मी भाजपचा राजीनामा का देतोय? जे पाहिले, जे अनुभवले, ते सहनशक्तीच्या बाहेरचे होते, मनाला न पटणारे होते...
पडघम - देशकारण
शिवम शंकर सिंह
  • शिवम शंकर सिंह
  • Tue , 17 July 2018
  • पडघम देशकारण शिवम शंकर सिंह Shivam Shankar Singh नरेंद्र मोदी Narendra Modi भाजप BJP काँग्रेस Congress फेक न्यूज Fake news

शिवम शंकर सिंह या नेत्याने भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. नॉर्थईस्ट राज्यांमध्ये भाजपला विजय मिळवून देणाऱ्या टीमचा तो प्रमुख चेहरा होता. राज्यसभा टीव्ही, झी टीव्ही, एनडी टीव्ही अशा वेगेवेगळ्या न्यूज चॅनेल्सवर त्याच्या मुलाखती प्रसारित झालेल्या आहेत. अमेरिकेतील मिशिगन विद्यापीठातून शिकून आलेल्या शिवमने २०१३ मध्ये मोदींच्या मार्केटिंगला भुलून भाजप जॉईन केले होते. मोदींमध्ये त्याला आशेचा एक किरण दिसत होता. पण त्याने जे पाहिले, जे अनुभवले, ते त्याच्या सहनशक्तीच्या बाहेरचे होते, त्याच्या मनाला न पटणारे होते. म्हणून तो भाजपातून बाहेर पडला आहे. जाताजाता त्याने ‘मी भाजपचा राजीनामा का देतोय?’ या शीर्षकाखाली एक लेख लिहिलाय, त्याचाच हा अनुवाद.

.............................................................................................................................................

आपल्या देशातील राजकीय वातावरण सध्या नीचतम पातळीवर आलेले आहे. लोक आपापल्या नेत्याच्या भक्तीत इतके आकंठ बुडालेले आहेत की, त्यांनी पसरवलेल्या खोट्या बातम्या खोट्या आहेत हे पुराव्यानिशी जरी स्पष्ट केले, तरी त्यांना पश्चाताप होत नाही. वेगवेगळ्या प्रचारयंत्रणा वापरून भाजपने काही विशेष संदेश/मजकूर सामान्य लोकांमध्ये पसरवले आहेत. आणि माझ्या भाजप सोडण्यामागे हे एक प्रमुख कारण आहे.

पण ते संदेश काय आहेत, हे पाहण्यापूर्वी मला तुम्हाला सांगायचे आहे की, कोणताही पक्ष पूर्णपणे चांगला किंवा पूर्णपणे वाईट नसतो. आजवरच्या प्रत्येक सरकारने काही चांगली कामे केली आहेत, तर काही ठिकाणी माती खाल्ली आहे.

भाजपने केलेली काही चांगली कामे

१. रस्तेबांधणीचा वेग पूर्वीपेक्षा वाढलाय.

२. वीजजोडणी असलेल्या घरांची संख्या वाढत आहे. काँग्रेसने पाच लाख गावांपर्यंत वीज पोहोचवली, तर मोदींनी त्यात १८,००० गावांची भर घातली, आणि भाजपच्या काळात भारनियमनाचे तासही कमी झालेले असण्याची शक्यता आहे

३. वरच्या लेव्हलवरचा भ्रष्टाचार कमी झालाय. युपीए-१ प्रमाणेच भाजप सरकारमध्येही मंत्र्यांवर अद्याप तरी भ्रष्टाचाराच्या मोठ्या केसेस नाहीयेत. खालच्या लेव्हलवरचा भ्रष्टाचार मात्र जशास तसा, किंबहुना वाढलेला आहे.

४. ‘स्वच्छ भारत अभियान’ ही एक यशस्वी रोजना आहे. पूर्वीच्या सरकारपेक्षा जास्त टॉयलेट या सरकारने बांधून दिलेत. आणि लोकंही आता स्वच्छतेबद्दल जागरूक झाले आहेत

५. ‘उज्ज्वला’ही अशीच एक चांगली योजना आहे. पण २०१४ पासून आत्तापर्यंत सिलेंडरच्या किमती जवळजवळ दुपटीने वाढल्या आहेत

६. पूर्वोत्तर राज्यांमध्ये रस्ते, रेल्वे आणि विमान यांद्वारे कनेक्टिविटी पूर्वीपेक्षा खूप चांगली झाली आहे, यात वादच नाही. विशेष म्हणजे पूर्वोत्तर राज्यांशी संबंधित असलेल्या विषयांवर आता मुख्य प्रवाहातील माध्यमांमध्ये अधिक चर्चा होत आहे

