‘कवीचं जे असलेपण आहे ती कविता. ‘कवी’पासून भाववाचक नाम बनवलं की ‘कविता’ होते. त्यानं कविता लिहायला पाहिजे असं नाही. त्याचं असणं आहे, तेच कविता आहे’
ग्रंथनामा - जागतिक पुस्तक दिन
भाग्यश्री भागवत
  • प्रातिनिधिक छायाचित्र
  • Mon , 23 April 2018
  • ग्रंथनामा जागतिक पुस्तक दिन World Book Day २३ एप्रिल 23 April

सर्वसामान्यत: कविता या रचनाप्रकाराचा विचार करता, एका विशिष्ट लयीचा, नादाचा आणि भावात्मक अर्थाचा प्रत्यय हा रचनाप्रकार देतो, असे लक्षात येते; परंतु या प्रत्ययाचे अधिकाधिक विश्लेषण करता, रचनेत उतरलेल्या कवितेचा ‘कविता हा स्वभाव’ असण्याशी घनिष्ट संबंध प्रस्थापित होताना दिसतो. ‘कादंबरी लिहिणारा कादंबरीकार, लघुकथा लिहिणारा लघुकथाकार, निबंध लिहिणारा निबंधकार, तसा कवी नाही. कवीचं जे असलेपण आहे ती कविता. ‘कवी’पासून भाववाचक नाम बनवलं की ‘कविता’ होते. त्यानं कविता लिहायला पाहिजे असं नाही. त्याचं असणं आहे, तेच कविता आहे.’ हे अशोक शहाणे यांचे मत म्हणूनच रास्त ठरते. हा घनिष्ट संबंध जास्तीत जास्त शोधण्याचा प्रयत्न प्रस्तुत लेखामध्ये केला आहे.

रचना आणि धारणा यांमधील सगळ्यात कमी अंतर म्हणजे कविता होय. त्यामुळे ‘स्व’ला पुन:पुन्हा मोडण्यातून आणि रचण्यातून ती उत्पन्न पावते, परंतु येथे ‘स्व’ म्हणजे स्वत:ला केंद्रस्थानी मानून केलेली रचना अपेक्षित नाही. कविता ही आत्मकेंद्री अथवा स्वकेंद्री रचना नाही. ती व्यक्तिनिष्ठ नसते. विशिष्टत्वापेक्षा कवितेला प्रतिनिधित्व अधिक प्रिय असते. परंपरेशी गाढ बांधिलकी राखत वाढीच्या विविध शक्यतांसह ती काळाच्या पटलावर उभी राहते. कुठल्याही गोष्टीला द्रवरूप होऊन भिडण्याची क्षमता म्हणजे कविता होय. म्हणून म. सु. पाटील म्हणतात, ‘तिचा वेध घेण्यासाठी कवी स्वत:मध्ये जितका खोलवर बुडी घेतो, तितका तो कमी वैयक्तिक बनत जातो. तो मानवाच्या मूलभूत स्वभावापर्यंत पोचतो. अशा वेळी सर्वांना समान अशा मानवभावांची नाना रूपे आकलण्यात व ती अभिव्यक्त करण्यात तो गढून गेलेला असतो. तेथे कवीचे भाव वैयक्तिक राहत नाहीत. आविष्कार प्रक्रियेतच ते स्व-पर-तटस्थसंबंधांच्या पलीकडे जातात, म्हणून ते कोणाचेही होतात. त्यांना विश्वात्मता प्राप्त होते.’ त्यामुळे जगण्याच्या सर्वसामान्य तऱ्हांपेक्षा ती जाणिवेला अधिक तीव्र भासते. या तीव्रतेमागे चिरंतन आणि सार्वत्रिक होण्याची इच्छा प्रबळपणे कार्यरत असते. सर्वसामान्य चेहऱ्यांमधीलच एक स्वतंत्र आवाज म्हणजे कविता होय. या दृष्टीने विचार करता, ‘स्व’च्या नोंदी करत असतानाही ती व्यक्तिगत होण्याच्या शक्यता लोप पावतात. कारण समाजाच्या एका सामायिक मूलाधारावरच, पण ठळकपणे ती उभी राहते. त्यामुळे ‘स्व’बद्दल बोलत असतानाही तिला परंपरेच्या संदर्भापासून सुटे राहणे शक्य नसते. आजूबाजूला घडणारे, न घडणारे आणि या संदर्भात ‘स्व’ यांची अविरत होणारी कोंबाकोंबी म्हणजे कविता होय. त्यामुळे कविता हा स्वभाव असणाऱ्याला स्वत:तून काळासकट काहीही वगळणे शक्य नसते. म्हणूनच कविता हा सर्वांत जास्त लवचीक आणि कमीत कमी घोटीव रचनाप्रकार ठरतो.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

वास्तवाइतकेच स्वप्नाच्या जवळ असणे, ही कविता हा स्वभाव असणाऱ्याची मूलप्रवृत्ती असते. त्यामुळेच अशी कविता वास्तवाच्या जितकी जवळ जाते, तितकेच तिला स्वप्नाच्या जवळ जाणे क्रमप्राप्त ठरते. याचा ताण तिच्यावर सतत अंमल करत असतो. त्यामुळे या स्वप्न-वास्तवात सतत सोलवटत राहणे, हाच तिचा स्वभाव असतो. त्यामुळेच कविता हा स्वभाव असणाऱ्यासाठी अस्वस्थता क्रमप्राप्त ठरते. कारण द्रवरूप असण्यातून भोवतालबद्दलच्या त्याच्या संवेदनेची तीव्रता वाढीस लागते. यातून बदलाच्या आकांक्षेचा वेग वाढीस लागतो आणि त्यातून अस्वस्थतेची तीव्रता वाढते.

