जगातली पहिली रहस्यकथा : मॉर्ग रस्त्यावरचे खून
ग्रंथनामा - आगामी
एडगर अ‍ॅलन पो
  • ‘काळी मांजर’ या पुस्तकाचं मुखपृष्ठ
  • Fri , 13 July 2018
  • ग्रंथनामा Granthnama आगामी एडगर अ‍ॅलन पो Edgar Allan Poe

एडगर अ‍ॅलन पो (१८०९ - १८४९) हा अमेरिकन कथाकार गूढकथांचा जनक मानला जातो. त्याच्या निवडक गूढकथांचा संग्रह ‘काळी मांजर’ या नावानं लवकरच डायमंड पब्लिकेशन्सतर्फे प्रकाशित होत आहे. ‘मॉर्ग रस्त्यावरचे खून’ ही एडगरची रहस्यकथा जगातली पहिली रहस्यकथा मानली जाते. या कथेचा सर आर्थर कॉनन डॉयलचा सुप्रसिद्ध नायक शेरलॉक होम्स आणि अगाथा ख्रिस्तीचा नायक हर्क्युल पायरो यांच्यावर मोठा प्रभाव असल्याचं मानलं जातं. ही मूळ कथा जवळपास ११ हजार ९११ शब्दांची आहे. ती संपूर्ण इथं देणं शक्य नाही. त्यामुळे या कथेचे हे पहिले ३२३८ शब्द. यावरून मूळ कथेचा अंदाज येऊ शकतो. आणि एडगरच्या कथाशैलीचाही.

.............................................................................................................................................

आपल्या आवाजानं भुरळ घालणार्‍या मोहिनी कोणतं गाणं म्हणायच्या किंवा ऍकिलिस बायकांच्या घोळक्यात लपला, तेव्हा त्यानं कोणतं टोपण नाव धारण केलं होतं, हे गोंधळात पाडणारे प्रश्‍न असले, तरी त्यांच्याविषयी काहीतरी तर्क नक्कीच बांधता येतात. - सर थॉमस ब्राउन

मानवी मनाच्या ज्या वैशिष्ट्यांना विश्लेषणात्मक म्हटलं गेलेलं आहे, ती वैशिष्ट्यं खरं तर विश्लेषणाच्या पलीकडे आहेत. आपल्याला त्यांचं विश्लेषण करताच येत नाही. आपण केवळ या वैशिष्ट्यांचा परिणाम अनुभवू शकतो. ज्या मनुष्याकडे अशी असामान्य वैशिष्ट्यं असतात, त्याला मात्र मनोरंजनाचा आणि आनंदाचा अखंड स्रोतच मिळालाय असं समजा. जसा एखादा धट्टाकट्टा मनुष्य आपल्या स्नायूंची शक्ती दाखवण्याची संधी शोधत असतो, तसाच एखादा विश्लेषक कोणता तरी गुंता सोडवण्यासाठी आपल्या बौद्धिक क्षमतेचा वापर करण्यात धन्यता मानतो. मग एखादा अगदी लहानसहान प्रश्‍न असला, तरी तो सोडवण्यासाठी आपली कौशल्यं वापरली गेली तर त्याला फार आनंद होतो. अशा विश्लेषकाला विविध प्रकारची कोडी, कूटप्रश्‍न प्रिय असतात; कारण प्रत्येक प्रश्‍न सोडवताना त्याला आपली कुशाग्र बुद्धी दाखवण्याची संधी मिळते. अर्थात सामान्य माणसाला त्याचं हे कौशल्य अद्भुतच वाटतं. त्यानं शोधलेलं उत्तर खरं तर अगदी पद्धतशीर विचार करून मिळवलेलं असलं, तरी त्याला ते अंतर्ज्ञानानंच प्राप्त झालंय असा आभास उगाचच निर्माण होतो.

कोणतंही उत्तर शोधायच्या या क्षमतेला गणिताच्या अभ्यासानं आणि त्यातही गणिताच्या सर्वोच्च शाखेमुळे बळकटी मिळते. पण एखाद्या स्थितीतून मागे मागे जात प्रश्‍नाची उकल करण्याच्या पद्धतीमुळे त्यांना निव्वळ ‘विश्लेषण’ म्हटलं जातं. तरीही खरं तर, काहीही मोजणं किंवा गणन करणं म्हणजे विश्लेषण करणं नव्हे. उदाहरणार्थ, एखाद्या बुद्धीबळपटूला कोणत्याही प्रकारच्या विश्लेषणाची गरज न पडता फक्त गणितानं समोरच्याच्या खेळीचे अंदाज बांधता येऊ शकतात. खरं सांगायचं तर, बुद्धीबळ हा खेळ बुद्धीसाठी चांगला आहे असं जे म्हटलं जातं, तो एक मोठा गैरसमज आहे. मी काही इथे कोणता प्रबंध लिहायला बसलो नाहीये. फक्त सहज केलेल्या काही निरीक्षणांतून समोर आलेल्या एका काहीशा विचित्र गोष्टीची प्रस्तावना करण्यासाठी मी हे सगळं सांगतो आहे. माझं असं ठाम मत आहे, की उगाचच स्तोम माजवलेल्या बुद्धीबळापेक्षा ड्राफ्ट्सच्या साध्यासुध्या खेळामध्ये उच्च प्रतीची विचारक्षमता आणि बुद्धिकौशल्यं वापरावी लागतात. बुद्धीबळाच्या खेळामध्ये प्रत्येक सोंगटीची म्हणजेच मोहर्‍याची चाल वेगवेगळी आणि विचित्र असते आणि त्यांचं महत्त्वही वेगवेगळं असतं. पण त्यातून निर्माण होणार्‍या गुंतागुंतीला बरेचदा चुकीनं उगाचच गहन समजलं जातं. यामध्ये खूप लक्षपूर्वक खेळणं महत्त्वाचं असतं. जर क्षणभरही लक्ष विचलित झालं, तर त्यामुळे तुमची हार होऊ शकते. बुद्धीबळामध्ये बर्‍याच वेगवेगळ्या चाली असतात आणि एकानंतरच्या एक चाली या एकमेकांवर अवलंबून असल्यानं एकमेकांत गुंतलेल्या असतात. त्यामुळे लक्ष न दिल्यानं एखादी चूक झाली, तर ती पुढच्या चालींबरोबर वाढत जाऊ शकते. त्यामुळे या खेळात दहापैकी नऊ वेळा जास्त तल्लख खेळाडूपेक्षा जास्त लक्ष देऊन खेळणाराच जिंकतो. त्याउलट ड्राफ्ट्समधल्या चाली साधारणपणे ठरावीकच असतात. त्यामुळे अनवधानानं काहीतरी होण्याची शक्यता कमी असते. त्यात एकानं लक्ष न देण्यानं दुसर्‍याला तितका फायदा होत नाही, तर केवळ तीक्ष्ण बुद्धी वापरूनच फायदा करून घेता येतो.

