ब्रिटिशांना बीबीसीचा आणि अमेरिकेला सीएनएनचा अभिमान वाटतो, तसा अभिमान वाटण्याजोगी वृत्तवाहिनी भारतापाशी आहे?
पडघम - माध्यमनामा
करण थापर
  • ज्येष्ठ पत्रकार करण थापर माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या हस्ते जी. के. रेड्डी स्मृति-राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारताना
  • Tue , 27 March 2018
  • पडघम माध्यमनामा करण थापर Karan Thapar जी. के. रेड्डी स्मृति-राष्ट्रीय पुरस्कार G. K. Reddy Memorial National Award

ज्येष्ठ पत्रकार, लोकप्रिय टीव्ही मुलाखतकार करण थापर यांना नुकतंच जी. के. रेड्डी स्मृति-राष्ट्रीय पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. हा पुरस्कार सोहळा २२ मार्च २०१८ रोजी तीन मूर्ती भवन, दिल्ली इथं पार पडला. त्यावेळी थापर यांनी केलेल्या मूळ इंग्रजी भाषणाचा हा मराठी अनुवाद...

.............................................................................................................................................

जी. के. रेड्डी स्मृती-राष्ट्रीय पुरस्कार देऊन माझा बहुमान आणि कौतुक केल्याबद्दल मी सर्वांचे मनःपूर्वक आभार मानतो. आर्थर कॉनन डॉयल एकदा म्हणाले होते की, काम करायला मिळणं हेच मुळात त्याचं बहुमोल पारितोषिक असतं. अर्थात् केलेल्या कामाचं कौतुक होणं हीसुद्धा खूप आनंदाची गोष्ट असते, हे समजून घेण्यासाठी शेरलॉक होम्ससारख्या बुद्धिमान व्यक्तीची गरज नाही. खरोखरच, जी. के. रेड्डींसारख्या महान व्यक्तिमत्त्वासोबत आपली आठवण होणं आणि आपलंही नाव घेतलं जाणं यापेक्षा कुठल्या पत्रकाराचं अधिक मागणं असेल?

मी रेड्डींना व्यक्तिशः ओळखत नसलो तरी माझ्या व्यवसायातील अशी एकही व्यक्ती नाही, जिला रेड्डींचं नावच माहिती नाही. त्यांच्यासारखी भारतीय राजकारणाबद्दलची समज आणि उमज असलेले फारच कमी लोक होते आणि आजही परिस्थिती फार वेगळी नाही. जे उत्कृष्टतेचे मापदंड ते सहजगत्या मागे ठेवून गेले, तिथपर्यंत पोचण्यासाठी त्यांच्या मृत्यूनंतर तीन दशकं होऊन गेल्यावरही आम्हाला धडपड करावी लागते.

परंतु एक छोटं क्षेत्र असं आहे, जिथं रेड्डीजी आणि माझ्यात काहीतरी साम्य आहे असा दावा मी करू शकतो. इंग्लंडमध्ये विदेशी वार्ताहर म्हणून त्यांनी बरीच वर्षं काम केलं. या काळात लंडनहून येणारं त्यांचं साप्ताहिक सदर पुष्कळ मोठ्या संख्येनं वाचलं जायचं, त्याला दिलखुलास दादही मिळायची. मला असं कळलं की, त्यांना नंतर तो देश खूप आवडायला लागला आणि ब्रिटिश लोकही आवडायला लागले. मीही माझी करिअर त्याच शहरात सुरू केली आणि माझ्या आवडीच्या प्रदेशांत त्याला खास स्थान आहे.

