प्रारंभिक कादंबरीचं सखोल चिंतन
ग्रंथनामा - शिफारस\मराठी पुस्तक
राजशेखर शिंदे
  • पुस्तकाचं मुखपृष्ठ
  • Sat , 22 October 2016
  • राजशेखर शिंदे Rajshekhar Shinde Rohini Tukdeo रोहिणी तुकदेव मराठी कादंबरीचे प्रारंभिक वळण

एकोणिसाव्या शतकात मराठीमध्ये नव्यानंच निर्माण झालेल्या कादंबरीवर एकविसाव्या शतकाच्या दुसर्‍या दशकात एक उत्तम संशोधनपर पुस्तक सिद्ध झालं आहे. ते म्हणजे ‘मराठी कादंबरीचे प्रारंभिक वळण’ होय. समीक्षक डॉ. रोहिणी तुकदेव यांनी प्रारंभीच्या कादंबरीच्या वळणाचा श्रीगणेशा अप्रतिमरीत्या उलगडला आहे. ‘कादंबरी’ हा वाङ्मयप्रकार लेखकाला जसा वेळखाऊ आहे, तसाच तो वाचकालाही वाटतो. कादंबरीमध्ये एकाच वेळी जीवनसंबद्ध अशा वेगवेगळ्या गोष्टींचे ध्वनी उमटलेले असतात. म्हणून लेखकाचा दृष्टिकोन महत्त्वाचा ठरतो. तद्वतच तिचा विचार करणार्‍या समीक्षकाचा दृष्टिकोनही महत्त्वाचा ठरतो.

या पुस्तकाच्या मुखपृष्ठावरील गणेशही प्रारंभिक वळणाचाच आहे. शाम भालेकरांनी ठिपक्यांच्या रांगोळीतून गणेशाची मोहक आकृती सूचित केली आहे. लेखिकेनं पुस्तकात प्रारंभिक अवस्थेतील कादंबरीतील अनेक प्रतिबिंबित बाजू उलगडून स्पष्ट केल्या आहेत. त्या बाजू मुखपृष्ठावरील गणेशाच्या आकारातून दाखवलेल्या आहेत. एकोणिसाव्या शतकात नव्यानंच निर्माण झालेल्या कादंबरीवर १८७२ साली पहिला समीक्षणात्मक लेख तयार झाला. ते आज जवळपास दीडशे शतकाच्या अवधित अनेक पुस्तके निर्माण झाली आहेत. वाङ्मयेतिहास, वाङ्मयसमीक्षा, समाजसमीक्षा, इतिहासातील मूलभूत समीक्षा, तत्कालीन नियतकालिकं व प्रत्यक्ष कादंबरी यांच्या प्रदीर्घ काळानंतर झालेलं हे संशोधन आहे. कालानुषंगानं हे तटस्थ व पूर्वसुरींच्या अनुषंगानं निर्भीड संशोधन आहे.

कादंबरी वाङ्मयप्रकार हा मोठा जीवनपट व्यापणारा प्रकार आहे. त्याच्यामध्ये व्यक्तिजीवनाच्या व समाजजीवनाच्या अनेक घटनांचे पडसाद उमटत असतात. अशा वाङ्मयप्रकाराचा अभ्यास करताना बुद्धीचा आणि सावधपणे, ध्यासाने केलेल्या अवांतर वाचनाचा कस लागतो. कादंबरीमध्ये लेखक काहीएक भूमिका घेऊन घटना उघडपणे मांडत असतो. त्याचं अन्वेषण कशा रीतीनं करावं हा एक गहन प्रश्न असतो. या संदर्भात याच ग्रंथातील अवतरण घेऊ म्हणजे ते अधिक स्पष्ट होईल. ‘‘का. बा. मराठे यांनी १८७२ मध्ये लिहिलेला ‘नावल व नाटक ह्याविषयी निबंध’ हा मराठीतील पहिला समीक्षात्मक निबंध आहे. पण कादंबरी व नाटक यांच्या स्वरूपाची चर्चा करणारा, वाङ्मयीन टीकेचा एकही निबंध कोणी लिहिला नाही. रा. ब. विष्णू परशुराम रानडे यांनी ‘सद्या नावले लिहिणारे व नाटके लिहिणारे फार झाले आहेत; त्यापैकी पुष्कळांस नावल अथवा नाटक असावे कसें, हे देखील माहीत नसते. म्हणून कोणातरी चांगल्या विद्वानाने नावल व नाटक यांच्या स्वरूपाविषयी निबंध लिहावा.’ असे वारंवार सूचवल्याने का. बा. मराठे यांनी लेख लिहिला.” आजवर कादंबरीच्या रूपाविषयी, आशयाविषयी, आविष्कार विशेषांविषयी अनेक विद्वानांनी पुस्तकं लिहिली आहेत. परंतु तरीही ‘मराठी कादंबरीचे प्रारंभिक वळण’ हे अवघ्या २६९ पानांचं (सारांश वगळता) पुस्तक उजवं आहे असं म्हणावंसं वाटतं.

