आधुनिकता आणि जागतिकता
पडघम - सांस्कृतिक
भालचंद्र नेमाडे
  • पहिले विंदा करंदीकर स्मृती व्याख्यान, २३ ऑगस्ट २०१८
  • Thu , 30 August 2018
  • पडघम सांस्कृतिक भालचंद्र नेमाडे Bhalchandra Nemade विंदा करंदीकर राष्ट्रीय स्मारक Vinda Karandikar National Memorial विंदा करंदीकर Vinda Karandikar

चेतना महाविद्यालयाने स्थापन केलेल्या ‘विंदा करंदीकर राष्ट्रीय स्मारका’चे उद्घाटन डॉ. भालचंद्र नेमाडे यांच्या हस्ते २३ ऑगस्ट २०१८ रोजी झाले. ‘विंदा करंदीकर राष्ट्रीय स्मारका’तर्फे या वर्षीपासून दरवर्षी ‘विंदा करंदीकर स्मृती व्याख्यान’ आयोजित करण्यात येत आहे. राष्ट्रीय पातळीवरील लेखकांना या व्याख्यानासाठी वक्ते म्हणून निमंत्रित करण्यात येईल. ‘पहिले विंदा करंदीकर स्मृती व्याख्यान’ डॉ. भालचंद्र नेमाडे यांनी 'आधुनिकता आणि जागतिकता' या विषयावर २३ ऑगस्ट २०१८ रोजी दिले. त्याचे हे मुद्रित रूप.

.............................................................................................................................................

मित्रहो,

‘विंदा करंदीकर राष्ट्रीय स्मारक’ आज इथं चेतना महाविद्यालयात स्थापन झालं, ही मुंबईच्या आणि मराठी समाजाच्या इतिहासात महत्त्वाची घटना मानली पाहिजे. या राष्ट्रीय स्मारकातर्फे ह्यानंतर दरवर्षी होत जाणाऱ्या विंदा करंदीकर व्याख्यानमालेचा प्रारंभ माझ्या मुखें व्हावा, हा मी माझा बहुमान समजतो. विंदा माझे एम. ए.ला गुरू होते, तेव्हा ह्या निमित्तानं हे व्याख्यान म्हणजे त्यांना फार उशिरा मी देऊ शकलो अशी गुरुदक्षिणा मानून स्वत:ला ऋणमुक्त करू इच्छितो. आमच्या संस्कारक्षम वयात चुकीच्या कलावादी-सौंदर्यवादी विचारप्रणालींनी आयात केलेली आधुनिकता आपल्या प्रदीर्घ परंपरेला बाधक होती, याची जाणीव करून देणाऱ्या ज्येष्ठ लेखकांमध्ये विंदा करंदीकर एक होते - मे. पुं. रेगे, दि. के. बेडेकर, शरद पाटील, म. वा. धोंड, द. ग. गोडसे ही काही नावं आता ह्या संदर्भात आठवतात. आपण ह्या परंपरेतून आलो, ही जाणीव आजच्या विद्रूप आधुनिकतेच्या काळात अत्यंत सुखद वाटते. भाषांतरं, समीक्षा, निबंध आणि कवितेतले त्यांचे नानाविध प्रयोग आजही स्फूर्तिदायक आहेत. ‘इच्छा देई शक्ती । ज्ञान देई डोळे’ ही विंदा करंदीकरांच्या सृजनशीलतेची प्रेरणा मराठी कवितेला उत्तमतेचा आदर्श दाखवीत राहील.

१.

हिंदुस्थानातल्या आणि ‘तिसऱ्या’ जगातल्या सगळ्याच जाणत्या लोकांना आपण एका अजस्र कैचीत सापडलो आहोत, अशी चिंताकुलता जाणवत आलेली दिसते : आपापल्या भौगोलिक-ऐतिहासिक परिसरात उत्क्रान्त होत आलेल्या प्राचीन परंपरांच्या आणि मूल्यांच्या आधारे जगावं की, अर्वाचीन जगात चलती असलेल्या विक्रमी ठरलेल्या पाश्चात्य-भांडवली-शहरी प्रवृत्तींच्या आधुनिकतेला आत्मसात करावं? (God made the country, man made the town.)

ह्या पर्यायांमध्ये थोडंफार साम्य आढळत असलं तरी असंख्य विचारवंतांनी - विवेकानंदांपासून महात्मा गांधींपर्यंत आणि मार्क्सपासून फ्रान्झ फॅनॉनपर्यंत - ह्यांच्यातला मूलभूत विरोध व्यक्त केला आहे. युरोपी आधुनिकतेमुळे माणसाला परात्मता आणून देणारी आणि निसर्गाला केवळ संसाधनाचं क्रयमूल्य देत सर्वनाशाकडे नेणारी अपरिहार्य अशी दुर्दशा उद्भवल्याचं सर्वांना कळून चुकलं आहे. युरोपी आधुनिकतेची अनेक अनैतिक लक्षणंसुद्धा सनदशीर होऊन प्रतिष्ठित झाल्याचं दिसतं. उदाहरणार्थ, भांडवली अर्थव्यवस्था, जिला काहीही नैतिक परिमाणं नाहीत. जे लहानसहान समाज जगभर सर्वत्र आपापली पारंपरिक अर्थव्यवस्था आपापल्या नैसर्गिक परिसराबरोबर सलोख्याने वहिवाटत होते, ते सगळेच हळूहळू युरोपी उपयुक्ततावादी, व्यक्तिवादी समाजरचनेचे अंकित होऊन बसले. अशी शोषणकेंद्री आधुनिकता आज गरजेची नसून शोभेची, अनावश्यक घटकांना आवश्यक करणारी ठरते आहे. जे समाज ‘पंचतंत्रा’तल्या कीलोत्पाटीव वानराप्रमाणे ह्या जबरदस्त युरोपी आयाती-निर्यातीच्या, सगळ्यांना परावलंबी गिऱ्हाइकी दर्जा देण्याच्या राक्षसी फळ्यांमध्ये आपली शेपटी अडकवून बसले आहेत, त्यांना आपली पाळंमुळंही गमवावी लागत आहेत. आपापल्या परंपरेत स्वत:ची आधुनिकता अनुद्भूतपणे असतेच, फार काय त्या त्या समाजाची संस्कृती अनन्य असते, त्यामुळेच त्यांची आधुनिकता वेगवेगळी असली पाहिजे, ह्याचंही भान जागतिकीकरणातल्या बहुराष्ट्रीयतेच्या शिरजोरीमुळे नाहीसं होत चाललेलं दिसतं.