७. वेगवेगळ्यां राज्यांमध्ये भाजप सरकार आल्यापासून तेथील कायदा आणि सुव्यवस्था प्रथमदर्शनी तरी पूर्वीपेक्षा सुधारल्यासारखी वाटते.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

भाजपने केलेली काही वाईट कामे

एखादा देश आणि व्यवस्था घडवायला कधीकधी दशके, शतके उलटावी लागतात. माझ्या मते भाजपचे सगळ्यात मोठे अपयश हे आहे, की त्यांनी अतिशय क्षुल्लक कारणांवरून काही चांगल्या गोष्टींची वाट लावून टाकली आहे.

१. Electoral Bonds म्हणजेच निवडणूक रोख्यांबाबत भाजप सरकारने जो निर्णय घेतलाय, तो सरळसरळ भ्रष्टाचाराला कायदेशीर मान्यता देण्याचा प्रकार आहे. आपण कोणत्या राजकीय पक्षाला देणगी दिली हे सांगण्याचे बंधन आता मोठमोठ्या कॉर्पोरेट्सवर नाही. त्यामुळे, उद्या एखाद्या मोठ्या कंपनीने त्यांच्या हिताचा कायदा पास करून घेण्यासाठी एखाद्या पक्षाला एक हजार कोटी रुपये किमतीचे निवडणूक रोखे देणगी म्हणून दिले, तर त्याची कसलीही चौकशी होणार नाही. कारण यासंदर्भातली कोणतीही माहिती उघड करण्याचे त्यांच्यावर बंधनच नाही. वरच्या लेव्हलवर भ्रष्टाचार कमी का झाला, याचे हे चांगले उदाहरण आहे.

२. सरकारने सुरू केलेल्या योजनांची किती प्रमाणात अंमलबजावणी झाली, त्याचा किती प्रमाणात आणि काय फायदा होतोय, वगैरे महत्त्वाची माहिती योजना आयोगाच्या रिपोर्ट्समधून मिळायची. भाजप सरकारने योजना आयोगच बरखास्त करून टाकला, त्यामुळे आता सरकार जो डेटा सांगेल, त्यावर विश्वास ठेवण्यावाचून पर्याय नाही. (CAG ऑडिटमधून माहिती मिळू शकते, पण तसे ऑडिट होण्यात बराच वेळ निघून जातो.) योजना आयोगाला बरखास्त करून आलेला नीती आयोग म्हणजे प्रामुख्याने सरकारची पी.आर. एजन्सी आहे.

३. मला जेवढं कळतंय, त्यानुसार सीबीआय आणि एन्फोर्समेंट डिपार्टमेंट (ED) चा वापर फक्त विरोधकांवर दबाव आणण्यासाठीच केला जातोय.

४. अरुणाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कालिखो पुल यांची आत्महत्या, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती लोया यांचा मृत्यू, सोहराबुद्दीन हत्या, बलात्कार आणि बलात्कारितेच्या वडिलांच्या खुनाचा आरोप असलेल्या नेत्याचा बचाव इत्यादी घटनांची चौकशी करण्यात आलेले अपयश.

५. नोटबंदी पूर्णपणे अयशस्वी झाले. पण त्यापेक्षा वाईट म्हणजे ते अयशस्वी प्रकरण हे मान्य करायला भाजप तयार नाही. आतंकवाद्यांची फंडिंग थांबली, कॅशलेस इकॉनॉमी, भ्रष्टाचार थांबला ही त्यासाठी दिली जाणारी कारणे अगदी हास्यास्पद आहेत.

६. GST ज्या गडबड गोंधळात लागू केला, त्यामुळे फायदा होण्याऐवजी नुकसानच झाले. आशा आहे की, येत्या काही काळात सगळे सुरळीत होईल, पण याची अंमलबजावणी करण्यात आपण चुकलो, हेही भाजप कबूल करत नाहीये. हे मुजोरपणाचे लक्षण आहे.

