बरं बोलायचं की खरं बोलायचं? : ‘निमित्त 'व्हेंटिलेटर’चं
कला-संस्कृती - मराठी सिनेमा
अवधूत परळकर
  • 'व्हेंटिलेटर'चं एक पोस्टर
  • Tue , 10 January 2017
  • मराठी सिनेमा व्हेंटिलेटर Ventilator आशुतोष गोवारीकर Ashutosh Gowariker राजेश मापुसकर Rajesh Mapuskar हॅम्लेट Hamlet

‘बरं बोलायचं की खरं बोलायचं?’ दॅट इज द क्वेश्चन!
आजकाल आपल्या सगळ्यांचा ‘हॅम्लेट’ होऊन गेला आहे की काय? हे करावं की ते, हा प्रश्न अनेक प्रसंगी आपल्याला छळतो आहे. प्रश्न कसला, हा मोठाच पेच आहे. पावलोपावली अडखळायला लावणारा पेच.

महिन्यापूर्वी 'व्हेंटिलेटर' नावाचा एक सिनेमा पाहिला. शीर्षक इंग्रजी असलं तरी सिनेमा मराठी होता. अलीकडे मराठीत दर्जेदार सिनेमे निघायला लागलेत. अर्थात सगळे सिनेमे चांगले नसतात. आणि चांगले असतात तेही पूर्ण अंशानं चांगले नसतात. तद्दन वाईट सिनेमे परवडतात. नाक मुरडून मोकळं होता येतं. वेळ आणि पैसे गेल्याचं दु:ख होतं आणि त्याहून दु:ख वेळ वाया गेल्याचं होतं. पूर्णपणे वाईट असलेल्या सिनेमाचा विषय तिसऱ्या दर्जाचा असतो आणि त्याची पडद्यावरील हाताळणी त्याहून वाईट असते. पण हे एक वेळ ठीक आहे. अर्धवट चांगल्या सिनेमांचं काय करायचं? बऱ्याचदा हे सिनेमे वाईट सिनेमाहून अधिक त्रासदायक असतात. या सिनेमांचे कथाविषय अनोखे आणि चांगले असतात, त्या विषयाची पडद्यावरील मांडणीही उत्तम असते. पण कुठेतरी भट्टी बिघडून जाते आणि गडबड होते. चांगल्या विषयावरील असे चांगले सिनेमे अपेक्षाभंग करतात. या फसलेपणाचं, या अपेक्षाभंगाचं दु:ख अधिक क्लेशदायक असतं.

'व्हेंटिलेटर' सिनेमा त्याचं उत्तम उदाहरण आहे. उत्तम कथा, पटकथा, तांत्रिक सामग्रीची हुशार हाताळणी, अभिनेत्यांचा अव्वल दर्जाचा अभिनय याबद्दल या सिनेमाला भरपूर गुण द्यावे लागतील. तांत्रिकद्दृष्ट्या श्रीमंत असा हा सिनेमा सुरुवातीपासून पकड घेतो. खूप दिवसांनी पडद्यावर आपल्याला एक चांगली आणि वेगळी कलाकृती पाहायला मिळते आहे अशी भावना निर्माण होते. दिग्दर्शकाच्या सादरीकरणाला आणि नटांच्या टीमवर्कला दाद द्यावीशी वाटते. मात्र आपण सिनेमातील नाट्यात रंगून गेलो असतानाच सिनेमाची भट्टी बिघडायला सुरुवात होते. पडद्यावर आपल्या डोळ्यासमोर चांगलं आकार घेत असलेलं चित्र बघता बघता बिघडून जातं. सिनेमाचा अवघा बाज विस्कटून जातो.

'व्हेंटिलेटर'चं कथासूत्र तसं साधं, सोपं आणि सरळ आहे. त्याची पडद्यावरील पेशकश सरळ रेषेत जाणारी आहे. भलते गुंते नाहीत. घरातला एक ज्येष्ठ नागरिक व्हेंटिलेटरवर आहे. कोणत्याही क्षणी त्याचं आयुष्य संपण्याची शक्यता आहे. व्हेंटिलेटर चालू आहे तोवरच फक्त सर्व ठीक आहे. त्या अवस्थेत तो दीर्घकाळ जगू शकेल. मात्र अशा अवस्थेत त्याला किती दिवस जगवायचं हा प्रश्न त्याच्या कुटुंबीयांपुढे आहे. व्हेंटिलेटर बंद करायचा की, चालू ठेवायचा हा निर्णय मुलाने घ्यायचा आहे. सिनेमाभर या अवघड पेचाचं चित्रण आहे. या निमित्ताने सगळे कुटुंबीय एकत्र येतात. कुटुंबातील या सदस्यांच्या बोलण्या-वागण्यातून मानवी स्वभावाचे विविध नमुने समोर येत जातात. प्रसंग गंभीर आणि तणावपूर्ण असला तरी वातावरण खेळकर आहे. सतीश आळेकरांच्या 'महानिर्वाण' नाटकाची आठवण करून देणारा 'ब्लॅक ह्यूमर' या सिनेमात आहे.