एखादा वाङ्मयप्रकार नव्याने निर्माण होतो, तेव्हा ती निर्मिती त्या पुस्तकापुरती मर्यादित नसते. त्या निर्मितीची पाळंमुळं आजूबाजूच्या जमिनीत, सांप्रत परिस्थितीत आणि लोकमनाच्या मानसिकतेत असतात. ही परिस्थिती कोणा एकाला काही अपूर्व वा नवीन निर्माण करावयास प्रवृत्त करते. कादंबरीची प्रकृती अवाढव्य असते. लेखकाची रसना त्याला रूप देते. संशोधकाला या दोन्हींचा शोध घ्यायचा असतो. मराठी कादंबरी एकोणिसाव्या शतकात निर्माण झाली. तेव्हा सबंध हिंदुस्थान परतंत्र, परभृत होता; अर्थात परपुष्टीही चालू होती. परंतु, पारतंत्र्याच्या पहिल्या अर्धशतकातच स्वातंत्र्याच्या उठावाला सुरुवात झाली. ब्रिटिशांनी आपली पाळंमुळं घट्ट रोवण्यासाठी काही सामाजिक सुधारणा केल्याही, तसंच जागृतीसुद्धा त्याच पोटी होऊ लागली. वाईट चालीरीती-सतीप्रथा, बालजरठ विवाहास विरोध, मुलींच्या विवाहाचं आक्रमण, शुद्धीकरण, सामाजिक प्रश्न, सनातनी लोकांची भूमिका, स्त्रीशिक्षण, सुधारक, मिशनर्‍यांचं कार्य, दुष्काळामुळे होणारं स्थलांतर, सावकारशाही अशा अनेक गोष्टींनी एकोणिसावं शतक व्यापलेलं आहे. या सर्व गोष्टींची बारकाईनं पाहणी लेखिकेनं केली आहे.

त्यांनी प्रारंभिक काळातील कादंबरी हा विषय सामाजिकतेच्या अनुषंगानं घेतलेला आहे. सामाजिकता केवळ विशिष्ट अंगानं नसते. राजकारण, समाजकारण, अर्थकारण, ठग, पुंडगिरी, सुधारणा, धर्माधर्मातील चढाओढी, मतप्रवाह, विचारप्रवाह आणि त्यामधून निर्माण होणारा दुरावा, दुराव्यातून निर्माण होणार्‍या नव्या वाटा या सगळ्यांनी मिळून स्वस्थ-अस्वस्थ समाज निर्माण होतो. व्यक्तीव्यक्तींचा, घटकाघटकांचा, पंथापंथाचा, धर्माधर्माचा आणि चालीरीती, रिवाज, परंपरा मिळून समाज निर्माण होतो. समाजाचा जो काही हितकारक असा संबंध निर्माण होतो, तो त्याच्या वाटचालीस पूरक ठरतो. जे अहितकारक असतं त्याच्या उच्चाटणासाठी समाजधुरीण नेहमीच सिद्ध असतात. समाजासाठी आणि समाजहितासाठी व्यापक भूमिका व तत्संबंध कार्यवृत्ती म्हणजे सामाजिकता होय. हे ध्यानात घेऊन पहिल्या प्रकरणात एकोणिसाव्या शतकातील सामाजिक आणि राजकीय घडामोडींची चर्चा केली आहे. ती अत्यंत उद्बोधक स्वरूपाची आहे.

