‘लोकमान्य ते महात्मा’ : महाराष्ट्राच्या सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक इतिहासाचे पुनर्वाचन  
ग्रंथनामा - वाचणारा लिहितो
सदा डुम्बरे
  • ‘लोकमान्य ते महात्मा’च्या इंग्रजी अनुवादाचे मुखपृष्ठ
  • Fri , 25 May 2018
  • ग्रंथनामा Granthnama वाचणारा लिहितो लोकमान्य ते महात्मा Lokmanya Te Mahatma सदानंद मोरे Sadanand More

डॉ. सदानंद मोरे लिखित ‘लोकमान्य ते महात्मा’ या पुस्तकाचा इंग्रजी अनुवाद अभय दातार यांनी केला असून त्याचे सकाळ प्रकाशनातर्फे १ मे २०१८ रोजी, पुणे येथे प्रकाशन झाले. त्या समारंभात केलेले भाषण.

.............................................................................................................................................

सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देऊन मी माझ्या भाषणाला सुरुवात करतो.

‘महाराष्ट्राचं महाभारत’ हे ज्या ग्रंथाचं उपशीर्षक होऊ शकतं, त्या ‘लोकमान्य ते महात्मा’ या द्विखंडात्मक महाग्रंथाचा इंग्रजीतील अनुवाद आज महाराष्ट्रदिनी प्रकाशित होण्यात मोठं औचित्य आहे.

महाराष्ट्राच्या प्रादेशिक सीमा ओलांडून महाराष्ट्रासंबंधीचा हा अभिनव विचारव्यूह जागतिक पातळीवर पोहोचतो आहे. तो पोहोचवण्याची अतिशय आव्हानात्मक कामगिरी ‘सकाळ प्रकाशना’ने स्वीकारल्याबद्दल त्यांचं अभिनंदन.

‘लोकमान्य ते महात्मा’शी माझा पहिल्यापासूनच संबंध आहे. त्याचं कारण अर्थातच ही लेखमाला ‘साप्ताहिक सकाळ’मधून प्रकाशित झाली आणि तब्बल पाच वर्षे चालली. एखादी लेखमाला इतकी वर्षे चालल्याचा कदाचित हा विक्रमच असेल. ही लेखमाला कशी विकसित होईल आणि त्यात आपल्याला नेमकं काय मिळणार आहे, याबाबत आमचे वाचक सुरुवातीला थोडेसे साशंक होते. परंतु डॉ. सदानंद मोरे यांच्या विद्वत्तेबद्दल, त्यांच्या व्यासंगाबाबत वाचकांची खात्रीही होती. त्यांच्या आधीच्या ‘तुकाराम दर्शन’मुळे या वाचकांशी त्यांचा परिचयही होता. सुदैवाने ‘साप्ताहिक सकाळ’च्या वाचकांची प्रोफाईल फार उत्तम होती आणि तो दूरवरही पसरलेला होता. महाराष्ट्राच्या बाहेर बेंगळुरु, हैदराबाद, अहमदाबाद, इंदूर, दिल्ली वगैरे शहरांत तर हे वाचक होतेच; शिवाय भारताबाहेर युरोप, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, प.आशियातही होतेच. इंग्लंडमध्ये तर अनेक वाचक होते. आपलं साहित्य ‘साप्ताहिक सकाळ’मध्ये प्रकाशित व्हावं, अशी अनेक नामवंत लेखकांची आकांक्षा असायची. याचं कारण वाचकांकडून मिळणारा सकारात्मक प्रतिसाद. डॉ. सदानंद मोरे यांच्या वाट्यालाही तो आला. फार आत्मीयतेने आला. कारण हे लेखन दुसरं-तिसरं काही नसून त्यांचा स्वत:चाच इतिहास होता. इतिहासाच्या आरशात त्यांच्याच प्रतिमा त्यांना दिसत होत्या. विस्मृतीत गेलेली स्वत:चीच ओळख त्यांना नव्याने होत होती. असो. एवढ्या प्रास्ताविकानंतर मी आता वळतो मूळ विषयाकडे.

