मध्ययुगातच भारताचा इतिहास ‘जमातवादी’ झाला! बिगर मुस्लिम इतिहासकारांनी इतिहासाचे ‘विकृतीकरण’ केले
ग्रंथनामा - झलक
प्रा. फकरूद्दीन बेन्नूर
  • ‘मध्ययुगीन मुस्लिम विद्वान’ या पुस्तकाचं मुखपृष्ठ
  • Fri , 10 August 2018
  • ग्रंथनामा Granthnama झलक सरफराज अहमद Sarfraz Ahmed मध्ययुगीन मुस्लिम विद्वान Madhyayugin Muslim Vidvan

मुस्लिम अभ्यासक सरफराज अहमद यांचं ‘मध्ययुगीन मुस्लिम विद्वान’ हे पुस्तक नुकतंच लोकवाङ्मय गृहातर्फे प्रकाशित झालं आहे. मध्ययुगीन इतिहासाच्या आजवर कधीही चर्चिल्या न गेलेल्या बाजूवर हे पुस्तक प्रकाश टाकतं. अनेक मुस्लिम विद्वांनाचा परिचय करून देतं. पुस्तकाला मुस्लीम अभ्यासक प्रा. फकरूद्दीन बेन्नूर यांनी लिहिलेल्या प्रस्तावनेचा हा संपादित अंश...

.............................................................................................................................................

भारतात आणि महाराष्ट्रात इतिहास हा अभ्यासाचा विषय नसून जाती-जमातींचे एकमेकांवर कुरघोडी करण्याचे आणि सूड उगवण्याचे साधन बनलेला आहे. स्वातंत्र्यलढ्याच्या काळातच इतिहास हा अॅकेडमिक विषय राहिला नाही. ज्या पद्धतीने पाश्चात्य देशात मोठ मोठे इतिहासकार, उदाहरणार्थ विल ड्युरांडसारखे इतिहासकार होऊन गेले. त्यांनी इतिहासाचे तत्त्वज्ञान विकसित केले. केवळ पाश्चात्य देशातच नव्हे, तर पौर्वात्य देशातदेखील इब्ने खल्दूनसारखे इतिहासकार झाले. त्याने इतिहासाच्या तत्त्वज्ञानाची मांडणी केली. जगाच्या इतिहासाचे टप्पे पाडले. त्याच्या लिखाणाचा प्रभाव फार मोठ्या प्रमाणावर पाश्चात्य इतिहासकारांवर पडला आहे. इतिहासाचे तत्त्वज्ञान असते, याची जाणीव इब्ने खल्दूनने पाश्चात्य जगाला करून दिली. असे म्हटले जाते की, इतिहासलेखनाची परंपरा भारतात नव्हतीच, ती मुस्लिम इतिहासकारांनी निर्माण केली.

मुहम्मद गझनीबरोबर आलेला इतिहासकार अल् बेरूनी याने पहिल्यांदा भारताच्या इतिहासाचे टप्पे पाडले. राजकीय इतिहासाबरोबरच सामाजिक इतिहास त्याने लिहिला. लोकांच्या रूढी, परंपरा, चालीरीती एकत्रित केल्या. त्याचे लेखन इतिहासलेखनाचा एक आदर्श मानला जातो. ‘अल् बेरूनीचा भारत’ (किताबुल हिंद) या नावाने तो प्रसिद्ध आहे. मुस्लिम राज्यकर्त्यांनी इतिहासकार, तवारीखकार यांची टीमच बाळगलेली होती. दैनंदिन व्यवहारापासून युद्धाच्या घटना याची नोंद मुस्लिम इतिहासकारांच्या ग्रंथात आढळते. 

