‘पूर्ण स्वराज्य’ या एकमेव आदर्शाचे सतत स्मरण करून देणारे प्रतीक म्हणून गांधींनी खादीची निवड केली!
सदर - गांधी @ १५०
पीटर गोन्साल्विस
  • ‘वस्त्राद्वारे स्वातंत्र्यप्राप्ती’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ
  • Thu , 02 August 2018
  • सदर गांधी @ १५० Gandhi @ 150 महात्मा गांधी Mahatma Gandhi

२ ऑक्टोबर २०१९ रोजी म. गांधी यांची १५०वं जयंती वर्षं साजरं केलं जाईल. त्याचं निमित्त साधून वर्ध्याच्या सेवाग्राम आश्रमानं २१-२२ फेब्रुवारी २०१७पासून ‘गांधी १५० जयंती अभियान’ सुरू केलं आहे. (२२ फेब्रुवारी हा गांधींच्या पत्नी कस्तुरबा यांचा स्मृतिदिन असतो.) या अभियानाअंतर्गत विविध कार्यक्रम केले जाणार आहेत. त्याला प्रतिसाद म्हणून ‘अक्षरनामा’वर दर महिन्याच्या दोन तारखेला गांधींविषयी एक लेख प्रकाशित केला जातो… या मालिकेतला हा पंचविसावा लेख ...

‘वस्त्राद्वारे स्वातंत्र्यप्राप्ती’ हा पीटर गोन्साल्विस लिखित ‘क्लोदिंग फॉर लिबरेशन’ या पुस्तकाचा मराठी अनुवाद (अनुवाद : श्वेता देशमुख) नुकताच प्रकाशित झाला आहे. सेज-भाषा प्रकाशनातर्फे प्रकाशित झालेल्या या पुस्तकातील संपादित अंश.

.............................................................................................................................................

“समाज उत्क्रांत होत असताना (सजग नकारात्मक पद्धतीने), ज्या पद्धतीने इतिहासाची मांडणी करत असतो, त्याही पलीकडे जाऊन ज्या सामाजिक जीवनातून प्रत्यक्ष कामगिरी घडते, ती कामगिरीच उघड अथवा छुपी समीक्षा करत असते.”

- व्हिक्टर टर्नर

स्वदेशी चळवळीमध्ये प्रतीकांचा वापर कशा प्रकारे करण्यात आला हे अभ्यासताना ‘सामाजिक रूपका’मधील दोन संकल्पना विशेष महत्त्वाच्या आहेत. टर्नर त्यांना ‘युगांतर (लिमिनॅलिटी) आणि असंरचित समुदाय (कम्युनिटाज)’ असे संबोधतात. देम्बू आदिवासी संस्कृतीचा अभ्यास करताना या संकल्पना त्यांनी प्रथमत: वापरल्या असल्या तरी त्यांनी त्या तेवढ्यापुरता सीमित न ठेवता त्यामध्ये अत्याधुनिक औद्योगिक समाजाचा समावेश करून त्यांचे संशोधन अधिक व्यापक केले. या प्रक्रियेदरम्यान त्यांनी संशोधनातील गृहीतके अनेक सामाजिक संदर्भांना लागू केली आणि त्यांची उपयोजिता पडताळून पाहिली.

युगांतर अनुभवणाऱ्या व्यक्ती, या अथवा त्या कोणत्याच वर्गवारीत मोडत नाहीत. कायदा, रूढी, संकेत, प्रथा, परंपरा, सणवार यांनी सोपवलेल्या आणि त्यांनी प्रभावित झालेल्या भूमिका पार पाडताना त्या ना धड इकडच्या असतात, ना तिकडच्या. तसेच त्यांचा विचार एखाद्या विधिसंदर्भातच केला जातो. त्यांना जोडली जाणारी संदिग्धता आणि अनिश्चिततादर्शक वैशिष्ट्ये ही सामाजिक आणि सांस्कृतिक अवस्थांतरणांना विधीचे स्वरूप देणाऱ्या अनेक समाजांमधील प्रतीकांद्वारे व्यक्त होतात. युगांतराची तुलना ही मृत्यू, गर्भावस्था, अदृश्य रूप, अंध:कार, उभयलिंगी गुणधर्म, निर्मनुष्य प्रदेश, चंद्रग्रहण अथवा सूर्यग्रहण या घटितांशी केली जाते.

