‘याडं लागलं, याड लागलं!’
सदर - ‘कळ’फलक
संजय पवार
  • रेखाचित्र - संजय पवार
  • Tue , 03 January 2017
  • ‘कळ’फलक Kalphalak संजय पवार Sanjay Pawar सैराट Sairat एक मराठा लाख मराठा Yak Maratha Lakh Maratha नोटाबंदी Demonetisation

२०१६ संपलं. महाराष्ट्राचं पहायचं झालं तर ‘मास हिस्टेरिया’ काय असतो याचा अनुभव आपण सर्वांनी सरत्या वर्षात ठळकपणे घेतला. तसा तो देशपातळीवर आपण २०१४च्या निवडणुकीपासूनच अनुभवतोय. चढत्या भाजणीने तो आजही देशपातळीवर जाणवतो. सध्या आपण महाराष्ट्रापुरतं पाहू. कारण देशपातळीवरचा ‘ईसीजी’ या वर्षात क्रमाक्रमाने मिळेल.

२०१६ सालात महाराष्ट्राने जे दोन ‘मास हिस्टेरिया’ अनुभवले, त्याने २०१६चे सरळ दोन भाग केले. पूर्वार्ध आणि उत्तरार्ध. पूर्वार्धात नागराज मंजुळेच्या ‘सैराट’ने महाराष्ट्राला अभूतपूर्व असा मास हिस्टेरियाचा अनुभव दिला. आणि तोही अवघ्या तीन तासाच्या सिनेमातून! ‘सैराट’ने मराठी चित्रपटाच्या अनेक गणितांना मोडीत काढलं, त्रैराशिकं उधळली. चित्रपटाचं ‘यश’ मोजायला कुठलीच फूटपट्टी शिल्लक ठेवली नाही. यातली अधिक धक्कादायक (तथाकथित यशस्वी मार्तंडांना) भाग म्हणजे ‘पिस्तुल्या’ ही शॉर्ट फिल्म आणि ‘फँड्री’सारखं तिरपागडं नाव असणाऱ्या व डुकरं पकडून व्यवस्थेला स्वच्छ ठेवणाऱ्या जमातीमधील मुलाचं पौगंडावस्थतेलं गावव्यवस्थेत जन्म घेणारं प्रेम या विषयावरचा समीक्षकीय गौरवांकित एक सिनेमा, एवढंच भांडवल असलेल्या नागराजने ही झेप घेतली!

‘फँड्री’नंतर नागराज असाच कडेकडेनं, विविध जाती, त्यांचे प्रश्न, गेला बाजार धरणग्रस्त, नक्षलवादी, शेतकरी, ओबडधोबड बाया-बाप्ये, त्यांची काळी सावळी पोरं घेऊन आपला एक आरक्षित पण विमुक्त सिनेमा बनवत, वेगळ्या धारेचा म्हणून राहिल आसपास…तो सतीश मनवर नाही का आहे एक तसलाच दिग्दर्शक…तसा हा आणखी एक!

पण नागराजने सर्वांच्या या भाकितांना मोडीत काढलं. खरं तर नागराजच्या पुढच्या वाटचालीची दखल घेऊन, त्यावर भाकितं करावी इतकी ही ‘गिनती’ करण्यायोग्य तो अनेकांना त्यावेळी वाटला नसावा. रोटरी क्लबमध्ये एखाद्या डोंबाऱ्याचं आत्मकथन ऐकल्यावर नंतरच्या चहापानाच्या वेळी द्रयार्द करुणेनं पहात ‘हाऊ नं…सो बॅड’ वगैरे म्हणत रोटरीची श्रीमंत, डिस्ट्रिक पेज थ्रीवाली मंडळी जशी हळहळतील, तितपत मराठी इंडस्ट्री नागराजकडे पहात असावी.