वर्तमानाला दिलेली जास्तीत जास्त निरलस प्रतिक्रिया म्हणजे कविता होय. मात्र म्हणून कुठल्याही अर्थी ही प्रतिक्रिया भाबडी नसते. जास्तीत जास्त मानुष आणि नैसर्गिक या अर्थी ही प्रतिक्रिया निरलस ठरते. यातील मानुषतेत प्रामाणिकपणाचा समावेश होतो, तर नैसर्गिकमध्ये उत्कटेचा समावेश होतो. ही उत्कटता वास्तवाबाबत बेभान न करता काळाची नवी संगती लावण्यास भाग पाडते. या अर्थी कविता एकूणच काळाबाबत अधिकाधिक प्रगल्भ होत जाते. सर्वसामान्य व्यवहाराप्रमाणे विशिष्ट चौकटीत ती मूल्यमापन करू शकत नाही. यासाठी काळाच्या वेगवेगळ्या संदर्भांसकट आयुष्यभर जगणे कवितेला क्रमप्राप्त ठरते. काळाच्या जुन्या-नव्या सर्व संदर्भांना पुन:पुन्हा तपासून जोखणे आणि ते निकामी भासल्यास त्यांची संगती सतत नव्राने लावण्याचा रत्न करीत राहणे, ही कवितेची आंतरिक गरज असते. त्यामुळे कविता हा स्वभाव असणाऱ्याला कुठल्याही एकाच एका संकल्पनेला चिकटून न राहता सतत प्रवाही असणे क्यमप्राप्त ठरते.

कविता हा स्वभाव असणाऱ्या प्रवृत्तीची दोन गोष्टींपासून सुटका नसते -

१) सचोटी

२) जगाच्या तुलनेत सतत भानावर असणे.

या दोन्ही घटकांचा विचार करता, ‘भावना’ या घटकाला रूढार्थाने कवितेसंदर्भात ज्या प्रकारे महत्त्व दिले जाते, ती एका अर्थी कवितेची दिशाभूल ठरते. कारण ‘भावुकता’ हा घटक कवितेची फार तर प्राथमिक अवस्था दर्शवतो, परंतु तर्कशुद्धपणे विचार केल्यास असे लक्षात येते की, भावुकता/ भावविवशता ही गोष्ट कवितेला परवडणारी नसते. उलट या घटकाची तीव्रता गरजेपेक्षा अधिक वाढल्यास ती कवितापणाला बाधक ठरते. कारण भावविवश असणाऱ्याला कुठलीही एकच एक ठाम भूमिका घेणे भाग असते, परंतु कुठलीही एकच एक भूमिका घेण्यापेक्षा प्रत्येक भूमिकेबाबत कविता अधिक समंजस/अधिक प्रगल्भ असते. म्हणूनच ‘पण कलावंत भावनांच्या आहारी जाण्याच्या ऐवजी त्यांच्यावर स्वार होतो; त्यांना आकारित करतानाच तो त्यांना आपल्या कह्यात आणतो, त्यासाठी मनाची विश्रांतावस्था आवश्यक असते.’ हे म. सु. पाटील यांचे मत सार्थ ठरते. त्यामुळे निव्वळ आकांक्षी असण्यापेक्षा व्याकूळ असणे, ही कवितेची मूलभूत गरज असते आणि व्याकूळता केवळ भावविवशतेतून जन्म पावत नाही. व्याकूळ असण्यासाठी माणसाच्या ठायी तीव्र आर्द्रता आणि शोधाची तीव्र गरज असणे आवश्यक असते.

‘स्वप्न रचणे’ हा कवितेचा स्थायी भाव असतो. त्यामुळे ‘कविता’ ही रचना तीनही काळांच्या पार्श्वभूमीवर खरचटून उभी राहणारी रचना ठरते. ती विसंगतीने व्याकूळ होऊन घडणारी रचना आहे. त्यामुळे कवितेतील कुठलेही विधान जितके अधिक स्वप्नपूर्ण, तितके तीनही काळांच्या पार्श्वभूमीवर ते अधिकाधिक राजकीय ठरते. कारण हे स्वप्नपूर्ण विधान काळाशी, वास्तवाशी फटकून उभे राहत नाही, तर काळाला सामावून त्याच्या पुनर्रचनेतून हे विधान उभे राहते. या अर्थी कवितेचे अस्तित्व, तिची रचना, तसेच तिच्या रचना प्रकाराचा विचार केला, तरी काळ व काळाची अवस्था सापडण्यास मदत होते. कारण संपूर्ण परिस्थितीच्या संदर्भात कविता मार्मिकपणे काही सांगत असते. त्यामुळे ‘कविता लिहिणं, वाचणं ही एक राजकीय कृती आहे याचं भान आपण बाळगलं पाहिजे. तिच्यातली शक्ती व्यवस्थेत परिवर्तन घडवून आणू शकते. ती अन्यायांना मुखरित करते, वेदनांना शब्द देते, शोषितांना धीर देते आणि शोषकांच्या विरोधात आवाज उठवण्यात मदत करते.’ हे वसंत आबाजी डहाके यांचे विधान रास्त ठरते.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

................................................................................................................................................................

कविता ही अटीतटीची रचना असते. कारण तिला नेमकेपणाची आस असते. घडणारा प्रत्येक बारीक बदल चिमटीत पकडण्याची तिला आकांक्षा असते. विवेक, नैसर्गिकता आणि व्याकूळता यांच्या निष्ठेतून कविता उभी राहते. त्यामुळे ती एकाच वेळी तटस्थ, संरमित आणि आत्मीय रचना ठरते. मात्र कुठल्याही क्षणी या तीन घटकांतील एक घटक जरी वरचढ झाला, तरी कविता फसते. मात्र कवितेतील ही अटीतटी सांभाळल्यास कविता अधिकाधिक टोकदार बनत जाते. आवाहकता हा कवितेचा गाभा असतो. त्यातूनच कविता मनाला भिडू शकते. कवितेतून येणारा हा टोकदारपणाच तिच्या आवाहकतेतील महत्त्वाचा घटक ठरतो.

कविता शक्य पावण्यासाठी तिचा स्वतंत्र आवाज संपूर्ण कोलाहलात सतत ऐकू येणे आवश्यक आहे; परंतु त्याचबरोबर कोलाहल स्वत:मध्ये सामावणे आणि सामावतानाही या आवाजाशी स्वत:पाशी प्रामाणिक राहणे आवश्यक असते. कारण तेव्हाच कविता शक्य पावते. नाहीतर स्वभावाला, विचाराला आणि रचनेला एक बंदिस्तपणा प्राप्त होतो. यातून कवितेतील गतिमानता संपते. गतिमानता संपली की, एका ठरावीक विचारप्रणालीच्या वर्तुळात कविता फिरत राहते. यामध्ये तिची व्यापकता बाधित होते आणि मर्यादेलाही कर्मठपणा/ताठरता प्राप्त होते. भोवतालाकडे धीटपणे पाहून त्यातील बदल सामावून घेण्याची तिची कुवत खलास होते. यातूनच तिचे कवितापण खलास होते व ती अलिप्त पावू शकत नाही.

