बाईपणाचा प्रवास दाखवणारं नाटक आणि ड्रामा स्कूल, मुंबई
कला-संस्कृती - नाटकबिटक
धनश्री खंडकर 
  • ‘माटी’मधील एक दृश्य
  • Sat , 17 March 2018
  • कला-संस्कृती नाटकबिटक माटी MAATI महेश दत्तानी Mahesh Dattani द ड्रामा स्कूल The Drama School

हिंदी-इंग्रजी रंगभूमीवरील महत्त्वाचे नाटककार-दिग्दर्शक महेश दत्तानी यांनी दिग्दर्शित केलेलं 'माटी' हे नाटक बघण्याचा नुकताच योग्य आला. या नाटकाविषयी आस्था आणि जाण असणाऱ्या मित्राच्या शिफारशीवरून उत्सुकता निर्माण होऊन मुंबई मराठी साहित्य संघात ड्रामा स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेला 'माटी'चा प्रयोग पाहिला. 

हे नाटक स्पॅनिश कवी व नाटककार फेड्रिको गार्सिया लोर्काच्या 'येर्मा' या नाटकाचं हरियाणवी भाषेतील रूपांतर आहे. 'माटी' नावाच्या एक शेतकऱ्याच्या बायकोची ही गोष्ट. लग्नाला तीन वर्षं उलटूनही मूल न झालेल्या माटीची तगमग शेतात अहोरात्र काबाडकष्ट करणाऱ्या नवऱ्याला समजत नाही. नवऱ्याच्या प्रेमासाठी, बाळासाठी आसुसलेल्या माटीला मात्र नवऱ्याकडून आणि समाजाकडून अवहेलना झेलावी लागते. 'स्वतःच्या नवऱ्यापासून मूल होत नसेल तर त्याला सोडून दुसरा घरोबा कर, माझी मुलं तुला सुख द्यायला सक्षम आहेत', असं सांगणाऱ्या बाईला सडेतोड जवाब देण्याइतका स्वाभिमान माटीत आहे. पण तीचं एकाकीपण तिला दिवसेंदिवस उदध्वस्त करत जातं, तिची निरागसता शोषून तीला शुष्क करतं... सरतेशेवटी भावनेच्या उद्रेकात ती नवऱ्याला- प्रेम आणि मूल देण्यासाठी अक्षम असणाऱ्या पुरुषाला- संपवते.

भाषा, संस्कृती यांच्या सीमा ओलांडून बाईपणाचा प्रवास दाखवणारं हे नाटक प्रेक्षकांना वेगळी अनुभूती देणारं आहे. 

आजही समाजात टिकून असणारं हे वास्तव नाटकात तितक्याच टोकदारपणे चित्रीत झालं आहे. लोर्काच्या नाटकाचं रूपांतर करताना नेहा शर्मा यांनी त्याला चढवलेले हरियाणवी रंग इतके बेमालूम आहेत की, हे नाटक परकीय आहे, यावर विश्वास ठेवणं कठीण जातं. हरियाणवी संस्कृतीतल्या रूढी ,परंपरा, सणवार, पूजेच्या पद्धती अस्सलपणे नाटकात आल्या आहेत. अभिनव ग्रोव्हर यांनी लिहिलेली गाणी आणि त्याला आमोद भटांनी दिलेलं संगीत 'माटी'चा प्रवास रंजक करतात. महेश दत्तानींनी तीन पातळ्यांवर हे नाटक खेळवलंय. माटी, तिचं स्त्रीत्व आणि पुरुषत्व यांचा एकत्रित प्रवास नर-मादी यांची स्वभाववैशिष्ट्यं, त्यातले तपशील आणि संबंधांतलं राजकारणही उलगडत पुढे जातो. 