सल्तनतकाळात जियाऊद्दीन बरनी, अमीर खुसरोंसारखे इतिहासकार होऊन गेले. अभ्यासकांनी भारताचे समाजशास्त्र त्यातूनच निर्माण केले आहे. अर्थात तवारिखकारांचा इतिहास हा पक्षपाती असला तरी तो इतिहासाचा फार मोठा खजिना मानला जातो. आधुनिक अभ्यासक प्रा. मुजीब, डॉ. इरफान हबीब यांनी त्याचा अभ्यास केला आहे. इरफान हबीब यांनी इतिहासातील अनेक भ्रम मोडीत काढले आहेत. प्रा. मुजीब यांचा ‘इंडियन मुस्लिम’ हा महाग्रंथ, मुस्लिम भारतात आल्यापासूनचा इतिहास आपल्यासमोर ठेवतो. भारतातील मुसलमानांचे आचारविचार, त्यांचे जगणे, त्यांनी निर्माण केलेले सण, उत्सव यांचा तो अभ्यास आहे.

भारतात बिगर मुस्लिम इतिहासात इतिहासकार, राज्यकर्त्यांचे केवळ गुणगान करणारे लेखन करत असत. भारतीय इतिहास भाटगीरीने बनला आहे. उदाहरणार्थ विजयनगरच्या लढायात तुंगभद्र किंवा गोदावरी यांच्या खोऱ्यातील सुपीक जमीन बळकावण्याची भूमिका काय असावी, याचा अभ्यास अजून झालेला नाही. त्याला बिगर मुस्लिम इतिहासकारांनी हिंदू आणि मुस्लिम यांच्या शत्रुत्वाचे रूप दिले आहे. म्हणून असे म्हणता येईल की, मध्ययुगातच भारताचा इतिहास हा जमातवादी झाला. वास्तविक बिगर मुस्लिम इतिहासकारांनी इतिहासाचे विकृतीकरण केले. या सर्व गुंतागुंतीत शास्त्रीय पद्धतीने इतिहास तयार करण्याचा प्रयत्न होतो आहे. 

इतिहासाच्या मांडणीबद्दल असे म्हणता येईल की, अगदी प्राचीन काळापासूनच इतिहास सत्ता प्राप्त करण्याचे साधन बनलेले आहे. उदाहरणार्थ प्राचीन काळापासून पक्षपाती लिखाण भारतात दिसून येते. रिचर्ड इटन यांनी ‘अल् हिंद’ या पुस्तकातून अशा प्रकारच्या इतिहासलेखनाची समीक्षा केलेली आहे. असे म्हटले जाते की, मुस्लिम राज्यकर्त्यांच्या काळातील इतिहास हा केवळ बाटवा-बाटवीचा आहे. रिचर्ड इटन यांनी मुस्लिम राज्यकर्त्यांचे राजकारण बाटवाबाटवीचे कसे नव्हते, हे लिहिले आहे. मुळात ब्राह्मणी सत्ता एवढी शक्तिशाली होती की, तिचा मुकाबला करणे अवघड होते. मुस्लिम राज्यकर्त्यांचा तो उद्देशदेखील नव्हता. मुस्लिम राज्यकर्ते ज्या भागामध्ये मागास जनता आहे दारिद्रय आहे अशा भागामध्ये गेले आणि त्यांनी विकासाचे प्रयत्न केले. उदाहरणार्थ बंगालच्या खाडीमधील दलदल त्यांनीच बुजवली. धुमाकूळ घालणाऱ्या वाघांचा बंदोबस्त केला. स्थानिकांवर औषधोपचार केले. मुस्लिम राज्यकर्त्यांबरोबर आलेले साधू, संतांनी त्या भागामध्ये आपल्या झोपड्या टाकल्या. त्यांनीच तेथील लोकांना शेतीची कला शिकवण्यास सुरुवात केली. कालांतराने तिथल्या काही जमातींनी इस्लाम धर्माचा स्वीकार केला. या उलट युरोपियन इतिहासकारांचा ‘उद्देश प्रोजेक्ट’ निराळा होता.

