...आणि मी देशातील ‘पहिली तृतीयपंथीय प्राचार्य’ बनले!
ग्रंथनामा - झलक
मनोबी बंदोपाध्याय
  • ‘होय, मी स्त्री आहे!’ या आत्मकथनाचं मुखपृष्ठ
  • Sat , 14 July 2018
  • ग्रंथनामा Granthnama झलक होय मी स्त्री आहे Hoy Mi Stree Aahe मनोबी बंदोपाध्याय Manobi Bandyopadhyay

देशातील पहिल्या तृतीयपंथी प्राचार्या मनोबी बंदोपाध्याय यांचं ‘होय, मी स्त्री आहे!’ हे मनमोकळं आत्मकथन नुकतंच विश्वकर्मा पब्लिकेशन्सतर्फे प्रकाशित झालं आहे. या पुस्तकाचा मराठी अनुवाद सीमा भानू यांनी केला आहे. या पुस्तकाला लेखिकेनं लिहिलेल्या मनोगताचा संपादित अंश…

.............................................................................................................................................

ट्रॅफिक सिग्नलला थांबला असताना मोटारीच्या काचेबाहेर पैसे मागणाऱ्या किन्नराला पाहून तुम्ही कितीदा आपलं तोंड दुसरीकडे फिरवलं आहे? या वेळी तुमच्या मनात फक्त घृणा असते. हो ना? पण, जेव्हा एखादी भिकारी स्त्री तिच्या मुलाबरोबर भीक मागते, तेव्हा तुम्हाला इतका तिटकारा येत नाही. का? मी सांगते का ते. याचं कारण आहे- त्या किन्नराचं लैंगिक वेगळेपण. ही व्यक्ती आपल्यापेक्षा वेगळी आहे हे तुम्हाला जाणवतं. त्यामुळेच तुम्हाला ती विचित्र प्राण्यासारखी वाटते. कदाचित गुन्हेगारही आणि अमानुष तर नक्कीच.

मी त्या सगळ्यांपैकी एक आहे. आयुष्यभर मला हिजडा, बृहन्नडा, नपुंसक, खोजा, लौंडा अशा नावांनीच ओळखलं गेलंय आणि मी इतरांसारखी नाही याची जाणीव बाळगतच मी आयुष्य घालवलंय. मला याचं दु:ख नाही का वाटत? वाटतं ना. खरं तर या सगळ्यामुळे मी जखमी झालेय असं म्हणणं अधिक बरोबर आहे. पण, अगदीच वापरून शिळं झालेलं वाक्य वापरायचं तर, ‘काळ हे मोठं औषध आहे.’ मात्र हे सुभाषित माझ्या बाबतीत थोडं वेगळं ठरलंय. जखम ओली आहेच; पण वेदना मात्र काळाबरोबर थोडी कमी झाली आहे. मी एकटी असताना मात्र ती मला सामोरी येतेच. आणि मीच मला माझ्या अस्तित्वाबद्दल प्रश्न विचारते, ‘मी कोण आहे? मी स्त्री असूनही पुरुषाच्या शरीरात का कोंडली गेले? माझ्या नशिबात आहे तरी काय?’

माझ्या उत्फुल्ल बाह्य शरीरात स्वातंत्र्यासाठी तडफडणारं जखमी मन आहे. ते स्वतःच्या इच्छेनुसार आणि मी जशी आहे तसं जगू पाहतेय. मी आहे तशी मला स्वीकारलं जावं यासाठी माझी धडपड आहे. वरवर पाहता, मी खंबीर आणि बेपर्वा दिसत असले, तरी माझा हळवेपणा झाकण्यासाठीचा तो मुखवटा आहे. माझ्यासारख्या इतरांच्या वाट्याला सहसा येत नाही असं यश सुदैवानं मला लाभलंय. पण, मी वेगळ्या वाटेवर गेले असते तर? हे सुखाचे दिवस आहेत आणि ‘मी आनंदी असलं पाहिजे,’ असं मी स्वत:ला सांगत असले, तरी आतून मला भीती वाटते. माझा आतला आवाज मला सांगतो की, आजूबाजूची प्रसिद्धी, सुख साजरं करणं ही निव्वळ माया आहे, भ्रम आहे. आणि मी माझं यश संन्यस्त वृत्तीनं स्वीकारायला हवं.

एका तृतीयपंथी व्यक्तीला प्राचार्यपद लाभणं हे पहिल्यांदाच घडत होतं आणि माध्यमांनी त्याला खूप प्रसिद्धी दिली. माझा फोन अभिनंदनासाठी सतत खणखणत होता आणि सत्काराच्या आमंत्रणांनी माझं टेबल अपुरं पडत होतं. मी आहे, तशी मला लोकांनी स्वीकारलं आहे अशी समजूत करून घ्यायला मला नक्कीच आवडलं असतं. पण मग त्यांचं ते ओठ दाबून उपहासात्मक हसणं? कितीही लपवलं, तरी ते लपत नाहीच. त्यांच्यासाठी मी एक तमाशा बघायचं, चेष्टा करायचं साधन आहे. आणि अशी दुसऱ्याची मजा बघायला कुणाला आवडत नाही?

