टॉलस्टॉय, नायपॉल आणि गांधी
सदर - गांधी @ १५०
अलका गाडगीळ
  • टॉलस्टॉय, नायपॉल आणि गांधी
  • Mon , 03 September 2018
  • सदर गांधी @ १५० Gandhi @ 150 महात्मा गांधी Mahatma Gandhi लिओ टॉलस्टॉय Leo Tolstoy व्ही. एस. नायपॉल V.S. Naipaul

२ ऑक्टोबर २०१९ रोजी म. गांधी यांची १५०वं जयंती वर्षं साजरं केलं जाईल. त्याचं निमित्त साधून वर्ध्याच्या सेवाग्राम आश्रमानं २१-२२ फेब्रुवारी २०१७पासून ‘गांधी १५० जयंती अभियान’ सुरू केलं आहे. (२२ फेब्रुवारी हा गांधींच्या पत्नी कस्तुरबा यांचा स्मृतिदिन असतो.) या अभियानाअंतर्गत विविध कार्यक्रम केले जाणार आहेत. त्याला प्रतिसाद म्हणून ‘अक्षरनामा’वर दर महिन्याच्या दोन तारखेला गांधींविषयी एक लेख प्रकाशित केला जातो… या मालिकेतला हा सविसावा लेख ...

.............................................................................................................................................

१.

जहाल गटाचे क्रांतिकारक तारकनाथ दास कोलकात्याहून ‘फ्री हिंदुस्तान’ नावाचं दैनिक काढायचे. त्यासोबत सैनिकी प्रशिक्षणही ते आपल्या साथीदारांसोबत घेते होते. भारताच्या स्वातंत्र्य चळवळीला पाठिंबा मिळवण्यासाठी विदेशी लेखक आणि विचारवंतांशी संपर्क साधला पाहिजे असं त्यांच्या गटानं ठरवलं आणि नावांची एक यादी तयार केली. त्यातलं सर्वांत पहिलं नाव होतं, महान रशियन लेखक लिओ टॉलस्टॉय.

साधारण १९०७पासून दास टॉलस्टॉय यांच्या संपर्कात होते. स्वातंत्र्य लढ्याला जाहीर समर्थन देण्याची विनंती त्यांनी टॉलस्टॉय यांना केली. दासांच्या पत्रांची लगोलग उत्तरंही आली. टॉलस्टॉय यांनी भरभरून लिहिलं. वसाहतवादाचा स्पष्ट शब्दांत धिक्कार केला. हा सारा पत्रव्यवहार ‘फ्री हिंदुस्तान’ मध्येक्रमश: प्रसिद्ध झाला. या अंकांच्या प्रती महात्मा गांधींपर्यंत पोचल्या. गांधी तेव्हा दक्षिण आफ्रिकेत सत्याग्रहाचे वेगवेगळे प्रयोग करण्यात गुंतले होते. कॉलेजच्या दिवसांपासून गांधी टॉलस्टॉय वाचत होते. ‘द किंगडम ऑफ गॉड इज विदिन यू’ या त्यांच्या पुस्तकाचा गांधींवर सखोल परिणाम झाला.

‘फ्री हिंदूस्तान’मधील दास-टॉलस्टॉय पत्रसंवादाने गांधी संमोहित झाले. ही सारी पत्रं ‘अ लेटर टू अ हिंदू’ या पुस्तकात प्रसिद्ध झाली आहेत.

टॉलस्टॉय विश्वातील महान लेखक होतेच, त्याशिवाय मानवी जीवनासमोरील जटिल नैतिक प्रश्नांवर ते प्रकट चिंतनही करत. ‘धार्मिक उन्माद आणि जहाल विज्ञानवाद हिंसेला जन्म देतो. मानवी तत्त्वाला हरताळ फासणाऱ्या या विचारांपासून दूर राहून आपल्याला आदिमत्वाकडे परत जाण्याशिवाय पर्याय नाही’, असं त्यांचं मत होतं. टॉलस्टॉय १९१० साली निर्वतले. त्यानंतर जग हादरवून टाकणारी दोन महायुद्धं झाली. संहारासाठी विज्ञानाचा उपयोग किती जीवघेणा ठरू शकतो याचं प्रत्यंतर मिळालं.