मृत्युशय्येवरील माणसाचं निमित्त करून सिनेमा एकाच वेळी अनेक गोष्टींबद्दल बोलतो. हास्यविनोद, चेष्टा मस्करीतून लेखक आणि दिग्दर्शक राजेश मापुसकर गंभीर विधानं करतात.  दोन पिढ्यांमधले मूल्यात्मक अंतर, समकालीन राजकारणाचं तिरस्करणीय रूप, कुटुंबातल्या नात्यांमधला खोटेपणा, स्वार्थी आणि स्वकेंद्रीवृत्तीने भोवतालच्या घडामोडीकडे पाहणारे कुटुंबसदस्य, परस्परांशी असलेले त्यांचे दांभिक नातेसंबंध या सामग्रीतून हा सिनेमा समाजावर, आजच्या कुटुंबव्यवस्थेवर लहान-मोठी पण महत्त्वाची भाष्यं करतो. सिनेमाभर भरपूर पात्रांचा संचार असून दिग्दर्शक राजेश मापुसकरांनी हे सारे कुशलतेनं कथानकात गोवलं आहे आणि पडद्यावर तितक्याच कौशल्यानं उभं करून योग्य तो परिणाम साधला आहे. अधूनमधून मापुसकरांनी त्यात पेरलेले विनोद वातावरण खेळतं ठेवतात. फार्सिकल अंगानं जाणारे काही प्रसंग मात्र सिनेमातल्या विनोदाचा दर्जा खाली आणतात. पांचट म्हणावेत असे सुमार दर्जाचे विनोदी प्रसंग अशा सिनेमात पेरण्याचा उद्योग या मापुसकरसारख्या परिपक्व दिग्दर्शकानं का करावा कळत नाही. 

व्हेंटिलेटर बंद करायचा की, नाही या क्लायमॅक्सला सिनेमा येऊन पोहोचतो, तेव्हा त्याचे संवाद व सादरीकरण मेलोड्रामाकडे झुकायला लागतं, सिनेमाची लय बिघडू लागते. पूर्वार्धात दिग्दर्शकाने गाठलेली दर्जात्मक उंची उत्तरार्धात खाली घसरू लागते. व्यावसायिक चौकट सांभाळून पडद्यावर नवं काहीतरी सादर करू पाहणारा एक चांगला कलाप्रयत्न डोळ्यादेखत कोसळून पडताना पाहून आपण अस्वस्थ होतो.

उत्तम कलाकारांचा आणि उत्तम तंत्रज्ञांचा संच लाभलेल्या सिनेमाध्यमाची उत्तम समज असलेल्या राजेश मापुसकर या गुणी दिग्दर्शकाला ही अवदसा का आठवावी असा आपल्याला प्रश्न पडतो. मराठीतली एक चांगली सिनेकृती शेवटच्या पंधरा-वीस मिनिटात बघता बघता एका सामान्य रडव्या मराठी सिनेमाच्या पातळीवर येऊन पोचते. सुबुद्ध चित्रण असलेल्या एका हेतुप्रधान आणि कलानिष्ठ सिनेमाची ही एकप्रकारे शोकांतिकाच!

'व्हेंटिलेटर' हे एक उदाहरण झालं. अनेक सिने-नाट्यकृतींबद्दल आणि साहित्यकृतींबद्दल अलीकडे असा अनुभव येऊ लागला आहे. उत्तम जमलेलं नाटक कलाकृतीच्या पातळीवर पोचत असता नाटककार स्वत:च्या हातानं त्याची मोडतोड का करतो समजत नाही. सुरेख आकाराला आलेल्या साहित्यकृतीचा लेखक शेवटच्या काही पानात स्वतः:च्या लेखणीनं विध्वंस करतो.

