मेरे शहर का माहोल अब सुहाना न लगे...
पडघम - कोमविप (कोकण, मराठवाडा, विदर्भ, प.महाराष्ट्र)
प्रवीण बर्दापूरकर
  • उजवीकडील छायाचित्र दै. ‘दिव्य मराठी’च्या सुमीत डोळे यांचं आहे.
  • Sat , 19 May 2018
  • पडघम कोमविप मराठवाडा Marathwada जातीय दंगल Communal Riots Communal Violence औरंगाबाद Aurangabad

१.

पत्रकारितेच्या निमित्तानं नागपूरला पडाव पडल्यावर उर्दूचे जाणकार, मराठी साहित्यातील युद्धकथांचं दालन समृद्ध करणारे सेवानिवृत्त लष्करी अधिकारी आणि महत्त्वाचं म्हणजे, ‘आईना-ए-गझल’ या उर्दू ते मराठी, हिंदी आणि इंग्रजी कोशकर्ते डॉ. विनय उपाख्य राजाभाऊ वाईकर यांची ओळख झाली. मी औरंगाबादचा आहे असं सांगितल्यावर त्यांच्या परिचित शैलीत राजाभाऊ म्हणाले -

तुम्हारे शहर का मौसम बडा सुहाना लगे  

मैं एक शाम चुरा लूं अगर बुरा न लगे

पुढे ‘आईना-ए-गझल’च्या प्रकाशनासाठी नागपूरला आलेल्या प्रख्यात गायक, साक्षात जगजितसिंह यांच्या तोंडून मुमताझ राशीद यांनी लिहिलेली ही गझल ऐकायला मिळाली. नंतरच्या काळात औरंगाबाद शहराबद्दल अनेकांनी डॉ. वाईकर यांच्यासारखीच भावना व्यक्त केल्याच्या आठवणी मनाच्या कुपीत जमा झालेल्या आहेत.

मलिक अंबरने १६१०मध्ये वसवलेल्या औरंगाबादला मी आलो ते १९६५ साली. तेव्हा हे शहर खरंच टुमदार होतं, शांत होतं. खाम नावाची पाण्यानं तुडुंब आणि खळाळत वाहणारी (आता कचऱ्याची खाई झालेली!) खाम नदी होती. माई-म्हणजे आई, नर्स असल्यानं शासकीय वैद्यक महाविद्यालयाच्या (औरंगाबादकरांच्या भाषेत घाटी दवाखाना!) परिसरात नेहमीच जावं लागे. संध्याकाळनंतर गजबज शांत होऊ लागली की, खाम नदीच्या पाण्याचा खळखळाट त्या परिसरात ऐकू येत असे. पावसाळ्यातल्या वाढत्या संध्याकाळी मिटमिटत्या उजेडात, त्या येणाऱ्या आवाजाची भीती वाटत असे, इतका तो खळखळाट दटावणीखोर असे. गावात ठिकठिकाणी कायम परदेशी आणि प्रामुख्याने गोऱ्या पर्यटकांचा वावर असे. त्यांचे लांडे कपडे, बाटलीतून पाणी पिणं याचं अप्रूप वाटत असे. भर उन्हाळ्यातही पंखा लागत नसे, इतकं हवामान आल्हाददायक असे. विशेषत: सामिष पदार्थांची चव तेव्हा औरंगाबादच्या बाहेरून येणारे जास्तच वाखाणत. दररोज ते खाणाऱ्या औरंगाबादकरांना त्याचं फार काही कौतुक नव्हतं. तेव्हा बसस्टँड शहागंज भागात होतं. तिकडे आणि सिटी चौकात अनेक हॉटेल्स होती. औरंगाबादची खासीयत असलेली नान खलिया, लज्जतदार मटन खाण्यासाठी खवय्यांची पावलं सिटी चौकाकडे वळत असत. शहागंज भागातील हॉटेल्स रात्री उशीरापर्यंत उघडी असत आणि तिथं गजल व हिंदी चित्रपट गीतं ऐकण्यासाठी जाण्याची क्रेझ होती. मुशायरेही नियमित होत असत. लोकसंख्या तेव्हा साधारण एक लाख ६० हजार असल्याची (आणि त्यापैकी ९८ हजार मुस्लीम असल्याची) नोंद शासनाच्या वतीनं प्रकाशित केलेल्या आणि माईकडे येणाऱ्या वार्षिकीत वाचल्याचं अजूनही स्मरतं. बहुसंख्य टांगे मुस्लिमांचे असायचे, पण या लेकराला अमुक एका ठिकाणी सोडून दे, असं त्या टांगेवाला किंवा पुढे आलेल्या ऑटोरिक्षा चालकाला सांगितलं गेलं तर  ते पाळलंही जायचं. नवखा लुबाडला गेलाय, एकट्या स्त्रीला कधी प्रवास करताना भीती वाटलीये, असं कधी औरंगाबाद सोडेपर्यंत तरी कानावर नाही आलं. ऑटोरिक्षा चालकानं प्रवाशाची विसरलेली बॅग परत केल्याच्या आणि त्याबद्दल पोलिसांनी त्याचा सत्कार केल्याच्या बातम्याही ‘मराठवाडा’ आणि ‘अजिंठा’ या दैनिकांत वाचल्याचं आठवतं.