तारकनाथ दासांच्या पेपरात प्रकाशित झालेलं टॉलस्टॉय यांचं उत्तरवजा मुक्तचिंतन गांधींना ‘इंडियन ओपिनियन’मध्ये छापायचं होतं. त्यासंबंधीची परवानगी मागण्यासाठी गांधींनी टॉलस्टॉय यांच्याशी १९०८ मध्ये पत्रव्यवहार सुरू केला आणि तो टॉलस्टॉय यांच्या मृत्यूपर्यंत म्हणजे १९१०पर्यंत चालू राहिला.

या दोघांचा पत्रव्यवहार ‘लेटर्स फ्रॉम वन : करसपॉन्डन्स (अँड मोअर) ऑफ लिओ टॉलस्टॉय अँड मोहनदास गांधी’ या पुस्तकांत प्रसिद्ध झाला आहे.

टॉलस्टॉय यांचं एका पत्राचं उत्तरं मोठ्या प्रकरणाएवढं असायचं. वर्तमानपत्रांच्या जागेचा तेव्हा संकोच झालेला नव्हता. शब्दसंख्येवरही मर्यादा नव्हती. टॉलस्टॉय आपलं म्हणणं ऐसपैसपणे मांडायचे.

.............................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

‘स्वातंत्र्यासाठी लढा द्या, पण (र्इव्हिल) सैतानी वृत्ती हिंसेने नव्हे तर प्रेमाने रोखली जाऊ शकते. हिंसेला अहिंसेने उत्तर देउूनच बदल घडू शकतो’. टॉलस्टॉय यांच्या संदेशाचा गांधींवर खोलवर प्रभाव पडला आणि त्यांची अहिंसेची मांडणी आकार घेऊ लागली.

काउंट टॉलस्टॉय सरदार घराण्यातले होते. घराण्याची प्रचंड जमीन आणि संपत्ती होती. शेती-बागायतीत काम करणारी वेठबिगारांची फौज होती. पण या व्यवस्थेतील अन्याय आणि हिंसेची त्यांना जाणीव झाली. आपल्या वेठबिगारांना त्यांनी मुक्त केलं. जमिनी कसणाऱ्यांच्या नावावर केल्या.

त्यांच्या मृत्यूनंतर घडलेल्या रशियन क्रांतीचे पडघम त्यांना ऐकू आले होते. समाजातील अस्वस्थता त्यांना दिसू लागली. भूमीहीन वेठबिगार मजूरांवर होणा-या हिंसेबद्दल ते लिहू लागले. झारच्या रशियात मूठभर सरंजामदार रयतेचं शोषण करत होते, अन्वनित अत्याचार करत होते. विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात या जुलमी व्यवस्थेला आव्हान मिळालं. राजसत्तेचा पाडव झाला आणि रशियन सोशल डेमोक्रॅटिक पार्टीचं सरकार स्थापन झालं. पुढे क्रांतीला विकृत वळण कसं लागलं याचं चित्रण जॉर्ज ऑरवेल यांच्या ‘अ‍ॅनिमल फार्म’ या पुस्तकात सापडतं. तरीही रशियन क्रांतीला दंतकथेंचं वलय प्राप्त झालं. मार्क्सवाद मोडीत काढण्याचे सतत प्रयत्न होतात. पण २००८मध्ये अमेरिकन अर्थव्यवस्थेची पडझड झाल्यानंतर युरोप आणि अमेरिकेत मार्क्सच्या ‘दास कॅपिटल’ची विक्रमी विक्री झाली. त्याच्या लक्षावधी प्रती विकल्या गेल्या

झारच्या रशियातील अस्वस्थतेचं चित्रण टॉलस्टॉय यांच्या साहित्यात पाहायला मिळतं. ‘हजारो श्रमिकांचे श्रम आणि आयुष्यं मूठभर मालक नियंत्रित करतात. हे सर्वत्र घडतंय. सर्व वर्णांमध्ये, सर्व देशांमध्येही’, गांधींना लिहिलेल्या एका पत्रात ते म्हणतात.