गांधींची स्वदेशी चळवळ आणि १९२१ ते १९४७ हा चळवळीचा काळ हा खऱ्या अर्थाने युगांतराचा होता. नियमभंग केल्यानंतरचा काळ अवस्थांतराचा होता, कारण या काळात भारताला ब्रिटिश साम्राज्यवादापासून स्वातंत्र्य मिळाले नव्हते, पण तो पारतंत्र्यातदेखील नव्हता. स्वदेशी चळवळीत सहभागी झालेल्यांनी टर्नर यांच्या ‘ना अल्याड ना पल्याड’चा अनुभव दीर्घकाळ घेतला. हा काळ देशाच्या इतिहासातील सर्वांत नवोन्मेषी काळ होता. आवेगपूर्ण, सामूहिक पातळीवरील प्रतीकात्मक पुढाकाराचा हा काळ होता. प्रत्यक्ष कृती, हावभावात्मक संकेत, वर्तनव्यवहार, वेशभूषा, आपले काम, मिरवणुका, स्मारक स्मृतिजागरण, वर्षपूर्ती समारंभ, परिषदा, सभा, सामाजिक कार्य, स्वयंसेवी कार्ये, आवाहने, नाटके, विविध विषयांवरील प्रकाशने, प्रार्थना, धर्मग्रंथांची पुनर्अर्थांकन, त्यागाची प्रतीके, उपवास, धरणे ही ती प्रतीके होती. या सर्वांच्या मध्यभागी ते करिष्माई वलयांकित नेतृत्व होते. आणि स्वत:च्या व्यक्तिमत्त्वातून त्यांनी त्यांच्या लोकांच्या नव्या युगांतराची प्रतीती दिली. स्वदेशी चळवळीतील सहभागींच्या अनुभवांच्या विश्लेषणासाठी टर्नर यांचे युगांतराच्या उंबरठ्यावरील व्यक्तीविषयीचे (अथवा नवोदित) संशोधन परिपूर्ण आहे.

दीक्षा घेणारी नवोदित व्यक्ती, तारुण्यसुलभ भावभावना अनुभवणाऱ्या व्यक्ती यांसारख्या नव्या युगाच्या उंबरठ्यावरील व्यक्तींकडे स्वत:चे असे काहीच नसते. ते जणू काही वेषांतर करून अक्राळविक्राळ भासतात, कापडाची एखादी चिंधी बांधणारे किंवा काही वेळा नग्न असतात. थोडक्यात काय तर नव्या युगाच्या उंबरठ्यावरील व्यक्ती असल्यामुळे त्यांच्या अस्तित्वाला कोणताही दर्जा नसतो, त्यांच्याकडे मालमत्ता, सन्मानसूचक चिन्हे नसतात, नातेसंबंधांमधील पत अथवा भूमिका आणि स्थान व्यक्त करणारी वस्त्रप्रावरणे त्यांच्याकडे नसतात. थोडक्यात, त्यांच्या साहचार्यांमध्ये असलेल्या नवोदितांपेक्षा अथवा पुढारलेल्यांपेक्षा ते वेगळे उठून दिसतील, अशी कोणतीही बाब त्यांच्याजवळ नसते. ज्यांचे वर्तन सहनशील अथवा नम्र असते, ते विनातक्रार निदेशकाच्या आज्ञांचे पालन करतात आणि त्यांनी दिलेली कोणत्याही स्वरूपातील शिक्षा विनातक्रार भोगत असतात. यातून नवे रूप धारण करण्यासाठी आणि एका नव्या परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी त्यांना अतिरिक्त अधिकार दिले जातात. या सर्वांपैकी, नवोदितांमध्ये परस्परांना सहयोग देण्याकडे आणि समता प्रस्थापित करण्याकडे तीव्र कल असतो. श्रेणीय रचना आणि दर्जा यांमधील वास्तविक भेद लोप पावतात अथवा एकजिनसी होत जातात.

सत्याग्रहाच्या संघर्षाला युगांतर ही संकल्पना लागू करताना आज्ञापालनाकडे योग्य परिप्रेक्ष्यातून पाहिले पाहिजे. प्रत्यक्षात यामध्ये विरोधाभास वाटत असला तरी त्यात तथ्य आहे. नागरी क्षेत्रात कायदेभंग करणाऱ्या सत्याग्रहींनी वसाहतवाद्यांनी घालून दिलेल्या कायद्यांचे काटेकोर पालन करायचे हेच आज्ञापालन होते. त्यांनी अन्याय्य कायद्यांचे पालन केले नाही, तर न्यायिक कायद्यांनुसार शासनव्यवहार होऊ दिला. आज्ञापालन (जसे स्वत:हून अटकेत जाणे) हा (कायद्याच्या) आज्ञाभंगाचा अंतर्निहित परिणाम होता. चौरीचौरा घटनेनंतर न्यायाधीश ब्रूमफिल्ड यांच्यापुढे गांधींनी दिलेली साक्ष ही नागरी कायद्यांचा कायदेभंग करणाऱ्या सत्याग्रहीच्या अशा आज्ञापालनाचे ठळक उदाहरण होते.

