स्वातंत्र्याचा स्वैराचार
पडघम - माध्यमनामा
देवेंद्र शिरुरकर
  • प्रातिनिधिक छायाचित्र
  • Sat , 21 April 2018
  • पडघम माध्यमनामा इलेक्ट्रॉनिक मीडिया Electronic Media प्रिंट मीडिया Print Media

परमेश्वराचा आणि आपला थेट ऋणानुबंध असल्याचे भासवत जनसामान्यांच्या भावनांचे व्यवस्थापन करणाऱ्या बाबा-बुवांचा उच्छाद भारतीय समाजव्यवस्थेत जसा शक्य आहे, तसाच ‘आम्ही सांगू तेच सत्य’ अथवा ‘आम्हीच कसे सर्वप्रथम वास्तव दाखवले’ हा दंभ असणाऱ्या माध्यमांचा सुळसुळाटही भारतीय व्यवस्थेत सहजशक्य झाला आहे. या मनमानी व्यभिचाराला आता समाजमाध्यमांची सोयीस्कर फोडणी मिळत आहे. ब्रिटिश साम्राज्यशाहीच्या उदात्तीकरणाचे इतिवृत्त देण्यासाठी म्हणून भारतात शिरकाव केलेल्या मुद्रणकलेसोबत सद्य:स्थितीचे साद्यंत वृत्त देणाऱ्यांचा गत पन्नास वर्षांतील खळखळाट विचारी माणसाला इतक्यातच नकोसा होईल, हे भाकित कोणीच केले नसेल.

स्वातंत्र्य आणि स्वैराचार यांच्यातील सीमारेषा पुसत हा बौद्धिक म्हणवला जाणारा कृतीयुक्त सदाचार सद्सद्विवेकाशी फारकत घेईल, असा विचार या क्षेत्रातील देशी-विदेशी प्रणेत्यांनीही केला नसेल. लोकशाहीची चौथी कोणशिला असे नामाभिधान देण्यात आलेल्या माध्यमांनी व्यवस्थेत सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्यापेक्षा व्यवस्थेतील यच्चयावत दुर्गुणांचा परिपोष अंगीकारत जो चवचालपणा चालवला आहे, ते पाहता ‘भीक नको पण कुत्रा आवर’' म्हणायची पाळी आली आहे.

‘बेंगॉल गॅझेट’च्या अस्तित्वाने भारावलेली, आधुनिक शिक्षण, स्वातंत्र्य, समता, धर्मनिरपेक्षता, उदारमतवादी तत्त्वांनी आपल्या समाजातील कर्मकांडावर प्रहार, मात करू पाहणारी एक पिढी, जिला या माध्यमाचे सामर्थ्य आकलन झाले होत,. त्यांच्याकडून या मूलभूत तत्त्वांसह ही माध्यमे मोठ्या जबाबदारीने हाताळण्यात आली. काळानुरूप लोकप्रबोधनावर भर देत लोकरंजन बाजूला ठेवत त्यांची वाटचाल सुरू राहिली. योग्य-अयोग्य, पोषक-घातक अशा विविध कसोट्यांवर तासून समष्टीच्या विकासासाठी श्रेयस्कर भूमिका पार पाडणारी माध्यमे भारतीय नवपिढ्यांसमोर तटस्थता, लोकहितवाद, स्वातंत्र्य, लोकशाही अशा मूल्यांचा वारसा देत राहिली. काळाच्या कसोटीवर एखादे तत्त्व तपासून गरजेनुरूप त्यात बदल करण्याची लवचिकताही तिने साधली. या निरंतर चाललेल्या प्रक्रियेतून प्रसंगी दमनशाही अंगिकारलेल्या शासकाला सत्तास्थानावरून खाली खेचण्याचे सामर्थ्यही अंगी बाणवले.

.............................................................................................................................................

‘सेपिअन्स - मानवजातीचा अनोखा इतिहास’ या पुस्तकाच्या ऑनलाईन प्रकाशनपूर्व नोंदणीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/client/book_detailed_view/4406

.............................................................................................................................................

आजही काही सन्माननीय संस्था हा सतीचा मार्ग अनुसरण्याचे काम करत आहेत. पण यांचा अपवाद वगळता स्पर्धेच्या नावाखाली घडामोडींची दखल घेताना, वार्तांकन करताना आज जे ताळतंत्र सोडले जात आहे ते पाहता ही माध्यमे नेमके काय साध्य करू पाहताहेत, असा प्रश्न पडतो. मुद्रित माध्यमातला शब्द खरा मानला जातो, हा विश्वासही माध्यमांनी गमावला आणि चलतचित्रांद्वारे वार्तांकन करणाऱ्यांनी तर पत्रकारितेतील बाराखडीही टीआरपीसाठी विकून टाकली असावी. समाजातील अनिष्ट घडामोडींवर नियंत्रण प्रस्थापित करण्याची नैतिक क्षमता व समाजातील नैतिक प्रतिष्ठाच गमावून बसल्यानंतर या माध्यमांकडून वाचक काय अपेक्षा करणार? एखादा गल्लाभरू थिएटरमालक पैसावसूल चित्रपटाची तबकडी वारंवार लावतो, तसाच गोरखधंदा या इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी सुरू केला आहे. कुठल्यातरी राजकीय बॅनरसाठी पॅकेजेसवरील कार्यक्रम प्रसारित करणाऱ्या या वाहिन्या मनोरंजनासाठीच्या वाहिन्यांएवढ्याच ट्रस्टवर्थी अर्थात विश्वासार्ह असतात, हे आता जनसामान्यांना उमजू लागले आहे म्हणून ठीक.