माझा पहिलाच प्रश्न आहे की, कोण बुवा हे सदानंद मोरे? म्हणजे मोरेसरांशी आपण परिचित नाही, असं मला म्हणायचं नाही. आपण त्यांना लेखक म्हणून ओळखतो.

गेली तीस-पस्तीस वर्षे ते सातत्याने लिहिताहेत. ते ‘बातमीत’ असतात. वृत्तपत्रात ते झळकतात. अनेक कार्यक्रमांत त्यांची भाषणं असतात. ते उत्तम वक्ते आहेत. न्यूज चॅनेलवर चर्चांच्या कार्यक्रमांना त्यांना हमखास बोलावलं जातं. शासनाच्या अनेक कमिट्यांवर ते असतात. मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री वगैरे कसोटीच्या प्रसंगी त्यांचा सल्ला घेतात. पाठ्यपुस्तकांच्या संपादनात त्यांचा सहभाग असतो. झालंच तर, ते साहित्य संमेलनाचे वगैरे अध्यक्ष होते. साहित्य अकादमीवर ते आहेत. साहित्य अकादमीसह अनेक प्रतिष्ठित पुरस्कार त्यांच्या पुस्तकांना मिळालेत. पंडित मैत्री- सभेत संचार असल्याने ‘मनुजा चातुर्य येतसे फार’ हे त्यांच्या बाबतीतही खरे आहे. वगैरे वगैरे.

मला विचारायचंय की, हा कोणत्या मातीतला माणूस आहे? कोणत्या जमिनीतून हे झाड उगवलं आहे? ‘टेरा-फर्मा’ काय? त्यांचं सामाजिक स्थान काय? सोशल लोकेशन काय? कुठल्या परंपरेतून तो आलाय? हे प्रश्न मला कळीचे वाटतात, कारण याचा त्यांच्या लेखनाशी संबंध आहे. घनिष्ठ संबंध आहे. जैविक संबंध आहे. The man and his writings, त्यात काही फरक नाही.

इथे, आपल्या सगळ्यांना माहीत असलेलीच गोष्ट या टप्प्यावर मी अधोरेखित करतो. ती म्हणजे, वारकरी संप्रदायाचा त्यांना लाभलेला वारसा. संत तुकारामांचे ते थेट वंशज आहेत. तुकोबांचे दहावे वंशज. गेल्या अठरा पिढ्यांचा हा वारसा आहे. तुकोबांच्या आधीपासून. ज्ञानदेव- नामदेवांपासून तुकोबांपर्यंत विकसित झालेली ही परंपरा काय आहे? वैश्विक मूल्यभान असलेली ही परंपरा आहे. उदारमतवादी, समावेशक, समतावादी अशी ही परंपरा आहे. ती मानवतावादी आहे. समाजकेंद्री आहे. लोकशाहीवादी आहे. आणि म्हणूनच आधुनिक आहे. परंपरेतून निर्माण झालेली आधुनिकता. ती सनातनी नव्हे. जातवर्णवर्चस्ववादी तर नव्हेच. वैयक्तिक मोक्षही तिचं साध्य नाही. भक्ती हे साधनही आहे आणि साध्यही.