कविता ही आकारापेक्षा प्रक्रिया अधिक असते. त्यामुळे रचनेतून दृश्य पावणारा तिचा आकार हा त्या प्रक्रियेतीलच एक भाग ठरतो. किंबहुना कविता हा स्वभाव असणाऱ्याच्या विविध कविता घडणाऱ्या संपूर्ण कविता या प्रक्रियेचे दाखले म्हणून विचारात घेता येतात. म्हणूनच ‘कविता ही एक आंतरिक घटना असते. भाववृत्ती हाच तिचा आशय असतो. ती कविपरत्वे वेगळी असू शकते. म्हणून कवितेचे विषय तेच ते असले, तरी त्यांत आकारित होणारी भाववृत्ती तीच ती असत नाही.’ हे म. सु. पाटील यांचे मत निश्चितच स्वीकारार्ह आहे. हे दाखले कविता या प्रक्रियेपर्यंत अथवा कविता या स्वभावापर्यंत पोहोचण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरतात. तसेच त्या संपूर्ण प्रक्रियेला एक पोत अथवा स्वत:चा आवाज प्राप्त करून देतात.

‘कविता लिहिणे’ हा केंद्रवर्ती उद्योग/उपजीविकेचे साधन ठरू शकत नाही. करिअर ठरू शकत नाही. अशा कुठल्याही गोष्टींशी ती बांधली गेली की, तिचे स्वातंत्र्य किंबहुना तिचे अस्तित्वच खलास होते. मात्र ती जन्माला येण्यासाठी रोजचे, कंटाळवाणे, लहान-मोठ्या ताण-तणावांनी, अपरिहार्यतेने, संघर्षाने भरलेले आयुष्य म्हणजेच सर्वसामान्य माणसाचे आयुष्य जगणे महत्त्वाचे ठरते. कारण वास्तव जाणल्याशिवाय स्वातंत्र्याच्या नेमक्या कक्षा कळणे आणि विधारक स्वप्न जन्माला येणे शक्य नसते.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

अंतर्मुख असणारी कविता अधिक जिवंत असते. कारण कविता हे निव्वळ भाष्य नाही. ‘स्व’ला भेदणारा, ‘अहं’ला प्रत्येक क्षणी सुरुंग लावणारा तो संवाद असतो. यावरील ‘आत्मभानाशिवाय चांगली कविता निर्माणच होऊ शकत नाही. आत्मभानामधूनच जीवनाकडे, जगण्याच्या प्रक्रियेकडे बघण्याची निश्चित, विशिष्ट आणि सातत्य असलेली भूमिका निर्माण होते. या दृष्टीशिवाय लिहिली जाणारी कविता खोटी, उपरी आणि नकली असते.’ हे चंद्रकांत पाटील यांचे मत सार्थ ठरते. त्यामुळे कविता हा सहनशील आविष्कार असतो. येथे सहनशील म्हणताना ती ‘बळी’ जाणारी रचना नव्हे, हे नमूद करणे महत्त्वाचे ठरेल. म्हणूनच शरणागती किंवा आक्रस्ताळेपणापेक्षा चिवट, सहानुभावी आणि तटस्थ नकार तिच्यात सामावलेला असतो. कवितेतील या विधायक सहनशीलतेतूनच नेमके भाष्य, नेका बदल आणि नेकी गतिमानता शक्य पावते. अधिकाधिक वस्तुकेंद्री मानसिकतेत कवितेचा जन्म अशक्य असतो. जास्तीत जास्त निसर्गानुकूल जगण्याच्या ओढीतूनच कविता शक्य पावते. या तत्त्वामुळेच काळानुसार कविता ही अधिकाधिक गुंतागुंतीची प्रक्रिया ठरत जाते. कारण समाज नावाच्या गतिमान व्यवस्थेमध्ये हरएक काळानुसार ‘जास्तीत जास्त नैसर्गिक असणे’ ही एक कसोटीच ठरत असते. या कसोटीवर उतरताना जगण्यातील नैसर्गिक ऊर्मी संपूर्णत: धसाला लागल्याने कविता ही प्रक्रिया गुंतागुंतीची होते. नैसर्गिक ऊर्मीतून वास्तवाशी सतत झडणाऱ्या चकमकीतूनच कविता हा रचनाबंध आकाराला येतो.

जगणे अधिकाधिक सुकर व्हावे, या ईर्ष्येपोटी समाज नावाची संरचना आकाराला येते. सुकरता ही नियमिततेशिवाय अशक्य आहे. त्यामुळे नियमिततेसाठी ही संरचना काही वर्तनप्रणाली स्वीकारते. कारण त्याशिवाय समाज नावाच्या मोठ्या समूहाचे एकत्रित परस्परावलंबित्व शक्य होत नाही. त्यामुळे या यंत्रणेच्या चलनवलनासाठी विशेषत: नातेसंबंधांची नैतिक चौकट आवश्यक ठरते. या चौकटीच्या गरजेतूनच ‘कुटुंबसंस्था’ ही चौकट आकाराला येते, कविता हा स्वभाव असणारा माणूस या लादलेल्या व्यवस्थेतून, नैतिक चौकटीतून बाहेर पडून सतत नैसर्गिकतेच्या, आदिम प्रेरणांच्या जवळ जाऊ पाहतो. त्यामुळे व्यवस्था आणि त्यातून वाढत गेलेल्या भौतिक गरजांध्ये/सुखवस्तू मानसिकतेध्ये तो रमू शकत नाही. त्यातून तो सतत स्वत:च्या स्वच्छ परंपरेकडे, अस्सलपणाकडे जाण्याचा प्रयत्न करतो किंवा उलटपक्षी असा ओढा असणाऱ्याचीच कविता अधिक अस्सल असल्याचे आपल्याला आढळून येते.