‘फँड्री’नंतर नागराज एक सिनेमा करतोय, त्याचं नाव ‘सैराट’ आहे इतपत माहिती समाजमाध्यमातून इंडस्ट्री व लोकांपर्यंत झिरपत होती. ‘सैराट’ शीर्षकात पुन्हा तसलंच काही असणार असेही कयास मांडून सर्व आपापल्या यशोगाथेत, विक्रमात मश्गुल होते. आणि एक दिवस ‘सैराट’ प्रदर्शित झाला. प्रदर्शनाआधीच त्यातल्या ‘झिंगाट’ गाण्यानं ठेका धरला होता. ‘याड’ लागायला लागलं होतं. सैराट प्रदर्शित झाला आणि पहिल्या दिवसापासून त्यानं जी वावटळ निर्माण केली, त्यात ‘शाळा’ची पुस्तकं उडाली, ‘दुनियादारी’तले केसांचे विग विस्कटले, ‘टाईमपास’चे आई-बाबा आणि साईबाबा ही विसरले गेले. ‘लय भारी’ची लाथही निकामी ठरली आणि ‘नटसम्राट’समोर ‘सैराट’ नावाचा शहेनशहा उभा ठाकला.

बाकी मग नंतरचा इतिहास सर्वश्रुत आहे. त्याची पुनरुक्ती टाळत ‘सैराट’ने नंतर राजकीय मास हिस्टेरिया कसा निर्माण केला तो प्रवास राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील अभ्यासकांनी गंभीरपणे अभ्यासावा असाच आहे.

‘सैराट’मधील पाटलाची पोर कुणा मच्छिमार परशाने पळवून नेणं आणि दोन वर्षांनी पाटलांनी आपल्या धुळीला मिळालेल्या प्रतिष्ठेचा घेतल्याला रक्तरंजित बदला या शेवटाने पाटील पर्यायाने मराठा समाज चर्चेत आला! आर्चीचा बिनधास्तपणा पाटीलकीच्या मर्यादा उधळून लावणाऱ्या ठरल्या. त्यात खालच्या जातीच्या पोराशी पाट लावणं आणि त्याला टाळ्या, शिट्ट्या आणि झिंगाटच्या तालावर मान्यता मिळणं हे सिनेमागृहातून बाहेर पडून समाजात चर्चेत आलं आणि मग आजवर सिनेमात (व प्रत्यक्षात) पाटलांनी किती बाया ‘वाड्यावर’ नेल्या याची चर्चा, वादविवादात बदलली. गावोगावचे पाटील तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करत होते. कारण तोवर ‘सैराट’ची झिंग महाराष्ट्राच्या नसानसात चढली होती.

आणि याच वातावरणात कोपर्डीत, दलित तरुणांनी मराठा मुलीवर अत्यंत घृणास्पद बलात्कार व अत्याचार करून मृतदेहाचीही बिटंबना केल्याची बातमी प्रसिद्ध झाली. आणि हा ‘सैराट’चा साईड इफेक्ट म्हणून थेट अट्रॉसिटी कायदाच कॉमन सिव्हिल कोडसारखा ऐरणीवर आणला गेला. पाटलांच्या पोरी सुरक्षित नाहीत म्हणत जमिनीखालून एक आंदोलन पेरलं गेलं. आणि हा हा म्हणता, कोंब तरारून यावे तसे, ‘एक मराठा, लाख मराठा’ म्हणत शिस्तबद्ध व मोर्च्यागणिक सहभागी गर्दींचे उच्चांक मोडत मराठा समाज रस्त्यावर उतरला. थिएटरमध्ये जे ‘सैराट’ने केलं, ते रस्त्यावर या मोर्च्यांनी केलं! ‘सैराट’सारखेच हे मोर्चे बिनचेहऱ्याचे, दर्शनी तरी राजकीय तोंडवळा नसलेले, प्रस्थापित राजकीय-बिगर राजकीय संघटना, त्यांचे नेते, पदाधिकारी, भूमिका यांना दूर ठेवत समाजातील तरुण-तरुणींनी यशस्वी केले. त्यात कोपर्डी बलात्कार व अट्रॉसिटी कायद्यात बदल व मराठा आरक्षण या तीन प्रमुख मागण्यांनी महाराष्ट्राच्या ‘फडणवीशी’ सरकारला हा स्वपक्षीय ओबीसींचा धोबीपछाड कि सत्तावंचित व पुढेमागे गैरकारभाराच्या चौकशी फेऱ्यात तुरुंगात जाण्याच्या भीतीने गारठलेल्या मराठाबहुल विरोधी पक्षांची ही खेळी, असा प्रश्न राजकीय पक्ष, विश्लेषक व सत्ताधाऱ्यांना पडला. ‘सैराट’सारखाच या मोर्च्यांचा मास हिस्टेरिया महाराष्ट्रभर पसरला. ‘सैराट’च्या नापसंतीतून व कोपर्डीच्या बलात्कार प्रकरणातून तयार झालेला हा हिस्टेरिया शहरोशहरी जेव्हा तथाकथित नेतृत्वाला बाजूला सारून मोर्च्यातीलच पाच तरुणींच्या हस्ते जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्याचा नवा पायंडा पाडला गेला. म्हणजेच नकळतपणे ‘सैराट’मधल्या आर्चीनेच रस्त्यावर उतरून आपलं राजकीय, सामाजिक नेतृत्व उभं केलं होतं! अन्यथा पडदा संस्कृती पाळणाऱ्या मराठ्यांना हे पचलं असतं?

