वाचणारे विजयी होवोत्
ग्रंथनामा - जागतिक पुस्तक दिन
नीतीन वैद्य
  • आशय, ग्रंथदिन २०१८च्या विशेषांकाचे मुखपृष्ठ
  • Mon , 23 April 2018
  • ग्रंथनामा जागतिक पुस्तक दिन World Book Day २३ एप्रिल 23 April

सोलापूरचे नीतीन वैद्य आणि त्यांचा आशय मित्रपरिवार २३ एप्रिल रोजी म्हणजेच ‘जागतिक ग्रंथदिना’निमित्त गेली काही वर्षं एक विशेषांक प्रकाशित करतात. तो स्वखर्चानं महाराष्ट्रातील काही रसिक-वाचक, जाणकार यांना पाठवतात. त्याशिवाय ज्यांना तो हवा आहे, त्यांना अंकाची पीडीएफ फाइल पाठवतात. (इच्छुकांनी लेखाच्या शेवटी दिलेल्या त्यांच्या मेल आयडीवर संपर्क करावा.) आजच्या ‘जागतिक ग्रंथदिना’निमित्तही त्यांनी विशेषांक काढला आहे. त्या विशेषांकाला त्यांनी लिहिलेले हे संपादकीय.

............................................................................................................................................

ओम स्वस्ति श्री सकु
९४० काळयुक्त संवत्सरे माघ ( सु )...!
पंडित गछतो आयाता तछ मी
छिमळ नि १०००!
वाछितो विजयो होएवा!

सोलापूरजवळील हत्तरकुडलसंग येथील मंदिरातील दगडी तुळईवर हा शिलालेख कोरलेला आहे. मराठीतील या पहिल्या ज्ञात शिलालेखाची सहस्त्राब्दी सध्या सुरू आहे. यातल्या शेवटच्या ओळीचा अर्थ – ‘वाचणारे विजयी होवोत’ असा आहे. त्याचा तत्कालीन संदर्भ वेगळा असेल कदाचित्, पण सद्यकाळात हेही किती अन्वर्थक आहे! खरंच, वाचणारे विजयी होवोत्.
२.
ग्रंथदिन शुभेच्छांचं हे बारावं वर्ष. तपपूर्तीचा आनंद आहेच, त्याबरोबर पेरलेलं काही अनपेक्षित उगवून आल्याचा आनंदही आहे. 

२०१४ च्या ऑगस्टमध्ये केव्हातरी ‘महाराष्ट्र टाइम्स’मध्ये ‘वरवरचे वाचन आणि सखोल वाचन’ हा डॉ. आनंद जोशींचा छोटा लेख वाचनात आला. बाज वैज्ञानिक‌ असला (म्हणजे वाचत असताना मेंदूत काय होतं वगैरे) तरी सखोल वाचन सृजनाच्या पातळीवर कसं पोचतं, याविषयी काही सुतोवाच करणारी मांडणी होती. या लेखाचा विषय घेऊन जाईल तितका विस्तार, ललित साहित्य संदर्भाला घेऊन करावा, अशी विनंती करणारं पत्र लिहिलं, तेव्हा जोशींशी तोंडओळखही नव्हती. पण त्यांनी लिहिलं. ‘अॅलिस इन वंडरलॅण्ड’ आधाराला घेऊन वाचनाच्या इतिहासापासून सविस्तर मांडणी केली. २०१५ च्या  ‘वाचनाचेनी आधारे’ या ग्रंथदिन अंकाला तोवरचा सर्वाधिक प्रतिसाद मिळाला. त्यावरचे लेख, पत्रं, फोन, मेल-मॅसेजेसचं हवंहवंसं वाटणारं ओझं आम्ही अनेक दिवस आनंदानं वाहिलं.