दुखावलं जाणं आणि राग येणं या दोन भावनांना आवर घालायला मी शिकले आहे. तो माझ्या जगण्याचा भाग झाला आहे. मी आयुष्यात जे काही यश कमावलंय, त्याची माझ्या आजूबाजूच्या लोकांना काही किंमत नाही, हे मी अखेर मान्य केलं आहे. त्यांच्या मते, दोन मांड्यांच्या मधलं लिंग महत्त्वाचं. आणि ते माझ्याकडे नसणं हीच माझी एकमेव ओळख. मला भावना असण्याचा हक्क आहे, हे बहुतेकांच्या खिजगणतीतच नाही. मी या लोकांना दोष नाही देत. मी त्यांच्याकडे अजूनही दुर्लक्ष करू शकलेले नाही, ही माझीच चूक आहे.

माझ्या ५१ वर्षांच्या आयुष्यात मला प्रेम मिळालंच नाही असं अजिबात नाही. जोपर्यंत ते टिकलं, तोपर्यंत त्यांचा अनुभव चांगलाच होता. अनेकदा माझे प्रेमभंग झाले; पण दर वेळेस मी नवीन धडा शिकत गेले. जेव्हा प्रेमात पडले, तेव्हा मी सर्वस्व ओतून प्रेम केलं. माझे साथीदार आज जिथे कुठे असतील, तिथे ते एवढी गोष्ट तरी लक्षात ठेवतील अशी आशा आहे. मात्र माझी अशी नाती कधीच टिकली नाहीत. माझ्यावर प्रेम केलेले सगळेच मला या ना त्या वळणावर सोडून गेले. आणि दर वेळी त्यांच्याबरोबर माझ्या आयुष्याचा एक भागही तुटून गेला.

आज माझी ही गोष्ट सांगताना माझ्या मनात आठवणींची गर्दी झाली आहे. माझ्यासारख्या लोकांना समाजाने अधिक समजून घ्यावं हा माझ्या लेखनामागचा हेतू आहे. आम्ही बाहेरून थोडे वेगळे असू; पण आतून आम्ही तुमच्यासारखीच माणसं आहोत. आम्हालाही तुमच्यासारख्याच शारीरिक आणि भावनिक गरजा आहेत, हेच मला सांगायचं आहे.

…………………

मी माझी नोकरी कशीतरी टिकवून धरली होती, कमाईचा तेवढा एकच मार्ग माझ्याजवळ होता. परिचयाचं झाल्यामुळे महाविद्यालय त्या वेळी मला सुसह्य वाटत असावं की, मी त्या अपमानास्पद नात्याला आणि त्याच्यानंतरच्या परिणामांना पुरून उरले होते? माझे सहकारी अजूनही मी अमानवी असल्यासारखंच मला वागवत होते. त्यांच्या दृष्टीनं मला त्यांच्याबरोबर स्टाफ- रूममध्ये बसण्याचा हक्क नव्हता. प्राध्यापक म्हणून त्यांना ज्या सोयी मिळत, त्या वापरायचाही अधिकार नव्हता. शिक्षक संघटनेच्या चर्चेत किंवा त्यांच्या एकत्रित कार्यक्रमांत ते मला सहभागी करून घेत नसत. गरीब आणि अभ्यासात मागे असलेल्या विद्यार्थ्यांसाठी मी जे वर्ग, शिकवण्या घेत होते, त्या मात्र थांबवणं त्यांना शक्य होत नव्हतं. संघटनेनं चिथावणी दिल्यानं बहुसंख्य विद्यार्थी माझ्या विरोधात असले, तरी माझ्या विभागातले काही जण अजूनही माझ्या बाजूचे होते.

कल्पतरू भवनातील माझ्या घरी परत येणं मला नकोसं वाटायचं. तिथला कोपरानकोपरा मला अरिंदमची आणि त्याच्या विश्वासघाताची आठवण करून द्यायचा. मुखर्जी कुटुंबीय माझ्या विरोधात गेलं होतं. आणि मला घराबाहेर काढण्यासाठी त्यांचे सतत प्रयत्न सुरू होते. अखेर, कनक मुखर्जींनी माझ्याकडून भाडं स्वीकारायला नकार दिला. घरमालक आणि भाडेकरू यांच्या वादात मध्यस्थी करणारी सरकारी भाडे नियम अधिकार संस्था होती, तिच्यामार्फत मी त्यांना भाडं देऊ लागले. पण मी भाडं देत नसून त्यांच्या जागेवर अतिक्रमण केल्याचं कनक सगळ्यांना सांगू लागले. सुरुवातीला

आमचे संबंध चांगले असल्यानं त्यांनी भाडंपावती कधीच दिली नाही, तरी मी त्याकडे दुर्लक्ष केलं होतं. आता मात्र त्यांनी याचाच माझ्याविरुद्ध उपयोग केला. पण आपण सहजासहजी हे घर सोडायचं नाही असं मी ठरवलं होतं. एकतर माझ्याकडे दुसरी जागाही नव्हती, ना मला कुणी मित्र होते.

