“आम्ही योग्य ठिकाणाहून मिळालेली मदत, योग्य ठिकाणी पोहचवायची, ही जबाबदारी ‘पोस्टमन’च्या इराद्यानं निभावतो”
सदर - रौशनख़याल तरुण
हिनाकौसर खान-पिंजार
  • सत्तार शेखचा प्रयोगवन परिवार
  • Thu , 29 March 2018
  • रोशनख्याल तरुण हिना खान Heena Khan सत्तार शेख Sattar Shaikh

‘अमूक तमूक ठिकाणी रक्ताची गरज आहे, संपर्क करा.’, ‘अमूक एका चिमुरड्याच्या औषधोपचारासाठी डॉक्टरांचा योग्य सल्ला हवाय.’, ‘अमूक एकाला ऑपरेशनसाठी इतका इतका खर्च आहे. त्यासाठी इच्छुकांनी संबंधितांच्या खात्यावर मदत जमा करा.’, ‘अमूक मुलांसाठी थंडीचे गरम कपडे हवेत, शाळेसाठी वह्या पुस्तके हवीत, शाळेपर्यंतची पायपीट टाळण्यासाठी सायकली हव्यात.’, ‘अनाथ मुलांना तुमची माया हवी.’… अशा एक ना अनेक प्रकारच्या आर्जवी, संवेदनशील हाकांची, समंजस दुव्यांची आणि कृतिशील होण्याची मागणी करणाऱ्या पोस्टस सत्तार शेख या तरुणाच्या फेसबुक भिंतीवर दिसतात.

सोशल मीडियात सजगपणे वावरणाऱ्यांना सत्तार शेख हे नाव माहीत असणार! सोशल मीडियाच्या प्रवेशातलं नावीन्य आणि फुकाची वेळ दवडेगिरी संपल्यानंतर सत्तारला जाणवलं, फेसबुकची भिंत ही खरं तर आपल्या चळवळ्या वृत्तीची भुसभुशीत माती आहे. इथं चांगलं पेरलं तर उत्तम पिकेल. इथं जे आभासी नेटवर्क आहे, त्याला कृतिशीलतेला जोड दिली तर महत्त्वाचं काहीतरी उभं करता येईल. पण इथं नुसतंच इतरांना समस्या सांगून इतरांचं नेटवर्क जोपासत नाही राहायचं, तर प्रत्यक्ष आपणही ते काम करायचं, याची स्वत:शी त्यानं खूणगाठ बांधली आणि त्याच्या आभासी कल्पकतेतून वास्तवात दोन प्रकल्प उभे राहिले – ‘प्रयोगवन परिवार’ आणि ‘संडे स्कुल’!

सत्तार हा मुळात पत्रकार. जामखेड गावाचा वार्ताहर म्हणून त्यानं कामाला सुरुवात केली. ‘देशदूत’, ‘सार्वमत’, ‘प्रभात’, ‘भास्कर’ या दैनिकांमध्ये ‘कलमनामा’ या साप्ताहिकामध्ये त्यानं अकरा वर्षं पत्रकारिता केली. अनेकदा बातमीदारीच्या धावपळीत आणि रोज नकारार्थी बातम्या करून करून संवेदना बोथट होऊ लागतात. घटनेची बोच असते म्हणून बातमी करणं शक्य होतं, परंतु त्यातली वेदना हळूहळू जाणवेनाशी होते. हीच बाब सत्तारचं डोकं पिंजून काढत होती. बातमीदारीत संवेदना जाग्या होत्या, तरीही त्याला फार अस्वस्थ वाटत राहायचं. आपल्या सामाजिक दायित्वाची ओळख त्याला या अस्वस्थतेतूनच मिळाली.

