उंदरांनी (जी इभ्रत) नेली, ती गोळ्यांनी (खुलासा केल्यानं) परत येईल?
सदर - ‘कळ’फलक
संजय पवार
  • रेखाचित्र - संजय पवार
  • Wed , 28 March 2018
  • ‘कळ’फलक Kalphalak संजय पवार Sanjay Pawar देवेंद्र फडणवीस एकनाथ खडसे सुधीर मुनगंटीवार

‘बुँद से गयी वह हौदसे नहीं आती’ असा हिंदी मुहाँवरा आपण सर्व ऐकत-वाचत मोठे झालो. याच चालीवर ‘उंदरांनी (जी इभ्रत) नेली, ती गोळ्यांनी (खुलासा केल्यानं) परत येईल?’ हा सवाल आहे आपल्या फडणवीस सरकारला. मागच्या आठवड्यात मंत्रालयातल्या (खरे प्राणी, दर्जा, लिंग, शरीर असलेले) उंदीर प्रकरणानं सरकारला बिळात जायची वेळ आली होती. पण अर्थमंत्री मुनगंटीवारांनी ‘उंदीर नाही, उंदीर मारायच्या गोळ्या’ असा खुलासा केला आणि चर्चा उंदीर मारण्यावरून गोळ्या ठेवण्याकडे वळवली. पण दरम्यान सरकारचं व्हायचे ते हसं झालं. हे हसं व्हायला कारणीभूत ठरले स्वपक्षीय खडसे!

आपल्याकडे राजकारणात काहींना, त्यांच्या विशिष्ट कृती, विधानं, खेळी, आकांक्षा यांमुळे काही लेबलं चिकटतात ती कायमची! उदा. अडवाणी – ‘पीएम इन वेटिंग’. शरद पवार – ‘भावी पंतप्रधान’. तसे हल्ली खडसे म्हणजे नुस्ते खडसे किंवा नाथाभाऊ नाही, तर ‘नाराज खडसे!’

तर या नाराज खडसेंनी आपल्यावरील आरोपांची तड लावता लावता अचानक मंत्रालयात कसे व किती उंदीर मारले याचा तक्ताच ठेवला! तोही भर विधानसभेत! त्यामुळे मंत्रालयात एवढ्या मोठ्या प्रमाणावर उंदीर आहेत हे जनतेला कळलं. मारलेले एवढे तर जिवंत किती? हा तर आणखी मोठा प्रश्न.

यात आम्हाला आणखी एक प्रश्न पडला. तो असा की, मग मागे मंत्रालयात आग लागली, तेव्हा भाजून मृत्यू पावलेल्या उंदरांची आकडेवारी काही जाहीर नव्हती केली. सगळेच भाजून पार कोळसा आणि राख झाले? का बुडत्या म्हणजे आग लागलेल्या जहाजातून उड्या मारून पसार झाले? असो. तर नाराज खडसेंनी भोसरी भूखंड प्रकरणावरून थेट उंदीर चर्चेत आणल्यानं त्यांनी मुख्यमंत्रीरूपी मांजराच्या गळ्यात घंटा बांधायचा यशस्वी प्रयत्न केला.

पण नाराज खडसेंना हे सुख फार काळ उपभोगता आलं नाही. अर्थमंत्र्यासह वनमंत्री असलेले आणि वाघांचेही पुतळे करणारे आदरणीय सुधीरभाऊ मुनगंटीवारांनी वाघासारखी झेप घेत ‘वाघाची मावशी’ झालेल्या मुख्यमंत्र्यांच्या गळ्यातील गंटा ओढून अशी काही भिरकावून दिली की, ती थेट शिर्डीला बाबांच्या मंदिरात मंजूळ किणकिणत तिथंच लटकून राहिली. मुनगंटीवारांनी खुलासा केला की, ‘उंदीर नाही, उंदीर मारायच्या गोळ्या ठेवल्या होत्या. त्याचं ते बिल!’ नाराज खडसेंनी लावलेल्या मूषकाख्यानाला आपल्या अमृतवाणीनं तोंड देण्याचं काम मुख्यमंत्र्यांवर आलं होतं, ते सुधीरभाऊंनी परस्पर परतवलं. (एवढ्या गोळ्यांनी किती उंदीर मेले हा प्रश्न मात्र अनुत्तरितच राहिला!)

