कुणब्याच्या डोक्यातील अंगार जिता ठेवणारी कादंबरी
ग्रंथनामा - बुक ऑफ द वीक
शेषराव मोहिते
  • कादंबरीकार सुशील धसकटे आणि ‘जोहार’चं मुखपृष्ठ
  • Sat , 22 October 2016
  • ग्रंथनामा बुक ऑफ द वीक शेषराव मोहिते Sheshrao Mohite सुशील धसकटे Susheel Dhaskate जोहार Johar

‘जोहार’ ही सुशील धसकटे यांची पहिलीच कादंबरी. ओघवत्या शैलीत लिहिलेली. सुरुवातीपासून शेवटपर्यंत खिळवून ठेवणारी. आजच्या वर्तमान ग्रामीण वास्तवास थेट भिडणारी. मल्हार हा या कादंबरीचा नायक. प्रथमपुरुषी निवेदनशैलीत तो वाचकांशी थेट संवाद साधत राहतो. यात उगीच स्मरण रमणीयतेचा घाट नाही की, अधूनमधून मागं वळून पाहणं नाही. एकविसावं शतक म्हणजे रोखठोक एकविसावं शतक. या कालखंडातील खेड्यातील शेतकरी कुटुंबात जन्मून शिक्षणासाठी विद्येचं माहेरघर असलेल्या पुण्यात शिकायला आलेल्या एका तरुणाची ही म्हटलं तर कहाणी; म्हटलं तर भालचंद्र नेमाडे यांच्या ‘कोसला’चा वर्तमान अवतार. मात्र ‘जोहार’ ही ‘जोहार’ म्हणूनच वाचायला हवी.

मल्हार हा मराठवाड्यातील एका खेड्यातून पुण्यात शिक्षणासाठी आलेला शेतकऱ्याचा मुलगा. पुण्यातल्या विद्यापीठात एम.ए.नंतर एम.फिल. करणारा विद्यार्थी. चार-पाच वर्षांचा कालावकाश व्यापणारी; पण प्रत्यक्षात हजारो वर्षांची कृषिपरंपरा अन् तिचा अभिमान ठायी ठायी सिद्ध करू पाहणारी ही कादंबरी आहे. सशक्त कृषिपरंपरेचे जे जे लेखक पाईक आहेत, त्यांच्या त्यांच्या लेखनात ही कृषिपरंपरा धवल स्वरूपात अवतीर्ण होणं अपरिहार्य आहे. अगदी ‘हिंदू’मध्ये खंडेराव हा जसा केंद्रस्थानी आहे, तसा ‘जोहार’मध्ये मल्हार.

एक देश, दोन संस्कृती हे आपल्या समाजजीवनाचं व्यवच्छेदक लक्षण. ते अधोरेखित करण्यात धसकटे कमालीचे यशस्वी झाले आहेत. उच्चभ्रू, उच्च मध्यमवर्गीय, कॉन्वेंट कल्चरमध्ये वाढलेल्या लोकांविषयी एक पराकोटीचा अविश्वास मल्हारच्या मनात आहे. हे लोक शरीरानं इथं राहत असले तरीही मनानं प्रगत देशातच वावरत असतात. ‘आपल्या लेवलचं इथं काहीच नाही. भारत हा एंटम देश आहे. इथं केवळ मूर्ख, मॅनर्सलेस, गबाळे लोकच राहतात. तिकडं किती स्वच्छता, सगळं कसं नीट नेटकं अन् इथं किती घाण-बेशिस्त,’ असं त्यांचं सतत चालू असतं. तेव्हा ‘ते’ म्हणजे देशाचं भवितव्य वगैरे गोष्टींवर मल्हारचा विश्वास नाही. दुसऱ्या बाजूला आपण ज्या हजारो वर्षांपासून चालत आलेल्या उदात्त कृषिसंस्कृतीचे पाईक आहोत, त्याचं वर्तमान काय आहे?

