‘मराठी शब्दलेखनकोश’ : सर्वांना उपयुक्त कोशग्रंथ
ग्रंथनामा - आगामी
प्रा. रा. ग. जाधव
  • ‘मराठी शब्दलेखनकोशा’च्या नव्या आवृ्तीचं मुखपृष्ठ
  • Wed , 11 January 2017
  • ग्रंथनामा Booksnama आगामी यास्मिन शेख Yasmin Shaikh मराठी शब्दलेखनकोश Marathi Shabdalekhankosh मराठी लेखन मार्गदर्शिका Marathi Lekhan Margdarshika

प्रा. यास्मिन शेख यांचा ‘मराठी शब्दलेखनकोश’ हा एक अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण, समयोचित व उपयुक्त असा स्वागतार्ह कोशग्रंथ आहे. मराठी लेखन-वाचन-संभाषणातील शब्दप्रयोग करताना शब्दांची सामान्यरूपातली जी वरवर सोपी, पण किचकट व्याकरणीय विकारप्रक्रिया होत असते, तिच्यासंबंधी सुव्यवस्थितपणे मार्गदर्शन करणारी ही आगळीवेगळी कोशरचना आहे. सध्याच्या मराठी लेखनाची दुरवस्था दूर करण्यासाठी मोठ्या तळमळीने व अभ्यासपूर्वक परिश्रमाने प्रा. यास्मिन शेख यांनी सिद्ध केलेला हा कोश ऐतिहासिक महत्त्वाचाही ठरतो; कारण मराठी भाषेत यासारख्याच कितीतरी वेगवेगळ्या स्वरूपाच्या कोशरचनांची गरज आहे व यासाठी अभ्यासकांनी पुढे आले पाहिजे, हेही आवाहन त्यातून जाणवते.

मराठीचे शिक्षक, विद्यार्थी, पत्रकार तथा सर्वसामान्य मराठी माणसे या सर्वांनाच व्याकरणशुद्ध मराठी लेखन कसे करावे, हे या कोशग्रंथाच्या आधारे चांगल्या प्रकारे कळू शकेल. लेखिकेचे उद्दिष्टही हेच आहे.

मराठी भाषा व विशेषत: व्याकरणशुद्ध मराठी लेखन हे प्रा. यास्मिन शेख यांच्या आस्थेचे, अभ्यासाचे व चितंन-मननाचे विषय आहेत. या अभ्यासविषयातील सर्वसामान्य मराठी भाषकांच्या अडचणींची नेमकी जाणीवही सुमारे तीन तपांच्या महाविद्यालयीन अध्यापनाच्या अनुभवातून त्यांना झालेली आहे. ‘व्याकरणविषयक सल्लागार’ या आगळ्यावेगळ्या नियतकालिकीय भूमिकेची जबाबदारीही त्या गेली काही वर्षे सांभाळत आहेत. ‘मराठी लेखन मार्गदर्शिका’ या त्यांच्या पहिल्या पुस्तकालाही चांगला प्रतिसाद मराठी भाषकांनी दिलेला आहे. थोडक्यात, ‘मराठी शब्दलेखनकोशा’मागे प्रा. यास्मिन शेख यांच्या अभ्यासाची, अनुभवाची व मराठी भाषाप्रेमाची एक परिपक्व पार्श्वभूमी आहे.

मराठी लिहिण्या-बोलण्यात (-अव्ययांचा अपवाद सोडून) नाम-सर्वनामादी शब्द व क्रियापदे यांना लिंग-वचन-विभक्ती यांनुसार विकार होतात व हे विकार सामान्यरूपाच्या निश्चितीवर अवलंबून असतात. प्रस्तुत कोशात मराठीतील शब्दांच्या आठ व्याकरणीय जातींचे शेकडो शब्द तीन विभागांतून वर्मानुक्रमे दिलेले आहेत. त्यांची लिंग-वचनांनुसार होणारी सामान्यरूपे दिलेली आहेत. साधारणपणे प्रचलित अशा सर्व मराठी शब्दांचा समावेश यात आहे.

याखेरीज मराठीतील सर्वनामे, एक ते एकशेपाच (१ ते १०५) या अंकांचे लेखन, धातू व क्रियापदे, अनियमित चालणारे धातू व त्यांची रूपे, मराठीतील क्रियापदे यांसारखे या कोशातील विषय उदबोधक, नवलाईचे ठरतील.

कोणत्याही प्रकारच्या कोशात न्यूनाधिक्य टाळणे मोठे कठीण असते. अभ्यासक-परीक्षक ज्या उणिवा वा दोष निदर्शनास आणतात, त्यांची योग्य ती दखलही कोशकर्त्याला घ्यावी लागतेच. प्रस्तुत कोशरचनाही यास अपवाद नाही, तथा कोशकर्त्याही अपवाद नाहीत. ‘​अॅ, ऑ’ यांसारखे स्वर मराठीत शिरले आहेत. त्याचप्रमाणे ‘संस्कृती’, ‘प्रणाली’, ‘क्रांती’ यांसारख्या तत्सम शब्दांची अनेकवचनी रूपे ‘संस्कृत्या’, ‘प्रणाल्या’, ‘क्रांत्या’ या स्वरूपात करण्याचाही पर्याय रूढ असल्याचे दिसते. यांसारखी संभाव्य निरीक्षणे सोडली तर प्रस्तुत कोशरचना प्रचलित अशा संकेतांनुसार व पद्धतीप्रमाणे करण्यात आली आहे आणि तरीही ही कोशरचना तिच्यातील विषयानुसार आगळीवेगळी व सुसंवादी आहे. कोशाच्या या संरचनेमागे लेखिकेचे मोठेच परिश्रम, चिंतन-मनन उभे आहे, यात शंकाच नाही.