इस्लामच्या उदय आणि विस्तारामुळे स्पेन व इतर युरोपियन देशात जी पोपची सत्ता आणि रोमन साम्राज्य पसरले होते. त्यांना धोका निर्माण झाला. म्हणून त्यांनी प्रेषित मुहम्मद (स) साहेबांविरुद्ध सुडाचे लिखाण केले. खोट्यानाट्या कहाण्या लिहिल्या. कारेन आर्मस्ट्राँग यांनी ‘मोहम्मद’ या पुस्तकात त्याची चर्चा केली आहे. कुरआनाचे अवतरण झाल्यापासून बायबलमधील मिथके वापरून प्रेषित मुहम्मद (स) तोतया (?) होते. कुरआनातील समीकरणे भ्रष्ट नक्कल आहेत. अल्लाहने म्हणजे परमेश्वराने येशू ख्रिस्त, मोझेस यांनाच पाठवले होते, अशा प्रकारचे भरपूर लिखाण केलेले दिसून येते. हा संघर्ष पेटवल्यामुळे युरोपात क्रुसेड (धर्मयुद्ध) झाले.

तेव्हा इतिहास हा सरळ कधीच नसतो. भारतातदेखील चातुवर्ण्य, मनुस्मृती यांच्याप्रमाणे समाज घडवून गुलामगिरी वाढवण्यासाठी इतिहासाचा वापर केला गेला. थोडक्यात इतिहासाचे स्वरूप असे आहे. इतिहासात वस्तुनिष्ठता आणि तत्त्वज्ञानाऐवजी त्यांनी जातीय व्यवस्था भक्कम केली. यातून भारतात अस्पृश्यतेचा पाया घातला गेला.

औद्यौगिक क्रांतीनंतर राष्ट्रवादाची मांडणी सुरू झाली. इतिहास त्या राष्ट्रापुरताच मर्यादित करण्यात आला. राष्ट्रवादाने स्वकीय आणि परकीय असे भेद पाडले. ज्यांना परकीय मानले त्यांना हाकलून देण्याचे प्रयत्न केले. भारतात मुस्लिमांसारख्या जमाती आलेल्या होत्या. त्या सर्वांची शत्रूपक्षात गणना केली.

पाश्चात्त्य इतिहासकार आणि ब्रिटिश साम्राज्यवादी इतिहास लेखकांनी मुस्लिमासंबंधी जी साचेबंद समीकरणे तयार केली होती, त्यामुळे खूपच गुंतागुंत निर्माण झाली आहे. खुद्द मुस्लिम विचारवंत, राजकारणी आणि त्यांचे धर्मगुरू यांनीही परस्परविरोधी आणि मोठ्या प्रमाणावर ‘जमातवादी दृष्टिकोन’ स्वीकारून केलेल्या लिखाणामुळेही असे घडले आहे. त्याचबरोबर गेल्या दोन-तीन दशकांत इस्लाम संबंधाने आणि विशेषतः भारतीय मुसलमानांसंबंधाने नव्या माहितीच्या आधारे केले गेलेले लिखाण प्रकाशित होत आहे. इस्लाम आणि मुसलमान यांच्या संबंधाने लिहिणारे जे इतिहासकार आणि अभ्यासक आहेत, त्यांच्यावर परस्परविरोधी प्रभाव आहेत. तसेच त्यांचे हेतू आणि प्रेरणाही समान आणि तटस्थ नाहीत.

१८१५-१६ साली भारतात येणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या सोयीसाठी जेम्स मिलने इंग्लंडमध्ये बसून इतिहासलेखन केले. त्याच वेळी ब्रिटिश इतिहासकारांनीदेखील अशाच प्रकारचे लिखाण केले होते. तर ईस्ट इंडिया कंपनीने वेळोवेळी इंग्लंडला पाठवलेल्या अहवालाच्या सहाय्याने ‘ब्रिटिश इंडियन हिस्टरी’ हे पुस्तक लिहिले गेले. मिल् हा ब्रिटिश साम्राज्यवादाचा प्रतिनिधी होता. भारतीय लोक भित्रे, नामर्द, असत्य बोलणारे, नीतीमत्तेची चाड नसणारे आणि कमजोर असल्यामुळे त्यांच्यावर सर्वार्थाने श्रेष्ठ असणाऱ्या ब्रिटिशांचे राज्य कसे श्रेयस्कर आहे, हे दाखवण्याचा त्याचा उद्देश होता. (चौसाळकर, इतिहासाची जमातवादी मांडणी आणि राष्ट्रीय एकात्मता, पान-3) जेम्स मिल् यांचे मत होते की, कोणत्याही संस्कृतीचे नीट आकलन लांब बसून आणि अनुवादित ठांथांवरून होऊ शकते. मिल् यांची सांस्कृतिक अस्मितेची (आयडेंडीटीज) संकल्पना, भूतकाळातील संबंध आणि इतिहासकारांची भूमिका यासंबंधीचे त्याचे जे मत होते, त्यावर आधारित होती.