आमच्या गोडगोजिऱ्या मुख्यमंत्र्यांचं आणि मंत्रालयाचं काय वाकडं आहे कळत नाही! या मंत्रालयातच त्यांचा सहकारी पक्ष मंत्रिमंडळात जागा पकडून बसलाय, केबिन व बंगले घेतलेत, पण बोलतात सतत विरोधी! विखे पाटलांसारखे सख्खे विरोधी फिके वाटावेत एवढे हे मित्रपक्ष तिखट! हे कमी म्हणून गेल्या काही महिन्यांत लोकांनी मंत्रालय हा ‘सूसाईड पॉइंट’ बनवला. त्यातून बाहेर पडायला जाळ्या बसवल्या तर नाराज खडसेंनी हा उंदरांचा सापळा रचला.

याच नाराज खडसेंच्या कुणा व्यक्तिगत सहाय्यकांनी थेट मंत्रालयाच्या दारातच लाच मागितली का घेतली म्हणे! आता खायचेच होते पैसे, तर मंत्रालयाच्या बाहेर पडून एलआयसी इमारतीपाशी घ्यायची आणि म्हणायचं – ‘काम के पहले भी आौर काम होने के बाद भी!’ आता तर दिवसाआड कुणीतरी मंत्रालयावर मोर्चा आणतो. तोही लाखांचा. यात गिरीश महाजनांना आपली कामं सोडून शांतीदूताची कामं करावी लागतात. कमरेला पिस्तुल असणाऱ्या मंत्र्यावर काय ही नौबत!

शेवटी बहुधा मुख्यमंत्र्यांनी ‘हर रोग का अक्सीर इलाज वेदों में है’ हे प्रमाण मानून वेद वाचून घेतले असणार प्रवीण दराडेंकडून. त्यातूनच पावसाळी अधिवेशन नागपूरला हलवण्याची तयारी सुरू झालेली दिसते. तसंही मुख्यमंत्र्यांचा जीव ‘वर्षा’वर रमत नाही. ते थेट मोदी असते तर त्यांनी मंत्रालयच नागपूरला हलवलं असतं. नागपूरला किती का आणा मोर्चे. मुंबईत म्हणजे एकच आझाद मैदान. पुन्हा तिथंच सीएसटी, तिथंच महानगरपालिका व पोलिस मुख्यालय. आधीच मुंबईची गर्दी, वाहन कोंडी आणि चोवीस तास वृत्तवाहिन्या. नागपुरात कसं सगळं घर का मामला. आणि मुंबईत दिवसाआड मोर्चा आला तर काम कधी करायचं?
वरती मोदींचं ठीक आहे. त्यांनी डोळे वटारले की सगळे चिडीचूप. इथं राजकीय लढाईत दोन पावलं मागे घेऊन अंगणवाडी सेविकांवरचा मेस्मा मागे घेतला तर चि. पंकजा हिरमुसली. तिनं थेट फेसबुकवर ‘कल्पवृक्ष कन्येसाठी लावूनिया बाबा गेला’ हे भजनच लावलं. ते माहीमचं नेचर पार्क, धारावी प्रकल्पाच्या नकाशात नुस्तं दिसलं तर युवराज आदित्य ठाकरेंनी डरकाळी फोडली. खुलासा केला तर वृत्तवाहिन्या ‘यू टर्न’ म्हणत धावत राहिल्या.

आता हरिभाऊंवरचा अविश्वास ठराव! पण त्यात दांडपट्टा चालवला मुख्यमंत्र्यांनी आणि थेट विश्वासदर्शक ठराव मांडत नियम, अनियम यांची अशी काही ‘लडी’ लावली की विरोधक हिरमुसून थेट राज्यपालांकडे जाऊन चहा पिऊन आले! थोडक्यात मुख्यमंत्र्यांनी स्वत:च चोवीस तास बुलेटप्रूफ जाकीट घालून लहान-मोठ्या चकमकींपासून थेट मोठ्या लढायाही मीच लढणार हे ‘दिल्लीतंत्र’ ठेवलंय!