आज सांगताना विरोधाभासाचं वाटलं तरी हे सत्य मोठं मनोरंजक आहे. पत्रकार म्हणून माझी कारकीर्द सुरू झाली त्यामागे एक दैवदत्त योगायोग होता. निदान चांगलं नशीब तरी होतंच. १९८० मध्ये ऑक्स्फर्डमध्ये पीएच.डी. प्रबंधाशी झटापट करत असताना मी सहा वृत्तपत्रांत नोकरीसाठी अर्ज केला. त्यातील चौघांनी उत्तर देण्याचे कष्टही घेतले नाहीत. एकानं सरळ ‘नाही’ म्हणून कळवलं तर सहाव्यानं म्हणजेच ‘द टाईम्स’नं त्यांचे उपसंपादक चार्ली डग्लस-होम याच्यासोबत मला लंचचं आमंत्रण दिलं.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

................................................................................................................................................................

चार्ली स्कॉटिश होता, त्यानं मला कॅलेडोनियन क्लबमध्ये जेवायला नेलं. मला अनोळखी अन्न खायला नको वाटतं असं सांगून मी ‘हॅगीज’ हा पदार्थ मागवला. ‘‘तुला नक्की हाच पदार्थ खायचाय का?’’ चार्लीनं मला विचारलं. मी काहीतरी वेडपटपणा केलाय हे जाणवूनही स्वतःचा मान राखण्यासाठी म्हणून मी ‘हो’ म्हटलं. परंतु ‘हॅगीज’ हा पदार्थ मेंढीच्या पोटाच्या आतल्या भागापासून बनवतात हे मला माहिती नव्हतं. त्याची चव तर मळमळ आणणारी होती.

मी तो पदार्थ कसाबसा गिळत असताना चार्लीनं पाहिलं आणि तो मला म्हणाला, “बरं झालं, चांगली अद्दल घडली तुला.’’ मग तो पदार्थ त्यानं मला संपूर्ण खायला लावला आणि तो खाऊन होईतो मला अखंड प्रश्न विचारत राहिला. माझी उत्तरं चालू असताना अचानक तो मध्येच बोलला, “काय बोलतोय ते कळत नसलं तरी तुला शब्द तर चांगले सुचताहेत रे. याचा अर्थ तू चांगला पत्रकार होऊ शकशील.’’

त्यानंतर चार्ली जे बोलला ती त्याच्याकडून क्वचितच घडणारी चूक असावी. कारण आम्ही क्लबातून बाहेर पडताना तो म्हणाला, “तू नॉर्मन सेंट जॉन स्टेवासच्या अगदी विरुद्ध केलंस की!’’ त्यावर मी लगेच उत्तरलो, “नाही, नाही. मी त्यांच्यासारखंच तर केलं.’’

सेंट जॉन स्टेवास हे श्रीमती थॅचर यांच्या मंत्रिमंडळातले एक उत्साही मंत्री होते. ऑक्स्फर्डला पीएच.डी.साठी जाण्यापूर्वी त्यांनी केंब्रिजमधून पहिली पदवी घेतली होती. मीही तसंच केलं होतं.

“चल, माझ्या कचेरीत जाऊन आपण तपासून पाहू. माझं चुकत असेल तर नोकरी तुझी.” चार्ली म्हणाला.

चार्लीचं म्हणणं खरं ठरलं असतं तर जीवनात पुढे मी काय झालो असतो याची मला कल्पनाही करता येत नाही.

माझं टीव्हीवरील जीवन त्यानंतर काही वर्षांनी सुरू झालं. परंतु पुन्हा एकदा, नशीबानं चांगली भूमिका बजावली. या वेळेस मुलाखत घेण्याबद्दल जे काही मी शिकलो, त्याचं श्रेय एका वेगळ्याच प्रकारच्या माणसाकडे जातं. जॉन बर्ट चार्लीपेक्षा वेगळे होते. ते ठाम विचारांचे अणि शांत स्वभावाचे स्ट्रक्चरल अॅनालिस्ट होते. ‘लंडन विकेंड टेलिव्हिजन’वर कार्यक्रमाचे संचालक या नात्यानं माझे वरिष्ठ होते. बीबीसीचे डायरेक्टर जनरल म्हणून त्यांची नेमणूक होऊन ते वैभवशाली दिवस नजीकच्याच भविष्यात पाहायला मिळणार होते.

