स्त्रियांच्या वेदनांना मुखर करण्याचा प्रयत्न
पडघम - साहित्य संमेलन विशेष
मेनका धुमाळे
  • कथाकार मेनका धुमाळे
  • Fri , 03 February 2017
  • मेनका धुमाळे Menka Dhumale नवलेखन - मराठी कथा Navlekhan - Marathi Katha राजन गवस Rajan Gawas

साहित्य संमेलन ही मराठी साहित्यविश्वातली एक सर्वाधिक मोठी घडामोड आहे. अनेक लेखक-कवी-कथा\कादंबरीकारांना तिथं व्यासपीठ मिळतं. उद्या त्या व्यासपीठाचे हक्कदार असलेले आणि नुकतेच लिहून लागलेले मराठीमध्ये नवे दमदार कथाकार उदयाला येत आहेत. यातील काहींचं एखाद-दुसरं पुस्तक प्रकाशित झालं आहे, तर काहींच्या अवघा पाच-सातच कथा प्रकाशित झाल्या आहेत. पण त्यातून त्यांच्याविषयीच्या अपेक्षा वाढीला लागल्या आहेत. या वर्षीच्या संमेलनात कदाचित या कथाकारांचा नामोल्लेखही होणार नाही, पण यंदाचा साहित्य अकादमीचा पुरस्कार ज्या आसाराम लोमटे यांना कथालेखनासाठी मिळाला आहे, त्यांच्या प्रदेशातील म्हणजेच मराठवाड्यातील हे कथाकार आहेत. त्यांची दखल भविष्यात मराठी साहित्यविश्वाला भविष्यात घ्यावी लागेल. त्यातील एका कथाकाराचं हे मनोगत…

-----------------------------------------------------------------------------

एका मध्यमवर्गीय कुटुंबात झालेला जन्म खूप काही शिकवून जातो. घरातून नकळत होत जाणारे वाचनाचे, लेखनाचे संस्कार स्वस्थ बसू देत नव्हते. लिखाणाला योग्य दिशा मिळत नव्हती. त्यामुळे जे मनात येईल ते फक्त कागदावर उतरण्याचा प्रयत्न करत होते. बहुतेकदा कवितेच्या माध्यमातून स्वत:ला व्यक्त करण्यात एक वेगळा आनंद मिळत होता. जगण्याच्या कक्षा विस्तारत गेल्या आणि अनुभव वाढत गेले. वाढत्या अनुभवांनी जाणीवांना जिवंत ठेवण्याचं काम केलं आणि याच जाणीवा शब्दरूप घेऊ लागल्या.

पारंपरिक मध्यमवर्गीय संस्कारांनी मी एक स्त्री आहे, याची वारंवार आठवण करून दिली आणि स्त्री म्हणून जगताना निर्माण होणारे असंख्य प्रश्न मनाला अस्वस्थ करू लागले. जगणं काय असतं, हे भवताल बघताना कळत होतं. विशेषत: बाईच्या वाट्याला समाजाने दिलेला भोगवटा तिला जिवंतपणी मरण दाखवतो. या सर्व परिस्थितीत माझं संवेदनशील मन हळहळत होतं. या सर्व परिस्थितीवर आपण काहीच करू शकत नाही, ही अस्वस्थता काळीज पोखरून टाकत होती. कवितारूपी शब्दांनी मग ही अस्वस्थता थोडी कमी केली. अनुभवांना व्यक्त करण्यासाठी कविता अपुरी वाटू लागली आणि मग कथा लिहिण्याचा प्रयत्न केला. सौ. नभा बडे यांच्या माध्यमातून कथाकार डॉ. भास्कर बडे यांच्या सहकार्याने कथालेखनाचा माझा प्रवास सुरू झाला.

नॅशनल बुक ट्रस्ट प्रकाशित आणि राजन गवस संपादित ‘नवलेखन - मराठी कथा’ या कथासंग्रहात ‘कोरडा पाऊस’ ही कथा प्रकाशित झाली आणि कथालेखिका म्हणून माझं नाव समोर आलं. ही निवड माझ्या लेखनासाठी अतिशय प्रेरणादायी ठरली. त्यामुळे आत्मविश्वास निर्माण झाला.

बालपणापासूनच परंपरांच्या बाबतीत वेगवेगळे प्रश्न निर्माण व्हायचे, पण या प्रश्नांची समाधानकारक उत्तरं मिळत नव्हती. त्यामुळे अस्वस्थता वाढत होती. ती कमी करण्यासाठी वाचन करणं आवश्यक होतं. यातूनच वाचनाची गोडी वाढत गेली.