आधुनिकता म्हणजे परंपरेला जोडलेलं ठिगळ नसून ती परंपरेच्या गर्भातून येणारी जिवंत व्यवस्था असते, हे विशेषत: आपल्यासारख्या गुलामीत अनेक पिढ्या घालवलेल्या प्राचीन देशांना आधी उमगलं पाहिजे. परंपरा आणि आधुनिकता यांच्यात वाटतं तसं वैर नसतं, उलट बळकट असं सेंद्रिय नातं असतं. खुद्द परंपरेत परस्परविरोधी प्रवृत्ती एकसमयावच्छेदेकरून नांदत असतात आणि त्यामुळेच बाहेरील विविध प्रकारच्या दुष्ट प्रवृत्तींशी प्रसंगोचित सामना द्यायला ती सक्षम असते, हेही लक्षात घेतलं पाहिजे. नाहीतर ती परंपरा पूर्वीच संपुष्टात आली असती, आजपर्यंत जिवंत राहिलीच नसती. खरं तर अशा पुनरुज्जीवनाच्या प्रक्रियेमुळेच आपल्या जुनाट कुचकामी रूढींची लोढणी टाकून देऊन परंपरा पुन्हा नव्यानं बहरू लागतात. वेदांपासून तसव्वूफपर्यंत अनेक बुलंद पद्धती आत्मसात करणारी आपली हिंदुस्थानी परंपरा याचं उत्कृष्ट उदाहरण आहे.

हिंदुस्थानी समाजाचं आधुनिकीकरण हे वसाहतीकरण आणि पाश्चात्यीकरण यांचं मिश्रण आहे. एकोणिसाव्या वसाहती शतकातल्या आपल्या दादाभाई नवरोजी, भाऊ दाजी लाड, राजा राममोहन राय, लोकहितवादी, दादोबा पांडुरंग तर्खडकर अशा समाजातल्या सर्व स्तरांतल्या विचारवंत नेत्यांनी वेगानं बदल घडवून आणायचा ध्यास घेतल्यानं अशी वसाहतधर्मी आधुनिकता घडत गेली. इंग्लंडमधल्या औद्योगिक क्रांतीसाठी गरजेचं ठरलेलं कच्च्या मालाचं लागवड क्षेत्र म्हणून हिंदुस्थानचं झपाट्यानं शोषण होत गेलं. अर्थात ओघाओघानं असंख्य किरकोळ सुधारणाही ह्या देशात होत गेल्या. उदाहरणार्थ, कच्च्या मालाच्या बंदरांपर्यंतच्या वाहतुकीसाठी जलद रेल्वे, इथल्या अस्तित्वातल्या प्रादेशिक स्वायत्त सौंदर्यव्यवस्था नष्ट करण्यासाठी इंग्रजी भाषा आणि इंग्रजी कायदे, आणि इंग्रजी मूल्यं यांचं अविनाशी साम्राज्य टिकवण्यासाठी इथल्या उतावळ्या लोकांचं देशी साहेबांमध्ये रूपांतर करणारी शिक्षणव्यवस्था - अशा योजनांनी ह्या भूमीत कायमची मुळं धरली, ती अजून आपल्याला उपटून फेकून देता येत नाहीत. इंग्रजी भाषेचा न्यायव्यवस्थेतला वापर हे एक नमुन्यादाखल उदाहरण उत्तम होईल. हिंदुस्थान-केंद्रित अर्थव्यवस्था उच्छेदून इंग्लंडकेंद्रित अर्थव्यवस्था आणण्यात ते वसाहतखोर इतके धुंद होते की, त्यांनी अस्सल भारतीय सत्त्व असलेली आधुनिकता अप्रस्तुत ठरवून टाकली. त्यांची धोरणं राबवणाऱ्या इंग्रजी-शिक्षित मराठी-बंगाली उच्चवर्णीयांना पाहिजे ते मिळत गेलं, पण खालच्या जातींचं अतोनात शोषण होत राहिलं. ७५ लाखांवर लोकसंख्या असलेल्या भिल्ल-संथाळ आदि इंग्रजविरोधी लोकांना साधी शासकीयभूमीसुद्धा शेवटपर्यंत मिळू दिली नाही. आजही असे मोठमोठे लाखांचे समूह उपरेच जगत आहेत.

आता आपल्या असहाय हिंदुस्थानी लोकांच्या ह्या अघोरी लूटमारीचं आणि जगात सर्वाधिक काळ चाललेल्या अमानुष शोषणाचं समर्थन कोणत्या आधुनिकतेच्या नैतिकतेवर करायचं? तुलनेनं कमी सुसंस्कृत पण केवळ लष्करीदृष्ट्या वरचढ युरोपी लोकांची सहकारी आधुनिकता एका प्राचीन संस्कृतीचा पद्धतशीर उच्छेद करू शकते, ह्याचं मूल्यमापन कोणत्या विवेकी तत्त्वप्रणालीवर करावं? आता अशा भाबड्यापश्चात् बुद्धीला मानवी इतिहासात काहीही उत्तरं नसतात. एवढं मात्र खरं की, असं सहकारी आधुनिक होण्यासाठी आपल्याला मोजावी लागलेली सर्वांत मोठी किंमत म्हणजे आपल्याच परंपरांबद्दलचं आपलं अज्ञान, ज्यामुळे वाङ्मयासकट अनेक क्षेत्रांमध्ये आपल्या बहुसांस्कृतिक समृद्ध वारशाची आपली जाण खंडित वा कुंठित होऊन बसली.