७. फक्त टाळ्या मिळवण्यासाठी केलेल्या परराष्ट्र धोरणाचा पुरता फज्जा उडाला आहे. चीनने श्रीलंकेतील मोक्याच्या ठिकाणी असलेले बंदर आपल्या ताब्यात घेतले आहे. आता पाकिस्तान व बांगलादेशसोबत चीन जवळीक साधत आहे. मालदीवने भारतीय कामगारांना वर्क परमिट आणि बिझनस व्हिसा देणे बंद केले आहे. आणि दुसरीकडे मोदीजी परदेशात जाऊन, ‘भारतीयांना २०१४ पूर्वी जगात कुठेही मान-सन्मान मिळत नव्हता, पण आता सगळीकडे त्यांना मान-सन्मान मिळायला लागला आहे,’ असे सांगत असतात. किती अर्थहीन बोलणे आहे हे! भारतीयांना मिळणाऱ्या मान-सन्मानाला बऱ्याच अंशी आपली आर.टी. इंडस्ट्री आणि पूर्वीपासून सतत वाढणारी अर्थव्यवस्था कारणीभूत आहे. आणि त्याचे छटाकभरही क्रेडिट मोदींना जात नाही. उलट मॉब लिंचिंग, पत्रकारांना मिळणाऱ्या धमक्या वगैरेंमुळे आपली प्रतिमा खराब होत आहे.

८. विविध योजना अयशस्वी ठरत आहेत आणि त्यांचे अपयश कबूल करून त्यात सुधारणा घडवून आणण्याचे कोणतेही प्रयत्न होताना दिसत नाहीयेत. उदा. फसल बीमा योजना, सांसद आदर्श ग्राम योजना, मेक इन इंडिया, स्किल डेव्हलपमेंट इत्यादी. शेतकऱ्यांच्या आणि बेरोजगारांच्या समस्या जाणून घेण्याऐवजी नेते प्रत्येक मुद्याला भाजप सरकार विरोधकांचे षडयंत्र म्हणून आपली जबाबदारी झटकून टाकत आहे.

९. पूर्वी पेट्रोल-डिझेलच्या मुद्यावर काँग्रेसवर तुटून पडणारे भाजपायी आता आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल स्वस्त असूनही पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीचे समर्थन करत आहेत. हे मुळीच स्वीकारार्ह नाही.

१०. शिक्षण आणि आरोग्य या अगदी मूलभूत विषयांकडे दुर्लक्ष होत आहे. शिक्षण क्षेत्रात काहीही बदल होत नाहीयेत, हे देशाचे मोठे अपयश आहे. गेल्या दशकभरात भारतातील सरकारी शाळांची अवस्था दयनीय झालेली आहे, आणि अजूनही त्यात काहीही सुधारणा होत नाहीये. (ASER-असर म्हणजे Annual Status Education चा अहवाल.) गेल्या चार वर्षांमध्ये भाजपने आरोग्याच्या क्षेत्रातही काही केले नाही. यावर्षी सरकारने ‘आयुष्मान भारत’ या योजनेची घोषणा केली आहे, पण आरोग्याच्या क्षेत्रात काहीही न करण्यापेक्षा या स्कीमचीच मला जास्त भीती वाटायला लागली आहे. कारण अशा विमा योजनांचा ट्रॅक रेकॉर्ड चांगला नाहीये.

अशा योजनांद्वारे आपण अमेरिकेच्या अशा पावलावर पाऊल ठेवत आहोत, जे आरोग्य क्षेत्राच्या बाबतीत अतिशय चुकीचे आहे. (मायकल मूर यांची Sicko ही डॉक्युमेंट्री पाहा.)

भाजपने केलेली काही अत्यंत वाईट कामे

भाजपने सगळ्यात वाईट काही केले असेल, तर ते म्हणजे देशातील एकंदरीत सगळेच वातावरण गढूळ करून टाकले आहे. पण हे त्यांचे अपयश नाही, तर त्यांनी अतिशय पद्धतशीरपणे आखलेली योजना आहे.

१. याच स्ट्रॅटेजीचा एक भाग म्हणजे, जे पत्रकार ‘मुद्यांवर’ आवाज उठवत आहेत, त्यांना पेड पत्रकार किंवा काँग्रेसी दलाल ठरवून टाकणे. अशा प्रकारे ते त्या पत्रकारावर वैयक्तिक हल्ले करतात आणि मूळ मुद्दा बाजूलाच राहतो

२. देशात मागील ७० वर्षांत काहीही चांगले झाले नाही, असाही एक अपप्रचार केला जातो. हा तर खोटारडेपणाचा कळस आहे आणि ही मानसिकताच देशासाठी नुकसानदायक आहे. भाजप सरकारने आत्तापर्यंत जाहिरातींवर ४,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च केला आहे. त्यांना पाहिजेत तशाच गोष्टी आता ते आपल्या मनावर बिंबवतील. उदा. मोदी काही पहिले नाहीत ज्यांनी रस्ते बांधलेत. (मी आजवर प्रवास केलेले सगळ्यात चांगले रस्ते मायावती आणि अखिलेश यादव यांनी बांधलेत.) भारत IT ची महासत्ता ९० च्या दशकातच झाला होता.