कानडी कवी आनंद झुंजुरवाड हे कविवर्य द.रा. बेंद्रे यांच्यावरील मराठी संदर्भांवरच्या कामाकरता नेहमी सोलापूरला येत. तसे आले असता त्यांनाही अंक दिला. पुढे चार-सहा महिन्यांनी आल्यावर त्यांनी कामाआधी एक फाईल हातात ठेवली. ते ‘वाचनाचेनी आधारे’ अंकाच्या कानडी अनुवादाचं हस्तलिखित होतं. ‘पुस्तक करायचा प्रयत्न आहे, पण प्रकाशक मिळेतो राहवेना…’ ते भारावून सांगत होते. याला दोन वर्षं झाली आणि आत्ता सप्टेंबरात जोशींचा मॅसेज आला, लंडनमध्ये चेरिंग क्रॉस रोडवर हिंडताना काही लिहावंसं वाटतं आहे… ‘वाचनाचेनी…’चा उत्तरार्ध होईल असं.’ लगेच टंकलं, ‘लिहा मनसोक्त. काय करायचं ते पाहू…’ पाठोपाठ झुंजूरवाडांचा अनपेक्षित मॅसेज आला, बेंगळुरुच्या अंकिता पब्लिशर्सनं पुस्तक स्वीकारलं आहे, डिसेंबरपर्यंत होईल. प्रत्यक्षात ३० डिसेंबरला जोशींचा लेख पोचला, तर २१ जानेवारीला बेंगळुरूच्या इंटरनॅशनल कल्चरल सेंटरच्या सभागृहात कानडी कवी  एच . एस . वेंकटेशमूर्ती यांच्या हस्ते ‘ओदूवदेंदरे’ ( ಓದುವದೆಂದ ರೆ, ‘रिडिंग्ज अबाऊट रिडिंग’ या उपशीर्षकासह) चं थाटात प्रकाशन झालं. झुंजूरवाडांनी या दरम्यानच्या प्रत्येक टप्प्यावरचा आनंद आवर्जून पोचवला. प्रकाशनानंतर चौथ्या दिवशी कुरिअरनं पुस्तक आलं. वेगळी लिपी-भाषेचा पेहराव केलेल्या आपल्याच शब्दांचा कोरा स्पर्श अनुभवताना आनंदून गेलो. जोशींची यानिमित्तानं भेट होईल म्हणून झुंजूरवाड मुंबईला गेले, एशियाटिक सोसायटीच्या कॅफेमध्ये भेटून जोशींना प्रत दिली. या त्रिकोणी प्रकरणातला तिसरा लघुकोन म्हणून दोघांनीही या भेटीत माझी आठवण केली, भेटीचे लाईव्ह मॅसेज, फोटो दोघांनीही त्याच वेळी शेअर केले... निर्भेळ आनंदानं मन भरून गेलं. एखाद्या विशेषांकाचं स्वभाषेत पुस्तक होण्याअगोदरच अन्य भाषेतील अनुवाद पुस्तकरूपानं प्रकाशित व्हावा, ही मराठीपुरती तरी दुर्मीळ घटना असावी.

३.
‘वाचनाचेनी आधारे’ या लेखाचा हा उत्तरार्ध, ‘अक्षर पाविजे निर्धार’. पूर्वार्धात काही उदाहरणं देत वाचनप्रक्रियेची उकल करायचा प्रयत्न जोशींनी केला होता, उत्तरार्धात या सगळ्या प्रक्रियेची केसस्टडी म्हणता येईल असा, एका जगभर  गाजलेल्या, दीर्घायुषी, अनेक दंतकथांची नायिका झालेल्या ‘मॉबी डिक’ (हरमन मेलव्हिल) या कादंबरीच्या वाचनाचा अनुभव विस्तारानं येतो. यात या कादंबरीचं कथानक वा त्यावर आस्वादात्मक, समीक्षापर काही लिहावं असा पारंपरिक हेतू नाही, तर तिच्या निमित्तानं, ती पार्श्वभूमीला ठेवून आपल्याच आकलनप्रक्रियेचा, वाचनातून वाढण्याचा अनुभव जोशी इथं शेअर करत आहेत. अनेक संदर्भांनी संपन्न, चांगल्या अर्थी भरकटलेला, कुठेही तात्त्विक युक्तिवाद न करता वा शब्दबंबाळ न होताही सगळ्या तथाकथित अस्मितांच्या पलिकडचा, काहीसा दर्शनाच्या पातळीवर जाणारा हा निखळ बौद्धिक आनंद आहे.

