नसीरुद्दीन शाह : अदाकार हैं, वक्त की तस्वीर भी हैं                                 
कला-संस्कृती - चलत्-चित्र
अंजली अंबेकर
  • नसीरुद्दीन शाह
  • Fri , 20 July 2018
  • कला-संस्कृती चलत्-चित्र नसीरुद्दीन शाह Naseeruddin Shah

प्रसिद्ध अभिनेते नसीरुद्दीन शाह यांचा आज वाढदिवस. त्यानिमित्तानं हा विशेष लेख...

.................................................................................................................................................................

नसीरुद्दीन शाह या नावाच्या व्यक्तीचा जन्म जुलै १९४९ मधील आहे की, ऑगस्ट १९५० मधील आहे याबाबत संभ्रम आहे. परंतु नसीरुद्दीन शाह नावाच्या त्याच व्यक्तीला जाणत्या वयापासून फक्त आणि फक्त अभिनेता होऊन रंगमंचावर आणि चित्रपट क्षेत्रांत कार्यरत राहायचं होतं, याबाबत मात्र कुठलाही गोंधळ त्यांच्या मनात नव्हता. फक्त अभिनय करत राहणं ही त्यांच्यासाठी सूर्यप्रकाशाइतकीच स्वच्छ बाब होती. उत्तर प्रदेशातील लखनौजवळील बाराबंकी नावाच्या लहानशा खेड्यात जन्म झालेल्या या व्यक्तीनं, शालेय जीवनातच शेक्सपिअरच्या ‘मर्चंट ऑफ व्हेनिस’मधील शायलॉकच्या भूमिकेपासून गेल्या पन्नास वर्षांत भारतीय व विदेशी भाषांतील शंभरहून अधिक चित्रपट, सीरिअल्स, शॉर्ट फिल्म्स व पन्नासहून अधिक नाटकांमधील अभिनय तसेच दिग्दर्शन अशी भक्कम कारकिर्द घडवली आहे.

त्यांना संगीत नाटक अकादमी, राष्ट्रीय पुरस्कार, व्हेनिस अवॉर्डपासून पद्मभूषणपर्यंत अनेक पुरस्कारांनी सन्मानितही करण्यात आलं आहे. पण अशा ढोबळ पद्धतीनं त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा किंवा कारकिर्दीचा विचार करून चालणार नाही. अभिनय आणि दिग्दर्शनाला सोबत घेऊन, पण फक्त अभिनय व दिग्दर्शनाच्याच कुंपणात कैद न होणारं त्यांचं नाट्य व चित्रपट क्षेत्रांतील योगदान आहे.

शालेय जीवनातच नसीर यांच्यावर जेफ्री कँडल यांच्या शेक्सपीअराना या थिएटर ग्रुप मार्फत सादर होणाऱ्या नाटकांचा, त्यांच्या नाट्यकलेवरील निष्ठेचा आणि विशेषतः जेफ्री कँडल यांच्या अभिनयाचा खूप प्रभाव पडला होता. नसीर यांच्या पुढच्या एकूणच रंगमंचीय तथा अभिनय कारकिर्दीबाबतच्या प्रवासाचा वेध घेताना शेक्सपिअरानाचा हा प्रभाव आवर्जून जाणवतो. प्रामुख्याने त्यांच्या एकूणच कलाकीर्दीचा विचार करताना, त्यांचं या क्षेत्रांतील हुन्नर, कलात्मकतेविषयीची श्रद्धा आणि रंगमंचीय कमिटमेंटचा बाबी आपोआपच समोर येतात किंवा त्यांना टाळून पुढे जाताच येत नाही. म्हणूनच की काय ते फक्त इतर प्रोफेशनल अभिनेते किंवा दिग्दर्शकासारखे विशिष्ट फॉर्ममध्ये व्यक्त होऊन थांबले नाहीत, तर त्यांनी प्रोफेशनल कारकीर्दीच्या बाहेर जाऊन त्या कलेचा व्यासंग जपला, त्याला सातत्याने शिकण्या-शिकवण्याची जोड दिली.

नसीरुद्दीन शाह आणि ओम पुरी असे दोनच भारतीय चित्रपट सृष्टीतील असे अभिनेते आहेत की, त्यांनी नाटकांतील अभिनयाचं (नॅशनल स्कुल ऑफ ड्रामा, दिल्ली) आणि चित्रपटांतील अभिनयाचं (फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिटयूट, पुणे) असं दोन्ही क्षेत्रांतील अभिनयाचं रीतसर प्रशिक्षण घेतलेलं आहे. योगायोग ही असा की, ते दोन्ही संस्थांमध्ये एकत्र शिक्षण घेत होते आणि त्यानंतरची त्यांची चित्रपट कारकीर्दही समांतर पद्धतीनं सुरू झाली. नसीर यांनी त्यांचा यशस्वी अभिनय प्रवास एकीकडे सुरू असतानाही प्रशिक्षण संदर्भातील सातत्य राखल आहे. अभिनय आणि दिग्दर्शनासोबतच अभिनयाच्या अनेक कार्यशाळाही घेतल्या आहेत. त्याबाबत करियरच्या सुरुवातीपासूनच त्यांच्यात स्पष्टता होती हेही जाणवतं.