‘सैराट’चा मास हिस्टेरिया शेवटी राजकीय वळण घेऊन हिवाळी अधिवेशनात जिल्हाधिकारी यांच्याऐवजी थेट मुख्यमंत्र्यानाच भेटून नागपूरच्या थंडीत गोठत गेला. आणि ‘पुढचा कार्यक्रम पुढे बघू’ इथवर तो अनिश्चित झाला. नागराजने एकाच दगडात किती पक्षी मारले बघा, यावर खरंतर टीसीसीसारख्या संस्थांनी अभ्यास करायला हवा.

‘सैराट’ आणि ‘एक मराठा, लाख मराठा’ या मास हिस्टेरियांना वर्षाच्या उत्तरार्धात, खरं तर शेवटाला नोटाबदीनं व त्याला जोडून आणलेल्या देशप्रेमाच्या मास हिस्टेरियानं गिळंकृत केलं! सोनिया गांधींनी ज्यांना ‘मौत के सौदागर’ अशी काँग्रेसी परंपरेला न शोभणारी उपाधी दिली होती, त्या नरेंद्र मोदींचा या जनतेनं संपूर्ण बहुमतासह, देशाची सत्ता देऊन, ‘मौत के सौदागर’ला ‘सपनों के सौदागर’ ही उपाधी दिली! दहा वर्षांच्या यूपीएच्या धोरण लकव्यानं पुंगत्व आलेल्या राजकीय, सामाजिक जीवनाला नरेंद्र मोदींनी स्वप्नांचा असा काही व्हायग्रा दिला की, देशवासीयांच्या पेशीनपेशी उत्तेजित झाल्या! या उत्तेजनेला मोदींनी पहिल्यापासून देशभक्तीचं असं काही चाटण लावलं की, ‘सैराट’पेक्षा भयंकर ‘याड’ देशाला लागलं! ‘प्रेषित’ या शब्दाला मागे टाकील अशी विराट प्रतिमा मोदींनी स्वत:ची स्वत: पक्ष, सहकारी आणि माध्यमं यांची सांगड घालत केली. अडीच वर्षं विविध स्वप्नांची पेरणी करणाऱ्या मोदींनी पारंपरिक आंतरराष्ट्रीय शत्रू असलेल्या पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक करून नव देशभक्तीला आणखी उत्तेजना दिली. या विजयोन्मादातच त्यांनी नोटाबंदीचा आर्थिक सर्जिकल स्ट्राईक केला आणि देश जणू एक बंद घड्याळ झाला! ना काही पुढे सरकेना, ना काही मागे जाईना. स्टॅच्यू झाला देशाचा. या स्थितीलाही ५० दिवसाची मुदत व देशभक्ती जोडायला मोदी विसरले नाहीत.

