अशोक शहाणे, अर्धवट शहाणे, दीड शहाणे आणि अति शहाणे!
पडघम - सांस्कृतिक
राजन मांडवगणे
  • ‘साद’नं चव्हाण सेंटर, ठाणे शाखेच्या सहकार्यानं आयोजित केलेलं अशोक शहाणे यांचं आख्यान
  • Sat , 07 April 2018
  • पडघम सांस्कृतिक अशोक शहाणे Ashok Shahane भालचंद्र नेमाडे Bhalchandra Nemade कोसला Kosla ज्ञानेश्वरी Dnyaneshwari

अशोक शहाणे

ज्या माणसांना त्यांच्या प्रतिभेमुळे, विद्वतेमुळे किंवा विक्षिप्तपणामुळे आधी लोकप्रियता मिळते, मग वलय प्राप्त होतं, आणि नंतर ती स्टॉलवर्ट होतात; त्या माणसांचं हसणं, चिरकणं, भेकणं, खाकरणं, शिंकरणं सगळंच कौतुकाचा विषय होतं. त्यात त्यांनी ‘तुच्छता’ हा आपला स्वभावधर्म मानला तर मग बघायलाच नको! ती ‘काहीं’च्या अजूनच आवडीची होतात. अशोक शहाणे हे खऱ्या अर्थानं आणि सर्वार्थानं ‘शहाणे’ असल्यामुळे त्यांचं आजवर असं काहीही झालेलं नाही. किंबहुना त्यांनीच ते जाणीवपूर्वक होऊ दिलेलं नाही.

अशोक शहाणे हे इतके स्वत:च्या ‘टर्म्स अँड कंडिशन’वर जगणारे गृहस्थ आहेत की, त्यांची तुलना पत्रपंडित गोविंदराव तळवलकर यांच्याशी करण्याचा मोह होतो. तळवलकर विद्वान होतेच, अशोक शहाणेही विद्वान आहेत. तळवलकर विचक्षण, प्रतिभावान होते, अशोक शहाणेही विचक्षण, प्रतिभावान आहेत. तळवलकर एका मराठी वर्तमानपत्राचे तब्बल तीसेक वर्षं संपादक राहिले होते, अशोक शहाणे यांचं आजवरचं सबंध आयुष्य इतरांच्या लेखनाचं संपादन, संगोपन करण्यात व्यतित होत आलंय. यापुढेही ते बहुधा कमी-अधिक प्रमाणात तसंच होईल. तळवलकरांना स्वत:च्या विद्वतेचा गर्व होता आणि अहंकारही. कदाचित सुरुवातीला गर्व असावा, संपादकपदी विराजमान झाल्यावर त्यात अहंकाराची भर पडली असावी. अशोक शहाणे यांच्याकडे मात्र या दोन्ही गोष्टी नाहीत. ते इतरांवर टीका करतात, अगदी निरर्गल टीका करतात, पण त्यांच्याकडे तितकाच मनाचा उमदेपणा, मोठेपणाही आहे. नवख्या तरुणाशी आणि दिग्गजाशीही ते तितक्याच सहजतेनं बोलतात. त्यांच्या या वैशिष्ट्यांमुळेच कदाचित त्यांची तुलना ‘मौज-सत्यकथा’चे संपादक राम पटवर्धन यांच्याशी केली जाऊ शकते.

शहाणे हाडाचे संपादक असल्यानं ते सहसा जाहीर कार्यक्रम, प्रकाशन समारंभ, परिसंवाद, चर्चासत्र, मुलाखती, साहित्य संमेलनं अशा ठिकाणी नसतात. त्यामुळेच त्यांच्या आजवर फारशा जाहीर मुलाखती झालेल्या नाहीत. कारण शहाणे अशा प्रकारच्या जाहीर कार्यक्रमांसाठी फारसे उत्सुक नसतात. ते असे प्रस्ताव अनेकदा फेटाळून लावतात. त्यामुळे त्यांनी त्यांच्या स्नेही-मित्रांच्या आग्रहापोटी जाहीर मुलाखतीसाठी होकार दिला, तर ती संधी मानायला हवी होती. पण आयोजकांनी शहाणे यांच्या सांगण्यावरून मुलाखतीसाठी शहाणे यांचे स्नेही आणि शैलीदार ललितलेखक व ज्येष्ठ पत्रकार अंबरीश मिश्र यांची निवड केली. त्यामुळे या मुलाखतीत काही चांगलं ऐकायला मिळेल अशी अपेक्षा होती, पण ती बव्हंशी फोल ठरली. कारण मिश्र यांनी स्वत:च्या आणि शहाणे यांच्या प्रेमात पडून घिसेपिटे प्रश्न विचारले. परिणामी, या मुलाखतीला ‘डोंगर पोखरून उंदीर’ काढण्याचं स्वरूप आलं.