१९९० सालानंतर आर्थिक उदारीकरण, खाजगीकरण अवतरलं, त्याचे परिणाम काही प्रमाणात शहरात, महानगरात रोजगाराच्या संधी निर्माण होण्यात झाला. पण खेड्यात हे पर्व अवतरलंच नाही. आर्थिक क्षेत्रात जेव्हा काही बदल घडून येतात, तेव्हा त्या अनुषंगानं इथल्या शिक्षणव्यवस्थेतदेखील अनुकूल बदल घडून यायला हवे होते, ते घडलेच नाहीत. कल्याणकारी राज्यव्यवस्था (?) अन् मिश्र अर्थव्यवस्थेच्या काळातील कालबाह्य, कूचकामी शिक्षणव्यवस्था तशीच चालू राहिली. त्याचा मोठा फटका मल्हारसारख्या वा त्याच पार्श्वभूमीवरून तथाकथित विद्येच्या माहेरघरी उच्चशिक्षण घेण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांना बसला. आपण घेत असलेले शिक्षण आपल्याला जीवनात आत्मविश्वासानं उभं राहण्यात अन् स्वाभिमानानं समृद्ध आयुष्य जगण्यास कुचकामी ठरणार असेल तर या शिक्षणव्यवस्थेतील सर्वच घटक हास्यास्पद ठरतात. शिक्षक कामचुकार, बावळट ठरतात. पदव्या कस्पटासमान ठरतात अन् विद्यार्थ्यांचं भवितव्य अंध:कारमय ठरतं. एखादा डॉ. भोसलेंसारखा प्राध्यापक वाळवंटातील हिरवळीसारखा आशेचा किरण दिसावा तसा दृष्टोत्त्पत्तीस पडतो. इतर सर्वजण समता असूनही डबक्यात साचलेल्या सडक्या पाण्यातील किड्यामुंग्यासारखं जगत राहतात.

जे उच्चशिक्षणाबाबत तेच प्राथमिक अन् माध्यमिक शिक्षणाबाबत घडत राहतं. मुळात जगणं उन्नत करण्यासाठी केवळ शिक्षण कारणीभूत नसतं. शिक्षणाचा सार्वत्रिक प्रसार झाला नव्हता, त्या काळातही माणसं जगत होतीच. त्यांच्या जगण्यातत नैतिकता, प्रामाणिकपणा, दिलेल्या शब्दास जागणं, एकमेकांच्या अडीअडचणींच्या वेळी मदतीस धावून जाणं हे माणुसकीला उजागर करणारे घटक अधिक प्रमाणात होते. आज शिक्षणाचा सार्वत्रिक प्रसार झालेला असूनही माणसं अधिक भ्रष्ट, अनीतिमान, लबाड, आपमतलबी अशीच मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. कारण मुख्यत: खेड्यातील माणसांच्या प्रगतीच्या सर्व वाटाच खुंटल्या आहेत अन् शिक्षण वांझोटं ठरलं आहे. ते माणसाला आहे त्या ठिकाणाहून, स्वत:च्या गावापासून, जमिनीपासून, जगण्यापासूनही तोडतं. दुसरीकडे रूजावं म्हटलं तर तिथलाही अवकाश हिरावून घेतलेला. अशा एका पिढीचं हे आत्मवृत्त ‘जोहार’मधून प्रतिबिंबित होतं.

