चैत्यभूमी : माझं विद्यापीठ
सदर - चैत्यभू'मी'तला 'मी'!
कीर्तिकुमार शिंदे
  • दादर (मुंबई)मधील चैत्यभूमीचं प्रवेशद्वार
  • Thu , 01 December 2016
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर Babasaheb Ambedkar चैत्यभूमी Chaitya Bhoomi ६ डिसेंबर 6 December आंबेडकरी चळवळ

यंदाचा सहा डिसेंबर हा डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचा ६०वा महापरिनिर्वाण दिन. त्यानिमित्ताने हे विशेष सदर, चैत्यभू'मी'तला 'मी'! आजपासून ६ डिसेंबरपर्यंत रोज हे सदर प्रकाशित होईल. हे सदर पत्रकार, प्रकाशक कीर्तिकुमार शिंदे लिहीत आहेत. विविध चळवळींतील कार्यकर्त्यांशी त्यांचे अत्यंत जवळचे संबंध असून राजकीय विषयांवरही त्यांनी लेखन केलेलं आहे. ६ डिसेंबर रोजी मुंबईतील चैत्यभूमीवर घडणाऱ्या फिनॉमेननचं विविधांगी दर्शन घडवणारं हे सदर...

 

बरोबर सतरा वर्षांपूर्वी म्हणजे ६ डिसेंबर १९९९ या दिवशी मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा दादरच्या चैत्यभूमीवर अवतरलो. तेव्हा १८ वर्षांचा होतो. त्या दिवसापर्यंत बाबासाहेबांच्या 'महापरिनिर्वाण' दिनानिमित्त (हा शब्दही पहिल्यांदा त्याच दिवशी ऐकला होता) चक्क आपल्या मुंबईत लाखो लोक महाराष्ट्रातून - देशभरातून येतात, हे मला अजिबात ठाऊक नव्हतं. त्याआधी काही महिने रुईया कॉलेजला आर्ट्सला प्रवेश घेतला होता. त्यामुळे बाबासाहेबांचं हिंदू कॉलनीतलं निवासस्थान 'राजगृह' मला माहिती होतं. त्यांच्याविषयीचे एखाद-दोन लेख वाचले असतील-नसतील, पण माझी 'पाटी कोरी' होती, इतकं नक्की!

तर सतरा वर्षांपूर्वी चैत्यभूमीवर झालेल्या त्या विराट जनसमुदायाच्या दर्शनाने मी, माझं मित्रवर्तुळ, माझं विचारविश्व बदललं. विस्तारलं तर निश्चितच. मी आयुष्यात पहिल्यांदाच सामाजिक पातळीवर कुणाशी तरी रिलेट करत होतो. ही माणसं 'आपली' आहेत, आपण त्यांच्यापैकी आहोत, ही भावना पहिल्यांदा तिथेच जन्माला आली.

पूर्वीच्या तुलनेत आता खूपच चांगलं, खरंतर परफेक्ट व्यवस्थापन असतं चैत्यभूमीचं. पालिका, पोलीस, अनेक संस्था त्यासाठी खूप राबतात. पंधरा-सतरा वर्षांपूर्वी तिथे सगळा सावळा-गोंधळ असायचा. पुरुषांचं काय, महिलासुद्धा मिळेल त्या कोपऱ्यात बसून 'मोकळं' व्हायच्या. जेव्हा ते मी पहिल्यांदा बघितलं, तेव्हा पुरता हादरलो होतो. गर्दी, गोंगाट, गोंधळ, गू ... असं ते वातावरण होतं. त्यावर एक लहानसा लेखही लिहिला होता, पण या सगळ्या गजबजाटात एक गोष्ट माझ्या नजरेत, डोक्यात आणि जगण्यात पुरती फिट्ट बसली. ती म्हणजे, तिथल्या जवळपास प्रत्येकाच्या हातात एखाद-दोन पुस्तकं, पुस्तिका, काहीच नाही तर विशेषांक तरी होता. प्रत्येक जण वाचण्यासाठी काहीतरी विकत घेत होता. वेगवेगळ्या चळवळींचे कार्यकर्ते त्यांच्या कार्यक्रमाची पॅंपलेट्स छापून मोफत वाटत होते... हे खरंच वेगळं होतं. मी हे सगळं पहिल्यांदाच पाहत होतो, अनुभवत होतो... आणि काही वर्षांनी प्रत्यक्ष जगणार होतो. 

