‘पसायदान’ हे विश्वशांतीसाठी रचलेलं महान शांतीसूक्त आहे!
पडघम - साहित्यिक
लक्ष्मीकांत देशमुख
  • ९१व्या अ.भा. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख
  • Fri , 13 April 2018
  • पडघम साहित्यिक पहिले पसायदान विचार साहित्य संमेलन लक्ष्मीकांत देशमुख

आज, उद्या आणि परवा (१३ ते १५ एप्रिल २०१८) श्रीक्षेत्र आळंदी इथं ‘पहिले पसायदान विचार साहित्य संमेलन’ होत आहे. या संमेलनामागची भूमिका विशद करणाऱ्या डॉ. लक्ष्मीकांत देशमुख यांच्या भाषणाचा हा संपादित अंश...

.............................................................................................................................................

‘श्री ज्ञानेश्‍वर महाराज संस्थान कमिटी’(आळंदी)ने ‘महाराष्ट्र साहित्य परिषद’ (पुणे) यांच्या सहकार्याने आळंदी इथं पहिले ‘पसायदान विचार साहित्य संमेलन’ आज, उद्या आणि परवा (१३ ते १५ एप्रिल २०१८) आयोजित केलं आहे. महाराष्ट्र देशी संमेलनाचा सुकाळ असताना असताना आणखी एक संमेलनाचं काय प्रयोजन आहे, असा प्रश्‍न सर्वसामान्यांना पडू शकेल. त्यासाठी सर्व प्रथम हे स्पष्ट केलं पाहिजे की, हे निव्वळ साहित्य संमेलन नाही, की संत साहित्याचं सांप्रदायिक स्वरूपाचं संमेलन नाही.

श्री ज्ञानेश्‍वरांचा ‘भावार्थदीपिका’ म्हणजेच ‘ज्ञानेश्‍वरी’चं सारतत्त्व असलेलं पसायदान हे केवळ मानवतेचं महन्मंगल स्तोत्रच नाही, तर तो उद्याचा आदर्श मानव समाज कसा असावा, याची नीलप्रत (ब्ल्यू प्रिंट) समाजास देणारा शाश्‍वत लोककल्याणकारी विचार आहे. आजच्या तणावमुक्त मानवी जीवनातील वैफल्य, बाजारीकरण, हिंसा, धर्मद्वेष आणि मुख्य म्हणजे माणसांचा परस्पर अविश्वास यातून मानवमुक्तीचा मार्ग हा विवेकशील मूल्याधिष्ठित प्रेम-क्षमा-करुणा युक्त मानवतावादी सहजीवनाद्वारे प्राप्त होऊ शकतो. त्यासाठी समाजमनात हे उदार विचार पेरण्यासाठी आणि वारकरी, साहित्यिक आणि सामान्य माणूस यांना एकत्र एका व्यासपीठावर आणून आदर्श समाजनिर्मिती संतविचार आणि पसायदानाच्या उदात्त भावातून कशी करता येईल, याचा विचार देण्यासाठी या साहित्य संमेलनाचं आयोजन करण्यात आलं आहे.

साने गुरुजींनी १९४० च्या दशकात ‘गोड निबंध’ या संग्रहात ‘मराठी साहित्य संमेलन’ शीर्षकाचा एक निबंध लिहिला होता. त्यातला पुढील उतारा या साहित्य संमेलनाची भूमिका समजून घेण्यासाठी उपयुक्त आहे – “संतांनी जनतेच्या कळवळ्याने लिहिले म्हणून ते जनतेत जाऊन बसले. मराठीत राष्ट्रीय ग्रंथ कोणते असा प्रश्‍न केला तर ज्ञानेश्‍वरी, नाथांचे व तुकोबांचे अभंग, मनाचे श्‍लोक, मुक्ताबाई, जनाबाईचे अभंग, श्रीधर व महिपती यांचे ग्रंथ असे उत्तर दिले पाहिजे. जे ग्रंथ गावोगाव आहेत, रोज वाचले जातात तेच खरे राष्ट्रीय ग्रंथ. जनतेच्या जीवनात जे ग्रंथ अजून ओलावा निर्मित आहेत तेच खरे थोर ग्रंथ!

समाजात रूढी आहेत, दंभ आहे, अज्ञान आहे, खोटे, श्रेष्ठ-कनिष्ठपणाचे भाव आहेत. ज्ञानाचा प्रकाश कुठेच नाही. अर्थहीन चित्रे, अर्थहीन लिहिणे, प्राण कुठेच नाही. ‘अवघाची संसार सुखाचा करीन’ या प्रतिज्ञेने आज कोण (संताप्रमाणे) हाती लेखणी धरतो? असे साहित्य आज निर्मिले पाहिजे की ज्यामुळे समाजात तेज ओतले जाईल, नरक नाहिसा होऊन स्वर्ग निर्माण करण्याची उत्कटता जनतेत साहित्याने आणली पाहिजे.”