३. भाजपची मदार ‘फेक न्यूज’ आणि तिच्या प्रसारावर अवलंबून आहे. इंटरनेटवर काही अँटी-भाजप फेक न्यूज बनवणाऱ्या वेबसाईट्सही आहेत, पण भाजपच्या वेबसाईट्सपुढे त्यांची संख्या अगदीच नगण्य आहे. या अशा वेबसाईट्सना सरकारचा जो राजाश्रय मिळतोय, त्यामुळे आपल्या समाजाचे खूप नुकसान होत आहे, हेच मुळी आपल्याला कळत नाहीये.

४. ‘हिंदू खतरे में है, और सिर्फ मोदीजी ही अब हिंदूओं को बचा सकते है।’ ही भावना लोकांच्या मनात निर्माण करण्यात भाजप बऱ्याच अंशी यशस्वी झाली आहे. हे सरकार आल्यापासून अनेक लोकांची विचारसरणीच बदूलन गेलीये. आपण हिंदू २००७ मध्येसुद्धा धोक्यात होतो का? मी तर त्यावेळी हे वाक्य कधीही ऐकले नव्हते. हिंदूंच्या राहणीमानात काही सुधारणा घडवून आणण्याऐवजी उलट भाजपने हिंदूंच्याच मनात भीतीची आणि द्वेषाची भावना निर्माण केली आहे.

५. सरकारविरोधात काही बोलाल, तर तुम्हाला लगेच देशद्रोही ठरवले जाते. आणि सध्या हिंदूविरोधी ठरवले जात आहे. भाजप नेत्याना स्वतःला ‘वंदे मातरम्’ म्हणता येत नाही, पण ते दुसऱ्याला बळजबरीने वंदे मातरम् म्हणायला सांगतात आणि त्यावरून इतरांची देशभक्ती मोजतात. मला स्वतःला माझ्या राष्ट्रवादी असण्याबद्दल अभिमान आहे आणि मला माझा राष्ट्रवाद दाखवण्यासाठी कोणाच्याही प्रशस्तिपत्राची गरज नाही. जिथे गरज असेल तिथे किंवा मला जेव्हा वाटेल, तेव्हा मी जन गण मन म्हणेन किंवा वंदे मातरम् म्हणेन. ते म्हणण्यासाठी मी माझ्यावर कोणाला जबरदस्ती करू देणार नाही.

६. हिंदू-मुस्लिम, देशभक्त-देशद्रोही, भारत-पाकिस्तान... हे वादसंवाद २४ तास चालवणारे काही न्यूज चॅनल्स भाजप नेत्यांचेच आहेत. यांचा मुख्य उद्देश जनतेचे लक्ष दैनंदिन जीवनाशी निगडित असलेल्या प्रश्नांवरून, मुद्यांवरून हटवून तुम्हाला हिंदू-मुस्लिम, देशभक्त-देशद्रोही, भारत-पाकिस्तान यात अडकवण्याचा आहे.

७. विकासाचा मुद्दा तर कधीचाच बाद झालेला आहे. पुढील निवडणुकांसाठी भारतीय समाजाचे मोठ्या प्रमाणात ध्रुवीकरण करणे आणि पोकळ देशभक्तीला प्रोत्साहन देणे, हीच भाजपची रणनीती आहे. मोदींनी स्वतःच अनेक वेळा फेक न्यूज पसरवलेल्या आहेत.

.................................................................................................................................................................

​Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/

Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1

Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama

Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4

Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6

.................................................................................................................................................................

काँग्रेस नेते भगतसिंगांना भेटायला गेले नव्हते, मनमोहन सिंह गुजरातमध्ये पाकिस्तानची मदत घेत आहेत, जीना, नेहरू, तुकडे-तुकडे गँग, जेएनयू... हा सगळा एक पद्धतशीरपणे केला जाणारा अपप्रचार आहे. लोकांची माथी भडकवा, दंगल घडवून आणा आणि निवडणुका जिंका. मला माझ्या नेत्याकडून हे सगळे ऐकायचे नाहीये. अशा नेत्याचे मी आता समर्थन करू शकत नाही, जो स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी सगळ्या देशाला दंगलीच्या आगीत ढकलू शकतो.

ही फक्त काही मोजकीच उदाहरणे आहेत, ज्याद्वारे भाजप देशाची वाट लावत आहे. मी यासाठी भाजप जॉईन केलेली नव्हती. आणि मी आता याचे समर्थनही करू शकत नाही. म्हणून मी आज भाजपतून बाहेर पडत आहे.