तर त्याचं असं झालं…

एक एप्रिल हा खरं तर इतरांना गमतीगमतीत मूर्ख बनवण्याचा दिवस. पण नेमक्या याच दिवशी ठाण्याच्या ‘साद’ या संस्थेनं चव्हाण सेंटर, ठाणे शाखेच्या सहकार्यानं अशोक शहाणे यांचं आख्यान आयोजित केलं होतं. ‘आख्यान’ असं नाव असलं तरी हा शहाणे यांच्या प्रकट मुलाखतीचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमाची ‘महाराष्ट्र टाइम्स’मध्ये जी बातमी आली, त्यात म्हटलं होतं की, ‘मराठी साहित्यावर क्ष-किरण टाकणारे ज्येष्ठ विद्रोही लेखक-समीक्षक अशोक शहाणे’. पुढे बातमीत असं म्हटलं होतं की, ‘मराठी लघुनियतकालिकांचे जनकत्व अशोक शहाणे यांच्याकडे जाते. लेखन, संपादन, प्रकाशन, संस्कृती समीक्षा यामध्ये शहाणे नेहमी अग्रेसर आहेत. भाषा, कविता, नाटक, चित्रपट, कादंबरी, कथा, पत्रकारिता, इतिहास, संस्कृती, कम्प्युटर कोणताही विषय शहाण्यांना वर्ज्य नाही. विद्रोहातूनच निर्मिती होते हे शहाणेंच्या जीवनाचे सूत्र, त्यांच्या आख्यानातही असणार. त्याशिवाय किस्से, आठवणी, चमकदार शेरेबाजी, मराठी भाषा, समाज, इतिहास, संस्कृती आणि वर्तमान यांवरील भेदक व मूलगामी टीका सध्याच्या काळात गरजेची आहे. हेच या आख्यानाचे प्रयोजन आहे.’

आयोजक जे कार्यक्रमाचं प्रयोजन सांगतात, त्यानुसार बातमीदार बातमी लिहितो. त्यामुळे बातमीबाबत बातमीदारावर फारसा आक्षेप घेण्याचं कारण नाही. अर्थात त्यात त्यानं पदरच्या एखाद-दोन ओळी घुसडल्याही असतील. म्हणूनच तर ‘मराठी साहित्यावर क्ष-किरण टाकणारे ज्येष्ठ विद्रोही लेखक-समीक्षक’ असं शहाणे यांचं वर्णन केलं गेलं. या लेखाला तसा पन्नास वर्षांचा काळ उलटला आहे. शहाणे यांनी मराठी साहित्यावर क्ष-किरण टाकल्यानंतर इतरही अनेकांनी वेगवेगळ्या प्रकारे क्ष-किरण टाकून मराठी साहित्याची व्यवस्थित, यथासांग तपासणी केलेली आहे. उदा. ‘मराठी साहित्यातील बिभत्स गारठा’ (दि. के. बेडेकर), ‘सुमारांची सद्दी’ (विनय हर्डीकर), ‘आखूड लोकांचा प्रदेश’ (सुहास पळशीकर), ‘हल्ली लेखकाचा लेखकराव का होतो?’ (भालचंद्र नेमाडे), ‘मराठी साहित्यिक आणि सार्वजनिक चारित्र्य : एक मीमांसा’ (अरुण टिकेकर), ‘मराठीतलं सांस्कृतिक गँगरीन’ (कुमार केतकर) असे विविध लेख लिहिले गेले आहेत. पण या लेखांची काही चर्चा कुणी करत नाही. वास्तविक शहाणे यांच्या लेखाच्या बरोबरीनं या लेखांचीही चर्चा व्हायला हवी होती, पण ती कुणीही करताना दिसत नाही. तर ते असो.

मुद्दा असा की, गेल्या पन्नास वर्षांत शहाणे यांची ओळख या एकाच लेखासाठी करून दिली जात असेल वा त्यांना या एका लेखामुळेच ओळखलं जात असेल तर ते त्यांच्यावर सरळ सरळ अन्याय करणारं आहे.

‘लेखन, संपादन, प्रकाशन, संस्कृती समीक्षा यामध्ये शहाणे नेहमी अग्रेसर आहेत. भाषा, कविता, नाटक, चित्रपट, कादंबरी, कथा, पत्रकारिता, इतिहास, संस्कृती, कम्प्युटर कोणताही विषय शहाण्यांना वर्ज्य नाही.’ हे खरंच आहे. शहाण्यांचं लेखन किती? त्यांचं ‘नपेक्षा’ हे एकमेव पुस्तक प्रकाशित आहे. त्यानंतर लिहिलेले आणि या पुस्तकात नसलेले त्यांचे काही लेख वेगेवगळ्या नियतकालिकांमध्ये प्रकाशित झालेले असले तरी ते अजून तरी पुस्तकरूपानं प्रकाशित झालेले नाहीत. ‘नपेक्षा’ हेही काही स्वतंत्रपणे, नव्यानं लिहिलेलं पुस्तक नाही. ते त्यांनी वेळोवेळी लिहिलेल्या लेखांपैकी निवडक लेखांचं पुस्तक आहे.

शहाणे लघुअनियतकालिकांचे जनक होते हे खरं, पण त्यांनी लघुनियतकालिकांची चळवळ उभी केली नाही, जे काही घडलं तो निव्वळ अपघात होता, त्यात कुठलंही नियोजन नव्हतं. हे त्यांनी स्वत:च सांगितलेलं आहे. आणि ते तर्कदृष्ट्या बरोबरही आहे. कारण साठीतल्या प्रस्थापित साहित्याच्या विरोधात, ‘सत्यकथा’छाप मराठी साहित्याच्या विरोधात निर्माण झालेलं ते त्यावेळच्या तरुण लेखकांचं बंड होतं. त्यासाठी काही समविचारी तरुण लेखक एकत्र आले असले तरी त्यामागे फार काही पूर्वतयारीचा वा वैचारिक तयारीचा भाग नव्हता. ‘असो’ आणि ‘वाचा’ ही दोन लघुनियतकालिकं शहाणे यांनी कशा प्रकारे चालवली, याची कहाणी शहाणे यांनीच पुन्हा एकदा एक तारखेच्या आख्यानात सांगितलीच.

.............................................................................................................................................

‘सेपिअन्स - मानवजातीचा अनोखा इतिहास’ या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/client/book_detailed_view/4406

.............................................................................................................................................