ती महाराष्ट्राची वैचारिक मध्य धारा आहे. महाराष्ट्र नावाच्या घटिताचं ते केंद्र आहे. महाराष्ट्र संस्कृतीच्या इमारतीचा तो मुख्य आधारस्तंभ आहे. आता या परंपरेचं तुम्ही पाईक असणं म्हणजे एक मूल्यभान जोपासणं, जगाकडे पाहण्याची एक परिदृष्टी विकसित होणं. एक ‘वर्ल्ड व्ह्यू’ तयार होणं. परंपरेतून गवसलेल्या आधुनिक मूल्यांसाठी संघर्ष करणं. प्रस्थापित अन्यायी व्यवस्थेशी, सर्वस्व पणाला लावून आत्मबळाच्या जोरावर रात्रंदिन युद्ध करणारे तुकोबा या परंपरेच्या शिखरस्थानी आहेत. हे मूल्यभान, हा मूल्यविवेक हा डॉ. सदानंद मोरे यांच्या सर्व लेखनकृतींच्या गाभ्याशी आहे. परंपरा आणि आधुनिकता यांचे संश्लेषण करून एक नवे परिमाणक, एक नवे पॅरडाईम त्यांनी सिद्ध केले. समकालीन अभ्यासक आणि विद्वान यांच्यापेक्षा त्यांचं ठळक वेगळेपण आहे ते हे. ही पृथकात्मता आणि त्यातून निर्माण झालेल्या लेखनकृती यामुळे अ‍ॅकॅडमिक वर्तुळात मोरे यांनी स्वत:चे स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे.

परंपरेला जोड मिळाली ती आधुनिक शिक्षणाची. त्यांचं एम.ए. आणि पीएच.डी. दोन्ही तत्त्वज्ञानातील. शिवाय आयुष्यभर तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक. तत्त्वज्ञान हे शास्त्रांचं शास्त्र. ज्ञानाचं शास्त्र. महाराष्ट्राच्या संस्कृतीचे, इतिहासाचे, लोकव्यवहाराचे अभ्यासक म्हणून मोरे आपल्याला परिचित आहेत. या आंतरशाखीय अभ्यासाची त्यांची स्वतंत्र बैठक तयार झाली, ती त्यांनी स्वत:पुरत्या विकसित केलेल्या पद्धतीशास्त्रामुळे. परंपरा आणि आधुनिकता यांच्या परस्परविनिमयात जी संघर्षमय सर्जनशीलता आहे, जो रचनात्मक ताणतणाव आहे; त्याचं प्रकटीकरण त्यांच्या या लेखनात झालं आहे. ते परंपरेच्या चष्म्यातून आधुनिकतेकडे पाहतात आणि आधुनिक, वैज्ञानिक. विवेकवादी दृष्टीतून परंपरेकडे पाहतात. या विचारप्रक्रियेत त्यांचा दृष्टिकोन सम्यक् होतो व वर्ण्यविषयाशी तादात्म्य न पावता, त्याच्याशी बौद्धिक अंतर कायम ठेवून ते अवघड प्रमेयं मांडतात आणि ती सोडविण्यासाठी वाचकाला निरपेक्ष बुद्धीने भरपूर सामग्री उपलब्ध करून देतात. उत्तरं शोधण्यासाठी वाचकाला प्रवृत्त करतात. प्रसंगी प्रमेयं सोडवूनही दाखवतात. परंपरा आणि आधुनिकता परस्परावलंबी आहेत- एकमेकांशी संबंधित आहेत, या त्यांच्या भूमिकेमुळे केवळ पाश्चात्त्य विचारांवर पोसलेल्या किंवा परंपरेतच जखडून गेलेल्या अभ्यासकांच्या मांडणीपेक्षा त्यांची मांडणी वेगळी होते. हे अस्सल देशी बेणं आहे, या मातीतील आहे आणि प्रतिकूल हवामानातही ते तग धरून राहणार आहे, असा आत्मविश्वास ते आपल्याला देतात.