मराठवाड्यातील अन्य गावांप्रमाणेच औरंगाबादलाही धार्मिक तणावांचा वारसा होता. रझाकारांनी केलेल्या अत्याचाराचे व्रण मनावर ताजे असणारी पिढी अस्तित्वात होती. त्या व्रणांमागच्या छळकथा ते सांगत, तेव्हा अंगावर शहारा उमटत असे. तेव्हाही औरंगाबादचा समावेश संवेदनशील शहरात आणि तणाव हिंदू विरुद्ध मुस्लीम असा आणि स्पष्ट होता. दंगल म्हणजे नेमकं काय हे वय कळायचं नव्हतं. १९६८ची दंगल वणव्यासारखी पेटली. शहर एक तरी आठवडाभर लष्कराच्या ताब्यात होतं. माई खंडाळ्याला होती, वडील दौऱ्यावर होते आणि घरी आम्ही मुलंच होतो. एका निंबाच्या मोठ्ठ्या झाडाखालच्या नूतन कॉलनी बस ​स्टॉपसमोर असणाऱ्या एका चाळीत तेव्हा आम्ही राहत असू. पाठीशी पूर्ण वस्ती मुस्लिमांची. पण आमच्या चाळीच्या लगत राहणाऱ्या एका फुफी आणि फुफा यांनी आम्हाला त्यांच्या घरी नेलं आणि वडील परतेपर्यंत पुढचे दिवस आम्हाला आश्रय दिला. बस स्टॉपच्या झाडाखाली जवानांची चौकी लागलेली होती. त्या जवानांनाही त्या फुफी पाणी, चहा, गरम भाजी नेऊन द्यायच्या. १९७२ची दंगल भडकली तेव्हा मी सिटी चौकात होतो. लोक सैरावैरा पळायला सुरुवात झाली. मी भांबावून गेलो. एका ऑटोरिक्षा चालकानं ‘हिंदू हो क्या’ असं विचारलं आणि मी ‘हो’ म्हणताच रिक्षात घालून त्यानं एकही पैसा न घेता नूतन कॉलनीत आणून सोडलं होतं... असं बरंच काही...बळ आणि तारुण्यातील असे अनेक अनुभव वज्रासारखे मनावर कोरले गेल्यानं औरंगाबादच्या आठवणी सुखद वाटायच्या, मन कातर व्हायचं. ‘चांद के साथ कई दर्द पुराने निकले...’ ही जगजितसिंह यांनी म्हटलेली गजल, शब्द बदलून मी ‘चांद के साथ औरंगाबाद की यादे निकली’ अशी गुणगुणायत ते सुनहरे दिवस आठवायचो...

२.