.............................................................................................................................................

‘मुस्लीम राजकीय विचारवंत आणि राष्ट्रवाद’ या प्रा. फक्रुद्दीन बेन्नूर यांच्या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

२.

युरोपी पद्धतीची आधुनिकता ही जागतिक पातळीवर एक मूल्यमापनाची कसोटी म्हणून आजपर्यंत वापरली जात असल्यामुळे अशा छद्म वैश्विकतेला आपला आक्षेप आहे. ‘वसुधैव कुटुम्बकम्’ हे भाषित ‘पंचतंत्रा’तला लबाड कोल्हा आपापल्या भूमीवर चरत सुखानं जगणाऱ्या एका निष्पाप हरणाला फसवण्याकरता वापरतो. आधुनिकतेतून जागतिकीकरण प्रस्थापित किंवा प्रतिष्ठित करू पाहणाऱ्या युरोपी वर्चस्ववादाचा हा एका सापळा आहे. दुर्दैवानं आपले नेतेही नेमक्या चुकीच्या अर्थानं ह्या भाषिताचा उपयोग करत असतात, तेव्हाही युरोपी कावेबाज नीती यशस्वी झाल्याचं दिसतं. कोणत्याही स्वायत्त लोकसमूहाच्या मूल्यांचं, वृत्तींचं, श्रद्धांचं, समाजव्यवस्थांचं किंवा त्यासमूहाच्या एकूण संस्कृतीचं मूल्यमापन करताना वापरले जाणारे आधुनिकतेचे मानदंड त्यासमूहाच्या स्वत:च्या भौगोलिक-ऐतिहासिक परिस्थितीतून उत्क्रांत होत आले असले पाहिजेत, हे शास्त्रीय सत्यतरी ही युरोपकेंद्री जागतिक आधुनिकता मान्य करील काय?

आपल्या देशातल्या समृद्ध अशा ज्या कलांनी ह्या परक्या आधुनिकतेचा स्पर्श होऊ दिला नाही, त्या पारंपरिक हिंदुस्थानी संगीत आणि नृत्यकला, आणि अनेक लोककला ह्यांच्या दर्जाबद्दल कोणते मानदंड वापरल्यास त्यांना न्याय मिळेल? ब्रेख्तचा खुला रंगमंच, पीटर ब्रूकचं महाभारताच्या देशभरातल्या नाट्यशैलींचं निरीक्षण, लुई मॉलचं ह्या देशातल्या अव्यवस्थेचं चित्रीकरण – ह्या सगळ्या आपल्या आधुनिकतेवरच्या साक्षेपी प्रतिक्रिया आहेत. आपल्या सुशिक्षित उच्चभ्रू आधुनिक म्हणवणाऱ्या समाजात जुनाट आणि हीन अभिरूचीच्या ठरलेल्या ह्या कला प्रतिभावंत युरोपियनांना अग्रगण्य कशामुळे वाटल्या?

दूरदृष्टी असलेल्या काही हिंदुस्थानी प्रतिभावंतांनी भूतकाळातल्या अस्सल परंपरांशी आतूनच नातं प्रस्थापित केलं. अशा आपल्या देशातल्या अलौकिक सर्जनशीलता दाखवून देणाऱ्या वेगवेगळ्या कलाक्षेत्रांमधल्या श्रेष्ठ कलावंतांची अल्पशी यादी करून बघू या :

रुक्मिणी अरूंडेल, बालसरस्वती, केलूचरण महापात्र, सत्रनाट्यसितारा देवी, सत्यजित राय, शिवराम कारंथ, हबीब तनवीर, बालमुकुंद गुरू, जीव्या सोमा मशे (सामूहिक जाणिवा, परंपरेतल्या नेणिवा, द्विमितीची सृष्टी), यमुनाबाई वाईकर, तय्यब मेहता - हे आपण स्वत: अनुभवलेले सगळे प्रतिभावंत आपल्या कलांना सर्वोच्च मानांकनावर नेऊन ठेवणारे आधुनिक कलाकार नव्हते काय? ह्यासाठी आंतरराष्ट्रीय सर्टफिकिटांची गरज भासते काय? जागतिक पातळीवर यांची नावंसुद्धा माहीत नसली तर ह्या त्यांच्यातल्या न्यूनतेची कारणमीमांसा जागतिकीकरणाच्या रक्षणकर्त्यांनी करायला हवी, आपण ती जागतिकीकरणाच्या संदर्भात करत आहोत.

आपल्याच परंपरांमधल्या भिन्नभिन्न आणि परस्परविरोधी आशयद्रव्यांमध्ये आपल्या गरजांनुसार आधुनिक ठरतील अशी सर्जनशीलतेची केंद्रं शोधता येतील, याचा पुरावा म्हणून वर उल्लेखलेले कलाकार महत्त्वाचे ठरतील. ह्यासाठी आपल्याला स्मृतिरूपानं जिवंत असलेला मौखिक परंपरेतला इतिहास अनिवार्य आहे. लिखित इतिहासही पूर्वग्रहदूषित आणि विशिष्ट विचारप्रणालींनी भारलेले असतात आणि त्यांच्यातली ऐतिहासिकता संशयास्पद असते, याची उदाहरणं अनेक सांगता येतील. खरा मुद्दा हा आहे की, आपल्या सर्जनप्रक्रियेतील पारंपरिक द्रव्यांना आधुनिक शैलीमध्ये पुनर्रचित करण्याचं आव्हान कोणत्या मूल्यांच्या आधारे करावं? सर्जनात द्रव्यांना काही महत्त्व द्यावं की नाही? ही मूल्यंसुद्धा पारंपरिक चालतील की आपल्या आधुनिकतेला पोषक अशी नव्यानं निर्माण करावी लागतील की, ती परक्या संस्कृतीमधली आयात केलेली चालतील? मानवी संस्कृतीचा इतिहास काय दर्शवतो?