कदाचित मी स्वत: एक स्त्री असेल म्हणून स्त्रीवादी दृष्टिकोनातून लिहिलं गेलेलं साहित्य जास्त प्रमाणात वाचनात आलं. त्यातून काही भूमिका बनत गेल्या. भारतीय पुरुषसत्ताक मानसिकतेनं स्त्रियांना किती छळलं आहे, हे मी स्वत:ही अनुभवत होते.

ग्रामीण भागात राहत असल्याने अनेक अडचणी निर्माण होत होत्या. त्यातच लक्षात आलं की, जे साहित्य आपण वाचतो त्यात आपल्यासारख्या स्त्रियांचे प्रश्न तर आलेच नाहीत. स्त्री मग ती जगातील कोणतीही असो तिच्या वेदना समान असतात, ही गोष्ट जरी मान्य केली तरीही आजच्या आधुनिक युगात शहरी स्त्रिया आणि ग्रामीण स्त्रिया यांच्या अडचणींमध्ये खूप तफावत आहे. त्यांच्या प्रश्नांचं स्वरूपही भिन्न आहे. सुशिक्षित नोकरी करणारी स्त्री एकवेळ आपल्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवू शकते, पण ग्रामीण स्त्री आजही परंपरेच्या जोखडाखालून बाहेर यायला तयारच नाही. त्यामुळे तिच्या वाट्याला अजूनही भोगणंच आहे. तिचं हे भोगणं समोर यावं यासाठी लेखनाचा छोटासा प्रयत्न.

रामायण, महाभारत यांसारख्या आपल्या धार्मिक महाकाव्यांनी एक वेगळीच परंपरा निर्माण केली आहे. विशेषत: रामायणातील घटना प्रसंगांनी तर खूपच विचार करायला भाग पाडलं –

मी करत राहिेले स्वत:ला सिद्ध

सांगत राहिलीस मी पवित्र आहे म्हणून

सर्व अन्याय निमूटपणे सहन केलास.

पण एक केले नाहीस.

फक्त एवढाच प्रश्न विचारला असतास रामाला,

माझ्या नसण्याने तू विरह, व्याकूळ झालास

आणि बिलगलास, वृक्ष वेलांना

याची साक्ष तुला देता येईल का?

तुझ्याशिवाय राहिले मी रावणाच्या लंकेत

आणि क्षणार्धात माझे पावित्र्य तू संपवलेस

माझ्याशिवाय तुही एकटाच होतास,

मग तुझ्या पावित्र्याचा पुरावा कोणता?

फक्त एवढाच प्रश्न विचारला असतास

तर आज नक्कीच घडले असते

एक वेगळे रामायण

अशा प्रकारचे प्रश्न निर्माण होऊ लागले.

आजूबाजूचा अस्वस्थ करणारा भोवताल अनेक प्रश्न माझ्यासमोर निर्माण करत होता आणि त्यांच्या उत्तरासाठी माझी कथांच्या माध्यमातून धडपड चालू झाली.

आजच्या संगणकाच्या युगातही स्त्रिया कितीही शिकल्या, अनेक उच्चपदावर गेल्या, तरीही त्यांच्याकडे स्त्री म्हणूनच बघितलं जातं. तिची ओळख फक्त स्त्रीच असते. तिला उपभोगाचीच वस्तू मानलं जातं. अधिकारी वर्ग आणि हाताखाली काम करणारा पुरुष वर्ग यांच्याकडूनही पावलोपावली तिला अपमानास्पद वागणूक दिली जाते. तिचं चारित्र्य हा तर अत्यंत महत्त्वाचा घटक. त्यात एकट्या राहणाऱ्या, विधवा किंवा घटस्फोटित महिला ही तर जणू काही पुरुषांची सार्वजनिक मालमत्ताच आहे, अशाच प्रकारे तिच्याशी वागलं जातं.

