‘रणांगण’ : एन. डी. तिवारींचा मराठमोळा, पण सिनेमॅटिक अवतार 
कला-संस्कृती - मराठी सिनेमा
श्रीकांत ना. कुलकर्णी
  • ‘रणांगण’ची पोस्टर्स
  • Sat , 12 May 2018
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti मराठी सिनेमा Marathi Movie रणांगण Ranangan स्वप्निल जोशी Swapnil Joshi सचिन पिळगावकर Sachin Pilgaonkar राकेश सारंग Rakesh Sarang

काही व्यक्ती आपल्या हयातीतच आपला वारसदार चांगला असावा आणि त्यानं आपल्या घराण्याचं नाव उज्ज्वल करावं, यासाठी सतत धडपड करतात. विशेषतः आपल्याच रक्ताचा ‘वारस’ असावा यासाठीही कोणतीही पातळी गाठायची त्यांची तयारी असते. त्यासाठी नीती-अनीतीच्या गोष्टी त्यांना मान्य नसतात. त्यांना फक्त आपल्या घराण्याची परंपरा वाढीस लावणारा ‘वारस’ हवा असतो. ‘रणांगण’ या नवीन मराठी चित्रपटात अशाच एका ‘वारसा हट्टा’नं पेटून उठलेल्या एका घरंदाज देशमुखांची कथा चित्रित करण्यात आली आहे. लेखक-दिग्दर्शक राकेश सारंग यांनी दिग्दर्शित केलेला हा पहिलाच चित्रपट आहे. चित्रपट पाहताना दिग्दर्शनाचा नवखेपणा जाणवत असला तरी एक गुंतवून टाकणारी कथा पडद्यावर चांगल्या पद्धतीनं सादर करण्यात त्यांना चांगलं यश मिळालं आहे, असं म्हणावं लागेल. 

काही वर्षांपूर्वी उत्तर प्रदेश व उत्तराखंडचे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, राज्यपाल अशी विविध मानाची पदं भूषवलेल्या नारायणदत्त तिवारी यांच्या अनौरस पुत्रानं त्यांच्याविरुद्ध केलेला दावा बराच गाजला होता. त्यांच्या या अनौरस पुत्रानं थेट सर्वोच्च न्यायालयात जाऊन आपल्या वारसाहक्काची लढाई जिंकली होती. चित्रपटाची कथा याच घटनेवर बेतलेली दिसते. त्या अनुषंगानं सुचलेल्या कथेत लेखक-दिग्दर्शक राकेश सारंग यांनी योग्य ते बदल करून त्यांना वाटणाऱ्या काही सोयीच्या गोष्टी गृहीत धरून आणि त्याला ‘मराठमोळा’ टच देऊन ही कथा पडद्यावर साकार केली आहे. अर्थात चित्रपटाच्या कथेतील ही ‘गृहीतके’ फारशी पटणारी नसली तरी कथा औत्स्युकपूर्ण असल्यामुळे शेवटापर्यंत ती खपून गेली आहेत. 

‘रणांगण’ मध्ये श्यामराव देशमुख या शिक्षणसम्राट कम राजकीय नेत्याची कथा पहायला मिळते. श्यामराव देशमुख यांचे व्यतिमत्त्व अतिशय आत्मकेंद्री आणि महत्त्वाकांक्षी आहे. आपल्याला पाहिजे तसं करून घेण्यासाठी कोणत्याही थराला जाण्याची त्यांची नेहमीच तयारी असते. त्यांचा मुलगा वरद हा संतती निर्माण करण्यास अपात्र आहे, हे कळल्यामुळे अस्वस्थ असलेले श्यामराव आपल्याच रक्ताचा वारस असावा म्हणून एक वेगळीच खेळी खेळतात. श्लोक उर्फ अविनाश हा त्यांचा अनौरस मुलगा. अर्थात हे ‘गुपित’ फक्त श्यामराव आणि श्लोकलाच माहीत असतं. श्यामरावच्याच शिक्षणसंस्थेतील एका शिक्षिकेपासून झालेला हा श्लोक त्यांच्या घरात मात्र लहानपणापासून पालनपोषण केलेला एक ‘अनाथ मुलगा’ म्हणून वावरत असतो. वरदला मुलगा होण्यासाठी श्यामराव श्लोकचा वापर करून घेण्याचं ठरवतात. आपल्याच रक्ताचा वारस असावा या कल्पनेनं पछाडलेले श्यामराव श्लोकपासून गरोदर असलेल्या सानिकाला आपली सून (वरदची बायको) करून घेतात. एका क्षणी श्लोकला श्यामरावांनी आपल्या जन्मदात्या आईचा खून केल्याचं कळतं आणि त्याचा बदला घेण्यासाठी आणि वारसाहक्कासाठी तो श्यामरावांशी संघर्ष पुकारतो. उभयतांच्या शह-काटशहांच्या लढाईत अखेर कोण जिंकतं? त्याची कहाणी म्हणजे ‘रणांगण’.   