दरम्यानच्या काळात नारायण राणे नावाचा देवमासा मंत्रालयाच्या प्राणीसंग्रहालयात ठेवायचा का दिल्लीच्या महासागरात सोडायचा, यावरची मालिका सात-आठ महिने चालली. पण उंदीर प्रकरण उदभवायच्या तोंडावरच श्रेष्ठींनी हा देवमासा दिल्लीला नेला. म्हणजे आता रिंगणाबाहेरचे खडसे, चि. पंकजा आणि अधूनमधून विनोद तावडे सोडले तर पक्ष पातळीवर !सब का साथ, सब का साँस, अपने हाथ’ असं म्हणत मुख्यमंत्री आता शिवसेना, सामना, राऊत, उद्धवजी यांच्यासोबत ‘ओली-सुकी’ खेळत बसलेत.

आता ते संभाजी भिडे नामक दाढेत अडकलेली लवंग कशी काढायची आणि भिडे, लवंग व दाढ कशी वाचवायची, यावर सध्या जाकीटातल्या जाकिटात चुळबुळत आहेत. त्यात प्रकाश आंबेडकरांच्या ‘अल्टिमेटम’मुळे ते प्रकाशझोतात आणि आठवले गरीब कोकरू होऊन आमच्या कुशीत! थोपटावं की धोपटावं हेच कळत नाही मुख्यमंत्र्यांना. त्यांच्या पत्नीची गाणी गाजताहेत. मुख्यमंत्र्यांनी आपली ‘स्वगतं’ प्रसिद्ध केली तर ते हॅरी पॉटरला मागे टाकतील कदाचित!

तर अशा प्रकारे फडणवीस सरकारची उंदरावरून वरात निघाली. गेली तीन-साडेतीन वर्षं फडणवीसांनी चांगला किल्ला लढवला. पण ‘दिल्लीतंत्रा’नं घात केला. नुस्त्या घोषणा, जाहिराती आणि आकडेवारी यामुळे रंगीबेरंगी वातावरण तयार होत राहिलंय. मुख्यमंत्र्यांनी सपत्निक पूजेला बसावं, तशी केलेली जाहिरातही लोकांना पाहिली. त्यावर विनोद केले. विडंबनं रचली. परवा कुठल्या तरी कार्यक्रमात मुख्यमंत्री गायनवजा गुणगुणलेही. त्यामुळे लवकरच फडणवीस पती-पत्नीचा ‘भावसरगम’ किंवा ‘बोरकरांच्या कविता’ वाचनाचा कार्यक्रम अवतरला तरी आश्चर्य वाटू नये. अमृताजींना पुढच्या वर्षी पद्मश्रीही मिळेल मग!

थोडक्यात समाजातला प्रत्येक वर्ग आतून खदखदतोय (नवश्रीमंत मोदीभक्त वगळता). आता डॉक्टरही संपावर निघालेत. गृहखातं मुख्यमंत्र्यांकडे असून खुद्द उपराजधानी नागपुरातच क्राईम रेट वाढलाय. शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीचे पैसे कागडी घोड्यांमुळे अजूनही जमा नाहीत. विविध पायाभूत प्रकल्पासाठी शेतकऱ्यांच्या कसत्या जमिनी हिसकावून घेतल्या जाताहेत आणि दलालांची धन करत शेतकऱ्यांच्या अंगावर चिल्लर भिरकावली जातेय.

नवनवीन प्रकारचे अर्धा, पाव, एक टक्का कर लावून, जमेल तिथून पैसे जमवण्याच्या मागे सरकार लागलंय. ‘सब का साथ, सब का विकास’ऐवजी ‘पूंजीपंतीयोंको साथ, पूँजीपतीयोंका विकास’! ‘अच्छे दिन’ आलेत पण ते श्रीमंतांना अधिक श्रीमंत करणारे. महाराष्ट्राचे सोडा भारताचेही नाही, तर फक्त गुजरातचे ‘अच्छे दिन’ आलेत.