सत्तार याविषयी सांगतो, “पत्रकारिता करत असताना रोज वेगवेगळे सामाजिक प्रश्न दिसत. आपल्या लेखणीतून त्या प्रश्नांना वाचा फोडण्याचा प्रयत्न सुरू होता, परंतु अनेकदा त्यात प्रशासकीय अन राजकीय अडथळ्यांची शर्यत ठरलेली असे. साहजिक काही प्रश्नांची उकल दीर्घकालीन प्रतीक्षेत अडकून पडते. आपल्या हाती असणाऱ्या माध्यमात प्रश्न मांडला म्हणून एकीकडे बरं वाटायचं, परंतु उत्तरांचा वेध मग कधी धिम्या तर कधी दीर्घकालीन प्रतीक्षेत अडकल्याचं पाहून अस्वस्थ व्हायचो. समाधान मिळत नव्हतं. मग काय केलं तर आपण समाजातील उपेक्षित व वंचितांना मदत करू शकतो? त्यांना मुख्य प्रवाहात आणू शकतो? हा विचार सतत सुरू झाला. आपणही सक्रियपणे काहीतरी करायला हवं याची त्यावेळेस जाणीव झाली. व्यवस्था बदलेल तेव्हा बदलेल, परंतु आपण आपला खारीचा वाटा उचलायला हवा. देणाऱ्या आणि घेणाऱ्यांच्या हातातील दुवा बनून काम करायला हवं. यातूनच ‘प्रयोगवन परिवारा’चे प्रयोग सुरू झाले.”

पत्रकारितेमुळे उकललेलं समाजवास्तव, आलेलं समाजभान आणि त्याला कृतीची जोड ही खूप कमी जणांना जमणारी गोष्ट. पण सत्तारनं मनावर घेतलं. सुरुवातीला सत्तारनं सोशल मीडियाचा वापर करण्यास सुरुवात केली. रुग्णांना ऐनवेळेवर रक्त उपलब्ध करून देण्याचं काम त्याला आणि त्याचे मित्र राहुल साळवे यांना महत्त्वाचं वाटलं. त्यामुळे त्यांनी ‘हेल्पिंग हॅण्डस फॉर ब्लड’ हा उपक्रम सुरू केला. राज्यात कुठूनही कुणालाही रक्ताची गरज भासल्यास, स्थानिक लोकांकडून ती मदत मिळवून देण्याचा प्रयत्न ते करू लागले. यामध्ये असंख्य मित्र-मैत्रिणींशी तो जोडला गेला. यातूनच मग विविध प्रश्न समोर येऊ लागले. जसे प्रश्न येत तशी उत्तरं शोधण्यासाठी धडपड सुरू झाली. कोणाला पैशांची गरज, तर कोणाला आरोग्याविषयी योग्य मार्गदर्शन, कुणाला सवलत हवी, तर कुणाला थोडी मदत. अशा विविध प्रकारच्या गरजवंतांना योग्य दात्यापर्यंत नेण्याचं काम सत्तार करू लागला.

याचबरोबर सत्तारची स्वत:ची शाळा सुरू होती. राज्यभर माणसं, संस्था काम करत आहेत. ते काम कसं करतात, त्यांची प्रेरणा काय असते, एकामागून एक कामाचा डोंगर उपसण्याची ऊर्जा येते कुठून आणि आपल्याला यातलं काय काय आत्मसात करता येईल, हा विचार त्याच्या चुळबुळ्या स्वभावाला शांत बसू देत नव्हता. जवळपास तीन वर्षं तो स्वखर्चानं महाराष्ट्रात भटकला. आनंदवन , सोमनाथ प्रकल्प, शांतीवन, आपलं घर, हेमलकसा, स्नेहालय, सावली, स्नेहग्राम, इन्फट इंडिया, बालग्राम, सेवाश्रम, प्रश्नचिन्ह, आरंभ ऑटिझम, ज्ञानप्रबोधन, या सामाजिक प्रकल्पांसह विविध ठिकाणी भेटी देणं, चर्चा करणं, संवाद साधणं, स्थानिक प्रश्नांचा संदर्भ समजून घेणं असे एकेक कित्ते तो गिरवू लागला. प्रत्येक ठिकाणी पाटी कोरी ठेवून तो सारं समजून घेत राहिला. या भटकंतीनं आपल्याला फार समृद्ध केल्याचं तो सांगतो. म्हणतो, “या काळात खूप माणसं मिळाली. या माणसांनी माणसं कशी वाचावीत हेही नकळत शिकवलं. आणि माणूसच! जात, धर्म, पंथ या पलिकेड जाऊन माणूस म्हणून पाहण्याची समज दिली.”