नवी पिढी दिग्दर्शन क्षेत्रात आल्यापासून मराठी सिनेमात मोठा दर्जात्मक बदल घडून आला आहे. तरुण दिग्दर्शकांच्या सिनेमांनी भल्याभल्यांना चकीत केलं आहे. खूप वेगळे विषय या नव्या दिग्दर्शकांनी पडद्यावर आणले. नव्या तंत्रात नव्या शैलीत ते सादर करून आपली क्षमता त्यांनी दाखवून दिली. नव्या दिग्दर्शकांचे हे नवे सिनेमे सर्वार्थानं परिपूर्ण होते असं नाही. त्यांनी केलेले अनेक प्रामाणिक प्रयत्न फसले आहेत. कलाकृतीचा एकसंध परिणाम हे सिनेमे घडवू शकले नाहीत. काहींचे विषय आणि कथासूत्रं आगळीवेगळी होती, पण त्यांचा पडद्यावरील आविष्कार ढोबळ होता. काही अखेरच्या भागात भलतीकडे भरकटले, काही होतकरू दिग्दर्शक सिनेमाचा शेवट कसा करावा हे न कळून गोंधळले. काहींना धंदेवाईक हितासाठी सिनेमात नको त्या तडजोडी कराव्या लागल्या, अप्रस्तुत दृश्यं आणि प्रसंग घुसडावे लागले, चुकीचे शेवट करावे लागले. त्यामुळे हुशार पेशकश असूनही ना धड इथले ना तिथले अशी या सिनेमांची  अवस्था झाली.

अतिप्रसिद्धी आणि समीक्षकांची अवाजवी प्रशंसा यामुळे काही सामान्य सिनेकृती असामान्य म्हणून उचलल्या गेल्या. हे सिनेमाक्षेत्रात घडलं तसं साहित्य आणि नाट्यक्षेत्रातही घडलं. अनेक प्रसंगी समीक्षकांच्या अतिउत्साही  प्रशंसापर लेखनामुळेही हे घडलं. काही वेळा निर्माते, दिग्दर्शकाशी असलेले समीक्षकांचे हितसंबंध स्पष्ट अभिप्रायाच्या आड येत गेले.

कदाचित मराठी सिनेमाच्या किंवा होतकरू दिग्दर्शकाच्या कौतुकापोटी, सिनेमाबद्दल स्पष्ट  भूमिकेतून समीक्षा लिहायचं टाळलं जात असावं. सिनेमा खूप वाईट असला तरी त्याबद्दल 'खरं' न बोलता 'बरं' म्हणण्याची सवय बऱ्याच समीक्षकांना असते. काही वेळा उत्तेजन देण्याच्या सद्हेतूतून हे घडतं. कारणं काही असोत, खराखुरा अभिप्राय लिहिणं हा प्रकार मराठी समीक्षाक्षेत्रात दुर्मीळच होत चालला आहे, मग तो सिनेमा असो, नाटक असो वा साहित्यिक कलाकृती.

बरं बोलायचं की खरं, हा पेच आपल्या सर्वांनाच नेहमी पडतो. समीक्षक तरी असे वेगळे कोण असतात? आपल्यापैकीच काही लेखणीबहाद्दर लोक समीक्षा लिहितात. महत्त्वाचं म्हणजे,   लेखक, कलावंत आणि दिग्दर्शकांनाही ‘खरं’ बोलण्यापेक्षा ‘बरं’ बोलणारे समीक्षक आवडतात. चांगले बोलणारे तर त्यांचे जन्माचे मित्र बनून जातात. अनेकदा नाटककार आपल्या जवळच्या मित्रांना नाट्यप्रयोगाला बोलावतात. मित्राच्या आग्रहाखातर आलेल्या प्रेक्षकाला नाटक आवडलं नाही तर प्रश्न पडतो. आता काय करावं? नाटक संपल्यावर आत जाऊन मित्राला काय सांगावं? बरं बोलावं की खरं बोलावं?

‘तुझं नाटक आवडलं नाही’ असं स्पष्ट शब्दांत आपल्या नाटककार मित्राला ग्रीनरूममध्ये जाऊन सांगणारा समीक्षक अजून मला भेटलेला नाही. चित्रप्रदर्शन पाहून झाल्यावर चित्रकार मित्राला ‘मला नाही आवडली बुवा तुझी चित्रं’  असं रोखठोक सांगणारा प्रेक्षक मी पाहिलेला नाही.

पाहुणचारादाखल समोर खाण्यासाठी ठेवलेला पदार्थ बिघडला असेल तर तसं गृहिणीला स्पष्टपणे सांगणारा पाहुणा तुम्हाला आढळला आहे का? मैत्रिणीने ‘कसा दिसतो हा ड्रेस मला’ असं विचारल्यावर ‘अगदीच कायच्या काय वाटतो ग’ असं उत्तर देणारा कोणी पुरुष आहे का या जगात?

एकूणात काय तर ‘बरं बोलावं की खरं बोलावं?’ हा प्रश्न आपल्याला असा ठायी ठायी छळत राहतो. दैनंदिन व्यवहारात ‘हॅम्लेट’ची भूमिका आपण निमूट बजावत असतो.   

 

लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत.

awdhooot@gmail.com

  • 4 Like
  • 1 Comments

Post Comment

Tejas Kulkarni

Wed , 08 February 2017

सहमत !