वेगवेगळे लोकसमूह आपापल्या स्थळकाळविशिष्ट गरजांनुसार पारंपरिक जीवनशैलीनुरूप आवश्यक असलेली मूल्यं, द्रव्यं आणि कलाप्रकारसुद्धा आत्मसात करत आले आहेत. हिंदुस्थानातून जगात सर्वत्र पसरलेली अहिंसा (रॉलिनसन), रोमँटिसिझम (वॉल्टर लेफर) आणि पशुकथा (इटालिओ काल्विनो) ही तीन उदाहरणं लक्षात घेऊन आपण पुढे जाऊ. अशा देवाणघेवाणीत पर्यावरण आणि निवड हे दोन्ही घटक सक्रिय असतात. कोणतीही संस्कृती अशाच आंतरिक आणि बाहेरील सक्तींनी उत्क्रांत होत जाते. सारांश, आधुनिकता ही स्वायत्त तत्त्वांनुसार लोकांच्या तात्त्विक आणि व्यावहारिक दोन्ही पातळ्यांवर व्यक्त होणारी मूल्यव्यवस्था आहे, हे जर आपल्याला मान्य असले तर आज देशभर नाना जमातींमध्ये अस्तित्वात असलेल्या आपल्या सांस्कृतिक मूल्यांचं, द्रव्यांचं, शैलींचं कठोर परीक्षण करून, पुनर्रचन करून प्रबळ आत्मविश्वासानं ती प्रत्यक्षात वापरात आणण्याची प्रक्रिया सर्व स्तरांवर सुरू झाली पाहिजे. तरच भारतीय पद्धतीची आधुनिकता रूढ होईल. आपल्या लुप्त किंवा नष्ट भूगोलात, इतिहासात आणि अजूनही टिकून राहिलेल्या परिघावरच्या अनेक जातीजमातींमध्ये, आदिवासी परंपरांमध्ये आचरणात असलेल्या नानाविध कृतिकर्मांमध्ये आपली सर्वसमावेशक आधुनिकता शोधण्याची तातडीची गरज आहे. ह्यासाठी परराष्ट्रीय जागतिक-आंतरराष्ट्रीय किंवा विश्वबंधुत्वात्मक छद्म-वैश्विक आयामांची गरज नाही. याचा अर्थ आपल्याला आता मागे पाहण्याची आवश्यकता आहे. हे अर्थात प्रवाहाच्याविरुद्ध पोहणं होईल. परंतु केवळ निर्जीव वस्तूच प्रवाहाच्या दिशेनं जात असतात, हेही एक दिलासा देणारं निरीक्षण समोर ठेवावं.

३.

आता नवं ज्ञान भूतकाळात असतं, हा काहींना विरोधाभास वाटेल - विशेषत: - जुने जाऊ द्या मरणालागुनि- जाळुनि किंवा पुरुनी टाका - असे आदेश देणारे आधुनिकतेचे उद्गाते ज्या समाजात मार्गदर्शक ठरले, अशा आपल्या समाजात. पण मग स्मारकं आणि वस्तुसंग्रहालयं आणि ग्रंथालयं, पुरातत्त्वविद्या किंवा इतिहाससंग्रह, फार काय, शास्त्रीयसंचयनं आणि विश्वाचा उगम हे धांडोळे नेमके आधुनिकतेच्याच युगात कशासाठी वाढले? ऑक्टेविया पाझनं तर कबूलच केलं आहे की, “आधुनिकतेचा शोध घेता घेता माझ्या असं लक्षात आलं की, मी पुढे न जाता मागे मागे चाललो आहे.” कदाचित भूतकाळात शिरणं हे भविष्यसूचक असतं हा धडा आपण विज्ञानापासूनही शिकू शकतो. बिग बँग आणि अणू-परमाणू किंवा जनुकांच्या संशोधनात शिरणारं संशोधन नव्या जगाची उभारणी करतंच आहे. २५०० वर्षांपूर्वीचा बौद्ध धर्म आज जगातल्या सगळ्या पंथा-धर्मांपेक्षा आधुनिक वाटतो, हे जगात सगळे विचारवंत मानतात. युरोपी आधुनिकतेनं मोडीत काढलेल्या आणि वर्चस्ववादी जागतिकीकरणानं लुप्त होण्याच्या मार्गावर असलेल्या असंख्य भाषा, प्रादेशिक शैलीप्रकार, देशी सौंदर्यमूल्यं, निरर्थक वाटणाऱ्या चालीरीतीरूढीप्रथा – एवढ्या आपल्या समृद्धद्रव्यांचा - सृजनशील वापर कसा करावा, ही नव्या पिढीच्या बुद्धिमत्तेची कसोटी ठरावी. आधुनिकतेच्या आणि जागितकतेच्या संकल्पनांमध्ये ह्या सर्व गोष्टी अनावश्यक लोढण्यासारख्या प्रगतीविरोधी मानल्या जातात. त्यांचा विनोद आणि मनोरंजन म्हणून भारतीय इंग्रजी प्रकारचे लेखक मोठ्या प्रमाणावर वापर करत आले. ‘अ सूटेबल बॉय’ (विक्रम सेठ) हे त्याचं ठळक उदाहरण आहे. ‘मुलगी पाहाणं’ ह्या वधूपरीक्षेच्या आपल्या जुन्यारिवाजाचा इंग्रजीच्या आधुनिकतावादी प्रदेशांत थट्टा-विनोद होणं फारसं आक्षेपार्ह नाही, परंतु इंग्रजीत गाजू पाहणाऱ्या आपल्या लेखकांची संस्कृती आधुनिकीकरणाच्या अजून किती शतकं मागे आहे, हे चिंताजनक आहे. एका चर्चासत्रात वरील इंडियन वधूपरीक्षेबद्दल मस्करी चालली असताना एका प्रश्नानंतर सगळे निरुत्तर झाले, तो प्रश्न पाहा : “वयात येण्याच्या आधीपासून डेटिंग वगैरे करत सगळं काही नीट असल्याची खात्री पटल्यावरसुद्धा पन्नास टक्क्यांच्यावर घटस्फोट होतात, हे विनोदी आहे की असं वडीलधाऱ्यांसमक्ष पहिल्यांदाच भेटून जुळलेले नवरा-बायकोचे संबंध आजन्म टिकतात हे? शेवटी कुटुंबसंस्था नीट चालावी म्हणूनच लग्न करतात की ती मोडण्यासाठी?”

