म. गांधीजी - नम्रतेची पराकाष्ठा
पडघम - राज्यकारण
राजन मांडवगणे
  • छायाचित्र सौजन्य - www.panoramio.com-Panoramio - Photos by V-Italy
  • Sat , 22 October 2016
  • राजन मांडवगणे Rajan Mandavgane म. गांधी Gandhi

कालच्या २ ऑक्टोबरला म. गांधी यांची १४७वी जयंती देशभर साजरी झाली.

गांधीजी म्हणत मी १२५ वर्षं जगणार आहे, पण दुर्दैवानं स्वातंत्र्यानंतर जेमतेम वर्षभरातच त्यांची हत्या झाली. गांधीजींविषयी आजवर जगभरच्या पत्रकार, लेखकांनी आणि त्यांच्या सहवासातल्या अधिकारी व्यक्तींनी असंख्य पुस्तकं लिहिली आहेत, आजही त्यांच्याविषयी लिहिलं जात आहेच. गांधीजी आणि त्यांच्या तत्त्वज्ञानाचं गारूडच असं आहे की, त्याची मोहिनी भल्याभल्यांना पडल्यावाचून राहत नाही.

सत्याग्रह आणि अहिंसा या दोन शस्त्रांच्या बळावर गांधीजींनी बलाढ्य ब्रिटिश सत्तेशी लढा दिला. तिला सळो की पळो करून सोडलं. सत्याचा आग्रह आणि अहिंसात्मक कृती या दोन गोष्टी गांधीजींनी भारतीय राजकारणात आणल्या, तशाच त्या भारतीय जनामानसातही रुजवण्याचा प्रयत्न केला. गांधीजींचे गुरू नेक नामदार गोखले म्हणत माणसाला सज्जनपणा न सोडता राजकारण करता आलं पाहिजे. तसं त्यांनी स्वत:च्या कृतीतून दाखवूनही दिलं. गांधीजींनी त्यांचाच वारसा पुढे चालवला. भारतीय राजकारणाला त्या दिशेनं वळण देण्याचा प्रयत्न केला.

गांधीजी म्हणतात - ‘‘सत्य आणि अहिंसेच्या मार्गाला वस्तºऱ्यासारखी तीक्ष्ण धार असते. दैनंदिन आहारापेक्षा देखील तिचं रोजचं आचरण अधिक महत्त्वाचं असतं. योग्य आहारानं शरीराचं पोषण होतं, अहिंसा योग्य रीतीनं आचरली तर आत्म्याचं सामर्थ्य वाढतं... अहिंसा हे आत्म्याचं अन्न असल्यामुळे ते सतत घेणंच योग्य असतं. त्या बाबतीत तृप्ती ही होऊच शकत नाही... अहिंसेचं पहिलं पाऊल घालणं म्हणजेच आपल्या दैनंदिन जीवनात परस्परांच्या बद्दल सत्यवादित्व, नम्रपणा, सहिष्णुता आणि प्रेमळ दयाभाव यांची जोपासना करणं होय.’’

नेमस्तपणा आणि जहालपणा हे दोन्ही उपाय स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अपुरे आहेत, हे गांधीजींनी ओळखलं असावं, म्हणून त्यांनी अहिंसेचा मार्ग अवलंबला. कारण नेमस्तपणाला सर्वसामान्यांचा फारसा पाठिंबा मिळत नाही. त्यांना तो नेभळटपणा वाटतो. तर जहालपणातल्या क्रांतिकारकात्वामुळे त्यात सर्वांचंच जगणं पणाला लागतं. त्यामुळे सर्वसामान्यांना हाही पर्याय मानवत नाही. शिवाय सामान्यांचं समुदायात रूपांतर झालं की, त्यांची झुंड व्हायला वेळ लागत नाही. अशा झुंडीकडून काही सकारात्मक कृती घडवून आणायची असेल तर अहिसेंचं आचारशास्त्रच नितांत निकडीचं ठरतं. गांधीजींनी याच शस्त्राचा नेमकेपणाने वापर करत तमाम भारतीयांना स्वातंत्र्यलढ्याशी जोडून घेतलं. ब्रिटिश सत्तेपुढे आपलं काहीच चालत नाही, या विचारानं नैराश्य आलेल्या, तिच्या जोर-जुलमानं असहाय्य झालेल्या भारतीय जनतेमध्ये गांधीजींनी चैतन्य निर्माण केलं. बलिदानाच्या प्रेरणेनं शहरं आणि खेड्यापाड्यांतील लाखो लोक गांधीजींच्या सत्याग्रह चळवळीत सहभागी झाले. त्यातून अहिंसक प्रतिकाराची एक तेजस्वी परंपरा निर्माण झाली.