फारच दुर्बोध होत असेल तर जरा स्पष्ट करून सांगतो... समजा, एका ड्राफ्ट्सच्या डावात फक्त राजांच्या चार सोंगट्या उरल्या आहेत. त्यामुळे तिथे नजरचूक होण्याची शक्यता नसते. इथे सगळेच खेळाडू समान पातळीवर आहेत, त्यामुळे जिंकण्यासाठी कोणतीतरी दुर्बोध खेळीच उपयोगी पडू शकते. अशा वेळी फारच बुद्धी वापरावी लागते. या ठिकाणी समोरच्याच्या खेळीची बाकी काहीच माहिती नसताना, एखादा विश्लेषक स्वतःला त्या प्रतिस्पर्ध्याच्या ठिकाणी योजतो आणि काही क्षणांतच त्याला कळून येतं, की कोणत्या प्रकारे तो त्याला चूक करायला किंवा चुकीचे अंदाज बांधून खेळायला भाग पाडू शकेल ते. आणि बरेचदा हे करण्याची पद्धत फारच सोपी असू शकते बरं.

सर्व गोष्टींचा अंदाज घेत पुढच्या खेळीचा विचार करण्याच्या क्षमतेवर ‘व्हिस्ट’ या पत्त्याच्या खेळाचा खूप परिणाम होतो. अत्यंत बुद्धिमान माणसं या खेळाचा आनंद घेताना दिसतात आणि तीच माणसं बुद्धीबळाला फालतू समजून त्याला टाळतात. या खेळात खरोखरच मेंदूच्या विश्लेषणक्षमतेची परीक्षाच पाहिली जाते. बुद्धीबळाचा सर्वोत्तम खेळाडू हा फक्त बुद्धीबळातच सर्वोत्तम असू शकतो. मात्र व्हिस्ट या पत्त्याच्या खेळामध्ये कौशल्य असणं, म्हणजेच मानसिक पातळीवरच्या द्वंद्वात तरबेज असणं होय. प्रतिस्पर्ध्याविषयी ज्या ज्या प्रकारची माहिती तुम्ही मिळवू शकता, तितके तुम्ही तरबेज. आता हे स्रोत तर अगणित आणि वेगवेगळ्या प्रकारचे असतात आणि ते समोरच्याच्या मनाच्या तळात खोलवर कुठेतरी दडलेले असू शकतात, त्यामुळे ते सामान्य माणसाच्या आकलनापलीकडे असतात. जेव्हा तुम्ही लक्षपूर्वक निरीक्षण करता, तेव्हा तुम्हाला सगळं काही स्पष्ट लक्षात राहतं. म्हणूनच इथवर, एखादा लक्षपूर्वक खेळणारा बुद्धीबळपटू व्हिस्टमध्ये चांगला खेळू शकेल. हॉइल या शास्त्रज्ञाने तयार केलेले पत्त्यांच्या खेळाचे नियम (जे त्या खेळाच्या तांत्रिक गोष्टींवरच आधारित आहेत) हे पुरेसे स्पष्ट आणि समजायला सोपे आहेत. म्हणूनच बरेचदा खेळात खेळलेल्या चाली नीट लक्षात ठेवणं आणि नियमानुसार खेळणं म्हणजे चांगलं खेळणं असं समजलं जातं. मात्र, जिथे फक्त नियमानुसार खेळून भागत नाही, अशा बाबींमध्येच खर्‍या विश्लेषकाचं कौशल्य समोर येतं. अगदी शांतपणे बसून तो कित्येक गोष्टींचं निरीक्षण करत असतो आणि कित्येक बारीक गोष्टी टिपून ठेवत असतो आणि त्यावरून अनुमानं काढत असतो. कदाचित त्याचे प्रतिस्पर्धी किंवा पत्ते खेळणारे सगळेच जण तसं करत असतील; पण खेळाडूंमधला फरक हा प्रत्येकाच्या निरीक्षणशक्तीच्या कौशल्यावर अवलंबून असतो, किती व काय प्रकारची माहिती त्याला मिळाली आहे यावर नाही. यासाठी नक्की कोणत्या गोष्टीचं निरीक्षण करायला हवं, याचं ज्ञान असणं गरजेचं आहे. खरा विश्लेषक पत्त्यांचा खेळ खेळताना स्वतःला त्या खेळापुरताच मर्यादित ठेवत नाही, तर खेळाच्या बाहेरील इतर गोष्टींच्या निरीक्षणांमधूनही तो विविध अनुमानं काढत असतो. तो त्याच्या जोडीदाराचे हावभाव नीट निरखतो आणि त्याच्या प्रतिस्पर्धी जोडीचंही बारकाईनं निरीक्षण करून त्याची तुलना करतो. पत्त्यांचे हात वाटताना प्रत्येक वेळी ते कशा प्रकारे वाटले जात आहेत आणि त्यातला प्रत्येक पत्ता उचलताना इतर स्पर्धकांच्या चेहर्‍यावर काय भाव उमटत आहेत याचं तो सूक्ष्म निरीक्षण करतो. खेळ जसजसा पुढे सरकतो, तसतसा तो इतर खेळाडूंचे चेहरे नीट निरखत असतो. त्यांच्या विविध हावभावांवरून त्याला बरीच माहिती मिळू शकते. त्यांच्या चेहर्‍यावरचा ठाम विश्वास किंवा आश्चर्य किंवा जिंकल्याचे भाव किंवा लाज वाटल्यानं झालेला सूक्ष्म बदल तो टिपतो. ज्या प्रकारे दुसरा माणूस पत्ता उचलून आपल्या हातातल्या पत्त्यांत घेतो आहे, त्यावरून त्याचा आणखी एक हात होणार आहे, की नाही हे त्याला समजतं. ज्या पद्धतीनं कोणी पत्ते टेबलावर फेकतं, त्यावरून तो डाव खोटा आहे की काय, हेही त्याच्या लक्षात येतं. कोणीतरी चुकून बोलून गेलेला एखादा शब्द; उगाचच केलेलं एखादं विधान किंवा चुकून एखादा पत्ता खाली पडल्यावर तो उचलून घेण्यासाठी केलेली लगबग; चेहर्‍यावरची काळजी किंवा ती लपवताना मुद्दामच दाखवलेली बेफिकिरी; हातातल्या पत्त्यांच्या पंख्यातले हात मोजणं, नीट लावणं, त्यातलं अडखळणं, लाज किंवा अधीरपणा किंवा हाताची सूक्ष्म थरथर या सगळ्या बाबींवरून त्याला खरं काय ते समजतं. अशा तर्‍हेनं पहिले दोन-तीन डाव होईपर्यंत त्या विश्लेषकाला प्रत्येक खेळाडूच्या हातातले सगळे पत्ते समजलेले असतात. म्हणूनच तो स्वतःचे हात पूर्ण आत्मविश्वासानं खेळू शकतो, जणू काही इतर खेळाडू आपाआपल्या हातातले पत्ते सुलटे करूनच बसले असावेत!