पत्रकारितेसाठी १९७८साली औरंगाबाद सोडलं आणि मे १९९८मधे परत आलो. या मधल्या काळात देशाच्या आणि राज्याच्या पटावर अनेक महत्त्वाच्या घटना घडून गेलेल्या होत्या. दहशतवादाच्या गडद होऊ लागलेल्या छायेत इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांची हत्या झालेली होती. रामनामाच्या हिंस्र गजरात बाबरी मस्जिद पाडली गेलेली होती. देशाला हिंसाचाराची लागण झालेली होती. काँग्रेसचा संकोच सुरू झालेला अन भाजप विस्तारायला लागलेला होता. केंद्रात आणि राज्यातही हिंदुत्ववादी विचारांचं सरकार आलेलं होतं. अनेक नवे राजकीय पक्ष आणि नवं राजकीय नेतृत्व उदयाला आलेले होते. गल्लोगल्ली-गावांच्या सीमेवर अमुक पक्ष, शाखा स्वागत करत आहे अशा पाट्या झळकत होत्या. जागतिकीकरण आणि खुल्या अर्थ व्यवस्थेचे वारे जोरात वाहू लागलेले होते.    

औरंगाबादही बदलेलं, विस्तारलेलं होतं. इतका विस्तार की गावाच्या पाsssर बाहेर असणारा शहानूरमियां दर्गा गावात येत, वस्ती त्यापलीकडे विस्तारली होती. नागरीकरणात या शहराचं नाव झालेलं होतं आणि आद्योगिक वाढीमुळे लोकांचाही ओढा वाढलेला होता. मात्र ‘दंगलीचं गाव’ ही या शहराची प्रतिमा काही पुसट झालेली नव्हतीच. शुक्रवारच्या दुपारच्या नमाजच्या वेळी, रमजान, गणेशोत्सव, महापुरुषांच्या जयंती आणि पुण्यतिथीनिमित्त होणाऱ्या कार्यक्रमांच्या निमित्तानं या शहराची नवीन झालेली ओळख स्पृहणीय नव्हती.

एकेकाळी हिंदू आणि मुस्लीम द्वेषाची धार आता हिंदू, मुस्लीम आणि दलित अशी तिहेरी आणि अत्यंत धारदार, टोकाच्या अस्मितेची, परस्परांवर हिंसक आक्रमण करण्याची झालेली होती. एके काळचं टुमदार औरंगाबाद कचरा, अतिक्रमण यामुळे बकाल होऊ लागलेलं होतं. मित्रवर्य उल्हास जोशी पोलीस आयुक्त होते. त्यांच्यासोबत आणि एकटा फिरताना असताना हे गाव आता आपल्या मनातलं ‘सुहानं’ गाव राहिलेलं नाही, हे लक्षात आलं.

१९९९चा उद्रेक झाला, तेव्हा पोलीस आयुक्तालयाच्याच्या परिसरात हिंसक होण्याचं आणि पोलीस वसाहतीत धुडगूस घालण्याचं धाडस येण्याइतका बेडर झालेला समाज जवळून अनुभवता आला. ते धाडस एकाच वेळी मन विषण्ण आणि भयकंपितही करणारं होतं...   

३.

पदोन्नतीमुळे मार्च २००३मध्ये पुन्हा औरंगाबाद सोडावं लागलं आणि मे २०१४मध्ये परत आलो तेव्हा लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्यात निर्माण झालेल्या हितसंबंधांनी इतका कोडगा कळस गाठलेला होता की, नागरी सोयी सुविधांचा बोजवारा उडालेला आहे आणि टुमदार औरंगाबादचा उकिरडा झालेला आहे. चार दशकांच्या पत्रकारितेत देशभर आणि अनेक परदेशातही फिरणं झालं, पण रस्ता दुभाजकावर अतिक्रमण हा ‘अद्वितीय’ प्रकार औरंगाबादलाच अनुभवायला मिळाला. अत्यंत वाईट भाग म्हणजे पहाटे लवकर उठून फिरायला गेलं किंवा संध्याकाळी घरी परततांना द्वेषाच्या भगव्या, निळ्या, हिरव्या, पिवळ्या अशा अनेक रंगाच्या आवाजांची आसमंतात दाटी झालेली दिसायला लागलीये. जरा जरी खुट्ट वाजलं तरी चाकू, तलवारी निघू लागल्याचं दृश्य रोजचं झालेलं आहे.

