दिवाळी अंक : लसाविमसावि
पडघम - सांस्कृतिक
टीम अक्षरनामा
  • ललित आणि अक्षर यांची मुखपृष्ठे
  • Fri , 25 November 2016
  • दिवाळी अंक Diwali Ank टीम अक्षरनामा ललित Lalit अक्षर Akshar

ललित

‘ललित’ हे ग्रंथलेखन, ग्रंथप्रसार आणि ग्रंथसंग्रह या विषयांना वाहिलेलं मराठीतलं एकमेव मासिक आणि बुक ट्रेड जर्नल आहे. त्यामुळे ललितच्या दिवाळी अंकाचा वाचक साहित्यप्रेमी आहे, हे काही नव्याने सांगण्याची गरज नाही. ललितचा दिवाळी अंक त्याचा टार्गेट ऑडियन्स नजरेसमोर ठेवूनच काढला जातो. या वर्षीचा अंकही त्या परंपरेला साजेसा असाच आहे. मात्र अंक पाहताच काही पट्टीच्या वाचकांना थोडंसं चुकचुकल्यासारखं होऊ शकतं. गेली जवळपास ४९ वर्षं ललितच्या दिवाळी अंकाचं मुखपृष्ठ ज्येष्ठ व्यंगचित्रकार वसंत सरवटे करत असत. गेल्या दोन-तीन वर्षांपासून सरवटेंना वयोपरत्वे ते शक्य होत नसल्यामुळे चित्रकार सतीश भावसार मुखपृष्ठ करत आहेत. ललित दिवाळी आणि सरवटे हे एक समीकरण झालं होतं. यापुढच्या काळात ललित दिवाळी आणि भावसार हे समीकरण होऊ घातलं आहे, असं दिसतं. हा बदल नक्कीच स्वागतार्ह आहे. फक्त सरवटे यांना इतक्या लवकर विसरणं ललितच्या वाचकांना शक्य होणार नाही. दुसरी गोष्ट म्हणजे पत्रपंडित गोविंद तळवलकर यांचा लेख आणि ललित दिवाळी हेही समीकरण अलीकडच्या काही वर्षांत रुजू घातलं होतं. त्यानुसार यंदाही ललितची सुरुवात तळवलकर यांच्या  लेखानेच झाली आहे. या वर्षी शेक्सपिअरच्या निधनाला चारशे वर्षं झाली आहेत. त्या निमित्ताने जगभर शेक्सपिअरविषयी वेगवेगळे कार्यक्रम झाले. त्याच्यावर लेख, पुस्तकं लिहिली गेली. तो धागा पकडून तळवलकरांनी ब्रिटिश शेक्सपिअर अमेरिका आणि रशियामध्ये कशा प्रकारे लोकप्रिय झाला, या विषयी लिहिलं आहे. वेगवेगळ्या लेखकांनी लिहिलेली पुस्तकं, लेख यांवर तळवलकरांचा हा लेख आधारित आहे. अशा प्रकारचा लेख तळवलकर जपून लिहितात. अनलंकृत शैली हा तळवलकरांचा प्रधान विशेष. शब्दांची उधळमाधळ त्यांच्या लेखणीला अजिबात चालत नाही. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे वयाच्या नव्वदीतह तळवलकर अशा प्रकारचा लेख लिहू शकतात, हे नक्कीच कौतुकास्पद आहे. एके काळी महाराष्ट्रात विद्वान संपादक म्हणून प्रचंड दबदबा असलेले तळवलकर या वयातही लिहिते आहेत, ही नक्कीच आश्चर्यकारक बाब म्हटली पाहिजे. त्यामुळे त्यांच्या लेखातून फार काही हाती लागत नसलं, तरी किमान काही वेगळी माहिती नक्कीच मिळू शकते. दुसरं म्हणजे, मराठीमध्ये एक दुष्ट परंपरा आहे. ती म्हणजे, ज्येष्ठ, मान्यताप्राप्त सहसा नव्या, तरुण लेखक-कवींची दखल घेत नाहीत. याला