जॉन नेहमी म्हणायचे, “कुठल्याही प्रश्नाची ‘हो, नाही, माहिती नाही आणि सांगणार नाही’ अशी फक्त चारच संभाव्य उत्तरं असतात. त्यामुळे ‘माहिती नाही आणि सांगणार नाही’ या उत्तरांचं रूपांतर एकतर ‘हो’ मध्ये करायचं किंवा ‘नाही’ मध्ये करायचं हेच मुलाखतकार म्हणून तुमचं कौशल्य असतं.’’ दुर्दैवानं हे बोलायला सोपं आहे, प्रत्यक्षात आणणं महाकठीण आहे.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

पुष्कळ लोक मला आक्रमक किंवा कधीकधी उद्धटही म्हणतात. त्यासाठी मी जॉननाच जबाबदार धरतो.

जॉन म्हणायचे, “एखादा प्रश्न विचारण्यासारखा असेल तर त्याचं उत्तर खात्रीनं मिळवलंच पाहिजे. त्यामुळे तुमचा पाहुणा विषय टाळत असेल, भलतीकडे वळवत असेल, असंबद्ध बोलू लागत असेल किंवा विषयच बदलत असेल तर मुलाखतकार म्हणून त्याला रूळावर आणणं हे तुमचं कर्तव्यच आहे. त्यात तुम्ही अपयशी ठरलात तर तो माणूस मुलाखतीतून सहीसलामत निसटतोच, परंतु तुमच्या प्रश्नाचं उत्तर ऐकण्याची वाट पाहणाऱ्या श्रोतृगणाचाही तो अपमान ठरतो.’’

म्हणूनच जॉन नेहमीच ठाम राहायला सांगायचे, परंतु त्याच वेळेस मुलाखतकारानं सदैव नम्रपणेच बोललं पाहिजे यावरही भर द्यायचे. मला वाटतं की, हा त्यांचा सल्ला मी कधीकधी विसरतो.

हे सगळं घडत होतं ते केवळ दुसऱ्या देशातच नव्हे, तर जवळजवळ दुसऱ्या जगातच घडत होतं असं म्हणायला हरकत नाही. जॉननी अशा वातावरणात काम केलं, जिथं चालू राजकीय घडामोडींवरील कार्यक्रमांना ‘रेटिंग’वर मोजलं जात नव्हतं. आशय हाच सदैव अधिक महत्त्वाचा मानला जात होता. परंतु आजच्या भारतात त्याच्या अगदी विरुद्ध केलं जातं. पुरेशा नजरा तुमच्या कार्यक्रमावर खिळत असतील तर तुम्ही अक्षरशः काय वाट्टेल ते खपवू शकता. इथला मीडिया असं बरऱ्यादा करतो, हे माझ्या परिचयाच्या बहुतेक लोकांनाही माहिती आहेच.

त्यामुळेच मला असाही प्रश्न पडतो की, आज जी. के. रेड्डी असते तर त्यांचं भारतीय पत्रकारितेबद्दल काय मत झालं असतं? त्यांनी त्यांच्या उत्तराधिकाऱ्यांना शाबासकी दिली असती की, तेही काही बोलायला कचरले असते? पत्रकारितेचं फूल तेजस्वी बनून उमलतंय असं त्यांना वाटलं असतं की, ते सुकू लागलंय, एवढंच नव्हे तर सडू लागलंय असं त्यांना वाटलं असतं?

६०, ७० आणि ८० च्या दशकांत ‘टाईम्स ऑफ इंडिया’ आणि ‘हिंदू’ ही वृत्तपत्रं वाचताना जी. के. रेड्डींचं लिखाण वाचलंच पाहिजे असा जणू दंडकच होता, परंतु त्यानंतरच्या काळात जे दोन मोठे बदल घडून आले, त्या बदलांत या प्रश्नांची उत्तरं दडली आहेत. 