मेंदूची विश्लेषण करण्याची क्षमता आणि भरपूर चातुर्य यांमध्ये गल्लत करता कामा नये. उत्तम विश्लेषक हा नेहमीच हुशार असतो, पण एखादा हुशार माणूसही विश्लेषण करण्याच्या बाबतीत पूर्णपणे अक्षम असू शकतो. एखाद्या गोष्टीचा रचनात्मक पद्धतीनं विचार करण्यातूनच बरेचदा हुशारी दाखवली जाते. कवटीच्या आकारावरून मेंदूचा अभ्यास करणार्‍या फ्रेनॉलॉजिस्टांनी (माझ्या मते चुकून) त्या क्षमतेसाठी एक वेगळा अवयव असतो असं म्हटलेलं आहे. त्यांच्या मते ती एक आदिम क्षमता आहे. पण ज्यांची बुद्धिमत्ता एरवी मूर्खपणाच्या पातळीवर असते, त्यांच्यामध्येसुद्धा ही रचनात्मक विचार करण्याची क्षमता बरेचदा दिसून येते. आणि या गोष्टीनं अनेक लेखक आणि विचारवंतांना आकर्षित केलेलं आहे. पण चातुर्य आणि विश्लेषणशक्ती यात फार मोठा फरक आहे. म्हणजे कल्पनाविलास आणि कल्पनाशक्ती यात जितका फरक आहे त्याहूनही कितीतरी जास्त. तरी त्यांत एक प्रकारचं साम्य आहेच. म्हणजे खरं सांगायचं तर बुद्धिमान मनुष्य नेहमी कल्पनाविलासात रमलेला असतो; पण ज्याच्याकडे खरी कल्पनाशक्ती असते, तो मात्र नेहमीच खरा विश्लेषक असतो.

आत्ता मी जी काही विधानं केली आणि जी मतं मांडली, त्याच्याशी ही पुढची गोष्ट संबंधित आहे, हे वाचकांच्या लक्षात येईल.

फार वर्षांपूर्वी वसंत ऋतूतले आणि ग्रीष्मातले काही दिवस मी पॅरिसमध्ये राहत होतो. तिथे माझी मिस्टर सी. ऑग्युस्त द्युपां याच्याशी ओळख झाली. हा तरुण मनुष्य एका बड्या, उच्चभ्रू कुटुंबातला होता; पण काही दुर्देवी घटनांमुळे त्याची परिस्थिती अत्यंत हलाखीची बनली होती. यामुळे त्याच्या उत्साही स्वभावावर विपरीत परिणाम झाला होता. त्यानं आपली संपत्ती पुन्हा मिळवण्याचे प्रयत्न सोडून दिले होते आणि तो बाहेरच्या जगात मिसळायचाही बंद झाला होता. त्याच्या कर्जदात्यांच्या चांगुलपणामुळे त्याच्या वडिलोपार्जित संपत्तीतला काही उरलेला भाग अजूनही त्याच्यापाशी होता आणि त्यातून मिळणार्‍या उत्पन्नावर तो अत्यंत काटकसरीत राहत होता. त्याच्याकडे फक्त गरजेपुरत्या गोष्टी होत्या आणि चैनीचं राहणीमान नसल्याचा तो स्वतःला त्रास करून घेत नसे. त्याच्यासाठी पुस्तकं ही एकमेव चैनीची वस्तू होती आणि पॅरिसमध्ये पुस्तकं तर कुठेही सहजपणे मिळतातच.

