प्रणबदा, ‘लोकशाही’ची विटंबना करणाऱ्यांना थेट सुनवायचं काम तुम्ही नाही तर कोणी करायचं?
पडघम - देशकारण
अमेय तिरोडकर
  • माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी काल नागपुरात संघ स्वयंसेवकांसमोर भाषण करताना
  • Fri , 08 June 2018
  • पडघम देशकारण डॉ. मोहन भागवत Mohan Bhagwat काँग्रेस‘मुक्त’ भारत Congress-mukt Bharat काँग्रेस Congress. संघ RSS प्रणव मुखर्जी Pranab Mukherjee

तुम्ही नेहरूंचं ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’ वाचलंय का? 

रवींद्रनाथ टागोरांच्या भाषणांचं संपादित पुस्तक ‘नॅशनलिझम’ वाचलंय का?

नसतील वाचली तर लगेच वाचा. प्रणब मुखर्जी यांनी संघ स्वयंसेवकांसमोर जे भाषण केलं, ते या दोन पुस्तकांचं सार आहे.

ही दोन्ही पुस्तकं माझी आवडती आहेत. पण तरीही मला प्रणबदांचं भाषण आवडलं नाही. न आवडण्याचं कारण ते बोलले त्याबद्दल नाही, तर त्यांनी जे बोलण्याचं टाळलं त्याबद्दल आहे.

प्रणबदा भारताच्या इतिहासाबद्दल बोलले. पंडित नेहरू त्यांच्या भाषणांत भारताच्या पाच हजार वर्षांच्या सांस्कृतिक सातत्याबद्दल अनेकदा बोलत. प्रणबदांच्या भाषणात एकदा हा पाच हजार वर्षांचा संदर्भ आला. भारतीय राष्ट्रवादाबद्दल तर त्यांनी नेहरूंचेच शब्द वापरले. टागोर आणि गांधींचाही उल्लेख केला. संघ स्वयंसेवकांनी ज्या गांधी आणि नेहरूंचा आयुष्यभर द्वेष केला, त्यांच्यासमोर या दोघांचा आधार घेत प्रणबदा बोलल्यामुळे स्वयंसेवक अस्वस्थ झालेत, बावचळलेत आणि अनेक पुरोगाम्यांना आनंद झालाय.

पण, मी पुरोगामी असलो तरी मला हा आनंद झालेला नाही.

संघाच्या व्यासपीठावर जाऊ की जाऊ नये, हा प्रश्नही माझ्या मनात येत नाही. नक्की जावं. लोकशाही ही संवादावर उभी असते. संघ आपल्याला आवडो न आवडो, भारतातल्या एका वर्गाला ती आपली संघटना वाटते. त्यामुळे आपण संघाशी बोललंच पाहिजे. हुरियत, बोडो स्वतंत्रतावाद्यांशी आपण बोलतो, नक्षलवाद्यांना चर्चेचं आमंत्रण देतो, तसं संघाशीही आपण बोललं पाहिजे.

प्रश्न हा आहे की काय बोललं पाहिजे? जे प्रणबदा बोलले नाहीत!

संघाला हे आता खडसावून सांगण्याची वेळ आलेली आहे की, तुमच्या अनेक थेट आणि छुप्प्या संघटनांच्या माध्यमातून जे हिंसेचं थैमान घातलं जात आहे... गोरक्षा ते लव्ह जिहाद आणि घरवापसी या नावाखाली... ते तातडीनं थांबलं पाहिजे. प्रणबदा काय म्हणाले यावर? त्यांनी मोघम भाष्य केलं की, आजकाल भारतात हिंसा वाढीला लागली आहे आणि ती परस्पर अविश्वास आणि अज्ञान यातून येते आहे.

संघाला हे पण सांगायला हवं की, या देशात संविधान आहे. तुमची भारतीय संविधान बदलण्याची इच्छा जी अनेक तोंडांनी बोलून दाखवता ती मूलत: देशविरोधी आहे. प्रणबदा यावरही मोघम बोलले की, भारतीय राष्ट्रवाद हा संवैधानिक देशप्रेमातूनच निर्माण झालेला आहे.