यातूनच निर्माण होते ती त्यांची लेखनशैली. त्यांच्या लेखनाचा आशय वैचारिक आहे, अ‍ॅकॅडेमिक आहे; पण त्याचा घाट मात्र देशी आहे. विद्यापीठीय ज्ञानक्षेत्राला, अ‍ॅकॅडेमिक जगाला अपरिचित आहे. कदाचित अमान्यही आहे. ही शैली कीर्तनाची, प्रवचनाची आहे. हरदासी म्हणा हवं तर. समोर बसलेल्या किंवा गृहीत धरलेल्या श्रोतृवृंदाशी संवाद साधणारी आहे. त्यांच्या अंतरंगात शिरणारी आहे. त्यांच्या क्रिया-प्रतिक्रिया अजमावणारी आहे. त्याला सकारात्मक प्रतिसाद देणारी आहे. ही कथनशैली आणि त्यानुसार विचार करण्याची प्रक्रिया त्यांच्या जनुकात आहे. आनुवंशिक आहे. एखादी ओवी किंवा अभंग घ्यावा आणि कीर्तन-प्रवचनातून त्याचा विस्तार करावा.

डॉ.मोरे अनेक वर्षे उत्तम कीर्तन करतात, प्रवचन करतात, ही माहिती इथे अप्रस्तुत ठरणार नाही. His brain is hardwired for this form. आता या घाटातील लवचिकता अशी शाश्वत, सस्टेनेबल या अर्थाने की- खूप मोठी कथनं, ग्रँड नॅरेटिव्हज त्यातून निष्पन्न होतात. ‘लोकमान्य ते महात्मा’ ही ‘साप्ताहिक सकाळ’मधील लेखमाला पाच वर्षे सुरू होती आणि त्यातून हे साडेबाराशे-तेराशे पृष्ठांचे दोन खंड निष्पन्न होतात, यावरून आपण त्याची कल्पना करू शकतो. माहितीच्या प्राथमिक पातळीवरून विश्लेषणाच्या, मूल्यमापनाच्या, ज्ञानाच्या उच्चतर शिखरापर्यंतचा प्रवास आपल्याला अचंबित करतो. अनेक अवघड, दुर्गम वाटा-वळणांनी आपण इथपर्यंत कसे पोहोचतो वाचकाला कळत नाही. या वैचारिक प्रवासात तो कुठे दमला नाही की, त्याला कधी भोवळ आली नाही. डॉ. मोरे वाचकांचं बोट कधी सोडत नाहीत. माहितीचा, घटनांचा, घटितांचा अर्थ काय हे सांगत, अर्थनिर्णयन करीत ते आपल्याला पुढच्या अध्यायाकडे नेत राहतात. या देशी घाटाकडे परपुष्ट इंग्रजी वाचक कसे पाहतील, ही मोठ्या औत्सुक्याची आणि कुतूहलाची गोष्ट आहे.

‘लोकमान्य ते महात्मा’ या द्विखंडात्मक ग्रंथाच्या इंग्रजी अनुवादाचे आज प्रकाशन आहे. त्याचा सुटा आणि स्वतंत्र विचार होऊ शकतोच. मला मात्र एका विशेष गोष्टीचा निर्देश करावासा वाटतो. ‘तुकाराम दर्शन’, ‘लोकमान्य ते महात्मा’ आणि ‘गर्जा महाराष्ट्र’ ही मला एक त्रिपुटी वाटते. महाराष्ट्राच्या वैचारिक इतिहासाची त्रिपुटी. महाराष्ट्राच्या सामाजिक राजकीय व सांस्कृतिक इतिहासाचे हे पुनर्वाचन आहे. त्याची नव्याने केलेली समीक्षा आहे. मराठी समाजाकडे पाहण्याची एक परिदृष्टी देणारं, परिप्रेक्ष्य सांगणारं हे कथन आहे. मोरे अभ्यासक आहेत, विद्वान आहेत; परंतु हे लेखन विद्वत्ताप्रचुर नाही. इंटलेक्च्युअल या अर्थाने एका विचारवंतांचं ते लेखन आहे. आणि म्हणून महाराष्ट्रातील विद्यमान स्थितीच्या पुनर्विचाराला प्रेरणा देणारं हे महाकथन आहे. अलीकडच्या काळात ‘आयडिया ऑफ इंडिया’ला जसं आव्हान मिळत आहे, तसं ‘आयडिया ऑफ महाराष्ट्रा’लाही. महाराष्ट्राची संकल्पना, त्याची आत्मखूण, त्याची ओळख आणि त्याची अस्मिता गेली काही शतके कशी विकसित होत गेली, स्थिर झाली याचं फार यथार्थ दर्शन आपल्याला या तिन्ही ग्रंथांतून होतं. या महाराष्ट्राचं पुढे करायचं तरी काय, या समेवर आणून हे ग्रंथ आपल्याला सावध करतात, आत्मपरीक्षणासाठी उद्युक्त करतात. संस्थात्मक म्हणता येईल एवढं काम एक व्यक्ती स्वबळावर करते हे या प्रकल्पाचे वैशिष्ट्य आहे. सरदेसाई, राजवाडे, केतकर आदी महाराष्ट्रातील पूर्वसुरींच्या पठडीत ते बसते.