एकोणिसाव्या शतकातील साहित्याचं तेच आशयद्रव्य असल्यानं अपेक्षित घटना, प्रसंग, नको त्या रींतीच्या विरोधातील प्रबोधन, परिस्थितीच्या विरोधातील ब्रिटिशांची भूमिका (दुष्काळातील सारावाढ) या घटना विवेचनाकरिता मध्ये मध्ये  घेण्यापेक्षा त्यांचा एकत्रितपणे विचार केला आहे. कादंबरीसारखा हा वैचारिक खाद्य पुरवणारा, अनेक बाबी सामावून घेऊन वाचकांची गुंतागुंत काही अंशी कमी करणारा वाङ्मय प्रकार आहे. हा गुंतागुंतीचा प्रकार लेखिकेनं आपल्या व्यापक अभ्यासदृष्टीनं सुलभ केला आहे. भारताच्या इतिहासाचा चांगला अभ्यास असणार्‍यांना (अर्थात ज्यांनी कलिंकर, राय चौधरी, दत्ता, रोमिला थापर, जे. एल. मेहता, बिपिन चंद्रा, ग्रोअर अँड ग्रोअर वाचले आहेत) पहिल्यांदा वाटतं की, लेखिका सामाजिकतेच्या अनुषंगानं इतिहासाची मांडणी करत आहेत! कारण राजकीय इतिहासच मोठ्या प्रमाणात आहे. सामाजिक अनुषंगानं इतिहासलेखन नाही. जे आहे ते इतिहासलेखनशास्त्राला धरून नाही. म्हणून तशी शंका रास्त वाटते. इतकी तटस्थता लेखिकेला साधता आली आहे की, त्यांचं लेखन शुद्ध सामाजिक इतिहास वाटावं.

इतर कोणत्याही वाङ्मयप्रकारांपेक्षा कादंबरीमध्ये वर्णनात्मकतेला खूप जागा नि अवकाश मिळत असतो. जे सत्त्वयुक्त आहे ते तर येतंच येतं, पण फँटसी हीसुद्धा समाजमनाची भूक असते. शरण्यभाव नि कुतहलापोटी माणसं फँटसीत रमतात. यासारख्या गोष्टीही कादंबरीकार टिपत असतो. या दोन्ही प्रकारच्या कादंबरींचं संशोधन करताना झापडबंदपणे संशोधनाच्या लोकप्रिय रीतींचा अवलंब करून लेखिका मोकळ्या झालेल्या नाहीत. आपल्याला पाऊणशे वर्षांच्या इतिहासाचा अर्कभूत असं दर्शन घडवायचं, हा लेखिकेचा एकमात्र उद्देश असल्याचं दिसून येतं.

कादंबरीकडे किंवा एकंदर साहित्याकडे पाहण्याचा लेखिकेची दृष्टी एका समाजशास्त्रज्ञाची आहे. असा शास्त्रज्ञ समाजाच्या संघटनमुळाशी जात असतो. तद्वत लेखिकेनं कादंबरीच्या प्रारंभिककाळाचा विचार केला आहे. त्यांनी संगीत आणि चित्रपट या दोन्ही कलांना समाजाच्या घडणीत महत्त्व दिलं आहे. कादंबरीच्या उगमकाळातील संगीत आणि चित्रपट यांमुळे तिला हातभार लागला, हे सांगताना लेखिका विष्णुशास्त्री चिपळूणकर, वि. का. राजवाडे, रा. भा. पाटणकर यांची कादंबरीच्या उगमाची विषयीची मते सांगतात. श्री. कृ. कोल्हटकर, भालचंद्र नेमाडे यांच्या वेगळ्या मताचंही त्यांनी विवेचन केलं आहे. विशेषतः भालचंद्र नेमाडे यांच्या मताचं विस्तृत विवेचन करून त्या म्हणतात की, ‘‘हिंदू संस्कृतीमध्ये विविधता आहे आणि परस्परविरोधी गोष्टींनी ती भरलेली आहे, वैदिक परंपरा आणि श्रमण परंपरा या दोन मुख्य परंपरांच्या कित्येक उपशाखा - या सगळ्याला मिळून आपण ‘हिंदू संस्कृती’ असे जे अभिधान देतो ती संस्कृती ‘स्वस्थ चिंतनशील’ नाही हे पटू शकेल. म्हणून दोन ‘विरोधी गुणधर्म असलेल्या संस्कृतीच्या संयोगातून निर्माण झालेला सांस्कृतिक व्यवहार’ असे कादंबरीचे वर्णन करायला पाहिजे.’’ (प्रस्तृत ग्रंथ : ७१) पण इथं कादंबरीचा उगम कोठून, कसा झाला हे सांगण्याऐवजी लेखिका कादंबरीची व्याख्या सांगत आहेत. आता नेमाडे कादंबरीच्या निर्मितीबाबत काय सांगतात पहा- ‘‘एकोणिसाव्या शतकात अस्वस्थ प्रयत्नवादी आंग्ल संस्कृतीशी स्वस्थ चिंतनशील हिंदू संस्कृतीच्या झालेल्या संयोगातून जे महत्त्वाचे सांस्कृतिक व्यवहार निर्माण झाले, त्यापैकी गद्य वाङ्मय हा एक होय.’’ (नेमाडे : १९९९ : २८१) म्हणजे नेमाडे कादंबरी-गद्यप्रकाराच्या उगमाचा निर्देश करतात.

