“हिच्याशी” लग्न करण्यासाठी “----”ला टॅग करा
पडघम - सांस्कृतिक
अनुज घाणेकर
  • प्रातिनिधिक छायाचित्रं
  • Sat , 24 March 2018
  • पडघम सांस्कृतिक सोशल मीडिया Social media टॅग युवर फ्रेंडस Tag Your Friends

सोशल मीडियावर फिरताना तुम्ही अशा प्रकारची एखादी पोस्ट वाचली आहे? मग हा लेख तुमच्यासाठी आहे. आणि अशी एखादी पोस्ट वाचून हसून तुम्ही त्यावर प्रतिक्रियाही दिली आहे? मग तर हा लेख नक्कीच तुमच्यासाठीच आहे.

गेले काही दिवस अशा अनेक पोस्टस तुम्ही बघितल्या असतील, जिथं रंगामुळे, शरीराच्या आकारामुळे, चेहऱ्यामुळे, हावभावांमुळे समाजाच्या ‘सुंदर आणि आखीव-रेखीव’ संकल्पनांमध्ये न बसणाऱ्या व्यक्तींवरून अशा प्रकारे विनोदनिर्मिती होत आहे. या पोस्टस एक समाज म्हणून आपली सामूहिक दृष्टी अधोरेखित करतात – काळा रंग सुंदर नाही, शरीरानं लठ्ठ असणं सुंदर नाही, बुटकं असणं सुंदर नाही, स्त्रीची शारीरिक वैशिष्ट्यं असणारा पुरुष किंवा पुरुषाची शारीरिक वैशिष्ट्यं असणारी स्त्री सुंदर नाही इत्यादी इत्यादी.

काय ‘नॉर्मल’ आहे, काय ‘सुंदर’ आहे याच्या व्याख्या समाजानं ठरवल्या. त्या व्याख्येच्या बाहेरचं काही जरी डोळ्यांना दिसलं तरी आपण कावरेबावरे होतो, क्वचित घाबरतो, आपल्या कळपात असू तर हसतो आणि मजा उडवतो. तुमच्या मनातली ‘सुंदर म्हणजे कोण’ याची व्याख्या विचारली तर आपल्या समाजातले बहुसंख्य लोक उत्तर देतील - गोरी व्यक्ती, नाकी-डोळी नीटस व्यक्ती, ‘योग्य’ वजन आणि उंची असणारी व्यक्ती, कसलंही व्यंग नसलेली व्यक्ती इत्यादी.

‘वर किंवा वधू पाहिजे’ या वर्तमानपत्रातल्या सदरातल्या अपेक्षा कधी वाचल्या आहेत? सगळ्यांनाच आपले जोडीदार नाकी डोळी नीटस, तथाकथित शरीरानं सुंदर हवे असतात. ही व्याख्या पिढ्यानपिढ्या समाजात जाणीवपूर्वक बिंबवली जाते आणि त्यासाठी कला, चित्रपट, गीत या माध्यमांचा फार परिणामकारकरीत्या वापर केला जातो. उदाहरणार्थ, ‘गोरी गोरी पान, फुलासारखी छान, दादा मला एक वाहिनी आण.’ शहरी मध्यमवर्गीय घरामध्ये सामान्यपणे ऐकू येणारं हे बालगीत आठवतं? म्हटलं तर साधंच पण लहानपणीच जाणीवपूर्वक एक व्याख्या रुजवणारं. साहजिकच वर्णानं काळ्या-सावळ्या व्यक्ती, जास्त उंच, बुटक्या, लठ्ठ, लुकड्या व्यक्ती, शारीरिक-मानसिक व्यंग असलेल्या व्यक्ती म्हणजे ‘परिपूर्ण किंवा सुंदर’ न दिसणाऱ्या व्यक्ती समाज एक प्रकारे हद्दपारच करून टाकतो.

वर वर पाहता साधी दिसणारी ही गोष्ट अनेक प्रकारच्या प्रश्नांना जन्म देते. शाळेत मुलांनी एकमेकांना चिडवणं आणि निर्माण होणारा आयुष्यभराचा न्यूनगंड असो, किंवा लग्नाच्या बाजारातले मानापमान असो, कामाच्या ठिकाणी होणारा उपहास असो, किंवा नैराश्य आणि अनेक मानसिक आजारांची निर्मिती असो. एक समाज म्हणून आपण किती प्रगल्भ आहोत, हे तर यावरून ठरतं. पण आपल्या-आपल्यात असे भेद राहिले की, संवेदनशीलता कमी झाली की, ज्यांना स्वार्थ साधायचाय त्यांचं अर्थात फावतं.