आपल्या स्वत:च्या आकलनानुसार त्याने भारतात परस्परांपासून पूर्णपणे भिन्न असलेल्या दोन लोकसमुदायांचे स्वायत्त अस्तित्व गृहीत धरले आणि हिंदु-मुसलमानातील समाजरचना, शासनपद्धती, कायदे, धर्म, कला, वगैरेंची तुलना करून हे दोन्ही लोकसमुदाय एकमेकांपासून पूर्णपणे भिन्न कसे आहेत, हे दाखवण्याचा प्रयत्न केला. भारतीय इतिहासाची विभागणी त्याने धर्मानुसार केली. प्राचीन हिंदू इतिहास, मध्ययुगीन मुसलमानी इतिहास आणि आधुनिक ब्रिटिश इतिहास अशी विभागणी केली. अशा प्रकारे, जेम्स मिल् याने भारतातील हिंदू आणि मुस्लिम एकमेकांपासून भिन्न असून धर्मामुळे ते एकसंघ (मोनोलिथ) झालेले आहेत, अशी मांडणी केली. यातून हिंदू आणि मुस्लिम लोकसमुदायांचे ‘मोनोलिथायझेशन’ तयार झाले. भारताचा प्राचीन इतिहास हा हिंदू इतिहास आहे आणि मध्ययुगीन इतिहास हा मुस्लिम इतिहास आहे हा भ्रम प्रस्थापित झाला. आधुनिक इतिहासाला मात्र त्याचे धार्मिकीकरण न करता ‘ब्रिटिश इतिहास’ असे म्हटले गेले. हीच कालगणना नंतरच्या सर्व इतिहासकारांनी स्वीकारली आणि इतिहासाचे जमातवादीकरण झाले.

एलियट आणि डाऊसन यांनी भारतीय इतिहासाला पूर्णपणे जमातवादी वळण देऊन भारताचा इतिहास हिंदू-मुस्लिमांच्या ‘शत्रुत्वाचा इतिहास’ म्हणून पुढे आणला. इतिहासाचे पद्धतशीर विकृतीकरण करून त्यांनी दाखवले की, भारताचा इ.स. १००० पासून १९१७ पर्यंतचा इतिहास हा हिंदू आणि मुसलमानांच्या धार्मिक संघर्षाचा इतिहास आहे. त्यांनी असे स्पष्ट लिहिले आहे की, या इतिहासाचे परिशीलन केल्यानंतर हिंदूंच्या लक्षात येईल की, मुसलमानी अंमलात हिंदूंवर फार मोठ्या प्रमाणात अत्याचार होत होते. त्यांनी असेही मत व्यक्त केले आहे की, भारतात हिंदू आणि मुसलमान ही दोन स्वतंत्र राष्ट्रे आहेत आणि मुसलमान परकीय आक्रमक आहेत. एलियट आणि डाऊसन यांनी स्वत:ला सोयीचे वाटतील असे उतारे निवडले. त्यामुळे लोकांमध्ये जातीय आणि धार्मिक पूर्वग्रहांचा प्रसार झाला. या संदर्भात प्रा. मुहम्मद हबीब यांनी लिहिले आहे की, ब्रिटिश सरकारच्या शिक्षण खात्यानेही याच मताचा पुरस्कार करणारी पाठ्यपुस्तके अनेक पिढ्यांच्या माथी मारली. हिंदू व मुसलमान यांना एकमेकांचे शत्रू म्हणून त्यात रेखाटले.