अशा प्रत्यक्ष फिल्डवर्कमधून तयार झालेल्या सत्तारनं २०१६ मध्ये ‘प्रयोगवन परिवार’ या संस्थेची स्थापना केली. सध्या प्रयोगवन परिवार शिक्षण, आरोग्य, स्वयंरोजगार व पर्यावरण या चार विषयात राज्यभर काम करत आहे. प्रश्न दिसेल तिथं त्याच्या उत्तरासाठी खंबीरपणे उभं राहायचं हेच सूत्र ठरवून प्रयोगवन कार्यरत आहे. शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणं, आर्थिक दुर्बल व वंचित घटकातील मुलांना शैक्षणिक साहित्याचं वाटप करणं, गरजू रुग्णासाठी रक्ताची अथवा रक्तदात्याची मदत मिळवून देणं, गोरगरीब रुग्णांना हॉस्पिटल खर्चासाठी मदतनिधी मिळवून देणं, सामाजिक प्रकल्पांसाठी वेगवेगळ्या प्रकारची मदत करणं, बेरोजगार तरुणांना कौशल्याधारित प्रशिक्षण देऊन रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणं, असे विविध उपक्रम ‘प्रयोगवन’ करत आहे.

याच बरोबर वृक्षारोपण, बियासंकलन व बीजारोपण या निसर्गपूरक गोष्टींमध्येही सत्तारनं उडी घेतली. गेल्या दोन वर्षांत दीड कोटी बियासंकलन व बिजारोपण त्यानं केलं आहे. इतकी विविधांगी कामं कशी चालतात याविषयी सत्तार सांगतो, “इतकी विविध कामं ही समाजातील दानशुरांच्या अमूल्य अशा सेवासहयोगाच्या मदतीतून चालतात. मदत देताना खरोखरीच ती व्यक्ती, संस्था व घटक गरजवंत आहे का? दिली जाणारी मदत इव्हेंट न ठरता ती शाश्वत व योग्य व्यक्ती, संस्था व घटकापर्यंत पोहचवण्याकडे जातीनं लक्ष दिलं जातं.”

मुलं हा सत्तारचा विक पॉइंट. शाळाबाह्य मुलं, बालकामगार पाहिले की, त्याचा जीव हळहळतो.  जामखेड शहरापासून काही अंतरावर असणाऱ्या पारधी वस्तीवरची मुलं अशीच शाळाबाह्य आहेत किंवा जी शाळेत जातात ती धड शिकत नाहीत हे सत्तारच्या शोधक नजरेनं हेरलं. या मुलांना मुख्य प्रवाहातल्या शिक्षणाची गोडी वाटावी, त्यांच्या उपजत गुणांना वाव देता यावा यासाठी सत्तारनं या मुलांसाठी ‘संडे स्कुल’ सुरू केलं.

साधारणपणे मुख्य प्रवाहातल्या शाळांमध्ये ही मुलं पटकन मिसळत नाहीत. त्यांची वस्तीवरील भाषा वेगळी असते. या मुलांचं अभ्यासात मन रमत नाही आणि म्हणून शिक्षकही अनेक वेळा अशा मुलांकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे शिक्षक-विद्यार्थ्यांतला संवाद खुंटतो. परिणामी ही भटकी मुलं भटकतच राहतात. सत्तारला हीच गोष्ट सलत होती. शाळा या जगाशी सकारात्मक ओळख व्हावी यासाठी त्यानं ‘संडे स्कुल’चा घाट घातला. मुलांनी यावं, खेळावं, बागडावं, चित्रं काढावीत, मातीकामात हुशार असणाऱ्या मुलांनी मातीच्या वस्तू बनवाव्यात आणि त्यातून अक्षरओळख, वाचन, गणित, विज्ञानही शिकावं अशी सत्तारची कल्पना.

