साहित्य हे सांस्कृतिक हस्तक्षेपाचं हत्यार
पडघम - साहित्यिक
महेंद्र कदम
  • प्रातिनिधिक चित्र
  • Mon , 19 March 2018
  • पडघम साहित्यिक युवा साहित्य संमेलन Yuva Sahitya Sanmelan महेंद्र कदम Mahendra Kadam

रुकडी (कोल्हापूर) इथं गतवर्षी भरलेल्या युवा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रा. महेंद्र कदम यांची निवड झाली होती. त्यावेळी त्यांनी केलेल्या भाषणाचं हे संस्कारित व संपादित लेखरूप.

.............................................................................................................................................

मित्रहो,

जागतिक साहित्य संमेलनाबरोबर छोट्या-मोठ्या गावांत आणि महाविद्यालयांतही साहित्य संमेलनं होत आहेत, ही मोठी आनंदाची आणि महत्त्वाची गोष्ट आहे. साहित्याकडे आणि साहित्यिकांकडे विद्यार्थ्यांना घेऊन जाण्याऐवजी थेट साहित्यच विद्यार्थ्यांपर्यंत घेऊन येणं, ही स्वागतार्ह आणि परिणामकारक गोष्ट आहे. खेड्यापाड्यात शिकणाऱ्या आणि नव्यानं लिहू पाहणाऱ्या मुलांसाठी तर हा उपक्रम नक्कीच महत्त्वाचा आहे. म्हणून मी रुकडी (कोल्हापूर) महाविद्यालयाचे अभिनंदन करतो.

राजर्षी शाहू महाराजांच्या राजकीय-सामाजिक वारशापासून सिनेमा, शेती, संगीत, शिक्षण आदी अनेक घटकांच्या पदस्पदर्शानं पूणित झालेली कोल्हापूर आणि परिसर ही पावन भूमी आहे. एका अर्थानं या देशात सर्वांत आधी लोकशाहीची फायदे अनुभवलेली ही भूमी आहे. त्या अर्थानं तुमच्या लोकशाहीचं वय अधिक आहे. त्यामुळे त्याचाही आपण विचार करायला हवा. पण हीच भूमी कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येनं रक्तरंजित होऊन भ्रष्टही होऊ लागली आहे. त्यामुळे आपली जबाबदारी अधिक वाढली आहे.

मित्रांनो, मी आपणांसमोर फार गंभीर अशी सैद्धांतिक मांडणी करणार नाही. आपल्याशी संवाद साधणार आहे. हा संवाद साधताना मला पडलेले प्रश्न तुमच्याशी शेअर करणार आहे. ते करण्यापूर्वी एक अत्यंत महत्त्वाचं विधान करून मी पुढे तो. ते विधान असं :

साहित्य हे सांस्कृतिक हस्तक्षेपाचं महत्त्वाचं हत्यार आहे. याचं पक्कं भान असल्यामुळेच प्रतिगामी शक्तींनी संत तुकाराम – म. गांधी यांच्यापासून कॉ. गोविंद पानसरे, नरेंद्र दाभोलकर, कलबुर्गी यांच्यापर्यंत अनेकांच्या हत्या करून विचार संपवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे साहित्य हे विद्रोहाचं आणि परिवर्तनाचं महत्त्वाचं हत्यार आहे. त्याचं भान आजच्या युवकांनी बाळगणं गरजेचं असताना मी तुम्हाला डॉ. आ. ह. साळुंखे सरांच्या एका उदाहरणाची आठवण करून देतो. ते नेहमी म्हणतात, ‘एखादं झाड तोडल्यावर जमिनीत उरलेल्या बुंध्याला अनेक नवे धुमारे फुटतात आणि ते झाड पुन्हा शेकडो फांद्यांनी बहरत जातं.’

विचारांचंही असंच आहे. एखादा विचार मारायचा प्रयत्न केला की, तो विचार पुढे घेऊन जाणारे हजारो हात पुढे येतात. म्हणूनच आजही चार्वाक-बुद्धापासून पानसरेंपर्यंतचे विचार कुणाला पुसता आले नाहीत. उलट ते वेगानं वाढत आहेत. मला वाटतं, आपला हा खरा वैचारिक वारसा आहे. तो आपण वाचनाच्या आणि लेखनाच्या रूपानं पुढं घेऊन गेलं पाहिजे.

