शशिकला तमिळनाडूच्या ‘नव्या अम्मा’ होतील?
सदर - सत्तावर्तन
राजा कांदळकर
  • शशिकला नटराजन
  • Thu , 12 January 2017
  • सत्तावर्तन राजा कांदळकर Raja Kandalkar शशिकला नटराजन Sasikala Nataraja जयललिता Jayalalithaa ऑल अंडिया अण्णा द्रविड मुनेत्र कळघम All India Anna Dravida Munnetra Kazhagam

तमिळी जनतेच्या ‘अम्मा’ जयललिता यांच्या निधनानंतर तमिळनाडूचं राजकारण रंग बदलत आहे. जयललितांच्या निकटवर्तीय शशिकला नटराजन या अखिल भारतीय अण्णा द्रमुकच्या सरचिटणीस बनल्या आहेत. द्रमुक पक्षात सरचिटणीस हे पद महत्त्वाचं असतं. या पदावरच्या व्यक्तीकडे पक्षाची सर्व सूत्रं एकवटलेली असतात.

जयललितांचा करिष्मा मोठा होता. चित्रपट ते राजकारण हा त्यांचा प्रवास रोमहर्षक होता. शिवाय एम. जी. रामचंद्रन यांच्यासारख्या विख्यात नट, नेत्याशी नाळ जोडली गेल्याने त्यांचं महात्म्य जास्त वाढलं होतं. स्वत:च्या कर्तबगारीने जयललिता तमिळी जनतेची ‘अम्मा’ बनल्या. लोकांनी त्यांना मनोभावे स्वीकारलं. त्यांचा मृत्यू झाल्यानंतर तमिळी जनतेमध्ये उमटलेल्या प्रतिक्रियांतून ते दिसलं होतं.

अम्मानंतर कोण हा प्रश्न सर्वांनाच पडला होता. करिष्मा असलेला नेता गेल्यानंतर त्याची पोकळी सहजासहजी भरत नसते हे खरंच, पण त्याची जागा तरी कोण घेणार हा प्रश्न होताच. साऱ्या देशाचं त्याकडे लक्ष लागलं होतं. अम्मांची उत्तराधिकारी म्हणून सर्वांत वरच्या क्रमांकावर शशिकला यांचं नाव घेतलं जात होतं. सगळ्यांच्या नजरा त्या दृष्टीने त्यांच्याकडे लागल्या होत्या.

जयललितांच्या आजारपणात आणि नंतर अंत्ययात्रेत शशिकला पुढे होत्या. सर्व परिस्थितीचा ताबा त्यांनी स्वत:कडे घेतला होता. सबंध देशाने ते टीव्हीच्या पडद्यावर पाहिलं होतं. अम्मांची उत्तराधिकारी होण्याची शशिकला यांची इच्छा त्यातून लपून राहिली नव्हती.

आता शशिकला या पक्षाच्या सरचिटणीस झाल्या आहेत. अण्णा द्रमूक पक्षाची सर्व सूत्रं त्यांनी स्वत:कडे घेतली आहेत. हे सत्तांतरण आता सहज होताना दिसत असलं तरी पुढेही वातावरण असंच सरळ राहील याची खात्री नाही.

शशिकला यांची पुढची वाटचाल साधी, सोपी नक्कीच नसणार. जयललितांना विरोधक म्हणून करुणानिधी यांच्यासारखा मातब्बर नेता होता. आता त्यांनी नव्वदी ओलांडलीय. त्यांनीच द्रमूक पक्षाची सूत्रं त्यांच्या मुलगा स्टॅलिन याच्या गळ्यात अडकवली आहेत. याचा अर्थ सरळ आहे की, करुणानिधींनी तमिळनाडूच्या राजकारणातून जवळपास सक्रिय निवृत्ती घेतली आहे, त्याचे हे उघड संकेत आहेत. यापुढे करुणानिधी त्यांच्या पक्षात सल्लागाराच्या भूमिकेत दिसतील हे स्पष्ट दिसत आहे.

या पार्श्वभूमीवर शशिकला यांचा नव्या अम्मा म्हणून तमिळनाडूमध्ये उदय होत आहे. त्या काही कच्च्या गुरूच्या चेल्या नाहीत. त्यांनी जयललितांचं व्यक्तिमत्त्व आणि राजकारण जवळून पाहिलं आहे. राजकारणातले डाव-पेच आखण्यात त्या जयललितांच्या खांद्याला खांदा लावून सक्रिय होत्या. पण आता त्यांना स्वत:ला निर्णय घ्यावे लागतील. पक्ष सांभाळावा लागेल. शिवाय पक्षातल्या सत्तास्पर्धेतलाही त्यांना हाताळावे लागेल.