कविता ही मितव्ययी, नेमकी आणि टोकदार रचना असते. तसेच कमी काळात, कमी शब्दांत अधिक आवेगाने आवाहन करते. त्यामुळे तिच्यावरील जबाबदारी अधिक वाढते. हा जबाबदारीचा गोळीबंदपणा सैल पडला, तर कवितेची पडझड निश्चित असते. त्यामुळे जबाबदार असणे, ही कवितेची पूर्वअट होय.

कविता हा स्वभाव सतत शाश्वततेच्या, टिकाऊपणाच्या शोधात असतो. त्यामुळे भोवतालला कवीची प्रतिक्रिया संवेदनशील आणि विवेकनिष्ठ असते. त्यामुळे असा माणूस स्व आणि भोवतालचा तीव्र विश्लेषक असतो. पृथक्करणप्रिय असतो. त्यामुळे सृष्टी विज्ञानाशी तो कमीत कमी प्रतारणा करून जगू पाहतो. परंतु मग येथे असा प्रश्न उपस्थित होतो की, असा माणूस चुकणारच नाही का? तसे नाही. उलट असा माणूस अत्यंत प्रयोगशील असल्याने अनेकदा खूप मोठी किंमत मोजाव्या लागणाऱ्या आणि टोकाच्या चुका करतो, पण या संपूर्ण धकाधकीत तो ‘स्व’चा शोध शापासारखा घेत राहतो. ‘स्व’च्या कुठल्याही आवर्तनात तो अडकू शकत नाही. त्यामुळे त्याच्या चुका प्रवृत्तीतील महत्त्वाच्या बदलाचे वळण ठरतात. ‘कविता ही एक आध्यात्मिक कृतीही आहे. जगण्याचा, अस्तित्वाचा अर्थ शोधण्याच्या प्रवासात ती आपल्या सोबत असते. निर्णयाच्या क्षणाच्या खडतर कसोटीतून जात असताना ती अंतरात्म्याचा बोल होऊन येते. हे वसंत आबाजी डहाके यांचे मत म्हणूनच येथे रास्त ठरते.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

................................................................................................................................................................

अशा प्रवृत्तीनिष्ठ चुकांमुळे तो इतर समाजापेक्षा वेगळा ठरतो. स्थावर समाज चालत राहावा म्हणून त्याची काही एक मूल्यव्यवस्था, वर्तनप्रणाली असते. या व्यवस्था आणि प्रणाली पाळून बहुतांश माणसे सरळसोट, थोड्याफार फरकाने आखीव-रेखीव आणि पूर्वनियोजित आयुष्य जगतात. प्रयोगशील आवाहन आणि आव्हानांना त्यांच्या आयुष्यात तितकेसे स्थान नसते, परंतु प्रयोगशील माणूस इतके नियोजित आयुष्य जगू शकत नाही. त्यामुळे इतर समाजाच्या तुलनेत परिपक्व बदलाच्या शक्यता त्याच्यात अधिक संभवतात. कारण सामान्य माणसाला, त्याच्या सामान्य जगण्याला आणि या जगण्याच्या मुळाशी दडलेल्या त्याच्या सामूहिक बळकट शक्तीला हा माणूस रूढ पद्धतीपेक्षा वेगळ्या कोनातून भिडतो. त्यामुळे सामान्यत्वाचा एक निराळा पैलू, निराळा अर्थ त्याला उलगडतो आणि या विविधमिती रसायनासकट तो पुन्हा स्वत:त डोकावतो, स्वत:ला तपासतो आणि अधिकाधिक पक्व होत जातो. सामान्य माणूस, समूह, काळ, परंपरा यांचे अधिक मूलभूत, नेमके आणि जास्तीत जास्त शाश्वत आकलन तो करत असतो. सामान्य माणसाच्या जगण्यातील विसंवाद आणि सचोटी पकडून त्या धाग्यावर त्याच्या प्रवृत्तीचा तळ गाठणे, ही कविता हा स्वभाव असणाऱ्याची आकांक्षा असते. त्यामुळे चांगल्या कवितेत ‘सामान्य माणसाचा उद्गार’ केंद्रस्थानी असतो. सामान्यातल्या शक्तिकेंद्रांची जाणीव चांगली कविता देते. रोजच्या जगण्यातले प्रश्न तिची आस्था ठरतात आणि त्या आस्थेद्वारे विसंगती पकडून ती सामान्य जगण्याचा अधिकाधिक नैसर्गिक स्वर शोधू पाहते.

कविता हा स्वभाव मनुष्य निरंतर जगत असेल किंवा रचना आणि धारणा यांतले सर्वांत कमी अंतर म्हणजे कविता असेल, तर कविता या गोळीबंद रचनाबंधाची, संरचनेची आवश्यकता काय? कविता जगावीच लागत असेल, तर व्यक्त होण्याच्या कुठल्या गरजेतून ती रचनेत उतरते? जेव्हा ती एकसंधपणे, एक रचना म्हणून विशिष्ट शब्दांत येते तेव्हा नेमके काय घडते? कविता हा स्वभाव असणाऱ्याचे जगणेच जरी कविता असली, तरी ते त्यांचे संपूर्णत: व्यक्त होणे नसते. कविता ही संरचना आकाराला येणे, म्हणजेच त्याचे व्यक्त होणे होय. कारण जरी कविता हा कवीच्या उर्ध्वपतनाच्या प्रक्रियेतील एक भाग असला, तरी त्या विशिष्ट संरचनेत व्यक्त होणे, ही कवितेची गरज असते. ती त्या स्वभावाची, व्यक्त होण्याची आणि त्या प्रक्रियेच्या ओघाचीही गरज असते. व्यक्ततेच्या त्या विशिष्ट टप्प्यामुळेच कवितेला प्रवाहीपणा प्राप्त होतो आणि पृथक्करणाच्या संपूर्ण प्रक्रियेला एक पोत, अर्थ प्राप्त होतो. मात्र याचा अर्थ कविता म्हणजे निव्वळ प्रतिक्रिया असा नव्हे. प्रतिक्रिया म्हणून येणाऱ्या कुठल्याही गोष्टीचा जीव, आवाका लहान असतो. ‘जेव्हा अनुभवांचे आंतरिकीकरण होते, त्या वेळी त्यात विचार आणि इतर अनेक प्रकारच्या संवेदना येऊन मिसळतात, आणि चांगल्या कवितेत त्या सर्व गोष्टी अभिव्यक्त होतात. जेव्हा अनुभवांचे नीट आंतरिकीकरण होत नाही, तेव्हा फक्त प्रतिक्रियाच निर्माण होतात. प्रतिक्रिया ‘भावनिकते’ऐवजी भावविवशताच निर्माण करतात. चांगली कविता भावनाविवशता टाळते.’ हे चंद्रकांत पाटील यांचे विधान रास्त ठरते. त्यामुळे खरी कविता शाश्वततेच्या शोधात असते आणि प्रतिक्रिया हा तिच्या संरचनेतील केवळ एक भाग असतो. त्यामुळे गंभीर कवितेतील प्रतिपादित केलेल्या कोणत्याही तत्त्वाच्या तळाशी निसर्गाच्या मूलभूत प्रेरणांचा वास असतो आणि अशी कविताच सार्वकालिक होण्याची शक्यता अधिक असते.