.............................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन प्रकाशनपूर्व नोंदणीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/client/book_detailed_view/4406

.............................................................................................................................................

त्या काळी साने गुरुजींच्या नजरेसमोर जो भरकटलेला आणि दबलेला समाज होता, त्यापेक्षा कितीतरी पट अधिक आज समाज भरकटलेला आणि तणावग्रस्त आहे. एकीकडे माहितीचा स्फोट, दुसरीकडे वाढता चंगळवाद आणि विकृत उपभोगवाद, तर तिसरीकडे अभावग्रस्तता, बेरोजगारी आणि घुसमट. पुन्हा वेगवान जीवनशैली आणि स्पर्धेच्या रॅटरेसमुळे माणूस अस्थिर, अस्वस्थ आणि बैचेन झाला आहे. आजचं समाजमन अस्वस्थ खदखदत्या ज्वालामुखीच्या तोंडावर जणू उभं आहे आणि केव्हाही त्याचा स्फोट होईल. त्यातून विनाशकारी असं काही होईल, ही साधार भीती आहे. पुन्हा जगाला ग्रासणारा अतिरेकी स्वरूपाचा धार्मिक दहशतवाद आणि उन्मादात सारं जग सतत भीतीच्या छायेत वावरत आहे. त्यावर उत्तर म्हणून कर्मकांड, कालबाह्य धार्मिक रूढीचं प्रस्थ वाढणं, स्वत:च्या धर्म-जात-पंथाबाबत कडवं होणं आणि त्याच वेळी इतर धर्म बांधवांचा तिरस्कार करणं आणि क्षुल्लक कारणावरूनही हिंसा होणं, हे आता नित्याचं झालं आहे. त्याचा परिणाम म्हणजे भारतीय संविधानात आपणांस दिलेले मूलभूत अधिकार - जसे की विचार स्वातंत्र्य, अभिव्यक्ती आणि धर्मस्वातंत्र्यही नागरिकांना उपभोगता येत नाही. म्हणून आजचं समाज मन अस्वस्थ आहे.

थोडक्यात आजचं युग जीवघेण्या स्पर्धेचं आहे. बाजारपेठी अर्थकारणाचा केंद्रबिंदू असणारी स्पर्धा आणि शांततामय सहजीवनावर भर असणारा पसायदानातील विचार यांची सांगड कशी घालायची, हा खरा प्रश्‍न आहे. कारण भौतिक आणि आर्थिक सुबत्तेबरोबर जीवनातील व्यक्तिवादी दृष्टिकोन दिवसेंदिवस प्रबळ होत चालला आहे. त्यामुळे व्यक्ती आणि समाजातल्या नात्याचा पोत बदलतो आहे. अशा वेळी पसायदानातील केंद्रवर्ती असणारी मूल्यव्यवस्था आणि तिची प्रस्तुता या संमेलनाद्वारे विवेकी नागरिकांना जाणून घेता येईल. किंबहुना याच उद्देशानं संमेलनातील अध्यक्षांची निवड आणि त्यांचे अध्यक्षीय भाषणातून व्यक्त होणारे विचार, परिसंवादाचे विषय, समारोपाचे सत्र यांची आखणी केली गेली आहे.

ज्ञानेश्‍वर माऊलींनी ‘वसुधैव कुटुंबकम्’ अशा विचारांनी विश्‍वात्मक देवाकडे जगाच्या कल्याणासाठी धर्म, जात, पंथ या मर्यादा ओलांडत पसायदान मागितले आहे. त्यामुळे ही एक सर्वश्रेष्ठ प्रार्थना आहे आणि ती प्रत्येक धर्माला आपली वाटू शकते. समाजाचा विध्वंस करणारी मनातली तामसी वृत्ती नष्ट होऊन मानव प्राण्यात बंधुभाव, प्रेम व स्नेह निर्माण व्हावा आणि त्यानं आपल्या बुद्धी कुवतीप्रमाणे सत्कार्य करावं, हा पसायदानाचा विचार एकूणच वारकरी संप्रदायाचा पाया आहे. विश्‍वशांतीसाठी पसायदान हे रचलेलं महान असं शांतीसूक्त आहे.

पसायदान आणि संतविचाराचं नातं हे गौतम बुद्धांची करुणा, पैगंबरांची बंधुता आणि शांतता, कबिराचं प्रेम, संत तुकाराम महाराजांची दया-क्षमा-शांती आणि साने गुरुजींचा ‘खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे’ अशा विचारांकडे सम्यक दृष्टीनं पाहिलं तर जोडता येतं. त्या दृष्टीनं पसायदान विचार साहित्य संमेलनाच्या परिसंवादाचे विषय आम्ही ठरवले आहेत. तसंच या संमेलनात तज्ज्ञ अभ्यासकांना पाचारण केलं आहोत. ‘माझा धर्म आणि पसायदान’ असाही एक परिसंवादाचा विषय असून विविध धर्माचे अभ्यासक हा अनुबंध उलगडून दाखवणार आहेत.