अनेक दिवस ‘मॉबी डिक’ची एखादी विशेष आवृत्ती आपल्याकडे असावी असं जोशींना वाटत होतं, रोजच्या धबडग्यात शोध पुढे सरकत नाही, तसा मनातून जातही नाही. लंडनला चेरिंग क्रॉस रोडवर काहीसं निवांत भटकताना एका दुकानात फडताळावर ती दिसते, ‘कलेक्टर्स एडिशन’. ‘आतून’ मारलेली हाक पुस्तकं ऐकतात असा काहीसा तर्कातीत अनुभव याआधीही काहींनी मांडला आहे. परतल्यावर मुंबईत एशियाटिक सोसायटी जवळच्या नेहमीच्या कॉफीशॉपचं नाव स्टारबक्स आहे, हे आता नव्या संदर्भात उलगडतं. गुगलवारीत यासंबंधातल्या आख्यायिकाही सापडतात. अशी अन्यही काही उदाहरणं पाहिल्यावर हे त्यांना पाश्चात्य समाजातल्या विकसित वाचनसंस्कृतीचं उदाहरण वाटतं. मीही हे वाचल्यावर गुगलवर भरकटलो, पण पहिल्याच थांब्यात विकीपीडियावर ठसका लागतो. गॉर्डन बोवकर या स्टारबक्सच्या एका संस्थापकाचं वाक्य येतं, ‘Mobi Dick didn’t have anything to do with starbucks directly.’ थोडा संभ्रम निर्माण झाला म्हणून जोशींच्या मदतीनं पुन्हा खणाखणी केली.

जेरी बाल्डवीन आणि ज्वेल सीगल हे शिक्षक आणि गॉर्डन बोवकर (उच्चारांतील चुकभूल देणे-घेणे) हा लेखक अशा विद्यार्थिदशेत भेटलेल्या तीन मित्रांनी मार्च १९७१ मध्ये उभा केलेला हा उद्योग. बोवकरनं ‘युलिसिस’वाल्या जेम्स जॉईसचं चरित्र लिहिलं आहे. तिघांचीही पार्श्वभूमी पाहता स्टारबक्स हे नाव ‘मॉबी डिक’मधूनच अवतरलं याला वेगळा तर्क लागत नाही. (स्टारबक हा ‘मॉबी डिक’मधल्या पेडोक या देवमाशांची शिकार करणाऱ्या व्यावसायिक जहाजावरचा फर्स्ट मेट. रुढार्थानं नायक नसला तरी विशिष्ठ पांढऱ्या व्हेलला मारण्यासाठी सुडानं पेटलेल्या एहॅमला भानावर आणण्याचा अयशस्वी प्रयत्न तो करतो, हेही लक्षणीय.) तरी शोध जारी ठेवला. तिघांनीही याआधी किंग टीव्हीसाठी पटकथा लिहिणं, रेडिओवर विविध कार्यक्रमांचं प्रसारण करणं, अशी एकत्रित कामं केलेली. बाल्डविन आणि बोवकर या दोघांनी अमेरिकन लोक आणि जाझ संगीतावरील अनेक लघुपटांची निर्मिती केली. त्यासाठी त्यांनी स्थापन केलेल्या कंपनीचं नाव होतं, ‘पेकोड’… ‘मॉबी डिक’मधील व्हेलिंग जहाज. मला वाटतं अधिक शोधाची गरज नाही.