होतं काय, प्रणबदांनी ही जी ‘स्टेट्समन’ लाईन घेण्याचा प्रयत्न केला त्यातून ठोस काहीच निष्पन्न झालं नाही. गांधी संघाच्या व्यासपीठावर जाऊन संघाचं कौतुक करून आले होते असं धादान्त खोटं पसरवलेली ही संघटना आहे. गांधींनी संघाच्या शिस्तीचं कौतुक केलं होतं, पण जे विचार संघ पसरवत होता (आणि आजही पसरवतो आहे) त्याला स्पष्ट विरोध केला होता. पण जिथं गांधींना, सरदार पटेल, सुभाषबाबू आणि भगतसिंगांना या ढोंग्यांनी मिसकोट केलं आहे, तिथं प्रणब मुखर्जींचं काय?

भारतीय इतिहासाचं आणि मागच्या पन्नास वर्षांच्या स्वतःच्या अनुभवाचं संचित असणाऱ्या या चालत्या बोलत्या भारतीय एनसायक्लोपीडियाला संघाची ही मिसकोट करायची वृत्ती ठाऊक नाहीये काय? आणि मग अशा वेळी कुठलीही संदिग्धता न ठेवता मुद्देसूद स्पष्ट शब्दांत सुनावणं गरजेचं नव्हतं काय?

लक्षात घ्या की प्रणबदांनी इतकं स्पष्ट राहणं का गरजेचं होतं? त्यांच्या भाषणानं संघ स्वयंसेवकांमध्ये काही फरक पडला नसता. पण, ज्यांना आजकाल संघ ही खरोखरच देशप्रेमी संघटना आहे असा गैरसमज झालाय. त्यांना या स्पष्टतेमुळे योग्य तो मेसेज गेला असता. एक असा मोठा समाज आहे, ज्याला हा हिंसाचार आणि त्यामागे असलेली भयंकर विकृत मानसिकता यांचा संबंध उलगडून सांगणं गरजेचं आहे. या विचारामुळे देशाच्या एकात्मतेलाच हादरा बसतोय, इथल्या विकासाच्या प्रक्रियेलाच खीळ बसतोय हे समजावून सांगणं गरजेचं आहे. प्रणब मुखर्जी यांनी हे करणं ही काळाची गरज होती.

प्रणब मुखर्जी यांच्या आत्मचरित्राचा पहिला भाग जेव्हा प्रसिद्ध झाला, तेव्हा विचारवंत प्रताप भानू मेहता यांनी ‘इंडियन एक्सप्रेस’मध्ये परीक्षण लिहिलं होतं. त्यात ते म्हणाले होते, ‘प्रणब मुखर्जी यांच्याकडे सांगण्यासारखं इतकं काही आहे. पण हे आत्मचरित्र मात्र निराशा करतं. त्यांनी जे लिहिलं त्यापेक्षा त्यांनी जे लिहिलं नाही, त्याचीच चर्चा यानिमित्तानं होत राहील.’

नागपुरातलं प्रणब मुखर्जी यांचं भाषण हे त्यांच्या आत्मचरित्रासारखंच होतं!

जाता जाता महाभारतामधला एक प्रसंग सांगतो. कृष्ण समेटाची बोलणी करण्यासाठी हस्तिनापुरात आलेला असतो. भीष्म त्याला कुरूंच्या ऐतिहासिक राजवाड्यात राहायला चल म्हणून विनवतो. कृष्ण नाही म्हणतो. विदुराकडे त्याच्या झोपडीत राहीन म्हणतो. नकार देताना कृष्ण कारण काय देतो माहितीये? तो सांगतो, एकतर मी दूत आहे आणि दूतानं असं राजवाड्यात येऊन राहणं बरं नाही. आणि दुसरं म्हणजे, ज्या वास्तूत माझ्या बहिणीची... द्रौपदीची विटंबना झाली तिथं राहणं मला जमणार नाही.