सुमारे ८५ टक्के वापरात असलेलं ५०० व १०००च्या नोटा स्वरूप चलन ‘काळा पैसा’ बाहेर काढण्यासाठी एका रात्रीत रद्द करण्याचा निर्णय मोदींनी घेतला. देशाने क्षणभराचा पॉज घेतला. मात्र तो पॉज चटकन रिलीज करत नमोभक्तांनी माध्यमांचा ताबा घेतला आणि ७० वर्षांच्या देशाच्या इतिहासातला धाडसी निर्णय, अर्थक्रांती, काळे पैसेवाले डुबले. नोटा फेकू लागले, जाळू लागले, वाटू लागले, दानपेटीत, गंगेत टाकू लागले. एखाद्या यशातला होम अखंड तेवत ठेवण्यासाठी ज्या पद्धतीने तेल-तुपाचा अकंड मारा केला जातो, तसे नमो गुणगान, देशभती यांना उधाण आलं. दरम्यान बँका, एटीएम इथं अभूतपूर्व चलनकोंडी, चलनकल्लोळ, मनीस्ताप झाला. ५० दिवसाच्या मुदतीत ६०च्यावर नोटिफिकेशन्स निघाली. देशभरात शंभर जणांचा पैसे काढण्याच्या रांगेत बळी गेला. पण मोदी प्रेमाचा जाणीवपूर्वक पसरवलेला मास हिस्टेरिया इतका जालीम होता की, सर्व त्रास, जाच, गैरसोय सहन करत लोक ‘त्रास होतोय पण निर्णय चांगला’ म्हणत राहिले! अलीकडच्या भाषेत सांगायचं तर लग्नाचं आमिष दाखवून उपभोग घेत राहणाऱ्या तरुणाविषयी ‘तू वेळीच तक्रार का नाही केलीस?’, या प्रश्नावर तरुणीचं उत्तर असतं, ‘…पण माझं प्रेम आहे ना त्याच्यावर अजूनही!’ तपासयंत्रणांना निरुत्तर करणाऱ्या या उत्तरासारखं कुणी कुडमुडे अर्थक्रांतीवाले बोकील आणि माशेलकर, काकोडकर, नरेंद्र जाधव यांच्यासारखे सन्मानीयही ‘त्रास होता, पण निर्णय चांगला’ असं विधान करतात, तेव्हा वाटतं, ओरडून विचारावं यांना ‘त्रास ठेवा बाजूला, कागदावर मांडून दाखवा शास्त्रीय पद्धतीने’ निर्णय कसा चांगला ते! रिझर्व्ह बँक जिथं अजून धैर्य दाखवत नाही त्याआधीच समाजधुरिणांच्या या प्रतिक्रिया म्हणजे सावध प्रतिक्रिया की राजकीय दहशतीपुढची शरणागती?

नवश्रीमंत, नव भांडवलदार व नव सांस्कृतिक मक्तेदार यांनी तयार केलेल्या ‘मोदी - एक युगपुरुष’ या मास हिस्टेरियाचे बळी इतके वाढले होते की, तुम्ही एक तर देशभक्त म्हणजेच मोदीभक्त किंवा देशद्रोही म्हणजेच मोदी विरोधक, एवढे दोनच पर्याय शिल्लक ठेवले होते.

हीच गोष्ट ‘सैराट’ने केली होती. ‘सैराट’ आवडतो किंवा नावडतो. पण त्याचवेळी एक मोठा वर्ग ‘डिसीजनलेस तटस्थ’ राहतो. आपल्या तटस्थतेची भीती वाटावी असं वातावरण आजूबाजूला उभं केलं गेलंय! त्यामुळे तुम्ही समर्थक नसाल पण विरोधकही करत नसाल आणि तटस्थ राहत असाल तर तुमची तटस्थता तुमची मूकसंमती म्हणून समर्थनात मोजली जातेय. आणि तुम्हाला प्रेमाचं, भक्तीचं ‘याड लागलं’ असं जाहीर केलं जातंय.

या मास हिस्टेरिया म्हणजे ‘याड लागलं’ प्रकरणानं आता गंभीर वळण घेतलंय! या लोकशाहीवादी देशाला एकछत्री हुकूमशाहीकडे नेण्याचा हा आभासी लोकशाहीचा प्रकार धोकादायक आहे. यात लोकशाहीची हत्या तर होईलच, पण ‘सैराट’च्या शेवटासारखी त्याची भविष्यकालीन पावलं लोकशाहीच्या रक्तीनं माखलेली दिशाहिन व निरागस डोळ्यांनी रडणारी असतील!

...............................................................................................................................................................