राहता राहिला शहाण्यांना ‘भाषा, कविता, नाटक, चित्रपट, कादंबरी, कथा, पत्रकारिता, इतिहास, संस्कृती, कम्प्युटर’ यापैकी कोणताही विषय वर्ज्य नसण्याचा. एखादा विषय वर्ज्य नसणं आणि त्या विषयांत विशेष प्रावीण्य असणं या दोन पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत हे लक्षात घेतलं पाहिजे. शहाणे यांचं सर्वाधिक प्रेम कविता या वाङ्मय प्रकारावर आहे. त्यानंतर मराठी भाषेवर. त्यानंतर थोडंसं कादंबरीवर. बाकीच्या विषयांचं त्यांचं वाचन चांगलं आहे. पण त्याला समकालीन लेखन-वाचनाची फारशी परंपरा नाही, ही वस्तुस्थिती आहे. म्हणूनच तर शहाणे आजही तितक्याच ठसक्यात सांगतात की, बंगालीमध्ये जसे टागोर आहेत, तसा मराठीमध्ये तुकाराम हा सर्वश्रेष्ठ लेखक आहे. त्यांच्या या विधानावर या आधीही अनेकांनी टाळ्या वाजवलेल्या आहेत. माना डोलावलेल्या आहेत. आणि होकारही भरलेला आहे. परवाच्या आख्यानातही टाळ्या वाजवणं, माना डोलावणं आणि होकार भरणं हे सारे प्रकार झालेच. तेही अशा थाटात जणू काही शहाणे यांनी पहिल्यांदाच काहीतरी ‘भन्नाट’ सांगितलेलं आहे. क्षणभर असं वाटलं की, हे रसिक प्रेक्षक एखाद्या भावगीताच्या कार्यक्रमाला जाण्याऐवजी चुकून इथं आलेले आहेत की काय! कारण टागोर काय किंवा तुकाराम काय, त्यांचं निर्विवाद श्रेष्ठत्व कधीच सिद्ध झालेलं आहे. ते आता कुणीही नाकारू शकत नाही. पण तरीही त्याचा पुनरुच्चार शहाणे करत असतील तर त्यात नवीन काय आहे?

त्यामुळे असा प्रश्न पडतो की, त्यावर केवळ टाळ्या वाजवणारे, माना डोलावणारे किंवा होकार भरणारे लोक किती गंभीर असतात? आचार्य अत्रे यांनी मराठी माणसाच्या दोन व्याख्या केल्या आहेत.

१) तुकोबाचा निदान एक अभंग ज्याला पाठ येतो तो मराठी माणूस.

२) ज्याच्या घरी नाही, तुकोबाची गाथा; त्याच्या शिरी लाथा, हाणा चार.

यांबाबत मराठी माणूस म्हणून आपली काय स्थिती आहे? शहाणे, नेमाडे, चित्रे, कोलटकर तुकारामाच्या कवी म्हणून असणाऱ्या श्रेष्ठत्वाबद्दल सांगणार आणि आम्ही केवळ टाळ्याच वाजवत राहणार?

पण ही वस्तुस्थिती फारशी नाकारता येत नाही. एवढंच नव्हे तर शहाणे यांच्या कुठल्याही विधानावर निव्वळ टाळ्याच वाजवत राहणाऱ्यांची जमात वाढत चालली आहे की काय असं वाटतं. परवाच्या आख्यानातही तोच प्रकार बऱ्याचदा घडला. एकदा तर लेखक का लिहितो, याविषयी शहाणे आईही नऊ महिन्यानंतर मूळ कसं पोटात ठेवू शकत नाही, त्याला बाहेर काढून त्याच्याशी असलेली नाळही तोडून टाकते, हे त्यांना राजिंदरसिंग बेदी यांनी सांगितलेलं उदाहरण सांगत असतानाही मायबाप रसिक प्रेक्षकांनी टाळ्या वाजवल्या. तेव्हा मुलाखत घेणाऱ्या अंबरीश मिश्र यांनी त्यांना दटावलं की, हे टाळ्या वाजवण्यासारखं नाही. मात्र त्याविषयी मिश्र यांनी शहाणे यांना सविस्तर बोलतं केलं नाही.

खरं तर या सबंध मुलाखतीमध्ये मिश्र यांनी शहाणे यांना नीट बोलतंच केलं नाही. मुलाखतकारानं मुलाखतकर्त्याच्या प्रेमात पडायचं नसतं, असं म्हणतात. पण मिश्र यांचं शहाणेप्रेम त्यांना ओळखणाऱ्यांना पूर्वीपासूनच माहीत आहे. पण या मुलाखतीमध्ये मिश्र यांचं स्वत:वरचं प्रेमही जगजाहीर झालं. कारण शहाणे यांना कुठल्याही एका मुद्द्यावर बोलतं करण्यापेक्षा किंवा तो विषय त्यांच्याकडून नीट काढून घेण्यापेक्षा मिश्र त्यांच्या प्रश्नांचीच उत्तरं मिळवण्याचा आटोकाट प्रयत्न करत होते. त्यात शहाणेही कुठल्याही प्रश्नाचं उत्तर सविस्तर देण्यापेक्षा चार-दोन विधानांच्या पुढे जात नव्हते. त्यात त्यांनी एखादं चमकदार विधान केलं की, मिश्र ‘अजि म्या ब्रह्म पाहिले’ असे होत आणि मायबाप रसिक प्रेक्षक सदगदीत होऊन टाळ्या वाजवत.

