‘मंटो’ : दिग्दर्शनात कमी पडणारा सिनेमा तगतो, तो नवाजुद्दीनच्या लाजवाब अभिनयानं!
कला-संस्कृती - हिंदी सिनेमा
विवेक कुलकर्णी
  • ‘मंटो’ या चित्रपटाचं पोस्टर
  • Sat , 22 September 2018
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti हिंदी सिनेमा Hindi Movie मंटो Manto नंदिता दास Nandita Das नवाजुद्दीन सिद्दिकी Nawazuddin Siddiqui

साहित्यकृतींवरील आक्षेप हे प्रत्येक काळात दिसून येतात. तीन वर्षांपूर्वी तामिळ लेखक पेरूमल मुरूगन यांनी त्यांच्या फेसबुक वॉलवर लिहिलं होतं, “पेरूमल मुरूगन, तो लेखक आता मेला आहे. तो देव नसल्यामुळे, त्याचा पुनरुद्धार होणार नाही. त्याचा पुनर्जन्मावर विश्वास नाही. एक सर्वसाधारण शिक्षक म्हणून तो पी. मुरूगन नावानं सामान्य आयुष्य जगणार आहे. त्याला एकटं सोडा.” एकविसाव्या शतकात महासत्ता बनायला निघालेल्या या देशात एक लेखक ‘तो मेलाय’ असं जाहीर करतो यासारखी उद्वेगजनक गोष्ट नाही. एकीकडे परंपरेचं नको इतकं ओझं वाहणारा समाज, तर दुसरीकडे महासत्ता होण्यासाठीची केविलवाणी धडपड करणारा लोकशाही मानणारा देश असल्या विरोधाभासात जगणार्‍या या देशात लेखकांना लेखणी बंद करून ठेवावीशी वाटते, यासारखी नामुष्की नाही. आज एकविसाव्या शतकात हे घडतंय म्हटल्यावर भारत-पाकिस्तान फाळणीच्या वेळी मंटोच्या मनावर कसले आघात झाले असतील, याचा विचारच केलेला बरा. त्यांच्या त्याच काळाचा पट म्हणजे ‘मंटो’ सिनेमा.

मुंबईतल्या एका कॅफेत सआदत हसन मंटो (नवाजुद्दीन सिद्दिकी), इस्मत चुगताई (राजश्री देशपांडे), साफिया (रसिका दुगल) व त्यांचे मित्र बसलेले असतात. चर्चा मंटो व चुगताईच्या कथांवर चालू असते. इस्मतला येणारी शिव्यांनी भरलेली पत्रं, तर मंटोच्या कथेत वेश्याच का असतात यावर हिरीरीनं चर्चा होते. त्याचं म्हणणं आहे सध्या जे चालू आहे त्यावर लिहावं कारण तेच खरं साहित्य आहे. पण एका मित्राच्या बोलण्यावरून मंटो तिथून निघून जातो.

सिनेमात पैशांसाठी स्क्रिप्ट रायटिंगचं काम करणारा मंटो तिथल्या कामावर नाराज आहे. त्याच दरम्यान भारत-पाकिस्तान असे दोन देश होतील, असा लोकांचा कयास खरा ठरायला लागतो. मित्र श्याम चढ़ा (ताहिर राज भसीन) याच्या उद्वेगजनक बोलण्यामुळे आपण होत्याचे नव्हते होऊ, या भीतीनं मंटो लाहोरला जातो. तिथली परिस्थिती भारतापेक्षा वेगळी नसल्यामुळे नेमकं आपण कशासाठी इथं आलो असा प्रश्न मंटोला पडतो.

.............................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

 

.............................................................................................................................................

नंदिता दास यांचा दिग्दशर्क म्हणून हा दुसराच सिनेमा. २००२ च्या गुजरात दंगलींवर आधारित असणारा ‘फिराक’ विषयाच्या गांभीर्यामुळे लक्षात राहणारा होता. तसेच दंगली होऊन सहाच वर्षं झाली होती, त्यामुळे सर्वसामान्यांच्या आयुष्यात नेमकं काय झालं त्याचा ‘आँखों देखा हाल’ असं त्याचं स्वरूप होतं. पहिल्याच सिनेमात आशयघन विषय हाताळल्यामुळे त्यांचा पुढचा सिनेमा कुठला याची उत्सुकता होती.

