रावसाहेब दानवे यांचा रिकामा ‘आड’ आणि ‘पोहरा’!
पडघम - राज्यकारण
प्रवीण बर्दापूरकर
  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे
  • Sat , 24 December 2016
  • राज्यकारण देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis रावसाहेब दानवे Raosaheb Danve नगरपालिका नगरपंचायती नगराध्यक्ष Municipal council polls Municipal Corporation elections

नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या तीनही टप्प्यातील निकाल जाहीर झाले असून ‘मनातल्या मनात’ किंवा ‘जनतेच्या मनात’ असलेले राज्य भारतीय जनता पक्षातील बहुतेक सर्व इच्छुक मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतून आता बाहेर पडले आहेत. क्रिकेटच्या भाषेत सांगायचं तर हे सर्व ‘हिट विकेट’ झालेले आहेत. नुकतीच ‘क्लीन चीट’ मिळालेल्या पंकजा मुंडे, मग विनोद तावडे, नंतर एकनाथराव खडसे यांनी सत्तेच्या पटावर असलेल्या विकेट्स फेकल्या. आता रावसाहेब दानवे यांनीही विकेट फेकली आहे. राहता राहिले चंद्रकांत पाटील आणि सुधीर मुनगंटीवार. पाटील हे कार्यालयीन भाषेत सांगायचं तर ‘बॉस इज ऑलवेज राईट’ सदरातले आहेत. अमित शहा यांनी निरोप/आदेश दिलाच तर ते शर्यतीत येतील अन्यथा देवेंद्र फडणवीस यांचे उजवे हात म्हणून वावरत राहतील. मुनगंटीवार हा माणूस ‘थंडा कर के खाओ’ या सदरात मोडणारा आहे. आजच्या घटकेला नरेंद्र मोदी आणि अमित शहा या दोघांचाही हात फडणवीस यांच्या डोक्यावर आहे, हे दिसत असताना अवसानघातकी खेळी करणं हा सुधीर मुनगंटीवार यांचा स्वभाव नाही.                                                

थोडक्यात काय तर पक्ष आणि सरकार या दोन्ही आघाड्यांवर फडणवीस यांच्यासाठी सारं काही सध्या तरी सुशेगात आहे. महाराष्ट्र भाजपचा चेहरा आता देवेंद्र फडणवीस हाच आहे, हे अनेकांना कायम सलत राहणारं शल्य ही विद्यमान वस्तुस्थिती आहे. राजकारणातले दिवस कसे झपाट्याने रंग बदलतात बघा! नितीन गडकरी प्रदेशाध्यक्षपद सोडून दिल्लीत राष्ट्रीय अध्यक्षपद स्वीकारायला निघाले, तेव्हाच खरं तर देवेंद्र फडणवीस यांच्या गळ्यात प्रदेशाध्यक्षपदाची माळ पडणार होती. मात्र फडणवीस यांना त्यावेळी रस होता तो विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदात, पण तिथं एकनाथ खडसे पाय घट्ट रोऊन होते. मग काही काळ पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सुधीर मुनगंटीवार यांनी पार पाडली. २०१४च्या लोकसभा निवडणुकीच्या माहोलपूर्वी प्रदेशाध्यक्षपद फडणवीस यांच्याकडे आलं. एखादा माणूस संधीचं नुसतं सोनं नाही तर हिरे-माणिक जडावलेल्या सोन्याच्या मुकुटाच्या रूपांतर कसं करतो, याचं उत्तम उदाहरण म्हणजे देवेंद्र यांचा प्रदेशाध्यक्षपदाचा काळ. एरव्ही ते अभ्यासू आणि आक्रमक आमदार म्हणून परिचित होते, पण त्यांची पाळंमुळं काही राज्यात सर्वत्र अंकुरलेलीही नव्हती. पक्षात गोपीनाथ मुंडे आणि नितीन गडकरी यांचाच राज्यभर प्रभाव आणि स्पर्धा होती. गडकरी दिल्लीत गेले; राज्यातलं त्यांचं स्थान रिक्त झालं. ते स्थान पटकावण्यासाठी स्पर्धा झाली ती विनोद तावडे आणि फडणवीस यांच्यात. गोपीनाथ मुंडे यांचं शिष्यत्व स्वीकारून त्या काळात फडणवीस यांनी महाराष्ट्र तालुकापातळीपर्यंत पिंजून काढला.                                     