“एकतर या व्यवस्थेपुढे नतमस्तक व्हायचे, ज्यामुळे माझ्या देशाचे अपरिमित नुकसान झाले आहे, अथवा माझ्या तोंडून निघालेल्या सत्यामुळे माझ्या लोकांचा संताप उसळण्याची जोखीम उचलावी यापैकी एकाची मला निवड करायची होती. माझी माणसं काही वेळा वेड्यासारखे वागली आहेत याची मला जाण आहे आणि याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. त्यासाठी मी लहानसहान नाही, तर मोठी शिक्षा भोगण्यास तयार आहे. मी कोणतीही क्षमायाचना करणार नाही. माझी शिक्षा कमी करण्यासाठी मी विनंतीदेखील करणार नाही... आदरणीय न्यायाधीश, अशा परिस्थितीत आपल्यापुढे एकच मार्ग आहे, एकतर आपण आपल्या पदाहून पायउतार व्हावे, नाही तर मला सर्वांत कडक शिक्षा ठोठवावी. परंतु तत्पूर्वी आपण ज्या व्यवस्थेचा अन कायद्याचा आधार घेत आहात, ती लोकांच्या कल्याणासाठीच आहे याची खात्री आपणांस असावयास हवी.”

या घटनेमधून टर्नर यांनी त्यांच्या ‘The Ritual Process’मध्ये परस्परसंबंध स्पष्ट करणाऱ्या दुहेरी प्रारूपाचा उल्लेख करणे क्रमप्राप्त आहे. सामाजिक रूपकाचे संरचना-संरचनाविरोधी असे दोन परस्परविरोधी पैलू अधोरेखित केले आहेत. संरचनाविरोधी विचार हा युगांतराचा अनुभव असतो, ज्याला ते ‘असंरचित समुदाय’ (कम्युनिटाज्) असे संबोधतात. त्यांची ही संकल्पना ‘सर्वसामान्य जनजीवन’ यापेक्षाही ‘सार्वजनिक नातेसंबंधांचा प्रकार’ यावर अधिक भर देते. या संरचनेला ते ‘श्रेणीय व्यवस्था’ असे संबोधतात.

एका बाजूस टर्नर यांची असंरचित समुदायाविषयीची सैद्धान्तिक सूची आणि स्वदेशी चळवळीतील गांधींच्या सत्याग्रहींचे प्रत्यक्ष अनुभव आणि दुसऱ्या बाजूस औपचारिक संरचनेची टर्नर यांनी तयार केलेली वर्णनात्मक विहित संरचना सूची आणि साम्राज्यवादी सरकारची प्रस्थापित नियंत्रण व्यवस्था यांच्यामधील परिपूर्ण संवाद अभ्यासणे हे रंजक आहे. ‘असंरचित समुदाया’ची गुणवैशिष्ट्ये आणि अनेक धार्मिक परंपरांनी स्वीकारलेली गुणवैशिष्ट्ये यांचे दृढ संबंध ही चित्तवेधक बाब आहे. हे असे का होते याचे टर्नर स्पष्टीकरण देतात. जी अनेकविध प्रतीके उपरोक्त गुणवैशिष्ट्यांनी युक्त असतात आणि ज्यांच्या माध्यमातून ही गुणवैशिष्ट्ये व्यक्त होतात, त्यांचा ‘संबंध नेहमी जन्म आणि मृत्यू, चय आणि अपचय या मानसशास्त्रीय प्रक्रियांशी निगडित असतो.’ आधुनिक समाजातील वाढत्या गुंतागुंतीचा परिणाम म्हणून वाढते विशेषीकरण आणि श्रमविभाजन हा गुणवैशिष्ट्यांचा प्रवास आदिवासी समाजातील परिवर्तनीय गुणवैशिष्ट्ये ते आजच्या स्वरूपातील धर्म असा हा प्रवास झाला आहे.