एक अपवाद असलेल्या वसंत आबाजी डहाके यांनी मंगेश नारायणराव काळे यांच्या ‘तृतीय पुरुषाचे आगमन’ या दीर्घ कवितेची केलेली समीक्षा मननीय आणि स्वागतार्ह आहे. या परंपरेचे पाईक वाढायला हवेत. तिसरं म्हणजे, ज्येष्ठ कथालेखिका आशा बगे यांनी नुकत्याच निवर्तलेल्या, प्रसिद्धीपराङ्मुख कथा-कादंबरीकार आनंद विनायक जातेगावकर यांच्याविषयी लिहिलेला लेखही मनोज्ञ आहे. जातेगावकरांचा उल्लेख बगे यांनी ‘अम्लान पर्व’ असा केला आहे. बगे यांचा लेखही ‘अम्लान’ आहे. ‘नवनीत’ या मराठीतल्या पहिल्या गोल्डन ट्रेझरीविषयीचा लीला दीक्षित यांचा लेख मात्र निराशाजनक आहे. तो त्यांनी लिहिला नसता, तर जास्त बरं झालं असतं. वसंत हजरनीस या मर्ढेकरांना समकालीन असलेल्या आणि ‘काव्यात मी मर्ढेकरी’ असं स्वत:ला म्हणवून घेणाऱ्या कवीची ओळख अनंत देशमुख यांनी करून दिली आहे. मीना वैशंपायन यांनी झुम्पा लाहिरी या बंगाली-अमेरिकी लेखिकच्या लेखनप्रवासाची करून दिलेली ओळख लेखकाने ‘अस्मिता, लेखकपण आणि लेखन’ यांकडे कसं पाहावं यावर चांगला प्रकाश टाकते. रवींद्र शोभणे यांनी ग्रेसविषयी वैयक्तिक आठवणींना उजाळा दिला आहे. ग्रेस यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या आता परिचित झालेल्या पैलूंनाच हा उजाळा पुन्हा अधोरेखित करणारा आहे. दीपक घारे यांनी केनेथ क्लार्क या बहुआयामी लेखकाची ओळख करून दिली आहे, तर वर्षा गजेंद्रगडकर यांनी त्यांचे वडील, रा. चिं. ढेरे यांच्याविषयी लिहिलं आहे. हे दोन्ही दोन भाषेतले लेखक संस्कृतीचे किती निष्ठावान अभ्यासक होते, लेखन-संशोधनासाठी किती एकनिष्ठ होते, याचा प्रत्यय स्तिमित करणारा आहे. ‘कथा, कादंबरी, कविता आणि ललित गद्य या सर्जनशील साहित्याची स्थितिगती’ हा परिसंवाद मात्र तितकासा जमला नाही. मोनिका गजेंद्रगडकर यांनी सोशल मीडियावरच्या लेखनाला सरसकट निकालात काढलं आहे. त्यावर अनेक जण आक्षेप घेऊ शकतात. या माध्यमांमुळे सर्जनशील साहित्य वाचण्याचं प्रमाण कमी झालं आहे, हा अनेकांप्रमाणे त्यांचाही वहिम असल्याने त्यांचं मत ठीकच म्हणावं लागेल. इतर तिन्ही लेखांमधूनही सर्जनशील साहित्याची स्थितिगती फारशा नेमकेपणाने अधोरेखित होत नाही, असं खेदाने म्हणावं लागतं. प्रवीण दशरथ बांदेकर, जयप्रकाश सावंत, चंद्रकांत भोंजाळ, विवेक गोविलकर, नंदिनी आत्मसिद्ध, अरुण नेरूरकर यांचे लेखही वाचलेच पाहिजेत असे आहेत. कुठल्याही दिवाळे अंकातल्या सर्वच लेखांची भट्टी जमून आलेली असतेच असे नाही, पण ज्या अंकातले किमान अर्धे लेख चांगले असतात, तो अंक उत्तम म्हणावा लागतो. ‘ललित’ हा अंक निश्चितच त्या फळीत मोडणारा आहे.