सुरुवातीला मुलांनी सत्तारला ढेंगा दाखवला. पण त्यानं चिकाटी ठेवली. हळूहळू मुलं येऊ लागली. सत्तारनं वर्षभरात दहा शाळाबाह्य मुलांना शाळेत प्रवेश मिळवून दिला. एका कावेरी नावाच्या मुलीला तीन किलोमीटरचा अंतर पायी कापावं लागायचं. सत्तारनं सोशल मीडियावर कावेरीची ही पायपीट मांडली. सहृद्य व्यक्तीकडून तिच्यासाठी सायकल मिळाली आणि शिक्षणाची तिची वाट सुसह्य झाली. पारधी समाजाकडे आजही संशयितपणे पाहिलं जातं. हा समाजही पोलिसांना बिचकून असतो. अशा स्थितीत सत्तारनं या मुलांची थेट पोलिसांशी भेट घडवली. या मुलांसाठी चप्पला, गणवेश, थंडीसाठी कपडे सारं काही लोकसहभागातून उपलब्ध केलं.

सत्तराच्या कामाचा गाभाच लोकसहभाग आहे. ही संकल्पना त्यानं अत्यंत काळजीपूर्वक आणि शहाणपणानं वापरली आहे. याचबरोबर सध्या तो सायकलदान महाअभियान, पक्षी वाचवा महाअभियान, तसंच साधनाताई बाबा आमटे बालवाचनालय या चळवळीसाठीही काम करतो आहे. हे अभियान यशस्वी करण्यासाठी समाजातील दानशूर व्यक्तींनी पुढणं यावं, असं तो प्रांजळपणे नमूद करतो.

हे सारं समजून घेताना त्याची स्वत:ची पार्श्वभूमी काय? तो कसा वाढला? असं विचारलं तर तो सहज म्हणाला, “सर्वसामान्यांसारखंच जगलो. घरात आई-वडील, चार बहिणी आणि एक भाऊ. मी कुटुंबातला थोरला. कुटुंब मोठं, पण शेती नाही. वडिलांनी गावात छोटशी टपरी चालवून कुटुंब चालवत आम्हा भावंडांना शिकवलं. बालपण प्रचंड हलाखीचं गेलं. साहजिकच कर्जाचा डोंगर झाला. मग वडिलांनी घरातच एक छोटं हॉटेल टाकलं. त्यावरच संसार, शिक्षण सुरू झालं. वयात आल्यानंतर मी कामधंदा करत बी. ए. पर्यंत शिक्षण केलं. लेखनाची आवड वाटायची. मग वर्तमानपत्रांनी जवळ केलं. आपण जे करू ते बेस्ट करायचं या हेतूनं कामाला सुरुवात केली. मोबाईल हाताळायची फारशी माहितीही नव्हती, त्याच दिवसात मोबाईलवरून बातम्या पाठवू लागलो. त्यामुळे दैनिकातले वरिष्ठही खूश झाले. वेगवेगळे विषय शोधून, प्रसंगी उकरून त्यांचा छडा लावण्याचं काम करू लागलो. दरम्यान, चारही बहिणींची लग्नं झाली. छोटा भाऊ इम्रान सिव्हिल इंजिनिअर झालाय... आता तो नोकरीच्या शोधात आहे…”

सत्तारला या सगळ्या उपक्रमांमध्ये विकास आमटे, प्रकाश आमटे, अनिकेत आमटे, कौस्तुभ आमटे, दीपक नागरगोजे, विजय फळणीकर, कीर्तीदादा ओसवाल, गिरीश कुलकर्णी, ‘लोकसत्ता’चे वरिष्ठ संपादक दिनेश गुणे, महेश निंबाळकर, लायन विवेकानंद धारेश्वर, सागर वानखेडे, राहुल साळवे, नितेश बनसोडे, सुरेश राजहंस, शर्मिलाताई ताम्हणकर, अवीदादा केळकर, मनीषाताई कांदळगांवकर यांच्याकडूनन सातत्यानं मार्गदर्शन व खंबीर साथ लाभत आली आहे. सत्तार सांगतो, “आनंदवनात डॉ. विकासभाऊ आमटे यांनी शेती, पाणी, आरोग्य आदी क्षेत्रांत केलेल्या अफलातून प्रयोगातून आकारास आलेल्या ‘आनंदवन - प्रयोगवन’ या पुस्तकानं प्रचंड प्रभावीत झालो होतो. याच अनुषंगानं आम्ही ( सत्तार व महेशदादा निंबाळकर) आमच्या संस्थेचं ‘प्रयोगवन परिवार’ हे नाव निश्चित केलं.”