टर्नर यांच्या सांस्कृतिक मानववंशशास्त्रामधील सखोल ज्ञानामुळे स्वराज्यासाठीच्या लढ्याच्या  प्रतीकनिर्मितीमध्ये धर्माची भूमिका समजण्यास मदत होते. स्वयंशिस्त आणि आध्यात्मिक कृती म्हणून गांधी सूतकताई करत असत. आणि यज्ञाहुती समजून हा कर्मयज्ञ प्रत्येक सत्याग्रहीने, म्हणजे काँग्रेस सदस्यापासून ते खेड्यातील गरिबातील गरीब माणसाने अतिशय प्रामाणिकपणे करावा असे आवाहन गांधींनी केले.

खादीचे कापड तयार करणे हे ब्रिटिश वर्चस्वाचे आणि भारतासाठी अहितकारी धोरणांचे प्रतीक असणारे विदेशी कापड देशातून बाहेर काढण्याचा मार्ग होता. विदेशी कपड्यांवरील सामूहिक बहिष्कार आणि होळी ही सत्कृत्ये होती. कारण हिंदूधर्मानुसार यज्ञ हा यज्ञाहुतीसंबंधी महत्त्वाचा विधी असून, विदेशी कपड्यांची होळी ही यज्ञाद्वारे होणाऱ्या आत्मशुद्धीसदृश प्रतीक होते. विदेशी कपड्यांची होळी करण्याची शुद्धिप्रक्रिया वस्त्र अथवा ते तयार करणाऱ्या इंग्लिश लोकांविरुद्ध नव्हती, तर तिचे प्रयोजन एका बाजूस विदेशी कपड्यांवरील अवलंबित्व आणि दुसऱ्या बाजूस त्याचे उत्पादन करण्यासाठी स्वत:ची प्रतिष्ठा आणि कर्तव्य धुळीस मिळवण्याच्या दुहेरी पापातून मुक्त होण्यासाठी होते. ब्रिटिश साम्राज्यावादापुढे गुडघे टेकण्यास तयार होणे हे पापच होते आणि या लज्जास्पद कृतीतून मुक्त होण्यासाठी भारतीयांची शुद्धी करणे गरजेचे होते. ‘विदेशी कपड्यांचे दहन करत असताना वास्तविक पाहाता मी माझ्या लज्जास्पद वर्तनाचेच दहन करत आहे.

राजकीय आणि आध्यात्मिक पातळीवरील नियमभंग बाह्यरूपाने खादीतून व्यक्त करण्यात आला. खादी हे सदाचाराचे अधिष्ठान मानले गेले. खादी परिधान करणाऱ्या व्यक्तीवर सत्याग्रह धर्मपालनाचे नैतिक बंधन येते आणि ‘खादीच्या वापरातून येणारे स्फुरण’ ती व्यक्ती अनुभवते. विदेशी वस्त्रे आणि वस्त्रप्रावरणांचा त्याग करणे हे ‘धर्मांतर करण्यासारखे’ होते. हे नवीन नीतीमूल्ये, आध्यात्मिकता आणि निष्ठा यांचा स्वीकार करण्यासारखे होते. सन १९२१ मध्ये एकेरी पंचा नेसण्याच्या गांधींनी घेतलेल्या निर्णयातून ‘बोले तैसा चाले’ अशी वृत्ती असणारा ‘राजकारणी संत’ अशी त्यांची प्रतिमा निर्माण झाली. गांधींचा दृष्टिकोन समग्र होता - ‘राजकारण धर्मापासून विलग झाल्यास ते अर्थहीन होते.’ कारण ‘मानवी आयुष्य हे एकसंध आहे आणि मनुष्यप्राणी हा विविध क्षेत्रांमध्ये विभागाला जाऊ शकत नाही, तसाच तो नीती आणि राजकारण यांतदेखील विभागलेला राहू शकत नाही.’

निष्कर्षाप्रत येताना, गांधींचे ‘ना अल्याड ना पल्याड’ या अवस्थेवरील विचार मला आवर्जून मांडावेसे वाटतात. गांधींनी लिहिलेल्या पहिल्याच ग्रंथामध्ये एका परिच्छेदामध्ये त्यांनी जे धडधडीत सत्य मांडले आहे, त्यावरून टर्नरने युगांतराची संकल्पना मांडण्यापूर्वी बराच काळ आधी गांधींनी ही संकल्पना पूर्णपणे जाणलेली होती हे स्पष्ट दिसते. उत्क्रांती आणि विकासामध्ये युगांतराची भूमिका कशी हातभार लावते याबद्दल ते लिहितात -