पुण्याच्या फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटमध्ये अभिनयाचं प्रशिक्षण घेतानाच नसीरना त्यांच्या कारकिर्दीतील पहिल्या चित्रपटांत (श्याम बेनेगल यांचा ‘निशांत’) भूमिका मिळाली. ते साल होतं १९७५ आणि बरोबर चार वर्षांनी सन १९७९ मध्ये इंग्रजी व हिंदुस्थानी भाषांतील नाटकांची निर्मिती करण्यासाठी बेंजामिन गिलानी या नाट्य अभिनेत्यासोबत मॉटली थिएटर ग्रुपची स्थापना केली. मॉटली थिएटर ग्रुप मार्फत सॅम्युएल बेकेट यांच्या ‘वेटिंग फॉर गोदो’ या पहिल्या नाटकाची निर्मिती केली आणि त्याचा पहिला प्रयोग मुंबईच्या पृथ्वी थिएटरमध्ये करून एक वर्तुळ पूर्ण केलं.

पृथ्वी थिएटरच्या निर्मिती मागे, ज्यांचा मोठा हातभार आहे, त्या जेनिफर कँडल /कपूर या अभिनेते शशी कपूर यांच्या पत्नी व शेक्सपीअराना ग्रुपचे जेफ्री कँडल यांच्या कन्या आहेत. एवढेच नव्हे तर १९९० मध्ये जेफ्री आणि लॉरा कँडल (शेक्सपिअराना) या दाम्पत्याला व नसीर यांना एकाच वेळी संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार मिळाला. नसीर यांच्यासाठी ही अत्यंत गौरवाची बाब होती. मॉटली थिएटर ग्रुपची नाट्य चळवळ ही सुरुवातीपासूनच पृथ्वी थिएटरशी संबंधित राहिली आहे. मॉटली थिएटर ग्रुप मार्फत नसीर यांनी जागतिक साहित्यातील महत्त्वाचे  शेक्सपिअर, सॅम्युएल बेकेट, एडवर्ड एल्बि, हेरॉल्ड पिंटर, अँटनी चेकॉव्ह, सोफोक्लीज, जॉर्ज बर्नाड शॉ, हारुकी मुराकामी; हिंदीमधील इस्मत चुगताई, सआदत हसन मंटो, मोहन राकेश, कमलनाथ व प्रेमचंद यांच्या साहित्यकृती घेऊन त्याचं रंगमंचीय सादरीकरण केलं. ऐंशीच्या दशकांत पं. सत्यदेव दुबे यांनी मॉटलीच्या नाटकांचे दिग्दर्शन केले. पं. सत्यदेव दुबे यांनी नसीर यांनी केलेल्या ‘निशांत’ या पहिल्या चित्रपटाचे संवाद लिहिले होते. आता अनेक वर्षांपासून स्वतः नसीर आणि रत्ना पाठक-शाह मॉटलीची नाटकं बसवतात. मॉटलीचं आता कार्यक्षेत्रही विस्तारलं आहे आणि नाट्यक्षेत्रातील योगदान ही उल्लेखनीय राहिलं आहे.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

भारतातील समांतर आणि आशयघन चित्रपट चळवळीत ज्यांचा महत्त्वाचा सहभाग आहे, त्या दिग्दर्शक श्याम बेनेगल यांच्या सोबतच नसीर यांच्या चित्रपट कारकिर्दीची (निशांत) सुरुवात झाली आणि बेनेगलांसोबत नसीर यांनी त्यांच्या कारकिर्दीतील सर्वाधिक (सहा) चित्रपटात काम केलं. बेनेगलांनीही नसीर यांच्या अभिनयाप्रति असणाऱ्या समर्पण वृत्तीबाबत वेळोवेळी गौरवोद्गार काढले आहेत. बेनेगलांसोबतच नसीर यांनी भारतीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरांवरील ही महत्त्वाच्या दिगदर्शकांसोबत काम केलं. त्यांत प्रामुख्याने मृणाल सेन (खंडहर), गोविंद निहलानी (आक्रोश, अर्धसत्य), गौतम घोष (पार), सई परांजपे (स्पर्श, कथा), केतन मेहता (भवनी भवाई, मिर्च मसाला ), गुलजार (इजाजत, मिर्झा गालिब, लिबास), सईद अख्तर मिर्झा (अल्बर्ट पिंटो को गुस्सा क्यूँ आता है), कुंदन शाह (जाने भी दो यारो), गिरीश कासारवल्ली (एक घर), शेखर कपूर (मासूम), मीरा नायर (मान्सून वेडिंग), स्टीफन नॉररिंगटोन (The league of extraordinary Gentlemen), पॅन नॅलीन (Valley of Flowers) (२००६), मौलाना वली (खुदा के लिये) पासून ते विशाल भारद्वाज (मकबूल, ओंकारा) आणि होमी अदजानिया (बीइंग सायरस) सारख्या चित्रपटांचा समावेश होतो.

