सी. रामचंद्र : एक हरहुन्नरी पण उपेक्षित संगीतकार
कला-संस्कृती - चलत्-चित्र
प्रमोद शिरोडकर
  • सी. रामचंद्र (जन्म : १२ जानेवारी, १९१८, मृत्यू : ५ जानेवारी, १९८२)
  • Thu , 12 January 2017
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti चलत-चित्र सी. रामचंद्र C. Ramchandra राम चितळकर Ram Chitalkar भगवानदादा Bhagwan Dada अलबेला Albela अनारकली Anarkali

राम चितळकर उर्फ सी. रामचंद्र उर्फ अण्णासाहेब यांचं आजपासून जन्मशताब्दी वर्ष सुरू होत आहे. ते एक सव्यसाची कलाकार होते. अष्टपैलू प्रतिभा असलेल्या या संगीतकाराची अनेक गाणी आपण गुणगुणत असतो, पण या संगीतकाराविषयी, त्याच्या प्रवासाविषयी आपल्याला फारशी माहिती नसते. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने त्यांच्याविषयीचा हा विशेष लेख...

स्थळ- गिरगाव, मुंबई येथील सेन्ट्रल सिनेमा. साल - नोव्हेंबर, १९४७. प्रसंग – निर्माता-दिग्दर्शक विश्राम बेडेकर यांच्या ‘चूल आणि मूल’  या चित्रपटाचा रौप्य महोत्सव. या कार्यक्रमात गजानन जहागीरदार म्हणाले, “अहो, चितळकर तुम्ही फार मधुर संगीत दिलंय, पण तुम्ही इथे मराठीत काय करताय? हिंदी सिनेमात चला. तिकडचा तो दाक्षिणात्य सी. रामचंद्र बघा, हिंदी सिनेमात कसा धुडगूस घालतोय. आता मी मराठी आणि हिंदीमध्ये प्रभाततर्फे लोकमान्य टिळकांवर सिनेमा बनवतोय. त्याचं संगीत तुम्हीच द्यायचंय हे लक्षात ठेवा. आपण मराठी माणसांनीच मराठी माणसांना पुढे आणलं पाहिजे.” १५ ऑगस्ट, १९४७ पासून मुंबईच्या नॉव्हेल्टी सिनेमात सी. रामचंद्रचं संगीत असलेला ‘शहनाई’ सिनेमा भरपूर गर्दी खेचत होता. त्यातील गाणी प्रत्येकाच्या ओठावर होती. अण्णांनी जहागीरदारांचं हे वक्तव्य ऐकून फक्त स्मित केलं. बाजूलाच विश्राम बेडेकर उभे होते. ते म्हणाले, “अहो, राम चितळकर आणि सी. रामचंद्र म्हणजेच आपल्या समोर उभी असलेली व्यक्ती... अण्णासाहेब!” हे ऐकून जहागीरदार आश्चर्यचकित झाले; परंतु त्यांनी लगेच अण्णांचं कौतुकही केलं. मात्र त्यांचा ‘लोकमान्य टिळक’ हा सिनेमा कधीच पूर्ण झाला नाही. मुहूर्ताच्या शॉटनंतर शूटिंग पूर्णपणे थांबलं, कारण तोपर्यंत प्रभातच बंद होण्याच्या मार्गावर होती.