‘फॉर्ज्ड कूपन’ या त्यांच्या अखेरच्या काळातील साहित्यकृतीत शोषण  आणि त्यातून उद्भवणारे गुन्हे आणि हिंसा यासंबंधीचं चिंतन आहे. धनिक वर्गातला एक किशोरवयीन मुलगा वह्या-पुस्तकांसाठी वडिलांकडे पैसे मागायला त्यांच्या खोलीत जातो. वडील त्याला अद्वातद्वा बोलतात आणि एक पैही न देता हाकलून देतात. मित्राच्या सांगण्यावरून तो खोटी नोट वापरून साहित्य खरेदी करतो. आपण फसवले गेलोय हे दुकानदाराच्या लक्षात येतं आणि त्याच्या रानात कामासाठी येणाऱ्या मजूराच्या पगाराच्या रकमेत तो ही खोटी नोट खपवतो. नोटेचं मूल्य मोठं असतं, पण ती खोटी असल्यामुळे या मजूराला काही विकत घेता येत नाही.

मजूर मालकाकडे जातो, पण हा सरंजामरदार कानावर हात ठेवतो आणि मजूराला रिकाम्या हाताने परतावं लागतं. त्याला पोटासाठी गुन्हा करावा लागतो. या एका गुन्ह्यातून गुन्ह्यांची आणि हिंसेची मालिकाच तयार होते. खून होतात, दरोडे पडतात आणि चोऱ्या होतात. शेवटी श्रमिक वर्गातील माणसंचं पकडली जातात.

त्या दरम्यान शहरातील कॉलेजात शिकणारी काही तरुण-तरुणी ग्रामीण भागातील भ्रष्ट सरकारी अधिकाऱ्यांविरोधात आघाडी उघडतात. चौकात मिटिंगा घेतात, मोर्चा काढायचा प्रयत्न करतात. एक क्रांतिकारक तरुणी सरकारी अधिका-यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करते. तो सफल होत नाही, पण तरुणीची तुरुंगात रवानगी होते.

पण कथा इथेच संपत नाही. सद्गुण आणि माणसांच्या चांगुलपणावर लेखकाचा ठामविश्वास. पुढे खून करून तुरुंगात शिक्षा भोगणा-या सगळ्या मजुरांचं हरुदय परिवर्तन होतं आणि त्यांना ठकवणाऱ्या मालदारांचंही हृदय परिवर्तन हे मजूर घडवून आणतात.

भारताची फाळणी घोषित झाल्यानंतर बंगालमध्ये अन्वनित हिंसाचार सुरू झाला. सगळीकडे दंगली, खून, बलात्कार आणि जाळपोळ होत होती. अशा परिस्थितीत गांधी नौखालीला गेले आणि त्यांनी सामोपचाराचं कार्य सुरू केलं. जिथे हिंसा होत असे तिथे गांधी जात असत. लोकांचं हृदय परिवर्तन होवू शकतं यावर त्यांचा ठाम विश्वास होता.

२.

“महात्माच्या प्रतिमेमध्ये गांधी दीर्घकाळ अडकून बसले. त्यांना प्रेरणा देणारे टॉलस्टॉयसुद्धा विभूती असल्याच्या भ्रमात होते. दोघांनाही जिवंतपणीच विभूतीपण लाभलं. याची डोळा ते आपलं विभूतीपण पाहू शकले. गांधी आपल्या वैयक्तिक चिंताही सार्वजनिक करत. उदा. त्यांच्या सेक्सबद्दलच्या चिंता आणि चिंतन खरंतर वैयक्तिक होतं,” ‘इंडिया - अ‍ॅन एरिया ऑफ डार्कनेस’ या पुस्तकांत व्ही. एस. नॉयपॉल यांनी आपलं निरीक्षण मांडलं आहे.

टॉलस्टॉय यांनीही सेक्स वर्ज्य करण्याची चर्चा सुरू केली होती. त्यांच्या ‘क्रुटझर सोनाटा’ या कादंबरीची केंद्रिय कल्पना ‘अ‍ॅब्स्टिनन्स’ (लैंगिक संबंध टाळणे) हीच आहे.