२.

कवितेच्या परंपरेचा विचार करता, कविता ही नेणिवेला, सशक्त परंपरेला अधिक जवळची, तसेच गद्याआधीची रचना आहे. कारणांचा विचार करताना पुरातन/आदिम रचनांचा धांडोळा घेतल्यास तत्कालीन पदांची संरचना, त्यातील लर, गतिमानता, स्वर या सर्व घटकांचा निसर्गातील लर, संरचना, गतिमानता, स्वर या घटकांशी निकटचा अनुबंध प्रस्थापित होतो. निसर्गातील बहुतांश घटकांचे, प्रेरणांचे परावर्तन या पदांमध्ये झालेले आढळते. त्या तुलनेत गद्याचा विचार करता ती अधिक शिथिल, स्थैर्यशील, योजनाबद्ध रचना भासते. पद्यातील उत्स्फूर्तता, उत्पत्ती-स्थिती-लयीशी त्याचे असलेले अनुकूलन हे निसर्गाशी अधिकाधिक साधर्म्य दाखवते. त्यामुळे पद्य ही जन्मत: निसर्गाशी जोडली गेलेली, त्याला सामावून घेणारी किंवा त्याचाच एक अविभाज्य घटक बनलेली रचना आहे. म्हणूनच अगदी प्राथमिक स्तरावरही चांगली कविता निसर्गाला वस्तुमूल्य देत नाही. निसर्गाच्या आवाजातील, लयीतील, गतिमानतेतील एक स्वर म्हणून ही रचना उभी राहते. मात्र या तुलनेत गद्य या संरचनेचा विचार केल्यास मूलत: ती जड प्रक्रिया भासते. गद्य ही रचनाच स्थितिप्रधानतेचा, नियोजनाचा, नित्यतेचा प्रत्यय देणारी रचना आहे. त्यामुळे गद्याचा उगम ‘समाज’ नावाची योजनानिष्ठ व्यवस्था निर्माण झाल्यावर झाला असावा. त्यामागे उत्स्फूर्ततेपेक्षा चलनवलनाची सोय कारणीभूत असावी. त्यामुळे गद्याला अधिक वस्तुनिष्ठ/साधननिष्ठ बनणे अपरिहार्य ठरते. या अर्थी ते भौतिक बदलांच्या, पर्यायाने वास्तवाच्या अधिक जवळ असते; परंतु प्रेरणांच्या आणि पर्रायाने बदलाच्या जागृतीसाठी ते उत्स्फूर्त आवाहक ठरत नाही.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

उलटपक्षी कविता ही कमीतकमी वस्तुकेंद्री असते किंवा वस्तुकेंद्री नसणे, हाच तिचा मूळ गाभा असतो. त्यामुळे एकूण वास्तव पटावर उभी राहतानाच ती निसर्गाचे माध्यम अथवा निसर्गाची, नैसर्गिक प्रेरणांची प्रतिनिधी म्हणून उभी राहते. या अर्थी निसर्गावरील तिचे अवलंबित्वही आदरयुक्त, कृतज्ञ बांधिलकी जपणारे ठरते. त्यामुळेच तिच्यात आवाहन, आर्द्रता, समावेशकता, बंधत्व, व्याकूळता, विश्वास, ठामपणा, श्रद्धा इत्यादी घटक अधिक्याने संभवतात.

३.

काय सांगायचे आहे, हे कवितेध्ये कधीच पूर्वनियोजित नसते. गद्याचा विचार केल्यास, गद्यामध्ये मात्र हे बऱ्यापैकी स्पष्ट असते. त्यामुळे कविता ही रचना अधिक अस्सल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण कविता घडताना लिहिणारा घडून मग तिला घडवत नाही, तर तोही किंबहुना तोच घडत जातो. त्यामुळे तिची रचनाच घडण्याच्या मर्यादा आणि आकांक्षा पोटात घेऊन येते. अशा प्रकारे कविता ही कमीत कमी कृत्रिम रचना ठरते. ‘असे शब्द सापडणे आणि भावना आकारित होणे या क्रियांत क्रम नसतो. प्रथम आकारित झालेली भावना व नंतर तिच्यासाठी शब्द असा पूर्वापरसंबंध नसतो. दोन्ही एकाच वेळी घडत असतात. शब्द सापडणे म्हणजेच भावना आकारित होणे आणि शब्दांत आकारित झालेली भावलर म्हणजेच कविता होय.’ हे म. सु. पाटील यांचे मत निश्चित स्वीकारार्ह आहे. ती एकाच वेळी कविता हा स्वभाव आकाराला आणते, स्वत:च्या अस्तित्व आणि आशयाने जगण्यावर काही विधान करते आणि वास्तवाला भानावर आणण्यासाठी आणि समंजस करण्यासाठी काहीएक अवकाश खुले करते.