रामचंद्र नरहर चितळकर यांचा जन्म नगर जिल्ह्यातील पुणतांबा इथं १२ जानेवारी १९१८ रोजी एका ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांचे वडील त्यावेळेच्या जीआयपी रेल्वेमध्ये स्टेशन मास्टर होते. त्यांचं प्राथमिक शिक्षण प्रथम पुणतांबा आणि नंतर नगर इथं झालं. नंतर वडिलांची बदली नागपूरला झाली व छोट्या रामचं माध्यमिक शिक्षण नागपुरात सुरू झालं. छोट्या रामचा संगीतातील कल व त्याचा आवाज बघून त्याला शंकरराव सप्रे यांच्या क्लासमध्ये दाखल करण्यात आलं. त्यावेळी तिथं समवयस्क असा छोटा वसंत (वसंतराव देशपांडे) होता. त्या दोघांच्या शाळा मात्र निरनिराळ्या होत्या. त्यावेळी आंतरशालेय गायनस्पर्धा होत असत. शंकरराव सप्रे या दोघांची स्पर्धेसाठी जय्यत तयारी करून घेत. राम आणि वसंतची या निमित्ताने एकाच मंचावर परत भेट होत असे. पहिली तीन वर्षं वसंताला प्रथम क्रमांकाचं पारितोषिक मिळालं व रामला दुसऱ्या. चौथ्या वर्षी म्हणजे साधारणपणे १९३२-३३च्या सुमारास  रामने बाजी उलटवली. त्याची मजेशीर गोष्ट खुद्द वसंतराव देशपांडे यांनी १९८२-८३ च्या आसपास पुण्यातील एका कार्यक्रमात सांगितली होती. नेहमीप्रमाणे सप्रे गुरुजी दोघांची तयारी करून घेत होते. तयारीच्या वेळीच वाटत होतं कि, वसंतच या वर्षीही बाजी मारणार. कारण रामचं लक्ष त्याच्या हरहुन्नरी स्वभावामुळे गाण्यापेक्षा ताल, वाद्य व इतर वाद्यांकडेच जास्त होतं. परंतु रामच्या मनात काही निराळंच शिजत होतं. त्याने घरच्या रेकॉर्ड प्लेयरवर बागेश्री रागातील ‘बहुत दिन नच भेटलो सुंदरीला’ या ‘सौभद्र’मधील नाट्यगीतावर रियाझ चालू केला होता. त्यावेळी तो क्लासचा तबलजी व पेटीवादक यांना रोज एक आणा देऊन व गुप्ततेची शपथ घ्यायला लावून घरी साथीला बोलवत असे. या गीताची त्याने इतक्या सफाईदारपणे तयारी केली. ते १०-१२ मिनिटं असं काही गायला की, मूळ गीत फिकं वाटावं. हरकती, मुरक्या, खटके व ताना यांनी युक्त या बागेश्री रागातील अवरोहाचे स्वर ‘पदमगरेसा’ घोळून कोमल गांधारसह असा समेवर यायचा की, टाळ्या मिळाल्याच पाहिजेत. रामला पहिलं पारितोषिक मिळालं. सर्वांवर अगदी आश्चर्यचकित व्हायची वेळ आली. सप्रे गुरुजींनी त्याच्या जिद्दीचं कौतुक केलं. त्याच्या वडिलांनाही उमजलं की, आपल्या मुलाचा कल कुठे आहे.

पुढच्या वर्षी वडिलांची बदली पुण्याला झाली. रामचे पुढील शिक्षण पुण्यात सुरू झालं. नंतर परत राम-वसंत कधीच एका मंचावर आले नाहीत. हा बागेश्री राग अण्णांच्या मनात इतका भिनला की, तो त्यांचा आवडता राग झाला. पुढे त्यांच्या सिनेसंगीतातील कारकिर्दीत या रागावर आधारित काही अप्रतिम रचना त्यांनी केल्या. हमको तुम्हाराही आसरा (साजन, १९४७), दिलसे भुला दो तुम हमे (पतंगा, १९४९), मुहब्बत हि न जो समझे (परछाई, १९५२), जाग दर्द इश्क जाग (अनारकली, १९५३), राधा ना बोले (आझाद, १९५५) ही त्यापैकी काही. या गीतांतून बागेश्रीचं संपूर्ण रागस्वरूप आपल्या समोर उभं राहतं.

पुण्यात रामचं काही अभ्यासात मन रमेना. त्यावेळी सिनेमा बोलू लागला होता. घराजवळच्या एका सिनेमागृहात डोअरकीपरशी संगनमत करून सिनेमातील गाणी ऐकणं हाच दिवसभराचा उद्योग झाला. अशा एका वेळी साधारणपणे १९३८-३९च्या सुमारास त्याला भगवानदादांनी पाहिलं. त्याची संगीतातील जाण व आवड पाहून त्यांनी त्याला सिनेमात संगीतकार म्हणून येण्याविषयी विचारलं. अभ्यासात नववी-दहावीच्या पुढे काही प्रगती होत नव्हती. त्यामुळे त्याच्या वडिलांनी त्याला सिनेमात संगीतक्षेत्रात करिअर करायला परवानगी दिली. भगवानदादांकडे त्यावेळी एका तमिळ सिनेमाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी होती. ते रामला आपल्याबरोबर मद्रासला घेऊन गेले व तिथल्या लोकांच्या परिचयातलं असं त्याचं ‘अण्णासाहेब’ हे नामकरण केलं. १९३९ मध्ये प्रदर्शित झालेल्या या तमिळ सिनेमाचं नाव होतं ‘जयक कोडी’. पुढील दोन वर्षांत ‘वनमोहिनी’ हा आणखी एक तमिळ सिनेमा व नंतर मुंबईत येऊन ‘नारदनारदी’ हा मराठी चित्रपट ‘राम चितळकर’ या नावानं केला.

