‘आलिया भटा’शी असावे सादर!
कला-संस्कृती - हिंदी सिनेमा
मिताली तवसाळकर
  • आलिया भट
  • Sat , 03 December 2016
  • हिंदी सिनेमा Hindi Cinema आलिया भट Alia Bhatt उडता पंजाब Udta Punjab डिअर जिंदगी Dear Zindagi हायवे Highway

१९९९मध्ये अक्षय कुमार आणि प्रीती झिंटाच्या ‘संघर्ष’ चित्रपटातून आलिया भट पहिल्यांदा रूपेरी पडद्यावर आली. बालकलाकार म्हणून काम केलेल्या आलियाचा चार वर्षांपूर्वी आलेला करण जोहरचा ‘स्टुडंट ऑफ द इअर’ हा तशा अर्थाने पहिलावहिला चित्रपट. या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या आलियाला तेव्हा सर्व जण प्रसिद्ध दिग्दर्शक-निर्माते महेश भट यांची मुलगी आणि अभिनेत्री पूजा भटची बहीण म्हणूनच ओळखत होते. आजच्या ‘जेन नेक्स्ट’चं खऱ्याखुऱ्या अर्थानं प्रतिनिधित्व करणाऱ्या आलियाला या चित्रपटामुळे टीन एज आणि तरुणाईतलं प्रचंड ‘फॅन फॉलोइंग’ लाभलं. स्वतःच्या 'बबली', 'हॅप्पी गो लकी' लुकमुळे आणि तशाच प्रकारच्या वावरामुळे तिला जणू ‘बबली गर्ल’ असं लेबलच चिकटलं; पण त्याच सुमारास करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ या टीव्हीवरच्या चॅट शोमध्ये सहभागी झालेल्या आलियाने स्वतःच्या सामान्य ज्ञानाचे तारे तोडले आणि ती सोशल मीडियावर ‘फेमस’ झाली. तोपर्यंत तरुणांमध्येच पॉप्युलर झालेल्या आलियाची कीर्ती आबालवृद्धांमध्ये पसरली. तिच्या सामान्य ज्ञानाचे वाभाडे काढणारे अनेक जोक्स सोशल मीडियामध्ये व्हायरल झाले. करणच्या चॅट शोमधल्या फजितीच्या घटनेला वर्षं उलटून गेली असली, तरी आलियाची फिरकी घेण्याचं प्रमाण सोशल मीडियामध्ये कमी झालेलं नाही. ते काम अधूनमधून सुरू असतं. पहिल्या चित्रपटानंतर बराच काळ पडद्यावर न दिसलेली आलिया दरम्यानच्या काळात सोशल मीडियातून चर्चेत होती; पण तरीही आलिया यामुळे चिडून गेली नाही किंवा निराश झाली नाही. ''बुद्धिमान असण्याचा कांगावा करण्यापेक्षा मी वेडं असल्याचं सांगेन', असं म्हणत ती स्वतःवरच्या या टीकेला उत्तर देत राहिली.

‘स्टुडंट ऑफ द इयर’ या स्वतःच्या पहिल्याच चित्रपटातून मॉडर्न, स्टायलिश, अॅटिट्यूड असणाऱ्या आजच्या तरुणीची इमेज तिने व्यवस्थित साकारली. या चित्रपटात फ्रेश आणि यूथफूल चेहरे असल्यामुळे बॉक्स ऑफिसवरही या चित्रपटाने चांगलं यश मिळवलं. आता अशाच प्रकारच्या भूमिकांमध्ये आलिया दिसणार, अशी सगळ्यांचीच अपेक्षा होती; पण तिने मात्र समीक्षकांसह सगळ्यांचाच अंदाज चुकवला. करण जोहरचा पहिला चित्रपट केल्यावर जवळजवळ दोन वर्षांनी ती इम्तियाज अलीच्या ‘हायवे’ या रोड ड्रामामधून प्रेक्षकांसमोर आली. हा सगळ्यांसाठीच एक धक्का होता.

लग्नाच्या संध्याकाळी अपहरण करण्यात आलेल्या एका बलाढ्य व्यावसायिकाच्या मुलीची भूमिका आलियाने यात साकारली आहे. सुरुवातीला घाबरलेल्या, घरी परतण्यासाठी उत्सुक असलेल्या वीरा त्रिपाठीला हळूहळू हा प्रवास आवडायला लागतो. मन:शांती आणि खऱ्या अर्थाने लाभलेल्या स्वातंत्र्याचा ती उपभोग घेऊ पाहते. 'स्वतःच्या घरी परतूच नये', असं तिला नंतर वाटायला लागतं. स्वतःचं अपहरण करणाऱ्या अपहरणकर्त्याच्याच प्रेमात पडण्याचा प्रवास आलियाने स्वतःच्या वकुबानुसार उत्तम रीतीने पेलला आणि साकारलाही.