त्या काळात कधीही मुंबई किंवा नागपूर वगळता एका गावात फडणवीस यांचं बूड कधीच स्थिरावलं नाही. कधीही फोन केला तर, ‘आज इथं आहे आणि उद्या तिथं असेन’, हे त्यांचं उत्तर ठरलेल असायचं. बैठका आणि कार्यकर्त्यांच्या गराड्यात हा माणूस सदैव गुंतून राहिला. राज्य भाजपमध्ये पाळंमुळं घट्ट करण्याची ती देवेंद्र यांची सुरुवात होती. केंद्रात भाजपचं सरकार आलं; विधानसभा निवडणुका लागण्याआधीच गोपीनाथ मुंडे यांच्यावर काळाने घाला घातला. त्यानंतर फडणवीस यांनी पक्षावरची त्यांची मांड पक्की केली. आश्वासक नेतृत्व, स्वच्छ प्रतिमा आणि वय हे त्यांचे प्लस पॉइंट होते. मुख्यमंत्रीपद त्यांच्याकडे चालत आलं. गेल्या सव्वादोन वर्षांत कोणताही डाग उमटू न देता, अत्यंत प्रतिकूल राजकीय परिस्थितीत हे पद त्यांनी सांभाळलं. शिवाय आता नगरपरिषदा आणि पंचायतीच्या निवडणुका एक हाती लढवत पक्षाला राज्यात आजवर कधीही न मिळालेलं यश मिळवून दिलं आहे. भाजपचे निवडून आलेले बहुसंख्य अध्यक्ष आणि सदस्य साहजिकच फडणवीस यांचे समर्थक आहेत आणि येत्या विधानसभा निवडणुकीत पक्षाचे उमेदवार विजयी करण्यात या सर्वांची म्हणजे पर्यायानं फडणवीस यांची भूमिका कळीची राहणार आहे! नगर परिषदा आणि पंचायतीच्या निवडणुकांमधील भाजपच्या यशाचं मोल फडणवीस यांच्यासाठी काय आहे, ते लक्षात घेतलं पाहिजे.

या पार्श्वभूमीवर प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे हे कुठे होते आणि काय करत होते हा प्रश्न आपण विचारायचा नसून तो त्यांनीच स्वत:ला विचारायचा आहे! दानवे यांचा भाजपच्या राजकारणातला प्रवास सरपंच ते केंद्रीय राज्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष असा आहे. १८ मार्च १९५५ला या भूतलावर प्रकट झालेले दानवे १९९० साली सर्वप्रथम विधानसभेवर विजयी झाले. नंतर त्यांनी १९९५चीही विधानसभा निवडणूक जिंकली. जालना लोकसभा मतदार संघातून भाजपचे लोकसभा सदस्य तेव्हा उत्तमसिंग पवार होते. प्रमोद महाजन हेच पक्षात स्पर्धक आहेत असा साक्षात्कार उत्तमसिंग यांना झाला. एकदा का साक्षात्कार झाला की, निर्माण होणारे समज-गैरसमज कातळी असतात. अखेर उत्तमसिंग पवार यांनी पक्षत्याग केला आणि दानवे यांच्या गळ्यात लोकसभा निवडणुकीची जबाबदारी आली. तेव्हापासून म्हणजे गेली अडीचपेक्षा जास्त दशकं दानवे लोकसभा सदस्य आहेत. या वाटचालीत राज्य भाजपने त्यांच्यावर सचिव आणि उपाध्यक्षपदाचीही जबाबदारी टाकली. अस्सल ग्रामीण लहेजा असणारं वक्तृत्व आणि मनात काय सुरू आहे यांची पुसटशीही रेषा चेहऱ्यावर उमटू न देता लाघवी बोलणं ही दानवे यांची बलस्थानं. मुलाला विधानसभा मिळवून देणं आणि २०१४च्या विधानसभा निवडणुकीत सेनेशी असलेली भाजपची युती तुटली तरी जावयाला सेनेची उमेदवारी मिळवून देणं व निवडूनही आणणं, यावरून त्यांचं स्वहिताचं राजकीय कौशल्य लक्षात यावं. केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपचं सरकार आलं अन दानवे राज्यमंत्री झाले. देवेंद्र मुख्यमंत्री झाले आणि पदरात प्रदेशाध्यक्षपद अलगद पडलं कारण दुसरा कुणी मराठाच दृष्टीक्षेपात नव्हता.