रॉबर्ट ओर्मे या ईस्ट इंडिया कंपनीच्या इतिहासकाराने साऱ्या मोघलांचा इतिहास औरंगजेबच्या कृत्यांच्या चष्म्यातून लिहिला आहे. मोघलांनी देवळे उद्ध्वस्त केली, जिझिया कर लादला यावरच त्याने भर दिला. गिबनच्या इतिहास लेखनाचे प्रभाव ब्रिटिश इतिहासकारावर होते. जेम्स मिलने भारताच्या इतिहासाचे वर्णन गिबनच्या मूल्यमापनावरून घेतलेले होते. गिबननेच मुस्लिम हे इतरांपासून पूर्णपणे भिन्न असणारे लोक आहेत, हे लिहून ठेवले होते. विल्यम जोन्स याने गिबनचे अनुकरण करूनच प्राचीन भारतीय हा हिंदूंचा स्वतंत्र इतिहास आहे, अशा अर्थाचे लिखाण केले आणि हिंदू सभ्यतेचा र्‍हास हा मुस्लिम अंमलाखाली झाला, असे लिहून ठेवले.

थॉमस मॉरिस हा ब्रिटिश इतिहासकार पूर्णपणे मुस्लिमविरोधी होता. त्याने मुस्लिम राज्यकर्त्यांचे अतिरेकी वर्णन करणारे लिखाण केले. मुस्लिम राज्यकर्त्यांना विश्‍वासघातकी, लुटालूट करणारे, भ्रष्ट आणि अमानुष अशी विशेषणे लावली. ते केवळ पिपासू वृत्तीचे होते त्यांच्याकडे कोणतेही शहाणपण नव्हते ते अनुदार असल्याचा इतिहास मॉरिसने लिहिला. त्याने १८०२ मध्ये भारताचा इतिहास अशा प्रकारे अतिरंजित पद्धतीने रचला होता.

ब्रिटिश वसाहतकालीन इतिहासकारांचे वैशिठ्य म्हणजे त्यांनी भारताच्या इतिहासाचे विश्‍लेषण ‘हिंदू-मुसलमानांच्या धार्मिक संघर्षाच्या चष्म्यातून’ केले. विल्यम् हंटर याने भारतीय मुसलमानांच्या इतिहास म्हणून जो काही इतिहास लिहिला आणि त्यांच्या परिस्थितीचे वर्णन केले त्यामधूनच मुस्लिम अलगतावादाचा उदय झाला त्याअर्थाने विल्यम हंटर हा द्विराष्ट्रवादाच्या सिद्धान्ताचा जनक असे म्हणता येईल. (मुहम्मद दिलावर हुसेन, सेन्च्युरी इंडियन हिस्टोरिकल राईटिंग इन इंग्लिश, पान-११२) त्याने केवळ बंगाली मुसलमानांची उदाहरणे घेऊन मुसलमानांवर होत असलेल्या अन्यायाचे एकांगी चित्रण केले होते. नेमके तेच चित्रण अलगतावादाचे बीज ठरले. एलफिन्स्टन् यांनी ‘फोडा आणि राज्य करा’ या ब्रिटिशांच्या धोरणाचा जाहीरपणे पुरस्कार केलेला होता. सर्व ब्रिटिश इतिहासकारांच्या इतिहास लेखनाचा हाच मुख्य दृष्टिकोन होता.

