तीन दिवस लाखो पुस्तकांसोबत… एक स्वप्नवत अनुभव
ग्रंथनामा - वाचणारा लिहितो
नीतीन वैद्य
  • दिल्लीतील जागतिक ग्रंथप्रदर्शन
  • Mon , 09 January 2017
  • ग्रंथनामा Booksnama नॅशनल बुक ट्रस्ट National Book Trust जागतिक ग्रंथ प्रदर्शन World Book Fair नवी दिल्ली New Delhi प्रगती मैदान Pragati Maidan

एकदा शांताबाई शेळके सोलापूरला आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी सांगितलेला किस्सा- “यावेळी अचानक अक्कलकोटला जाणं झालं. स्वामी समर्थांचं दर्शन झाल्यावर तिथल्या अवलिया पुजाऱ्याशी बोलताना सहज म्हणाले, ‘किती दिवस इथं यायचं होतं, पण जमतच नव्हतं. दरम्यान सोलापूरलाही अनेकवार येणं झालं, पण प्रत्येक वेळी काही ना काही कारणं निघत. या वेळी मात्र कसलंही नियोजन नव्हतं तरी सहज येणं झालं…’ अवलिया पुजारी सहज तरी गंभीर आवाजात म्हणाला, ‘आप कैसे आती? बुलावा आना चाहिये.’ ”

दिल्लीला नॅशल बुक ट्रस्टच्या वतीने दरवर्षी होणाऱ्या जागतिक ग्रंथप्रदर्शनाला जायचं गेली काही वर्षं ठरवत होतो, पण जमत नव्हतं. प्रत्येक वेळी शांताबाईंचा हा किस्सा आठवे. गेल्या वर्षी मात्र पुस्तकांचं बोलावणं आलं. ध्यानीमनी नसताना मनोविकासच्या आशिष पाटकरांमुळे सहज जाणं झालं. प्रगती मैदानावरील या ग्रंथप्रदर्शनात १६, १७, १८ फेब्रुवारी अशा तिन्ही दिवशी पुस्तकांनी भरभरून स्वागत केलं, अगदी गळामिठीच… स्वप्नवत अनुभव पदरी जमा झाला.

पुस्तक प्रदर्शनांना जगभर मोठी परंपरा आहे. चौदाव्या शतकात गटेनबर्गने खिळ्याच्या छपाईतंत्राचा शोध जिथं लावला, त्या जर्मनीतल्या मेन्झ या गावापासून जवळच असलेल्या फ्रँकफर्ट इथं जगातलं सर्वांत मोठं, प्रतिष्ठेचं ग्रंथप्रदर्शन ऑक्टोबर महिन्यात भरतं. त्याला जवळपास पाचशे वर्षांची प्रदीर्घ परंपरा आहे. जगभरचे नोबेल पारितोषिक विजेते, संभाव्य यादीतले महत्त्वाचे लेखक इथं येतात अन येनकेनप्रकारे आपली नवी पुस्तकं जगभर पोचतील अशा बेतानं त्यावर चर्चा घडवून आणतात. जगातले दहा हजारांवर प्रकाशक प्रदर्शनात सहभागी होतात. पण वाचकांचा पुस्तकांशी होणारा थेट संवाद इथं केंद्रस्थानी नाही. विविध भाषांतून होणारे अनुवाद आणि माध्यमांतरं यांच्या हक्कविक्रीचं हे महत्त्वाचं स्थान आहे. प्रकाशनातील नवी तंत्रं, छपाईतले नवे प्रयोग यासाठीही हे प्रदर्शन ‘लाँचिंग पॅड’ मानलं जातं.

मराठीत प्रदर्शनाची परंपरा सुरू झाली ती साहित्य संमेलनात. १९५५ साली पंढरपूर इथं शं. दा. पेंडसे यांच्या अध्यक्षतेखाली भरलेल्या संमेलनात ग्रंथदिंडी आणि ग्रंथप्रदर्शन प्रथम झालं. पुढे हा संमेलनाचा अविभाज्य भागच झाला. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून बसलेल्या प्रकाशकांना वाचकांशी थेट संवाद त्यामुळे शक्य झाला. तदनंतर गेल्या साठ वर्षांत नित्यनियमानं भरणाऱ्या प्रदर्शनांपासून (सातारा ग्रंथोत्सव, अक्षरधारा इ.इ.) कधीमधी उगवणाऱ्या (स्टॉक क्लीअरन्स सेल असावा तशा) प्रदर्शनांनी प्रकाशनविश्व झाकोळलं असलं तरी संमेलनातलं सर्वांना सामावून घेणारं ग्रंथप्रदर्शन आपला आब राखून आहे.