त्यामुळे या मुलाखतीला ना आख्यानाचं स्वरूप आलं, ना संवादाचं. कुठल्याही प्रश्नावर शहाणे यांचं एक-दुसरं चमकदार विधान एवढंच या मुलाखतीचं स्वरूप राहिलं. शहाणे यांनी या मुलाखतीमध्ये केलेली सगळीच विधानं काही सगळ्यांनाच पटतील अशी नव्हती. तसं कुणाचंच एखाद-दुसरं विधान परिपूर्ण नसतं. त्यातल्या त्यात जी विधानं परिपूर्णतेच्या जवळ जातात, त्यांना वाक्प्रचाराचा, सुविचाराचा, म्हणीचा दर्जा मिळतो. बाकीची विधानं नुसतीच ‘चमकदार’ विधान होऊन तुटलेल्या ताऱ्यासारखी काही काळ चमकून विरून जातात. शहाणे यांची तर या अशा ‘चमकदार’ विधानांबाबत पुष्कळच ख्याती आहे. पण म्हणून शहाणे यांची ती चूष नव्हे की, फॅशन नव्हे. कारण शहाणे यांचं कुठलंही बोलणं आंतरिक कळवळ्यातून आलेलं असतं. त्यामुळे त्यांना वादग्रस्त विधानं करण्याची अजिबात हौस नसते, नाही, कधीच नव्हती.

दुसरी गोष्ट म्हणजे शहाणे फर्डे वक्ते नाहीत आणि फर्डे लेखकही नाहीत. (खरं तर किमान बरेही वक्ते नाहीत. लेखक मात्र चांगले आहेत, म्हणूनच ‘कॅरॅव्हॅन’ या प्रख्यात नियतकालिकानं गेल्या वर्षी त्यांच्यावर केलेल्या लेखाचं नाव होतं – “The Man Who Wrote (Almost) Nothing.”)

त्यामुळे त्यांच्या कुठल्याही चमकदार वा वादग्रस्त विधानावर ते आजवर सविस्तर बोलू-लिहू शकलेले नाहीत. त्यामुळे परवाच्या मुलाखतीमध्ये मिश्र यांनी त्यांना या विधानांबाबत सविस्तर, संदर्भांसह बोलतं करायला हवं होतं. त्यामुळे शहाणे यांच्याविषयी विनाकारण निर्माण झालेले काही गैरसमज दूर झाले असते. मिश्र आणि शहाणे यांची प्रदीर्घ काळापासून मैत्री असल्यानं त्यांना तसं करता येणं सहज शक्य होतं. पण त्यापैकी मिश्र यांनी काहीही केलं नाही. ते प्रश्न विचारत, शहाणे त्यांना बोलावंसं वाटेल ते बोलत. विषय कट. लगेच पुढचा प्रश्न. या पद्धतीनं ही मुलाखत चालू होती. शेवटी तर मिश्र यांना मुलाखत संपवण्याचीही घाई झाली होती.

अर्धवट शहाणे

आणि तरीही या कार्यक्रमाची दोन एप्रिल रोजी दै. ‘लोकसत्ता’ या प्रतिष्ठित वर्तमानपत्रात सविस्तर बातमी आली. कार्यक्रम जाहीर होता, तरीही ही बातमी पहिल्या पानावर बातमीदाराच्या बायलाईनसह आली. बायलाईन किती स्वस्त झाली आहे आणि ‘लोकसत्ता’वाल्यांचं शहाणेप्रेम किती पराकोटीचं आहे, या दोन्हींचा साक्षात्कार त्या बातमीतून आला.

या बातमीला जो मथळा दिला गेला आणि तिचा जो लीड लिहिला गेला, त्यातून तर तारतम्यपूर्ण विचार करणाऱ्या कुठल्याही माणसाचे शहाणे यांच्याविषयीचे गैरसमज कमी होण्याऐवजी वाढण्याचंच पातक घडलं. ‘संस्कृतच्या अपूर्णतेमुळेच मराठीचा जन्म’ असा या बातमीचा मथळा असून सुरुवातीच्या परिच्छेदात लिहिलं आहे, “संस्कृतमधून अभिव्यक्तीच्या मर्यादा येत असल्यानेच मराठी भाषा जन्मास आली. ज्ञानेश्वरांचे ‘अमृताते पैजा जिंके’ हे म्हणणे संस्कृतला उद्देशूनच होते; मात्र त्याबद्दल कुणी अवाक्षरही काढत नाही. त्या काळात संस्कृतमधून व्यक्त होण्याला मर्यादा येत असल्यानेच मराठी भाषा निपजली आणि याचे दाखले चक्रधरांच्या लीळाचरित्रातही आढळतात.” (ही शहाणे यांची विधानं!)

बातमी वाचण्यासाठी क्लिक करा - https://www.loksatta.com/maharashtra-news/ashok-shahane

ज्ञानेश्वरांनी ‘ज्ञानेश्वरी’ फक्त संस्कृत भाषेविरोधात बंडखोरी करण्यासाठीच लिहिलीय का? याचं स्पष्टीकरण मिश्र यांनी शहाणे यांना विचारायला हवं होतं. पण कुठल्याचं विधानाचं स्पष्टीकरण शहाणे यांच्याकडे संदर्भांसह मागायचं नाही, असा मिश्र यांचा होरा असावा. त्यामुळे ते काही त्यांनी केलं नाही. परिणामी शहाणे त्यांना सुचेल ते बोलत राहिले. त्यातच त्यांनी एखादी भाषा का निर्माण होते, याविषयी काही विधानं केली. त्यातून केवळ ‘लोकसत्ता’च्या बातमीदाराचाच नाही तर या मुलाखतीला उपस्थित असलेल्या अनेकांचा गैरसमज झाला.