दानवे यांची प्रदेशाध्यक्षपदाची आजवरची कारकीर्द मात्र प्रभावशून्य ठरली आहे. तसं तर ते खासदार म्हणूनही लोकसभेत कामाचा ठसा उमटवू शकलेले नाहीत, मात्र त्यांना लोकसभेची उमेदवारी सातत्यानं मिळत गेली. त्यातच मुंडे-गडकरी स्पर्धेत ते कायम (पण गाजावजा न करता) गडकरी यांच्या बाजूने राहिले. त्याचं बक्षीस त्यांना आधी केंद्रात राज्यमंत्रीपद आणि नंतर प्रदेशाध्यक्षपद मिळण्यात झालं. पैठणच्या प्रचार सभेत बोलताना त्यांनी ‘लक्ष्मी’दर्शनाची केलेली भाषा वादग्रस्त ठरल्याची खूप चर्चा माध्यमांत झाली तरी, ते प्रकरण काही त्यांना फार भोवणार नाही. कारण राजकीय नेत्यांविरुद्ध अशा प्रकरणात कठोर कारवाई झाल्याचा इतिहास नाही. फार लांब जायला नको शरद पवार, नितीन गडकरी आणि दिवंगत गोपीनाथ मुंडे यांची गाजलेली वादग्रस्त वक्तव्यं आठवून बघा. अशा घटनांवर राज्य वा केंद्रीय निवडणूक आयोगाकडून कारवाईबद्दल नरमाईची भूमिका घेतली जाते, हेच आजवर समोर आलेलं आहे.

दानवे यांच्यावर प्रदेशाध्यक्षपद गमावण्याची वेळ आता लगेच येणार नाही, पण दिल्लीतील चर्चांनुसार नजीकच्या भविष्यात ते अटळ आहे. याबाबतीत नितीन गडकरी यांच्याशी संपर्क साधला, पण ते परदेशात आहेत असं सांगण्यात आलं. गडकरी हेही दानवे यांच्यावर खूष नाहीत अशी चर्चा ऐकायला आली. सर्व पक्षात दोस्तयार असूनही पक्षहिताला तडा न जाऊ देण्याची गडकरी यांची करडी ख्याती आहे आणि कुटुंबियांना त्यांनी राजकारणापासून कटाक्षानं लांब ठेवलं आहे. प्रदेशाध्यक्षपदाची संधी मिळाल्यावर जालना जिल्ह्यापुरता मर्यादित असणारा प्रभाव दानवे यांना राज्यभर निर्माण करता आला असता, पण ते घडलं नाही. सुभाष देशमुख आणि जयप्रकाश रावल हे सरचिटणीस राज्यात मंत्री झाले. एक व्यक्ती, एक पद या धोरणानुसार त्यांच्याकडचं पद काढून घेण्याची औपचारिकतीही दानवे विसरले. खुद्द भोकरदनमध्येही त्यांना काँग्रेसची ताकद क्षीण करण्यात गेल्या सुमारे तीन दशकांत यश आलेलं नाही. शिवाय जालना नगरपरिषदेच्या निवडणुकीत पक्षहित खुंटीवर गुंडाळून ठेवण्याची त्यांनी केलेली गुस्ताखी पक्षश्रेष्ठीना मुळीच आवडलेली नाही.   