प्रा. यास्मिन शेख यांचा हा कोशग्रंथ प्रत्येक मराठी कुटुंबात सहज हाताशी येईल अशा ठिकाणी म्हणजे बहुधा टेबलावर असला पाहिजे, असे मला वाटते. कोशग्रंथ वरचेवर गरजेनुसार चाळावे लागतात व आपल्या अडचणी त्यांच्या आधारे वारंवार सोडवाव्या लागतात. या प्रकारे प्रस्तुत कोशाचे स्वागत व स्वीकार मराठी भाषकांनी करावा, ही माझी अपेक्षा आहे.

प्रा. यास्मिन शेख यांचे अभिनंदन करून व पुढेही त्या मराठी लेखनसंस्कृतीसाठी विविध प्रकारचे कोशग्रंथ निर्माण करून मराठीची दुरवस्था दूर करण्यास साहाय्य करतील, अशी इच्छा व्यक्त करून थांबतो.

‘मराठी शब्दलेखन कोश’ - प्रा. यास्मिन शेख
हर्मिस प्रकाशन, पुणे
पाने - ४८८
मूल्य - ५०० रुपये.

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘एच-पॉप : द सिक्रेटिव्ह वर्ल्ड ऑफ हिंदुत्व पॉप स्टार्स’ – सोयीस्करपणे इतिहासाचा विपर्यास करून अल्पसंख्याकांविषयी द्वेष-तिरस्कार निर्माण करणाऱ्या ‘संघटित प्रचारा’चा सडेतोड पंचनामा

एखाद्या नेत्याच्या जयंती-पुण्यतिथीच्या निमित्तानं रचली जाणारी गाणी किंवा रॅप साँग्स हा प्रकार वेगळा आणि राजकीय क्षेत्रात घेतल्या जाणाऱ्या निर्णयांवर, देशातील ज्वलंत प्रश्नांवर सातत्यानं सोप्या भाषेत गाणी रचणं हे वेगळं. भाजप थेट अशा प्रकारची गाणी बनवत नाही, पण २०१४नंतर जी काही तरुण मंडळी, अशा प्रकारची गाणी बनवतायत त्यांना पाठबळ, प्रोत्साहन आणि प्रसंगी आर्थिक साहाय्य मात्र करते.......

या स्त्रिया म्हणजे प्रदर्शनीय वस्तू. एक माणूस म्हणून जिथं त्यांना किंमत दिली जात नाही, त्यात सहभागी होण्यासाठी या स्त्रिया का धडपडत असतात, हे जाणून घेण्यासाठी मी तडफडत होते…

ज्यांनी १९७०च्या दशकाच्या अखेरीला मॉडेल म्हणून काम सुरू केलं आणि १९८०चं संपूर्ण दशकभर व १९९०च्या दशकाच्या सुरुवातीचा काही काळ, म्हणजे फॅशन इंडस्ट्रीच्या वाढीचा आलेख वाढायला सुरुवात झाली, त्या काळापर्यंत काम करत राहिल्या आहेत, त्यांना ‘पहिली पिढी’, असं म्हटलं जातं. मी जेव्हा त्यांच्या मुलाखती घेतल्या, तेव्हा त्या पस्तीस ते पंचेचाळीस या दरम्यानच्या वयोगटात होत्या. सगळ्या इंग्रजी बोलणाऱ्या.......

निर्मितीचा मार्ग हा अंधाराचा मार्ग आहे. निर्मितीच्या प्रेरणेच्या पलीकडे जाणे, हा प्रकाशाकडे जाण्याचा, शुद्ध चैतन्याकडे जाण्याचा मार्ग आहे

ही माया, हे विश्व, हे अज्ञान आहे. हा काळोख आहे. त्याच्या मागील शुद्ध चैतन्य हा प्रकाश आहे. सूर्य, उषा ही भौतिक जगातील प्रकाशाची रूपे आहेत, पण ती मायेचाच एक भाग आहेत. ह्या अर्थाने ती अंधःकारस्वरूप आहेत. निर्मिती ही मायेची स्फूर्ती आहे. त्या अर्थाने माया आणि निर्मिती ह्या एकच आहेत. उषा हे मायेचे एक रूप आहे. तिची निर्मितीशी नाळ जुळलेली असणे स्वाभाविक आहे. निर्मिती कितीही गोड वाटली, तरी तिचे रूपांतर शेवटी दुःखातच होते.......

‘रेघ’ : या पुस्तकाच्या ‘प्रामाणिक वाचना’नंतर वर्तमानपत्रांतील बातम्यांचा प्राधान्यक्रम, त्यांतल्या जाहिरातींमधला मजकूर, तसेच सामाजिक-राजकीय-सांस्कृतिक क्षेत्रांतील घटनांसंबंधीच्या बातम्या, यांकडे अधिक सजगपणे, चिकित्सकपणे पाहण्याची सवय लागेल

मर्यादित संसाधनांच्या साहाय्याने जर डोंगरे यांच्यासारखे लेखक इतकं चांगलं, उल्लेखनीय काम करू शकत असतील, तर करोडो रुपये हाताशी असणाऱ्या माध्यमांनी किती मोठं काम केलं पाहिजे, असा विचार मनात आल्याशिवाय राहत नाही. पण शेवटी प्रश्न येतो तो बांधीलकी, प्रामाणिकपणा आणि न्यायाची चाड असण्याचा. वृत्तवाहिन्यांवर ज्या गोष्टी दाखवल्या जात, त्या विषयांवर ‘रेघ’सारख्या पुस्तकातून प्रकाशझोत टाकला जातो.......