्यात माहीर’ अशी जी टीका केली, त्याचा भाजप व मोदीभक्त वगळता सगळ्यांनीच निषेध केला. समाजमाध्यमावरही मोठ्या प्रमाणावर नापसंती व्यक्त करण्यात आली. आता तीन महिन्यांनी त्यांच्या सरकारला तीन वर्षं पूर्ण होतील, त्या पार्श्वभूमीवर मोदींचा हा अहंकार पाहिला तर ही त्यांची आणि भाजपच्या पतनाची सुरुवात आहे. यापूर्वी ‘इंडिया शायनिंग’च्या अहंकारानं सत्ता गमवावी लागली होती, याची आठवण भाजपनं ठेवावी.

भारतीय मतदार एखाद्या नेत्याला नेतृत्व देतो, त्याचं कौतुक करतो, त्याला व त्याच्या पक्षाला भरभरून मतं देतो, सत्ता देतो. पण हे सगळं अहंकारात बदललं की, मग तो अशा अहंकाराला ‘योग्य’ जागा दाखवतो. बांगला देश युद्ध विजयानंतर इंदिरा गांधींनी वाढलेल्या अहंकारातून व सर्वसत्ताधीश होण्याच्या इच्छेतून लादलेल्या आणीबाणीचा परिणाम त्यांना १९७७च्या निवडणुकीत भोगावा लागला. याच अहंकारापोटी जनता पार्टीचा प्रयोग फसला. अनेक पक्षांची शकलं उडाली. अनेक नेत्यांची विमानं आकाशात उडाली आणि नंतर जमिनीवर आदळली. अलीकडच्या काळात प्रमोद महाजन, मायावती, जयललिता यांनीही हा अनुभव घेतला. महाराष्ट्रात याच अहंकारामुळे राष्ट्रवादी काँग्रेस व महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांची पाठ जमिनीला टेकली.

हा इतिहास बघता सध्या मोदींची वेगानं ऱ्हासपर्वाकडे वाटचाल सुरू झालेली दिसते. विशेषत: नोटबंदीनंतर मोदींची भाषणबाजी तीच असली तरी देहबोलीत तो आत्मविश्वास दिसत नाही. शब्दांचं वजन जाऊन ‘और एक जुमला’ अशी बोळवण होऊ लागलीय. उत्तर प्रदेशात करिष्मा चालला नाही तर आज हलक्या आवाजात व्यक्त केली जाणारी नाराजी उघड स्वरूप घेईल. हे सरकार ‘घोषणाबाज सरकार’ आहे, अशी पक्की नोंद होईल.

समाजसेविका सिंधुताई सपकाळांचं एक प्रसिद्ध वाक्य आहे- ‘भाषण है, तो राशन है!’ त्या अनाथ मुलांना सांभाळतात, त्यासाठी त्या भाषण देऊन (व्याख्यान नव्हे) पैसे जमवतात. म्हणून त्या जाहीरपणे सांगतात की, भाषण दिलं तरच राशन मिळेल, कार्य चालेल. याच वाक्यात थोडा बदल करून देशातले लोक मोदींना म्हणून लागलेत, ‘भाषण बहोत सुना, अब राशन दो!’ नोटबंदीनंतर तर ही भावना अधिक सार्वत्रिक होऊ लागलीय. आता घोषणा, नव्या योजना व त्यांच्या करोडोंच्या जाहिराती आणि मोदींची भाषणं, यांचं अजीर्ण होऊ लागलंय.

तरीही मोदींची भाषणबाजीची खोड काही मोडत नाही. दुसरं म्हणजे चर्चेचा त्यांना न्यूनगंड असावा. प्रश्नोत्तरं आवडत नसावीत किंवा त्यात आपण निरुत्तर झालो तर, ही भीती वाटत असावी. आधी म्हटल्याप्रमाणे प्रत्येक स्पर्धा जिंकणाऱ्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यामध्ये ‘न जाणो आपल्याला पारितोषिक मिळालं नाही तर?’ असा भयगंड तयार होतो. जिंकण्याचं व्यसन घातकी असतं. सध्या मोदींना या व्यसनानं घेरलेलं दिसतं!

कारण संसदेत ते चर्चेला, प्रश्नोत्तरांना समोरं जात नाहीत. मी येईन, वाटल्यास थांबेन आणि मला जे वाटतंय ते बोलून निघून जाईन, हा त्यांचा खाक्या असतो. आणि बोलले की एकपात्री प्रयोगच सुरू होतो! त्यात पुन्हा कारागिरी अधिक, वस्तुस्थितीचं भान कमी, रेटून खोटं बोलण्याची मातृसंस्थेची परंपराच पुढे चालवणार. अनेकदा इतिहास, भूगोल, तपशिलांचा घोळ, तर काही वेळा हुकमी गहिवरणं, नाटकी संवेदनशीलता यांचा वापर. हे सर्व आता इतकं सवयीचं झालंय की, मध्येच उभं राहून विचारावंसं वाटतं की, ‘…पण मुद्दा काय आहे?’

कारण बाहेर कितीही भाषणबाजी केली तरी त्यांच्या सरकारला संसदेत जमीन सुधारणा विधेयक मंजूर करून घेता आलेलं नाही. जीएसटी दोन वर्षं लांबलं. त्यांनी मनरेगा योजनाला ‘काँग्रेसचं थडगं’ अशी उपमा देत लोकसभेत हंशा पिकवला, पण नंतर त्याच मनरेगाला त्यांना गुपचूप स्वीकारावं लागलं. जनधन, स्वच्छ भारत अशा योजनांचा गाजावाजा खूप झाला, पण परिणाम शून्य!