संत साहित्य हे मध्ययुगीन पारलौकिक जीवनाचा विचार करणारं साहित्य मानून आजचा तरुण त्याकडे पाठ फिरवतो. पण संतविचार हा ऐहिक जीवनाची ऊर्जा वाढवण्यासाठी एक पूरक आणि उपयुक्त विचार आहे. त्यामुळे संतसाहित्य आणि आज आधुनिक साहित्याचा सांधा जुळल्याविना समाजधारणेसाठी आवश्यक असणारा मूल्यविचार समाजास समजणार नाही. आजचा माणूस तणावविरहित समाधानी जगू शकणार नाही. संतविचारांच्या परिप्रेक्ष्यात आजच्या साहित्यिकांनी त्यांचं साहित्य संपन्न आणि मूल्यगर्भ करण्यासाठी याचा अभ्यास करत, ही शाश्‍वत मूल्यं स्वीकारणं आवश्यक आहे. तसं झालं तर त्याचं प्रतिबिंब त्यांच्या साहित्यात पडेल आणि वाचकांना नवा सकस विचार मिळेल.

थोडक्यात ‘पसायदान विचार साहित्य संमेलना’च्या माध्यमातून प्रेम, त्याग,  करुणा,  परोपकार,  सहजीवन, सहअस्ति, नैतिकता सचोटी व पापभिरूपणा ही शाश्‍वत मूल्यं पुन्हा एकदा बाजारी उपभोगवादी, असहिष्णू बनत चाललेल्या समाजात प्रस्थापित करणं, निदान त्याची अपरिहार्यता जाणून त्या दिशेनं वाटचाल करणं, हा या इतर संमेलनापेक्षा वेगळ्या असणार्‍या पहिल्या पसायदान विचार साहित्य संमेलनाचा उद्देश आहे आणि त्याची समाजाला अत्यंत गरज आहे. ती अधोरेखित करण्याचा हा नम्र प्रयत्न आहे.

.............................................................................................................................................

लेखक लक्ष्मीकांत देशमुख ९१व्या अ.भा. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी, आळंदीचे विश्‍वस्त आहेत.

laxmikant05@yahoo.co.in

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

भाजपच्या ७६ पानी ‘जाहीरनाम्या’त पंतप्रधान नरेंद्र मोदींची तब्बल ५३ छायाचित्रं आहेत. त्यामुळे हा जाहीरनामा आहे की, मोदींचा ‘छायाचित्र अल्बम’ आहे, असा प्रश्न पडतो

काँग्रेसच्या ४८ पानी जाहीरनाम्यात राहुल गांधींची फक्त पाच छायाचित्रं आहेत. त्यातली तीन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत आहेत. याउलट भाजपच्या जाहीरनाम्याच्या मुखपृष्ठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीमागे बळंच हसताहेत अशा स्वरूपाचं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचं छायाचित्र आहे. त्यातली ‘बिटवीन द लाईन’ खूप सूचक आणि स्पष्टता सूचित करणारी आहे.......

जर्मनीत २० हजार हत्तींचा कळप सोडण्याची धमकी एका देशाने दिली आहे, ही ‘हेडलाईन’ जगभरच्या प्रसारमाध्यमांमध्ये गाजतेय सध्या…

अफ्रिका खंडातील बोत्सवाना हा मुळात गरीब देश आहे. त्यातच एवढे हत्ती म्हणजे दुष्काळात तेरावा महिना. शेतांमध्ये येऊन हत्ती मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान करत असल्याने शेतकरी वैतागले आहेत. याची दखल बोत्सवानाचे अध्यक्ष मोक्ग्वेत्सी मेस्सी यांनी घेतली आहे. त्यामुळेच त्यांनी संतापून एक मोठी घोषणा केली आहे. ती म्हणजे तब्बल २० हजार हत्तींचा कळप थेट जर्मनीमध्ये पाठवण्याची. अनेक माध्यमांमध्ये ही ‘हेडलाईन’ गाजते आहे.......

महाराष्ट्राच्या राजकारणाचा हा ‘खेळखंडोबा’ असाच चालू राहू द्यायचा की, त्यावर ‘अक्सिर इलाज’ करायचा, याचा निर्णय घेण्याची एकमेव ‘निर्णायक’ वेळ आलेली आहे…

जनतेला आश्वासनांच्या, ‘फेक न्यूज’च्या आणि प्रस्थापित मीडिया व सोशल मीडियाद्वारे भ्रमित करूनही सत्ता मिळवता येते, राखता येते, हे गेल्या दहा वर्षांत भाजपने दाखवून दिले आहे. पूर्वी सत्ता राजकीय नेत्यांना भ्रष्ट करते, असे म्हटले जायचे, हल्ली सत्ता भ्रष्ट राजकीय नेत्यांना ‘अभय’ वरदान देण्याचा आणि एकाधिकारशाही प्रवृत्तीच्या राजकारण्यांना ‘सर्वशक्तिमान’ होण्याचा ‘सोपान’ ठरू लागली आहे.......