मित्रांनो, आपण ज्या पर्यावरणात राहतो, ते धड ना शहरी आहे, ना ग्रामीण आहे. त्यामुळे आपण धड पारंपरिक नाही आणि पूर्ण आधुनिकही होत नाही. मागचं सगळं सुटत नाही आणि पुढचं सगळं पकडून पुढं जाता येत नाही, अशा एका मोठ्या सांस्कृतिक पेचात आपण जगत आहोत. आणि ही आपली खरी गोची आहे. म्हटलं तर सगळ्या सोयी आपणाला उपलब्ध आहेत. एका क्लिकसरशी सगळे जग आपल्याला उपलब्ध आहे आणि त्याचवेळी आपल्यापुढे दोन वेळच्या जेवणाचाही प्रश्न गंभीर आहे. एकीकडं हे सगळं भौतिक जग आपल्याला हाकारतं आहे, दुसरीकडे पोटातल्या भूकेचे कावळेही ओरडत आहेत. ते कावळे मारून आपणाला त्या नव्या जगाचा हात धरायचा आहे. पण तो धरता येत नाही, हे खरं आपलं दु:ख आहे. सभोवती इंग्रजी शाळांचं पेव फुटलं आहे, पण हवं ते शिक्षण आपणाला मिळत नाही. घेतलंच शिक्षण तर नोकरी मिळत नाही. व्यवसायासाठी भांडवल उपलब्ध नाही. पिकवली शेती तर मालाला भाव मिळत नाही. अशा सगळ्या परिस्थितीत आपण कसं उभं राहावं आणि उभं राहून टिकाव कसा लागावा, हाच आजचा तुमच्या पुढचा महत्त्वाचा प्रश्न आहे. अनेक तरुणांना लग्नासाठी मुली मिळत नाहीत. उत्तम शेती असूनही मुलीचा बाप आपली मुलगी स्वत: शेतकरी असूनही तो शेतकऱ्याच्या मुलाला द्यायला तयार नाही.

असं सगळं त्रांगडं होऊन बसलेलं असतानाच एकीकडे गावोगाव जातीयवाद फणा काढून तयार आहे आणि दुसरीकडे समूहाचं भान बाळगणारी शेतीसंस्कृती मोकळा श्वास आपणाला घेऊ देत नाही. तर तिसरीकडे हे तथाकथित शहर आपणांस त्याच्या पोटात सामावून घ्यायला तयार नाही. तर चौथीकडं राजकारण-समाजकारणाच्या रूपानं आपलीच मंडळी आपलं शोषण करण्यात आघाडीवर आहेत.

अशा परिस्थितीत अस्तित्वाचा लढा उभा करणं कठीण होत आहे. म्हणजे आपली अवस्था ‘आई जेवू घालीना आणि बाप भीक मागू देईना’ अशी झाली आहे. त्यामुळे आपण न्यायासाठी कुणापुढे हात पसरायचा हा प्रश्न निर्माण झाला आहे. मराठीत एक म्हण आहे, ‘राजानं मारलं आणि पावसानं झोडपलं तर तक्रार कुणाकडं करायची?’ तशी आपली अवस्था झाली आहे. आपल्या सभोवती असे अनेक राजे तयार झाले आहेत, त्यांच्याविरुद्ध आपणाला आज आवाज उठवता येत नाही.

हे सगळं कमी म्हणून की काय, जागतिकीकरण नावाच्या राक्षसानं आपणाला पूर्ण गिळंकृत केलं आहे. त्यातून आता आपली सुटका नाही. जागतिकीकरणाच्या नावाखाली भौतिक सुविधा देऊन माणसांमधलं समूहभान आणि सहानुभाव संपुष्टात आणला जात आहे. नेमका याच गोष्टीचा फायदा घेऊन प्रतिगामी शक्तींनी आपलं डोकं वर काढलं आहे. राष्ट्रवाद, स्वदेश वगैरेच्या गोष्टी बोलून आपल्या मनात संभ्रम निर्माण करून वैचारिक गोंधळ निर्माण करण्यात ही मंडळी माहीर आहेत. आणि दुर्दैवानं त्यात त्यांना यशही येऊ लागलं आहे.