शशिकला सुखासुखी सरचिटणीस झाल्या असल्या तरी त्यांच्या सत्तारोहनाला एका प्रसंगाने गालबोट लावलं आहे. हा प्रसंग त्यांच्या वाटेतले काटे किती काटेरी आहेत याचं सूचन करणारा दिसतो. शशिकला यांना त्यांच्याच पक्षाच्या खासदार दुसऱ्या शशिकला पुष्पा यांनी आव्हान दिलं आहे. पुष्पा या शशिकला यांच्याविरोधात उमेदवारी अर्ज भरायला तयार झाल्या होत्या. त्यांचा अर्ज भरायला त्यांचे पती आणि वकील गेले होते. त्यांना शशिकला यांच्या समर्थकांनी मारहाण केली. त्याच्या बातम्या फार प्रसिद्ध झाल्या नाहीत, पण हे प्रकरण गंभीर आहे. पक्षाच्या सत्तासोपानावर चढतानाच शशिकला यांनी विरोधकांचा आवाज दाबला. हा आवाज दाबूनच त्या पक्षाचा ताबा घेतल्या झाल्या आहेत हे लपून राहिलेलं नाही.

या प्रकरणात पुढे एक गंमत झाली. या प्रकरणात पोलिसांनी मारहाण करणाऱ्या गुंडांना सोडून दिलं आणि ज्यांनी मार खाल्ला त्यांना अटक केली. त्यातून शशिकला यांची सत्तेवरची पकड दिसून आली. तशी सत्तेचा गैरवापर करण्याची झलकही पाहायला मिळाली.

तमिळ जनता व्यक्तिपूजक जास्त. त्यांना हिरो, नेते डोक्यावर बसून घेणं आवडतंच, पण ते पहिल्यांदा काही सहजासहजी त्यांचं मोठेपण स्वीकारत नाहीत. या अनुभवातून सर्वच तमिळ नेत्यांना जावं लागलं आहे. अगदी अण्णादुराई, करुणानिधी, एम.जी.रामचंद्रन आणि जयललिता यांनीही हे भोगलं आहे. त्यांनी अथक मेहनत करून विविध हिकमती लढवून लोकांच्या मनाला साद घातली. मनं जिकंली आणि नंतर लोकांनी त्यांना स्वीकारलं. अर्थात या अग्निदिव्यातून शशिकला यांनाही जावं लागणारच. तमिळी जनतेच्या विविध फुटपट्ट्यांतून त्या पास झाल्या तरच लोक त्यांना नवी अम्मा म्हणून स्वीकारतील.

शशिकला यांना नवी अम्मा होण्यात पहिला अडथळा आहे तो तमिळनाडूचे मुख्यमंत्री ओ. पनीरसेल्वम उर्फ ओपीएस यांचा. ते मुरब्बी नेते आहेत. खुद्द जयलिलता यांनी त्यांच्याकडे तीन वेळा मुख्यमंत्री पद सापेवलं होतं. त्यांचा लोकसंपर्क मोठा आहे. ग्रामीण जनतेशी नाळ आहे. ओपीएस शशिकला यांना हायकमांड मानतील काय? त्यांच्या इशाऱ्यावर कारभार करतील काय? या प्रश्नांची उत्तरं अजून मिळायची आहेत. उद्या या पक्षात शशिकला विरुद्ध ओपीएस असा सत्तासंघर्ष उफाळला तर पक्षच फुटू शकतो. तसं झालं तर या दोघांचीही ताकद कमी होईल.

अशा पक्षफुटी आणि नेतृत्व स्पर्धेची तमिळनाडूत मोठी परंपरा आहे. जे नेतृत्व स्पर्धेत टिकेल आणि जनतेची नाडी ओळखेल, त्याला तमिळी जनता स्वीकारते. शशिकलांचं काय होणार आणि त्यांच्या वाटचालीचं भवितव्य काय हे येत्या काळात ठरेल.

 

लेखक ‘लोकमुद्रा’ या मासिकाचे संपादक आहेत.

rajak2008@gmail.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

जर नीत्शे, प्लेटो आणि आइन्स्टाइन यांच्या विचारांत, हेराक्लिट्स आणि पार्मेनीडीज यांच्या विचारांचे धागे सापडत असतील, तर हे दोघे आपल्याला वाटतात तेवढे क्रेझी नक्कीच नाहीत

हे जग कसे सतत बदलते आहे, हे हेराक्लिटस सांगतो आहे आणि या जगात बदल अजिबात होत नसतात, हे पार्मेनिडीज सिद्ध करतो आहे. आपण डोळ्यांवर अवलंबून राहण्यापेक्षा आपल्या बुद्धीवर अवलंबून राहिले पाहिजे, असे पार्मेनिडीजचे म्हणणे. इंद्रिये सत्याची प्रमाण असू शकत नाहीत. बुद्धी हीच सत्याचे प्रमाण असू शकते. यालाच बुद्धिप्रामाण्य म्हणतात. पार्मेनिडीज म्हणजे पराकोटीचा बुद्धिप्रामाण्यवाद! हेराक्लिटस क्रेझी वाटतो, पण.......