“माणूस जेव्हा झोपेतून उठतो, तेव्हा तो आळोखेपिळोखे देतो आणि चुळबुळ करत असतो. पूर्णपणे जागे होण्यासाठी काही कालावधी जातो. तशाच प्रकारे फाळणीमुळे जागृती झाली असली तरी ग्लानी अजून उतरलेली नाही. आपण अजूनही आळोखेपिळोखे घेतो आहोत आणि अस्वस्थ आहोत. निद्रा आणि जागृती यामधील अवस्था जशी गरजेची असते, तशी देशातील सध्याची अस्वस्थता ही गरजेची असून, ती सुयोग्य अवस्था आहे. देशात अस्वस्थता पसरली आहे, याचे भान आल्याने आपण ती बाहेर काढू याची शक्यता मला अधिक वाटते... ही अस्वस्थता हा प्रत्यक्षात असंतोष आहे... जोपर्यंत माणूस त्याच्या प्राप्त परिस्थितीमध्ये समाधान मानत राहतो, तोपर्यंत त्याला त्यातून बाहेर पडण्यासाठी त्याचे मन वळवणे कठीण असते. कोणतेही परिवर्तन होण्यापूर्वी असंतोष निर्माण होणे क्रमप्राप्त आहे... हे सर्व शुभसंकेत आहेत असे मानले तरी त्याचे परिणाम अशुभ होऊ शकतात.”

अस्वस्थतेच्या गर्भामध्ये कल्याणाचे अंकुर रूजतात याची जाणीव असलेल्या गांधींनी त्यांच्या लोकांची सामाजिक आणि राजकीय अस्मितेला आकार देण्यासाठी, जटिल विविधतेमधूनही ऐक्य साधण्यासाठी आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे लोकांमध्ये अशी स्वप्नजागृती निर्माण करायचे की जेणेकरून ते त्यांचे शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक सामर्थ्य पणास लावतील, या हेतूने प्रतीकांचे महत्त्व जाणले होते. त्यांच्यातील अढळ निष्ठा जागृत करण्यासाठी आणि सतत भूतकाळात डोकावण्याचा अथवा मोह होत असतानादेखील ध्येयाचा पाठपुरावा करण्यासाठीदेखील प्रतीके महत्त्वाची आहेत, याची त्यांना खात्री होती.

लोकांना त्यांच्या ध्येयपूर्तीसाठी वेळ पडल्यास बलिदान करण्यास लागणारे बळ आणि प्रोत्साहन देणे प्रतीकाची योजना असायला हवी. लोकांच्या सामूहिक प्रयत्नांचे हे फलित असले पाहिजे. हे प्रतीक, आपण स्वातंत्र्य मिळवण्यास पात्र आहोत या स्वत:वरील विश्वासाचा आधार असला पाहिजे. पूर्ण स्वराज्य या एकमेव आदर्शाच्या दिशेने घौडदौड करत असताना त्या आदर्शाचे सतत स्मरण करून देणारे असे प्रतीक असणे गरजेचे होते.

याचकरिता गांधींनी खादीची निवड केली. हे त्यांच्या भारताविषयी बाळगलेल्या स्वप्नाचे भविष्यसूचक प्रतीक होते. भारतातील विविध स्तरातील लोकांना एकत्र आणून अशी टिकाऊ सूतकताई होईल की जेणेकरून, भविष्यातील पिढ्यांतील नेते एखाद्या मजबूत, टिकाऊ आणि बहुरंगी वस्त्राप्रमाणे स्वतंत्र अन् वैविध्यपूर्ण भारताची निर्मिती करतील.

.............................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

जर नीत्शे, प्लेटो आणि आइन्स्टाइन यांच्या विचारांत, हेराक्लिट्स आणि पार्मेनीडीज यांच्या विचारांचे धागे सापडत असतील, तर हे दोघे आपल्याला वाटतात तेवढे क्रेझी नक्कीच नाहीत

हे जग कसे सतत बदलते आहे, हे हेराक्लिटस सांगतो आहे आणि या जगात बदल अजिबात होत नसतात, हे पार्मेनिडीज सिद्ध करतो आहे. आपण डोळ्यांवर अवलंबून राहण्यापेक्षा आपल्या बुद्धीवर अवलंबून राहिले पाहिजे, असे पार्मेनिडीजचे म्हणणे. इंद्रिये सत्याची प्रमाण असू शकत नाहीत. बुद्धी हीच सत्याचे प्रमाण असू शकते. यालाच बुद्धिप्रामाण्य म्हणतात. पार्मेनिडीज म्हणजे पराकोटीचा बुद्धिप्रामाण्यवाद! हेराक्लिटस क्रेझी वाटतो, पण.......