माँमार्त्र रस्त्यावरच्या एका आडबाजूच्या ग्रंथालयात आमची पहिल्यांदा भेट झाली. आम्ही दोघंही एक फार चांगलं पण दुर्मीळ असं पुस्तक शोधत होतो आणि त्यामुळे अपघातानंच आमची गाठ पडली. त्यानंतर आम्ही वारंवार भेटत राहिलो. स्वतःविषयी सांगताना एखादा फ्रेंच मनुष्य ज्या प्रामाणिकपणे आणि मोकळेपणानं बोलतो, तशाच प्रकारे त्यानं मला त्याच्या कुटुंबाचा इतिहास सांगितला आणि मला त्यात फारच रस वाटायला लागला. त्याचं अफाट वाचन पाहून मी चकित झालो आणि त्याची उत्कट आणि रसरशीत कल्पनाशक्ती पाहून तर माझ्या मनात उत्साहाचा झरा नव्यानं खळाळू लागला. मी पॅरिसमध्ये ज्या गोष्टींच्या शोधात आलो होतो, त्यात त्याच्यासारख्या व्यक्तीचा सहवास मिळणं, म्हणजे माझ्यासाठी अमूल्य ठेवाच होता आणि तसं मी त्याच्यापाशी प्रांजळपणे कबूलही केलं. माझ्या पॅरिसमधल्या मुक्कामात आम्ही एकत्रच राहायचं असं काही दिवसांत ठरलं आणि माझी आर्थिक स्थिती त्याच्याइतकी दयनीय नसल्यानं मी एक घर भाड्यानं घ्यायचं असंही ठरलं. आमच्या दोघांच्या खिन्न प्रवृत्तीला साजेशी अशी एक जुनाट, भयाण हवेली भाड्यानं घेऊन आम्ही त्यात सामान हलवलं. त्या हवेलीविषयी बर्‍याच वदंता असल्यानं तिथं कित्येक वर्षांपासून कोणी राहत नव्हतं; पण त्या अफवा कोणत्या हेही जाणून घेण्यात आम्हाला रस नव्हता. ही पडकी हवेली फोबूर्ग सँ जर्मँमधल्या एका सुनसान ठिकाणी होती.

तिथं आमचा दिनक्रम कशा प्रकारचा होता हे जर बाहेरच्या जगाला समजलं असतं, तर त्यांनी आम्हाला वेड्यातच काढलं असतं... हां, म्हणजे आम्हाला निरुपद्रवी वेडे ठरवलं असतं. आम्हाला अगदी हवा तसा एकांत मिळाला होता. कोणाही पाहुण्याला हवेलीत प्रवेश नव्हता. तसंही आम्ही एकांतवासात कुठे राहत आहोत, हे मी माझ्या ओळखीच्या लोकांपासून लपवून ठेवलं होतं. आणि द्युपां तर काय, कितीतरी वर्षांपासून पॅरिसच्या सामाजिक वर्तुळात गेलेलाच नव्हता. त्यामुळे पॅरिस त्याला ओळखत नव्हतं आणि तो पॅरिसला. त्यामुळे आम्ही आमच्यातच गुरफटलेलो होतो.

माझा मित्र रात्रीच्या प्रेमात पडला होता, याला मी त्याच्या कल्पनाविश्वातली एक विचित्र आवड म्हणून शकतो, दुसरं काय! त्याच्या या अजब आवडीमध्ये आणि इतरही सगळ्या विक्षिप्तपणामध्ये मी हळूहळू गुंतत गेलो आणि त्याच्या अगदी वेगळ्या, विचित्र इच्छांच्या पूर्णपणे अधीन झालो. ती गडद, अंधारी दिव्य वेळ काही आमच्यासोबत कायम असू शकत नव्हती. पण आम्ही रात्र झाल्याचा खोटा दिखावा तर नक्कीच करू शकत होतो. पहाटेचा पहिला प्रकाश फाकला की आम्ही आमच्या हवेलीच्या सगळ्या खिडक्या बंद करायचो. मग दोन अगदी मंद, भयाण प्रकाश देणार्‍या सुगंधी मेणबत्त्या लावून आम्ही आमच्या स्वप्नांच्या जगात हरवून जायचो... आम्ही वाचन करायचो, लिखाण करायचो किंवा चर्चा करायचो. मग खरीखुरी रात्र पडल्याची सूचना घडाळ्यानं दिल्यावरच आम्ही उठायचो. रात्र झाल्यावर आम्ही हातात हात घालून घराबाहेर पडायचो आणि दिवसभरच्याच विषयाची चर्चा पुढे चालू ठेवायचो किंवा मग आम्ही उशिरापर्यंत दूर दूरवर फेरफटका मारायचो आणि शहरातल्या दिव्यांच्या लखलखाटात आणि लोकांच्या गजबजाटात शांतपणे निरीक्षण करत हिंडायचो आणि त्यातून आम्हाला भरपूर मानसिक खाद्य मिळायचं.