ब्रिटिशकालीन इतिहासकारांच्या हिंदू-मुसलमानासंबंधीचे विकृत इतिहास लेखनाची थोडीच उदाहरणे नमूद केलेली आहेत. सर्वसाधारणपणे सर्वच ब्रिटिश इतिहासकारांचा दृष्टिकोन हिंदू आणि मुसलमानात शत्रुत्त्वाची भावना वाढवत नेणे हा होता. तो त्यांच्या ‘फोडा आणि झोडा’ राजकारणाचा भाग होता. वास्तविक औरंगजेबनंतरचे मोघलांचे तथाकथित बादशाह सत्ताविहीन झालेले होते. पेशवे आणि महादजी शिंदे यांच्यासारख्या हिंदू राज्यकर्त्यांनी नाममात्र असलेली मोगलांची राजवट टिकवून ठेवलेली होती. हिंदू आणि मुस्लिम राज्यकर्त्यांतील संघर्ष मूळच्या स्वरूपात शिल्लक राहिलेला नव्हता. हिंदू आणि मुस्लिम राज्यकर्त्यांची राजकीय देवाण-घेवाण सुरू झालेली होती. धार्मिक आणि वैचारिक देवाण-घेवाण मोठ्या प्रमाणावर सुरू झालेली होती. सर्वच मुस्लिम राज्यकर्ते औरंगजेबसारखे नव्हते.

असे असताना ब्रिटिश वसाहतवादी इतिहासकारांनी बखरीतल्या अतिरंजित घटना आपल्याला सोयीच्या होतील, अशा प्रकारे घेऊन हिंदू आणि मुसलमानांना एकमेकांचे शत्रू म्हणून त्यांचे चित्रण केले. 

महात्मा गांधींनी हिंद स्वराज्यमधून ब्रिटिश इतिहासकारांनी रचलेला इतिहास खोडून काढला आहे. गांधींनी म्हटले की, हिंदू-मुसलमानांत ‘हाडवैर’ वगैरे नव्हते आणि नाही. ते एकमेकांशी लढत असत. तेव्हाही त्यांच्यात परस्परसंबंध होते. हिंदू हे मुसलमान राजांच्या राज्यात आणि मुसलमान हे हिंदू राजांच्या राज्यात नांदत आले आहेत. त्याना लढाईचा फोलपणा कळलेला आहे. म्हणून दोघांनी एकत्र होऊन राहण्याचा निर्णय घेतला. भांडणे पुन्हा इंग्रजांनी सुरू केली. येथे गांधीजी ‘हिंदू आणि मुसलमान राजांचे राज्य’ असा शब्दप्रयोग करतात. येथे ते जेम्स मिलच्या धर्मनिहाय इतिहासाच्या विभागणीला उत्तर देतात. ते स्पष्टपणे सांगतात की, ही राज्ये हिंदू आणि मुसलमान राजांची होती. म्हणजे प्राचीन व मध्ययुगीन इतिहास सर्व हिंदू आणि मुसलमान धर्मियांचा नव्हता आणि त्यांच्यात कायम संघर्ष होता, असेही नाही. राठ्र हे एकाच धर्मीय लोकांचे नसते. भारतात अनेक धर्मांचे लोक राहत आहेत. ते राठ्रच आहे. हिंदू आणि मुसलमान ही दोन वेगळी राष्ट्रे नाहीत. म्हणजे येथे गांधीजी हिंदू-मुसलमानांच्या धर्मनिहाय संघर्षाचा आणि कायमचा शत्रूत्वाचा प्रचारकी इतिहास नाकारतात. गांधींजी वसाहतवादी इतिहासाच्या मांडणीवर आणि त्यांच्या इतिहासशास्त्रावर टीका करतात. ते जेम्स मिल् प्रणित, हिंदू, मुस्लिम आणि ब्रिटिश अशी आधुनिक इतिहासाची वसाहतवादी मांडणी नाकारतात.