अध:पतन ही एक अपरिहार्य मूलभूत प्रक्रिया आहे, हे खरं, पण ते किती तर सोबत दै. ‘दिव्य मराठी’च्या सुमीत डोळे यांनी टिपलेलं छायाचित्र नि:शब्द करणारं आहे- महात्मा गांधी यांच्या पुतळ्याच्या पायथ्याशी उभं राहून हिंसक होण्याइतकं समाजाचं अध:पतन झालंय. अशा घटनांनी केवळ विद्वेषाच्या ज्वाळा धडाडून पेटत नाहीत तर शहर कणाकणानं मरत जातं, त्या धगधगत्या वन्हीत शहराची जी काही असते ती प्रतिमा आणि संस्कृती शरमेनं जळते, सर्वसामान्यच होरपळतो, माणुसकीचं दहन होतं. कोणतीही दंगल विनाकारण घडलेली नसते तर ती घडवून आणलेली असते, याचा विसर पडलेला हा बहुसंख्य अध:पतित समाज आहे हे दर्शवणारं हे छायाचित्र आहे!

४.

ही अवस्था केवळ औरंगाबादचीच नाही तर संपूर्ण देशाची आहे. अनेक शहरांचं संचित मुद्दाम निर्माण केलेले धार्मिक किंवा जातीय तणाव हेच झालेलं आहे. एकीकडे पायाभूत सुविधांत वाढ, झपाट्यानं झालेलं नागरीकरण, औद्योगिक विकास, वाढलेलं दरडोई उत्पन्न, आर्थिक दृष्ट्या संपन्न असणाऱ्या मध्यमवर्गीयांचं वाढलेलं प्राबल्य तर दुसरीकडे अधिकच गरीब होत गेलेले समाजातले काही सर्व धर्मीय-जातीय घटक आणि तिसरीकडे प्रत्येक टोकाच्या असमंजस व स्वार्थी राजकीय हेतूंनी या देशाचं मतांसाठी म्हणजे पर्यायानं सत्ताप्राप्तीसाठी जाती-धर्माचे विखार सोडत नासवून टाकलेलं वातावरण, असं हे त्रांगडं झालेलं आहे (त्यात भर धर्मांध बेभान कट्टरपंथीय आणि त्यांच्या संघटनांनी घातलेली आहे). त्यातही मुस्लीम आणि आदिवासींची अवस्था अधिक गंभीर आहे. काँग्रेस असो की राष्ट्रवादी की मुस्लीम लीग की एमआयएम सर्वच राजकीय पक्षांनी मुस्लिमांचा ‘वापर’ करून घेतलाय, याची सच्चर समितीचा अहवाल वाचल्यावर, २०१४च्या मुजफ्फनगरच्या दंगलीचा अनुभव घेतल्यावर माझी खात्री पटली आहे.

आपण आपल्यात सामावून न घेतल्यानं हा समाज, तसंच बळीराजा, आदिवासी आणि सर्व धर्मीय गरीब आता निराश झाला आहे. बहुसंख्य मुस्लीम, शेतकरी आणि आदिवासी अजूनही आत्यंतिक गरिबीच्या खाईत आहेत. शिक्षण, रोजगार, नोकऱ्याअभावी फारच कमी मुस्लीम किमान चांगलं जीणं जगू शकतात. मुजफ्फरनगरची दंगल सुरु झाली तेव्हा केंद्रात मनमोहनसिंग पंतप्रधान तर उत्तर प्रदेशात अखिलेश यादव मुख्यमंत्री होते आणि मी दिल्लीत पत्रकारीता करत होतो. एक दिवस काँग्रेसच्या एका मंत्र्याच्या चेंबरमधे बसलेलो असताना या दंगलीचा विषय निघाला, तेव्हा मी म्हणालो, ‘एका दिवसात ही दंगल चिरडून टाकायला हवी’. त्यावर एक बुझुर्ग पत्रकार म्हणाले, “ये महाराष्ट्र नहीं, यूपी, दिल्ली हैं. चुनाव आनेवाले हैं. और महिना-पंधरा दिन गुजरने दो, पचास-सौ और मरने दो. फिर सरकार कुछ करेगी.” तिथं उपस्थित असणाऱ्या कुणीही त्या म्हणण्याचा प्रतिवाद केला नाही .