एकाकीपण आणि निराशा या दोन्ही गोष्टी मला सहन होत नव्हत्या. मी मद्यपान आणि धूम्रपान करतच होते. आता झोप येण्यासाठी मी झोपेच्या गोळ्याही घेणं सुरू केलं. मी ठीक आहे ना हे पाहण्यासाठी माझे आई-वडील, बहिणी मला नेमानं फोन करत. माझं दु:ख मी त्यांच्यापासून लपवू शकत नव्हते. माझी आई हताश होऊन खूप रडायची. पण? नोकरी सोडून माझ्याजवळ ये, हे म्हणण्याचं धाडस तिच्यात नव्हतं. शेवटी, माझ्या मोठ्या बहिणीनं माझ्या मदतीसाठी काम करणारी एक बाई पाठवली. तिच्यामुळे स्वयंपाक, स्वच्छता मला करावी लागत नसल्यानं आणि घरात सोबत असल्यानं माझं आयुष्य नक्कीच सुसह्य झालं.

छोबीच्या दुहेरी भूमिकेचा पत्ता मला लागल्यावर ती लगेचच सोडून गेली होती. बिठीने सहजपणे तिची जागा घेतली. ती माझी चांगली काळजी घ्यायची आणि लवकरच मी तिच्यावर अवलंबून राहू लागले. काम करणाऱ्या बाईपासून प्रगती करत ती हळूहळू माझी साहाय्यकच बनली. मी तिला सगळीकडे घेऊन जायची. माझी औषधं वेळेवर देणं, माझे कपडे, पादत्राणं तयार ठेवणं, माझे आवडते पदार्थ बनवणं, माझ्या मेकअपला मदत करणं, सगळीकडे बिठी असायचीच. पण, हळूहळू तिनं माझ्या आयुष्यात ढवळाढवळ करायला सुरुवात केली. तिनं माझ्यावर इतका मालकीहक्क गाजवायला सुरुवात केली की, मला भेटायला येणाऱ्या प्रत्येकाची ती चौकशी करायची आणि मी त्यांच्याबरोबर बोलायचं की नाही हे ठरवायची. सुरुवातीला माझ्याबद्दलच्या खऱ्याखुऱ्या काळजीनं ती हे करत आहे असं वाटून, मी त्याकडे दुर्लक्ष केलं. पण नंतर माझ्या लक्षात आलं की, या गोष्टीनं तिला आता पछाडलं आहे. कोलकातामधील सार्वजनिक संमेलनांना आठवड्याच्या अखेरीस किंवा सुट्टीच्या दिवशी मी जात असे. ती माझ्याबरोबर येई. माझ्या वतीनं संभाषणात हस्तक्षेप करायचा प्रयत्न करे. विशेषतः पुरुषांशी ती उर्मटपणे वागे. त्यांना माझ्यापासून दूर ठेवायचा प्रयत्न करे. छोबीप्रमाणेच बिठीनेही मला येणारं नैराश्य, धूम्रपान आणि मद्यपानावर माझं अवलंबून असणं याबद्दल माझ्या कोलकातातल्या बहिणीला सांगितलं. आणि यासाठी ती माझाच फोन वापरायची! सोबतीसाठी मी माझं स्वातंत्र्य आणि खाजगीपणा पुन्हा एकदा गमावत आहे, हे मला जाणवत होतं.

हल्दिया पोर्ट ट्रस्ट तर्फे आयोजित एका समारंभाला मला निमंत्रण होतं. तिथं गोष्टी थोड्या हाताबाहेर गेल्या. बिठीनं मूर्खासारखं वागायला सुरुवात केली आणि माझ्या मित्रांनी तिची सरळ टर उडवायला सुरुवात केली. तिचा शिरजोरपणा त्रासदायक आणि अडचणीत टाकणारा आहे, असं एक जण म्हणाला. एखाद्या सहायकानं त्याच्या मालकाच्या गोष्टींमध्ये इतकी मुक्त ढवळाढवळ करावी, यामुळे ते आश्चर्यचकित झाले होते.

इतके दिवस मी बिठीच्या मूर्खपणाकडे हसून दुर्लक्ष करायची. माझ्यासाठी ती जे काही करत होती, त्याची प्रशंसा म्हणून मी तिला कुटुंबातल्या व्यक्तीसारखंच वागवायला सुरुवात केली होती. माझा अति भावनिक स्वभावही याला कारणीभूत होता. मला एखादी व्यक्ती आवडली, तर मी कसल्याही परिणामांचा, तर्काचा विचार न करता माझ्या हृदयाचं ऐकते. या स्वभावामुळेच प्रत्येक नात्यात मी अडचणीत सापडले आहे. बिठी तर मला जवळची होतीच; पण तिला खूश ठेवण्यासाठी फॅशनेबल कपडे, दागिने घेऊन देऊन मी तिचे लाडही पुरवायचे. पण, ती माझा गैरफायदा घेते आहे असं जेव्हा लक्षात आलं, तेव्हा मी तिला तोडून टाकलं. जेव्हा एकाकीपण आणि सोबत यांमध्ये निवड करायची वेळ येते, तेव्हा एकाकीपणच मला अधिक वैयक्तिक स्वातंत्र्य देतं, असा माझा अनुभव आहे.