मंटोच्या आयुष्यावर सिनेमा त्या करणार आहेत म्हटल्यावर उत्सुकता शिगेला पोचली होती. अपेक्षेनुसार सिनेमा चांगला झालाय, पण काहीतरी कमी पडलंय असं शेवटपर्यंत वाटत राहतं. चरित्रपट म्हटल्यावर त्या व्यक्तीच्या आयुष्यातले कुठल्या गोष्टी घ्यायच्या कुठल्या नाही याचं भान पटकथाकार व दिग्दर्शकांना नसतं. त्यामुळे त्या व्यक्तीला न्याय दिलाय असं दिसून येत नाही. नंदितांनी मंटोच्या आयुष्यातल्या वादळी गोष्टीच गृहीत धरल्यात. फाळणी होण्याआधीची व त्यानंतरची लाहोरमधला ही उणीपुरी चार-पाच वर्षंच त्यांनी घेतली आहेत. ही वर्षं एकूणच भारतीय इतिहासात सर्वांत क्रौर्यानं भरलेली आहेत. त्याच काळात मंटो लिहीत होते हे आपलं भाग्य. नंदितांनी ही वादळी वर्षं घेताना त्यात मंटोच्या सर्वांत प्रसिद्ध कथांना गुंफून टाकलंय. त्या कथा आहेत ‘दस रुपये’, ‘काली सलवार’, ‘ठंडा गोश्त’, ‘खोल दे’ व ‘टोबा टेक सिंग’. तसंच ‘लेटर टू अंकल सॅम’मधल्या ओळीदेखील.

पटकथेची रचना या कथा व त्याची पात्रं व प्रत्यक्ष मंटोचं आयुष्य अशी केलीय. त्यामुळे मंटोच्या आयुष्यातले महत्वाचे प्रसंग चालू असताना मध्येच कथेमधील प्रसंग येतात. त्यामुळे रसभंग होतो खरा, कारण कथा कोणती अन मंटोचं जगणं कोणतं याचे स्पष्ट भाग केलेले नाहीत. कोणती कथा वापरलीय याचं स्पष्टीकरण पात्रांच्या तोंडी येत नाही. फक्त ‘ठंडा गोश्त’ व ‘टोबा टेक सिंग’ यांच्याबद्दल कळतं, कारण त्याबद्दल मंटो निवेदनाच्या रूपात बोलतात. पण इतर ठिकाणी ते पुरेसं स्पष्ट नाही. मंटो यांना आजूबाजूच्या परिस्थितीतून मिळणाऱ्या प्रेरणा नेमक्या दिसायला कशा आहेत, हे दाखवण्यासाठी योजलेली रचना निश्चित प्रभावी आहे.

हे समजून घेता येईल की, फाळणीचा काळ नेमका उभा करणं आणि तो दोन तासांत बसवणं सोपं काम नाही. छोट्या छोट्या गोष्टींचा विचार करून ते यथातथ्य दिसणं गरजेचं असतं. ते चांगल्या प्रकारे केलं आहे. मग सिनेमा कुठे कमी पडतो? तर नंदितांच्या दिग्दर्शनात. त्यांनी काळ जरी यथातथ्य उभा केला असला तरी तो भिडत नाही. त्याचं दिसणं विश्वसनीय आहे, पण मंटोची वाताहत, फाळणीचं क्रौर्य अंगावर येत नाही. त्यात एका प्रकारे तटस्थता दिसते, जी गरजेची नव्हती असं वाटतं. ‘फिराक’मध्ये जसं दंगलीचे परिणाम दिसून यायला लागतात व स्मरणात राहतात तसं इथं होत नाही. इथं दंगल दिसते, तिचे परिणाम दिसतात, मंटोच्या घरच्यांचं वागणं दिसतं, मंटोच्या साहित्याबद्दल जे बोललं जातं आणि न्यायालयात त्यांच्या विरोधात प्रतिक्रिया दिल्या जातात त्या दिसतात, पण मनाला भिडत नाहीत. असं वाटतं जणू नंदिता हात आखडता घेऊन दिग्दर्शन करतायत. त्यामुळे जिथं कथेला किंवा प्रसंगांना उठाव मिळणं गरजेचं आहे, तिथंच नेमकं त्या कमी पडतात. किंवा काही जागी कॅमेरा मुद्दामहून रेंगाळतोय असं दिसत नाही. हे रेंगाळणं प्रेक्षकांना मंटोंच्या विश्वात घेऊन जायला कारणीभूत व्हायला हवं होतं, ते होत नाही. जणू पटकथा पडद्यावर उभी करणं इतकंच आपलं काम आहे, असं त्यांनी मानलंय!