फेसबुकवर दीड-दोन वर्षापूर्वी वाचलेली तथागत गौतम बुद्ध यांची एक बोधकथा अशी- 

बौद्ध धम्माचा प्रसार सुरू झाला असतानाची गोष्ट आहे. अनेक राजे बौद्ध धम्माची दिक्षा घ्यायला पुढे येत होते. अशा काही राजांनी पूर्वी त्यांच्या हातून झालेली पापं नाहीशी करण्यासाठी व मनःशुद्धीसाठी तीर्थस्नान करायचं ठरवलं. तथागतांना सांगण्यासाठी आणि संमती घेण्यासाठी सर्व राजे गेले. तथागत म्हणाले, “जात आहात तर जा, परंतु मी तुम्हाला बरोबर न्यायला एक कडुनिंबाची डहाळी देतो. तुम्ही जेथे जेथे जाल तिथे तिथे त्या फांदीला पण स्नान घाला.”
ती डहाळी घेऊन सर्व राजे स्नानासाठी
 यात्रेला गेले. तीर्थयात्रेहून परत आल्यावर सर्व राजांनी तथागतांची भेट घेतली. त्यांनी दिलेली कडुनिंबाची फांदी परत करत ते राजे म्हणाले, "आपण म्हणालात त्याप्रमाणे आठवणीनं सर्व नद्यांवर या फांदीला स्नान घातलंय.” त्या डहाळीचे सुरीने तुकडे करून सर्वांना खाण्यास देत तथागत म्हणाले, "प्रसाद गोड आहे का, ते जरूर सांगा.” सर्वांनी तुकडा तोंडात टाकल्यावर तोंड वाईट केलं. कारण प्रसादाची चव कडू होती. तथागतांनी विचारलं, "सर्व तीर्थक्षेत्रांमध्ये स्नान रूनही कडूनिंबाची चव गोड झाली का?" 
   "कशी होईल? स्नान घालून बाह्यबदल होईल, आतला कडूपणा कसा जाईल?" एका राजाने प्रश्न उपस्थित केला. तथागत म्हणाले, "तेच समजावून सांगण्यासाठी मी ही डहाळी तुमच्याबरोबर दिली होती. तीर्थस्नानाने शरीर शुद्ध होईल, परंतु आत्मशुद्धी कशी होईल? त्यांचा संबंध सदाचरणाशी, सदगुणांशी आहे.

इथे ‘कडूपणा’ऐवजी ‘नेतृत्वगुण’ आणि ‘इच्छाशक्तीचा अभाव’ हे शब्द वापरले तर ही कथा दानवे यांच्यासाठी चपखल ठरते. त्यात ‘खास मराठवाडी गप्पिष्ट आळशीपणा’ही जोडायला हरकत नाही. मोठ्या पदावर संधी मिळूनही दानवे प्रभाव निर्माण करू शकले नाहीत. ‘आडातच नाही तर पोहऱ्यात येणार कुठून?’ आणि ते राज्य स्तरावर प्रस्थापित होणार कसे?

साहजिकच, दानवे यांचे मुख्यमंत्रीपदाचे मांडे सध्या तरी मनातच विरून गेले आहेत. पण अजूनही वेळ गेलेली नाही. आता आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीत तरी देवेंद्र फडणवीस यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी काम करून त्यांची क्षमता सिद्ध करायला हवी. अन्यथा प्रदेशाध्यक्षपद गमवावं लागलं की, त्यांची अवस्था ‘तेल गेलं आणि तूपही गेलं’ अशी होईल!