१९४२ मध्ये भगवानदादांनी ‘सुखी जीवन’ या हिंदी सिनेमात अण्णांना प्रथम संधी दिली. तिथपासून भगवानदादांची व अण्णांची जोडी जमली. अण्णांनी एकूण १२० हिंदी सिनेमे केले, त्यातील २१ हे भगवानदादांचे होते. १७व्या सिनेमापर्यंत त्यांनी ‘राम चितळकर’, ‘अण्णासाहेब’, ‘शामू’ ही नावं धारण केली. काही सिनेमांत त्यांनी त्यांचे सहाय्यक ‘पी. रमाकांत’ यांच्या नावेही संगीत दिलं. १९४०च्या दशकाच्या अखेरीस ‘सी रामचंद्र’ या नावाचा चांगला बोलबाला झाला होता. त्यामुळे भगवानदादांच्या मारधाडीच्या सिनेमासाठी ‘सी. रामचंद्र’ हे नाव देण्यास ते साशंक होते. त्यांनी भगवानदादांना गळ घातली की, जर त्यांनी पुढील सिनेमा सामाजिक विषयावर काढला तर ते त्यासाठी ‘सी. रामचंद्र’ हे नाव देतील. भगवानदादांना अण्णांचा प्रस्ताव मान्य होता, परंतु प्रश्न भांडवलाचा होता. त्यांच्या मते त्यांच्याकडे असलेले पैसे नायक व नायिकावरच खर्च होतील. परंतु अण्णांनी त्यांना सामाजिक विषयावरही कमीत कमी पैशात सिनेमा कसा बनवता येतो हे समजावलं. पण भगवानदादा हे मारधाडीच्या सिनेमाचे पूर्वाश्रमीचे नायक असल्यामुळे कुणीही सावकार त्यांना पैशाची मदत करेना. शेवटी स्वतः जवळची सर्व पुंजी पणास लावून व पत्नीचे दागिने गहाण ठेवून कसंबसं भांडवल जमा केलं. अण्णांनी त्यांच्याकडून कुठलंच मानधन घेतलं नाही. पण ‘अलबेला’ला असं काही ठेकेदार संगीत दिलं की, कुणाचीही पावलं त्या ठेक्यावर थिरकलीच पाहिजेत. मुंबईच्या इम्पिरियल थिएटरमध्ये १९५१च्या सुरुवातीस हा सिनेमा प्रदर्शित झाला. सुरुवातीचे दोन आठवडे शुकशुकाट होता. परंतु अण्णांना आपल्या संगीतावर ठाम विश्वास होता. त्यांनी व भगवानदादांनी एक योजना आखली. आपल्याच १५-२० माणसांना ते तिकीट देऊन सिनेमा पाहायला पाठवत. गाणं सुरू झालं की, ते सर्व पडद्याजवळ जाऊन गाण्याच्या तालावर नाच करायचे. ही गोष्ट कर्णोपकर्णी झाली. गाण्यांचा बोलबाला झाला. त्यानंतर कित्येक आठवडे हाउसफूलचा बोर्ड उतरलाच नाही. जवळजवळ वर्षभर सिनेमा तिथं चालला. गाण्यांच्या रेकॉर्डसचीही भरपूर विक्री झाली. त्यातून अण्णांना अपेक्षेपेक्षा जास्त मानधन मिळालं.