 ‘ललित’, संपादक – अशोक कोठावळे,  पाने - १८२, मूल्य – १२० रुपये.

………………………………………………………

अक्षर

भरीव, ठोस ऐवज हाती ठेवणारा ‘अक्षर’मधला परिसंवाद हे या अंकाचं खास वैशिष्ट्य असतं. या वर्षाचा परिसंवादही त्याला अपवाद नाही. ‘हिंसेचे दशावतार’ असं नाव असलेल्या या परिसंवादात प्रत्यक्षात नऊच लेख असले, तरी तो या अंकातला स‌र्वांत खणखणीत ऐवज आहे. हिंसाचार केवळ महाराष्ट्रात, केवळ भारतातच नाही, तर जगभरच बोकाळत चालला आहे. मानवतेचा, माणुसकीचा कितीही उदोउदो केला, तरी हिंसा कमी होताना दिसत नाही. माणसामाणसामध्ये दरी वाढवणारा हिंसाचार केवळ धर्म, जात यांच्या नावावरच होतो असं नाही. तो कधी सरकारच्या नावाखाली होतो, तर कधी शांततेच्याही नावाखाली होतो. कधी नवरा-बायकोच्या नात्यातही होतो. भाषिक हिंसाचारही सोशल मीडियावर दिवसेंदिवस उग्र होत चालला आहे. या परिसंवादात अशा हिंसाचाराचा वेगवेगळ्या बाजूंनी मागोवा घेण्याचा प्रयत्न केला आहे. रघु कर्नाड-ग्रेस जॅजो यांनी एका मारेकरी पोलिसाच्या हिंसाचाराची कहाणी सांगितली आहे, तर आयसिसने जगभर जो धूमाकूळ घातला आहे, त्या विषयी निळू दामले यांनी लिहिलं आहे. भारतात धर्माच्या नावावर होणाऱ्या हिंसेची वेगवेगळी रूपं हेमंत देसाई यांनी उलगडून दाखवली आहेत. वंदना खरे यांनी कौटुंबिक हिंसाचाराविषयी लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. समीर विद्वांस यांनी अनुराग कश्यपच्या सिनेमांतल्या हिंसेविषयी, संतोष शिंदे यांनी मुलांवर होणाऱ्या हिंसेविषयी, दीप्ती राऊतने जातीच्या नावावर होणाऱ्या हिंसेविषयी, राहुल बनसोडे यांनी सोशल मीडियावर होणाऱ्या भाषिक हिंसेविषयी लिहिलं आहे. यातले जवळपास सर्व लेख सुटे वाचले, तर ते तितके परिणामकारक वाटत नाहीत. वंदना खरे यांचा लेख तर वाचताना कंटाळवाणा होतो; पण हे सर्व लेख एकसलग वाचले (अंकात तशी सोय नाही, कारण मध्येमध्ये इतर मजकूर आहे) आणि या परिसंवादातला हिंसेमागच्या कारणांचा शोध घेणारा आशिष देशपांडे यांचा लेख वाचला, तर या आजच्या शतकातली सर्वाधिक भयानक गोष्ट कोणती, हे वेगळ्याने सांगायची गरज राहत नाही. बाकी लेखांमध्ये अमेय तिरोडकरने जेएनयूची वेगळी ओळख करून दिली आहे. ती फर्मास आहे. सोनाली नवांगुळचं आत्मकथनही हेलावून टाकतं. धडधाकट माणसांना तिची वेदना कळकळून टाकते, यातच सर्व काही आलं! निमिष पाटगावकरने खेळाच्या लोकप्रियतेमागच्या प्रायोजक, प्रसिद्धी, प्रसारमाध्यमं आणि पैसा या चार ‘प’कारांचा आंतरसंबंध उलगडून दाखवला आहे. अलका धुपकरने तीन महिन्यांच्या अभ्यासदौऱ्यात अनुभवलेल्या सिंगापूरविषयी लिहिलं आहे. प्रसन्न करंदीकरचा स्टेम सेलविषयीचा लेख माहितीपूर्ण आणि सुरस म्हणावा असा आहे. कर्ज काढून जगण्याचे दिवस जगभरच कसे फोफावत चालले आहेत, या विषयी संजीव चांदोरकर यांनी लिहिलं आहे. हा धावता आढावाही मननीय आहे. ‘अक्षर’मधल्या कथा-कविता यांचाही दर्जा चांगलाच असतो. त्यामुळे ते विभागही वादातीतपणे वाचनीय आहेत.