पण आयुष्यानं मला फार काळ एकटं राहू दिलं नाही. मी शाळेत शिकवायचे, तेव्हापासून ओळखीचा असलेला एक मित्र पुन्हा माझ्या आयुष्यात आला. आणि सगळं संपलं असं वाटत असताना त्यानं माझा हात धरून मला पुढे चालवलं.

आम्ही दोघांनीही आमचं मन फोनवर एकमेकांसमोर मोकळं केलं. अनेक वर्षांचा दुरावा विरघळून गेला आणि आम्ही आमच्या दु:खामुळे का होईना; पण एकत्र आलो असं वाटलं. निराशेतून प्रेम उमललं. मी माझा एकाकीपणा सहन करू शकत नव्हते आणि तो आपल्या पत्नीपासून दूर झाला नसला, तरी त्याचं लग्न फारसं यशस्वी ठरलं नव्हतं. आम्ही भेटायचं ठरवलं. आणि भेटल्याक्षणीच त्यानं मला लग्न करण्याबद्दल विचारलं. माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच कुणी पुरुष मला लग्नाची मागणी घालत होता. मी भारावून गेले; पण तर्कानं भावनेवर मात केली. मी विवाहित व्यक्तीशी लग्न करू शकत नव्हते आणि त्याचं लग्न मोडण्याचा माझा कुठलाही इरादा नव्हता. पण त्याच वेळी ज्याच्या प्रेमामुळे आणि एकनिष्ठतेमुळे माझ्या निरस जीवनाला काही अर्थ लाभेल असा मित्र दिल्याबद्दल मी देवाचे पुन्हा एकदा आभार मानले.

आमच नातं मात्र फार काळ टिकलं नाही. हळूहळू माझ्या लक्षात आलं की, किशालय माझ्यासाठी झपाटल्यासारखा झाला आहे आणि मला सतत संरक्षण देऊ पाहतोय. माझं मोकळं वागणं, सहज मैत्री करणं त्याला आवडायचं नाही. मी परिसंवादांना उपस्थित राहिले किंवा शैक्षणिक दौऱ्यासाठी दुसऱ्या महाविद्यालयांना भेटी दिल्या, तर ते त्याला आवडायचं नाही. कारण, माझी इतर पुरुष शिक्षकांशी मैत्री होईल अशी भीती त्याला वाटायची. लवकरच, परिस्थिती अधिकच बिघडली आणि मी परिसंवादांना उपस्थित राहणं थांबवलं नाही, तर मारहाण करण्याची धमकी त्यानं मला दिली. माझं झारग्राममधल्या लोकांबरोबर पटत नव्हतं, त्यामुळे मी तिथं असताना त्याला कदाचित अधिक सुरक्षित वाटायचं. या नात्यात मी गुदमरू लागले होते. आणि मोकळ्या श्वासासाठी तगमगत होते. महिषदल राज महाविद्यालयात आशापूर्णादेवींवर एक परिसंवाद होता. त्यात बोलण्यासाठी तिथले बंगाली विभागप्रमुख प्रभास रॉय यांनी मला निमंत्रण दिलं. मी तिथं जाणार आहे आणि महिषदल झारग्रामपासून दूर असल्यानं रात्री मुक्कामही करणार आहे, हे किशालयला कळलं तेव्हा तो संतापला. त्यानं मला शिवीगाळ केली आणि ‘झारग्रामच्या बाहेर पाऊल जरी टाकलं, तरी होणाऱ्या परिणामांना तयार राहा’ अशी धमकीही दिली. आता बस्स झालं असं वाटून मी आमचं नातं संपवून टाकलं. किशालयबरोबर नातं तोडणं आमच्या दोघांसाठी सोपं नव्हतंच; पण मी ते पाऊल उचलून पुन्हा स्वातंत्र्याचं स्वागत केलं. मी या वेळी भीष्मप्रतिज्ञेसारखी एक प्रतिज्ञाही केली. पुन्हा कधीही अशा शारीरिक नात्यात अडकायचं नाही. २०११ पासून पुरुषांचे सलगीचे प्रयत्न टाळत मी ही शपथ पाळली आहे.

…………………

शेवटी, मी त्या परिसंवादात भाग घेतलाच. प्रभास रॉय यांनी माझं चांगलं आदरातिथ्य केलं. मला मोकळं तर वाटत होतंच, त्याचबरोबर प्राध्यापक आणि विद्यार्थी यांच्या भरभरून प्रतिसादानंही मी आनंदून गेले. मला काही हवं-नको पाहायला, माझ्याशी बोलायला विद्यार्थ्यांचा एक गट सतत माझ्याबरोबर होता. त्यांच्यापैकी एका गोर्‍या, बारीक मुलानं माझं लक्ष वेधून घेतलं. परक्या ठिकाणी मला काही अडचण येऊ नये यासाठी तो विशेष दक्ष होता. अगदी पाण्याचा ग्लास किंवा चहाचा कप मागायच्या आधीच समोर यायचा. मी खाता-पितानाही त्याचं बारीक लक्ष होतं आणि मी व्यवस्थित खावं यासाठी तो आग्रहही करत होता. या मुलाबद्दल मला वेगळीच ममता वाटली. तो इतका निरागस आणि चांगल्या स्वभावाचा वाटत होता की, मी त्याची प्रभास रॉय यांच्याकडे चौकशी केली. काहीसं वैतागूनच त्यांनी सांगितलं की, हा देवाशीष. विभागातल्या दंगेखोर, त्रास देणार्‍या मुलांपैकी एक आहे आणि अभ्यासातही यथातथाच आहे. मला जरा विचित्र वाटलं. ‘त्रास’ या शब्दाचं त्या सौम्य आणि प्रेमळ चेहर्‍याशी नातं जुळत नव्हतं.