‘चूल आणि मूल’च्या रौप्यमहोत्सव प्रसंगी गजानन जहागीरदार अण्णांना मराठी माणसांनी मराठी माणसांना मदत करावी या संबंधी बोलले होते. परंतु अण्णांची मराठी माणसांसंबंधीची बांधीलकी सर्वश्रुत आहे. त्यांनी आचार्य अत्रे, राजा नेने, दत्ता धर्माधिकारी, विश्राम बेडेकर यांच्याबरोबर १९४० च्या दशकाच्या सुरुवातीला अल्पसं मानधन घेऊन काम केलं. अण्णांनी १९४० च्या दशकात त्यावेळेच्या प्रसिद्ध व अप्रसिद्ध मराठी गायिकांसाठी हिंदी सिनेमात पार्श्वगायनाचं द्वार खुलं केलं. त्यामध्ये ललिता देऊलकर, मोहनतारा अजिंक्य, सरोज वेलिंगकर, सुलोचना कदम, सरस्वती राणे (या आधीपासूनच प्रसिद्ध होत्या) यांची नावं घेता येतील. यातील सर्वांत महत्त्वाचं नाव म्हणजे ललिता देऊलकर. तिला अण्णांनी १९४४ मध्ये गिरगावात एका शाळेच्या स्नेहसंमेलनात ऐकलं. ती त्यावेळी माजी विद्यार्थिनी म्हणून गाणं गात होती. अण्णा त्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते. तिचा आवाज व गाण्याची पद्धत बघून अण्णा भारावले. त्यांनी तिथंच तिला सिनेमात पार्श्वगायन करणार का म्हणून विचारलं. नंतर जे घडलं ते ललिता देऊलकरसाठी स्वप्नवत होतं. १९४५ मध्ये तिला ‘नग्म-ए-सहारा या भगवानदादांच्या सिनेमात पार्श्वगायनाची प्रथम संधी मिळाली. त्यानंतर तिने १९४९ पर्यंत अण्णांकडे एकूण १७ सिनेमांत पार्श्वगायन केलं. त्यातील चार फिल्मीस्तानसारख्या मोठ्या स्टुडिओजचे होते. असं म्हणतात की, १९४७च्या ‘साजन’च्या रेकोर्डिंगच्या वेळी रफीला तिच्याबरोबर युगल गीत गाण्याचं दडपण आलं होतं. परंतु तिने त्यांना सांभाळून घेतलं. त्याची भरपाई त्याने तिच्या लग्नात (१९५०) मंगलाष्टकं म्हणून केली.  

बालपणी पुष्कळ नाट्यगीतं व उपशास्त्रीयगीतं वडिलांच्या गाण्याच्या शौकामुळे अण्णांच्या सतत कानावर पडत होतं. त्याची छाप त्यांच्या पुष्कळ गीतांत दिसून येते. हे ते स्वतःही कबूल करत. ‘अनारकली’मधील भीमपलास रागातील ‘ये जिंदगी उसी की है’ या गाण्याची चाल त्यांना ‘मूर्तीमंत भीती उभी’ या ‘शारदा’ नाटकातील पदावरून सुचली होती. जब दिलको सतावे गम - जौनपुरी (सरगम – १९५०), देखोजी बहार आई - झिंझोटी (आझाद – १९५५), मुहब्बत ऐसी धडकन - रागेश्री  (अनारकली -१९५३), ना मारो नजरिया के - मिश्र पहाडी (पेहली झलक – १९५४), बलमा अनाडी मन - भिन्न षड्ज (बहुरानी – १९६३), कटते है दुख में ये दिन – अहिर भैरव (परछाई – १९५२), ये प्यार तेरी दुनिया में – मिश्र खमाज (झांझर – १९५३), तुम क्या जानो तुम्हारी – मिश्र जंगला (शिनशिनाकी बुबलाबु – १९५२) ही शास्त्रीय व उपशास्त्रीय रागांवर आधारित अण्णांनी दिलेली काही प्रसिद्ध गाणी.

यातील शेवटच्या तीन गीतांबद्दल सुप्रसिद्ध समीक्षक राजू भरतन एकदा म्हणाले होते की, फक्त या तीन गीतांना जरी अण्णांनी संगीत दितं असतं तरी ते एक महान संगीतकार म्हणून ओळखले गेले असते.  

१९४५ मध्ये अण्णांसाठी फिल्मीस्तान या एका मोठ्या स्टुडिओजचे दरवाजे उघडले गेले. १९४६ मध्ये त्यांचा ‘सफर’ हा पहिला सिनेमा आला. फिल्मीस्तानसाठी त्यांनी एकूण बारा सिनेमांना संगीत दिलं. अण्णांच्या संगीतामुळे फिल्मीस्तानचे जवळजवळ सर्वच सिनेमे रौप्यमहोत्सवी व सुवर्णमहोत्सवी ठरले. १९५२-५३ मध्ये फिल्मीस्तानच्या ‘अनारकली’ या सिनेमाची निर्मिती करण्यात आली. अण्णांनी बांधलेल्या ‘अनारकली’मधील जवळजवळ सर्वच गाण्यांच्या चाली शास्त्रीय संगीतावर आधारित आहेत.