नवी दिल्लीत नॅशनल बुक ट्रस्टच्या वतीने होणारं ग्रंथप्रदर्शन त्यामानानं उशिरा म्हणजे १९७२ साली (हे वर्ष युनेस्कोनं आंतरराष्ट्रीय ग्रंथवर्ष घोषित केलं, त्यानिमित्तानं) सुरू झालं. १८ मार्च ते ४ एप्रिल या कालावधीत भरलेल्या या प्रदर्शनाचं उदघाटन तत्कालीन राष्ट्रपतींनी केलं होतं. तदनंतरच्या ४३ वर्षांत या प्रदर्शनाचा आलेख सतत वर्धिष्णू राहिला आहे. आज हे आशिया खंडातलं सर्वांत मोठं ग्रंथप्रदर्शन झालं आहे. दुसरं प्रदर्शन चार वर्षांच्या अंतरानं झालं. त्यानंतर दर वर्षाआड प्रगती मैदानावर हजेरी लावत २०१२ साली विसावं ग्रंथप्रदर्शन झालं. वाढता प्रतिसाह पाहून २०१३पासून वर्षाआड पंधरवडाभराचं या प्रदर्शनाचं स्वरूप दरवर्षी आठवडाभर असं करण्यात आलं. दरवर्षी जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये देशभरातले ग्रंथप्रेमी याची वाट पाहतात. एका देशाला फ्रँकफर्ट बुक फेअरच्या धर्तीवर ‘गेस्ट ऑफ ऑनर’ असा सन्मान दिला जातो. गतवर्षी या सन्मानांतर्गत दक्षिण कोरियाने आपलं साहित्य-सांस्कृतिक अवकाश खुलं केलं होतं. इतर ४१ देशांचे स्टॉल्सही या प्रदर्शनात होते. चीनसारखे देश त्यांच्याकडे होत असलेल्या जागतिक ग्रंथ प्रदर्शनाची जाहिरात या प्रदर्शनात करत होते.

प्रदर्शनाचा दरवर्षी एक मुख्य विषय (थीम पार्क) असतो. त्याच्याशी संबंधित व्याख्यानं, चर्चासत्रं, प्रकाशनं, सांस्कृतिक कार्यक्रम आठवडाभर सुरू असतात. गतवर्षी ‘सुर्योदय - इमर्जिंग व्हॉईसेस फ्रॉम नॉर्थ इस्ट इंडिया’ असा मुख्य विषय होता. ईशान्य भारतातल्या सात राज्यांशी संबंधित हजारो पुस्तकांची या प्रदर्शनात ठेवली गेली होती. आपल्या मर्यादित स्रोतात, आकलनाच्या कक्षेत तर सोडाच पाहण्यातही कधी येणार नाहीत अशी हजारो पुस्तकं होती. खासी लोक वाङ्मय, गारो लोककथा, संपूर्ण ईशान्य भारतातील लेखनाची ऑक्सफर्डने केलेली सूची, तिथं लागू असणारा विशेष लष्करी कायदा आणि त्याच्या विरोधात सुरू असलेला संघर्ष. बांगलादेश निर्मितीमुळे झालेल्या फाळणीच्या कथा, ईशान्य भारतातली विशिष्ट वाद्यं आणि संगीतसंस्कृती, माओ नागासारख्या आदिवासी जमाती, तिकडची प्रचलित मिथकं-परंपरा, इंदिरा गोस्वामी, मित्रा फूकनसारख्या नामवंतांच्या कथा-कादंबऱ्या…शिवाय तिथल्या चित्रकारांची चित्रं, शिल्प, हस्तकलेच्या वस्तू असा सभोवार पसरलेला ईशान्य भारत आणि मध्यभागी कार्यक्रमासाठीचा रंगमंच. खुलं सभागृह. आम्ही गेलो त्या दिवशी (१७ फेब्रुवारी) तिथं मैदानातल्या खुल्या रंगमंचावर ईशान्य भारतातल्या आसामी, नागा, मणिपुरी, अरुणाचली नृत्याचं बहारदार सादरीकरण झालं.