नंतर दंगलग्रस्त मुस्लिमांच्या सरकारनं उभारलेल्या छावण्यांत सुविधांची इतकी वाणवा होती की, त्यापेक्षा सडक्या फळावरील माशा चांगलं जीणं जगतात असं म्हणण्याची वेळ होती... इतकी परिस्थिती नरकासमान होती. पुरोगामी महाराष्ट्रात पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री  असताना मुस्लिमांना देण्यात आलेल्या आरक्षणाची काय वाट लागली ही आपण पहिलं आहेच. भाजप तर विरोधी आहेच, पण केवळ भाजपच नाही तर काँग्रेससकट सर्वच राजकीय पक्षांनी या समाजाचा वापर केवळ एकगठ्ठा मतं आणि निवडणुकीतील विजयासाठी हिंदू मतांचं ध्रुवीकरण यासाठी केलेला आहे. नेत्यांनी निवडणुकीच्या नशेत आणि धर्मसंस्थानी परंपरा तसंच अंध व जाचक रूढींच्या कायम गुंगीत ठेवलेला हा समाज आहे. या गुंगीतून बाहेर काढण्यासाठी या समाजाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारखा द्रष्टा महामानव अजूनही भेटलेला नाही.

जे देशाच्या बहुसंख्य शहरात आहे तेच औरंगाबादेत आहे. भीमा कोरेगावनंतर आणि आता दोन दिवस धार्मिक विद्वेषाच्या खाईत औरंगाबाद होरपळल्यावर समोर हे जे आलंय ते भेसूर, माणुसकीचा मुडदा पडणारं आहे. ‘मेरे शहर का मौसम और माहोल सुहाना हैं ’ असं मला आता मुळीच म्हणावसं वाटत नाही.                     

शेवटी- अशा संवेदनशील प्रसंगीही शेरेबाजी करण्याचा, सर्व दोष पोलिसांवर ढकलण्याचा प्रयत्न करणं राजकारणी नेहमीप्रमाणे करत आहेत. या ‘ब्लेम गेम’च्या खेळात अतिरिक्त पोलीस महासंचालक या दर्जाच्या अधिकाऱ्यानंही सामील व्हावं आणि त्याचा पोलीस दलाच्या मनोधैर्यावर परिणाम होऊ शकतो, हे भान विसरलं जावं, हे मुळीच योग्य नाही. चुकलेल्या पोलिसांचे खाजगीत कान उपटले असते तर ते अधिक समंजसपणाचं ठरलं असतं. आडनावात बिहार असलं म्हणून जबाबदारीच्या पदावरच्या अधिकाऱ्यांनी लालूप्रसाद यादव यांच्यासारखं बेताल बडबडायचं नसतं!

(संदर्भ सहाय्य- महेश देशमुख, औरंगाबाद)   

.............................................................................................................................................

लेखक प्रवीण बर्दापूरकर दै. लोकसत्ताच्या नागपूर आवृत्तीचे माजी संपादक आहेत.

praveen.bardapurkar@gmail.com

भेट द्या - www.praveenbardapurkar.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

Post Comment

Gamma Pailvan

Mon , 21 May 2018

प्रवीण बर्दापूरकर, मुस्लिम समाजाला आंबेडकरांसारखा नेता मिळाला होता. हमीद दलवाई त्याचं नाव. पण तो वयाच्या ४५ व्या वर्षी मृत्यू पावला. त्याची स्मृती म्हणावी तशी जोपासली गेली नाही. महाराष्ट्रीय पत्रकारितेच्या औदासिन्याबद्दल कोणीही खंत व्यक्त करतांना दिसंत नाही. शेवटी हमीद दलवाई ज्या तिहेरी तलाकच्या अन्यायाविरुद्ध लढला तो तिहेरी तलाक शेवटी मोदींनी कायदा करून संपुष्टात आणला. बघा काय विरोधाभास आहे. म्हणूनंच हिंदूना मुस्लिमद्वेष्टे म्हणण्यात तुमची काहीतरी गफलत होते आहे. आपला नम्र, -गामा पैलवान