या पुस्तकाला प्रारंभिक काळातील कादंबरीचं केवळ सामाजिक दृष्टीचं संशोधन म्हणून संबोधलं तर लेखिकेवर अन्याय होईल. कारण प्रारंभिक वळण म्हणून त्यांनी त्यात सर्व सामावून घेतलं आहे. अभिव्यक्तीची व तंत्राची वैशिष्ट्यंही शोधली आहेत. इंग्रजी शिक्षणामुळे लोकांना चिकित्सक दृष्टी आली. ही त्यांची दृष्टी काहीच कादंबर्‍यांत आहे. पूर्वीच्या लोकांपेक्षा वेगळ्या दृष्टीनं हे लोक आता जीवनव्यवहाराकडे पाहत होते; तेही कादंबर्‍यांत उतरलेलं नाही. दुसरं म्हणजे परंपरेतील समूहलक्ष्मी आविष्काराची रीत, कादंबरी या नव्या, आधुनिक व्यक्तिलक्ष्यी साहित्यप्रकारात सहज स्वाभाविकपणे उतरलेली दिसते. तसंच वाङ्मयेतिहासातील काही चुकीच्या नोंदीची दुरुस्तीही लेखिकेनं या पुस्तकात केली आहे. अनैतिहासिक गोष्ट खोडून काढणं ही इतिहासातील चांगली गोष्ट असते. रा. श्री. जोगांनी ‘ताराबाई आणि हिराबाई’ ही स्वतंत्र कादंबरी म्हटलं आहे. (म.वा.इ.खंड ४ : १९९९ : २५४) परंतु तुकदेवबाईंनी तो नझिर अहमद यांच्या ‘मिरातुल्ल अरूस’ या कादंबरीचा अनुवाद असल्याचं स्पष्ट दाखवून दिलं आहे. (पृष्ठ : १६६)

‘शतकातील कादंबरीविषयक अभिरूची’ हे या पुस्तकातील आणखी एक महत्त्वाचं प्रकरण. अभिरूचीचा विचार लेखिकेनं सविस्तर केलेला आहे. वृत्तपत्रं, मासिकं यातून आलेली परीक्षणं, प्रकाशन व्यवसाय, पुस्तकांचा खप, कादंबरीची प्रकृती यांच्या आधारे कादंबरीविषयीच्या अभिरूचीची चर्चा केली गेली आहे. विशेषतः मोती बुलासांच्या पहिल्या वाङ्मयेतिहासाचा फार गंभीरपणे विचार केला आहे. अशा अनेक बाबींमुळे ‘मराठी कादंबरीचे प्रारंभिक वळण’ हे पुस्तक असामान्य वाटतं.

मराठी कादंबरीचे प्रारंभिक वळण - रोहिणी तुकदेव, डायमंड पब्लिकेशन्स, पुणे, पाने – ३१२, मूल्य – ३९५ रुपये.

 

लेखक दयानंद महाविद्यालय, सोलापूर इथं मराठी विभागाचे प्रमुख आहेत.

srajshekhar215@gmail.com

मराठी कादंबरीचे प्रारंभिक वळण हे पुस्तक खरेदी करण्यासाठी खालील लिंक क्लिक करा.

https://goo.gl/FY82WI

 

 

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘बहिष्कृतां’च्या घरचे अन्न ‘बहिष्कृतां’प्रमाणेच उपेक्षिले गेले. त्यामुळे ‘ब्राह्मणेतर खाद्यसंस्कृती चळवळी’ने आपली ‘देशी’ बाजू जगापुढे मांडायला सुरुवात केलीय...

स्वच्छता व शुद्धता या दोहोंना अस्पृश्यतेचा मोठा संदर्भ आहे. ज्यांना शिवायचे नाही ते अस्पृश्य. त्यांनी जवळ यायचे नाही की, शेजार करायचा नाही, हा ब्राह्मण व सवर्ण यांचा नियम. घाणीची कामं ज्यांना वर्णाश्रम धर्माप्रमाणे करायला लावली, त्यांना घाण समजून अस्पृश्य ठरवण्यात आले. साहजिकच ही माणसं कशी जगतात, काय खातात-पितात, काय विचार करतात, याची जाणीवच वरच्या तिन्ही वर्णांना म्हणजेच सवर्ण जातींना नव्हती.......