नोटबंदी हा तर सपशेल फसलेला प्रयोग. काळ्या पैशाविरुद्ध धाडसी पाऊल म्हणून नमोभक्तांसह नवश्रीमंत झालेला मध्यमवर्ग सुरुवातीला चेकाळला, पण आज जसजशी वस्तुस्थिती बाहेर येतेय तसं सर्वत्र चिडीचूप! नोटबंदीमुळे किती काळा पैसा बाहेर आला, याचं उत्तर ना सरकारकडे आहे, ना रिझर्व्ह बँकेकडे.

ते अपयश झाकण्यासाठी बँक व्यवहारांवर विविध निर्बंध, डिजिटल- कॅशलेसचं तुणतुणं, तरीही काळ्या पैशाचा आकडा जाहीर करता येत नाही म्हणून मग आता प्राप्तीकर खात्याच्या धाडी. कधी काळी या सरकारच्या लाडक्या स्टेट बँकेच्या अरुंधती भट्टाचार्य यांनी तर ‘तीन महिने मागे नेणारा व आणखी तीन महिने न सुधारता येणारा निर्णय’ असं म्हणून घरचा आहेर दिलाय. तर व्याजदरात कपात न करता उर्जित पटेलांनी स्वत:च्या अधिकाराचा वापर करत नोटबंदीच्या पापातून काही प्रमाणात सुटका करून घेतलीय. शेती, लघुउद्योग, वाहन विक्री, रिअल इस्टेट… सर्वच क्षेत्रांत मंदीसदृश वातावरण, तर काही ठिकाणी भीषण अवस्था. पण भाषणाधिन मोदींचा कैफ काही उतरायला तयार नाही!

ज्या मनमोहनसिंगांनी संसदीय समितीसमोर केविलवाण्या ठरलेल्या उर्जित पटेलांना धीर देत सहयोगी सदस्यांना भडिमार करण्यापासून रोखलं आणि आदर्श चौकशी समितीचा वस्तुपाठ घालून दिला… ज्या मनमोहनसिंगांनी अर्थशास्त्रीय व संसदीय भाषेत कुठलाही चढा स्वर न लावता या निर्णयाच्या परिणामांची जाणीव करून दिली… त्यांना ‘रेनकोट घालून आंघोळ करण्यात माहीर’ असं संबोधणारे मोदी हेच खरं तर ‘शॉवर कॅप घालून आंघोळ करण्यात तरबेज’ म्हणता येईल.

शॉवर कॅप तुमचं डोकं भिजू देत नाही, बाकी आंघोळ उरकता येते. ‘ना खाऊंगा, ना खाने दूंगा’ म्हणणारे मोदी बिर्ला डायरीवर बॅकफूटवर जातात; विविध प्रांतात काँग्रेस, राष्ट्रवादी, समाजवादी, बीएसपी यांचे उमेदवार पळवतात; नामचीन गुंडांना भाजपमध्ये प्रवेश देतात… एन.डी. तिवारींसारख्या पिकल्या पानाला त्यांच्या आधी अनौरस, मग औरस ठरवलेल्या पुत्रासह भाजपमध्ये घेणारे मोदी कुठल्या तोंडानं मनमोहनसिंगांची आंघोळ काढतात?

मनमोहनसिंग निदान सर्वांग तरी वाचवतात, मोदी शॉवर कॅप घालून हमामात सुरक्षित आंघोळ करतात. वाढता दर्प व अहंकार विरोधकांना कस्पटासमान समजतो. मोदींना त्या प्रसिद्ध कव्वालीचा मुखडा नक्कीच माहीत असेल – ‘चढता सूरज धीरे धीरे ढलता है, ढल जाएगा.’

ती कव्वाली मोदींनी शांतपणे ऐकावी, काही काळ भाषणबाजी बंद करून. मोदीभक्तांनीही जरूर ऐकावी आणि रेनकोट व शॉवर कॅप यातला फरक जमला तर समजून घ्यावा!

 

लेखक प्रसिद्ध नाटककार व पटकथाकार आहेत.

writingwala@gmail.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

जर नीत्शे, प्लेटो आणि आइन्स्टाइन यांच्या विचारांत, हेराक्लिट्स आणि पार्मेनीडीज यांच्या विचारांचे धागे सापडत असतील, तर हे दोघे आपल्याला वाटतात तेवढे क्रेझी नक्कीच नाहीत

हे जग कसे सतत बदलते आहे, हे हेराक्लिटस सांगतो आहे आणि या जगात बदल अजिबात होत नसतात, हे पार्मेनिडीज सिद्ध करतो आहे. आपण डोळ्यांवर अवलंबून राहण्यापेक्षा आपल्या बुद्धीवर अवलंबून राहिले पाहिजे, असे पार्मेनिडीजचे म्हणणे. इंद्रिये सत्याची प्रमाण असू शकत नाहीत. बुद्धी हीच सत्याचे प्रमाण असू शकते. यालाच बुद्धिप्रामाण्य म्हणतात. पार्मेनिडीज म्हणजे पराकोटीचा बुद्धिप्रामाण्यवाद! हेराक्लिटस क्रेझी वाटतो, पण.......