त्याविषयी रवींद्रनाथ टागोर एके ठिकाणी म्हणतात - ‘‘मानवजातींमधील युद्ध हे जरी धर्मयुद्ध किंवा नैतिक स्वरूपाचं युद्ध म्हणून मानलं गेलं असलं तरी, या धर्मयुद्धातही निर्दयतेचा अंगीकार केल्यावाचून चालत नाही हे आम्हाला गीतेत आणि महाभारतातही ठिकठिकाणी दृष्टोपत्तीस येतं. आता त्यामध्ये शारीरिक शक्तीला स्थान आहे किंवा कसं यासंबंधीच्या शास्त्रात आम्हाला या ठिकाणी शिरण्याचं कारण नाही. परंतु त्याचे उलट हा जो एक नीतिधर्म की, ‘आम्ही मरू पण मारणार नाही; आणि याच मार्गानं विजय संपादन करू’ हा मात्र आम्हाला एखाद्या महावाक्याप्रमाणे वाटल्यावाचून राहावत नाही. किंबहुना ही संदेशवाणी आहे... असल्या प्रकारचं धर्मयुद्ध हे बाह्यजग जिंकण्याकरता नसतं, तर युद्धात हार खाल्ल्यानंतरही परत विजयश्री संपादन करण्याकरता असतं. अधर्मयुद्धात मरण येणं म्हणजे खरोखरीच मरणं. धर्मयुद्धात मात्र मेल्यावरही काही बाकी शिल्लक उरतं; ती म्हणजे पराजयापलीकडल जय, आणि मृत्यूच्या पलीकडील अमृतत्व! ज्यांनी या तत्त्वाचा आपल्या जीवनात साक्षात्कार करून घेऊन त्याचा पूर्ण अंगीकार केला, त्याचं म्हणणं आम्हाला मान्य केल्यावाचून गत्यंतरच नाही!’’

गांधीजींच्या अहिंसात्मक संघर्षाच्या या अभिनव मार्गानं जगाचं लक्ष वेधून घेतलं. अमेरिकेतील निग्रो, पोलंडचे कामगार, फिलिपाइन्सची जनता यांनी गांधीजींच्या याच मार्गाचा स्वीकार करत आपलं स्वातंत्र्य मिळवलं. १९८२ साली जागतिक कीर्तीचे दिग्दर्शक रिचर्ड अ‍ॅटनबरो यांचा ‘गांधी’ हा चित्रपट जगभर प्रदर्शित झाला आणि पुन्हा एकदा जगाचं लक्ष गांधीजींचं जीवन आणि शिकवण यांकडे गेलं. पण याचबरोबर गांधीजींच्या विचारांवर तेवढीच टीकाही होत आली आहे. अहिंसा म्हणजे नेभळटपणा, दुर्बलपणा असं तर गांधीजींच्या हयातीतच म्हटलं गेलं होतं. गांधीजींनी त्याला सडेतोड उत्तरही दिलं होतं. व्यक्तिगत पातळीवर अहिंसेचं पालन ठीक आहे, पण सामुदायिक पातळीवर ते कसं शक्य आहे, यासारखे प्रश्नही सुरुवातीपासून उपस्थित केले जात आहेत.