कवितेच्या परंपरेचा विचार करता, ती नेणिवेला म्हणजेच माणसाच्या अस्सल रूपाला अधिक जवळची रचना आहे, असे लक्षात येते. कविता ही आदिम रचना आहे, हे आपण पाहिले. या दृष्टीने विचार करता, आदिम माणूस नैसर्गिक प्रेरणांच्या अधिक जवळ होता. माणसाच्या समूहाला व्यवस्था म्हणून काही निश्चित आकार येण्याआधीपासून कविता ही रचना अस्तित्वात होती, हेही आपण पाहिले. त्यामुळे व्यवस्था या रचनेतून/रचनेसाठी निर्माण होणारी नीतिमूल्ये, वर्तनप्रणाली यांपासून ती दूर असावी. त्यामुळे त्या वेळी जाणीव-नेणिवेतील फरक अतिशर कमी असावा. त्यामुळे नैसर्गिक ऊर्मी आणि प्रेरणांची अभिव्यक्ती थेट असावी. थेट म्हणजे ती अधिकाधिक नैसर्गिक रूपांच्या माध्यमांतून होत असावी. त्यामुळे नेणीव उपस्थित असली, तरी आजच्याइतका माणूस नेणिवेपासून दूर नसावा. नैसर्गिक प्रेरणांच्या अधिक जवळ असावा. त्यामुळे या काळाच चांगल्यावाइटाच्या मानवनिर्मित रूढ संकेतांना स्थान नसावे. प्रेरणांनुरूपच वर्तन असावे.

पुढेपुढे नैतिक प्रगतीनुरूप हा फरक वाढत गेला. आदिम काळापेक्षा माणूस या काळात त्याच्या नैसर्गिक प्रेरणांपासून खूपच दूर गेला, पण कविता हा स्वभाव असणाऱ्यामध्ये परंपरेच्या या संस्काराचा काहीतरी अंश शिल्लक असावा. किंबहुना तो असल्याशिवाय निखळ कवितेचा जन्मच अशक्य ठरतो. आधुनिक काळाचा या दृष्टीने विचार करता, कविता हा स्वभाव असणाऱ्याची आदिम प्रेरणांच्या शोधात आधुनिक काळात घुसमट होत राहते. ही घुसमटच नेणिवेला कळत-नकळत व्यक्त करत राहते.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

................................................................................................................................................................

या अर्थी विचार करता, कविता ही गुंतागुंतीची/आशयसमृद्ध रचना असली, तरी गद्य प्रकारांच्या तुलनेत ती अधिक थेट रचना ठरते. कारण आवाहकता हाच मुळात कवितेचा गाभा असतो. त्या मानाने गद्य ही अधिक वैचारिक, जड प्रक्रिया ठरते. त्यामुळे ती आत घेण्यास वेळ लागतो. त्यामुळे कवितेशी तुलना करता ‘स्व’शी भिडणाऱ्या आवर्तनांची सातत्यपूर्ण जाणीव गद्य कमी देते. मात्र कविता तिच्या संरचनेुळे अधिक टोकदार बनत असल्याने तिची बोच सतत आवर्तने घेत राहतात. येथे हे लक्षात घेणे महत्त्वाचे ठरते की, ही आवर्तने विविध टप्प्यांवर आपल्या जगण्याला सतत येऊन भिडतात आणि नवी जाणीव व नवा दृष्टिकोन देतात, पण गद्य ही प्रक्रिया त्या मानाने तितकी आवर्तने देत नाही. ते हळूहळू रिचत जाणाऱ्या प्रक्रियेसारखे असते. त्यामुळे ते जगण्याची एक विशिष्ट बैठक देते, पण म्हणून आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर ते साक्षात्कारासारखी नव्या अर्थांची आवर्तने देईलच, असे नाही. कारण त्यात भावना बरीचशी उर्ध्वपतित झालेली असते किंवा तिचे ‘चल’ स्वरूप नष्ट झालेले असते. त्यामुळे तिच्या स्वरूपात फरक पडून तिला स्थैर्य प्राप्त झालेले असते; परंतु येथे हे लक्षात घेणे महत्त्वाचे ठरते की, चल अथवा प्रवाही भावनाच कृतिशीलतेसाठी कारणीभूत ठरते. त्यामुळे कवितेमधून येणारे थेट भिडलेपण गद्याहून अधिक तीव्र ठरते.

४.

कविता हे वास्तवाचे जसेच्या तसे चित्र नसते. ती बहुआयामी असण्याचे महत्त्वाचे कारण हेच आहे की, वरकरणी विरोधाभासात्मक भासणाऱ्या अनेक समांतर रेषांना एकत्र आणून ती त्यांच्या परस्परसंबंधाचा छेद घेते. यासाठी ती प्रतिमांचा लयीत वापर करत असल्याने ते नाते विरोध-विकासात्मक स्वरूप धारण करते. कवितेतील प्रतिमा वर्णाच्या ध्वनिरूपाने तर लय साधतातच, पण या प्रतिमांची वास्तवातील वाढ, या वाढीची गती, परंपरा, तसेच त्यांचे पारंपरिक व वैज्ञानिक अर्थ यांतूनही कवितेला लय प्राप्त होते.

कविता ही वेगवेगळ्या प्रतिमांनी युक्त रचना असते, परंतु म्हणून प्रतिमा एकापुढे एक ठेवून तयार झालेली एकरेषीय रचना नसते, तर या प्रतिमांचे, त्यांच्या लयींचे एकमेकांशी अनेक आडवे-तिडवे आंतरसंबंध तयार होतात आणि या सगळ्या संदर्भांतून कविता स्वत:च एक नवीन, आकाररूप, खुली प्रतिमा म्हणून उभी राहते. एखादी प्रतिमा किंवा संपूर्ण कविताच व्यक्त प्रतिमांधून अव्यक्त प्रतिमा सांधत जाते. अशा वेळीही या कवितेला अनेक अर्थ प्राप्त होतात. अव्यक्त प्रतिमांधून व्यक्ततेमागे काम करणारी संपूर्ण यंत्रणा, त्या यंत्रणेचा हेतू, विकास, तसेच व्यक्त-अव्यक्ततेतील आंतरसंबंध, त्यातील जिवंत-मृततेची परिमाणे आणि या सर्वांद्वारे केलेले विधान/विधाने समोर येतात.

बहुक्रियात्मक विविध शब्द एकत्र आणणे, ही कवीची कसोटी असते. त्यामुळे त्या-त्या शब्दाला तर विविध क्रिया प्राप्त होतातच, परंतु एका शब्दातल्या अनेक क्रियांशी संधी प्रस्थापित होऊन कवितेला चलन प्राप्त होते आणि एक नवा रचनाबंध आकाराला येतो.