हे नाटक सादर करणारे कलावंत नाट्यप्रशिक्षणाचे विद्यार्थी असले तरी त्यांचा अभिनय बघता ते सराईत अभिनेते जाणवतात. सफाई आणि स्वाभाविकता हे दोन गुण रंगमंचावर सातत्यानं काम केल्यावर प्रकटतात, या गृहीतकाला या विद्यार्थ्यांनी अर्धसत्य ठरवलेलं आहे. प्रशिक्षणाच्या टप्प्यावर इतकी सहजता आणि पात्राची जाण असेलल्या या नटांकडून भविष्यात अर्थपूर्ण कामाची नक्कीच अपेक्षा ठेवायला हरकत नाही. त्यांच्या कामावरून या नाट्यप्रशिक्षण संस्थेत दिल्या जाणाऱ्या उत्तम प्रशिक्षणाची आणि त्याच्या दर्जाची कल्पना येते.

नंतर या संस्थेविषयी अधिक माहिती जाणून घेतली. या प्रयोगाला उपस्थित असलेले अक्षय शिंपी (जे अभिनेते आणि या तुकडीचे विद्यार्थी समन्वयक, तसंच ड्रामा स्कूलचे कोअर फॅकल्टी आहेत) यांनी संस्थेबाबत सविस्तर माहिती दिली. 

महाराष्ट्रात मुंबई विद्यापीठाचा 'अकादमी ऑफ थिएटर आर्ट्स' विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा 'ललित कला केंद्र' विभाग, औरंगाबादचा नाट्यप्रशिक्षण विभाग, शिवाजी विद्यापीठ,कोल्हापूरचा नाट्यविभाग या नाट्यप्रशिक्षण देणाऱ्या सुपरिचित संस्था आहेत. त्यांच्याच मांदियाळीतील 'ड्रामा स्कूल, मुंबई' ही एक एक नवी आणि आश्वासक अशी संस्था आहे. देश-परदेशातल्या नामांकित नाट्यविद्यालयांतून प्रशिक्षण घेतलेल्या आणि विविध भाषिक रंगभूमीवर कार्यरत असणाऱ्या प्रयोगशील रंगकर्मींनी मुंबई मराठी साहित्य संघाच्या सहयोगानं त्यांच्याच जागेत २०१३ साली या संस्थेची स्थापना केली. त्यात जेहान माणेकशॉ, पद्मा दामोदरन आणि गीतांजली कुलकर्णी हे आघाडीवर होते. मुंबई मराठी साहित्य संघाचे बाळ भालेराव, रेखा सबनीस आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांचीही मोलाची मदत ड्रामा स्कूलला मिळाली, आजही करत आहेत. विद्यालयाचे सल्लागार नाटककार सतीश आळेकर आणि दिग्दर्शिका अनुराधा कपूर आहेत. 

इथं एक वर्षीय पूर्ण वेळ प्रशिक्षण कार्यक्रम राबवला जातो. त्यासाठी कुठल्याही शाखेची पदवी एवढीच शैक्षणिक पात्रता लागते. नाट्यप्रशिक्षणात सहभागी असणारे सर्व अध्यापक हे प्रशिक्षित आणि स्वतः रंगमंचावर सातत्यानं कार्यरत असणारे आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचा दुहेरी फायदा होतो. त्यांना येणाऱ्या अडचणींवर व्यावहारिक पण सृजनात्मक तोडगा निघतो आणि प्रशिक्षण संपल्यावर अध्यापकांच्याच नव्या व्यावसायिक नाट्यप्रस्तुतींत गरज वा मागणीनुसार विद्यार्थी सहभागी होतात.