फिल्मीस्तान नंतर अण्णांना लाभलेला मोठा स्टुडिओ म्हणजे शांतारामबापूंचा राजकमल. त्यांच्याकडे अण्णांनी ‘परछाई’ (१९५२), ‘सुबह का तारा’ (१९५४), ‘नवरंग’ (१९५९) व ‘स्त्री’ (१९६१) असे चार सिनेमे केले. ‘परछाई’ या पहिल्या सिनेमाच्या वेळी अण्णांनी शांतारामबापूंना स्पष्ट सांगितलं की, जयश्रीने आत्तापर्यंत कुणाचाही उसना आवाज घेतला नसला तरी ती यावेळी स्वतः गाणार नाही. त्यामुळे जयश्री पडद्यावर लताच्या आवाजातच गायली. ‘नवरंग’ हा सिनेमा अण्णांच्या व शांतारामबापूंच्याही प्रतिभेचा एक उत्तुंग आविष्कार म्हणून गणला जातो.

एक गमतीशीर गोष्ट म्हणजे १९३९-४१ मध्ये अण्णांची मद्रासशी जुळलेली नाळ जी तुटली होती ती १९५३ ते १९६३ या अकरा वर्षात मद्रासच्या स्टुडिओजमुळे अकरा सिनेमांद्वारे परत जुळली गेली. या अकरामधील ‘आझाद’ (१९५५) हा पक्षीराज स्टुडिओजचा सिनेमा अण्णांना अपघातानं मिळाला. पक्षीराज स्टुडिओजचे सर्वेसर्वा नायडू यांनी हा सिनेमा आधी तमिळ व तेलुगुमध्ये बनवला होता. तो त्यांना नंतर हिंदीमध्ये बनवायचा होता. कारण त्याचे सर्व सेट्स तयार होते. त्यांनी दिलीपकुमारसारख्या प्रथितयश नटाच्या तारखा मिळवल्या होत्या. देवदासनंतर त्याचं मानसिक स्वास्थ्य थोडं बिघडलं होतं. त्यामुळे तो एका हलक्याफुलक्या भूमिकेच्या शोधात होता, जी त्याला ‘आझाद’मुळे मिळाली. अण्णांनी १५ दिवसांत त्याची गाणी तयार केली.

‘आझाद’ या सिनेमातील एका दृश्यात दिलीपकुमार व मीनाकुमारी

‘शगुफा’च्या वेळेची (१९५२-५३) एक गोष्ट अण्णांच्या साडूंनी मला १०७०च्या सुमारास सांगितली होती. दादरच्या बॉम्बे फिल्म लॅबमध्ये गाण्याचं रेकॉर्डिंग होतं. दोन भागांतील अवखळ आणि उदास भावातील ते गाणं होतं ‘अपना पता बता दे’. त्यावेळी मदन मोहन हजर होते. त्यांनी विचारलं, ‘पडद्यावर कोण गाणार आहे?’ अण्णा म्हणाले, ‘मधुबाला’. ‘मग तर या गाण्यावरच हा सिनेमा चालेल.’ या सिनेमाची नायिका ही सोडून गेलेल्या नवऱ्याच्या स्मृतीत हरवलेली असते. हा सिनेमा प्रेमनाथ करत होता. या आधी अण्णांचंच संगीत असलेल्या ‘साकी’ या सिनेमात या दोघांनी काम केलं होतं. आणखी दोन-तीन सिनेमातही ते एकत्र होते. त्यामुळे या दोघांचं प्रेमप्रकरण चालू आहे अशी कुणकुण सिने इंडस्ट्रीमध्ये पसरली होती. ती प्रेमनाथची बहीण (कृष्णा राजकपूर) हिच्याही कानी गेली. तिने ताबडतोब प्रेमनाथचं लग्न बीना रायशी लावून दिलं. मधुबाला अभिनित ‘शगुफा’ हा सिनेमा ३० टक्के पूर्ण झाला होता. परंतु तिच्या जागी बीना रायला घेण्यात आलं. अण्णांनी प्रेमनाथला समजावलं की, ‘खाजगी व व्यावसायिक गोष्टींची गल्लत करू नकोस. कथेच्या अनुषंगाने मधुबाला हीच योग्य आहे. लग्न झाल्यामुळे बीना रायला लोक आता नायिका म्हणून किती स्वीकारतील हाही प्रश्नच आहे.’ परंतु प्रेमनाथचा नाईलाज होता. शेवटी व्हायचं तेच झालं. एकाहुनही एक मधुर अशी दहा गाणी असूनही सिनेमा आपटला.