शहाणे मराठी भाषेविषयी अतिशय पोटतिडीक असणारे, त्याविषयी तळमळीनं बोलणारे असले तरी ते काही भाषाशास्त्राचे अभ्यासक-संशोधक नाहीत. तसा त्यांचा स्वत:चाही आव नसतो. पण त्यांना जे वाटतं, ते शहाणे बोलतात. या मुलाखतीमध्ये ज्ञानेश्वरी आणि भाषेविषयी शहाणे जे काही बोलले, ते काही ‘मी एखादा मूलभूत सिद्धान्त मांडतोय’ या थाटाचं नसून ‘मला असं वाटतं’ या निरीक्षणाच्या पातळीवरचंच होतं. कारण शहाणे यांनी ‘लीळाचरित्रा’तल्या एका लीळेचा दाखला देत, संस्कृतला कस्पटासमान समजण्याचा जो उल्लेख केला किंवा ज्ञानेश्वरांनी ‘अमृत’ हा जो शब्द मराठीची थोरवी सांगण्यासाठी वापरला आहे. त्या ‘अमृता’चा संदर्भ देवांनी समुद्रमंथनातून काढलेल्या अमृताशी आहे. देवांनी निर्माण केलेली भाषा संस्कृत असेल तर तीही अमृतासमानच आहे. म्हणून ज्ञानेश्वरांचा ‘अमृत’ हा शब्दप्रयोग संस्कृतच्या संदर्भात आहे, असं जे शहाणे म्हणाले तो काही सिद्धान्त होऊ शकत नाही. त्याला त्यांचा तर्क किंवा निरीक्षण एवढंच म्हणता येईल. जोवर शहाणे त्याविषयी संदर्भांसह तपशीलवार बोलत नाहीत, तोवर त्यांचा तर्क वा निरीक्षण ग्राह्य मानण्याचं काही कारण नाही. तसंच त्यांनी मराठी भाषा कशी जन्मली याविषयी सांगितलेल्या तर्काचंही आहे.

पण इतकं साधं तारतम्य ना मिश्र यांनी दाखवलं, ना उपस्थित रसिक प्रेक्षकांनी. बातमीदार तर काय चमकदार विधानांच्याच शोधात असतात. त्यामुळे साहजिकच ‘अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरच्या मर्यादा हे आजचेच घटित नाही. तुकारामांच्या अभंगांच्या वह्या बुडवणे हे त्याचेच उदाहरण’, ‘धर्म आणि आयुर्विमा या बाबी सारख्याच असून दोन्हींचे फायदे मरणानंतरच मिळतात’, ‘बंगालीत जसे रवींद्रनाथ टागोर तसे मराठीत तुकारामांचे स्थान’ या शहाण्यांच्या विधानांना ‘लोकसत्ता’वाल्यांनी बातमीत चौकटीचा दर्जा दिला.

मिश्र यांनी सध्याच्या सरकार पुरस्कृत आणीबाणीविषयी विचारल्यावर शहाणे यांनी शिवाजी महाराज आणि तुकाराम समकालीन असूनही तुकारामाच्या वह्या बुडवण्याचा दाखला देत सांगितलं की, म्हणजे हे आजचंच नाही, तेव्हापासून चालत आलं आहे. शहाणे यांच्या या विधानात एकापेक्षा जास्त गफलती आहेत. एक, शिवाजी महाराज तुकारामाचे समकालीन असले तरी त्यांचं स्वराज्य फारच चिमुकलं होतं. तुकाराम त्या स्वराज्यात राहत नव्हते. त्यामुळे शिवाजी महाराज आणि तुकाराम यांचा दाखला वस्तुस्थितीला धरून नाही. दोन, प्रश्न सरकार पुरस्कृत आणीबाणीविषयी होता, तुकारामाच्या वह्याचं प्रकरण सनातनी समाजाच्या उद्रेकाशी संबंधित होतं. त्यात सरकार पुरस्कृत आणीबाणीचा काहीही संबंध नव्हता. तीन, तुकाराम-शिवाजी महाराज यांच्या काळापासून कुठल्या ना कुठल्या प्रकारची आणीबाणी अस्तित्वात आहे हे खरं, पण  त्याविषयी शहाणे यांचं मत काय त्याविषयी मात्र ते काहीही बोलले नाहीत. चार, सनातनी समाज आणि सरकार यांत शहाणे काही फरक करतात की नाही, याचाही उलगडा त्यांच्या उत्तरातून झाला नाही. त्यामुळे त्यांच्या या विधानाला ‘चमकदारपणा’पलीकडे फार महत्त्व देण्याचं निदान सध्या तरी काहीएक कारण नाही.

धर्म आणि आयुर्विमा यांच्या हवाल्याबाबतचं शहाणे यांचं निरीक्षण बरंचसं चपखल आहे, पण शेवटी निरीक्षणच ते! त्यापेक्षा जास्त त्याची ‘थोरवी’ नाही.

बंगालीत टागोर आणि मराठीत तुकाराम, हे सर्वमान्यच आहे. आणि अशा सर्वमान्य गोष्टींसाठी आता खरं तर शहाणे, नेमाडे, चित्रे यांच्या दाखल्यांची खरोखरच गरज नाही.

पुढे मुलाखतीमध्ये मिश्र यांनी लेखकाला राजकीय विचारसरणी असावी का? असा प्रश्न विचारला. त्याचं उत्तर शहाणे यांनी दिलं नाही. जे काही दिलं ते फारच उथळ होतं.