अशा प्रसंगी मला नेहमी द्युपांमधली विश्लेषणाची आगळीच क्षमता जाणवायची आणि मला त्याचं फार कौतुक वाटायचं. खरं तर त्याच्यात हा गुण असणार याची मला त्याच्या उत्तम आदर्शांवरून आधीपासूनच अपेक्षा होती. त्याच्यातलं हे विश्लेषणाचं कौशल्य लोकांना दाखवण्यापेक्षाही, ते वापरायला तो जास्त उत्सुक असायचा. त्यातून आपल्याला खूप आनंद मिळतो हे तो सहजी कबूल करायचा. हलक्या आवाजात हसत तो मला गर्वानं सांगायचा, की त्याच्यासाठी इतर लोकांच्या मनाची खिडकी जणू कायम उघडीच असते. तो माझ्या मनात काय चाललंय हे ओळखून मला ते सिद्ध करून दाखवायचा आणि थक्क करायचा. अशा प्रसंगी त्याचं वागणं अगदी थंड असायचं आणि तो वेगळ्याच तंद्रीत भासायचा. त्याच्या डोळ्यांत काहीच भाव नसायचा आणि त्याचा नेहमीचा आवाज बदलून अगदी उच्च पट्टीत चिरका व्हायचा. तो मुद्दाम काहीतरी महत्त्वाचं सांगतोय हे जर समोरच्याला माहीत नसेल, तर त्याचा आवाज वैतागलेला वाटू शकला असता. त्याच्या या दोन भिन्न मनोवस्थांचं निरीक्षण करताना मी बरेचदा, माणसाच्या आत दोन भिन्न आत्मे असतात या तत्त्वज्ञानावर चिंतन करायचो आणि अशी कल्पना रंगवायचो, की इथं द्युपांच्या आत खरं तर दोन दोन द्युपां आहेत - एक सर्जनशील द्युपां आणि दुसरा विश्लेषक!

मी आत्ता जे काही सांगितलं, त्यावरून असं समजू नका, की मी एखादी रहस्यकथा किंवा प्रेमकथा सांगणार आहे. मी आत्ता या फ्रेंच मनुष्याच्या कौशल्याबद्दल जे काही सांगितलं, तो फक्त त्याच्या विचित्र बुद्धिमत्तेचा किंवा उत्तेजित मनोवस्थेचा परिणाम होता. पण अशा वेळी तो काय बोलायचा याचं तुम्हाला प्रत्यक्ष उदाहरणच दिलं तर तुम्हाला नीट कल्पना येईल.

एका रात्री आम्ही ‘पाले रोयाल’च्या परिसरातल्या एका घाणेरड्या गल्लीमधून चालत जात होतो. आम्ही दोघंही बहुधा विचारात गढलेले असल्यानं पंधराएक मिनिटं कोणीच काही बोललं नव्हतं. मग अचानक द्युपां म्हणाला, ‘‘खरं आहे... हा माणूस फारच लहानखुरा आहे. तो ‘तेआत्र दे वारिएते’ या थिएटरसाठी जास्त चांगलं काम करू शकेल.’’

‘‘हो, नक्कीच,’’ मी नकळत बोलून गेलो. मी विचारांत इतका गुरफटलेलो होतो, की द्युपांनं माझ्या मनातला विचार ओळखून त्यावर प्रतिक्रिया दिली होती हे माझ्या पटकन लक्षातच आलं नाही. पण क्षणभरातच मी सावरलो आणि द्युपांचं कौशल्य पाहून फारच चकित झालो.

‘‘द्युपां, हे तर माझ्या आकलनापलीकडचं आहे,’’ मी गंभीरपणे त्याला म्हणालो. ‘‘मी स्पष्टपणे कबूल करतो, की मी खूपच प्रभावित झालोय. आणि यात माझ्या ज्ञानेंद्रियांचा काहीच वाटा नाही. तू ओळखलंस तरी कसं, की मी विचार करत होतो त्या...’’ मी जो विचार करत होतो, तो त्यानं नक्की ओळखला आहे, की नाही याची खात्री करायला मी बोलता बोलता थांबलो.

‘‘...त्या शँटिलीचा, हो ना?’’ तो म्हणाला, ‘‘बोलता बोलता थांबलास का तू? तू स्वतःशीच म्हणत होतास, की त्याचा लहानखुरा देह हा शोकनाट्य करण्यासाठी योग्य नाहीये.’’

माझ्या मनात अगदी हाच विचार चालू होता. शँटिली हा सँ देनिस रस्त्यावरचा पूर्वाश्रमीचा चांभार होता आणि नाटकाची हौस असल्यानं त्यानं क्रेबियॉंच्या शोकांतिकेत काम करायचा प्रयत्न केला होता, पण त्यासाठी त्याची भरपूर टिंगल झाली होती.

‘‘कृपा करून मला सांग,’’ मी उद्गारलो, ‘‘तू माझ्या मनाचा थांग कसा काय लावलास? तशी काही विशिष्ट पद्धत आहे की....’’ खरं सांगायचं तर मी दाखवत होतो त्याहीपेक्षा जास्त थक्क झालो होतो.

‘‘तो फळवाला होता ना, त्याच्यामुळे तू या निष्कर्षाप्रत पोचलास, की तो चांभार या नाटकातली भूमिका करण्यासाठी फारच बुटका आहे,’’ माझा मित्र म्हणाला.

‘‘फळवाला!... तू तर मला बुचकळ्यात पाडतो आहेस. मला कोणीच फळवाला वगैरे माहीत नाहीये!’’

‘‘आपण या गल्लीत शिरलो तेव्हा एक फळवाला तुझ्यावर धडकला होता ना... पंधराएक मिनिटांपूर्वी...’’