गांधींजी म्हणतात की, ज्या ‘हिस्टरी’ या इंग्रजी शब्दाला प्रतिशब्द इतिहास हा आहे त्याचा अर्थ ‘हिज-स्टोरी’ म्हणजे ‘राजा किंवा बादशाहची हकीकत’ असा आहे. ‘हिस्टरी’मध्ये जगातील युद्धाचीच कहाणी मिळेल. आपण इतिहास म्हणजे राजे गादीवर येणे त्यांची घराणी, लढाया, त्यांनी परस्परांशी केलेले तह व करार, सरदार-संरजामदार यांची हकीकत, असेच मानत आलो आहोत. गांधीजींनी हिंद स्वराज्यमध्ये त्याबद्दलची अनेक उदाहरणे दिली आहेत. गांधींजी पुढे म्हणतात की, राजे लोक खून कसे करीत, त्यांचा पोसलेला वैरभाव कसा होता, हे सर्व ‘हिस्टरी’मध्ये सापडते. जर हाच इतिहास असता व इतिहासात एवढेच घडले असते तर जग केव्हाच संपले असते. जगाची कथा जर लढाईने सुरू झाली असती तर आज एकही मनुष्य जिवंत दिसला नसता. म्हणून जग लढाया चालू असतानाही टिकले आहे. याचा अर्थ लढाईच्या बळापेक्षा दुसरे बळ हा जगाचा आधार राहिला आहे. परंतु इतिहासाची प्रवृत्ती ‘अस्वाभाविक घटनांची’ नोंद घेण्याची असते. शेकडो देशांतील लोक प्रेमाने आणि गुण्यागोविंदाने राहत असतात. त्याची नोंद इतिहास कधी ठेवत नाही. गांधीजींच्या दृष्टीने माणसांतल्या केवळ कृष्णकृत्यांच्या हकिकती म्हणजे इतिहास नव्हे.

गांधीजींच्या इतिहासाविषयीच्या धारणा या वस्तुस्थितीजन्य इतिहासलेखनाचा आग्रह धरणाऱ्या आहेत. मात्र भारतात अलीकडच्या काळात वस्तुस्थितीजन्य संदर्भांकडे दुर्लक्ष करून स्वतःच्या श्रद्धा आणि भावनांना इतिहास म्हणून सादर केले जात आहे. अनेक संदर्भ साधनांची मोडतोड केली जात आहे. साधनांचा गैरअर्थ काढून इतिहासाच्या घटनांना वेगळे रंग दिले जात आहेत. संदर्भांची मोडतोड आणि प्रक्षिप्त संदर्भांच्या जंत्रीमध्ये इतिहासाचे खरे स्वरूप जाणून घ्यायचे असेल, तर मुळ साधनांचा शोध घेणे गरजेचे आहे. त्यासाठी सरफराज अहमद यांचे हे पुस्तक महत्त्वाचे ठरू शकेल. सल्तनतकालीन आणि मोघलकालीन अनेक इतिहासकारांच्या ग्रंथांकडे लक्ष वेधण्याचे व त्यातील दुर्लक्षित संदर्भांना अधोरेखित करण्याचे महत्त्वाचे कार्य या पुस्तकाद्वारे होईल. मध्ययुगीन साहित्याच्या अभ्यासासाठी देखील हे पुस्तक अत्यंत महत्त्वाचे ठरेल असा मला विश्वास वाटतो.

 

"मध्ययुगीन मुस्लिम विद्वान" हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’चे अँड्राईड अॅप डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा -

 

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘बहिष्कृतां’च्या घरचे अन्न ‘बहिष्कृतां’प्रमाणेच उपेक्षिले गेले. त्यामुळे ‘ब्राह्मणेतर खाद्यसंस्कृती चळवळी’ने आपली ‘देशी’ बाजू जगापुढे मांडायला सुरुवात केलीय...

स्वच्छता व शुद्धता या दोहोंना अस्पृश्यतेचा मोठा संदर्भ आहे. ज्यांना शिवायचे नाही ते अस्पृश्य. त्यांनी जवळ यायचे नाही की, शेजार करायचा नाही, हा ब्राह्मण व सवर्ण यांचा नियम. घाणीची कामं ज्यांना वर्णाश्रम धर्माप्रमाणे करायला लावली, त्यांना घाण समजून अस्पृश्य ठरवण्यात आले. साहजिकच ही माणसं कशी जगतात, काय खातात-पितात, काय विचार करतात, याची जाणीवच वरच्या तिन्ही वर्णांना म्हणजेच सवर्ण जातींना नव्हती.......