जागतिकीकरणात साम्राज्यवादी विचारसरणी बळकट करणाऱ्यांमध्ये आंतरराष्ट्रीय पुरस्कार - नोबेल, बुकर इ. - वंशवादी प्रकल्प शिताफीनं आणि सावचोराच्या शैलीत कार्यरत असतात. ह्या क्षेत्रातही इंग्रजी शिकून इंग्रजीत साहित्यनिर्मिती करणाऱ्या म्हणजे मातृभाषा वर्ज्य मानणाऱ्या हिंदुस्थानी लेखकांची संख्या सर्वांत जास्त आहे. त्या खालोखाल आफ्रिकेतल्या लेखकांची - अचीबे, सोयिंका, एन् गुगी. जागतिकीकरणाचा हा वासाहतिक प्रभाव म्हटला जातो. ही प्रवृत्ती वाढत जाऊन नकारात्मक समाजदर्शनासाठी लोकप्रिय झाली आणि व्ही. एस. नायपॉल, सालमन रश्दी यांच्यासारखे अनेक हिंदुस्थानी वंशाचे लोक आपल्या आताच्या धन्याला खूश करण्यासाठी ‘आपल्याच पूर्वजांच्या भूमीवर थुंकणारी’ (ही नायपॉलवर वेस्ट इंडीजमधल्याच एका मोठ्या कवीच्या उपहासात्मक कवितेतली ओळ) स्थलांतरित लेखकांची आधुनिक जमात उदयास आली. ह्यांच्या वर्तमानपत्री लेखनालाही हिंदुस्थानी आशयद्रव्यामुळे साहित्याचा दर्जा मिळाला. मूळ भारतीय म्हणवणाऱ्या ह्या लेखकाला भारतीय समाज आज कसा आहे, हे समजून घ्यायलाच तीनदा ह्या पूर्वजांच्या भूमीत येऊन तीन पुस्तकं लिहावी लागली : १९६४ मध्ये पहिलं खूप गाजलेलं ‘एरिया ऑफ डार्कनेस’ हे प्रवासवर्णन : इंडियन लोक कुठेही हागत असतात, ऑफिसात उशिरा येतात, नाक कोरत प्लॅटफॉर्मवर उभे राहतात, यांचं भविष्य अंधारमय आहे. पुढे दुसरी फेरी १९७७ मध्ये (‘इंडिया अ वूंडेड सिव्हिलायझेशन’) - ही थोर विजयनगरसारखी संस्कृती दुष्ट मुसलमानी राज्यकर्त्यांनी जखमी केली - आपण आता राहतो त्या इंग्रज राज्यकर्त्यांचा उल्लेखही ह्या संदर्भात न करणे. नंतर १० वर्षांनी पुन्हा तिसरी फेरी – जेव्हा हा देश ‘अ मिलियन म्यूटिनीज’ असतो. ह्या दर दहा-पंधरा वर्षांनी भूमिका बदलणाऱ्या वर्तमानपत्री लेखकाची इ. एम. फॉर्स्टर ह्या इंग्रज असलेल्या अस्सल लेखकाच्या एकाच भेटीशी (अ पॅसेज टु इंडिया, १९२४) तुलना केल्यास हे लक्षात येईल की, खरा लेखक आपल्या अनुभूतींशी प्रामाणिक असतो आणि तो स्वत:च्याही (इंग्रजी) साम्राज्यवाद्यांची गुन्हेगारी झाकून ठेवत नाही. खऱ्या लेखकाला कोणाला खूश करायचं नसतं. आधुनिकीकरणाची ही देशी बाजू असते. अशा फॉर्स्टरसारख्या लेखकांमुळेच साहित्याची जाज्वल्य परंपरा टिकून आहे, नायपॉलसारख्यांमुळे नाही.

मेकॉलेच्या कुप्रसिद्ध खलित्यानंतर इंग्रजीचं स्तोम वाढलं आणि धूर्त आंग्लभाषापटाईत हिंदू लोक वरचढ ठरल्यामुळे आपल्या समृद्ध देशी भाषा दुय्यम कशा समजल्या जायला लागल्या, यावर जी. आर. पॉटरनं केलेलं हे भाष्य पाहा :

“हिंदुस्थानी लोकांचे उच्चशिक्षण पारंपरिक होणे थांबले, ते पौर्वात्य असणेही थांबले आणि शिक्षणाचे केवळ इंग्रजीकरण करण्यात आले – युरोपीकरणसुद्धा नव्हे. हा प्रचंड आयात करण्याचा हिंदूंचे कधीही भरून न येणारे नुकसान करणारा निर्णय ठरला. इंग्रजीत छापलेल्या पाठ्यपुस्तकांची यांत्रिक निरर्थक घोकंपट्टी करणे, हाच यशाचा मार्ग ठरला (१९५९).”