हो, आता मला आठवलं, की आम्ही या गल्लीत शिरलो, तेव्हा डोक्यावर सफरचंदांची टोपली घेऊन जाणारा एक फळवाला मला अपघातानंच धडकला होता आणि मी खालीच पडणार होतो. पण त्याचा शँटिलीशी काय संबंध होता ते मला अजूनही कळत नव्हतं.

द्युपां मला फसवत होता, माझी गंमत करत होता असं अजिबात वाटत नव्हतं. तो म्हणाला, ‘‘थांब, मी स्पष्ट करून सांगतो, म्हणजे तुला नीट समजेल. त्यासाठी मी तुझ्याशी पहिल्यांदा बोललो तिथपासून तो फळवाला तुला धडकला तिथपर्यंत तुझ्या विचारांची साखळी कशी होती ते आपण उलटं उलटं पाहत जाऊ. त्या साखळीतले महत्त्वाचे दुवे हे आहेत - शँटिली, ओरायन, डॉ. निकोला, एपिक्युरस, स्टिरिओटमी, रस्त्यावरचे दगड आणि तो फळवाला.’’

आपल्या मनानं काढलेल्या एखाद्या निष्कर्षापर्यंत आपण कसे पोचलो असू ही गंमत अनुभवण्यासाठी आपल्यापैकी बर्‍याच जणांनी कधी ना कधी आपल्या विचारांच्या साखळीतले दुवे उलटे उलटे तपासले असतील. असं करून बघायला फारच मजा येते आणि जो कोणी असं प्रथमच करतो, तो थक्क होतो. कारण आपल्या विचारप्रक्रियेला जिथून सुरुवात होते तो बिंदू आणि आपण ज्या निष्कर्षाप्रत पोचतो तो बिंदू यांत कोणताच उघड संबंध दिसत नाही आणि आपण काही क्षणांत कुठल्या कुठे पोचलेलो असतो. त्यामुळे विचार करा, की माझा फ्रेंच मित्र असं बोलल्यावर मला किती आश्चर्य वाटलं असेल. आणि तो अगदी बरोबर सांगत होता हेही मला कबूल केलंच पाहिजे.

तो पुढे म्हणाला, ‘‘या गल्लीत येण्यापूर्वी मला वाटतं आपण घोड्यांबद्दल बोलत होतो. आपल्या चर्चेचा शेवटचा विषय तोच होता. मग या गल्लीत शिरल्याशिरल्याच तो फळवाला तुला धडकला आणि तू बाजूच्या दगडांच्या ढिगावर कोलमडलास. त्या रस्त्याचं दुरुस्तीचं काम चालू असल्यानं तिथे तो दगडांचा ढीग ठेवलेला होता. बाजूला सुटून पडलेल्या त्यातल्याच एका दगडावरून तुझा पाय घसरला आणि जरासा मुरगळला. त्यामुळे तुला राग आला आणि काहीतरी पुटपुटत तू त्या दगडांच्या राशीकडे कटाक्ष टाकलास. मग तू पुन्हा शांतपणे चालू लागलास. मी त्या वेळी काही तुझ्याकडे नीट लक्ष देत नव्हतो; पण खरं सागायचं तर गेल्या काही वर्षांपासून निरीक्षण करणं ही माझ्यासाठी एक गरजच बनून गेली आहे. आपोआप घडते ती गोष्ट माझ्याकडून.

‘‘तू जमिनीकडे पाहतच चालत होतास. तू जरा वैतागूनच रस्त्यावरच्या खड्ड्यांकडे आणि फुटपाथवरच्या फटींकडे बघत होतास. (त्यावरून मला कळलं, की तुझ्या मनात अजूनही त्या दगडांचाच विचार चालू आहे.) काही वेळातच आपण लामार्तिन गल्लीमध्ये पोचलो. तिथे एक नवा प्रयोग म्हणून वेगळ्या पद्धतीनं दगडांचा फुटपाथ बांधलेला आहे. तो पाहून तुझ्या चेहर्‍यावर आनंद पसरला आणि तू काहीतरी पुटपुटलास. तुझ्या ओठांच्या हालचालीवरून मला कळलं की तू ‘स्टिरिओटमी’ म्हणाला असणार, कारण अशा पद्धतीनं दगड घडवून केलेल्या बांधकामाला स्टिरिओटमी म्हणतात. स्टिरिओटमी शब्दावरून तुला ऍटम म्हणजेच अणू हा शब्द सुचला असणार आणि त्यावरून अणूंचा अभ्यास करणारा ग्रीक तत्त्वज्ञ एपिक्युरस याची आठवण झाली. काही दिवसांपूर्वीच आपण त्याविषयी चर्चा केली होती, तेव्हा मी तुला म्हटलं होतं, की त्या थोर ग्रीक तत्त्वज्ञाने नुसते बांधलेले अंदाज नंतरच्या काळात नेब्युलाच्या विश्वउत्पत्तीशास्त्राचा अभ्यास झाल्यावर किती खरे ठरले, ही आश्चर्याचीच बाब आहे. माझं हे बोलणं तुला तेव्हा आठवलं असणार आणि म्हणूनच तू वर आकाशात ओरायनच्या नेब्युलाकडे पाहणार असा माझा अंदाज होता आणि तू वर पाहिलंस. त्यावरून माझी खात्री पटली, की तुझ्या विचारांच्या साखळीचा मी बरोबर माग काढला आहे.