डॉ. मोरे यांची इतर पुस्तके सातत्याने प्रकाशित होत आहेत. सकाळ प्रकाशनानेच अलीकडे त्यांची दोन पुस्तके प्रसिद्ध केली आहेत. ती बाजूला ठेवली तरी महाराष्ट्राचं विचारविश्व किंवा डिसकोर्स ज्यात आला आहे, त्या (आधी उल्लेख केलेल्या) तीन पुस्तकांचीच एकत्रित पृष्ठसंख्या अडीच हजारांच्यावर आहे. त्यासाठी वापरलेल्या संदर्भग्रंथांची संख्या शेकड्यात आहे आणि व्यक्तिनामसूचीत दोन हजारांपेक्षा जास्त व्यक्तींचा समावेश आहे. काळाच्या भाषेत मोजमाप करायचं तर चारशेसाडेचारशे वर्षांचा कालखंड त्यांनी व्यापला आहे. महाराष्ट्राच्या लोकइतिहासाचे समग्र, संकीर्ण आणि साकल्याने आकलन करून देणारा हा बृहद् प्रकल्प डॉ. मोरे यांनी गेल्या २५-३० वर्षांत साकारला आहे, एकट्याच्या बळावर.

‘लोकमान्य ते महात्मा’ हे महाराष्ट्रातील स्थित्यंतर एकरेषीय नाही, ते अनेकपदरी आहे. खरं तर ते केवळ स्थित्यंतरही नाही, सत्तांतरच आहे. महाराष्ट्राच्या पारंपरिक सत्तापटाला या काळात प्रचंड आव्हानं मिळाली. निर्णायक आणि परिणामकारक बदलाचा हा काळ आहे. ‘पॅरडाईम शिफ्ट’ असंच त्याचं वर्णन करायला हवं. महाराष्ट्राच्या समाजजीवनावर प्रभाव टाकणार्‍या विचारधारा, व्यक्ती, वृत्ती, प्रवृत्ती, प्रवाह आणि घटनांचा विविध पदरी सांगोपांग वेध घेणारे हे खंड आहेत. महाराष्ट्राचं आकलन समृद्ध करणारे हे लेखन आहे. गांधीपूर्व महाराष्ट्र हा देशाच्या केंद्रस्थानी होता. पुणे ही देशाची वैचारिक राजधानी होती. इंटलेक्च्युअल कॅपिटल. सामाजिक क्रांतीचे अग्रदूत म. फुले हे पुण्याचे. न्या. रानडे म्हणजे महाराष्ट्राचे सॉक्रेटिस. काँग्रेसच्या स्थापनेत त्यांचा कळीचा सहभाग होता. पुण्यातच स्थापनेचा घाट घातला होता. या नव्या भारतीय पातळीवरील संस्थेसाठी विविध नावे सुचविलेली होती. रानड्यांप्रति सर्वांना असलेल्या आदराचे प्रतीक म्हणून त्यांनी सुचविलेले इंडियन नॅशनल काँग्रेस हे नाव एकमताने स्वीकारले गेले. लोकमान्य टिळक हे देशातील पहिले अखिल भारतीय नेते. त्याआधी अशी मान्यता कोणालाच मिळालेली नव्हती. नामदार गोखले तर गांधींना गुरुस्थानीच. त्यांचे निधन १९१५ मध्ये झाले, तेव्हा ब्रिटिश पार्लमेंटमध्ये त्यांना श्रद्धांजली अर्पण करताना ‘गोखले इंग्लंडमध्ये जन्मले असते तर ते ब्रिटनचे पंतप्रधान झाले असते, एवढी त्यांची योग्यता होती’ असं विधान केलं गेलं.