सोबतच नसीर यांनी काही तद्दन व्यावसायिक चित्रपटांमध्येही कामं केली आहेत. नसीर यांनी अमेरिकेतील ९/११ च्या घटनेच्या पार्श्वभूमीवर ‘यूँ होता तो क्या होता’ हा चित्रपटही दिग्दर्शित केला आहे. पण एकूणच त्यांचा चित्रपट प्रवास बघितला तरी त्यांत प्रामुख्यानं भूमिका बघून चित्रपटांची निवड केलेली दिसते. अनेक चित्रपटांत ते त्याबाबतीत यशस्वी झालेले दिसत नाही. तरी एकुणात चांगल्या चित्रपटांचं पारडं जडच झालेलं आहे. रंगभूमीचा रंगकर्मी आणि अर्थगर्भ चित्रपटांमध्ये अभिनेता या दोन्ही माध्यमातून ते यशस्वी झाल्याचं दिसतं.

नसीर FTIIमध्ये प्रशिक्षण घेत असताना त्यांना प्रसिद्ध लेखक, कवी आणि दिग्दर्शक गुलजार शायर मिर्झा गालिब यांच्या आयुष्यावर चित्रपट बनवत असल्याची माहिती मिळाली होती. तेव्हा नसीर यांनी गालिबच्या भूमिकेसाठी स्वतःचा विचार व्हावा आणि गालिबच्या भूमिकेसाठी तेच कसे योग्य आहेत अशा आशयाचं गुलजार यांना पत्र लिहिलं होतं. त्यावेळी गुलजार यांना गालिबवरची फिल्म बनवता आली नाही, परंतु त्यानंतर चौदा-पंधरा वर्षानंतर गुलजार यांनी मिर्झा गालिब यांच्या आयुष्यावर टीव्ही सीरिअलची निर्मिती केली आणि त्यांत नसीर यांनीच गालिबची भूमिका केली. नसीर यांनी या भूमिकेसाठी नकार दिला असता तर मी मिर्झा गालिब सिरीयल बनवली नसती, असेही गुलजारांनी आवर्जून अनेक ठिकाणी नमूद केले आहे. त्यावरून नसीर गालिबच्या अंतरंगाचा किती तरी आधी पासून विचार करत असावेत याचा अंदाज येतो.

नटाचं यश अनेक मुद्द्यांवर अवलंबून असतं. त्यापैकी नटाची निवड त्या भूमिकेसाठी योग्य होती की, नाही हा त्यातला महत्त्वाचा भाग असतो असं खुद्द नसीर यांनीच ‘And then one day’ या आत्मचरित्रात नमूद केलंय. तीच गोष्ट रिचर्ड अॅटेनबॅरो यांच्या ‘गांधी’ चित्रपटाविषयी. रिचर्ड अॅटेनबॅरो गांधींच्या भूमिकेसाठी अभिनेत्याच्या शोधात आहेत, असं कळाल्यावर नसीर यांनी थेट लंडनला जाऊन ती स्क्रीन टेस्ट दिली होती, परंतु त्या भूमिकेसाठी बेन किंग्जले यांची निवड झाली. नसीर यांची  गांधींची भूमिका करण्याची इच्छा तेव्हा फलद्रूप झाली नाही. पण त्यानंतरच्या काळात ती प्रत्यक्षात दोनदा पूर्ण झाली.फिरोझ अब्बास खान यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘गांधी व्हर्सेस गांधी’ (१९९८) या इंग्रजी नाटकांत गांधींची भूमिका करण्याची आणि कमल हसनच्या ‘हे राम’ (२०००) या चित्रपटांत गांधींची भूमिका करण्याची दुसऱ्यांदा संधी मिळाली.

