‘वाडी-वस्ती’च्या वेशीवर...
ग्रंथनामा - झलक
आल्हाद गोडबोले
  • ‘वाडी-वस्ती’चे मुखपृष्ठ-मलपृष्ठ
  • Sat , 03 December 2016
  • ग्रंथनामा Booksnama झलक वाडी-वस्ती Wadi-vasti आल्हाद गोडबोले Aalhad Godbole दै. प्रहार Daily Prahaar किशोर कदम Kishor Kadam

‘वाडी-वस्ती’ हे दै. प्रहारमधील वाचकप्रिय सदराचे संकलन असलेले पुस्तक या दैनिकाचे तत्कालिन संपादक आल्हाद गोडबोले यांनी संपादित केले असून डिंपल प्रकाशनाने प्रकाशित केले आहे. त्याला गोडबोले यांनी लिहिलेल्या दीर्घ प्रस्तावनेचा संपादित अंश...

पुस्तकरूपातील ‘वाडी-वस्ती’ हे माझे एकट्याचेच नव्हे तर ‘प्रहार’च्या पुरवणी विभागातील अभिजित देसाई, मुकुंद कुळे, समीर करंबे, चैताली भोगले, अभिजित ताम्हाणे आणि अन्य सहकारी, त्यांच्याबरोबर कुंचला घेऊन या ‘वाडी’त ‘वस्ती’ला आलेले माझे आवडते चित्रकार पुंडलिक वझे तसेच अनेकविध क्षेत्रांतील शंभरेक नामवंत या साऱ्यांचेच हे स्वप्न होते. ते प्रत्यक्षात यायला उशीरच होतोय, पण ‘देरसे आये, दुरुस्त आये’ याचे प्रत्यंतर आणि त्याला प्रस्तावना लिहिण्याचे समाधानही लाभते आहे.   

‘वाडी-वस्ती’ साहित्यात अशी अक्षररूपात उभी राहत असल्याचे पाहताना ‘गाव-गाडा’ आठवला. योगायोग असा की, त्रिंबक नारायण आत्रे यांनी मराठीत अक्षररूपात ‘कोरून’ ठेवलेल्या ‘गाव-गाडा’ पुस्तकाचे हे शताब्दी वर्ष आहे. ‘पांढरी’ आणि ‘काळी’ या संकल्पनांची ओळख पत्रकारितेत पाऊल टाकत असताना झाली, ती या पुस्तकामुळे. पांढरी म्हणजे गावठाण आणि काळी म्हणजे रान. ढोकी, दिघंची, बोहाळी, पंढरपूर अशा ठिकाणी शिक्षण आणि संस्काराचा काळ गेला असल्यामुळे गावठाण आणि रान यांची ओळख मुंबई-पुण्याच्या पत्रकारांपेक्षा कांकणभर अधिक असणे स्वाभाविक होते. पण ‘वाडी-वस्ती’ प्रहारमध्ये कागदावर साकारताना, त्यानिमित्ताने आठवणी जागवताना; आपला गाव, आपले शेत, आपली वस्ती, आपल्यावरील संस्कार या साऱ्यांतून आपले घडणे साकारावे, ही मूळ कल्पना होती. ‘वाडी-वस्ती’च्या निमित्ताने अत्रे यांनी दाखवलेली ‘पांढरी’ मुंबईसारख्या महानगरात आम्ही पाहत होतो आणि इथे नांदत असलेल्या अनेकांच्या मनांतील ‘काळी’ - त्यांचे गाव, तिथला गाडा, त्यांचे स्वतःवरील संस्कार, त्यांचे स्थलांतर, तिथले स्थित्यंतर यांचा वेध आम्ही घेणार होतो. साहजिकच चर्चेत ‘गाव-गाडा’चा संदर्भ येत असे. त्यामुळे ‘गाव-गाडा’च्या शताब्दी वर्षात हे पुस्तक यावे, याचे एक वेगळे समाधान आहे.