दुसर्‍या दिवशी मी निघताना इतरांच्या आधी देवाशीष हजर होता. माझ्या हृदयाच्या तारा पुन्हा एकदा छेडल्या गेल्या. मला विचित्रही वाटत होतं आणि त्याच्या चेहर्‍याकडे बघताना दु:खही होत होतं. ‘मॅडम, मी तुम्हाला मदत करू का?’ त्यानं विचारलं. मला काय वाटलं कुणास ठाऊक; पण मी त्याला म्हटलं, ‘मॅडम ऐवजी तू मला ‘मा’ म्हणशील का?’ तो माझ्याकडे अविेशासानं पाहतच राहिला. नंतर काही क्षणांतच मान होकारार्थी डोलवत तो म्हणाला, ‘मा!’ माझ्यावर त्या शब्दांनी जणू जादू केली. काही क्षण काय प्रतिक्रिया द्यावी हे न सुचून मी तशीच उभी राहिले आणि मग मला जाणवलं की आपल्या गालांवरून अश्रू ओघळताहेत. त्या मुलाचा शरमलेला, घाबरलेला चेहरा पहिला आणि मी स्वतःला सावरलं. मी माझा नैहाटीचा पत्ता, फोन नंबर देवाशीषला दिला आणि कुठल्याही आठवड्याच्या शेवटी भेटायला यायला सांगितलं. खूश होऊन त्यानं यायचं वचन दिलं.

मी त्या मुलाचा आणि त्यानं पटकन मला ‘मा’ म्हणून मारलेल्या हाकेचा राहूनराहून विचार करत राहिले. ती हाक पुन्हा ऐकण्यासाठी मी तहानले होते. डॉ. खन्नांनी माझ्या बाबतीत चमत्कार घडवला असला, तरी जैविकदृष्ट्या मला गर्भधारणा होणार नव्हती, त्यामुळे ‘आई होणं’ हा त्या वेळेपर्यंत अप्राप्य असा विचार होता. मला मूल दत्तक घ्यायचा पर्याय खुला होता; पण माझा एकटेपणा आणि तृतीयपंथी असणं हे त्यासाठी फारसं योग्य ठरणार नाही म्हणून मी त्याचा फारसा विचार केला नव्हता. पण, आता आई होण्याच्या या शक्यतेनं मला उत्साह वाटला.

…………………

तृणमूल काँग्रेस मे २०११ मध्ये सत्तेवर आली. आणि इतिहास घडला. ३४ वर्षांची मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष पुरस्कृत सत्ता संपुष्टात आली. वर्डस्वर्थच्या प्रसिद्ध ओळी वापरायच्या, तर ‘It was a famous victory.’ ममता बॅनर्जी यांनी विधानसभा निवडणूक अक्षरश: खेचून नेली. आणि राज्यात बदलाचे वारे आणले. त्याला सगळयांनी ‘परिवर्तन’ असं संबोधलं. राज्यात खरंच काही बदल घडलाय का अशी शंका शंकेखोरांना वाटत असली, तरी माझ्यासाठी हा सत्ताबाबद्दल म्हणजे स्वर्गातून झालेली खैरात होती. राज्याच्या आधीच्या उच्च शिक्षणमंत्र्यांना जी गोष्ट समजायला इतके दिवस लागले, ती त्यांच्या उत्तराधिकाऱ्याला, ब्रात्य बसू यांना समजायला काहीच वेळ लागला नाही. नाटककार आणि बुद्धिवंत असलेले बसू मला चांगलं ओळखत होते आणि त्यांना माझ्याबद्दल सहानुभूतीही होती. सोमनाथ आणि मनोबी यांनी मिळवलेल्या पदव्या आणि त्यांचं कर्तृत्व हे एकाच व्यक्तीचं आहे हे जोपर्यंत नवीन सरकार मान्य करत नाही, आणि माझ्यावरचा अनेक वर्षांचा अन्याय दूर करत नाही, तोपर्यंत आहे त्या महाविद्यालयात राहायला त्यांनी मला सांगितलं. पण दीदी, म्हणजे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना माझ्याबद्दल माहिती होती आणि त्यांनी मला या समस्येतून बाहेर काढून न्याय द्यायचं ठरवलं. एका प्रसिद्ध वचनानुसार, आयुष्यात एकूण तीन वेळा प्रत्यक्ष देव तुमचा हात धरून तुम्हाला प्रकाश दाखवतो. हा तसा क्षण होता. त्यांच्या सूचनांनुसार राज्याचा उच्च शिक्षण विभाग आणि मुख्यतः सार्वजनिक सूचना विभागाचे उपसंचालक यांनी काम करायला सुरुवात केली. त्यांनी माझ्या आधीच्या कामगिरीतील समतोलता तपासून त्या एकाच व्यक्तीच्या आहेत हे स्पष्ट करणारी औपचारिकता पूर्ण केली, ज्यामुळे आधीची थकबाकी मिळण्यास मी पात्र ठरले. माझे सहकारी यामुळे चकितच झाले. पण आता राजकीय परिस्थितीत मोठा बदल घडला होता. त्यामुळे कुणी माझी किंवा माझ्या नवीन स्थानाची चेष्टा करायला धजावले नाहीत.