ता. क.

२०१३ मध्ये मोदींमध्ये मला देशाच्या उज्ज्वल भविष्याचा एक आशेचा किरण दिसत होता. मी त्यांच्या विकासाच्या मॉडेलला भुललो होतो. आज विकासाचे ते मॉडेलही गायब झालेले आहे आणि आशेचा तो किरणही गायब झालेला आहे. मोदी-शहा सरकारच्या रचनात्मक कामांपेक्षा त्यांच्या विघातक कामांचीच यादी मला खूप मोठी दिसत आहे.

लक्षात ठेवा, ‘अपप्रचाराला बळी पडणे’ आणि ‘एखाद्याची आंधळी भक्ती करणे’ याच्याएवढे वाईट काम दुसरे कोणतेही नसेल. असे करणे लोकशाही आणि देशहिताच्या विरोधात आहे. निवडणुका आल्यावर तुम्ही तुमचा काय तो निर्णय घ्या. त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा.

आपली विचारधारा किंवा आपला पक्ष कोणताही असो, पण आपल्या सगळ्यांना गुण्यागोविंदाने एकत्र राहता येईल, एकत्र काम करता येईल आणि एक विकसित भारत बनवता येईल याची काळजी घ्या.

.............................................................................................................................................

अनुवाद : सौरभ सुरेश सावंत

Ssaurabh2008@yahoo.com

.............................................................................................................................................

(‘साधना’ साप्ताहिकाच्या १४ जुलै २०१८च्या अंकातून)

.............................................................................................................................................

मूळ इंग्रजी लेखासाठी पहा -

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

Post Comment

vishal pawar

Sun , 22 July 2018


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

भाजपच्या ७६ पानी ‘जाहीरनाम्या’त पंतप्रधान नरेंद्र मोदींची तब्बल ५३ छायाचित्रं आहेत. त्यामुळे हा जाहीरनामा आहे की, मोदींचा ‘छायाचित्र अल्बम’ आहे, असा प्रश्न पडतो

काँग्रेसच्या ४८ पानी जाहीरनाम्यात राहुल गांधींची फक्त पाच छायाचित्रं आहेत. त्यातली तीन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत आहेत. याउलट भाजपच्या जाहीरनाम्याच्या मुखपृष्ठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीमागे बळंच हसताहेत अशा स्वरूपाचं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचं छायाचित्र आहे. त्यातली ‘बिटवीन द लाईन’ खूप सूचक आणि स्पष्टता सूचित करणारी आहे.......

जर्मनीत २० हजार हत्तींचा कळप सोडण्याची धमकी एका देशाने दिली आहे, ही ‘हेडलाईन’ जगभरच्या प्रसारमाध्यमांमध्ये गाजतेय सध्या…

अफ्रिका खंडातील बोत्सवाना हा मुळात गरीब देश आहे. त्यातच एवढे हत्ती म्हणजे दुष्काळात तेरावा महिना. शेतांमध्ये येऊन हत्ती मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान करत असल्याने शेतकरी वैतागले आहेत. याची दखल बोत्सवानाचे अध्यक्ष मोक्ग्वेत्सी मेस्सी यांनी घेतली आहे. त्यामुळेच त्यांनी संतापून एक मोठी घोषणा केली आहे. ती म्हणजे तब्बल २० हजार हत्तींचा कळप थेट जर्मनीमध्ये पाठवण्याची. अनेक माध्यमांमध्ये ही ‘हेडलाईन’ गाजते आहे.......

महाराष्ट्राच्या राजकारणाचा हा ‘खेळखंडोबा’ असाच चालू राहू द्यायचा की, त्यावर ‘अक्सिर इलाज’ करायचा, याचा निर्णय घेण्याची एकमेव ‘निर्णायक’ वेळ आलेली आहे…

जनतेला आश्वासनांच्या, ‘फेक न्यूज’च्या आणि प्रस्थापित मीडिया व सोशल मीडियाद्वारे भ्रमित करूनही सत्ता मिळवता येते, राखता येते, हे गेल्या दहा वर्षांत भाजपने दाखवून दिले आहे. पूर्वी सत्ता राजकीय नेत्यांना भ्रष्ट करते, असे म्हटले जायचे, हल्ली सत्ता भ्रष्ट राजकीय नेत्यांना ‘अभय’ वरदान देण्याचा आणि एकाधिकारशाही प्रवृत्तीच्या राजकारण्यांना ‘सर्वशक्तिमान’ होण्याचा ‘सोपान’ ठरू लागली आहे.......