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

................................................................................................................................................................

पहिला बदल म्हणजे एके काळी विश्वासार्हता, समतोल आणि अचूकता यासाठी जो मीडिया प्रसिद्ध होता, त्याची ती प्रतिष्ठा आता लयास गेली आहे. वृत्तपत्रात छापून आलं त्याचा अर्थ ते खरं असेल असा नाही असं आज आपण बरेचदा ऐकतो. समाजमाध्यमांत खोट्या बातम्यांचा सुळसुळाट झाला असेल, परंतु काय घडलं असेल हे समजून घेण्यासाठी लोक ट्विटर किंवा व्हॉटसअॅपवर अवलंबून राहतात यातून हेच दिसून येतं की, आजच्या घडीला एखादं वृत्तपत्र किंवा वृत्तवाहिनी आपल्याला सत्य किंवा संपूर्ण कहाणी सांगेल यावर लोकांचा आता विश्वास नाही.

मीडिया एकेकाळी वस्तुनिष्ठ आणि न्यायी होता असाही काही लोकांचा दावा आहे. मात्र आज या गोष्टीवर फारच कमी लोक विश्वास ठेवतात. वस्तुस्थिती दोनदा तपासून पाहिल्याशिवाय, संबंधित व्यक्तीला उत्तर देण्याचा हक्क न देताच आणि बऱ्याचदा संपूर्ण कहाणी माहिती नसतानाच मीडिया व्यक्तींचा न्याय करतो आणि त्यांना दोषी ठरवतो. कधीकधी तो बरोबर असतो हे मी नाकारत नाही, परंतु जेव्हा जेव्हा चुकीचा असतो, तेव्हा तेव्हा तो एखाद्या निरपराधी व्यक्तीचा धिक्कार करतो आणि आपल्याकडून निर्माण केलेली त्याची पूर्वग्रहदूषित प्रतिमा दुरुस्त करण्याची त्याला संधीही देत नाही.

‘अच्छे दिन’ या आश्वासनाच्या सत्यतेबद्दल तुम्ही काय वाटेल ते म्हणा, परंतु आजच्या घडीला भारतीय मीडियासाठी ‘अच्छे दिन’ नाहीत. तो आता नेभळट, बिनकण्याचा बनला आहे असं ठाम मत माझ्या माहितीच्या बऱ्याच लोकांचंही आहे. एके काळी ‘आम्ही सरकारला आव्हान देतो, त्यांची गैरकृत्यं चव्हाट्यावर आणतो,’ अशा बढाया मारणारी वृत्तपत्रं आणि वृत्तवाहिन्या आज तसं करायला कचरू लागली आहेत. त्याहूनही वाईट म्हणजे सरकारच्या विरोधकांच्या आणि टीकाकारांच्या विरोधात बोलताना मात्र आमचे आवाज चढतात– विशेषतः पंतप्रधानांना किंवा लष्करप्रमुखांना प्रश्न विचारण्याचं धारिष्ट्य करणाऱ्यांविरुद्ध तर ते फारच चढतात. म्हणजे सत्तेतील लोकांवर ‘वॉचडॉग’ बनून गुरकावण्याऐवजी आजचा मीडिया चुकूनमाकून राखणदार कुत्र्यासारखा वागू लागला आहे किंवा मग मालकाला आपण आवडावं अशी इच्छा धरणाऱ्या पाळीव कुत्र्यासारखा वागू लागला आहे.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