किणीकरांना सगळी दर्शने कळत होती आणि अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती काव्यात उतरवता येत होती. आणि अजून मोठी गोष्ट म्हणजे ते काव्य चार ओळींपुरते सुटसुटीत ठेवता येत होते

किणीकरांवर मानवेंद्रनाथ रॉय ह्यांच्या विचारसरणीचा मोठा प्रभाव होता. त्यांच्या नावावरूनच त्यांनी स्वतःला ‘रॉय’ हे नाव घेतले होते. रॉय यांनी 'रॅडिकल ह्यूमॅनिझम’चा पुरस्कार केला. त्या काळच्या महाराष्ट्रात अनेक नेत्यांवर, लेखकांवर आणि विचारवंतांवर रॉय ह्यांचा प्रभाव पडला होता. रॉय ह्यांनी क्रांतीचा मार्ग नाकारला असला, तरी त्या काळी तरुण असलेल्या किणीकरांना मनात कुठेतरी क्रांतीचे आकर्षण वाटले असणार.......

म्हटले तर हा ग्रामीण राजकारण उलगडून सांगण्याचा खटाटोप आहे अन् म्हटले तर शेतकऱ्यांना लुबाडणाऱ्या व्यवस्थेला पर्याय उभे करणाऱ्या पुढच्या पिढीतील शेतकरी तरुणांचा संघर्ष आहे

ही केवळ भानुदासराव पाटील, विक्रम शिंदेचीच कथा नाही, तर आबासाहेब जाधव, दिनकरराव पाटील यांच्यासारख्या लोकशाही प्रक्रियेने उदयास आलेल्या नव्या सरंजामदारांचीही गोष्ट आहे. आर्थिक संसाधनांच्या बळावर वाट्टेल तेवढा पैसा मोजून निवडणुका जिंकणारे, मतदारांचा कौल फिरवणारे आबासाहेब, दिनकरराव केवळ हैबतपुरातच नव्हे, महाराष्ट्रात सगळ्याच मतदारसंघांत दिसून येतात, पण.......

या पुस्तकातल्या ‘बिटविन द लाईन्स’ नीट वाचल्या, तर आजच्या मराठी पत्रकारितेची ‘अवनत’ अवस्था आणि तिची ‘ऱ्हासपरंपरा’ नेमकी कुठून सुरू झाली, हे लख्खपणे समजते!

आपल्या गुणी-अवगुणी सहकाऱ्यांकडून उत्तम ते काढून घेण्यापासून, समाजातल्या व्यक्ती-संस्था यांचं योगदान नेमकेपणानं अधोरेखित करण्यापर्यंत बर्दापूरकरांचा सर्वत्र संचार राहिला. त्यामुळे त्यांच्या पत्रकारितेला सत्त्व, नैतिक बळ आणि गांभीर्याची झळाळती झालर लाभत राहिली. आजच्या मराठी पत्रकारितेच्या संदर्भात त्या झालरीचा ‘थर्मामीटर’ म्हणून वापर केला, तर जे ‘तापमान’ कळतं, ते काळजी करावं, असंच आहे.......

लोकशाहीबद्दल आस्था किंवा काळजी व्यक्त करणं, ही काही लोकांचीच जबाबदारी आहे, हा समज खोडून काढायचा तर कामच केलं पाहिजे. ‘लोकशाही गप्पा’ हे त्या व्यापक कामाच्या गरजेतून आलेलं छोटंसं काम आहे

पुरेशी मेहनत करून आणि संवादाच्या सर्व शक्यता खुल्या ठेवून लोकांशी बोललं गेलं, तर प्रत्येकाच्याच आकलनात वाढ होते. आणि हळूहळू भूजलाची पातळी उंचवावी, तसं लोकशाहीबद्दलचं भान सखोल होण्याची शक्यता निर्माण होते. आपल्या भोवतीच्या गदारोळातून एकमेकांचा हात धरून, एका सजग आणि जिवंत लोकशाहीच्या मुक्कामापर्यंत मैदान मारणं आपल्याला सहज शक्य आहे. त्यासाठी एकमेकांना शुभेच्छा देणं एवढं तरी आपण करूच शकतो. ते मनःपूर्वक करू या!.......