“गांधींच्या पद्धती सर्वांनाच पसंत पडायच्या नाहीत. त्यांनी आपली अहिंसक चळवळ प्रमाणाबाहेर सुरू ठेवली. त्यामुळे स्वातंत्र्याचा प्रकल्प विनाकारण लांबला. वांशिकतेची जाणीव ही त्यांची सर्वांत क्रांतीकारी जाणीव होती, जी ते कधी व्यक्त करू शकले नाहीत किंवा ती व्यक्त करण्याचं साधन त्यांच्याकडे नव्हतं. दक्षिण आफ्रिकेतील वीस वर्षांच्या वास्तव्यामुळे त्यांना वांशिकतेचं भान आलं. पण भारतात या जाणीवेला काही महत्व नाही कारण इथे फक्त जातीची जाणीव असते. समाजाला धरून ठेवणारं वांशिकत्व भारतियांमध्ये नसल्यामुळे त्यांच्यामध्ये एकोपा येऊ शकत नाही.” नायपॉल यांचं हे निरीक्षणही टिकणारं नाही. आफ्रिकन वंशिय व्यक्तींसमोर भारतीयांची वर्ण आणि वंश श्रेष्ठत्वाची कल्पना डोकं वर काढते. दिल्लीत आणि इतरत्र आफ्रिकन विद्यार्थ्यांवर जीवघेणे हल्ले होतात. उत्तर पूर्व राज्यातील व्यक्तींवरही हल्ले होतात आणि त्यांना अपमानास्पद वागणूक दिली जाते.

दक्षिण आफ्रिकेतील वास्तव्याच्या पूर्वार्धात गांधींच्या वांशिक भावना काहीशा अशाच होत्या. पण आपल्या अंतरंगातील खोट त्यांनी ओळखली आणि वर्णश्रेष्ठत्वाच्या भावनेतून ते बाहेर पडले. आपल्या चुकांची कबुली देणं आणि सतत स्व परीक्षण करण्याची नीतीमत्ता गांधींकडे होती.

३.

एक व्यापारी कंपनी काही कोटी लोकसंख्येच्या देशावर मालकी कशी मिळवू शकते? हा प्रश्न या टॉलस्टॉय यांना पडायचा. “लहान मूल मोठं झालं की मोठ्यांचं न ऐकता भरकटत जातं. पाश्चिमात्य देश पूर्वेच्या देशांत जे करतायत ते असंच आहे. ‘प्रौढ’ पश्चिमी देश आयुष्यातील दु:खाकडे कानाडोळा करतायत आणि भरकटत जातायत.” टॉलस्टॉय यांची धार्मिकता नैतिकतेवर आधारलेली होती. संघटित धर्माचा त्यांनी नकार केला होता.

“हिंद स्वराज’मध्ये गांधींनीही साधारण हीच भूमिका घेतली आहे. “पाश्चिमात्य संस्कृती धर्म आणि नैतिकतेकडे पूर्णपणे दुर्लक्ष करते. अधार्मिकतेने युरोपात मोठा धुमाकूळ घातला आहे.” ‘हिंद स्वराज’मधील एका प्रकरणात हे विधान आढळतं.

गांधींची राष्ट्राची संकल्पना सर्वसमावेशक होती. केंद्रिय सत्तेबद्दल त्यांच्या मनात आशंका होती. त्यातील हिंसेच्या शक्यतांची जाणीव त्यांना झाली होती.

राष्ट्र नागरिकांचं रक्षण करण्यासाठी असतं या विचारावर टॉलस्टॉय यांचा विश्वास नव्हता. “रक्षणाच्या खोट्या बाता करून राज्य कराच्या रूपाने पैसे उकळतं. युद्धासाठी नागरिकांचं सैन्य उभं केलं जातं. परिणामी हे सैन्यही हल्ल्याचं लक्ष्य बनतं. धर्मावर आधारलेलं राज्य एक षडयंत्र असतं,” ख्रिश्चन स्टेटच्या संकल्पनेवर या महान लेखकांनी  हल्ला चढवला होता.

४.