गर्दी, गोंगाट, गोंधळ ...यांपेक्षा खूप खूप वेगळं.

इथेच मला बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं 'शूद्र पूर्वी कोण होते', 'अस्पृश्य मूळचे कोण' ही पुस्तकं पहिल्यांदा पाहायला-चाळायला मिळाली. 'जातिसंस्थेचे विध्वंसन' ही क्रांतिकारी पुस्तिका मी इथेच विकत घेतली. नंतर झपाटल्यागत वाचून काढली. पहिल्या एक-दोन वर्षांमध्येच मला गांधी आणि आंबेडकरांचा समन्वय साधण्याचा प्रयत्न करणारे किशोर जगताप आणि शशी सोनावणे, आंबेडकरी चळवळीतले सुमेध जाधव, डाव्या चळवळीतले सुबोध मोरे, अंधश्रद्धा निर्मूलन समिताचा समीर... असे अक्षरश: डझनाने मित्र भेटले. मित्र यासाठी की, आज इतक्या वर्षांनंतरही आम्ही खरोखरच मित्र आहोत. हा मित्रपरिवार नंतर दर वर्षी फक्त वाढत आणि वाढतच गेला!

महाराष्ट्रातली अशी एकही चळवळ नसेल, ज्या चळवळीचा प्रतिनिधी मला चैत्यभूमीला कोणत्या ना कोणत्या ६ डिसेंबरला भेटला नसेल. खरं तर ते आमचं गेट-टुगेदरच असतं. ‘गेल्या वर्षभरात काय झालं, पुढच्या वर्षभरात काय काय करायचं’, याचं खरं प्लॅनिंग, त्या संदर्भातले संकल्प इथली जनता १ जानेवारी या नववर्षाच्या पहिल्या दिवशी न करता बाबासाहेबांच्या विचारांचं स्मरण करत सहा डिसेंबरला सर्वांशी चर्चा करून, एकमेकांचा अंदाज घेत करते.

आरपीआय, बसपासह सर्व पक्षांमधले लहानमोठे कार्यकर्ते-पदाधिकारी-नेते, सेवाभावी संस्थांचे कार्यकर्ते, पत्रकार, लेखक, प्रकाशक, संशोधक, क्रांतिकारी, माओवादी, समाजवादी, मोफत शिक्षण-व्यवस्थेचा पुरस्कार करणारे, दलितांसाठी स्वस्तात घरं बांधण्याची योजना आखणारे, करगोटे-कडे तोडणारे विज्ञानवादी, सकल साहित्यवाले, विद्रोही साहित्यवाले... जो जो पुरोगामी विचारांशी बांधील माणूस आहे - मग तो सामाजिक-राजकीय पातळीवर पुरोगामी विचारांशी जोडलेला असेल किंवा वैयक्तिक पातळीवर तसं जगण्याचा प्रयत्न करणारा असेल -तो तो इथे चैत्यभूमीला सहा डिसेंबरला येणार म्हणजे येणारच. कारण त्या प्रत्येकाला टॉनिक देणाऱ्या, प्रेरणा देणाऱ्या माणसाचं नाव - डॉ. बाबासाहेब आंबेडकर. त्यांच्यासाठीच हा जनसागर जमतो.

टप्प्याटप्प्याने वाचन सुधारत गेलं. सौंदर्याचा अनुभव देणारं साहित्य इतर मित्रमंडळींमुळे वाचत होतो, त्यापेक्षा वेगाने सामाजिक क्रांतिकारी साहित्याचं वाचन करत होतो. इतर मराठी वाचकांना अनुवादित मार्क्स, मॅक्झिम गॉर्की अन कॉम्रेड शरद पाटील, आ. ह. साळुंखे, गेल ऑम्वेट माहीत असतील-नसतील, इथल्या प्रत्येकाला ते माहिती असतात. माझा 'या' सर्वांशी परिचय झाला, कारण मी चैत्यभूमीला येत राहिलो. इथे माझ्याबरोबर अनेकांनी त्यांची क्लिष्ट भाषेतली पुस्तकं वाचलेली असतात; ती समजून घेण्याचा किमान प्रामाणिक प्रयत्न केलेला असतो. सध्या तुरुंगात असलेला सचिन माळी त्याच्या कवितासंग्रहाच्या रूपाने मला इथेच भेटला. वेड लावलं त्याने मला! शाहीर संभाजी भगत वर्षभर भेटले नसतील, तरी इथे हमखास भेटणारच. इतकंच कशाला, नामदेव ढसाळ, नरेंद्र जाधव यांना मी प्रत्यक्ष भेटलो ते फक्त इथेच. कधी कुणाच्यात घुसलो नाही, पण दर वर्षी भेटत राहिलो, बोलत राहिलो, जमेल तितकं वाचत राहिलो.