या सगळ्यातील दुःखद भाग असा की, ज्या इलेक्ट्रॉनिक मीडियाचा मीही एक भाग आहे, तोच या सगळ्यास जबाबदार आहे अशी समजूत लोकांची झाली आहे. पंतप्रधानांच्या मुलाखती घेताना आम्ही त्यांना आव्हान द्यायला, कधीकधी तर त्यांना गंभीरपणे प्रश्न विचारायलाही नकार देतो, पॅनेल डिस्कशन्सच्या वेळेस आशयाला अनुसरून प्रकाश टाकण्याऐवजी आवाज आणि गरमागरमी यांनाच प्राधान्य दिलं जातं किंवा आपल्याला इच्छित प्रतिसाद मिळवण्यासाठी पडद्यावर बाष्कळ हॅशटॅग आम्ही दाखवतो. त्या सगळ्याचा परिणाम असा होतो की, आम्ही सरकारला सत्य सांगण्यात अपयशी ठरतोच, परंतु आमच्या प्रेक्षकांनाही असं वागवतो जणू ते आमच्या युक्त्याप्रयुक्त्या न ओळखू शकणारे, अधिक चांगल्याची मागणी न करणारे निर्बुद्ध पशूच आहेत.

आज आम्ही अशा पातळीवर येऊन पोचलो आहोत, जिथं भारताचे मुख्य न्यायमूर्ती भर न्यायालयात इलेक्ट्रॉनिक मीडियाची निर्भर्त्सना करतात आणि त्याची बाजू घेण्याऐवजी वृत्तपत्रांतील संपादकीयांत न्यायमूर्तींचं म्हणणं योग्य आहे असं म्हटलं जातं.

सोमवारी ‘बिझिनेस स्टॅंडर्ड’मध्ये पुढील म्हणणं मांडलं गेलं : “इलेक्ट्रॉनिक मीडियानं वस्तुस्थिती तपासणं सोडून दिलं आहे, आता तर ते न्यायीपणाचं सोंगही करेनासे झाले आहेत. त्यामुळे केवळ अभिव्यक्तिस्वातंत्र्यच नव्हे तर लोकशाही सुरळीत चालण्यावरही संकट ओढवलं आहे.’’

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

................................................................................................................................................................

अर्थात्, आज आपल्याला माहिती असलेला टीव्ही जी. के. रेड्डींच्या काळात अस्तित्वात नव्हता. त्यांच्या काळातलं दूरदर्शन हे सत्ताधीशांच्या हातातलं खेळणं होतं आणि त्याची यथार्थ निंदानालस्ती होतही होती. आज आपल्याकडे पाचशेपेक्षा अधिक वृत्तवाहिन्या आहेत, हा आकडा पाहूनच रेड्डी थक्क झाले असते. परंतु आज त्यांनी एक सोपा प्रश्न विचारला असता, तरी त्याचं उत्तर किती जणांना देता आलं असतं देव जाणे! तो प्रश्न असा - ‘ब्रिटिशांना बीबीसीचा आणि अमेरिकेला सीएनएनचा जसा सार्थ अभिमान वाटतो, तसा खराखुरा अभिमान जिचा वाटेल अशी वृत्तवाहिनी भारतापाशी आहे का?’ या प्रश्नाचं त्यांना काय उत्तर मिळेल याची मला तरी काहीच खात्री नाही. प्रामाणिकपणे सांगायचं तर तुमचं उत्तर काय असेल त्याची मला भीतीच वाटते आहे.

परंतु माझं उत्तर काय आहे ते सांगून मला या भाषणाचा शेवट करू दे. काही वाहिन्यांचा मला काही काळासाठी अभिमान वाटतो, काही कार्यक्रमांचा बहुतेक वेळी अभिमान वाटतो. परंतु अशाही काही वाहिन्या आणि कार्यक्रम आहेत, ज्यांच्यामुळे मला सदैव लाज वाटते. काही वृत्तपत्रांची मी हातचं न राखता तारीफ करू शकतो, परंतु अशी एकही वृत्तवाहिनी नाही जिच्याबद्दल मी असं म्हणू शकतो. तसं म्हणायला गेलोच तर आपण थाप मारतोय म्हणून माझीच जीभ चावली जाईल.