“वसाहत काळात उपजीविकेसाठी सक्तीचं देशांतर कराव्या लागलेल्यायजमान देशात भारतीयांची बाह्य ओळख फक्त सावळया वर्णाचे लोकअशीच असायची. ब्रिटिश, फ्रेंच इत्यादींच्या आफ्रिका आणि दक्षिण अमेरिकेतील मळयांवर काम करणाऱ्यांत पुरुष संख्येनं जास्त असायचे आणि स्त्रियांची संख्या अगदीच कमी असायची. त्यामुळे नैतिक बंधनं सैल झाली आणि जातपातही काही प्रमाणात गळून पडली”, गार्इत्रा बहादूर या लेखिकेने आपल्या ‘कूली वूमन’ या पुस्तकांत नोंदवलंय. गार्इत्राची पणजी मजूरांना नेणाऱ्या एका जहाजाने गयानाला गेली तेव्हा ती गरोदर होती आणि तिच्यासोबत पुरुष नव्हता. गयानाला पोचल्यावर ती बाळंत झाली आणि नंतर तिचं लग्नही झालं.

पण वसाहत काळात मजुरीसाठी गेलेल्या सगळ्यांचीच जातीची जाणीव गळून पडली नाही. नॉयपॉल यांच्या पूर्वजांना दक्षिण अमेरिकेत स्थलांतर करावं लागलं. ‘अ हाऊस फॉर मिस्टर बिस्वास’ या कादंबरीतील नायक घर घेण्यासाठी धडपडत असतो. दुसऱ्या पातळीवर स्थलांतरामुळे हरवून गेलेली जातीय अस्मिता परत मिळवण्याचीही धडपड करत असतो. परदेशात परवंशिय आणि अब्राह्मणी जातींच्या मजुरांच्या गोतावळ्यामध्ये जात हरवून जाण्याचा धोका होता. बिस्वास कुटुंबाची ब्राह्मणी श्रेष्ठत्वाची जाणीव मात्र जागी होती.

‘हाफ अ लाइफ’ या कादंबरीतील ब्राह्मण नायक गांधींच्या चळवळीत सामील होतो आणि दलित मुलीशी लग्न करतो, पण आयुष्यभर या निर्णयाबद्दल स्वत:ला दोष देत राहतो. त्याचा मुलगा इंग्लंडला स्थलांतर करतो आणि आफ्रिकन मुलीशी लग्न करतो. अठरा वर्षांच्या संसारानंतर तो आपल्या आफ्रिकन पत्नीला सोडतो. आपल्यातल्या दुर्गुणांसाठी तो आपल्या दलित आर्इला दोष देतो.

जातीव्यवस्थेमध्ये बद्दल नायपॉल काय विचार करत होते? रेडियो ऑस्ट्रेलियाला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणतात- ‘‘...जातीव्यवस्था फ्रेंडली आहे, भारतीय समाजाला ती आधार देते.”

जातीव्यवस्थेत फ्रेंडली काय आहे? उलट जातीव्यवस्था अनेकांना ‘अनफ्रेंड’ करत नाही का?

वर्णाश्रम धर्म केवळ व्यवसायांवर आधारलेला होता, नंतर तो भ्रष्ट झाला असं गांधींचं मत होतं. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना मात्र ही मांडणी मान्य नव्हती. प्रत्यक्षात गांधींनी जातपात तोडण्यावर भर दिला. केवळ आंतरजातीय लग्नांनाच ते उपस्थित राहत.

५.

गांधींच्या दक्षिण आफ्रिकेतील अखेरच्या टप्प्यावर टॉलस्टॉय यांचा प्रभाव स्पष्टपणे दिसतो. विरोध दर्शवण्यासाठी आपल्या हक्कांचा त्याग करणे ही कल्पना त्यांना या थोर लेखकाच्या चिंतनातून मिळाली. अहिंसा आणि सत्याग्रहाच्या संकल्पना टॉलस्टॉय यांच्या मांडणीतून विकसित झाल्या. ‘किंगडम ऑफ गॉड इज विथिन यू’ या टॉलस्टॉयलिखित पुस्तकात या साऱ्या संकल्पना आल्या होत्या. गांधींवर या संकल्पनांचा खोलवर परिणाम झाला.