लोकमान्यांच्या निधनानंतर आणि गांधींच्या उदयानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीचे आकलन टिळकांच्या अनुयायांना झाले नाही. त्यांची तेवढी प्रज्ञा नव्हती आणि राजकीय प्रतिभाही नव्हती. अखिल भारतीय नेतृत्व करण्याची महत्त्वाकांक्षा महाराष्ट्राने गमावली. गांधीविरोध हा जणू एककलमी कार्यक्रमच त्यांना मिळाला. ‘गांधीमुक्त भारत’ हेच जणू त्यांचे स्वप्न होते. गोडशांच्या हातून शेवटी ही कामगिरी फत्ते झाली. टिळकांच्या निधनानंतर अखिल भारतीय पातळीवरील राजकारणात महाराष्ट्र परिघावर फेकला गेला, त्याचे सीमांतीकरण किंवा मार्जिनलायझेशन झाले. आल्विन टॉफलरच्या एका फार गाजलेल्या पुस्तकाचे शीर्षक वापरून म्हणायचे झाले तर- ही मोठी

‘पॉवर शिफ्ट’ होती. टेक्टॉनिक पॉवर शिफ्ट. सत्तांतर होते. डॉ. सदानंद मोरे यांनी या प्रक्रियेचं वर्णन करताना जे विधान केलं आहे ते फार मार्मिक, वर्मावर बोट ठेवणारं आहे. ते म्हणतात, “लोकमान्य ते महात्मा हीच महाराष्ट्राची मूळ समस्या आहे. ती समजून घेतल्याशिवाय आपण पुढे जाऊच शकत नाही. आपण आधीच खूप किंमत मोजली आहे, आता पुरे.’’

तुकाराम दर्शन एककेंद्री होतं. ‘लोकमान्य ते महात्मा’ द्विकेंद्री आहे. म्हणून अधिक गुंतागुंतीचे, कॉम्प्लेक्स आहे. या ग्रंथात टिळक आणि गांधी आपल्याला फार ठळकपणे भेटतातच, पण त्यांना जोडणारे या काळातले अक्षरश: शेकडो नेते-कार्यकर्ते त्यात डोकावतात. तो कालखंड जिवंत करतात. स्वातंत्र्य चळवळीचा धगधगता कालखंड. एक नवा समाज आकाराला येण्याची प्रक्रिया. खरं तर एका नव्या, आधुनिक, लोकशाही देशाच्या जन्मकळा, बाळंतकळा सोसण्याचा तो संधिकाळ. आनंदाचा, तेवढाच वेदनेचा. एक मोठं कथन साकारणारे डॉ. सदानंद मोरे यांच्या या ग्रंथाची संरचना, आर्किटेक्चर किंवा डिझाईन लक्षात घेतलं; तर ‘मेकिंग ऑफ महाराष्ट्र, जॉइनिंग द डॉट्स’ असं पर्यायी शीर्षक मी त्याला दिलं असतं.