या वेळी मी माझ्या नोकरीत बदल व्हावा यासाठी प्रयत्न करत होते. माझ्या आजारी वडिलांसाठी मला झारग्राम सोडून कोलकाताजवळ जायची गरज होती. माझ्या आईला मेंदूचा पक्षाघात झाला होता आणि बरीच वर्षं अंथरुणाला खिळून राहिल्यानंतर तिचं मार्च २०११ मध्ये निधन झालं. बिचारी माझी आई! तिच्या सगळ्यांत धाकट्या अपत्याच्या सुरक्षिततेच्या काळजीनं तिनं आयुष्यात खूप काही भोगलं होतं. त्याची आठवण झाली, तरी आज मला फार वाईट वाटतं. मी तिचा मुलगा होतो, तेव्हा तर तिनं माझ्यावर प्रेम केलंच; पण मी तिची मुलगी झाल्यावरही तेवढंच प्रेम केलं. माझ्या बाजूनं उभी राहून सगळ्या जगाशी लढण्याइतकं धैर्य तिच्याजवळ नसेल; पण तिच्या शांत, सहनशील रीतीनं ती नेहमीच माझ्याबरोबर होती, हे मला माहीत आहे. तिनं माझ्या निवडीबद्दल कधी प्रश्‍न विचारले नाहीत. सारं काही ती निमूटपणानं सहन करत राहिली. माझ्या आईच्या मृत्यूनं माझ्या आयुष्यात एक मोठी पोकळी निर्माण झाली, जी भरून काढणं अजूनही कुणालाही शक्य झालेलं नाही. वडिलांची काळजी घेण्यासाठी लोक असले, तरी मी आता त्यांच्यापासून फार दूर राहू नये, असं मला वाटत होतं.

‘प्राचार्य’ म्हणून काम करण्याइतका अनुभव आता माझ्याकडे आहे याची मला खात्री होती. यासाठी लागणाऱ्या १६ वर्षांच्या अनुभवापेक्षा माझ्याकडे अधिक अनुभव होता. सहयोगी प्राध्यापकांचं पद होतं आणि पीएच.डी.ची पदवीही होती. कुठल्याही सरकारी महाविद्यालयात मी प्राचार्यपदासाठी अर्ज करू शकत होते. देवला ही कल्पना फारच आवडली होती. पदासाठी अर्ज मागवण्याची जाहिराती आल्यावरच अर्ज करता येतो हे उत्साहाच्या भरात लक्षात न आल्यानं तो रोज माझ्यामागे अर्ज करायचं टुमणं लावायचा. कॉलेज सर्व्हिस कमिशनद्वारे घराजवळच्या माझ्या पसंतीच्या महाविद्यालयात बदली मिळावी यासाठी अर्ज करण्याचा पर्यायही माझ्याकडे होता. पण त्यामुळे मला अधिक वरचं पद मिळालं नसतं. त्यामुळे मी आशावादी राहून वाट पाहायचं ठरवलं.

अखेर, २०१२ साली राज्य सरकारनं प्राचार्यांच्या रिकाम्या जागेसाठी जाहिरात दिली. उमेदवारांनी कॉलेज सर्व्हिस कमिशनकडे आधी ऑनलाइन अर्ज करून नंतर प्रमाणपत्रं सादर करायची होती. सुतापा या माझ्या विद्यार्थिनीनं जाहिरात वाचून माझ्यातर्फे अर्ज केला. त्याबद्दल मी कृतज्ञ आहे. प्रमाणपत्र घेऊन कुठल्या तारखांना प्रत्यक्ष जायचं याची माहिती तिनं मला दिली. मुलाखतीसाठी निवडल्या गेलेल्या प्राध्यापकांच्या यादीत अखेर माझं नाव मला सापडलं. अर्ज करतानाच तुमची महाविद्यालयांची पसंती कळवणं अपेक्षित असतं. नैहाटीपासून फार दूर नसलेलं मुलींचं महाविद्यालय एवढीच माझी अपेक्षा होती. तिसऱ्या लिंगाला मान्यता देणारा सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल अजून आला नव्हता, त्यामुळे ‘लिंग’च्या रकान्यात मला ‘स्त्री’ असं लिहावं लागलं. तृतीयपंथीयांसाठी अर्थातच राखीव जागा नव्हत्या. त्यामुळे माझी निवड गुणवत्तेवरच होणार होती.