‘‘कालच्या वर्तमानपत्रात शँटिलीवर बरीच टीका आली होती आणि त्यात काही लॅटिन ओळी वापरल्या होत्या. त्यावर आपण चर्चा करताना मी तुला त्याच्याशी संबंधित ओरायनचा संदर्भ दिला होता, ज्याला पूर्वी युरियन म्हणत. हां, आता युरियन शब्दावरून घाण वासाचं जे काही आठवतं, त्या विचित्र योगायोगामुळे मला असं वाटलं, की तू तो शब्द काही विसरला नसशील. म्हणूनच मला खात्री होती, की तू ओरायन आणि शँटिली या दोन वेगवेगळ्या कल्पनांचा एकत्र विचार करशील. त्या वेळी तुझ्या ओठांवर एक स्मित खेळू लागलं आणि तू तो संबंध जोडल्याचं मला कळलं. तुला त्या बिचार्‍या चांभाराचा बळी बनवलेला आठवला आणि इतका वेळ तू पोक काढून चालत होतास, तो एकदम ताठ होऊन चालू लागलास. त्यावरून मला समजलं, की तू शँटिलीच्या बुटकेपणावर विचार करतो आहेस. आणि त्याच क्षणी मी उद्गारलो, ‘‘खरं आहे... हा माणूस - हा शँटिली - फारच लहानखुरा आहे. तो ‘तेआत्र दे वारिएते’ या थिएटरसाठी जास्त चांगलं काम करू शकेल.’’

यानंतर काही वेळानं आम्ही ‘गाझेत् दे त्रिब्युनो’ हे सायंदैनिक वाचत असताना या परिच्छेदानं आमचं लक्ष वेधून घेतलं :

‘‘विस्मयकारक खून : आज सकाळी तीन वाजण्याच्या सुमारास सँ. रोश परिसरातले रहिवासी एकामागोमाग एक ऐकू येणार्‍या भयंकर किंकाळ्यांनी झोपेतून जागे झाले. मॉर्ग रस्त्यावरच्या एका घरातील चौथ्या मजल्यावरून या किंकाळ्या ऐकू येत होत्या असं म्हटलं जात आहे. या घरात मादाम लेस्पानाये आणि त्यांची मुलगी मिस लेस्पानाये या दोघीच राहतात. घरामध्ये सहजपणे आत जाता येत नसल्याचं समजल्यानंतर, काही वेळानं लोखंडी कांबीनं दार तोडून आठ ते दहा शेजारी दोन पोलिसांसह आत घुसले. तोपर्यंत त्या किंकाळ्या बंद झाल्या होत्या. मात्र हे सगळे लोक जिन्यानं वर जात असताना त्यांना वरच्या मजल्यावरून दोन किंवा अधिक लोकांचं संतापलेल्या आवाजातलं काहीतरी बोलणं ऐकू आलं. ते दुसर्‍या मजल्यावर पोहोचेपर्यंत हेही आवाज बंद झाले व सारं काही शांत झालं होतं. त्या लोकांनी आपापसात लहान गट करत भराभर वेगवेगळ्या खोल्या तपासून पाहिल्या. जेव्हा ते चौथ्या मजल्यावरच्या मागच्या बाजूच्या एका मोठ्या खोलीपाशी आले (त्या खोलीचं दार आतून किल्लीनं बंद केलेलं होतं आणि ते तोडावं लागलं), तेव्हा त्यांना आतमध्ये जे दृश्य दिसलं, त्यानं ते चकित तर झालेच; पण अतिशय घाबरलेही.

‘‘त्या खोलीतलं सगळं सामान इतस्ततः विखुरलेलं होतं. फर्निचरची मोडतोड करून ते चहूदिशांना फेकलेलं दिसत होतं. त्या खोलीत फक्त एकच पलंग होता आणि त्यावरची गादी काढून ती खोलीच्या मध्यभागी टाकलेली होती. खोलीतल्या एका खुर्चीवर रक्तानं भरलेला एक वस्तरा पडला होता. तसंच गालिच्यावर दाट पांढर्‍या केसांच्या दोन-तीन बटा पडल्या होत्या. त्याही रक्तानं माखलेल्या होत्या. ते केस मुळापासून उपटलेले वाटत होते. जमिनीवर सोन्याची चार नेपोलियन नाणी, टोपॅझ या किमती खड्याचं कानातलं, तीन मोठे चांदीचे चमचे, आणखी काही इतर धातूंचे चमचे आणि दोन थैल्या भरून सुमारे चार हजार फ्रँक्सची सोन्याची नाणी सापडली. खोलीतल्या कोपर्‍यात असलेल्या कपाटाचे सगळे कप्पे उघडे होते आणि उचकलेले दिसत होते. मात्र त्यात अजूनही बरेच कपडे शिल्लक होते. जमिनीवर पडलेल्या गादीखाली एक लोखंडी तिजोरी सापडली. त्याचं दार उघडं होतं आणि किल्ली अजूनही तशीच फिरवलेली होती. त्यात फक्त काही जुनी पत्रं आणि काही बिनमहत्त्वाची कागदपत्रं होती.

‘‘मादाम लेस्पानायेचा काहीच ठावठिकाणा त्या खोलीत दिसत नव्हता. मात्र तिथल्या शेकोटीच्या जागी बरीच राख पडलेली दिसली, म्हणून तपास केला असता (सांगायलाही भयंकर वाटत आहे!), शेकोटीच्या वरच्या चिमणीच्या अरुंद जागेत मादामच्या मुलीचं प्रेत सापडलं. ते खाली डोकं वर पाय या अवस्थेत बरंच वरपर्यंत कोंबण्यात आलं होतं. ते तिथून खाली ओढून काढल्यावर लक्षात आलं, की तिचं शरीर अजूनही गरम होतं. तपासाअंती तिच्या शरीरावर बर्‍याच सोलवटल्याच्या जखमा दिसून आल्या. तिला चिमणीमध्ये कोंबण्यात आल्यामुळेच त्या झाल्या असणार हे उघड होतं. तिच्या चेहर्‍यावर बरेच मोठमोठे ओरखडे होते आणि तिच्या गळ्यावर गडद रंगाचे वण उमटले होते, तसंच नखांचेही ओरखडे होते. त्यावरून तिचा गळा दाबून खून करण्यात आला होता असं दिसत होतं.