स्वरमेळ (हार्मनी) हा पाश्चात्य संगीताचा स्थायीभाव आहे, तर स्वरसंगती (मेलडी) हा भारतीय सुगम संगीताचा. लहानपणापासून अण्णांना निरनिराळे वाद्यवृंद वाजवण्याची आवड होती. त्यामुळे जाझ हा पाश्चात्य वाद्यवृंद प्रकारही त्यांना प्रिय होता. त्यासाठी ते मुंबईच्या ताजमहाल व ग्रांड या हॉटेलमध्ये ऐकायला जायचे. तिथं चिकचोकलेट (चिको वाझ) हा गोव्याचा कलाकार निरनिराळी पाश्चात्य वाद्यं वाजवायचा. १९४७ नंतर मुंबईत दारूबंदी आली. त्यामुळे या हॉटेलमधील मद्यालयं व तिथं वाजणारं पाश्चात्य संगीत बंद झालं. तेव्हा अण्णांनी चिकचोकलेट याला सहाय्यक म्हणून आपल्याबरोबर घेतलं. अण्णांनी त्यावेळी पाश्चात्य व भारतीय वाद्यं यांचा असा काही सुरेख मेळ घातला की, त्यातून सुश्राव्य मेलडीच निर्माण व्हावी. अशी मेलडी त्यावेळेच्या ‘समाधी’, ‘सरगम’, ‘पतंगा’ वगैरे सिनेमातील गाणी ऐकल्यावर लक्षात येते. १९५० च्या आसपास एल्विस प्रिस्ले आणि त्याच्या स्पॅनिश गिटारचा बोलबाला होता. अण्णांच्या १९५०च्या ‘संगीता’ या सिनेमातील बहुतेक गाणी या गिटारवरच बेतलेली आहेत आणि ती सर्व श्रवणीय होती. उदाहरणार्थ, ‘ना उम्मीद होके भी’ हे गाणं. तसंच कुठल्याही भारतीय वाद्यांचा वापर न करता बेतलेलं आझादमधील ‘कितना हसीन है मौसम’ या गाण्याबद्दल काय बोलावं!

१९५०च्या दशकात चिकचोकलेट हा त्यांचा एक आवडता सहाय्यक बनून राहिला होता. १९५१चा मधुबाला व देव आनंद अभिनित ‘नादान’ या सिनेमाच्या श्रेयनामावलीत चिकचोकलेट याचं नाव होतं, पण त्याचं संगीत अण्णांनीच दिलं होतं.

अण्णांचे त्यांच्या समकालीन संगीतकारांशी चांगले स्नेहपूर्ण संबंध होते. विशेषतः अनिल विश्वास व रोशन यांच्याशी. अनिल विश्वासना तर ते आपले गुरूच मानायचे. त्यांचे ते काही काळ सहाय्यकही होते. १९४९ मध्ये त्या दोघांनी मिळून ‘बेगुनाह’ या सिनेमाला एक प्रयोग म्हणून शामू (सी रामचंद्र) व हरीभाई  (अनिल विश्वास) या टोपण नावानं संगीत दिलं. त्या आधी अनिल विश्वास यांनी ‘गर्ल्स स्कूल’ हा सिनेमा अर्धवट सोडला होता, तो नंतर अण्णांच्या विनंतीवरून अनिल विश्वास यांनी १९४९ मध्ये पूर्ण केला. अण्णांनी त्यांचं पार्श्वगायन फक्त त्यांच्याच संगीतात केलं. परंतु रोशनसाठी त्याच्या एका सिनेमात (बराती, १९५४) त्यांनी पार्श्वगायन केलं होतं. ‘अनारकली’मधील ‘ये जिंदगी उसी की है’ या गाण्याच्या शेवटच्या ‘अलविदा अलविदा’ या विराणीसाठी रोशननी अण्णांना मदत केली असं म्हणतात.

फिल्मफेअर अवार्ड १९५४ पासून सुरू झाली. पहिल्या वर्षी संगीत क्षेत्रात फक्त गाण्यासाठीच अवार्ड होतं, संगीतकार, गीतकार, गायक अथवा गायिकासाठी नव्हतं. पहिल्या वर्षी हे अवार्ड बैजू बावरातील ‘तू गंगा की, मौज मे’ या गाण्याला अवार्ड मिळालं. ‘अनारकली’तील ‘मुहब्बत ऐसी धडकन है’ हे दुसऱ्या क्रमांकावर होतं. त्यानंतर अण्णांचं फिल्मफेअर अवार्डसाठी कधीच नामांकन झालं नाही. राष्ट्रीय पातळीवरील अवार्ड १९७० नंतर चालू झाली. तोपर्यंत अण्णांची कारकीर्द जवळजवळ संपत आली होती. मात्र १९७० च्याच ‘घरकुल’ या मराठी सिनेमासाठी अण्णांना महाराष्ट्र शासनाचं उत्कृष्ट संगीतकाराचं अवार्ड मिळालं. त्यांच्या आयुष्यातील हे एकमेव अवार्ड!