अवाढव्य प्रगती मैदानावर हे प्रदर्शन एकंदर १४ हॉलमध्ये विषयवार विभागलेलं होतं. एका हॉलचं क्षेत्रफळ ३० ते ३५,००० हजार चौरस फूट (अंदाजे पाउण एकर) असावं. त्यात साधारण दीडशे स्टॉल्स, छोटा रंगमंच आणि प्रेक्षागृह अशी व्यवस्था होती. (याव्यतिरिक्त हॉलचं भाडं न परवडणाऱ्या (ते एका स्टॉलसाठी आठवडाभरासाठी ४५००० इतकं होतं.)  प्रकाशकांनी स्टॉलच्या ओळींमधील पॅसेज, मोकळे कोपरे यांच्या आधारानं उघड्या टेबलवर आपलं तात्पुरतं दुकान मांडलं होतं.) देशविदेशातल्या १०५० सहभागी प्रकाशकांच्या एकंदर २०६१ स्टॉल्समधून हे अवाढव्य ग्रंथशिल्प उभारलं गेलं होतं. मागील वर्षीच्या अधिकृत आकडेवारीनुसार आठवडाभरात दहा लाख लोकांनी या प्रदर्शनाला भेट दिली होती. (ही संख्या कदाचित जगात सर्वाधिक असावी.) त्यात अनेक नामवंतही असतात. यावेळी आम्ही असताना अरविंद केजरीवाल, किरण बेदी, कुमार विश्वास, अनेक केंद्रीय मंत्री, नामवरसिंहासारखे नामवंत समीक्षक प्रदर्शाला भेट देऊन गेले, तरी फारसा गाजावाजा झाला नाही. वाचक आणि पुस्तकं यांच्यातला एकांत जपला जात होता.

प्रकाशन समारंभही जवळपास रोजच. यावेळी पत्रकार आशुतोषच्या ‘मुखौटे का राजधर्म’ आणि स्टार पत्रकार रविशकुमारच्या ‘इश्क में शहर होना’ या पुस्तकांचे प्रकाशन समारंभ झाले. शिवाय मोठ्या प्रकाशकांनी अनेक (२०-२५) स्टॉल्स एकत्र करून आपला स्वतंत्र अवकाश केलेला. तिथंही मोठे लेखक येत. त्यांचं स्वागत, वाचकांच्या गाठीभेटी होत. या सगळ्यात व्यवहार व त्यासाठीची प्रसिद्धी होती, पण सामान्य वाचकांना यापेक्षा पुस्तकांशी होणाऱ्या गळाभेटीचं अप्रूप आहे याचं भानही होतं. सर्वत्रच नव्या कोऱ्या पुस्तकांचा दरवळ मृदगंधासारखा पसरलेला होता…

लेखक प्रदर्शनात विकत घेतलेल्या पुस्तकांसह

वाणी, राजकमल, प्रभात, किताबघर, पेंग्विन, रूपा, नॅशनल बुक ट्रस्ट अशा मोठ्या प्रकाशकांनी २०-२४ स्टॉल्स एकत्रित केले होते. त्यांचं आठवडाभराचं भाडंच १२ लाखाच्या घरात होतं. शिवाय फर्निचर, सेवकवर्ग, समारंभ, मैदानभर लावलेले फ्लेक्स हे पाहिलं तर हे सर्व परवडणाऱ्या प्रकाशकांच्या व्यवहाराचा विचार करताना मती गुंग होते. शिवाय हिंदीत पुस्तकांच्या किमती मराठीच्या मानानं फारच कमी आहेत.

तीन पूर्ण दिवस आठ-नऊ हे हिंदी-इंग्रजी ललित साहित्याचे स्टॉल्स, लहान मुलांसाठीच्या पुस्तकांचा हॉल नं. १, थीम पार्क उभारलेला हॉल नं. ७ हे पूर्ण पाहिलं. तर ४१ परदेशी प्रकाशकांचा हॉल नं. ६, ललित कला अकादमीसारखे स्टॉल्स असलेला हॉल धावत पळत पाहिले. (अन्यत्र बहुतांशी वैत्रानिक, तंत्रज्ञान, शैक्षणिक पुस्तकांचे टॉल्स होते) जेमतेम अर्धं प्रदर्शन पाहता आलं असलं तरी बाहेरील रस्त्यावरून धावत पळत, हातात पुस्तकांनी भरलेल्या पिशव्या सांभाळात एका हॉलमधून दुसऱ्यामध्ये शिरणारी असंख्य माणसं दिवसभर पाहिली. मन आनंदानं तुडुंब भरून गेलं. इतकं की तीन दिवसात कधी, कुठे जेवलो हेही आठवत नाही. इतल्या जगरहाटीचे त्रस्त करणारे प्रश्न आपोआपच अंतर्मनातून बाहेर ढकलले गेले. अंतर्मनाचं अवकाश व्यापून राहिली होती पुस्तकं. जहाँ गम भी न हो, आँसू भी न हो, बस प्यार ही प्यार पले अशा दुसऱ्या विश्वात घेऊन जाणारी पुस्तकं…

लेखक पुस्तकप्रेमी आहेत.

vaidyaneeteen@gmail.com

  • 2 Like
  • 0 Comments