हिंदू धर्मातील मोक्ष ही संकल्पना अत्यंत व्यक्तिनिष्ठ आहे, पण ती मरणानंतरचा हवाला देत असल्यानं व्यावहारिक जीवनात तिचा कुठलाही अनुभव येत नाही, हे शहाणे यांचं निरीक्षणही व्यक्तिवादाच्या संदर्भातलं उदाहरण म्हणून चांगलंच होतं. पण पुन्हा मुद्दा तोच की, यांवरही शहाणे यांना अजून बोलतं करायला हवं होतं.

अनुवादाविषयी शहाणे जे काही बोलले ते उत्कृष्ट होतं. पण ते मुद्देसूद नव्हतं. त्यात बराच विस्कळीतपणा होता. बाकी साताऱ्यातील त्यांचं बालपण, तिथं शाखेत जाण्याची आठवण, नंतर पुण्यातील शिक्षण, ‘रहस्यरंजन’-‘असो’-‘वाचा’ यांविषयीच्या आठवणी, ‘कोसला’बाबतची आठवण हा चांगला भाग होता. पण त्यातही सूसुत्रता नव्हती. सुचेल तसं ते बोलत होते. पण तरीही ते श्रवणीय होतं.

अति शहाणे

यांवर कळस चढवला तो ‘लोकसत्ता’नं तीन एप्रिल रोजी अग्रलेख लिहून. त्याचं शीर्षकं मोठं नामी आहे – ‘ ‘शहाणे’ करून सोडावे…’. या अग्रलेखाच्या पहिल्याच परिच्छेदात शहाणे यांचा ‘एकविसाव्या शतकातील प्रतिभाशाली भाष्यकार’ असा गौरव केला आहे. सुरुवातीला द.वा. पोतदार, मायकेल हेझलटाइन यांची उदाहरणं दिली आहेत. ती वाचून सोडून द्यावीत या छापाची आहेत. कारण त्यांच्याबाबतीत अनुक्रमे ‘सर्वांत उत्तम चरित्र’ आणि ‘ग्रेट ब्रिटनचा सर्वोत्कृष्ट पंतप्रधान’ असं जे म्हटलं जातं, ते अतिशयोक्ती अलंकाराचं उदाहरण आहे. त्यापेक्षा त्याला काही जास्त महत्त्व देण्याचं कारण नाही. आता शहाणे यांना ‘प्रतिभाशाली भाष्यकार’ ठरवल्यानंतर ते तसे का आहेत, हे सांगण्यापेक्षा त्यांना कसा बोलण्याचा कंटाळा आहे आणि आपल्याकडे बोलघेवड्यांची कशी वाणवा नाही, अशी टोलेबाजी करणं जास्त सोयीचं आहे. वीस-तीस वर्षं पत्रकारितेत काम करणाऱ्या माणसाकडे इतका हजरजबाबीपणा तर असायलाच हवा ना! त्यामुळे ते तर असोच असो.

बाकी या परिच्छेदाच्या शेवटी मिश्र यांनी शहाणे यांना काळजीपूर्वक हाताळल्याचा जो निर्वाळा दिलाय, तो सपशेल खोटा आहे. मिश्र यांना या मुलाखतीत स्वत:लाही नीट हाताळता आलं नाही आणि शहाणे यांना तर नाहीच नाही.

अग्रलेख वाचण्यासाठी क्लिक करा - https://www.loksatta.com/agralekh-news/ashok-shahane

पुढच्या परिच्छेदात संस्कृत भाषेचं स्तोम माजवणाऱ्यांना तुच्छ लेखत शहाणे यांचं विधान भाषाशास्त्रीयदृष्ट्या शंभर टक्के पटणारं आहे, अशी एक लोणकढी ठेवून दिली आहे. भारतात आजघडीला संस्कृत भाषा केवळ लिखित पुस्तकांमधून जिवंत आहे, बाकी ती बहुसंख्य भारतीयांच्या दृष्टीनं मृत भाषा आहे. आणि जी भाषा फारशी बोलली जात नाही, तिच्या लिखित पुराव्यांना केवळ ऐतिहासिक महत्त्व उरतं. त्यामुळे तिच्याविषयी शहाणे काय बोलतात याची विशेष दखल घेण्याचं काहीच कारण नाही. शहाणे यांचं ‘संस्कृत ही परिपूर्ण असती तर प्राकृत आणि नंतर त्यातून मराठीचा जन्म झालाच नसता’ हे मत भाषाशास्त्रीयदृष्ट्या शंभर टक्के पटणारं तर सोडाच, नुसतं साध्या संभाषणातही फारसं पटणारं नाही. पण शहाणे यांच्या या मताला भाषाशास्त्रीय दृष्टीनं ग्राह्य मानून त्याच्या समर्थनार्थ अग्रलेखात पुढे ‘हिंग्लिश’चं जे उदाहरण दिलं आहे, ते हास्यास्पद म्हणावं इतकं वाईट आहे. मुळात ‘हिंग्लिश’ ही भाषा नाही. तिची स्वत:ची लिपी नाही. तिचं स्वत:चं व्याकरण नाही. अक्षररचना नाही. ती एक स्लँग भाषा आहे. अशा स्लँग भाषा जगभरातल्या सगळ्या भाषेमध्ये असतात. आणि जगातली कुठलीही स्लँग भाषा निर्माण होण्यामागे मूळ भाषेचं अभिव्यक्तीसाठीचं फक्त अपुरेपणच कारणीभूत नसतं. अनेकदा स्लँग भाषा या भाषाश्रेष्ठत्वाविषयीच्या न्यूडगंडातून किंवा बंडखोरीतून निर्माण होतात. आणि एखाद्या भाषेत कितीही स्लँग भाषा निर्माण झाल्या तरी त्या मूळ भाषेची कधीही बरोबर करू शकत नाहीत. मूळ भाषा ही मूळ भाषाच असते. तिचं श्रेष्ठत्व कितीही नाकारलं तरी ते अबाधितच राहतं.