त्याविषयी गोपाळराव कुळकर्णी ‘गांधीवादावरील काही आक्षेप’ या आपल्या १९४४ सालच्या पुस्तकात एके ठिकाणी म्हणतात - ‘‘अहिंसा जर व्यक्तिजीवनाला उन्नत करणारं तत्त्व आहे, तर ते समाजजीवनालाही पोषक होणारच. अहिंसा जर व्यक्तीला शक्य आहे तर ती समाजालाही विशिष्ट प्रमाणात शक्य होणारच. महावीर, बुद्ध किंवा येशु ख्रिस्तासारख्यांनी अहिंसेचं उच्चतम आचरण केलं. अहिंसेची तेवढी मात्रा समाजाला शक्य झाली नाही तरी समाजाला उपकारक वस्तु अहिंसाच राहणार. गांधीवादात सामाजिक अहिंसेचं जे स्वरूप आखलेलं आहे ते महावीर किंवा ख्रिस्ताच्या कोटीच्या अहिंसेचं नसून कोणताही पामर समाज झेलू शकेल इतकं सोपं आहे.’’

गांधीजींनी अहिंसा आणि सत्य या शस्त्रांचा सत्तापरिवर्तनासाठी वापर करायचा ठरवला तेव्हा जगभर हिंसेचा न्याय प्रस्थापित झालेला होता. फॅसिझम, भांडवलशाही, साम्राज्यशाही, वसाहतवाद, वर्णवाद, वंशवाद, पंथवाद यांचा बोलबाला होता. अशा काळात साध्याइतकंच साधन महत्त्वाचं आहे हे सांगत गांधीजींनी हिंसेचा मुकाबला अहिंसेनंच केला जाऊ शकतो, या तत्त्वाचा हिरीरीनं पुरस्कार केला. इतकंच नव्हे तर त्यासाठी आपलं संपूर्ण आयुष्य वाहून घेतलं. त्यांच्या या निश्चयात विलक्षण धैर्य होतं, ठासून भरलेला आत्मविश्वास होता आणि तत्त्वाशी असलेली असिधाराव्रताच्या तोडीची बांधीलकी होती.

गांधीजींनी आपल्या आत्मचरित्राला ‘सत्याचे प्रयोग’ असं विज्ञानयुगाला साजेसं असं नाव दिलं. आयुष्यभर ते सत्याचे प्रयोग करत राहिले. सत्याला वेगवेगळ्या पद्धतीनं भिडत, भेटत राहिले. त्यामुळे त्यांचं पहिल्यापासून असं मत होतं की, जे एकाला शक्य आहे ते सर्वांना शक्य आहे. आणि ते त्यांनी बºऱ्याच प्रमाणात सिद्धही करून दाखवलं.

‘माझे सत्याचे प्रयोग’ या आत्मचरित्रात शेवटी गांधीजी म्हणतात - ‘‘शस्त्रयुद्धानं सारं जग जिंकण्यापेक्षा मनाचे विकार जिंकणं मला अधिक कठीण वाटतं. हिंदुस्थानात आल्यानंतरसुद्धा माझ्यामध्ये दडून राहिलेले विकार माझ्या उघडकीला आले आहेत. त्याची मला शरम वाटत आहे, पण मी प्रयत्न मात्र सोडत नाही. सत्याचे प्रयोग करताना मला रसाचे घुटके मिळाले आहेत, आजही मिळत आहेत. मला माहीत आहे की, मला अजून कठीण मार्ग कापायचा आहे. त्यासाठी मला शून्यवत बनलं पाहिजे. मनुष्य जोपर्यंत आपण होऊन स्वत:ला सर्वांच्या शेवटी नेऊन बसवत नाही, तोपर्यंत त्याला मुक्ती नाही. अहिंसा ही नम्रतेची पराकाष्ठा होय; आणि या नम्रतेविना मुक्ती कधी काळी शक्य नाही, ही अनुभवसिद्ध गोष्ट आहे.’’