किणीकरांना सगळी दर्शने कळत होती आणि अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती काव्यात उतरवता येत होती. आणि अजून मोठी गोष्ट म्हणजे ते काव्य चार ओळींपुरते सुटसुटीत ठेवता येत होते

किणीकरांवर मानवेंद्रनाथ रॉय ह्यांच्या विचारसरणीचा मोठा प्रभाव होता. त्यांच्या नावावरूनच त्यांनी स्वतःला ‘रॉय’ हे नाव घेतले होते. रॉय यांनी 'रॅडिकल ह्यूमॅनिझम’चा पुरस्कार केला. त्या काळच्या महाराष्ट्रात अनेक नेत्यांवर, लेखकांवर आणि विचारवंतांवर रॉय ह्यांचा प्रभाव पडला होता. रॉय ह्यांनी क्रांतीचा मार्ग नाकारला असला, तरी त्या काळी तरुण असलेल्या किणीकरांना मनात कुठेतरी क्रांतीचे आकर्षण वाटले असणार.......

म्हटले तर हा ग्रामीण राजकारण उलगडून सांगण्याचा खटाटोप आहे अन् म्हटले तर शेतकऱ्यांना लुबाडणाऱ्या व्यवस्थेला पर्याय उभे करणाऱ्या पुढच्या पिढीतील शेतकरी तरुणांचा संघर्ष आहे

ही केवळ भानुदासराव पाटील, विक्रम शिंदेचीच कथा नाही, तर आबासाहेब जाधव, दिनकरराव पाटील यांच्यासारख्या लोकशाही प्रक्रियेने उदयास आलेल्या नव्या सरंजामदारांचीही गोष्ट आहे. आर्थिक संसाधनांच्या बळावर वाट्टेल तेवढा पैसा मोजून निवडणुका जिंकणारे, मतदारांचा कौल फिरवणारे आबासाहेब, दिनकरराव केवळ हैबतपुरातच नव्हे, महाराष्ट्रात सगळ्याच मतदारसंघांत दिसून येतात, पण.......

या पुस्तकातल्या ‘बिटविन द लाईन्स’ नीट वाचल्या, तर आजच्या मराठी पत्रकारितेची ‘अवनत’ अवस्था आणि तिची ‘ऱ्हासपरंपरा’ नेमकी कुठून सुरू झाली, हे लख्खपणे समजते!

आपल्या गुणी-अवगुणी सहकाऱ्यांकडून उत्तम ते काढून घेण्यापासून, समाजातल्या व्यक्ती-संस्था यांचं योगदान नेमकेपणानं अधोरेखित करण्यापर्यंत बर्दापूरकरांचा सर्वत्र संचार राहिला. त्यामुळे त्यांच्या पत्रकारितेला सत्त्व, नैतिक बळ आणि गांभीर्याची झळाळती झालर लाभत राहिली. आजच्या मराठी पत्रकारितेच्या संदर्भात त्या झालरीचा ‘थर्मामीटर’ म्हणून वापर केला, तर जे ‘तापमान’ कळतं, ते काळजी करावं, असंच आहे.......

लोकशाहीबद्दल आस्था किंवा काळजी व्यक्त करणं, ही काही लोकांचीच जबाबदारी आहे, हा समज खोडून काढायचा तर कामच केलं पाहिजे. ‘लोकशाही गप्पा’ हे त्या व्यापक कामाच्या गरजेतून आलेलं छोटंसं काम आहे

पुरेशी मेहनत करून आणि संवादाच्या सर्व शक्यता खुल्या ठेवून लोकांशी बोललं गेलं, तर प्रत्येकाच्याच आकलनात वाढ होते. आणि हळूहळू भूजलाची पातळी उंचवावी, तसं लोकशाहीबद्दलचं भान सखोल होण्याची शक्यता निर्माण होते. आपल्या भोवतीच्या गदारोळातून एकमेकांचा हात धरून, एका सजग आणि जिवंत लोकशाहीच्या मुक्कामापर्यंत मैदान मारणं आपल्याला सहज शक्य आहे. त्यासाठी एकमेकांना शुभेच्छा देणं एवढं तरी आपण करूच शकतो. ते मनःपूर्वक करू या!.......