पुढे अग्रलेखात अशीही लोणकढी ठेवून दिलीय की, शहाणे यांनी मराठीची संस्कृतशी केलेली बरोबरी ‘सांस्कृतिकदृष्ट्या अनेकांना न पेलणारी’ असली तरी भाषिकदृष्ट्या त्यावर साधकबाधक चर्चा व्हायला हवी. अभ्यासकांच्या परंपरेत एक चमकदार निरीक्षण हे फक्त स्वीकारलं जातं किंवा नाकारलं जातं. त्यावर कुणीही शहाणा अभ्यासक चर्चा करत बसत नाही.

पुढच्या परिच्छेदाची सुरुवातच मुळी ‘संस्कृतीचे आंतरशाखीय ठिपके जोडण्याचे शहाणे यांचे कसब नेहमीच कौतुकास्पद असते’ असं विधान करून राजिंदर सिंग बेदी यांचं लेखक का लिहितो या संदर्भातलं उदाहरण, तुकाराम-लक्ष्मीबाई टिळक हे आवडते लेखक असल्याचा निर्वाळा, मर्ढेकरांच्या अनेक कवितांतील कारागिरी खुपत असल्याची स्पष्टोक्ती आणि नेमाड्यांच्या ‘कोसला’च्या भाषाशैली चिकित्सेचं आवाहन, ही शहाणे यांची उदाहरणं दिली आहेत. यातून संस्कृतीचे कुठले आंतरशाखीय ठिपके जोडले जातात? मराठीत कुणी अभ्यासक शिल्लक असेलच तर त्यानं ‘कोसला’ची भाषाशैलीच्या अनुषंगानं चिकित्सा करायला हवी, असा टोला शहाणे यांनी मुलाखतीमध्ये हाणला होता. पण त्याच वेळी त्यांनी ‘कोसला’ची सुरुवातीची आणि शेवटची काही पानं ही कशी मुद्दामहून कारागिरी केलेली आहेत, हेही स्वत:च सांगितलं. आता ‘कोसला’मध्ये अशी ठरवून कारागिरी केलेली असेल, निरर्थक शब्दांची भरमार असेल तर कोण अभ्यासक कशाला त्यासाठी आपला वेळ वाया घालवेल?

त्यापुढचा अग्रलेख नेहमीचाच आपला क्ष-किरण, मौज संप्रदाय, प्रस्थापित मठाधिपती, विद्रोहवाला. तेच ते आणि तेच ते.

या अग्रलेखाच्या शेवटचं वाक्य आहे – ‘परंतु मराठीचे दुर्दैव हे की इतकी उत्कटता असणाऱ्या शहाणे यांनी लिहिलेले मात्र फारसे नाही. त्यांनी लिहावे. सकल जनांना ‘शहाणे’ करून सोडणे ही लेखकाची जबाबदारी असते.’ शहाणे यांनी लिहिलं काय आणि लिहिलं नाही काय, सकल जन शहाणे व्हायचे तेवढे होतीलच (किंवा जे व्हायचे नाहीत ते होणारच नाहीत.). जकल जनांनी शहाणं होण्याचा संबंध अशोक शहाणे यांच्या लेखनाशी संबंधित नाही. तसा तो कुणाच्याच लेखनाशी नसतो. नाहीतर आजवर शेक्सपिअर, प्रेमचंद, मंटो, तुकाराम, टागोर यांचं लेखन वाचून सकल जन शहाणे झाले नसते का?

दीड शहाणे

अशोक शहाणे खतरनाक जगतात, खतरनाक वागतात आणि खतरनाक बोलतात. त्यांच्या विधानांमध्ये वरकरणी विरोधाभास दिसतो. पण तसं तर जगातल्या कुणाचंही एखाद-दुसरं विधान घेतलं तर ते अपुरं, अर्धवट, संदिग्ध किंवा अंतर्विरोधीच दिसतं. अशा वेळी शहाणी माणसं संबंधित व्यक्तीकडून त्या विधानाविषयीचा नीट खुलासा करून घेतात. पण व्यक्ती हयात नसेल तर मग मात्र काहीशी पंचाईत होते. मग त्याच्या मुलाखती, लेख, भाषणं, पत्र, खाजगी आठवणी किंवा प्रकाशित लेखन यांमध्ये कुठे त्या विधानाचं स्पष्टीकरण मिळतं का याचा शोध घ्यावा लागतो. शहाणेंचं लेखनच मुळी फारसं नसल्यानं, तशी फारशी सोय नाही. त्यामुळे त्यांच्या खाजगीतल्या किंवा जाहीर कार्यक्रमातल्या विधानांनी जे दिपून जातात, त्यांना याचं भान कधीच राहत नाही की, याचं स्पष्टीकरण शहाणेंकडे मागावं. शहाण्यांसारखी त्यांनी एशियाटिक सोसायटीच्या ग्रंथालयाची वा इतर कुठल्याही ग्रंथालयाची वर्षानुवर्षं पायपीट केलेली नसते. स्वत:च्या उक्ती आणि कृतीमध्ये धड सुसंगती तरी आहे की, नाही याचा साधा विचारही अनेकदा त्यांच्या मनाला शिवलेला नसतो. त्यामुळे जेव्हा ते शहाण्यांचं चमकवणारं बोलणं ऐकतात, तेव्हा ते दिङमुढ होतात.