दहा वर्षांपूर्वी 'नवता'चा पहिला अंक मी आणि माझ्या मैत्रिणीने, माझा मित्र दौलत जाधव आणि त्याच्या मैत्रिणीने (दोघांचेही पुढे आंतरजातीय विवाह झाले) शिवाजी पार्कच्या रस्त्यावर उभं राहून विकला. तेसुद्धा तब्बल ३ हजार प्रती! सोबतीला अनेक चळवळींचे कार्यकर्ते होतेच. दौलत जाधव सोडला, तर आमच्यापैकी कुणीही बौद्ध नव्हतं. पण 'आपण या जातीचे नाही', असं कधीही आमच्या मनाला शिवलं नाही. पुढे 'नवता' प्रकाशन संस्थेच्या रूपाने जन्माला आलं. सहा वर्षांपूर्वी मित्रवर्य आनंद भंडारे (आंबेडकरी कलावंत भिकाजी भंडारे यांचे सुपुत्र) यांच्या सहकार्याने ‘संजय पवार’ या स्वतंत्र बाण्याच्या निर्भीड लेखकाची एकाच वेळी तब्बल तीन भली मोठी पुस्तकं प्रकाशित केली. त्यानंतर आंबेडकरी चळवळीतली, पुरोगामी चळवळीतली इतरही अनेक पुस्तकं प्रकाशित केली. सोबतीला प्रबोधनकार ठाकरे, इतकंच काय, राज ठाकरे यांचीसुद्धा पुस्तकं नवताने पुढे प्रकाशित केली, पण आंबेडकरी चळवळीतल्या, पुरोगामी वर्तुळातल्या एकाही मित्राने कधी नाक मुरडलं नाही. नेहमी कौतुकच केलं.

एक गोष्ट मला पक्की माहितीये... हा जनसागर बाबासाहेबांवर प्रेम करतो. म्हणूनच तो ज्ञानार्जनावर, पुस्तकांवरही तितकंच प्रेम करतो. 

'पुस्तकं माणसांना जोडण्यासाठी असतात, तोडण्यासाठी नाही', हे मी इथेच शिकलो. मग भले ती पुस्तकं एकमेकांवर, परस्परविरुद्ध विचारसरणींवर टीकाटिप्पणी करणारी असोत! चैत्यभूमीला मी 'माझं विद्यापीठ' मानतो, ते त्यासाठीच.

 

लेखक नवता बुक वर्ल्डचे संचालक आहेत.

shinde.kirtikumar@gmail.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

जर नीत्शे, प्लेटो आणि आइन्स्टाइन यांच्या विचारांत, हेराक्लिट्स आणि पार्मेनीडीज यांच्या विचारांचे धागे सापडत असतील, तर हे दोघे आपल्याला वाटतात तेवढे क्रेझी नक्कीच नाहीत

हे जग कसे सतत बदलते आहे, हे हेराक्लिटस सांगतो आहे आणि या जगात बदल अजिबात होत नसतात, हे पार्मेनिडीज सिद्ध करतो आहे. आपण डोळ्यांवर अवलंबून राहण्यापेक्षा आपल्या बुद्धीवर अवलंबून राहिले पाहिजे, असे पार्मेनिडीजचे म्हणणे. इंद्रिये सत्याची प्रमाण असू शकत नाहीत. बुद्धी हीच सत्याचे प्रमाण असू शकते. यालाच बुद्धिप्रामाण्य म्हणतात. पार्मेनिडीज म्हणजे पराकोटीचा बुद्धिप्रामाण्यवाद! हेराक्लिटस क्रेझी वाटतो, पण.......