आजच्या खेड्यात जन्मलेल्रा अन् जागतिकीकरणाच्या फायद्यापासून वंचित राहिलेल्या, म्हणून जणू काय जागतिकीकरणामुळेच ही अगतिकता आपल्या वाट्यास आली आहे, असा दृढ समज झालेल्या पिढीचं हे आत्मवृत्त आहे. यातील तरुणांना वि. रा. शिंदे, महात्मा फुले, डॉ. आंबेडकर, कॉ. शरद पाटील यांच्यासारखी सदैव बहुजनांच्या बाजूनं विचार करणारी, लढणारी माणसं, त्यांचे विचार या परिस्थितीवर मात करण्यासाठी साहाय्यभूत ठरतील असं वाटतं. दुसऱ्या बाजूला तथाकथित उच्चवर्तुळातील, इंग्रजीच्या आधारानं, जातीच्या आधारानं, हे जे दुष्टचक्र भेदून बाहेर पडले आहेत, अन् आजच्या आर्थिक खाजगीकरणाचे लाभार्थी ठरले आहेत, त्यांच्या विषयीचा एक कडवट असंतोष सतत मनात खदखदणारा नायक, असं काहीसं स्वरूप कादंबरीभर वाचायला मिळतं. ज्यांना या स्पर्धेच्या युगात, त्या स्पर्धेत भागच घेता आला नाही, त्यांच्या त्राग्याचं स्वरूप एकंदरीत या कादंबरीत आलं आहे. त्यात विनाकारण आदळआपट नाही. दोषारोप नाहीत. परंतु तिरकस शैलीत घेतलेले चिमटे अन् आपल्या भवतालाविषयीचा अभिमान मात्र पुरेपूर आहे. अशा निरर्थक ठरलेल्या शिक्षणव्यवस्थेत इथं निर्माण होणारी साहित्य-संस्कृती, तिथले कलेचे स्थान किती पोकळ अन् बिभत्स पातळीवर जाऊन पोहचलं आहे, याचं अतिशय बारकाव्यानिशी चित्रण आलं आहे. शिक्षणक्षेत्रातील सामान्य टिनपाट लोकांवर निघणारे जाडेभर्डे गौरवग्रंथ, टुकार लेख, विद्यापीठातील अभ्रासक्रमात आपलं साहित्य लावण्यासाठी केलेले साटेलोटे, पीएच.डी. मार्गदर्शनाच्या बदल्यात विद्यार्थी-विद्यार्थीनींचं होणारं शोषण, विद्यार्थ्यांच्या वकुबास पुरे न पडणारे शिक्षक हा सर्व सडकेपणा, कुजकेपणा ‘जोहार’मध्ये ताकदीनं आला आहे.

तर दुसरीकडे खेड्यातील लोकांचे अनवट, नैसर्गिक, निकोप, निरोगी वागण्याचे अनेक दाखले, संदर्भ येतात. यातील ‘आबई’ ही एक व्यक्तिरेखा खास ठळकपणे डोळ्यात भरण्यासारखी. तिची करारी धाडसी मुद्रा आणि मुदद्याचं बोलणं. प्रत्येक गावात अशी एखादी कर्तबगार आबई असतेच. आबईसंबंधी मूळातूनच वाचलं पाहिजे. आबईसारख्या कर्तबगार स्त्रिया गावागावांत होत्या, हे इथल्या खेड्यांचं मोठेपण ‘जोहार’मध्ये जागोजागी सिद्ध होतं.

अलिकडे शहर आणि खेडं यातील अंतर फार झपाट्यानं वाढत आहे. २०-३० वर्षांपूर्वी एकूणच शहरीकरणाचा वेग इतका अंगावर येण्याइतपत नव्हता. पण तो आता अंगावर तर येतोच आहे, पण माणसामाणसांतील दरी खूप वेगानं अन् जीवघेण्या पद्धतीनं वाढवत आहे. औरंगाबादला नोकरीनिमित्त राहणारा, पण खेड्यातून आलेला मल्हारचा मित्र शिवच्या पत्रातून ही रुंदावणारी जीवघेणी दरी खूप अस्वस्थ करते. खेड्यातील अभावग्रस्त कुटुंब, त्यांच्या प्राथमिक गरजाही नीट भागत नाहीत, त्यांच्या जगण्याचे चटके या अभावग्रस्त कुटुंबातून बाहेर पडलेल्या तरुण जोडप्याला कसं आणि किती जगणं नकोसं करून सोडतं, याचे महत्त्वाचे तपशील बारकाव्यांसह या पत्रातून व्यक्त होतात. काही सन्मानीय अपवाद वगळता खेड्यातून शहरात नोकरीच्या निमित्तानं आलेल्या कुटुंबातील हे आजचं सार्वत्रिक वास्तव आहे. बहुसंख्य शेतकरी, शेतमजूर कुटुंबात कितीही काबाडकष्ट केले तरी आर्थिक सुबत्ता काही येत नाही. कारण आपली संपूर्ण अर्थव्यवस्थाच त्यांच्या शोषणावर आधारित आहे. जी कुटुंबं खेड्यातली आणि शहरातीलही मुलाबाळांसोबत योग्य सामंजस्य आणि सुखासमाधानाचा योग्य समतोल राखून आहेत, ती निव्वळ बोटावर मोजण्याइतकी. त्यांचं खेड्यातील कुटुंब राजकारणात वावरणारं असतं. ज्यांची गावात सावकारी आहे किंवा शेतीशिवाय इतर काही उत्पन्नाचे मार्ग ज्यांच्याकडे आहेत, अशाच कुटुंबात हा समतोल आढळतो. दुसऱ्या बाजूला ही खेड्यातील माणसं पराकोटीची साधू संन्यस्तवृत्तीची. ज्यांच्या गरजा काहीच नाहीत. जगण्याकडून कसल्या अपेक्षाच नाहीत.