अण्णांचं संगीत हे गायिकाप्रधान असायचं. त्यातील स्त्रित्वामुळे त्यांच्या गाण्यातील मेलडी व मार्दव जाणवायचं. १९४०च्या दशकात त्यांच्या काही सिनेमांत सहा-सात गायिका असायच्या. उदाहरणार्थ, ‘शहनाई’मध्ये बीनापाणी मुकर्जी, मीना कपूर, मोहनतारा अजिंक्य, शमशाद बेगम, गीता राय, लता, अमीरबाई कर्नाटकी अशा सात गायिका होत्या, तर ‘खिडकी’ (१९४८) मध्ये सहा. या शिवाय १९४०च्या दशकात अण्णांनी जोहराबाई, हमीदा बानू, नसीम अख्तर, सुरैय्या अश्या त्यावेळेच्या गायिकांचेही आवाज वापरले. नंतर १९५० आणि १९६० च्या दशकांत अण्णांचं लता आणि आशाशिवाय पान हललं नाही. लताने त्यांच्याकडे एकूण २०५ एकल गाणी गायली, तर आशाने ७९. लताने त्यांच्याकडे गायलेलं प्रथम गाणं हे ‘शहनाई’मधील ‘जवानी की रेल चली जाय रे’ यातील एक कडवं होतं. १९४६ च्या अखेरीस जेव्हा विश्राम बेडेकरांच्या ‘चूल आणि मूल’ या सिनेमाची निर्मिती चालू झाली, तेव्हा ते अण्णांना म्हणाले होते की, ‘दीनानाथांची मुलगी छान गाते.’ परंतु या सिनेमात तिला गायची संधी ते देवू शकत नव्हते, कारण त्या सिनेमाची अभिनेत्री बिंबा उसना आवाज घ्यायला तयार नव्हती. १९४७च्या सुरुवातीस विश्राम बेडेकरांनी अण्णांना याची आठवण करून दिली. अण्णा म्हणाले, ‘‘शहनाई’चं संगीत जवळजवळ तयार होत आलं आहे. परंतु एका युगल गाण्यासाठी मी तिचा आवाज घेईन.’ परंतु एकल गाण्यासाठी मात्र १९४९ सालापर्यंत थांबावं लागलं. त्या वर्षी ‘भेदी बंगला’, ‘जिगर’, ‘नमुना’, ‘पतंगा’, ‘गर्ल्स स्कूल’, ‘सिपहीया’ अशा एकूण सहा सिनेमात लता गायली. त्यानंतर लताचा आवाज आणि अण्णांचं संगीत असा दुग्धशर्करा योग पुढील १५ वर्षं जुळून आला.

गायिकांच्या प्रमाणात अण्णांकडे गायक कमी प्रमाणात गायले, कारण स्वतः अण्णाच पार्श्वगायन करत होते. रफी ‘सफर’ (१९४६) या सिनेमात प्रथम त्यांच्याकडे गायला. परंतु एकूण कारकिर्दीत अण्णांकडे त्याने वीससुद्धा सिनेमे केले नाहीत. तलत मेहमूद त्यांचा आवडता गायक होता. परंतु त्यालाही कमी सिनेमे मिळाले. १९६० च्या दशकात ‘नवरंग’पासून महेन्द्र कपूरही त्यांच्याकडे गायला. परंतु अण्णांचं स्वतःच्या आवाजावरच खरं प्रेम होतं. त्यामुळेच त्यांनी जयंत देसाईना सैगल घेण्यास नकार दिला. तेव्हा ते जयंत देसाईना म्हणाले होते की, ‘सैगल हा सैगल असेल, पण मीही राम चितळकर आहे.’  

अण्णा म्हणायचे, ‘‘अलबेला’, ‘अनारकली’ व ‘आझाद’ म्हणजेच काही माझं संगीत नाही.’ ते खरंही आहे. ‘संगीता’, ‘झमेला’, ‘झांझर’, ‘शगुफा’ अशा न चाललेल्या काही सिनेमांतील संगीत तोडीस तोड होतं. त्या सिनेमांच्या अपयशामुळे त्यांतील गाण्यांनाही अपयश लाभलं.