कृष्ण भीष्माला मोघम उत्तर देत बसत नाही की, विदुर तत्त्वज्ञ आहे आणि मलाही जरा गप्पा झाडायचा शौक आहे तर राहतो आपला एक दिवसासाठी त्याच्याकडे. तो स्पष्ट शब्दांत द्रौपदीची विटंबना आपण विसरलेलो नाही याची जाणीव कुरूंच्या सर्वांत बलशाली पुरुषाला करून देतो.

प्रणब मुखर्जी काही कृष्ण नाहीत आणि रेशीमबाग काही कुरूंचा राजवाडा नाही. पण भारतीय लोकशाही नावाच्या द्रौपदीची शंभर संघटनांची पिलावळ पोसत असलेल्या दु:शासनाकडून विटंबना तर होतेच आहे ना? मग, त्यांना थेट सुनवायचं काम तुम्ही नाही तर कोणी करायचं प्रणबदा?

.............................................................................................................................................

लेखक अमेय तिरोडकर  'द एशियन एज' या इंग्रजी वर्तमानपत्रात 'विशेष प्रतिनिधी' म्हणून काम करतात. 

ameytirodkar@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

Post Comment

sunil modak

Sun , 10 June 2018

अमेय, खूप योग्य विवेचन. पण प्रणव दा ज्या सर्वोच्च पदावर होते त्याला साजेशी अन् संघ कार्यकर्त्यांना उमजणारी भाषा वापरून प्रबोधन केलं. पण प्रश्न आहे की संघ यातील काही अंशही घेईल. त्यांच्या लेखी हिंदू कोण हे आधी नक्की होऊ दे अन् नंतर हिंदू राष्ट्रवाद वगैरे.


Gamma Pailvan

Sun , 10 June 2018

अमेय तिरोडकर, शहाबानो केसमध्ये राजीव गांधीकडून भारतीय लोकशाही नामक द्रौपदीचा फार सन्मान होत होता का? फालतू उदाहरणं देणं टाळा. असो. बाकी संघावर झाडलेल्या दुगाण्या पाहून मनोरंजन झालं. आज मोदी सत्तेत बसलेत ते संघाच्या ताकदीमुळे. तुमच्याकडून त्या ताकदीच्या संदर्भात प्रणवदांच्या भाष्याबद्दल विवेचन अपेक्षित आहे. ते न करता तुम्ही संघाच्या नावाने खडे फोडीत राहिलात तर अशाने मोदींचे मतदार वाढतील. तेव्हा सांभाळून. आपला नम्र, -गामा पैलवान


Manoj Jagatkar

Fri , 08 June 2018

एकदा एखादी विचारसरणी स्वीकारली कि मग सारासार विचार करणे बंद होते. एखाद्या घटने , संघटने विरोधी लिहिणे नेहमीच सोपे असते. प्रणब दा नी तारतम्य सांभाळत अति संयंत भाषण केले आहे. त्यांनी संघाला कानपिचक्या दिल्या आहेतच. मला भागवतांचे भाषण सुद्धा अति नियंत्रित वाटले. त्यांनी विरोधी विचारांचा सन्मान आणि स्वीकार केला हे महत्वाचे ! आपले पत्रकार एक तर एकारलेले आहेत किंवा पूर्वग्रह दुषित आहेत. त्यांना माफ केले जावे. जे आपल्या पुरोगामी संघटनांना जमले नाही ( सेवा , संघटना , विस्तार इ ) ते संघाने सातत्याने ७५ वर्षे केले आहे. ह्यामुळे अनेकांचा बुद्धी संकोच झाला आहे. वरील लेख म्हणजे आपले वैफल्य प्रणबदांच्या माथी मारण्याचा केविलवाणा यत्न आहे. दुर्लक्षित करावा इतुका ! कृष्ण आणि विदुराचा संबंध अप्रसुत वाटला, त्या ऐवजी शल्याला कामी घालता येत होते.