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘जातवास्तव’ स्वीकारल्याशिवाय सत्ता आणि संसाधनांचा जातीय ‘असमतोल’ दूर करता येणार नाही. उमेदवारांची नावे जातीसकट जाहीर करणे, हा एक ‘सकारात्मक प्रयोग’ आहे

महायुतीच्या ३८ उमेदवारांपैकी १९ मराठा आहेत. विशेष म्हणजे हे सगळे श्रीमंत मराठे आहेत. महाविकास आघाडीच्या ३९ उमेदवारांपैकी २४ मराठा आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या ३२ उमेदवारांपैकी ५ अनुसूचित जाती, १३ ओबीसी आणि ४ मराठा आहेत. यावरून एक गोष्ट लक्षात येते की, मविआ असो वा महायुती एका विशिष्ट समाजाकडेच सत्ताबळ झुकलेले दिसते. मात्र वंबआने उमेदवारी देताना जात समतोल पाळलेला दिसतो.......

स्वयंपाकघरात टांगलेल्या कॅलेंडरवरच्या चित्राइतकीच थरारकता वा जाहिरातीतून एखादं उत्साहवर्धक पेय विकणार्‍या म्हातार्‍या अमिताभ बच्चनइतकीच विश्वासार्हता, दहा वर्षं राष्ट्रीय व्यासपीठावर वावरलेल्या मोदींच्या व्यक्तिमत्त्वामध्ये उरली आहे...

प्रचारसभांमधून दिसणारे पंतप्रधान दमले-भागलेले, निष्प्रभ झालेले आहेत. प्रमाणापलीकडे वापरलेली छबी, अतिरिक्त भलामण आणि अतिश्रम, यांमुळे त्यांची ‘रया’ गेल्यासारखी वाटते. एखाद्या ‘टी-ट्वेंटी’ सामन्यात जसप्रीत बूमराला वीसच्या वीस षटकं गोलंदाजी करायला लावावी, तसं काहीसं हे झालेलं आहे. आक्रसत गेलेला मोदींचा ‘भक्तपंथ’ टिकून असला, तरी ‘करिष्मा’ उर्फ ‘जादू’ मात्र चाकोरीबद्ध झालेली आहे.......

भाजपच्या ७६ पानी ‘जाहीरनाम्या’त पंतप्रधान नरेंद्र मोदींची तब्बल ५३ छायाचित्रं आहेत. त्यामुळे हा जाहीरनामा आहे की, मोदींचा ‘छायाचित्र अल्बम’ आहे, असा प्रश्न पडतो

काँग्रेसच्या ४८ पानी जाहीरनाम्यात राहुल गांधींची फक्त पाच छायाचित्रं आहेत. त्यातली तीन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत आहेत. याउलट भाजपच्या जाहीरनाम्याच्या मुखपृष्ठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीमागे बळंच हसताहेत अशा स्वरूपाचं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचं छायाचित्र आहे. त्यातली ‘बिटवीन द लाईन’ खूप सूचक आणि स्पष्टता सूचित करणारी आहे.......

जर्मनीत २० हजार हत्तींचा कळप सोडण्याची धमकी एका देशाने दिली आहे, ही ‘हेडलाईन’ जगभरच्या प्रसारमाध्यमांमध्ये गाजतेय सध्या…

अफ्रिका खंडातील बोत्सवाना हा मुळात गरीब देश आहे. त्यातच एवढे हत्ती म्हणजे दुष्काळात तेरावा महिना. शेतांमध्ये येऊन हत्ती मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान करत असल्याने शेतकरी वैतागले आहेत. याची दखल बोत्सवानाचे अध्यक्ष मोक्ग्वेत्सी मेस्सी यांनी घेतली आहे. त्यामुळेच त्यांनी संतापून एक मोठी घोषणा केली आहे. ती म्हणजे तब्बल २० हजार हत्तींचा कळप थेट जर्मनीमध्ये पाठवण्याची. अनेक माध्यमांमध्ये ही ‘हेडलाईन’ गाजते आहे.......