या काळात (योगायोगानं असं म्हणूया) पत्रकार-लेखक मित्र रजनीश जोशींनी अनुवादलेलं ‘जगावेगळे बना, श्रीमंत व्हा’ हे राईनर झिटलमन यांचं स्व-मदत प्रकारातलं पुस्तक वाचत होतो. उद्योगविश्वातल्या अत्युच्च यशस्वी कहाण्यांवरचे लेख यात आहेत. स्टारबक्सच्या जगभरात विस्तारासाठी हॉवर्ड शूल्ट्झनं घेतलेल्या अफाट परिश्रमांची यातली कथा वाचताना थबकलो. १९७४ साली शूल्ट्झ स्टारबक्समध्ये विस्ताराच्या अनंत शक्यता जाणवून तसा प्रस्ताव घेऊन तिच्या तीन संस्थापकांकडे गेला, तो आपली असलेली नोकरी सोडून. पण तिघांनीही कंपनीचा विस्तार करायला ‘आत्ता पाचही आऊटलेट्स व्यवस्थित चालत आहेत, पैसेही पुरेसे मिळताहेत, मग व्याप वाढवायचा कशासाठी’ असं सांगत नकार दिला. शुल्ट्झही चिकाटीनं प्रयत्न करत राहिला, पुढे १९८४ साली, तब्बल दशकभरानं पूर्ण कंपनीच (शूल्ट्झला दिलेल्या एस्स्प्रेसो आऊटलेटसह फक्त सहा शाखा असलेली) त्यांनी शुल्ट्झला विकली. आज स्टारबक्सच्या ७० देशांत २७,००० च्या वर शाखा आहेत. अलिकडेच या अफाट वाढीनंतर ‘गॉर्डियन’नं बाल्डविनची मुलाखत घेतली. त्यात त्यानं स्टारबक्सचा विस्तार न करता विकण्याच्या निर्णयाबद्दल अजिबात पश्चाताप वाटत नाही, उलट त्यावेळी मिळालेल्या पैशात आम्ही आणखी बरेच उद्योग केले, असं सांगितलं. सतत नवं काही करत राहणं, यशाच्या शक्यता दिसत असूनही पुनरावृत्ती नाकारणं, तेही आजच्या कॉर्पोरेट युगात, ही‌ परिपक्वतेत वाचनसंस्कारांचा वाटा नाही असं म्हणू शकू? (काहींना भाबडा बादरायण संबंध वाटू शकेल तरी!)