आपल्या प्रकल्पाला गांधींनी ‘टॉलस्टॉय फार्म’ असं नाव दिलं होतं. “टॉलस्टॉय फार्म नसतं तर हा लढा आठ वर्षं चालू राहिला नसता, मोठा निधी गोळा करता आला नसता आणि हजारो कार्यकर्त्यांचा सहभागही शक्यझाला नसता. एवढ सारं टॉलस्टॉय फार्ममुळे शक्य झालं,” नऊ सप्टेंबरला लिओ टॉलस्टॉय यांचा २१०वा जन्मदिन आहे. त्या निमित्ताने या महान लेखकानं गांधींना दिलेल्या प्रेरणेची आठवण ठेवायला हवी.

व्ही. एस. नायपॉल यांचं नुकतच निधन झालं. त्यांना साहित्यातील नोबेल पुरस्कार प्राप्त झाला होता. काही समीक्षक त्यांना ‘नेटिव्ह कलोनियल’ म्हणतात. साम्राज्यवादामुळे विस्थापित झालेले भारतीय इथली घाण, दुर्गंधी, जात-धर्म-गरिबी, राजकारण आणि भ्रष्टाचाराच्या जंजाळातून सुटले. त्यांच्या पूर्वजांनी मळ्यांमध्ये अंगतोड मेहनत केली. पुढच्या पिढ्यांना चांगलं शिक्षण दिलं. त्यापैकी काही लेखक परस्थ नजरेने भारताकडे पाहतात आणि आपल्या पूर्वजांच्या भूमीतील भ्रष्टाचार, गरीबी आणि एका मोठ्या लोकसंख्येचा खालावलेला जीवनाचा दर्जा यावर दुर्बीण रोखतात. या अर्थाने तेही वसाहतवादी दृष्टिकोन दर्शवतात.

नापॉयल यांच्या ‘एनिग्मा ऑफ अरायव्हल’ या पुस्तकांत विस्थापन आणि स्थलांतराची कहाणी आहे. त्रिनिदाद येथे त्यांचं मन रमेना. पहिल्या कादंबरीनंतर सर्जनशीलतेला ओहाटी लागली. तिथे राहून कोंडी झाल्याची जाणीव झाली. त्यांनी इंग्लडला स्थलांतर केलं. साम्राज्यामुळे विस्थापन झाल्याचा सल त्यांच्या मनात कायम राहिला.

जीवनात आलेल्या स्त्रियांशी नायपॉल वार्इट वागले. त्यांच्या लेखनातही स्त्रियांबद्दलचा हीन दृष्टिकोन दिसतो. मुस्लिमद्वेषाने त्यांचा पिच्छा सोडला नाही. मात्र साम्राज्यवादाचं फलित आणि अंत समजून घेण्यासाठी नायपॉलांचं साहित्य पुढे वाचलं जार्इल हे निश्चित.

गांधी वसाहतवादाविरोधात लढले. वसाहतवाद मूलत:च अनैतिक असतो असं टॉलस्टॉय यांचं म्हणणं होतं. नॉयपॉल साम्राज्यप्रणित विस्थापनामुळे होरपळले होते.

.............................................................................................................................................

लेखिका अलका गाडगीळ मुंबईस्थित सेंट झेविअर महाविद्यालयाच्या झेविअर इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेशन्समध्ये अध्यापन करतात.

alkagadgil@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’चे अँड्राईड अॅप डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा -

 

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

जर नीत्शे, प्लेटो आणि आइन्स्टाइन यांच्या विचारांत, हेराक्लिट्स आणि पार्मेनीडीज यांच्या विचारांचे धागे सापडत असतील, तर हे दोघे आपल्याला वाटतात तेवढे क्रेझी नक्कीच नाहीत

हे जग कसे सतत बदलते आहे, हे हेराक्लिटस सांगतो आहे आणि या जगात बदल अजिबात होत नसतात, हे पार्मेनिडीज सिद्ध करतो आहे. आपण डोळ्यांवर अवलंबून राहण्यापेक्षा आपल्या बुद्धीवर अवलंबून राहिले पाहिजे, असे पार्मेनिडीजचे म्हणणे. इंद्रिये सत्याची प्रमाण असू शकत नाहीत. बुद्धी हीच सत्याचे प्रमाण असू शकते. यालाच बुद्धिप्रामाण्य म्हणतात. पार्मेनिडीज म्हणजे पराकोटीचा बुद्धिप्रामाण्यवाद! हेराक्लिटस क्रेझी वाटतो, पण.......