लव्ह स्टोरीनंतर थेट एक रोड ड्रामा! कुणालाही अंदाज बांधता येणार नाही, अशी खेळी आलियाने हुशारीने खेळली होती आणि त्यात तिला यशही लाभलं. ‘स्टुडंट ऑफ द इयर’ या चित्रपटातल्या नटव्या शनायापेक्षा ‘हायवे’मधली वीरा त्रिपाठीची व्यक्तिरेखा प्रचंड भिन्न आणि ताकदीची होती. प्रेक्षकांनी आणि समीक्षकांनीही तिच्या या भूमिकेचं कौतुक केलं. या इमेज ब्रेकिंग परफॉर्मन्सने तिने सगळ्यांचं मन जिंकून घेतलं. याच चित्रपटातून आलियाने सगळ्यांना आणखी एकदा ‘सरप्राइज’ केलं. ते म्हणजे, ‘सुहा सहा’ हे गाणं गाऊन.

इम्तियाज अलीचे चित्रपट नेहमीच प्रेक्षकांसाठी वेगळं काहीतरी घेऊन येत असतात. असंच वेगळेपण त्याच्या ‘हायवे’मध्येही पाहायला मिळालं. रणदीप हुडासारखा ‘अनकन्व्हेन्शनल’ हिरो आणि अवघा एक चित्रपट केलेली आलिया यांची जोडी या चित्रपटात पाहायला मिळणार म्हणून प्रदर्शनापूर्वीपासूनच या चित्रपटाची हवा तयार झाली होती. त्या हवेचा आलियाला चांगलाच फायदा झाला.

यानंतर त्याच वर्षांत, म्हणजे २०१४मध्ये ‘टू स्टेट्स’ या चेतन भगतच्या कादंबरीवर आधारलेल्या त्याच नावाच्या चित्रपटातून आलिया प्रेक्षकांच्या भेटीला आली. आंतरजातीय विवाह, स्वतःच्या प्रेमाला पालकांचा होकार मिळावा म्हणून मुलांनी केलेली त्यांची मनधरणी, पालक आणि मुलांमधला तणाव या चित्रपटातून अनुभवता येतो. अभिषेक वर्मनने दिग्दर्शित केलेल्या या रोमकॉम सिनेमामध्ये यंग ब्रिगेडमधल्या अर्जुन कपूरबरोबर आलियाची जोडी जमली. हा चित्रपटही हिट ठरला. त्यानंतर वरुण धवनसोबत ‘हम्प्टी शर्मा की दुल्हनिया’ हा आणखी एक रोमकॉम चित्रपट आणि ‘गोइंग होम’ ही शॉर्ट फिल्म तिने केली.

गेल्या वर्षी आलेला ‘शानदार’ हा तिचा चित्रपट फारसा चालला नसला, तरी तिने त्यात तिच्या परीने अभिनयाचं काम चोख पार पाडलं होतं. २०१६ हे वर्ष मात्र तिच्यासाठी सुखद ठरलं, असं म्हणता येईल. या वर्षाच्या सुरुवातीला आलेल्या ‘कपूर अँड सन्स’ने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करून दाखवली. फवाद खान, सिद्धार्थ मल्होत्रा आणि आलिया यांचा प्रेमत्रिकोण असल्याचं वाटायला लावणारा हा चित्रपट प्रत्यक्षात मात्र ‘एलजीबीटी’ आणि 'पालक-मुलांच्या नातेसंबंधांवर' भाष्य करतो. फॅमिली ड्रामा असणाऱ्या या चित्रपटातला आलियाचा वावर तसाच बबली आणि यंग असा होता. यानंतर आलेल्या अभिषेक चौबे दिग्दर्शित ‘उडता पंजाब’ चित्रपटाने आलियाच्या पदरी पुन्हा एकदा यशाचं दान टाकलं.

पंजाबमधलं अमली पदार्थांचं जग, अमली पदार्थांमुळे वाया गेलेली पिढी, भ्रष्ट व्यवस्था आणि याविरोधात लढणारी मंडळी असं भीषण वास्तव हा चित्रपट मांडतो. करीना कपूर, शाहीद कपूर आणि दलजीतसिंग दोसांज यांच्याबरोबरच आलिया भटही या चित्रपटात प्रमुख भूमिकेत पाहायला मिळते. अपघाताने ड्रग्जमाफियांच्या विळख्यात अडकलेल्या बिहारमधल्या विस्थापित तरुणी, पिंकीची व्यक्तिरेखा आलियाने यात साकारली आहे. मनात नसताना अमली पदार्थांच्या आहारी गेलेल्या पिंकीची भूमिका सादर करताना आलियाने कमाल केली आहे! शाहीद कपूर, करीना कपूर यांच्यासारखे प्रसिद्ध कलाकार असतानाही आलियाने सगळ्यांना स्वतःची दखल घ्यायला भाग पाडलं, यातून तिच्या क्षमता दिसून येतो आहे.