मित्रांनो, एकूणच ही सगळी स्थिती युवापिढीसाठी आणि उद्याच्या भविष्यासाठी फार धोकादायक आहे. हे सुचिन्ह नाही. पण आपलं दुर्दैव असं की, आपणाला या सगळ्याचं काहीच भान नाही. ना आपण फार चांगलं वाचत, ना चांगलं (न वाचल्यामुळं) लिहीत. एक गोष्ट मात्र चांगली झाली, संविधानात्मक लोकशाहीनं खेड्यातली सरंजामी अर्थव्यवस्था मोडीत काढली. पण ती मोडीत निघताना संशयाचं मूल्य अग्रभागी आलं आणि धर्म जाऊन जात पुढे आली. नवी बंधुता काही आकारली नाही. त्यामुळे गावाकडचा माणूसही एकाकी पडू लागला आहे. नेमका याचा फायदा राजकारणी मंडळींनी उठवला आहे. जातीय ध्रुवीकरण करून ते आपली पोळी भाजून घेत आहेत. याचंही आपणाला भान नाही. या सगळ्या संभ्रमानंतर आजचं साहित्यही फार काही बोलताना दिसत नाही.

हे कमी की काय, पर्यावरणाचा ऱ्हास, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, वाढता दुष्काळ, गुंडगिरी, धाबासंस्कृती जोमानं फोफावत आहे. १९९५ ला आम्ही कोल्हापुरात एम.ए. करत होतो. तेव्हा जुलै-ऑगस्ट दरम्यान महिना-महिना सूर्यदर्शन व्हायचं नाही. सतत पाऊस असायचा. कोल्हापूर-सांगली सोडलं की, सांगोल्यापर्यंत रस्त्यावर हॉटेल दिसायचं नाही. वाहनांची गर्दी नव्हती. प्रचंड रिकामे माळ दिसायचे. दहा-पंधरा वर्षांतच काय झालंय पहा. पाऊस गायब झाला. माळ वस्त्यांनी झाकले गेले. रोडलगत धाब्यांचं आणि डिजिटल फ्लेक्सचं जग तयार झालं. भविष्यात आपल्याला दोन पावलांएवढी जमीन तरी मिळेल की नाही, अशी शंका आहे. कारण तीन पावलांची जमीन मागून बळीराजाला पाताळात ढकलणारे वामन आता रोज नव्यानं जन्मत आहेत. असं एक सगळं मजेशीर, संभ्रमित जग आपल्या सभोवती सतत घिरट्या घालत आहे.

मित्रांनो, असं हे सगळं नकारार्थी चित्र तुमच्यापुढं मांडून मी तुम्हाला निराशेच्या गर्तेत ढकलणार नाही. पण हे वास्तव आहे, हे आपण विसरता कामा नये. अशा नकाराचा, निराशा आणि संभ्रमाचा काळ जगण्याला बळ पुरवण्यात आपल्या अस्तित्वाचा अर्थ शोधण्याला आणि लेखनाला फार पोषक असतो. मी कोणत्या जातीत आणि कोणाच्या पोटी जन्म घ्यायचा, हे माझ्या हातात नसलं तरी मी माझ्या जन्माचं काय करायचं, हे मात्र नक्कीच हातात असतं. हे आपल्याला कळालं की, मग सगळं जग सुंदर दिसायला लागतं. हे तुकारामाला कळालं म्हणून त्यानं शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊन टाळ-वीणा हाती घेऊन विद्रोहाचं रणशिंग फुंकून आयुष्य सुंदर केलं. शिवरायांनी फाटक्या मावळ्यांमध्ये विश्वास पेरून तलवार हाती देऊन स्वराज्य निर्माण केलं. आपल्या अंगावरचं कपडे कमी करून म. गांधींनी देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं. तर रस्त्यावरच्या लाईट खाली अभ्यास करून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधान दिलं. म. फुल्यांनी शिक्षणाचं महत्त्व सांगितलं.

ही फार मोठ्या महापुरुषांची उदाहरणं झाली. पण तुमच्या सभोवती असणारी सगळी शिक्षक मंडळी अत्यंत अभावग्रस्तेतून पुढे आलेली आहेत. मित्रांनो, एक लक्षात घ्या. असा काळ नेहमीच असतो. फक्त आज तो अधिक संभ्रमाचा आहे. पण तरीही इथं आपण मोकळा श्वास घेऊ शकतो. आज मी तुमच्याशी माझ्या मनातलं बोलू शकतो. नाही बोलता आलं तर मतपेटीतून बोलतो. हे सगळं छानच आहे. मला गाणं म्हणता येतं. शीवीही देता येते. जगभर भटकंती करता येते. आज तरी यावर बंधनं नाहीत. तेव्हा या सगळ्या संभ्रमात आपणाला स्वत:पुरता उजेड करता आला तरी खूप झालं. एक पणती पेटवू या. आपल्या पावलांपुरता उजेड देणारी पणती आपल्या सोबत येणाऱ्या पावलांना उजेड दिल्याशिवाय राहत नाही.