‘‘त्या घराच्या सर्व खोल्यांचा नीट तपास केल्यावरही काही सापडलं नाही. अखेरीस पोलीस व ते लोक इमारतीच्या मागच्या बाजूच्या लहानशा फरसबंद अंगणात गेले. तिथेच वृद्ध मादाम लेस्पानायेचं प्रेत पडलं होतं. तिचा गळा इतका भयंकर पद्धतीनं कापला होता, की ते प्रेत उचलायचा प्रयत्न झाल्यावर तिचं डोकं धडावेगळं झालं. डोकं आणि शरीर अत्यंत अमानुष पद्धतीनं छिन्नविछिन्न करण्यात आलं होतं. शरीर तर मानवी शरीर म्हणून ओळखण्याच्याही पलीकडे गेलं होतं.

‘‘या भयंकर गूढाचा अजून काहीही तपास लागलेला नाही.’’

दुसर्‍या दिवशीच्या वर्तमानपत्रात आणखी काही माहिती छापून आली होती...

.............................................................................................................................................

'काळी मांजर - एडगर अ‍ॅलन पोच्या निवडक गूढकथा' या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/client/book_detailed_view/4446

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

Post Comment

tanya w

Sat , 14 July 2018

"‘मॉर्ग रस्त्यावरचे खून’ ही एडगरची रहस्यकथा जगातली पहिली रहस्यकथा मानली जाते." असे कोण मानते? अक्षरनामाचे संपादक की डायमण्ड पब्लिकेशन? पाश्चात्त्यकेंद्री दृष्टिकोन पाश्चात्त्य सोडू लागले तरी आपल्यासारखे लोक तेच धरून आहेत. असो. पुस्तकाची निर्मिती आकर्षक दिसते आहे, अनुवादही वाचनीय आहे. पुस्तक जरूर वाचावे लागेल. परंतु अक्षरनामाने थोडे स्वतःच्या संपादनावर कष्ट घेण्याचे गरज आहे. स्वतःचा काही दृष्टिकोन दिसत नाही. आपकी मर्जी.


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

या स्त्रिया म्हणजे प्रदर्शनीय वस्तू. एक माणूस म्हणून जिथं त्यांना किंमत दिली जात नाही, त्यात सहभागी होण्यासाठी या स्त्रिया का धडपडत असतात, हे जाणून घेण्यासाठी मी तडफडत होते…

ज्यांनी १९७०च्या दशकाच्या अखेरीला मॉडेल म्हणून काम सुरू केलं आणि १९८०चं संपूर्ण दशकभर व १९९०च्या दशकाच्या सुरुवातीचा काही काळ, म्हणजे फॅशन इंडस्ट्रीच्या वाढीचा आलेख वाढायला सुरुवात झाली, त्या काळापर्यंत काम करत राहिल्या आहेत, त्यांना ‘पहिली पिढी’, असं म्हटलं जातं. मी जेव्हा त्यांच्या मुलाखती घेतल्या, तेव्हा त्या पस्तीस ते पंचेचाळीस या दरम्यानच्या वयोगटात होत्या. सगळ्या इंग्रजी बोलणाऱ्या.......

निर्मितीचा मार्ग हा अंधाराचा मार्ग आहे. निर्मितीच्या प्रेरणेच्या पलीकडे जाणे, हा प्रकाशाकडे जाण्याचा, शुद्ध चैतन्याकडे जाण्याचा मार्ग आहे

ही माया, हे विश्व, हे अज्ञान आहे. हा काळोख आहे. त्याच्या मागील शुद्ध चैतन्य हा प्रकाश आहे. सूर्य, उषा ही भौतिक जगातील प्रकाशाची रूपे आहेत, पण ती मायेचाच एक भाग आहेत. ह्या अर्थाने ती अंधःकारस्वरूप आहेत. निर्मिती ही मायेची स्फूर्ती आहे. त्या अर्थाने माया आणि निर्मिती ह्या एकच आहेत. उषा हे मायेचे एक रूप आहे. तिची निर्मितीशी नाळ जुळलेली असणे स्वाभाविक आहे. निर्मिती कितीही गोड वाटली, तरी तिचे रूपांतर शेवटी दुःखातच होते.......

‘रेघ’ : या पुस्तकाच्या ‘प्रामाणिक वाचना’नंतर वर्तमानपत्रांतील बातम्यांचा प्राधान्यक्रम, त्यांतल्या जाहिरातींमधला मजकूर, तसेच सामाजिक-राजकीय-सांस्कृतिक क्षेत्रांतील घटनांसंबंधीच्या बातम्या, यांकडे अधिक सजगपणे, चिकित्सकपणे पाहण्याची सवय लागेल

मर्यादित संसाधनांच्या साहाय्याने जर डोंगरे यांच्यासारखे लेखक इतकं चांगलं, उल्लेखनीय काम करू शकत असतील, तर करोडो रुपये हाताशी असणाऱ्या माध्यमांनी किती मोठं काम केलं पाहिजे, असा विचार मनात आल्याशिवाय राहत नाही. पण शेवटी प्रश्न येतो तो बांधीलकी, प्रामाणिकपणा आणि न्यायाची चाड असण्याचा. वृत्तवाहिन्यांवर ज्या गोष्टी दाखवल्या जात, त्या विषयांवर ‘रेघ’सारख्या पुस्तकातून प्रकाशझोत टाकला जातो.......