महर्षी वि. रा. शिंदे या सर्वार्थानं दुर्लक्षिल्या गेलेल्या आणि त्यांच्या समकालीन समाजजीवनात कोणाच्याच पचनी न पडलेल्या द्रष्ट्या समाजसुधारकाच्या विचारांचा एक अमीट ठसा लेखकाच्या विचारसरणीवर दिसून येतो. हे एका परीनं ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचं काम धसकटे यांनी केलं आहे. जो महामानव त्याच्या काळातील सामाजिक, बौद्धिक राजकारणाचा बळी ठरला, तो आजदेखील किती प्रस्तुत ठरतो, हे जागोजागी दाखवून देण्यात लेखक यशस्वी झाला आहे. एकूण जगभर व्यक्तिस्वातंत्र्याचे वारं वाहू लागलं आहे. स्वातंत्र्य हे सर्वोच्च मूल्य म्हणून प्रस्थापित होण्याचा हा कालखंड आहे. जिथं जिथं व्यक्तीचं स्वातंत्र्य अबाधित आहे, तिथं तिथं मानवी समाजानं नेत्रदीपक प्रगती केली आहे. या उलट जिथं कोणत्याही निमित्तानं होईना व्यक्तिस्वातंत्र्याचा संकोच झाला आहे. व्यक्तिस्वातंत्र्यास दुय्यम स्थान देण्यात आलं आहे, तिथं तिथं माणसांची प्रगती खुंटली आहे. काही ठिकाणी अधोगतीकडे वाटचाल सुरू झाली आहे. पण आपल्या इथं या पराकोटीच्या विषम अर्थकारणामुळे व्यक्तिस्वातंत्र्य म्हणजे हिणकस मानवी मूल्य ठरत आहे, हेदेखील दाखवून देण्यात लेखक यशस्वी झाला आहे.

काही प्रकरणांच्या शेवटी येणाऱ्या ‘लीळा’ अप्रतिम अन् भन्नाटच आहेत. या कादंबरीतील आठवं प्रकरण अप्रतिम म्हणावं असं झालं आहे. मल्हार सुटीत गावाकडे येतो. त्याचं प्रगल्भ मन त्याला तिथं खूप अस्वस्थ करतं. त्या अस्वस्थेतून त्याच्या मनाची जी घालमेल व्यक्त होते, ती फार महत्त्वाची आहे. एकदा रात्रीच्या वेळी तुटणाऱ्या ताऱ्याकडे तो मागणं मागतो, “जगातल्या सगळ्या शेतकऱ्यांना बारमाही सुखी-समाधानी ठेव, कृषिसंस्कृतीला, जल- जंगल-जमिनीला साम्राज्यवादी गिधाडांपासून सुरक्षित ठेव.” एकूण कृषिसंस्कृतीचं भलं चिंतणारी, आज शेती व्यवसायास आलेल्या अवकळेस इथली व्यवस्था कशी जबाबदार आहे, हे अधोरेखित करणारी, या परिस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या शिक्षित मुलांना त्यांच्या मूलभूत प्रश्नाकडे डोळसपणे बघायला लावणारी, या परंपरेतील पूर्वसूरींविषयी कृतज्ञता व्यक्त करणारी ही कादंबरी आहे. ‘जोहार’ हा शब्द लाचारी दर्शवणारा नव्हे, तर साठ हजार वर्षांपासून अस्तित्वात आहे. चक्रधरांपासून तर चोखामेळ्यापर्यंत ज्यांनी ज्यांनी माणसांमाणसांतील समानतेच्या धाग्याला पुष्टी दिली आहे आणि माणसातील निखळ माणूसपणाचा आदर व्यक्त केला आहे, त्या ‘जोहार’ या शब्दास पुन्हा प्रतिष्ठा प्राप्त करून देण्याचे अन् विशेषत: कुणब्याच्या पोरांच्या डोक्यातील अंगार जिता करण्याचे काम ‘जोहार’ या कादंबरीनं केलं आहे. भालचंद्र नेमाडे, यू. आर. अनंतमूर्ती अन् मराठी संतपरंपरेचे संस्कार पचवून लिहिलेली ही अलिकडील काळातील मराठीतील महत्त्वाची कादंबरी आहे.