सत्तारची पत्रकारिता आणि त्याची कृतीशील वाटचाल हातात हात घालून सुरू आहे. सत्तारला जामखेड - आष्टी - पाटोदा - भूम या तालुक्याच्या सरहद्दीवरील बालाघाट डोंगररांगेच्या परिसरात  एक निवासी प्रकल्प सुरू करायचा आहे. पहिल्या टप्प्यात ५० आणि दुसऱ्या टप्प्यात १०० मुलं राहू शकतील अशा क्षमतेचा हा प्रकल्प आहे. यातून त्याला परिसरातल्या गरजू मुलांच्या शिक्षणाची सोय करायची आहे. आपलं काम इतरांना समृद्ध करणारं असायला हवं असा त्याचा हेतू आहे. त्यासाठी पारंपरिक आणि आधुनिक यांची योग्य सांगड घालून हा प्रकल्प उभारायचा आहे. त्यासाठी जागा आणि अर्थसहाय्य मिळवण्यासाठी सत्तार प्रयत्नशील आहे. त्याची ही वाट सहजसोपी नक्कीच नाही.

हे सांगत असताना सत्तारनं स्वत:चं एका शब्दात वर्णन केलं. त्यातून त्याच्या कामातला सच्चेपणा स्पष्टपणे जाणवत होता. तो शब्द म्हणजे - ‘पोस्टमन’! “आम्ही ‘पोस्टमन’ आहोत. योग्य ठिकाणाहून मिळालेली मदत योग्य ठिकाणी पोहचवायची ही जबाबदारी ‘पोस्टमन’च्या इराद्याने आम्ही निभावतो”, असं तो दोन तीन वेळा म्हणत राहिला.

त्यानं आणखी एक मुद्दा सहजभावनेनं मांडला. तो असा - “मी चालत राहिलो, प्रयत्न करत राहिलो. आपण करत असलेल्या प्रयत्नानं प्रश्न सुटतील का? तर माहिती नाही. आपल्याला एखादी गोष्ट खटकते, हे जाणवल्यानंतर तर निश्चितच केलं पाहिजे. मी तेच करत आहे. प्रयत्न चालू ठेवणं एवढंच आपल्या हाती, बाकी जग बदलेल तेव्हा बदलेल! ते आपल्या खारीच्या वाट्यानं बदलणार असेल, तर प्रयत्न सोडू नयेत.”

.............................................................................................................................................

लेखिका हिनाकौसर खान-पिंजार या मुक्त पत्रकार आहेत.

greenheena@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

जर नीत्शे, प्लेटो आणि आइन्स्टाइन यांच्या विचारांत, हेराक्लिट्स आणि पार्मेनीडीज यांच्या विचारांचे धागे सापडत असतील, तर हे दोघे आपल्याला वाटतात तेवढे क्रेझी नक्कीच नाहीत

हे जग कसे सतत बदलते आहे, हे हेराक्लिटस सांगतो आहे आणि या जगात बदल अजिबात होत नसतात, हे पार्मेनिडीज सिद्ध करतो आहे. आपण डोळ्यांवर अवलंबून राहण्यापेक्षा आपल्या बुद्धीवर अवलंबून राहिले पाहिजे, असे पार्मेनिडीजचे म्हणणे. इंद्रिये सत्याची प्रमाण असू शकत नाहीत. बुद्धी हीच सत्याचे प्रमाण असू शकते. यालाच बुद्धिप्रामाण्य म्हणतात. पार्मेनिडीज म्हणजे पराकोटीचा बुद्धिप्रामाण्यवाद! हेराक्लिटस क्रेझी वाटतो, पण.......