कविता ही वास्तवातील आकार आणि आकाररूप अर्थावर पेलली जाणारी रचना आहे. त्यामुळे वास्तवातल्या जिवंत-मृततेचे संदर्भ जरी तिच्यासाठी आवश्यक असले, तरी त्यांची बंधने तिच्यावर नसतात. कारण कविता या व्यवस्थेध्ये या सर्वच आकारांना प्रतिनिधित्व प्राप्त होते. त्यामुळे शब्दाच्या पार्थिव स्वरूपाला अधिकचा आयाम मिळाल्याने त्याला गती प्राप्त होते. कविता सतत नवी भाषा देत असते. म्हणजेच जगण्याच्या विविध शक्यतांशी ती चांगल्या-वाइटापलीकडे जाऊन संवाद साधू पाहते. सतत सर्वात्तम होण्याची धडपड, हाच कवितेचा आत्मा असल्याने गद्यातील केंद्र आणि परिघाची ठळक विभागणी कवितेत संभवत नाही. कविता ही अधिक भानावर असणारी संवेदनशील वस्तू आहे. दुसऱ्याचे जगणे ती स्वत:तील आत्मीयतेसकट जगू पाहते. या तिच्या स्वभावामुळे तिला नवी भाषा घडवणे शक्य होते. ‘कवीचा अंतर्गत भाव बाह्यरूप धारण करतो, तेव्हा त्यासाठी वैशिष्ट्यपूर्ण शब्दच आवश्यक असतात. असे शब्द कोणत्याही भाषेत तयार नसतात. कवीचा अंतर्गत भाव किंवा त्याच्या काव्यात्म अनुभवाची भावलरच शब्दांना शक्तिमान बनवते, त्यांना नवे व सजीव रूप देते. त्यांना आपण कविता म्हणतो.’ हे म. सु. पाटील यांचे मत येथे निश्चित स्वीकारार्ह आहे. कारण कुठल्याही इतर गोष्टीशी ती स्वत:च्या चौकटीतून संवाद साधत नाही, तर गोष्टीरूप होऊन ती ‘स्व’शी संवाद साधू पाहते आणि हा गोष्टीरूप ‘स्व’शी साधलेला संवादच नवी भाषा देतो.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

कविता हा स्वभाव असणारा गद्याप्रमाणे/गद्याइतके आकारनिष्ठ काही मांडत नसतो. त्यामुळे अधिक नेमके असणे, ही त्याच्यावरची जास्तीची जबाबदारी असते. कविता ही अधिक दिशाबहुल आणि कमी आकारनिष्ठ रचना आहे. त्यामुळे रचनाकाराला तिच्या त्रिमितीयतेबाबत अधिक गंभीर असणे अपरिहार्य ठरते.

याशिवाय कवितेत नैसर्गिक प्रेरणांची लय अंतर्भूत असते. कवितेची संरचना या लयीला एकूण काळ, जाणीव आणि ‘स्व’च्या संदर्भात अधिकाधिक अंतर्मुख आणि समृद्ध करत जाते. कविता ही प्रत्येक स्तरावर आंतरसंबंधांचे पापुद्रे शोधत जाणारी रचना आहे. नैसर्गिक प्रेरणांच्या धर्तीवर ती या आंतरसंबंधांचा छडा लावत जाते. त्यामुळे समाजमान्य संबंधांच्या भावनेच्या मुळापर्यंत पोहोचण्याची तिची आकांक्षा असते. व्यवस्थेने दिलेल्या नातेसंबंधांचा कोन झाकून प्रत्येक भावनेचा तळ गाठण्याचा तिचा प्रयत्न असतो. मग कुठल्या मूळ जैविक प्रेरणेवर ती भावना व्यवस्थेत अस्तित्वात आली? त्यामागे निसर्गाने उपजतच दिलेल्या कुठल्या बांधणीचा भाग कार्यरत आहे का? उदा. जन्म देणे, स्त्री-पुरुष यांच्या शारीर रचनेतील नैसर्गिक भेद इ. प्रश्नांवरून ती नातेसंबंधांच्या मूळ गाभ्यापर्यंत, जाणिवेपर्यंत पोहोचू पाहते आणि यातून घडत गेलेल्या भावसंबंधांची संगती-संपर्क प्रस्थापित करू पाहते. त्यामुळे कविता हा स्वभाव असणाऱ्याला नैसर्गिक प्रेरणा आणि सतत बदलत जाणारी व्यवस्था व त्यानुसार आकार घेणारे नातेसंबंध यांतील विकृतीचे आणि प्रकृतीचे संसूचन आणि बोच सामान्य माणसापेक्षा लवकर आणि तीव्रपणे जाणवते. त्यामुळे बरेचदा समाजाला जी गोष्ट विकृत वाटते, ती त्याला वाटेलच असे नाही. किंवा याच्या उलटही शक्य आहे; परंतु याही पुढे जाऊन नैसर्गिकतेशी तो अधिक बांधलेला असल्याने या दोन्ही प्रवृत्ती (प्रकृती आणि विकृती) तो स्वत:त सामावून घेतो. त्यामुळे वास्तवाने ग्रासून न जाता मुंगीच्या ऊर्जेने सतत कार्ररत राहण्याची आणि पुन:पुन्हा सकारात्मक स्वप्न रचण्याची त्याची ऊर्मी टिकून राहते.