Sacchin .

Fri , 08 June 2018

प्रणबदांच्या संघभेटीने 'खांग्रेसी पिलावळी'च्या अंगाची लाहीलाही होत असावी असे वाटले काही लेख वाचून. अहो तुम्ही प्रणबदांना प्रश्न विचारता, पण तुम्हाला माहित आहे का ? मागच्या वर्षी काॅग्रेसनियुक्त माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी हे PFI (popular front of India) या संघटनेने आयोजित केलेल्या कार्यक्रमाला गेले होते. या PFI वर भारतविरोधी, दहशतवादी करावाया करण्याचा तसेच, इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेसाठी मुस्लिम युवकांची नेमणूक करण्याचा आरोप आहे. हे माहित असूनही हमिद अन्सारी या कार्यक्रमाला गेले, तेव्हा ना काॅग्रेसने काही आरडाओरडा केला ना त्यांच्या भाडोत्री पत्रकारांनी. पण आता प्रणव मुखर्जी संघाच्या कार्यक्रमाला गेले तेव्हा मात्र यांना कंठ फुटला, व त्यांचे कसे चुकले हे सांगायला अर्धकच्चे पत्रकार, नेते वगैरे सरसावले. म्हणजे प्रणबदा हे हिंदू आणि संघ हा हिंदूंच्या रक्षणार्थ काम करतो म्हणून त्यांच्यावर टिका, तर अन्सारींना मात्र काही करण्याची मुभा, त्यांच्यावर टिका नाही. यावरून काॅंग्रेसचा आणि भाडोत्री पत्रकारांचा ढोंगीपणा, ढोंगी निधर्मवाद दिसून येतो.


Anil Bhosale

Fri , 08 June 2018

मला वाटतं प्रणव मुखर्जींना ही मोठी संधी होती संघीना सुनावण्याची.. ती बऱ्याच प्रमाणात असफल झाली..


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

जर्मनीत २० हजार हत्तींचा कळप सोडण्याची धमकी एका देशाने दिली आहे, ही ‘हेडलाईन’ जगभरच्या प्रसारमाध्यमांमध्ये गाजतेय सध्या…

अफ्रिका खंडातील बोत्सवाना हा मुळात गरीब देश आहे. त्यातच एवढे हत्ती म्हणजे दुष्काळात तेरावा महिना. शेतांमध्ये येऊन हत्ती मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान करत असल्याने शेतकरी वैतागले आहेत. याची दखल बोत्सवानाचे अध्यक्ष मोक्ग्वेत्सी मेस्सी यांनी घेतली आहे. त्यामुळेच त्यांनी संतापून एक मोठी घोषणा केली आहे. ती म्हणजे तब्बल २० हजार हत्तींचा कळप थेट जर्मनीमध्ये पाठवण्याची. अनेक माध्यमांमध्ये ही ‘हेडलाईन’ गाजते आहे.......

महाराष्ट्राच्या राजकारणाचा हा ‘खेळखंडोबा’ असाच चालू राहू द्यायचा की, त्यावर ‘अक्सिर इलाज’ करायचा, याचा निर्णय घेण्याची एकमेव ‘निर्णायक’ वेळ आलेली आहे…

जनतेला आश्वासनांच्या, ‘फेक न्यूज’च्या आणि प्रस्थापित मीडिया व सोशल मीडियाद्वारे भ्रमित करूनही सत्ता मिळवता येते, राखता येते, हे गेल्या दहा वर्षांत भाजपने दाखवून दिले आहे. पूर्वी सत्ता राजकीय नेत्यांना भ्रष्ट करते, असे म्हटले जायचे, हल्ली सत्ता भ्रष्ट राजकीय नेत्यांना ‘अभय’ वरदान देण्याचा आणि एकाधिकारशाही प्रवृत्तीच्या राजकारण्यांना ‘सर्वशक्तिमान’ होण्याचा ‘सोपान’ ठरू लागली आहे.......