जे उमेदवार प्राचार्यपदासाठी मुलाखत देतात, त्या प्रत्येकाच्या शैक्षणिक कामगिरीचा आलेख (API) काढलेला असतो. शैक्षणिक निकाल आणि शिकवायचा अनुभव यांखेरीज प्रकाशित साहित्य, भाग घेतलेले परिसंवाद, सामाजिक काम यांपैकी काही त्यांनी केलं असेल, तर तेही विचारात घेतलं जातं. तृतीयपंथीयांच्या समस्यांवर, त्यांच्या विकासावर भर देणारं अबोमनोब हे नियतकालिक मी प्रसिद्ध करत होते. त्याशिवाय, माझ्या नावावर दोन पुस्तकं, दोन दशकं लिहिलेले शेकडो वृत्तपत्रलेख होते. जे माझ्या (API) मध्ये समाविष्ट होणार होते, माझी मुलाखत कुलगुरूंच्या पॅनलनं घेतली. आणि ती बरीच सविस्तर होती. त्यांनी मला शैक्षणिक तसंच उच्च शिक्षणाच्या प्रगतीसंदर्भात प्रश्न विचारले. माझ्या महाविद्यालयाचा विकास मी कसा करेन यात त्यांना रस होता. मी त्यांना सांगितलं की, जेव्हा आपण राज्यातील उच्च शिक्षणाचा विचार करतो, तेव्हा कोलकातातील महाविद्यालय हा मापदंड ठरू नये. ग्रामीण विद्यार्थी आपली भूक मारून शिकायला आणि प्रगती करायला जिथं येतात, त्या ग्रामीण महाविद्यालयांचा विकास करणं हे खरं मोठं आव्हान आहे. जेव्हा असं महाविद्यालय अडचणींवर मात करून तल्लख विद्यार्थी घडवतं, तेव्हा राज्याच्या उच्च शिक्षणाचा आलेख आपोआपच वर जातो.

देवही या मुलाखतीच्या वेळी माझ्याबरोबर आला होता. मी आदल्या रात्री आमच्या खरगपूरच्या घरातून थेट आले होते. प्रमाणपत्रंही मी गडबडीत एकत्र केली होती. मी मूळ प्रमाणपत्रं आणली होती; पण त्यांच्या प्रती काढायला वेळ मिळाला नव्हता. मुलाखत संपल्यावर माझी प्रमाणपत्रं, पुस्तकं अधिकृततेसाठी तपासली गेली. त्यानंतर त्यांच्या प्रती काढायला देव शेजारच्या दुकानात धावतच गेला. माझ्यापेक्षा तोच जास्त उत्साहात होता आणि मला त्याचा आनंद चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. पॅनलचा निर्णय येण्यासाठी बरीच वाट पाहावी लागणार होती. तसं मी त्याला सांगितलंही. पण मी त्यांना प्रभावित केलं आहे आणि त्यांनी त्यांचा निर्णय कधीच घेतला असणार यावर तो ठाम होता. त्याच्या या खात्रीचं मला हसू आलं; पण मी काही बोलले नाही.

मार्च २०१५ मध्ये मी माझे वर्ग घेण्यासाठी खरगपूरहून गाडीनं झारग्रामला चालले होते. माझा मोबाईल वाजला. महाविद्यालयातील एक स्त्री कर्मचारी बोलत होती. तिने सांगितलं की, नवीन प्राचार्यांचं पॅनल जाहीर झालं असून माझी निवड झाली आहे! त्यांनी वेबसाइटवर यादी तपासली होती. माझा आनंद काय वर्णावा! जोरात ओरडून जगाला आपल्या यशाबद्दल सांगावं असं मला वाटत होतं. पण अर्थातच मी तसं केलं नाही. मी देवशी बोलण्यासाठी फोन उचलला. तो त्या वेळी त्याच्या आई-वडिलांना भेटायला त्याच्या घरी गेला होता. मला आठवतं, त्याच्या आईनं तो प्रसाधनगृहात आहे असं सांगितल्यावर ही बातमी त्याला लगेच सांगता न आल्याबद्दल मी किती अस्वस्थ झाले होते! पण नंतर त्यानं फोन केला आणि मग आम्ही दोघंही हसलो आणि रडलोसुद्धा! महाविद्यालयात पोहोचल्यावर निवडीच्या बातमीची खात्री करून घेण्यासाठी मी स्वत: वेबसाइट तपासली.

माझ्या महाविद्यालयात या बातमीमुळे विषादाचं सावट होतं. तिथंही आत्ता कायम प्राचार्य नव्हते. त्यामुळे बऱ्याच प्राध्यापकांना मी याच महाविद्यालयाची निवड करेन असं वाटलं होतं. प्राचार्य झाल्यावर मी त्यांच्यावर सूड उगवेन, अशी भीतीही त्यांना होती. मी मनातल्या मनात हसले; पण बोलले काहीच नाही. मी झारग्राममधून निसटून जायची वाट पाहत होते, हे त्यांना सांगायचं काहीच कारण नव्हतं. त्यांची जी त्रेधा उडाली होती, त्याची मला मजा वाटत होती. ते मला टाळत होते, भीत होते. आता हसण्याची वेळ माझी होती. मला ती म्हण आठवली, ‘एव्हरी डॉग हॅज हिज डे!'

अखेर, कृष्णनगर महिला महाविद्यालयात माझी नेमणूक झाली. आणि मी देशातील ‘पहिली तृतीयपंथीय प्राचार्य’ बनले होते! अशक्य ते शक्य झालं होतं!