इंग्रजीच्या प्रभावाखाली हे नुकसान स्वातंत्र्यानंतर आणखी वाढत चाललं आहे.

४.

खरं तर कोणत्याही अंगभूत गुणवत्ता असलेल्या वाङ्मयनिर्मितीवर जसा निर्मात्याचा स्वामित्वहक्कअसतो, तसा रसिकांचा-वाचकांचाही वाचण्याचा हक्क असतो. कारण कलाकृती - कविता, गोष्टी, महाकाव्य- ह्या जगात कुठेही आपल्याच वाटणाऱ्या असतात. पूर्वीही आपलं पंचतंत्र, जातककथा, रामायण, महाभारत, परीकथा, नाटकं वगैरे आपापल्या निर्मितीस्थळांच्या हजारो योजनं दूर देशोदेशी सहजत: सौंदर्यशास्त्रीय गरज म्हणून पोहोचत होती. परंतु त्यामागे आजच्या वर्चस्ववादी, भांडवली जागतिकीकरणाचं दांभिक मानवतावादी तर्कशास्त्र नसे. चॉसर, शेक्सपिअर, ग्यते, मॉन्टेन, अशा अनेकांनी हिंदुस्थानातून कधीतरी युरोपात अरब, सिंधी वगैरे प्रवाशांनी नेलेल्या गोष्टी भाषांतरित होत युरोपभर पसरल्या, त्या सर्वांनी आपल्याच समजून स्वत:च्या पुस्तकांमध्ये वापरल्या. यातही घेणाऱ्यांचा मोठेपणाच दिसतो, कारण ह्या देवाणघेवाणीत एका ‘राष्ट्रा’नं दुसऱ्या ‘राष्ट्रा’वर आपलं म्हणून काही लादल्याचं आजचं आंतरराष्ट्रीयत्व नव्हतं. अगदी अलीकडे ‘लिव्हिंग नेटवर्क्स : रिव्ह्यू ऑफ मार्व्हलस थीव्ज’ ह्या पावलो होर्टाच्या पुस्तकात अरबी भाषेतल्या गोष्टीकशा कलकत्ता, बगदाद, कैरो इ. ठिकाणाहून हॉटेलांमधून, बाजारातून, अनेक कथनकारांच्या मुखातून युरोपात गेल्या याची उदाहरणं आहेत. इंग्रजी कादंबरीची सुरुवात समजली जाणारी रॉबिन्सन क्रूसो (१७१९-२०) ही मूळ गोष्ट इसवी सनाच्या तेराव्या शतकात कुब्ला खानकडे राहिलेल्या मार्को पोलो ह्या व्हेनिसच्या सुप्रसिद्ध प्रवाशानं चीनमध्ये ऐकली. एक बाई एकटी एका निर्जन बेटावर कशी वर्षानुवर्षं राहिली, तिची ही मूळ गोष्ट. मार्को पोलोनं जिनोआच्या तुरुंगात कैदी म्हणून राहिला असताना रस्टिशिआनो नावाच्या सहकैद्याला ती सांगितली, ती रस्टिशिआनोनं नंतर छापली. त्याची एक जुनी प्रत माद्रिदला डॅनिअल डीफोला पुस्तकांच्या दुकानात मिळाली आणि या कशाचाही उल्लेख न करता डीफोनं ती जणू आपण स्वत: ऐकलेली हकिकत आहे, असं भासवत ‘The Life and Strange Surprising Adventures of Robinson Crusoe of York, Mariner’ ह्या नावानं मूळ न सांगता छापली आणि त्याला आधुनिक कादंबरीचं जनकत्व प्राप्त झालं. मॅक्सम्यूलरनं ‘मायग्रेशन ऑफ फेबल्स’मध्ये अशी हिंदुस्थानातून युरोपभर पसरलेल्या, आत्मसात केलेल्या परीकथांची सविस्तर चर्चा केलेली आढळते. ही सगळी उदाहरणं आपापल्या अंगभूत गुणांच्या बळावर साहित्यकृतीचं वैश्विक स्थान सिद्ध करणारी आहेत.

सौंदर्यकल्पना आणि रूपं यांच्या अशा स्वाभाविक स्वागत स्वीकृतीचा आदर्श मानवी समूहाच्या कट्टर राष्ट्रीयीकरणामुळे आता नष्ट झाला असून तिसऱ्या जगातल्या शाळा-कॉलेजांतल्या लक्षावधी कोवळ्या मुलामुलींना पहिल्या जगातले अक्षरग्रंथ केवळ सर्वश्रेष्ठ मानून घोकावे लागतात. तिसऱ्या जगातले कोणतेही क्लासिक्स ऐकायलाही मिळत नाहीत. जुन्या पिढीत तर तिसऱ्या जगात जिवंत साहित्य नावाची काही चीज आहे, याचीही जाण नव्हती. ह्या उलट वर्डसवर्थ, टेनिसन, ब्राउनिंग, मिल्टन, एलियट, पाउंड, लॉरेन्स अशी डझनावारी दुय्यम दर्जाच्या लेखकांची नावं वसाहती साम्राज्यवादानंतरच्या जागतिकीकरणामुळे चुकीचे आदर्श बनवत राहिली. प्रिंट कॅपिटॅलिझमच्या राष्ट्रीय लक्षणामुळे कितीतरी मिलियन प्रती जगातल्या ग्राहक वाचकांवर कोसळत राहतात. त्यामुळे एखादा कोणी इंग्रज लेखक असला किंवा होऊन बसला तर तो आपसूकच जागतिक दर्जाच्या साहित्याचा भागभांडवलदार होऊन बसतो. एकोणिसाव्या शतकातल्या इंग्रजी शिकल्यामुळे आधुनिक होत चाललेल्या मुंबईच्या काही नागरिकांनी तेव्हाच्या एका ब्रिटिश शिक्षणाधिकाऱ्याला पत्र लिहिलं होतं की, “युरोपियन विद्यापीठांमध्ये ग्रीक आणि लॅटिन ह्या अभिजात भाषा जशा रुजल्या आणि पसरल्या तशी इंग्रजी हिंदुस्थानात वाढली आहे.” इंग्रजीपेक्षा कित्येक शकतं अभिवृद्ध असलेल्या आपल्या पाच-सहा भाषा - मराठी धरून - अभिजाततेचा आज दावा करत आहेत. संस्कृत आणि मागधी वगैरे समृद्ध प्राकृत भाषांना तर कोणी वालीच राहिला नाही. अशा देशात इंग्रजी ही अभिजात कशी असू शकते?