अलीकडच्या काळात महाराष्ट्रासंबंधीचा बराचसा अभ्यास परकी देशांतील अभ्यासकांनी किंवा महाराष्ट्रीय अभ्यासकांनी परदेशी विद्यापीठात केला आहे. गुंथर सोंथायमर, एलिनॉर झेलिएट, अ‍ॅन फेल्डहाऊस, रोझॅलिंड ओ’हॅल्नन, गेल ऑमवेट व त्यांच्या जोडीला जयंत लेले आणि सध्या कार्यरत असलेल्या प्राची देशपांडे. महाराष्ट्रात असं काम उभं करणार्‍यांत डॉ. रा. चिं. ढेरे, डॉ. अरुण टिकेकर ही मोठी नावं आहेत. या मांदियाळीत आता डॉ.सदानंद मोरे यांचा मी आवर्जून समावेश करीन. He deserves it.

तरीही महाराष्ट्राच्या अभ्यासाच्या आणखी अनेक शक्यता आहेतच. इंडॉलॉजीसारखं महाराष्ट्रालॉजी वगैरे होऊ शकतं का, ते पाहायला हवं. पारंपरिक पद्धतीनेच काम करणार्‍या नवनवीन विद्यापीठांची स्थापना करण्याच्या लोकप्रिय घोषणांच्या मागे न लागता केवळ महाराष्ट्राच्याच अभ्यासाला वाहिलेल्या ‘सेंटर फॉर महाराष्ट्र स्टडीज’सारख्या नव्या संशोधन संस्थेची कल्पना आपण करायला हवी. त्याच्या नेतृत्वाची धुरा सांभाळण्यासाठी आपल्याकडे सुदैवाने कसलेले खंदे अभ्यासक डॉ.सदानंद मोरे उपलब्ध आहेत. त्यांना शुभेच्छा देऊन थांबतो.

जय हिंद! जय महाराष्ट्र!

.............................................................................................................................................

लेखक सदा डुम्बरे ‘साप्ताहिक सकाळ’चे माजी संपादक आहेत.

sadadumbre@gmail.com

.............................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/client/book_detailed_view/4415

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

Post Comment

Gamma Pailvan

Fri , 25 May 2018

सदा डुंबरे, आटोपशीर व समयोचित भाषण आहे. धन्यवाद! महाराष्ट्रॉलोजी चा विचार रोचक आहे. सदानंद मोऱ्यांचं हे वाक्य फार महत्त्वाचं आहे. : “लोकमान्य ते महात्मा हीच महाराष्ट्राची मूळ समस्या आहे. ती समजून घेतल्याशिवाय आपण पुढे जाऊच शकत नाही. आपण आधीच खूप किंमत मोजली आहे, आता पुरे.’’ मोदी २०१४ ला निवडून आल्यावर याच प्रकारचं भाष्य केलं होतं. ते म्हणाले की, "भारताच्या या भागातल्या (म्हणजे पश्चिम भारतातल्या म्हणजे गुजरात + महाराष्ट्र अभिप्रेत) नेतृत्वाकडे बराच काळ दुर्लक्ष झाले आहे." भारताच्या नेतृत्व परत महाराष्ट्राकडे खेचून घेतलं पाहिजे. या बाबतीत मुंबईतली बहुभाषिक लोकसंख्या कामी लावता येईल का याची चाचपणी करायला हवी. आपला नम्र, -गामा पैलवान


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘एच-पॉप : द सिक्रेटिव्ह वर्ल्ड ऑफ हिंदुत्व पॉप स्टार्स’ – सोयीस्करपणे इतिहासाचा विपर्यास करून अल्पसंख्याकांविषयी द्वेष-तिरस्कार निर्माण करणाऱ्या ‘संघटित प्रचारा’चा सडेतोड पंचनामा

एखाद्या नेत्याच्या जयंती-पुण्यतिथीच्या निमित्तानं रचली जाणारी गाणी किंवा रॅप साँग्स हा प्रकार वेगळा आणि राजकीय क्षेत्रात घेतल्या जाणाऱ्या निर्णयांवर, देशातील ज्वलंत प्रश्नांवर सातत्यानं सोप्या भाषेत गाणी रचणं हे वेगळं. भाजप थेट अशा प्रकारची गाणी बनवत नाही, पण २०१४नंतर जी काही तरुण मंडळी, अशा प्रकारची गाणी बनवतायत त्यांना पाठबळ, प्रोत्साहन आणि प्रसंगी आर्थिक साहाय्य मात्र करते.......