‘प्रहार’मध्ये रविवारच्या पहिल्या पुरवणीपासून सुरू केलेल्या या सदराला पार्श्वभूमी होती ती महाराष्ट्राच्या सुवर्णमहोत्सवाची. ऑक्टोबर २००८ मध्ये हे सदर सुरू झाले आणि दोनअडीच वर्षे चालले. १ मे २०१० रोजी महाराष्ट्र पन्नास वर्षांचा होईल, तेव्हा या अर्धशतकाचा सामाजिक आढावा घेणारा एक दस्तावेज त्यातून हाती येईल, अशी अटकळ होती. ती पूर्णपणे खरी ठरली, असे म्हणणार नाही, कारण हे सदर सामाजिक स्थित्यंतराच्या कारणांचा शोध घेण्यापेक्षा स्मरणरंजनात अधिक रमले. मात्र ते खूप प्रामाणिक, नितळ, रसरशीत उतरले आणि विलक्षण वाचकप्रिय झाले, हे मान्यच करावे लागेल. असो.

प्रस्तावनेची सुरुवात करताना आठवला तो या सदराचा सुरुवातीपासूनचा प्रवास.   

दसऱ्याच्या मुहूर्तावर, म्हणजे ९ ऑक्टोबरपासून प्रहार सुरू करण्याची इच्छा श्री. नारायण राणे यांनी व्यक्त केली होती. ठरल्याप्रमाणे ८ ऑक्टोबरला रात्री षण्मुखानंद सभागृहात ‘प्रहार’चे थाटात, समारंभपूर्वक प्रकाशन झाले. हा दोन-सव्वादोन महिन्याचा काळ मात्र विलक्षण धावपळीचा होता, पण तेवढ्याच उत्साहाने, जिद्दीने प्रत्येकाने आपापला खारीचा वाटा उचलल्यामुळे हा ‘सेतू’ उभा राहू शकला.

....

अभिजित देसाईने रुजु होताच मुकुंद कुळे, समीर करंबे, चैताली भोगले यांच्यासह शनिवार-रविवारच्या पुरवण्यांची आखणी करून मुकुंदची एक संकल्पना माझ्यापुढे ठेवली होती. मुकुंदने स्वत:चे तिचे बारसेही केले होते. तीच ही ‘वाडी-वस्ती’!

आता मान्य करायला हरकत नाही, मुकुंद त्याच्या कल्पनेतील ‘वाडी-वस्ती’ बैठकीत मांडत असताना माझ्याही मनात सामाजिक स्थित्यंतराआधी आठवणींचा पटच उलगडत चालला होता.

लक्ष्मीबाई टिळकांनी ‘स्मृतिचित्रे’ या सुंदर शब्दाची मराठीला जणू देणगीच देऊन ठेवली आहे. आठवणींचा असा एक अल्बम - म्हणजे स्मृतिचित्रांचा संग्रह - प्रत्येकाच्याच मनात जपलेला असतो. आपण जेवढे भूतकाळात जाऊ, तेवढी ही स्मृतिचित्रे सुटी-सुटी, मागचे-पुढचे संदर्भ हरवलेली किंवा धूसर झालेली अशी साठून राहिलेली दिसतात. म्हणजे आपल्याला ती आठवतात, किंबहुना लख्खपणे डोळ्यांपुढे येतात. पण त्याआधीचे किंवा नंतरचे क्षण कोरे असतात. हीच ती सुटी-सुटी स्मृतिचित्र. चित्रांसारखी आठवणींत राहिलेली.

प्रसिद्ध विचारवंत जे. कृष्णमूर्ती यांचे एक विधान नुकतेच वाचनात आले. ते म्हणतात, ‘शाळा आणि तुरुंग या दोनच जागा अशा आहेत की, जिथे कोणीच स्वतःहून जात नाही; तिथे दाखल करावे लागते’. याच धर्तीवर मला असे वाटते की, जन्म आणि शाळा या दोन गोष्टी अशा आहेत की, त्या माणसाच्या इच्छेनुसार वाट्याला येत नाहीत. आपल्याला कुणीतरी जन्माला घालतात आणि शाळेतही आपल्याला ‘घातलेले’ असते आणि त्याहीपेक्षा या दोन्ही वेळी प्रत्येकजण रडलेलाच असता!

खरे म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातील या दोन अतिशय महत्त्वाच्या घटना. अगदी कायम लक्षात ठेवण्यासारख्या. लक्षात राहणाऱ्या. म्हणजे वाढदिवस तर आपण आयुषयभर साजरा करतो. पण आपण जे काही घडतो-बिघडतो, बनतो, त्याचा ‘श्रीगणेशा’ घातला गेलेला पहिला दिवस आपण रडूनच साजरा केलेला असतो.