या वर्षाचा शेवटही तिने दणकेबाज केला आहे. ‘उडता पंजाब’नंतर नुकत्याच आलेल्या ‘डिअर जिंदगी’ने बॉक्स ऑफिसवर यशाचा झेंडा फडकवला आहे. लहान-मोठ्या गोष्टींमुळे निराश होणाऱ्या आजच्या पिढीची गोष्ट या चित्रपटातून पाहायला मिळते. व्यवसायाने सिनेमॅटोग्राफर असणाऱ्या कायराच्या आयुष्यात घडणाऱ्या घटना, नातेसंबंधांमधला गोंधळ, नकार पचवता न येणं आणि ओघाओघानं होणारी मानसोपचारतज्ज्ञाची भेट, त्याने केलेली सोबत हे या चित्रपटाचं कथानक. मानसिक रुग्ण नाही, पण तरीही स्वतःच्या आयुष्याबाबत उडालेला गोंधळ, भावनिक गुंतागुंत आलियाने उत्तम प्रकारे साकारली आहे. खऱ्या अर्थाने आलियाचा असणारा हा चित्रपट तिने स्वतःच्या अभिनयाने सहजसुंदर बनवला आहे. किंग खान शाहरूख सोबत असूनही आलिया कुठे दबून गेलेली दिसत नाही. चित्रपटातल्या भूमिकेला आवश्यक असणारा कायराच्या मनातला गोंधळ त्याचबरोबर पडद्यावरचा सहज वावर हे सगळंच तिने अप्रतिमरीत्या साकारलं आहे.

पदार्पणात काही नामांकित पुरस्कार मिळवणाऱ्या आलियाने ‘हायवे’, ‘टू स्टेटस’, ‘हम्प्टी शर्मा की दुल्हनिया’ या चित्रपटांसाठीही पुरस्कार पटकावले. बॉलिवुडमधल्या सध्याच्या यंग ब्रिगेडमधली ती एक हॉट स्पॉट ठरते आहे. अजून बराच लांबचा पल्ला तिला गाठायचा आहे. १९व्या वर्षी या इंडस्ट्रीत येताना सामान्य ज्ञानाच्या अभावामुळे लोकांच्या हसण्याचा, टिंगलीचा विषय बनलेली आलिया वयाबरोबर आता शहाणी बनते आहे. एका वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीदरम्यान तिला विचारण्यात आलं, ''वाढत्या असहिष्णुतेबद्दल अनेक सेलिब्रेटीज बोलत असतात. मग तू राजकारण किंवा इतर संवेदनशील विषयांवर का बोलत नाहीस?'' या प्रश्नाला उत्तर देताना आलिया म्हणते, ''प्रत्येकाला आपापली मतं असतात. मलाही माझं मत आहे, पण मी ते माझ्यापाशीच ठेवते. जगा आणि जगू द्या.'' तिच्या या उत्तरावरून ती मॅच्युअर होत असल्याचं जाणवतं.

आज वयाच्या २३ व्या वर्षी तिच्या गाठीशी चार वर्षांत आठ चित्रपट (त्यातले सात हिट, एक फ्लॉप) आहेत. आलियाच्या कारकिर्दीचा हा आलेख चढता आहे. तिच्याकडून कालपर्यंत नसलेल्या अभिनयाच्या अपेक्षा तिने केलेल्या वेगवेगळ्या भूमिकांमुळे आता वाढीला लागल्या आहेत, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही!

 

लेखिका मुक्त पत्रकार आहेत.

mitalit@gmail.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सिनेमा हे संदीप वांगा रेड्डीचं माध्यम आहे आणि त्याला ते टिपिकल ‘मर्दानगी’ दाखवण्यासाठी वापरायचंच आहे, तर त्याला कोण काय करणार? वाफ सगळ्यांचीच निवते… आपण धीर धरायला हवा…

संदीप वांगा रेड्डीच्या ‘अ‍ॅनिमल’मधला विजय त्याने स्वत:वरच बेतलाय आणि विजयचा बाप बलबीर त्याने टीकाकारांवर बेतलाय की काय? त्यांचं दुर्लक्ष त्याला सहन होत नाही, त्यांच्यावर प्रेम मात्र अफाट आहे, त्यांच्या नजरेत प्रेम, आदर दिसावा, यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे. रेड्डीसारख्या कुशल संकलकानं हा ‘समीक्षकांवरच्या, टीकाकारांवरच्या अतीव प्रेमापोटी त्यांना अर्पण केलेला’ भाग काढून टाकला असता, तर .......