या स्त्रिया म्हणजे प्रदर्शनीय वस्तू. एक माणूस म्हणून जिथं त्यांना किंमत दिली जात नाही, त्यात सहभागी होण्यासाठी या स्त्रिया का धडपडत असतात, हे जाणून घेण्यासाठी मी तडफडत होते…

ज्यांनी १९७०च्या दशकाच्या अखेरीला मॉडेल म्हणून काम सुरू केलं आणि १९८०चं संपूर्ण दशकभर व १९९०च्या दशकाच्या सुरुवातीचा काही काळ, म्हणजे फॅशन इंडस्ट्रीच्या वाढीचा आलेख वाढायला सुरुवात झाली, त्या काळापर्यंत काम करत राहिल्या आहेत, त्यांना ‘पहिली पिढी’, असं म्हटलं जातं. मी जेव्हा त्यांच्या मुलाखती घेतल्या, तेव्हा त्या पस्तीस ते पंचेचाळीस या दरम्यानच्या वयोगटात होत्या. सगळ्या इंग्रजी बोलणाऱ्या.......

निर्मितीचा मार्ग हा अंधाराचा मार्ग आहे. निर्मितीच्या प्रेरणेच्या पलीकडे जाणे, हा प्रकाशाकडे जाण्याचा, शुद्ध चैतन्याकडे जाण्याचा मार्ग आहे

ही माया, हे विश्व, हे अज्ञान आहे. हा काळोख आहे. त्याच्या मागील शुद्ध चैतन्य हा प्रकाश आहे. सूर्य, उषा ही भौतिक जगातील प्रकाशाची रूपे आहेत, पण ती मायेचाच एक भाग आहेत. ह्या अर्थाने ती अंधःकारस्वरूप आहेत. निर्मिती ही मायेची स्फूर्ती आहे. त्या अर्थाने माया आणि निर्मिती ह्या एकच आहेत. उषा हे मायेचे एक रूप आहे. तिची निर्मितीशी नाळ जुळलेली असणे स्वाभाविक आहे. निर्मिती कितीही गोड वाटली, तरी तिचे रूपांतर शेवटी दुःखातच होते.......

‘रेघ’ : या पुस्तकाच्या ‘प्रामाणिक वाचना’नंतर वर्तमानपत्रांतील बातम्यांचा प्राधान्यक्रम, त्यांतल्या जाहिरातींमधला मजकूर, तसेच सामाजिक-राजकीय-सांस्कृतिक क्षेत्रांतील घटनांसंबंधीच्या बातम्या, यांकडे अधिक सजगपणे, चिकित्सकपणे पाहण्याची सवय लागेल

मर्यादित संसाधनांच्या साहाय्याने जर डोंगरे यांच्यासारखे लेखक इतकं चांगलं, उल्लेखनीय काम करू शकत असतील, तर करोडो रुपये हाताशी असणाऱ्या माध्यमांनी किती मोठं काम केलं पाहिजे, असा विचार मनात आल्याशिवाय राहत नाही. पण शेवटी प्रश्न येतो तो बांधीलकी, प्रामाणिकपणा आणि न्यायाची चाड असण्याचा. वृत्तवाहिन्यांवर ज्या गोष्टी दाखवल्या जात, त्या विषयांवर ‘रेघ’सारख्या पुस्तकातून प्रकाशझोत टाकला जातो.......