मुळातच धर्म, जाती, लिंग इत्यादींनी दुभंगलेल्या समाजात भेदाभेदाची आणखी भर पडते. हे व्यक्ती म्हणून ना आपल्या फायद्याचं आहे, ना एक समाज म्हणून.

समाज म्हणून फक्त आर्थिक प्रगती करणं किंवा तंत्रज्ञान विकसित करणंच गरजेचं नाही, तर समाजाची मूल्यं काय आहेत, मानसिक आरोग्य कसं आहे, समाजात निर्माण होणाऱ्या कला वा साहित्य सर्वसमावेशक आहे का, आपल्या भावी पिढीला आपण काय देतो आहे, हे सगळंच महत्त्वाचं ठरतं.

तर मग भेदाभेदांच्या या प्रश्नावर उपाय काय?

व्यक्ती पातळीवर काही गोष्टी आपण निश्चितच करू शकतो –

१.) समाज माध्यमांचा थोडा विचारपूर्वक वापर आपण करू शकतो

२.) आपल्याकडून असा उपहास कुठे होतो आहे त्याची नोंद घेऊ शकतो

३.) जर कुठे होत असेल तर लक्ष्य केलं जाणाऱ्या व्यक्तीच्या सोबत आपण उभं राहू शकतो, तिला भावनिक आधार देऊ शकतो.

४.) अशा प्रकारच्या भेदांच्या विरोधातील साहित्याला, कलानिर्मितीला जाणीवपूर्वक प्रोत्साहन देऊ शकतो

५.) आपल्या पुढच्या पिढीपर्यंत मानसिकता कशी पोहोचणार नाही, याची सर्वतोपरी काळजी घेऊ शकतो.

 इथून सुरुवात केली तर एक समाज म्हणून कदाचित आपण काही पायऱ्या प्रगतीच्या दिशेनं चढू.

.............................................................................................................................................

लेखक अनुज घाणेकर मानवशास्त्रज्ञ व समुपदेशक आहेत.

anujghanekar2@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

Post Comment

SACHIN PATIL

Sat , 31 March 2018

मस्त लेख


SACHIN PATIL

Sat , 31 March 2018


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

जर्मनीत २० हजार हत्तींचा कळप सोडण्याची धमकी एका देशाने दिली आहे, ही ‘हेडलाईन’ जगभरच्या प्रसारमाध्यमांमध्ये गाजतेय सध्या…

अफ्रिका खंडातील बोत्सवाना हा मुळात गरीब देश आहे. त्यातच एवढे हत्ती म्हणजे दुष्काळात तेरावा महिना. शेतांमध्ये येऊन हत्ती मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान करत असल्याने शेतकरी वैतागले आहेत. याची दखल बोत्सवानाचे अध्यक्ष मोक्ग्वेत्सी मेस्सी यांनी घेतली आहे. त्यामुळेच त्यांनी संतापून एक मोठी घोषणा केली आहे. ती म्हणजे तब्बल २० हजार हत्तींचा कळप थेट जर्मनीमध्ये पाठवण्याची. अनेक माध्यमांमध्ये ही ‘हेडलाईन’ गाजते आहे.......

महाराष्ट्राच्या राजकारणाचा हा ‘खेळखंडोबा’ असाच चालू राहू द्यायचा की, त्यावर ‘अक्सिर इलाज’ करायचा, याचा निर्णय घेण्याची एकमेव ‘निर्णायक’ वेळ आलेली आहे…

जनतेला आश्वासनांच्या, ‘फेक न्यूज’च्या आणि प्रस्थापित मीडिया व सोशल मीडियाद्वारे भ्रमित करूनही सत्ता मिळवता येते, राखता येते, हे गेल्या दहा वर्षांत भाजपने दाखवून दिले आहे. पूर्वी सत्ता राजकीय नेत्यांना भ्रष्ट करते, असे म्हटले जायचे, हल्ली सत्ता भ्रष्ट राजकीय नेत्यांना ‘अभय’ वरदान देण्याचा आणि एकाधिकारशाही प्रवृत्तीच्या राजकारण्यांना ‘सर्वशक्तिमान’ होण्याचा ‘सोपान’ ठरू लागली आहे.......