दुसरा आक्षेप पार्श्वसंगीतात केलेला भारतीय शास्त्रीय संगीताचा वापर. जो अनावश्यक आहे. दिग्दर्शकाच्या अभिरुचीबद्दल कौतुक आहे, ते तरीही भारतीय शास्त्रीय संगीत हे पार्श्वसंगीतासाठी अप्रभावी ठरतं असं नेहमीच दिसून आलंय. एखादं सारंगी वाद्य किंवा गायिकेच्या आवाजातील रागदारीवर आधारित ख्याल/आलाप वगैरे इतर वेळी ऐकायला कर्णतृप्त करणारा अनुभव असतो, पण सिनेमात ते वापरलं की, उपरं वाटायला लागतं. आशयघन विषय असला की त्याला शास्त्रीय संगीताची जोड द्यायलाच हवी का, असा काहीसा प्रघात दिसून येतो. इथंही नंदिता तो प्रघात मोडू शकल्या नाहीत.

दिग्दर्शनात कमी पडणारा सिनेमा तगतो तो नवाजुद्दीन सिद्दिकीच्या लाजवाब अभिनयानं. भूमिका जगणं म्हणजे काय यासाठी सिद्दिकीच्या अभिनयाकडे उदाहरण म्हणून पाहावं. मंटोच्या आयुष्याची वाताहत ते चेहरा व डोळ्याद्वारे इतक्या प्रभावीपणे दाखवतात की, आपण विसरूनच जातो एक अभिनेता अभिनय करतोय म्हणून. बाकी त्याच्या अभिनयाला इतर सर्वांची साथ ही जमेची बाजू.

साहित्यकृतींवर आक्षेप ही जुनी व नित्याची गोष्ट वाटावी इतकं त्यात सातत्य आहे. आक्षेप घेणारे कोण असतात यापेक्षा त्यांना चेहरा नसतो हेसुद्धा नेहमीच दिसून आलंय. मंटो मुंबईत असताना त्यांच्यावर तीन खटले चालवले गेले होते, तर पाकिस्तानातही तीन. राजकीय स्वार्थासाठी दोन देशांची निर्मिती झाली, पण मंटोसारख्या लेखकांपासून ते सर्वसामान्य लोकांना त्याचे परिणाम भोगावे लागले. याचं यथातथ्य चित्रण करणार्‍या मंटोला मात्र कायद्याच्या कचाट्यात अडकवून अपमानित करण्यात आलं, तर साहित्यिक वर्तुळात त्यांच्या लेखनात साहित्यिक मूल्यच नाही म्हणून वाळीत टाकण्यात आलं. शब्दांचे इमले चढवणार्‍या लोकांकडूनच नागवले गेलेले मंटो मात्र त्या आघातातून कधीच सावरू शकले नाहीत. ‘टोबा टेक सिंग’मधल्या नो मॅन्स लँडमध्ये पडलेल्या त्यांच्या पात्रांसारखेच ते कुठेतरी पडले. इथंच त्यांची शोकांतिका झाली.

.............................................................................................................................................

लेखक विवेक कुलकर्णी सिनेअभ्यासक आहेत.

genius_v@hotmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’चे अँड्राईड अॅप डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा -

 

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सिनेमा हे संदीप वांगा रेड्डीचं माध्यम आहे आणि त्याला ते टिपिकल ‘मर्दानगी’ दाखवण्यासाठी वापरायचंच आहे, तर त्याला कोण काय करणार? वाफ सगळ्यांचीच निवते… आपण धीर धरायला हवा…

संदीप वांगा रेड्डीच्या ‘अ‍ॅनिमल’मधला विजय त्याने स्वत:वरच बेतलाय आणि विजयचा बाप बलबीर त्याने टीकाकारांवर बेतलाय की काय? त्यांचं दुर्लक्ष त्याला सहन होत नाही, त्यांच्यावर प्रेम मात्र अफाट आहे, त्यांच्या नजरेत प्रेम, आदर दिसावा, यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे. रेड्डीसारख्या कुशल संकलकानं हा ‘समीक्षकांवरच्या, टीकाकारांवरच्या अतीव प्रेमापोटी त्यांना अर्पण केलेला’ भाग काढून टाकला असता, तर .......