आजवर आपल्या दृष्टिक्षेपात पश्चिम जिथे संपते तिथे आपली पूर्व सुरू होत होती, पूर्व संपते तिथे पश्चिम सुरू व्हायला हवी. आणि ह्या प्रकारामुळे राष्ट्रवाद, जागतिकीकरण, वैश्विक आधुनिकता, केंद्रीकरण, प्रतिष्ठित-उच्चभ्रू विरुद्ध नीच-शूद्र, जुनाट पारंपरिक विरुद्ध नवीन परकी, गतानुगतिक विरुद्ध सुधारणावादी, एकविधता विरुद्ध बहुविधता - अशा नाना द्वद्वांच्या कोंडीत आपल्या जाणिवा सापडलेल्या दिसतात. ह्यानंतर आपल्या दृष्टिक्षेपात पूर्व कुठे संपते हे एकदा नीट आलं की, पश्चिम आपोआपच तिथून पुढे सुरू होईल. हासुद्धा संस्काराचाच एक परिणाम असतो. सुदैवानं आपल्या मूळ सेंद्रिय समाजव्यवस्था आणि विशेषत: मातृभाषा अजून सक्षम असल्यामुळे त्यांची निर्मितीशीलता जिवंत आहे. वनस्पती लाखो वर्षं बाहेरच्या संहारक जंतूंशी सामना करणाऱ्या प्रतिकारक द्रव्यांची निर्मिती आतूनच जैविक प्रक्रियेनं करून निरोगी राहू शकतात, बाहेरच्या संहारक द्रव्यांची त्यांना गरज नसते. ही संरक्षण व्यवस्था उत्क्रांतीनंच घडत आली आहे. तशीच आपल्या परंपरांच्या संरक्षणासाठीची देशी रणनीती आपल्याला ह्या कोंडीतून बाहेर पडण्याचे मार्ग सुचवील.

वेरिएर एल्विननं आदिवासींच्या कल्याणाचा मार्ग त्यांच्याच निसर्गाशी असलेल्या सेंद्रिय अनुबंधांत आहे, हे आग्रहानं सुचवलं होतं : त्यांना विस्थापित करून त्यांच्यावर नवा परिसर किंवा नवी जीवनपद्धती लादल्यानं सर्वनाश अटळ आहे - हे आज आपण अनुभवतोच आहोत. एकदाचे तुम्ही तुमच्या परिसराबाहेरच्या काल्पनिक राष्ट्र वगैरे संकल्पना तुमच्या जाणिवेत खऱ्या समजून वागायला लागला की आपोआपच आंतरराष्ट्रीयतेच्या बनावट संकल्पनेत शिरता, कारण राष्ट्रीयता हीसुद्धा युरोपी लोकांनी अलीकडे घडवलेली गुरुदेव टागोरांच्या व्याख्येत ‘अमानुष’ अशी काल्पनिक संकल्पना असून ती इतर राष्ट्रांच्या अशाच काल्पनिक अस्तित्वावर राजकारणात नांदत असते आणि त्यालाच छुप्या वैश्विक मानवतावादात जागतिकतेचं खोटं अस्तित्व प्राप्त होतं.

विश्वसाहित्याची एक संकल्पना तौलनिक साहित्यात एकोणिसाव्या शतकात प्रस्थापित झाली. खरं तर साहित्यात कुठेही वैश्विक अशी व्यवस्था नसते. हे एक साहित्यकृतीचं साधारणीकरण असतं. अशाच साधारणीकरणांचा, अनेक क्षेत्रांत वैश्विक किंवा आंतरराष्ट्रीय कल्पितांचा दबदबा निर्माण झाला आहे. ही जागतिकता विशिष्ट शिरजोर समूहांनी आपल्या स्वार्थासाठी राष्ट्र (उदा. एकजिनसी केंद्रीकरण), शास्त्रीय दृष्टिकोन (उदा. अर्थशास्त्र), लोकशाही (उदा. बहुसंख्याकता) किंवा प्रगती (उदा. शहरी शोषण व्यवस्था) अशा फसव्या संकल्पनांनी जगभर प्रस्थापित केली आहे. ह्या संकल्पनांमुळे नियमांचे अपवाद विचारात न घेणे, बहुविधतेला नष्ट करणे, मागासलेपणाशी जोडणे आणि एकसूत्री, एकतंत्री समाजव्यवस्था लागू करणे, केंद्रीकरण, प्रमाणीकरण, श्रेष्ठतेची भांडवली वर्गव्यवस्था - अशी स्वाभाविक सूक्ष्मभेदांना नष्ट करणारी कृत्रिम पोकळ जीवनशैली जागतिकतेला आधारभूत म्हणून प्रस्थापित होते आहे. आता सांस्कृतिक समृद्धतेच्या अभावी येणारी पोकळ जीवनपद्धती नागरिकांचे केवळ गिऱ्हाइकांमध्ये रूपांतर करून त्यांना बाजारपेठेशी पूर्णत: मग्न ठेवून परात्म करून टाकते. ठरावीक भांडवलशाही प्रकल्पांच्या सोयीसाठी ही जागतिकता अत्यंत प्रभावी साधन झालं आहे.