 

लेखक दै. लोकसत्ताच्या नागपूर आवृत्तीचे माजी संपादक आहेत.

praveen.bardapurkar@gmail.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘जातवास्तव’ स्वीकारल्याशिवाय सत्ता आणि संसाधनांचा जातीय ‘असमतोल’ दूर करता येणार नाही. उमेदवारांची नावे जातीसकट जाहीर करणे, हा एक ‘सकारात्मक प्रयोग’ आहे

महायुतीच्या ३८ उमेदवारांपैकी १९ मराठा आहेत. विशेष म्हणजे हे सगळे श्रीमंत मराठे आहेत. महाविकास आघाडीच्या ३९ उमेदवारांपैकी २४ मराठा आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या ३२ उमेदवारांपैकी ५ अनुसूचित जाती, १३ ओबीसी आणि ४ मराठा आहेत. यावरून एक गोष्ट लक्षात येते की, मविआ असो वा महायुती एका विशिष्ट समाजाकडेच सत्ताबळ झुकलेले दिसते. मात्र वंबआने उमेदवारी देताना जात समतोल पाळलेला दिसतो.......

स्वयंपाकघरात टांगलेल्या कॅलेंडरवरच्या चित्राइतकीच थरारकता वा जाहिरातीतून एखादं उत्साहवर्धक पेय विकणार्‍या म्हातार्‍या अमिताभ बच्चनइतकीच विश्वासार्हता, दहा वर्षं राष्ट्रीय व्यासपीठावर वावरलेल्या मोदींच्या व्यक्तिमत्त्वामध्ये उरली आहे...

प्रचारसभांमधून दिसणारे पंतप्रधान दमले-भागलेले, निष्प्रभ झालेले आहेत. प्रमाणापलीकडे वापरलेली छबी, अतिरिक्त भलामण आणि अतिश्रम, यांमुळे त्यांची ‘रया’ गेल्यासारखी वाटते. एखाद्या ‘टी-ट्वेंटी’ सामन्यात जसप्रीत बूमराला वीसच्या वीस षटकं गोलंदाजी करायला लावावी, तसं काहीसं हे झालेलं आहे. आक्रसत गेलेला मोदींचा ‘भक्तपंथ’ टिकून असला, तरी ‘करिष्मा’ उर्फ ‘जादू’ मात्र चाकोरीबद्ध झालेली आहे.......

भाजपच्या ७६ पानी ‘जाहीरनाम्या’त पंतप्रधान नरेंद्र मोदींची तब्बल ५३ छायाचित्रं आहेत. त्यामुळे हा जाहीरनामा आहे की, मोदींचा ‘छायाचित्र अल्बम’ आहे, असा प्रश्न पडतो

काँग्रेसच्या ४८ पानी जाहीरनाम्यात राहुल गांधींची फक्त पाच छायाचित्रं आहेत. त्यातली तीन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत आहेत. याउलट भाजपच्या जाहीरनाम्याच्या मुखपृष्ठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीमागे बळंच हसताहेत अशा स्वरूपाचं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचं छायाचित्र आहे. त्यातली ‘बिटवीन द लाईन’ खूप सूचक आणि स्पष्टता सूचित करणारी आहे.......

जर्मनीत २० हजार हत्तींचा कळप सोडण्याची धमकी एका देशाने दिली आहे, ही ‘हेडलाईन’ जगभरच्या प्रसारमाध्यमांमध्ये गाजतेय सध्या…

अफ्रिका खंडातील बोत्सवाना हा मुळात गरीब देश आहे. त्यातच एवढे हत्ती म्हणजे दुष्काळात तेरावा महिना. शेतांमध्ये येऊन हत्ती मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान करत असल्याने शेतकरी वैतागले आहेत. याची दखल बोत्सवानाचे अध्यक्ष मोक्ग्वेत्सी मेस्सी यांनी घेतली आहे. त्यामुळेच त्यांनी संतापून एक मोठी घोषणा केली आहे. ती म्हणजे तब्बल २० हजार हत्तींचा कळप थेट जर्मनीमध्ये पाठवण्याची. अनेक माध्यमांमध्ये ही ‘हेडलाईन’ गाजते आहे.......