नोकरी आणि घर ही तारेवरची कसरत करताना केवळ ती स्त्री म्हणून दिलं जाणारं दुय्यमत्व त्रास देणारं होतं. स्त्रीवादी लेखनाच्या मर्यादा सांगताना अशी टीका केली जाते की, स्त्रिया त्यांच्या ‘चूल-मूल’च्या बाहेर येऊन लेखन करत नाहीत. पण हे शंभर टक्के खरं वाटत नाही. कारण चौकटीच्या आतलं तिचं जगणं, तिचे अनुभव इतके व्यापक आणि भयानक आहेत की, तेही समग्रपणे काही अपवाद वगळता साहित्यात आले नाहीत. हे सगळे अनुभव, प्रश्न लेखनातून यावेत यासाठी माझे प्रयत्न आहेत.

डोईचा पदर आला खांद्यावरी

भरल्या बाजारी जाईन मी

ही क्रांतीची परंपरा पुढे नेऊन साहित्यातून मांडण्याचा माझा प्रयत्न असेल.

आज मी ज्या परिस्थितीत वाढले, जे संस्कार माझ्यावर झाले, त्यामुळे मी आणि माझ्या पिढीतील अनेक स्त्रिया या जुन्या आणि नव्याच्या सीमारेषेवर उभ्या आहेत. धड जुनं सोडता येत नाही आणि नवं स्वीकारता येत नाही, अशा संक्रमणाच्या काळात लेखनातून काहीतरी नवी मांडणी करणारा, धर्म संस्कृती, रूढी-परंपरा, जाती या सर्वांचा वेगळ्या अंगानं विचार करून तो साहित्यातून मांडण्याचा माझा प्रयत्न आपणास आवडेल ही अपेक्षा.

menkadhumale@gmail.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

स्वयंपाकघरात टांगलेल्या कॅलेंडरवरच्या चित्राइतकीच थरारकता वा जाहिरातीतून एखादं उत्साहवर्धक पेय विकणार्‍या म्हातार्‍या अमिताभ बच्चनइतकीच विश्वासार्हता, दहा वर्षं राष्ट्रीय व्यासपीठावर वावरलेल्या मोदींच्या व्यक्तिमत्त्वामध्ये उरली आहे...

प्रचारसभांमधून दिसणारे पंतप्रधान दमले-भागलेले, निष्प्रभ झालेले आहेत. प्रमाणापलीकडे वापरलेली छबी, अतिरिक्त भलामण आणि अतिश्रम, यांमुळे त्यांची ‘रया’ गेल्यासारखी वाटते. एखाद्या ‘टी-ट्वेंटी’ सामन्यात जसप्रीत बूमराला वीसच्या वीस षटकं गोलंदाजी करायला लावावी, तसं काहीसं हे झालेलं आहे. आक्रसत गेलेला मोदींचा ‘भक्तपंथ’ टिकून असला, तरी ‘करिष्मा’ उर्फ ‘जादू’ मात्र चाकोरीबद्ध झालेली आहे.......

भाजपच्या ७६ पानी ‘जाहीरनाम्या’त पंतप्रधान नरेंद्र मोदींची तब्बल ५३ छायाचित्रं आहेत. त्यामुळे हा जाहीरनामा आहे की, मोदींचा ‘छायाचित्र अल्बम’ आहे, असा प्रश्न पडतो

काँग्रेसच्या ४८ पानी जाहीरनाम्यात राहुल गांधींची फक्त पाच छायाचित्रं आहेत. त्यातली तीन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत आहेत. याउलट भाजपच्या जाहीरनाम्याच्या मुखपृष्ठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीमागे बळंच हसताहेत अशा स्वरूपाचं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचं छायाचित्र आहे. त्यातली ‘बिटवीन द लाईन’ खूप सूचक आणि स्पष्टता सूचित करणारी आहे.......

जर्मनीत २० हजार हत्तींचा कळप सोडण्याची धमकी एका देशाने दिली आहे, ही ‘हेडलाईन’ जगभरच्या प्रसारमाध्यमांमध्ये गाजतेय सध्या…

अफ्रिका खंडातील बोत्सवाना हा मुळात गरीब देश आहे. त्यातच एवढे हत्ती म्हणजे दुष्काळात तेरावा महिना. शेतांमध्ये येऊन हत्ती मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान करत असल्याने शेतकरी वैतागले आहेत. याची दखल बोत्सवानाचे अध्यक्ष मोक्ग्वेत्सी मेस्सी यांनी घेतली आहे. त्यामुळेच त्यांनी संतापून एक मोठी घोषणा केली आहे. ती म्हणजे तब्बल २० हजार हत्तींचा कळप थेट जर्मनीमध्ये पाठवण्याची. अनेक माध्यमांमध्ये ही ‘हेडलाईन’ गाजते आहे.......