तुम्ही तरुण आहात. सगळं नाकारण्याचं हे तुमचं वय आहे. लक्षात घ्या, न आवडणारं सगळं नाकारा. गौतम बुद्ध म्हणतात तसं अत्त दीप भव, म्हणजे स्वयंप्रकाशित व्हा. पण हा प्रकाश कोणता असावा, हे ठरवण्याचा हा काळ आहे. नदीच्या प्रवाहाबरोबर लाकडी ओंडके आणि मृत जनावरंही वाहत जातात. आपण माणूस आहोत. प्रवाहाच्या विरोधात पोहायला शिकलं पाहिजे. त्यासाठी आपल्यातली ताकद आपण समजून घेतली पाहिजे. खूप आडवं-तिडवं वाचलं पाहिजे. प्रश्न विचारायला शिकलं पाहिजे. तर लिहिता येऊ शकतं. आपल्या लेखनानं काही प्रश्न उपस्थित होणार नसतील तर लिहू नका. त्यानं काही फरक पडत नाही. लक्षात ठेवा सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला येणारा माणूस क्रांती करू शकत नाही. अण्णा भाऊ साठेंसारखी, अमरशेखांसारखी आणि तुमच्या-माझ्यासाठी अर्थपोटी राहिलेली आणि असलेली माणसं क्रांती करू शकतात. तुमच्या या अर्धपोटी असलेल्या भांडवलाला मी जाणीपूर्वक शुभेच्छा देतो आणि माझ्या मांडणीला पूर्णविराम देताना तुकारामांचे वारस आपण होऊ या अशी आशा व्यक्त करून थांबतो.

.............................................................................................................................................

लेखक महेंद्र कदम विठ्ठलराव शिंदे कला महाविद्यालय, टेंभुर्णी (ता. माढा, जि. सोलापूर) येथे प्राचार्य म्हणून कार्यरत आहेत.

mahendrakadam27@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सध्याच्या काळामध्ये तरुण पत्रकार लढायला तयार आहेत, ही माझ्या दृष्टीने अत्यंत आशादायक गोष्ट आहे. मला फक्त ह्यात नागरिकांचं ‘कॉन्ट्रीब्युशन’ फारसं दिसत नाही : निखिल वागळे

‘पर्यायी मीडिया’चं काम ‘मेनस्ट्रीम’च्या तुलनेमध्ये कमी पोहोचणारं असलं तरी खूप महत्त्वाचं आहे. आणीबाणीमध्ये ‘साधना’सारख्या छोट्या साप्ताहिकाने जे काम केलं, तेच इतिहासात नोंदलं गेलं. तेच नेमकं ह्यांच्या बाबतीत होणार आहे. जेव्हा सत्ताधाऱ्यांना ‘तू नागडा आहेस’ असं सांगायला समाजातलं कोणीही तयार नव्हतं, तेव्हा या किंवा कमी रिसोर्सेस असलेल्या लोकांनी हे काम केलं. माझ्या मते हे खूप ऐतिहासिक काम आहे.......

‘काॅन्टिट्यूशनल कंडक्ट ग्रूप’चे केंद्रीय निवडणूक आयुक्तांना जाहीर पत्र : जोवर सर्वोच्च न्यायालयाने मागितलेली माहिती एसबीआय देत नाही, तोपर्यंत लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक प्रकाशित करू नये

आम्ही आपल्या लक्षात आणून देऊ इच्छितो की, सध्याच्या लोकसभेचा कार्यकाळ १६ जून २०२४पर्यंत आहे. निवडणूक वेळेत होण्यासाठी आयोगाने २७ मार्च किंवा त्यापूर्वीच वेळापत्रक जाहीर करावे. एसबीआयने निवडणुकीच्या घोषणेच्या आधीच ‘इलेक्टोरल बाँड्स’चा डेटा द्यावा. संविधानाच्या कलम ३२४नुसार आपल्या अधिकारांचा वापर करून केंद्रीय निवडणूक आयोगाला आपली प्रतिष्ठा आणि त्याची स्वायत्तता परत मिळवण्याची ही संधी आहे.......