कविता हा स्वभाव असणाऱ्याची आकांक्षा अधिकाधिक नैसर्गिक होत जाणे ही असते. त्यामुळे चांगल्या कवितेची अधिकाधिक मितव्ययी किंबहुना नि:शब्द होत जाणे ही आकांक्षा असते. कारण शब्द हे व्यवस्थेतून उत्पन्न होणारे एक चिन्ह असते आणि कुठल्याही सांगण्याला चिन्हाचे दृश्य स्वरूप प्राप्त झाले की, अनेकार्थता लाभली, तरी त्याला काही निश्चित, मर्यादित आकार प्राप्त होतो. म्हणूनच ‘कवी जेव्हा आपल्या भावलयीला शब्दरूप देतो तेव्हाच ती वस्तुनिष्ठ होते. तो आणि त्याची भावलय या दोहोंमध्ये शब्द आले की, त्या दोहोंत अंतर निर्माण होते. ती शब्दनिविष्ट झाली की गर्भातून बाहेर येणाऱ्या मुलाप्रमाणे कवीपासून अलग होते.’ हे म. सु. पाटील यांचे मत सार्थ ठरते. हा निश्चित, मर्यादित आकार लोपून सांगणं, अधिकाधिक नेटकं आणि समृद्ध होण्यासाठी निसर्गात विरघळत जाणे, ही कवीची गरज असते. त्यामुळे जरी तो विशिष्ट रचनाबंधातून व्यक्त होत असला, तरी प्रगल्भतेनुसार या परिसीमा बदलत जातात.

.................................................................................................................................................................

लेखिका भाग्यश्री भागवत डायमंड पब्लिकेशन्समध्ये ग्रंथसंपादक आहेत.

bhagyashree84@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘बहिष्कृतां’च्या घरचे अन्न ‘बहिष्कृतां’प्रमाणेच उपेक्षिले गेले. त्यामुळे ‘ब्राह्मणेतर खाद्यसंस्कृती चळवळी’ने आपली ‘देशी’ बाजू जगापुढे मांडायला सुरुवात केलीय...

स्वच्छता व शुद्धता या दोहोंना अस्पृश्यतेचा मोठा संदर्भ आहे. ज्यांना शिवायचे नाही ते अस्पृश्य. त्यांनी जवळ यायचे नाही की, शेजार करायचा नाही, हा ब्राह्मण व सवर्ण यांचा नियम. घाणीची कामं ज्यांना वर्णाश्रम धर्माप्रमाणे करायला लावली, त्यांना घाण समजून अस्पृश्य ठरवण्यात आले. साहजिकच ही माणसं कशी जगतात, काय खातात-पितात, काय विचार करतात, याची जाणीवच वरच्या तिन्ही वर्णांना म्हणजेच सवर्ण जातींना नव्हती.......

किणीकरांना सगळी दर्शने कळत होती आणि अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती काव्यात उतरवता येत होती. आणि अजून मोठी गोष्ट म्हणजे ते काव्य चार ओळींपुरते सुटसुटीत ठेवता येत होते

किणीकरांवर मानवेंद्रनाथ रॉय ह्यांच्या विचारसरणीचा मोठा प्रभाव होता. त्यांच्या नावावरूनच त्यांनी स्वतःला ‘रॉय’ हे नाव घेतले होते. रॉय यांनी 'रॅडिकल ह्यूमॅनिझम’चा पुरस्कार केला. त्या काळच्या महाराष्ट्रात अनेक नेत्यांवर, लेखकांवर आणि विचारवंतांवर रॉय ह्यांचा प्रभाव पडला होता. रॉय ह्यांनी क्रांतीचा मार्ग नाकारला असला, तरी त्या काळी तरुण असलेल्या किणीकरांना मनात कुठेतरी क्रांतीचे आकर्षण वाटले असणार.......

म्हटले तर हा ग्रामीण राजकारण उलगडून सांगण्याचा खटाटोप आहे अन् म्हटले तर शेतकऱ्यांना लुबाडणाऱ्या व्यवस्थेला पर्याय उभे करणाऱ्या पुढच्या पिढीतील शेतकरी तरुणांचा संघर्ष आहे

ही केवळ भानुदासराव पाटील, विक्रम शिंदेचीच कथा नाही, तर आबासाहेब जाधव, दिनकरराव पाटील यांच्यासारख्या लोकशाही प्रक्रियेने उदयास आलेल्या नव्या सरंजामदारांचीही गोष्ट आहे. आर्थिक संसाधनांच्या बळावर वाट्टेल तेवढा पैसा मोजून निवडणुका जिंकणारे, मतदारांचा कौल फिरवणारे आबासाहेब, दिनकरराव केवळ हैबतपुरातच नव्हे, महाराष्ट्रात सगळ्याच मतदारसंघांत दिसून येतात, पण.......

या पुस्तकातल्या ‘बिटविन द लाईन्स’ नीट वाचल्या, तर आजच्या मराठी पत्रकारितेची ‘अवनत’ अवस्था आणि तिची ‘ऱ्हासपरंपरा’ नेमकी कुठून सुरू झाली, हे लख्खपणे समजते!

आपल्या गुणी-अवगुणी सहकाऱ्यांकडून उत्तम ते काढून घेण्यापासून, समाजातल्या व्यक्ती-संस्था यांचं योगदान नेमकेपणानं अधोरेखित करण्यापर्यंत बर्दापूरकरांचा सर्वत्र संचार राहिला. त्यामुळे त्यांच्या पत्रकारितेला सत्त्व, नैतिक बळ आणि गांभीर्याची झळाळती झालर लाभत राहिली. आजच्या मराठी पत्रकारितेच्या संदर्भात त्या झालरीचा ‘थर्मामीटर’ म्हणून वापर केला, तर जे ‘तापमान’ कळतं, ते काळजी करावं, असंच आहे.......

लोकशाहीबद्दल आस्था किंवा काळजी व्यक्त करणं, ही काही लोकांचीच जबाबदारी आहे, हा समज खोडून काढायचा तर कामच केलं पाहिजे. ‘लोकशाही गप्पा’ हे त्या व्यापक कामाच्या गरजेतून आलेलं छोटंसं काम आहे

पुरेशी मेहनत करून आणि संवादाच्या सर्व शक्यता खुल्या ठेवून लोकांशी बोललं गेलं, तर प्रत्येकाच्याच आकलनात वाढ होते. आणि हळूहळू भूजलाची पातळी उंचवावी, तसं लोकशाहीबद्दलचं भान सखोल होण्याची शक्यता निर्माण होते. आपल्या भोवतीच्या गदारोळातून एकमेकांचा हात धरून, एका सजग आणि जिवंत लोकशाहीच्या मुक्कामापर्यंत मैदान मारणं आपल्याला सहज शक्य आहे. त्यासाठी एकमेकांना शुभेच्छा देणं एवढं तरी आपण करूच शकतो. ते मनःपूर्वक करू या!.......