.....

‘प्रहार’च्या प्रकाशनाचा संकल्पित दसऱ्याचा मुहूर्त जेमतेम महिन्यावर आला होता. दिवसाचे चोवीस तास पुरे पडत नव्हते आणि त्याहून विशेष म्हणजे मुकुंदने पहिलेच शिलेदार असे काही निवडून वाडी-वस्तीचे चार लेख समोर ठेवले की, कर्टन-रेझरची आवश्यकताच उरली नाही.

ज्याला ‘व्हॅल्यू अडिशन’ म्हणता येईल ते, म्हणजे पुंडलिक वझे यांची रेखाटने, या सदरासाठी मिळवणे, ही मात्र माझी वैयक्तिक पुण्याई होती. वझे हे मोठे चित्रकार. केसरी, महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता या तिन्ही दैनिकांचे दिवाळी अंक सजवण्यासाठी मी त्यांच्याकडून रेखाटने घेतली होती. पण साप्ताहिक पुरवणीच्या गरजा, मर्यादा, चित्रासाठी अपुरा कालावधी, दिले जाणारे मानधन या सगळ्या कोष्टकात वझे यांच्यासारख्या चित्रकाराला बांधणे अशक्य होते. आता सांगायला हरकत नाही, पण वझे यांच्या प्रत्येक चित्राला आमच्या बजेटच्या मर्यादेत आम्ही देऊ शकत असलेले मानधन जेमतेम चार आणेही नव्हते. ‘तुम्हाला देऊ करत असलेले मानधन त्रोटक आहे, याची कल्पना आहे, पण वाडी-वस्ती हा उद्याचा दस्तावेज आणि लोकप्रिय होणारे पुस्तक असेल. त्यासाठी तुमचे चित्र एकदाच वापरले जाण्याची हमी देतो. पुढे पुस्तक होईल, तेव्हा चित्रांच्या स्वामित्वहक्काच्या पैशातून भरपाई करू’ असे सांगून मन वळवण्याचे ठरवले. तसे पत्रही पाठवले. पण वझे यांनी ते बाजूला ठेवून, ‘तुम्ही सांगताय ना, मग वर्षभर दर रविवारसाठी चित्र देतो, मानधन म्हणून तुळशीचे पान मात्र द्या’ असा निरोप दिला.

हा ‘सोने पे सुहागा’ ठरला.

वझे यांनी सलग सव्वा वर्ष एकाहून एक सरस रेखाटने काढून दिली. दर्जाशी तडजोड न करता आणि प्रसंगी हातातील कामे बाजूला ठेवून! वर्षअखेरीस त्यांनी कुंचला खाली ठेवत असल्याचा निरोप पाठवला. सदर तर इतके अफाट चालले होते की, ते थांबवायचे नावही कुणी काढत नव्हते. अखेर ते पाक्षिक करण्याचा आणि वझे यांनी आणखी एक वर्ष कळ सोसण्याचा मार्ग शोधण्यात आला आणि वाडी-वस्तीला एक वर्षाची मुदतवाढ मिळाली! (वझे यांनी रेखाटने थांबवल्यावर काही चित्रकारांकडून रेखाटने घेऊन वाडी-वस्तीची शंभरी गाठण्याचा प्रयत्न झाला, पण ‘वाडी-वस्ती वजा वझे’ हे समीकरण वाचकांनाही रुचत नसल्याचे लक्षात येताच सदर थांबवण्यात आले.)

....