.............................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/client/book_detailed_view/4447

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘बहिष्कृतां’च्या घरचे अन्न ‘बहिष्कृतां’प्रमाणेच उपेक्षिले गेले. त्यामुळे ‘ब्राह्मणेतर खाद्यसंस्कृती चळवळी’ने आपली ‘देशी’ बाजू जगापुढे मांडायला सुरुवात केलीय...

स्वच्छता व शुद्धता या दोहोंना अस्पृश्यतेचा मोठा संदर्भ आहे. ज्यांना शिवायचे नाही ते अस्पृश्य. त्यांनी जवळ यायचे नाही की, शेजार करायचा नाही, हा ब्राह्मण व सवर्ण यांचा नियम. घाणीची कामं ज्यांना वर्णाश्रम धर्माप्रमाणे करायला लावली, त्यांना घाण समजून अस्पृश्य ठरवण्यात आले. साहजिकच ही माणसं कशी जगतात, काय खातात-पितात, काय विचार करतात, याची जाणीवच वरच्या तिन्ही वर्णांना म्हणजेच सवर्ण जातींना नव्हती.......

किणीकरांना सगळी दर्शने कळत होती आणि अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती काव्यात उतरवता येत होती. आणि अजून मोठी गोष्ट म्हणजे ते काव्य चार ओळींपुरते सुटसुटीत ठेवता येत होते

किणीकरांवर मानवेंद्रनाथ रॉय ह्यांच्या विचारसरणीचा मोठा प्रभाव होता. त्यांच्या नावावरूनच त्यांनी स्वतःला ‘रॉय’ हे नाव घेतले होते. रॉय यांनी 'रॅडिकल ह्यूमॅनिझम’चा पुरस्कार केला. त्या काळच्या महाराष्ट्रात अनेक नेत्यांवर, लेखकांवर आणि विचारवंतांवर रॉय ह्यांचा प्रभाव पडला होता. रॉय ह्यांनी क्रांतीचा मार्ग नाकारला असला, तरी त्या काळी तरुण असलेल्या किणीकरांना मनात कुठेतरी क्रांतीचे आकर्षण वाटले असणार.......

म्हटले तर हा ग्रामीण राजकारण उलगडून सांगण्याचा खटाटोप आहे अन् म्हटले तर शेतकऱ्यांना लुबाडणाऱ्या व्यवस्थेला पर्याय उभे करणाऱ्या पुढच्या पिढीतील शेतकरी तरुणांचा संघर्ष आहे

ही केवळ भानुदासराव पाटील, विक्रम शिंदेचीच कथा नाही, तर आबासाहेब जाधव, दिनकरराव पाटील यांच्यासारख्या लोकशाही प्रक्रियेने उदयास आलेल्या नव्या सरंजामदारांचीही गोष्ट आहे. आर्थिक संसाधनांच्या बळावर वाट्टेल तेवढा पैसा मोजून निवडणुका जिंकणारे, मतदारांचा कौल फिरवणारे आबासाहेब, दिनकरराव केवळ हैबतपुरातच नव्हे, महाराष्ट्रात सगळ्याच मतदारसंघांत दिसून येतात, पण.......

या पुस्तकातल्या ‘बिटविन द लाईन्स’ नीट वाचल्या, तर आजच्या मराठी पत्रकारितेची ‘अवनत’ अवस्था आणि तिची ‘ऱ्हासपरंपरा’ नेमकी कुठून सुरू झाली, हे लख्खपणे समजते!

आपल्या गुणी-अवगुणी सहकाऱ्यांकडून उत्तम ते काढून घेण्यापासून, समाजातल्या व्यक्ती-संस्था यांचं योगदान नेमकेपणानं अधोरेखित करण्यापर्यंत बर्दापूरकरांचा सर्वत्र संचार राहिला. त्यामुळे त्यांच्या पत्रकारितेला सत्त्व, नैतिक बळ आणि गांभीर्याची झळाळती झालर लाभत राहिली. आजच्या मराठी पत्रकारितेच्या संदर्भात त्या झालरीचा ‘थर्मामीटर’ म्हणून वापर केला, तर जे ‘तापमान’ कळतं, ते काळजी करावं, असंच आहे.......

लोकशाहीबद्दल आस्था किंवा काळजी व्यक्त करणं, ही काही लोकांचीच जबाबदारी आहे, हा समज खोडून काढायचा तर कामच केलं पाहिजे. ‘लोकशाही गप्पा’ हे त्या व्यापक कामाच्या गरजेतून आलेलं छोटंसं काम आहे

पुरेशी मेहनत करून आणि संवादाच्या सर्व शक्यता खुल्या ठेवून लोकांशी बोललं गेलं, तर प्रत्येकाच्याच आकलनात वाढ होते. आणि हळूहळू भूजलाची पातळी उंचवावी, तसं लोकशाहीबद्दलचं भान सखोल होण्याची शक्यता निर्माण होते. आपल्या भोवतीच्या गदारोळातून एकमेकांचा हात धरून, एका सजग आणि जिवंत लोकशाहीच्या मुक्कामापर्यंत मैदान मारणं आपल्याला सहज शक्य आहे. त्यासाठी एकमेकांना शुभेच्छा देणं एवढं तरी आपण करूच शकतो. ते मनःपूर्वक करू या!.......