हे सगळं तर आत्ताचं, तसं अलिकडचं. पण ‘मॉबी डिक’ प्रसिद्ध झाली, त्यावेळी १८५१ साली  (विकीपिडियावरील नोंदीनुसार ‘मॉबी डिक’चं प्रथम प्रकाशन १८ ऑक्टोबर १८५१ ला झालं.)  म्हणजे १६७ वर्षांपूर्वी (मराठीतली ज्ञात अधिकृत पहिली कादंबरी ‘यमुना पर्यटन’ यानंतर दोन वर्षांनी म्हणजे १८५३ साली प्रकाशित झाली.) कशी होती तिकडे परिस्थिती? ‘मॉबी डिक’ वाचली त्याला बरीच वर्षं झाली, तपशील आठवत नव्हते. संग्रह उचकला, त्यात भानू शिरधनकर सापडले, मेलव्हिलच्या ‘बिली बड’ आणि ‘टायपी’ या ‘मोबी डिक’च्या आधी आणि नंतरच्या दोन कादंबऱ्यांचे अनुवाद होते ते, ‘पाचूचे बेट आणि शिस्तीचा बळी’. (हे पुस्तक माझ्या संग्रहात आले ते जुन्या बाजारातून, त्याच्याशीही एक किस्सा जोडला आहे, पण झालं एवढं भरकटणं खूप झालं.) त्यात माझ्या सवयीप्रमाणे दडवलेलं ‘मॉबी डिक’च्या जन्मकथेचं कात्रण होतं. (‘लोकसत्ता’त २००८ साली प्रकाशित ‘जन्मकथा’ या सदरातलं) मेलविल मुळात भटक्या प्रवृत्तीचा. बोटीवर केबिन बॉय म्हणून त्यानं अनेक सफरी केलेल्या. त्या अनुभवावर त्यानं पुस्तकही लिहिलं. पुढे त्यानं व्हेलची शिकार करणाऱ्या बोटींवर नोकरी केली. ‘मॉबी डिक’मधील वर्णनात हे अनुभवही असणार, पण त्याआधी १८२० मध्ये इसेक्स हे असं जहाज व्हेलच्या तडाख्यानं फुटलं होतं. त्यातून कशाबशा वाचलेल्या ओवेन चेस या खलाशानं त्या अनुभवावरही पुस्तक लिहिलं. आपल्या होणाऱ्या जावयाचा कल ओळखून मेलव्हिलचा सासरा हेम्युएल शॉनं एव्हाना दुर्मीळ झालेलं ‘नॅरेटिव्ह ऑफ द मोस्ट एक्स्ट्रॉऑर्डिनरी अॅण्ड डिस्ट्रेसिंग शिपरेक ऑफ द व्हेलशिप’ अशा अजस्त्र नावाचं पुस्तक त्याला मिळवून दिलं. याची प्रेरणाही ‘मॉबी डिक’च्या निर्मितीशी जोडली आहे. मेलव्हिलची द्विजन्मशताब्दी या वर्षी (जन्म १ ऑगस्ट १८१९) सुरू होईल. या घटना त्या दोनशे वर्षांपूर्वीच्या काळीही समाजावर असलेल्या वाचन-लेखनाच्या प्रभावाची साक्ष म्हणता येतील. अर्थात एरवी सहज घेतले असते असे तपशील वेगळे जाणवतात, ते मनात आपल्या परिस्थितीशी नकळत तुलना होते त्यामुळे, हेही खरे.

४.
डॉ. आनंद आणि सुमती जोशी यांच्याबरोबर,  व्हर्च्युअल का होईना, निर्माण झालेला ऋणानुबंध हे ग्रंथदिन अंकांचं देणं. दोघंही त्यांच्या विज्ञानविषयक लेखनातून माहिती होते (‘ती ग्रह आहे एक’ या वेगळ्या वाटेच्या विज्ञानकथांच्या अनुवादासह ‘उत्क्रांती’ हे सुमती जोशींचं, तर आनंद जोशींचं ‘मेंदूतला माणूस’ सुबोध जावडेकरांबरोबर सहलेखन), पण परिचय नव्हता. प्रत्यक्ष भेट अजूनही नाही, पण जुना जिव्हाळा जाणवावा इतका ई-परिचय या दोन्ही अंकांनिमित्तानं झाला. सांसारिक जबाबदाऱ्यांतून काहीशी मुक्ती मिळाल्यावर सुमती जोशींनी नवं काही करावं या हेतूनं बंगाली (रवीन्द्रनाथ आणि पुलंनी लेखांमधून उभे केलेलं बंगाली विश्व यामुळे बंगालीबद्दल एक वेगळा सॉफ्ट कॉर्नर बहुतेकांच्या मनात असतो, पण ते तेवढंच.) मूळांतुन शिकायला सुरुवात केली. तीन वर्षात तिन्ही परीक्षांतून विशेष प्राविण्यासह पार झाल्यावर जोशींनी त्यांच्यासाठी स्टेशनवरून ‘देश’चा अंक आणला. ही नवी सुरुवात. नवी भाषा आत मुरायला लागली. असं नवं काही जाणवलं की, ते सांगावंसं वाटू लागतंच. बंगाली मासिकांमधून समकालीन कथांचे अनुवाद सुरू झाले. ‘बंगगंध’ हा अशा १७ समकालीन बंगाली कथांचा अनुवाद अलिकडेच आला आहे. 