लेखक संजय पवार प्रसिद्ध नाटककार व पटकथाकार आहेत.

writingwala@gmail.com

............................................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

Post Comment

203mogra@gmail.com

Sun , 08 January 2017

hats off


Kunda Pramilani

Wed , 04 January 2017

मला हा पॅरा खूप आवडला माझाही अगदी तंतोतंत असाच अनुङव आहे. "--खरं तर नागराजच्या पुढच्या वाटचालीची दखल घेऊन, त्यावर भाकितं करावी इतकी ही ‘गिनती’ करण्यायोग्य तो अनेकांना त्यावेळी वाटला नसावा. रोटरी क्लबमध्ये एखाद्या डोंबाऱ्याचं आत्मकथन ऐकल्यावर नंतरच्या चहापानाच्या वेळी द्रयार्द करुणेनं पहात ‘हाऊ नं…सो बॅड’ वगैरे म्हणत रोटरीची श्रीमंत, डिस्ट्रिक पेज थ्रीवाली मंडळी जशी हळहळतील, तितपत मराठी इंडस्ट्री नागराजकडे पहात असावी. ... "


Kunda Pramilani

Wed , 04 January 2017

मास हिस्टेरिया तयार करणाऱ्यांचं एक बाजारपेठीय गणित आहे. आणि भांडवली माध्यमं ते खूप चलाखीनं करतात. त्याला जोड ब्राम्हणी बुध्दीजीवींच्या चलाख तंत्राची मिळाली की यशाचा उच्चांक गाठला जातो. नॉम चॉमस्कीनं आपल्या नेसेसरी इल्यूजन या ग्रंथात मॅन्युफॅक्चरींग कन्सेन्ट ही संकल्पना मांडताना नेमकं हेच म्हटलंय की बुध्दिजीवी मध्यमवर्ग हा नेहमी प्रस्थापीत व्यवस्थेच्या विचारांसाठी मॅन्यूफॅक्चरींग कन्सेंटचं काम असं करतो की हे कुणी केलंय हे कऴूच नये. निखील साने आणि झीच्या संपूर्ण ब्नाम्हणी टीमने चला हवा येऊद्या मंचावर हे अतिशय चलाखीने केलंय. जे नागराजला कदाचितकळलं असेलच. सैराट गाण्यावर सुरूवातीच्या मिनिटापासून सगळे लहानथोर नाचत होते. झिंगल्यासारखे. मी अनेकवेळा अशा कार्यक्रमाना जाऊन आल्यामुळे हे मास हिस्टेरीक ऑडियनसचे सीनस शुटींगसाठी कसे कंडक्टरकडून स्टेज्ड केले जातात हे मी पाहिलंय. हवा येऊद्याचं सैराटच्या पहिल्या दिवसाचं फुटेज काढून पाहिलं तर हे सहज लक्षात येईल कींवा सिनेमा प्नमोशनचे सगळे फुटेज काढून पहावे १६ ते २० वयोगटातली एक कॉमन टीमआधी उठून नाचायला सुरूवात करीत असे. हिमेश रेशमियाच्या गाण्यासारखं झोपडपट्टीतल्या बारश्याच्या लाऊडस्पिकरवर सुध्दा एकच गाणं तासंनतास वाजवलं जायचं. त्यामुळे सैराट हा ब्राम्हणी बाजारू व्यवस्थेने मॅन्युफॅक्चर केलेला मास हिस्टेरिया आहे. मराठा मोर्चा तसा नाहीय आरेसेसचा रोल त्यात स्पष्टपणे हे नाकारून चालणार नाही. लाखांच्या संख्येवर फ डणवीस सरकारचं मौन आणि फेक बातम्या हेच खूप बोलकं आहे. डॉ. कुंदा


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

जर नीत्शे, प्लेटो आणि आइन्स्टाइन यांच्या विचारांत, हेराक्लिट्स आणि पार्मेनीडीज यांच्या विचारांचे धागे सापडत असतील, तर हे दोघे आपल्याला वाटतात तेवढे क्रेझी नक्कीच नाहीत

हे जग कसे सतत बदलते आहे, हे हेराक्लिटस सांगतो आहे आणि या जगात बदल अजिबात होत नसतात, हे पार्मेनिडीज सिद्ध करतो आहे. आपण डोळ्यांवर अवलंबून राहण्यापेक्षा आपल्या बुद्धीवर अवलंबून राहिले पाहिजे, असे पार्मेनिडीजचे म्हणणे. इंद्रिये सत्याची प्रमाण असू शकत नाहीत. बुद्धी हीच सत्याचे प्रमाण असू शकते. यालाच बुद्धिप्रामाण्य म्हणतात. पार्मेनिडीज म्हणजे पराकोटीचा बुद्धिप्रामाण्यवाद! हेराक्लिटस क्रेझी वाटतो, पण.......