परंतु परिस्थिती वाटते तेवढी निराशादायक नाही. शेवटी काय, मीडिया दररोज बदलत असतो. वृत्तपत्राच्या प्रत्येक नव्या आवृत्तीगणिक आणि वृत्तवाहिनीच्या प्रत्येक नव्या बातमीपत्रागणिक नव्यानं सुरुवात करण्याची संधी असते. नवा वार्ताहर, नेहमीपेक्षा वेगळा अँकर, आधीपेक्षा बरा संपादक आणि अन्य प्रत्येक बाब खूप वेगानं बदलू शकते. ‘एका वाईट अनुभवामुळे खचून न जाता अधिक चांगल्या उद्याची उमेद धरता येते’ ही म्हण दुसऱ्या कुठल्या व्यवसायापेक्षा पत्रकारितेलाच अधिक लागू पडत असेल.

बंधुभगिनींनो, तुम्ही शांतपणे माझं बोलणं ऐकून घेतलंत म्हणून मी आभारी आहे. जी. के. रेड्डी स्मृती पारितोषिक समितीच्या सभासदांनी माझे विचार मांडण्याची संधी मला दिली म्हणून त्यांचेही मनापासून आभार.

.............................................................................................................................................

मूळ इंग्रजी भाषणाचा मराठी अनुवाद - सविता दामले

savitadamle@rediffmail.com

.............................................................................................................................................

हा मूळ इंग्रजी लेख https://theprint.in या पोर्टलवर २३ मार्च २०१८ रोजी प्रसिद्ध झाला आहे. त्याची लिंक -

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

Post Comment

vishal pawar

Tue , 27 March 2018

एन.डी.टी.व्ही वृत्तवाहिनी.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सध्याच्या काळामध्ये तरुण पत्रकार लढायला तयार आहेत, ही माझ्या दृष्टीने अत्यंत आशादायक गोष्ट आहे. मला फक्त ह्यात नागरिकांचं ‘कॉन्ट्रीब्युशन’ फारसं दिसत नाही : निखिल वागळे

‘पर्यायी मीडिया’चं काम ‘मेनस्ट्रीम’च्या तुलनेमध्ये कमी पोहोचणारं असलं तरी खूप महत्त्वाचं आहे. आणीबाणीमध्ये ‘साधना’सारख्या छोट्या साप्ताहिकाने जे काम केलं, तेच इतिहासात नोंदलं गेलं. तेच नेमकं ह्यांच्या बाबतीत होणार आहे. जेव्हा सत्ताधाऱ्यांना ‘तू नागडा आहेस’ असं सांगायला समाजातलं कोणीही तयार नव्हतं, तेव्हा या किंवा कमी रिसोर्सेस असलेल्या लोकांनी हे काम केलं. माझ्या मते हे खूप ऐतिहासिक काम आहे.......

‘काॅन्टिट्यूशनल कंडक्ट ग्रूप’चे केंद्रीय निवडणूक आयुक्तांना जाहीर पत्र : जोवर सर्वोच्च न्यायालयाने मागितलेली माहिती एसबीआय देत नाही, तोपर्यंत लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक प्रकाशित करू नये

आम्ही आपल्या लक्षात आणून देऊ इच्छितो की, सध्याच्या लोकसभेचा कार्यकाळ १६ जून २०२४पर्यंत आहे. निवडणूक वेळेत होण्यासाठी आयोगाने २७ मार्च किंवा त्यापूर्वीच वेळापत्रक जाहीर करावे. एसबीआयने निवडणुकीच्या घोषणेच्या आधीच ‘इलेक्टोरल बाँड्स’चा डेटा द्यावा. संविधानाच्या कलम ३२४नुसार आपल्या अधिकारांचा वापर करून केंद्रीय निवडणूक आयोगाला आपली प्रतिष्ठा आणि त्याची स्वायत्तता परत मिळवण्याची ही संधी आहे.......