अण्णा हे एक सव्यसाची कलाकार होते. लहानपणी ते शाळेच्या नाटिकेत लहानसहान भूमिकाही करायचे. त्याचा पुनःप्रत्यय त्यांनी १९६६ मध्ये आलेल्या ‘धनंजय’ या सिनेमात मुख्य भूमिका निभावून घेतला. त्याचं संगीत दिग्दर्शनही त्यांचंच होतं.

अण्णांनी एकूण सात मराठी सिनेमांना संगीत दिलं. एक भोजपुरी सिनेमाही केला. म्हणजे त्यांनी तमिळ, हिंदी, मराठी व भोजपुरी अशा चार भाषांतील सिनेमांना संगीत देऊन आपलं सव्यसाचीत्व सिद्ध केलं.

अण्णांची कुठल्याही राजकीय पक्षाशी बांधीलकी नव्हती. परंतु एक व्यावसायिक म्हणून अण्णांनी १९६२ च्या निवडणुकीच्या वेळी काँग्रेससाठी सहा गाण्यांना चाली लावल्या होत्या. त्यातील ‘बैलजोडीची खूण धरी ध्यानी’ हे प्रचार गीत लोकप्रिय झालं होत.

अमीन सयानी यांनी एका मुलाखतीमध्ये अण्णांना विचारलं होतं की, त्यांच्या आयुष्यातील सर्वांत सुखद व दु:खद घटना कोणती? सुखद घटनेविषयी अण्णा म्हणाले होते की, ‘भगवान दादांबरोबरची निखळ मैत्री ही अत्यंत सुखद अशी जीवनयात्रा होती.’ तर दु:खद घटनेविषयी त्यांनी सांगितलं की, ‘त्यांना त्यांच्या चांगल्या व प्रसिद्ध कामाबद्दलही अनेकदा अनुल्लेखानं मारलं गेलं.’ अण्णांनी त्यांनी स्वरबद्ध केलेल्या ‘ऐ मेरे वतन के लोगो’ या सुप्रसिद्ध देशभक्तीपर गीताचा उल्लेख केला. एका कार्यक्रमात हे गीत गायलं गेलं. तेव्हा दिलीपकुमार निवेदक होता. त्याने त्यावेळी गीतकार, मूळ गायिका व कुठल्या प्रसंगी हे गीत प्रथम गायलं गेलं वगैरे माहिती दिली, परंतु संगीतकाराचं नाव सांगितलं नाही. अण्णांनी त्या कार्यक्रमानंतर दिलीपकुमारला विचारलं “युसुफ, तुला माहीत नव्हतं हे गीत मी संगीतबद्ध केलं होतं?” त्यावर दिलीपकुमार त्यांना म्हणाला, “नाही. मला खरंच माहीत नव्हतं. मला जो कार्यक्रमाचा कागद दिला त्यामध्येही तुझा उल्लेख नव्हता.”

उत्तर आयुष्यात हीच उद्विग्नता काळजात ठेवून अण्णांनी ५ जानेवारी, १९८२ मध्ये या जगाचा निरोप घेतला.  

pramodshirodkar@hotmail.com

Post Comment

Yadunath Bhise

Sat , 21 January 2017

One printing mistake the year appearing as 1070 should be 1970(The relative of C Ramchandra shared the memory with auther)


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सिनेमा हे संदीप वांगा रेड्डीचं माध्यम आहे आणि त्याला ते टिपिकल ‘मर्दानगी’ दाखवण्यासाठी वापरायचंच आहे, तर त्याला कोण काय करणार? वाफ सगळ्यांचीच निवते… आपण धीर धरायला हवा…

संदीप वांगा रेड्डीच्या ‘अ‍ॅनिमल’मधला विजय त्याने स्वत:वरच बेतलाय आणि विजयचा बाप बलबीर त्याने टीकाकारांवर बेतलाय की काय? त्यांचं दुर्लक्ष त्याला सहन होत नाही, त्यांच्यावर प्रेम मात्र अफाट आहे, त्यांच्या नजरेत प्रेम, आदर दिसावा, यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे. रेड्डीसारख्या कुशल संकलकानं हा ‘समीक्षकांवरच्या, टीकाकारांवरच्या अतीव प्रेमापोटी त्यांना अर्पण केलेला’ भाग काढून टाकला असता, तर .......