५.
आयुष्यात पुस्तकं येवोत, त्यानिमित्तानं असे निर्भेळ ऋणानुबंधही. ज्यातून दिवसेंदिवस भेसूर होत चाललेल्या या जगात आयुष्यावरचा विश्वास कायम रहावा, यासाठी सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा!

............................................................................................................................................

लेखक नीतीन वैद्य पुस्तकप्रेमी आहेत.

vaidyaneeteen@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

या स्त्रिया म्हणजे प्रदर्शनीय वस्तू. एक माणूस म्हणून जिथं त्यांना किंमत दिली जात नाही, त्यात सहभागी होण्यासाठी या स्त्रिया का धडपडत असतात, हे जाणून घेण्यासाठी मी तडफडत होते…

ज्यांनी १९७०च्या दशकाच्या अखेरीला मॉडेल म्हणून काम सुरू केलं आणि १९८०चं संपूर्ण दशकभर व १९९०च्या दशकाच्या सुरुवातीचा काही काळ, म्हणजे फॅशन इंडस्ट्रीच्या वाढीचा आलेख वाढायला सुरुवात झाली, त्या काळापर्यंत काम करत राहिल्या आहेत, त्यांना ‘पहिली पिढी’, असं म्हटलं जातं. मी जेव्हा त्यांच्या मुलाखती घेतल्या, तेव्हा त्या पस्तीस ते पंचेचाळीस या दरम्यानच्या वयोगटात होत्या. सगळ्या इंग्रजी बोलणाऱ्या.......

निर्मितीचा मार्ग हा अंधाराचा मार्ग आहे. निर्मितीच्या प्रेरणेच्या पलीकडे जाणे, हा प्रकाशाकडे जाण्याचा, शुद्ध चैतन्याकडे जाण्याचा मार्ग आहे

ही माया, हे विश्व, हे अज्ञान आहे. हा काळोख आहे. त्याच्या मागील शुद्ध चैतन्य हा प्रकाश आहे. सूर्य, उषा ही भौतिक जगातील प्रकाशाची रूपे आहेत, पण ती मायेचाच एक भाग आहेत. ह्या अर्थाने ती अंधःकारस्वरूप आहेत. निर्मिती ही मायेची स्फूर्ती आहे. त्या अर्थाने माया आणि निर्मिती ह्या एकच आहेत. उषा हे मायेचे एक रूप आहे. तिची निर्मितीशी नाळ जुळलेली असणे स्वाभाविक आहे. निर्मिती कितीही गोड वाटली, तरी तिचे रूपांतर शेवटी दुःखातच होते.......

‘रेघ’ : या पुस्तकाच्या ‘प्रामाणिक वाचना’नंतर वर्तमानपत्रांतील बातम्यांचा प्राधान्यक्रम, त्यांतल्या जाहिरातींमधला मजकूर, तसेच सामाजिक-राजकीय-सांस्कृतिक क्षेत्रांतील घटनांसंबंधीच्या बातम्या, यांकडे अधिक सजगपणे, चिकित्सकपणे पाहण्याची सवय लागेल

मर्यादित संसाधनांच्या साहाय्याने जर डोंगरे यांच्यासारखे लेखक इतकं चांगलं, उल्लेखनीय काम करू शकत असतील, तर करोडो रुपये हाताशी असणाऱ्या माध्यमांनी किती मोठं काम केलं पाहिजे, असा विचार मनात आल्याशिवाय राहत नाही. पण शेवटी प्रश्न येतो तो बांधीलकी, प्रामाणिकपणा आणि न्यायाची चाड असण्याचा. वृत्तवाहिन्यांवर ज्या गोष्टी दाखवल्या जात, त्या विषयांवर ‘रेघ’सारख्या पुस्तकातून प्रकाशझोत टाकला जातो.......