श्लोक आणि श्यामरावांच्या एकमेकांवर मात करण्यासाठी केलेल्या शह-काटशहांच्या लढाईत काही गोष्टी सोयीनं वापरल्याचं प्रकर्षानं जाणवतं. श्यामरावांचं ‘राजकारण’ इतकं वरवरचं दाखवलं आहे की, अधूनमधून फक्त पक्षश्रेष्टींचं नाव घेतलं जातं, मात्र ते कोणत्या पक्षांशी संबंधित आहेत, त्याचा फारसा उल्लेख होत नाही. तसेच ‘राज्यसभा सीट’' मिळवण्यासाठी देण्यात येणारे पैसे आणि त्यामध्ये श्लोकला अडकवण्याचा श्यामरावांचा प्रयत्न हा लुटूपुटीचा वाटतो. त्यांचं ‘विद्यापीठ’ही अशीच ‘बोगस’ वाटतं. सानिकाचे आजोबा (माधव अभ्यंकर), श्यामरावांनी श्लोकच्या आईचा खून करताना पाहिलेला त्यांचा शोफर (विजय पटवर्धन) आदी काही महत्त्वाच्या व्यक्तिरेखाही पडद्यावर येतात आणि जातात. तसंच श्यामरावानी पोसलेला उस्मान नावाचा गुंड (संजय नार्वेकर) हा श्यामरावांच्या बाजूनं असतो की, श्लोकच्या याचा नीट उलगडा होत नाही. . 

कलाकारांच्या अभिनयाच्या बाबतीत बोलायचं झाल्यास स्वप्नील जोशीनं श्लोकची भूमिका अतिशय वेगळ्या ढंगात साकार केली आहे. त्याचा लूक आणि वेशभूषा खलनायकसदृश्य भूमिकेला छान शोभली आहे. याउलट कथेच्या मानानं श्यामराव देशमुख यांची व्यक्तिरेखा अधिक ‘तगडी’ हवी होती. या भूमिकेत सचिन पिळगावकर यांनी अभिनयाचे विविध कंगोरे दाखवले असले तरी त्यांची भूमिका ‘खुजी’ वाटते. सानिका झालेल्या प्रणाली घोगरेनं पदार्पणातच चांगलं दिसण्याबरोबरच अभिनयही बऱ्यापैकी केला आहे. सिद्धार्थ चांदेकरनंही वरदची समजूतदार भूमिका चांगली रंगवली आहे. श्यामरावांच्या मेव्हण्याच्या भूमिकेत असलेले आनंद इंगळे यांची भूमिका ही केवळ विनोदनिर्मितीसाठी आहे आणि ती कामगिरी त्यांनी चांगली पार पडली आहे. ‘सख्या रे घायाळ मी हरिणी...’ हे रिमेक गाणं कथेला अनुकूल ठरलं आहे, मात्र बाकीची गाणी नसती तरी चालली असती.

.............................................................................................................................................

लेखक श्रीकांत ना. कुलकर्णी ज्येष्ठ सिनेपत्रकार आहेत.
shree_nakul@yahoo.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सिनेमा हे संदीप वांगा रेड्डीचं माध्यम आहे आणि त्याला ते टिपिकल ‘मर्दानगी’ दाखवण्यासाठी वापरायचंच आहे, तर त्याला कोण काय करणार? वाफ सगळ्यांचीच निवते… आपण धीर धरायला हवा…

संदीप वांगा रेड्डीच्या ‘अ‍ॅनिमल’मधला विजय त्याने स्वत:वरच बेतलाय आणि विजयचा बाप बलबीर त्याने टीकाकारांवर बेतलाय की काय? त्यांचं दुर्लक्ष त्याला सहन होत नाही, त्यांच्यावर प्रेम मात्र अफाट आहे, त्यांच्या नजरेत प्रेम, आदर दिसावा, यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे. रेड्डीसारख्या कुशल संकलकानं हा ‘समीक्षकांवरच्या, टीकाकारांवरच्या अतीव प्रेमापोटी त्यांना अर्पण केलेला’ भाग काढून टाकला असता, तर .......