गांधीजींना काही लोक आध्यात्मिक, अलौकिक पुरुष मानतात. प्रसिद्ध लेखक जॉर्ज बर्नार्ड शॉ यांनी ‘गांधी ही व्यक्ती नसून चमत्कृति आहे’ असं म्हटलंच आहे. गांधीजींना ‘महात्मा’ अशी पदवीही त्यांच्या हयातीतच दिली गेली, पण ती त्यांना मान्य नव्हती. आपण संत आहोत, देवाचे अवतार आहोत, या भाकडगोष्टींवर तर त्यांचा काडीमात्र विश्वास नव्हता. आध्यात्मिक विशेषणाच्या बाबतीत एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, गांधीजींच्या दृष्टीनं आध्यात्मिकता म्हणजे नैतिकता होती. त्या नैतिकतेला सत्याचं, विवेकाचं अधिष्ठान होतं. म्हणूनच तर जगभरातल्या अनेक देशांचे, तेथील नेत्यांचे आणि जनतेचे गांधीजी स्फूर्तिस्थान होते, आहेत आणि राहतील. गांधीजींचा विचारवारसा माहीत नाही असा जगातील एकही देश नाही.

गांधीजींच्या निधनानंतर जगभरातून अनेकांनी दु:ख व्यक्त केलं. हिंदुस्थानचे व्हाईसरॉय लॉर्ड माऊंटबॅटन म्हणाले की - ‘गांधीजींसारखा पुरुष जगाला कित्येक शतकातही दिसणार नाही. आता फक्त त्यांच्या तत्त्वाचं आचरण झालं तर जगाचं दु:ख कमी होण्याचा संभव आहे.’ आपल्या आजूबाजूला आणि जागतिक पातळीवर आजही जे संघर्ष पाहायला मिळत आहेत, ते पाहता गांधीजी, त्यांचं तत्त्वज्ञान ही संबंध जगासाठीच नितांत निकडीची गोष्ट आहे, याची साक्ष पटल्यावाचून राहत नाही. पुन्हा एकदा वर्णवाद, वंशवाद, पंथवाद यांनी जगाचा ताबा घ्यायला सुरुवात केली आहे. अशा वेळी गांधीजींच्या तत्त्वविचारांशिवाय तरणोपाय नाही.

 

लेखक मुक्त पत्रकार आहेत.

mandavgane.rajan@gmail.com

Post Comment

Chinmay Kharade

Fri , 21 October 2016

Best article


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सध्याच्या काळामध्ये तरुण पत्रकार लढायला तयार आहेत, ही माझ्या दृष्टीने अत्यंत आशादायक गोष्ट आहे. मला फक्त ह्यात नागरिकांचं ‘कॉन्ट्रीब्युशन’ फारसं दिसत नाही : निखिल वागळे

‘पर्यायी मीडिया’चं काम ‘मेनस्ट्रीम’च्या तुलनेमध्ये कमी पोहोचणारं असलं तरी खूप महत्त्वाचं आहे. आणीबाणीमध्ये ‘साधना’सारख्या छोट्या साप्ताहिकाने जे काम केलं, तेच इतिहासात नोंदलं गेलं. तेच नेमकं ह्यांच्या बाबतीत होणार आहे. जेव्हा सत्ताधाऱ्यांना ‘तू नागडा आहेस’ असं सांगायला समाजातलं कोणीही तयार नव्हतं, तेव्हा या किंवा कमी रिसोर्सेस असलेल्या लोकांनी हे काम केलं. माझ्या मते हे खूप ऐतिहासिक काम आहे.......

‘काॅन्टिट्यूशनल कंडक्ट ग्रूप’चे केंद्रीय निवडणूक आयुक्तांना जाहीर पत्र : जोवर सर्वोच्च न्यायालयाने मागितलेली माहिती एसबीआय देत नाही, तोपर्यंत लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक प्रकाशित करू नये

आम्ही आपल्या लक्षात आणून देऊ इच्छितो की, सध्याच्या लोकसभेचा कार्यकाळ १६ जून २०२४पर्यंत आहे. निवडणूक वेळेत होण्यासाठी आयोगाने २७ मार्च किंवा त्यापूर्वीच वेळापत्रक जाहीर करावे. एसबीआयने निवडणुकीच्या घोषणेच्या आधीच ‘इलेक्टोरल बाँड्स’चा डेटा द्यावा. संविधानाच्या कलम ३२४नुसार आपल्या अधिकारांचा वापर करून केंद्रीय निवडणूक आयोगाला आपली प्रतिष्ठा आणि त्याची स्वायत्तता परत मिळवण्याची ही संधी आहे.......