सुरुवातीला प्रहारबद्दल असणाऱ्या साऱ्या शंका काही दिवसांतच नाहीशा झाल्या होत्या आणि रविवार पुरवणी तर लोकप्रियच झाली. वाडी-वस्ती त्यात ‘टॉप’ला होते. वाडी-वस्तीची रेखाटने आणि त्यातील लिखाण यांचे गारुड असे पसरत गेले की, त्यात आपलाही लेख असावा, असे निरोप, आग्रह, प्रसंगी दडपणेसुद्धा वाढू लागली. मात्र त्यात कोणकोण ‘वस्ती’ला आणावेत, याचे अधिकार मुकुंदकडे आणि अंतिम अधिकार मी स्वतःकडे राखून ठेवले होते. पहिल्या वर्षभरात यादीतील निम्म्याहून अधिक मान्यवरांना लिहिते किंवा बोलते करण्यात यश आले होते. त्यातही मुकुंदचा वाटा अर्ध्याहून अधिक असेल. प्रत्येक नाव आम्ही चर्चा करून ठरवत असू आणि मी शक्यतो संबंधिताशी बोलतही असे. काहीजणांना सवड नसायची. पण अर्थात बहुतेकांनी थोडे पुढे-मागे का होईना, सवड काढली आणि वाडी-वस्ती साकारली. त्याबद्दल त्यांना धन्यवाद द्यावेत, तेवढे थोडे आहेत. ऋणनिर्देश वगैरे करण्याचा उपचार करण्यापेक्षा या साऱ्यांच्या ऋणात राहणेच मुकुंदसह सारे सहकारी मान्य करतील. पण आमचा मित्रवर्य किशोर कदम उर्फ सौमित्र याची आठवण सांगितल्याशिवाय राहवत नाही. म्हणून तेवढी आवर्जून देतो.

शब्दांकन वगैरे नको, मी लिहूनच पाठवतो, असे किशोरने सांगितले होते. दोन-तीनदा आठवण करून झाली. वर्ष संपत आले आहे, कळवून झाले. लिहिले नाहीस तर आधी जाहिरात करून पानात तुझा फोटो टाकून मजकुराची जागा कोरी सोडू, अशी धमकी देऊन झाले. अखेर एका कार्यक्रमात मुकुंदची आणि त्याची भेट झाली, तेव्हा मुकुंदने ‘आमचे संपादक तुझ्यावर भडकले आहेत’ असे दणकून सांगितले आणि ही मात्रा लागू पडली. ‘बाप रे, गोडबोले माझ्यावर रागावून चालणार नाही’ असे म्हणून तो एकदम गंभीर झाला. मला भेटल्याशिवाय जाऊ नको, असे मुकुंदला सांगितले आणि कार्यक्रम संपताच त्याला घरी घेऊन गेला. जरा बैस, असे सांगून किशोर खोलीत गेला, दार आतून लावून घेतले आणि पाऊण-एक तासाने बाहेर आला तो हातात वहीची लिहिलेली १५-१६ पाने घेऊन! असा हा आमचा वेडा किशोर! अर्थात असे वेडे ममत्व त्याने एकट्यानेच दाखवले, असे नाही. पण वाडी-वस्ती सदर एवढ्या उत्कटतेने साकारण्यामागे सर्वांचीच किती तळमळ होती, याचे एक उदाहरण सांगावेसे वाटले.

या वाडी-वस्तीचा आराखडा मुकुंदने तयार केला, त्यासाठी लागणाऱ्या विटा, कौले, माती, वासे वगैरे मुकुंदला पुरवण्यात आणि लागेल ती मदत करण्यात समीर करंबे, चैताली भोगले, प्रदीप म्हापसेकर, मुकेश माचकर (पुढे अभिजित ताम्हाणे, विजय चोरमारे, वैभव वझे...) अशा अनेकांचा खारीचा वाटा होता, याचा उल्लेख करणे आवश्यक आहे. मात्र अभिजित देसाई हा या वस्तीचा खरा ‘मिस्त्री’ होता. आम्ही ठरवल्याप्रमाणे सारे नीट उभे राहते आहे ना, यावर त्याची बारीक नजर होती. पण वस्ती पुरती उभी होण्याआधीच तो अचानक निघून गेला. आता या वाडी-वस्तीची पाहणी करताना तो सोबत नाही, याची टोचणी आम्हा सर्वांनाच जाणवणार आहे. सदर संपल्यावर पुस्तक करताना ते अभिजितच्या स्मृतीला अर्पण करण्याची इच्छा पूर्ण होते आहे, एवढेच समाधान.