जोहार - सुशील धसकटे, अक्षरवाङ्मय प्रकाशन, पुणे, पाने-३३२, मूल्य – ३०० रुपये.

.................................................................................................................................................................

लेखक मान्यवर कादंबरीकार आहेत.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

या स्त्रिया म्हणजे प्रदर्शनीय वस्तू. एक माणूस म्हणून जिथं त्यांना किंमत दिली जात नाही, त्यात सहभागी होण्यासाठी या स्त्रिया का धडपडत असतात, हे जाणून घेण्यासाठी मी तडफडत होते…

ज्यांनी १९७०च्या दशकाच्या अखेरीला मॉडेल म्हणून काम सुरू केलं आणि १९८०चं संपूर्ण दशकभर व १९९०च्या दशकाच्या सुरुवातीचा काही काळ, म्हणजे फॅशन इंडस्ट्रीच्या वाढीचा आलेख वाढायला सुरुवात झाली, त्या काळापर्यंत काम करत राहिल्या आहेत, त्यांना ‘पहिली पिढी’, असं म्हटलं जातं. मी जेव्हा त्यांच्या मुलाखती घेतल्या, तेव्हा त्या पस्तीस ते पंचेचाळीस या दरम्यानच्या वयोगटात होत्या. सगळ्या इंग्रजी बोलणाऱ्या.......

निर्मितीचा मार्ग हा अंधाराचा मार्ग आहे. निर्मितीच्या प्रेरणेच्या पलीकडे जाणे, हा प्रकाशाकडे जाण्याचा, शुद्ध चैतन्याकडे जाण्याचा मार्ग आहे

ही माया, हे विश्व, हे अज्ञान आहे. हा काळोख आहे. त्याच्या मागील शुद्ध चैतन्य हा प्रकाश आहे. सूर्य, उषा ही भौतिक जगातील प्रकाशाची रूपे आहेत, पण ती मायेचाच एक भाग आहेत. ह्या अर्थाने ती अंधःकारस्वरूप आहेत. निर्मिती ही मायेची स्फूर्ती आहे. त्या अर्थाने माया आणि निर्मिती ह्या एकच आहेत. उषा हे मायेचे एक रूप आहे. तिची निर्मितीशी नाळ जुळलेली असणे स्वाभाविक आहे. निर्मिती कितीही गोड वाटली, तरी तिचे रूपांतर शेवटी दुःखातच होते.......

‘रेघ’ : या पुस्तकाच्या ‘प्रामाणिक वाचना’नंतर वर्तमानपत्रांतील बातम्यांचा प्राधान्यक्रम, त्यांतल्या जाहिरातींमधला मजकूर, तसेच सामाजिक-राजकीय-सांस्कृतिक क्षेत्रांतील घटनांसंबंधीच्या बातम्या, यांकडे अधिक सजगपणे, चिकित्सकपणे पाहण्याची सवय लागेल

मर्यादित संसाधनांच्या साहाय्याने जर डोंगरे यांच्यासारखे लेखक इतकं चांगलं, उल्लेखनीय काम करू शकत असतील, तर करोडो रुपये हाताशी असणाऱ्या माध्यमांनी किती मोठं काम केलं पाहिजे, असा विचार मनात आल्याशिवाय राहत नाही. पण शेवटी प्रश्न येतो तो बांधीलकी, प्रामाणिकपणा आणि न्यायाची चाड असण्याचा. वृत्तवाहिन्यांवर ज्या गोष्टी दाखवल्या जात, त्या विषयांवर ‘रेघ’सारख्या पुस्तकातून प्रकाशझोत टाकला जातो.......