सई परांजपे यांच्या ‘स्पर्श’ या चित्रपटाच्या दरम्यानचा एक किस्सा आवर्जून नमूद करण्यासारखा आहे. नसीर यांच्या पूर्वी त्याने अभिनित केलेली अनिरुद्ध परमार (अजय मित्तल यांच्या व्यक्तिरेखेवर आधारित) त्या दोघांनीही ही भूमिका नाकारल्यानंतर ती भूमिका करण्याचं नसीर यांनी तात्काळ मान्य केलं. त्यांच्याच शब्दांत भूमिकेची निवड यात ही नटाचं यश सामावलेलं असतं. या चित्रपटाचं शूटिंग सुरू होण्यापूर्वी ही भूमिका ज्यांच्यावर आधारित आहे, त्या अजय मित्तल यांचा अभ्यास/निरीक्षण करण्यासाठी नसीर आठवडाभर आधी दिल्लीत पोचले होते. त्यांनी त्या अंध शाळेत राहून भूमिकेचा अभ्यास केला. जेव्हा सई शूटिंगसाठी दिल्लीत पोचल्या, तेव्हा अजय मित्तल येऊन सईना भेटले आणि म्हणाले, “सईजी, आपल्या हिरोला प्लीज जरा आवरा. गेले पाच दिवस तो सतत सावलीसारखा माझ्या मागे मागे आहे. ऑफिसात, वर्गात, प्रार्थनेच्या वेळी, मैदानात... काय सांगू? मला आता बाथरूममध्ये जातानासुद्धा धास्तावल्यासारखं वाटू लागलं आहे.” असं सईंनी त्यांच्या ‘स्पर्श’वरील लेखांत नमूद केलंय. नसीर यांच्या ‘स्पर्श’मधील भूमिकेतून ते व्यक्त होतंच.                    

एनएसडीमध्ये शिकत असताना नसीर यांचा जेरझी ग्रोटॉव्हस्की या पोलिश रंगकर्मींच्या रंगमंचीय संकल्पनांचा परिचय झाला. अभिनयाविषयी मांडलेले ग्रोटॉव्हस्की यांचे विचार व त्यांनी अंगीकारलेली अभिनव प्रशिक्षण पद्धती नसीर यांना खूप प्रभावित करून गेली. तेव्हापासून त्यांना ग्रोटॉव्हस्की यांचेकडे थिएटर शिकण्याची इच्छा होती आणि त्यानुसार अभिनय कारकिर्दीची चांगली सुरुवात होण्याच्या काळात ग्रोटॉव्हस्की यांनी व्हरॉटस्लाव्ह (पोलंड) येथे आयोजित केलेल्या ‘Theatre of sources’ या कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी गेले होते. अभिनयातील मोनोटोनस टाळण्यासाठी आणि अभिनेता म्हणून स्वतःचं क्षितिज विस्तारण्यासाठी नसीर यांना सतत शिकत राहणं आवश्यक वाटतं आणि त्यांनी स्वतःसाठी ही प्रक्रिया सतत सुरू ठेवली आहे.

नसीर आता अडुससष्ट-एकोणसत्तर वर्षांचे आहेत. अजून ते चित्रपटांत कार्यरत आहेत. पण एवढ्यावरच ते थांबले नाहीत, एकीकडे Florian Zeller या फ्रेंच नाटककाराचं ‘The Father’चं दिग्दर्शन आणि त्यांत भूमिका करतात, दुसरीकडे इस्मत चुगताई यांच्या लिखाणावर आधारित ‘औरत, औरत, औरत’ही बसवतात आणि तिसरीकडे मराठीतलं सध्या समीक्षकांनी आणि जाणकारांनी गौरविलेलं तरुण नाटककार प्राजक्त देशमुख यांचं ‘संगीत देवबाभळी’ हे संगीत नाटक आवर्जून जाऊन बघतात.

गुलजार यांनी नसीरवर लिहिलेल्या कवितेच्या ओळी आठवतात,

मैं अदाकार हूँ  लेकिन

सिर्फ अदाकार नहीं                                                                                                            

वक्त की तस्वीर भी हूँ          

.................................................................................................................................................................

लेखिका अंजली अंबेकर चित्रपट समीक्षक, साहित्य अभ्यासक आहेत.

anjaliambekar@gmail.com                        

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal                             

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सिनेमा हे संदीप वांगा रेड्डीचं माध्यम आहे आणि त्याला ते टिपिकल ‘मर्दानगी’ दाखवण्यासाठी वापरायचंच आहे, तर त्याला कोण काय करणार? वाफ सगळ्यांचीच निवते… आपण धीर धरायला हवा…

संदीप वांगा रेड्डीच्या ‘अ‍ॅनिमल’मधला विजय त्याने स्वत:वरच बेतलाय आणि विजयचा बाप बलबीर त्याने टीकाकारांवर बेतलाय की काय? त्यांचं दुर्लक्ष त्याला सहन होत नाही, त्यांच्यावर प्रेम मात्र अफाट आहे, त्यांच्या नजरेत प्रेम, आदर दिसावा, यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे. रेड्डीसारख्या कुशल संकलकानं हा ‘समीक्षकांवरच्या, टीकाकारांवरच्या अतीव प्रेमापोटी त्यांना अर्पण केलेला’ भाग काढून टाकला असता, तर .......