नुकताच न्यायालयाने कथुआ बलात्कार प्रकरणातील पीडितेच्या नावाचा उल्लेख केल्याबद्दल काही वृत्तवाहिन्यांना जाब विचारला आहे. पीडित व्यक्तीचे नाव वार्तांकनादरम्यान येता कामा नये, ही पत्रकारितेतील मूलभूत बाबही या अतिउत्साही वाहिन्यांनी पाळली नाही. त्यांचा उथळपणा त्यांच्या धंदेवाईक दृष्टिकोनास साजरा असला तरी या भारतीय समाजाच्या चालचलनासाठी घातक आहे, याची जाणीव कोणीतरी त्यांना करून द्यायला हवी. अन्यथा भारतीय सीमेवर कोवळ्या वयात आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या जवानापेक्षा मोठ्या पडद्यावरच्या नटाच्या खटल्याची निर्लज्ज बातमी करण्याचे प्रकार करमणूक मंडळींकडून सतत केले जातील. लोकप्रियतेच्या नादात सतत सनसनाटी निर्माण करण्याची गलिच्छ कार्यपद्धती पाहता यांच्या धंद्यासाठी ते समाजात अनिष्ट घडवून आणणार नाहीत याची शाश्वती कोण देणार?

समाजमनाची, व्यवस्थेची एवढीच चिंता असेल तर महिलांना उपभोग्य वस्तू असल्याचा समज दृढ करणाऱ्या जाहिराती या वाहिन्यांवर प्रसारित कशा काय केल्या जातात? ‘वेदांचा तो अर्थ आम्हांसिच ठावे’ असा दावा करणाऱ्या मध्ययुगीन मानसिकतेची पुनरावृत्ती करणारा एक संधिसाधूंचा नवा वर्ग, नवी मानसिकता जन्माला घालण्याचे पातक माध्यमे करत आहेत. कमीअधिक फरकाने हाच प्रकार मुद्रित माध्यमांतही बाळसे धरू लागला असून उच्चतम व्यावसायिक नीतिमत्ता, सत्य-असत्याची पारख करण्याच्या क्षमता, समाजहितासाठी विधायक कृतिशीलतेचा पुरस्कार या सर्वच बाबी इतिहासजमा झाल्या आहेत. तत्कालीन घडामोडींपेक्षा समग्र व्यवस्थेच्या चालचलनाची दिशा, त्यातले नकारात्मक प्रवाह रोखण्यासाठी आपण काय करतो आहोत? असा प्रश्न माध्यमांना केव्हातरी पडेल का?

.............................................................................................................................................

लेखक देवेंद्र शिरुरकर मुक्त पत्रकार आहेत.

shirurkard@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

Post Comment

vishal pawar

Thu , 26 April 2018


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

भाजपच्या ७६ पानी ‘जाहीरनाम्या’त पंतप्रधान नरेंद्र मोदींची तब्बल ५३ छायाचित्रं आहेत. त्यामुळे हा जाहीरनामा आहे की, मोदींचा ‘छायाचित्र अल्बम’ आहे, असा प्रश्न पडतो

काँग्रेसच्या ४८ पानी जाहीरनाम्यात राहुल गांधींची फक्त पाच छायाचित्रं आहेत. त्यातली तीन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत आहेत. याउलट भाजपच्या जाहीरनाम्याच्या मुखपृष्ठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीमागे बळंच हसताहेत अशा स्वरूपाचं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचं छायाचित्र आहे. त्यातली ‘बिटवीन द लाईन’ खूप सूचक आणि स्पष्टता सूचित करणारी आहे.......

जर्मनीत २० हजार हत्तींचा कळप सोडण्याची धमकी एका देशाने दिली आहे, ही ‘हेडलाईन’ जगभरच्या प्रसारमाध्यमांमध्ये गाजतेय सध्या…

अफ्रिका खंडातील बोत्सवाना हा मुळात गरीब देश आहे. त्यातच एवढे हत्ती म्हणजे दुष्काळात तेरावा महिना. शेतांमध्ये येऊन हत्ती मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान करत असल्याने शेतकरी वैतागले आहेत. याची दखल बोत्सवानाचे अध्यक्ष मोक्ग्वेत्सी मेस्सी यांनी घेतली आहे. त्यामुळेच त्यांनी संतापून एक मोठी घोषणा केली आहे. ती म्हणजे तब्बल २० हजार हत्तींचा कळप थेट जर्मनीमध्ये पाठवण्याची. अनेक माध्यमांमध्ये ही ‘हेडलाईन’ गाजते आहे.......

महाराष्ट्राच्या राजकारणाचा हा ‘खेळखंडोबा’ असाच चालू राहू द्यायचा की, त्यावर ‘अक्सिर इलाज’ करायचा, याचा निर्णय घेण्याची एकमेव ‘निर्णायक’ वेळ आलेली आहे…

जनतेला आश्वासनांच्या, ‘फेक न्यूज’च्या आणि प्रस्थापित मीडिया व सोशल मीडियाद्वारे भ्रमित करूनही सत्ता मिळवता येते, राखता येते, हे गेल्या दहा वर्षांत भाजपने दाखवून दिले आहे. पूर्वी सत्ता राजकीय नेत्यांना भ्रष्ट करते, असे म्हटले जायचे, हल्ली सत्ता भ्रष्ट राजकीय नेत्यांना ‘अभय’ वरदान देण्याचा आणि एकाधिकारशाही प्रवृत्तीच्या राजकारण्यांना ‘सर्वशक्तिमान’ होण्याचा ‘सोपान’ ठरू लागली आहे.......