पण ही माणसं चतुरही असतात. त्यांच्या चतुरपणाचे अगणित आणि अपरिमित किस्से आपल्यापैकी अनेकांना माहीत आहेतच. त्यामुळे त्यांची मारुतीच्या शेपटीसारखी लांबड लावायची गरज नाही. तरी पण एक उदाहरण सांगण्यासारखं आहे. पत्रकार, समीक्षक आणि सामाजिक कार्यकर्ते विनय हर्डीकर यांनी ‘सुमारांची सद्दी’ हा लेख चौदा-पंधरा वर्षांपूर्वी लिहिला. तो ‘कालनिर्णय’च्या दिवाळी अंकात प्रकाशित झाला. या लेखाच्या शेवटी हर्डीकरांनी लिहिलं आहे – “ ‘सुमारांची सद्दी’ संपवल्याशिवाय स्वत:ला आणि त्या सुमारांनाही बरे दिवस येणार नाहीत, अशी आक्रमक खात्री बाळगावी लागेल, तरच ही कोंडी फुटण्याची शक्यता आहे.” हा लेख बिनतोड, सडेतोड आणि निर्विवाद होता. त्यामुळे त्यावर प्रतिक्रियांचा पाऊस पडला. त्यातली एक प्रतिक्रिया मोठी मजेशीर होती. लेख आवडल्याचे फोन करणारे काही चतुर लोक हर्डीकरांना अप्रत्यक्षपणे असं सुचवत होते की, तुम्ही आणि मी सोडून, बाकीचे सगळे सुमार.

अशोक शहाणे यांचं प्रत्येक विधान सदासर्वदा ‘बाबावाक्यं प्रमाणम्’च्या चालीवर डोक्यावर घेऊन इतरांना अक्कल शिकवू पाहणारे, हर्डीकरांच्या त्या चतुर वाचकांसारखे आहेत. त्यांनी तसं खुशाल असावं. त्याला कुणीच हरकत घेण्याचं कारण नाही. त्यांनी स्वत:ला अशोक शहाणे यांच्यासारखंच (किंवा त्यांच्यापेक्षाही जास्त) प्रज्ञावान, प्रतिभावान, विचक्षण आणि प्रगाढ पंडित समजावं.

महाराष्ट्राला जशी अशोक शहाणे यांची गरज आहे, तशीच किंबहुना त्यापेक्षाही जास्त अर्धवट शहाणे, दीडशहाणे आणि अतिशहाणे यांचीही गरज आहे. त्यामुळे या सगळ्या ‘शहाण्यां’चा विजय असो. ते आबाद राहोत!!!

.............................................................................................................................................

लेखक राजन मांडवगणे मुक्त पत्रकार आहेत.

mandavgane.rajan@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

Post Comment

Avadhut Raja

Sat , 07 April 2018

"प्रचंड" आकस मनात ठेवून केली गेलेली समिक्षा!


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

भाजपच्या ७६ पानी ‘जाहीरनाम्या’त पंतप्रधान नरेंद्र मोदींची तब्बल ५३ छायाचित्रं आहेत. त्यामुळे हा जाहीरनामा आहे की, मोदींचा ‘छायाचित्र अल्बम’ आहे, असा प्रश्न पडतो

काँग्रेसच्या ४८ पानी जाहीरनाम्यात राहुल गांधींची फक्त पाच छायाचित्रं आहेत. त्यातली तीन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत आहेत. याउलट भाजपच्या जाहीरनाम्याच्या मुखपृष्ठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीमागे बळंच हसताहेत अशा स्वरूपाचं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचं छायाचित्र आहे. त्यातली ‘बिटवीन द लाईन’ खूप सूचक आणि स्पष्टता सूचित करणारी आहे.......

जर्मनीत २० हजार हत्तींचा कळप सोडण्याची धमकी एका देशाने दिली आहे, ही ‘हेडलाईन’ जगभरच्या प्रसारमाध्यमांमध्ये गाजतेय सध्या…

अफ्रिका खंडातील बोत्सवाना हा मुळात गरीब देश आहे. त्यातच एवढे हत्ती म्हणजे दुष्काळात तेरावा महिना. शेतांमध्ये येऊन हत्ती मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान करत असल्याने शेतकरी वैतागले आहेत. याची दखल बोत्सवानाचे अध्यक्ष मोक्ग्वेत्सी मेस्सी यांनी घेतली आहे. त्यामुळेच त्यांनी संतापून एक मोठी घोषणा केली आहे. ती म्हणजे तब्बल २० हजार हत्तींचा कळप थेट जर्मनीमध्ये पाठवण्याची. अनेक माध्यमांमध्ये ही ‘हेडलाईन’ गाजते आहे.......

महाराष्ट्राच्या राजकारणाचा हा ‘खेळखंडोबा’ असाच चालू राहू द्यायचा की, त्यावर ‘अक्सिर इलाज’ करायचा, याचा निर्णय घेण्याची एकमेव ‘निर्णायक’ वेळ आलेली आहे…

जनतेला आश्वासनांच्या, ‘फेक न्यूज’च्या आणि प्रस्थापित मीडिया व सोशल मीडियाद्वारे भ्रमित करूनही सत्ता मिळवता येते, राखता येते, हे गेल्या दहा वर्षांत भाजपने दाखवून दिले आहे. पूर्वी सत्ता राजकीय नेत्यांना भ्रष्ट करते, असे म्हटले जायचे, हल्ली सत्ता भ्रष्ट राजकीय नेत्यांना ‘अभय’ वरदान देण्याचा आणि एकाधिकारशाही प्रवृत्तीच्या राजकारण्यांना ‘सर्वशक्तिमान’ होण्याचा ‘सोपान’ ठरू लागली आहे.......