राजकीय-वांशिक-सांस्कृतिक-आर्थिक अशा लहानसहान लोकसमूहांची स्वायत्तता फार कायत्यांचं अस्तित्वसुद्धा ह्या जागतिकीकरणात खिजगणतीचं नाही. साहित्याची एकूण व्यवस्थाही अशा अल्पसंख्याकांतच मोडते. व्यापारी वृत्तीची सार्वभौमता असलेल्या औद्योगिक समाजात नेहमीच निर्यातीला अग्रक्रम असतो, आयात (भाषांसकट, मूल्यांसकट) आरक्षित असते. उदाहरणार्थ, स्त्रीवाद ही विचारसरणीसुद्धा अशीच निर्यातीवर चालेल. आसामातल्या करवी किंवा मिसिंग स्त्रियांची किंवा एकूण भारतीय स्त्रियांची काही भूमिका असते की नाही? महाभारत, थेरीगाथा, मृच्छकटिक, श्यामची आई किंवा बहिणाबाई (एवढी चतुर सुगरण, पण तिले जन्माचा सांगाती / भिये गन्या गंप्या नर) या साहित्यकृतींमध्ये जागतिक पातळीवर टिकू शकेल असा काही स्त्रीवाद असू शकेल की नाही? या भारतीय स्त्रीवादातल्या मूल्यांची निर्यात आजच्या प्रिंट कॅपिटॅलिझमच्या जागतिकतेत कधीतरी शक्य होईल काय?

मित्रहो, जगाकडे वेगळ्या दृष्टीनं पाहणं म्हणजेच आपल्यापुरतं तरी जग बदलणंच असतं. आज आधुनिकीकरणाच्या आधारावर पाय पसरणाऱ्या बकाल जागतिकीकरणामुळे प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे अंगभूत होऊ पाहणाऱ्या परात्मतेचा अनुभव सगळ्या समाजव्यवस्थांमध्ये पाहता येतो : विषमता, आत्महत्या, हिंसाचार, अत्याचार, बलात्कार, दहशत, प्रदूषण, अपघात इत्यादी. मानवी इतिहासात आणि आपल्या देशात तरी कधीही झालं नसेल एवढ्या अजस्र प्रमाणावर माणसाचं अवमूल्यन झाल्याचं आपण अनुभवतो आहोत. सुदैवानं आपल्यातच अनेक विधायक अशा परंपरा अनेक जातीजमातींमध्ये जिवंत असून ज्या निर्मितीक्षम आहेत, त्यांच्यातून आपली स्वत:ची अशी देशी आधुनिकता शोधावी लागेल. ती आपल्यावर बाहेरून लादलेल्या आजच्या अमानुष जागतिकीकरणावर प्रतिबंधक इलाज म्हणून किमानपक्षी आवश्यक आहे. आजच्या जागतिकीकरणाचं जगड्व्याळ स्वरूप पाहता, आपले उपाय पुरेसे नसले, तरी आवश्यक आहेत.

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

भाजपच्या ७६ पानी ‘जाहीरनाम्या’त पंतप्रधान नरेंद्र मोदींची तब्बल ५३ छायाचित्रं आहेत. त्यामुळे हा जाहीरनामा आहे की, मोदींचा ‘छायाचित्र अल्बम’ आहे, असा प्रश्न पडतो

काँग्रेसच्या ४८ पानी जाहीरनाम्यात राहुल गांधींची फक्त पाच छायाचित्रं आहेत. त्यातली तीन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत आहेत. याउलट भाजपच्या जाहीरनाम्याच्या मुखपृष्ठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीमागे बळंच हसताहेत अशा स्वरूपाचं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचं छायाचित्र आहे. त्यातली ‘बिटवीन द लाईन’ खूप सूचक आणि स्पष्टता सूचित करणारी आहे.......

जर्मनीत २० हजार हत्तींचा कळप सोडण्याची धमकी एका देशाने दिली आहे, ही ‘हेडलाईन’ जगभरच्या प्रसारमाध्यमांमध्ये गाजतेय सध्या…

अफ्रिका खंडातील बोत्सवाना हा मुळात गरीब देश आहे. त्यातच एवढे हत्ती म्हणजे दुष्काळात तेरावा महिना. शेतांमध्ये येऊन हत्ती मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान करत असल्याने शेतकरी वैतागले आहेत. याची दखल बोत्सवानाचे अध्यक्ष मोक्ग्वेत्सी मेस्सी यांनी घेतली आहे. त्यामुळेच त्यांनी संतापून एक मोठी घोषणा केली आहे. ती म्हणजे तब्बल २० हजार हत्तींचा कळप थेट जर्मनीमध्ये पाठवण्याची. अनेक माध्यमांमध्ये ही ‘हेडलाईन’ गाजते आहे.......

महाराष्ट्राच्या राजकारणाचा हा ‘खेळखंडोबा’ असाच चालू राहू द्यायचा की, त्यावर ‘अक्सिर इलाज’ करायचा, याचा निर्णय घेण्याची एकमेव ‘निर्णायक’ वेळ आलेली आहे…

जनतेला आश्वासनांच्या, ‘फेक न्यूज’च्या आणि प्रस्थापित मीडिया व सोशल मीडियाद्वारे भ्रमित करूनही सत्ता मिळवता येते, राखता येते, हे गेल्या दहा वर्षांत भाजपने दाखवून दिले आहे. पूर्वी सत्ता राजकीय नेत्यांना भ्रष्ट करते, असे म्हटले जायचे, हल्ली सत्ता भ्रष्ट राजकीय नेत्यांना ‘अभय’ वरदान देण्याचा आणि एकाधिकारशाही प्रवृत्तीच्या राजकारण्यांना ‘सर्वशक्तिमान’ होण्याचा ‘सोपान’ ठरू लागली आहे.......