 

लेखक ज्येष्ठ संपादक आहेत.

alhadgodbole@gmail.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘एच-पॉप : द सिक्रेटिव्ह वर्ल्ड ऑफ हिंदुत्व पॉप स्टार्स’ – सोयीस्करपणे इतिहासाचा विपर्यास करून अल्पसंख्याकांविषयी द्वेष-तिरस्कार निर्माण करणाऱ्या ‘संघटित प्रचारा’चा सडेतोड पंचनामा

एखाद्या नेत्याच्या जयंती-पुण्यतिथीच्या निमित्तानं रचली जाणारी गाणी किंवा रॅप साँग्स हा प्रकार वेगळा आणि राजकीय क्षेत्रात घेतल्या जाणाऱ्या निर्णयांवर, देशातील ज्वलंत प्रश्नांवर सातत्यानं सोप्या भाषेत गाणी रचणं हे वेगळं. भाजप थेट अशा प्रकारची गाणी बनवत नाही, पण २०१४नंतर जी काही तरुण मंडळी, अशा प्रकारची गाणी बनवतायत त्यांना पाठबळ, प्रोत्साहन आणि प्रसंगी आर्थिक साहाय्य मात्र करते.......

या स्त्रिया म्हणजे प्रदर्शनीय वस्तू. एक माणूस म्हणून जिथं त्यांना किंमत दिली जात नाही, त्यात सहभागी होण्यासाठी या स्त्रिया का धडपडत असतात, हे जाणून घेण्यासाठी मी तडफडत होते…

ज्यांनी १९७०च्या दशकाच्या अखेरीला मॉडेल म्हणून काम सुरू केलं आणि १९८०चं संपूर्ण दशकभर व १९९०च्या दशकाच्या सुरुवातीचा काही काळ, म्हणजे फॅशन इंडस्ट्रीच्या वाढीचा आलेख वाढायला सुरुवात झाली, त्या काळापर्यंत काम करत राहिल्या आहेत, त्यांना ‘पहिली पिढी’, असं म्हटलं जातं. मी जेव्हा त्यांच्या मुलाखती घेतल्या, तेव्हा त्या पस्तीस ते पंचेचाळीस या दरम्यानच्या वयोगटात होत्या. सगळ्या इंग्रजी बोलणाऱ्या.......

निर्मितीचा मार्ग हा अंधाराचा मार्ग आहे. निर्मितीच्या प्रेरणेच्या पलीकडे जाणे, हा प्रकाशाकडे जाण्याचा, शुद्ध चैतन्याकडे जाण्याचा मार्ग आहे

ही माया, हे विश्व, हे अज्ञान आहे. हा काळोख आहे. त्याच्या मागील शुद्ध चैतन्य हा प्रकाश आहे. सूर्य, उषा ही भौतिक जगातील प्रकाशाची रूपे आहेत, पण ती मायेचाच एक भाग आहेत. ह्या अर्थाने ती अंधःकारस्वरूप आहेत. निर्मिती ही मायेची स्फूर्ती आहे. त्या अर्थाने माया आणि निर्मिती ह्या एकच आहेत. उषा हे मायेचे एक रूप आहे. तिची निर्मितीशी नाळ जुळलेली असणे स्वाभाविक आहे. निर्मिती कितीही गोड वाटली, तरी तिचे रूपांतर शेवटी दुःखातच होते.......

‘रेघ’ : या पुस्तकाच्या ‘प्रामाणिक वाचना’नंतर वर्तमानपत्रांतील बातम्यांचा प्राधान्यक्रम, त्यांतल्या जाहिरातींमधला मजकूर, तसेच सामाजिक-राजकीय-सांस्कृतिक क्षेत्रांतील घटनांसंबंधीच्या बातम्या, यांकडे अधिक सजगपणे, चिकित्सकपणे पाहण्याची सवय लागेल

मर्यादित संसाधनांच्या साहाय्याने जर डोंगरे यांच्यासारखे लेखक इतकं चांगलं, उल्लेखनीय काम करू शकत असतील, तर करोडो रुपये हाताशी असणाऱ्या माध्यमांनी किती मोठं काम केलं पाहिजे, असा विचार मनात आल्याशिवाय राहत नाही. पण शेवटी प्रश्न येतो तो बांधीलकी, प्रामाणिकपणा आणि न्यायाची चाड असण्याचा. वृत्तवाहिन्यांवर ज्या गोष्टी दाखवल्या जात, त्या विषयांवर ‘रेघ’सारख्या पुस्तकातून प्रकाशझोत टाकला जातो.......