त्यात या उंदीर प्रकल्पानं हे सरकार नक्की काय करतंय हेच कळत नाहीए. मंत्रालयात जर इतके उंदीर असतील तर मग ‘स्वच्छ भारत’, ‘डिजिटल भारत’, ‘मिनिमम गव्हर्नन्स’, ‘पेपरलेस वर्किंग’ या सगळ्याचं काय झालं?

का आता उंदीर हे विद्येच्या देवतेचं वाहन असल्यानं आणि मंत्रालयात ते मोठ्या संख्येनं आढळल्यानं तिथं विद्येच्या देवतेचा अष्टौप्रहर वावर आहे असं समजायचं? आणि मंत्रालयाच्या तळमजल्यावर नंदीप्रमाणे उंदराची प्रतिष्ठापना करणार हे सरकार?

गोळ्या ठेवल्या पण उंदीर गेले नाहीत, यातून सरकारी कारभारावरची प्रतीकात्मकताच दिसली. योजना आहे, पण यशस्वीतेची पावती नाही आणि खर्च तर झालाय.

आता सरकारनं दिल्लीच्या जादूगाराला बासरी घेऊन बोलवावं. त्याच्या बासरी वादनानं उंदीर भारून बाहेर पडतील. ‘जादूगार, जादूगार’ म्हणून चित्कारतील, जादूगाराच्या चेहऱ्याचे मुखवटे लावतील, बासरीवर माना डोलावतील, तो नेईल तिकडे जातील…

फक्त एक सांगा त्यांना, बासरी वादनावर मंत्रमुग्ध होऊन मागे येणारी ही पलटण म्हणजे १२५ कोटी भारतीय नव्हे तर महाराष्ट्राच्या मंत्रालयातील सरकारी गोळ्यांनी न मरणारे, मेलेले उंदीर आहेत.

यातून तरी कारभारीची बिळं बुजली तर बुजली!

.............................................................................................................................................

लेखक संजय पवार प्रसिद्ध नाटककार व पटकथाकार आहेत.

writingwala@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

Post Comment

Sourabh suryawanshi

Thu , 29 March 2018

https://m.facebook.com/Saurajsinghpariharmitramandal/posts/1460232604234675 वरील लिंक वर शरद पवार यांच्यावर संजय पवार यांनी केलेल्या टीकेचे उत्तर आहे मूळ लेख मला सापडला नाही वरील उत्तर 27 जुलै 2014 लोकसत्ता मध्ये प्रकाशित झाले आहे.


Sourabh suryawanshi

Thu , 29 March 2018

संजय पवारांनी शरद पवार यांच्यावर लोकसत्ता मधून तिरखी रेघ सदरातून टीका केली आहे पण त्यावेळी भक्त ( दुसरा शब्द आठवला नाही ) बहुधा वर्तमानपत्र वाचत नसावेत...


anirudh shete

Thu , 29 March 2018

असच व्यंग विरोधकावर सुद्धा शब्दबद्ध केल तर संजय पवार हे पत्रकारितेतील संजय ठरतील अन्यथा हे पवारसाहेबानी सरकारची सुपारी देउन भुंकण्याकरिता सोडलेले संजय वाटत आहेत


Alka Gadgil

Wed , 28 March 2018

Lay bhari vyanga


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

जर नीत्शे, प्लेटो आणि आइन्स्टाइन यांच्या विचारांत, हेराक्लिट्स आणि पार्मेनीडीज यांच्या विचारांचे धागे सापडत असतील, तर हे दोघे आपल्याला वाटतात तेवढे क्रेझी नक्कीच नाहीत

हे जग कसे सतत बदलते आहे, हे हेराक्लिटस सांगतो आहे आणि या जगात बदल अजिबात होत नसतात, हे पार्मेनिडीज सिद्ध करतो आहे. आपण डोळ्यांवर अवलंबून राहण्यापेक्षा आपल्या बुद्धीवर अवलंबून राहिले पाहिजे, असे पार्मेनिडीजचे म्हणणे. इंद्रिये सत्याची प्रमाण असू शकत नाहीत. बुद्धी हीच सत्याचे प्रमाण असू शकते. यालाच बुद्धिप्रामाण्य म्हणतात. पार्मेनिडीज म्हणजे पराकोटीचा बुद्धिप्रामाण्यवाद! हेराक्लिटस क्रेझी वाटतो, पण.......