‘अक्षर’, संपादक – मीना कर्णिक, हेमंत कर्णिक, पाने – २५८, मूल्य – १८० रुपये.

editor@aksharnama.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

भाजपच्या ७६ पानी ‘जाहीरनाम्या’त पंतप्रधान नरेंद्र मोदींची तब्बल ५३ छायाचित्रं आहेत. त्यामुळे हा जाहीरनामा आहे की, मोदींचा ‘छायाचित्र अल्बम’ आहे, असा प्रश्न पडतो

काँग्रेसच्या ४८ पानी जाहीरनाम्यात राहुल गांधींची फक्त पाच छायाचित्रं आहेत. त्यातली तीन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत आहेत. याउलट भाजपच्या जाहीरनाम्याच्या मुखपृष्ठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीमागे बळंच हसताहेत अशा स्वरूपाचं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचं छायाचित्र आहे. त्यातली ‘बिटवीन द लाईन’ खूप सूचक आणि स्पष्टता सूचित करणारी आहे.......

जर्मनीत २० हजार हत्तींचा कळप सोडण्याची धमकी एका देशाने दिली आहे, ही ‘हेडलाईन’ जगभरच्या प्रसारमाध्यमांमध्ये गाजतेय सध्या…

अफ्रिका खंडातील बोत्सवाना हा मुळात गरीब देश आहे. त्यातच एवढे हत्ती म्हणजे दुष्काळात तेरावा महिना. शेतांमध्ये येऊन हत्ती मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान करत असल्याने शेतकरी वैतागले आहेत. याची दखल बोत्सवानाचे अध्यक्ष मोक्ग्वेत्सी मेस्सी यांनी घेतली आहे. त्यामुळेच त्यांनी संतापून एक मोठी घोषणा केली आहे. ती म्हणजे तब्बल २० हजार हत्तींचा कळप थेट जर्मनीमध्ये पाठवण्याची. अनेक माध्यमांमध्ये ही ‘हेडलाईन’ गाजते आहे.......

महाराष्ट्राच्या राजकारणाचा हा ‘खेळखंडोबा’ असाच चालू राहू द्यायचा की, त्यावर ‘अक्सिर इलाज’ करायचा, याचा निर्णय घेण्याची एकमेव ‘निर्णायक’ वेळ आलेली आहे…

जनतेला आश्वासनांच्या, ‘फेक न्यूज’च्या आणि प्रस्थापित मीडिया व सोशल मीडियाद्वारे भ्रमित करूनही सत्ता मिळवता येते, राखता येते, हे गेल्या दहा वर्षांत भाजपने दाखवून दिले आहे. पूर्वी सत्ता राजकीय नेत्यांना भ्रष्ट करते, असे म्हटले जायचे, हल्ली सत्ता भ्रष्ट राजकीय नेत्यांना ‘अभय’ वरदान देण्याचा आणि एकाधिकारशाही प्रवृत्तीच्या राजकारण्यांना ‘सर्वशक्तिमान’ होण्याचा ‘सोपान’ ठरू लागली आहे.......