अध्यापकांमध्ये फैज जलाली, युकी इलियास, पूजा स्वरूप, सुखिता अय्यर, विक्रम फुकन, तुषार पांडे, लक्षिका पांडे, गिरीश खेमानी, रामू रामनाथन, दीपल दोषी, नीरज कबी ही हिंदी-इंग्रजी रंगभूमीवरील ठळक नावं आहेत. तद्वतच मराठी रंगकर्मीही ड्रामा स्कूलशी जोडले गेले आहेत. यात सुनील शानबाग, गीतांजली कुलकर्णी, नीरजा पटवर्धन, कल्याणी मुळे, मंदार गोखले, चिन्मय केळकर, अनिरुद्ध खुटवड, धनेंद्र कवडे, अमेय नाईक आणि अक्षय शिंपी ही मंडळी आहेत. 

या एका वर्षाच्या प्रशिक्षण कार्यक्रमात पहिल्या सहा महिन्यांनंतर विद्यार्थी 'मध्यंतर सादरीकरण' करतात. ज्यात त्यांना आत्मसात केलेली मूलभूत तंत्र आजमावता येतात. हे विद्यार्थ्यांचं पहिलं जाहीर सादरीकरण असतं. तसंच प्रशिक्षणाच्या समाप्तीला विद्यार्थी 'आद्यांत सादरीकरण' करतात. यात वर्षभर शिकलेल्या नाट्यतंत्राच्या साहाय्यानं विद्यार्थी स्वतः नाटक रचून सादर करतात. त्याद्वारे त्यांना 'संहिता ते प्रयोग' ही प्रक्रिया प्रत्यक्ष अनुभवायला मिळते. 

मध्यंतर ते आद्यांतच्या दरम्यान एक अतिथी दिग्दर्शक येऊन विद्यार्थ्यांसोबत एक पूर्ण लांबीचं नाटक दिग्दर्शित करतो, ज्याचे प्रयोग भारतातील महत्त्वाच्या शहरांत केले जातात. यंदा महेश दत्तानींना या उपक्रमाअंतर्गत 'माटी'चे प्रयोग करत आहेत. 

या ड्रामा स्कूलमधून प्रशिक्षण घेऊन बाहेर पडलेले विद्यार्थी नाटक, चित्रपट, वेबमालिका, तसंच नाट्यप्रशिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत. TVFच्या ‘गर्लीआप्पा’मध्ये दिसणारी शृष्टी श्रीवास्तव, मल्याळम चित्रपटातील आश्वासक अभिनेता रोशन मॅथ्यू, 'अद्र्क' नाटकाचा लेखक आणि अभिनेता निकेतन शर्मा, यक्षगान कलेचा अभ्यासक आणि गीतकार अभिनव ग्रोव्हर, हरीश कुलकर्णी, सागर भोईर, श्रीराम चौधरी (हे दोघे पालघर जिल्ह्यात गीतांजली कुलकर्णींसोबत 'गोष्टरंग' उपक्रमाशी जोडले गेले आहेत.) अशा विविध माध्यमांतून या संस्थेचे जवळपास ९० टक्के विद्यार्थी आजघडीला कार्यरत आहेत. 

या उपक्रमांव्यतिरिक्त रंगभूमी अभ्यास आणि संशोधनाशी निगडित उपक्रम ड्रामा स्कूल राबवतं. आठवड्याअंताला प्रयोगशील रंगकर्मींच्या कार्यशाळा आयोजित केल्या जातात. ज्यात सहभागासाठी कुठलीही वयोमर्यादा नाही. यात भारतीय तसंच परदेशी नाट्यप्रशिक्षक येऊन अध्यापन करतात. 

'रेखा सबनीस स्मृती व्याख्यानमाला' हाही एक महत्त्वाचा उपक्रम. यात महिन्याच्या एका शनिवारी अभ्यासू रंगकर्मीच्या दीर्घ मुलाखतीचं सत्र आयोजित केलं जातं. त्यामुळे या रंगकर्मीचा नाटक या माध्यमाकडे पाहण्याचा दृष्टिकोन, ते करत असलेले विविध प्रयत्न, प्रयोग आदींची माहिती मिळते. यात मोहित टाकळकर, राजकुमार तांगडे, शफाअत खान, इरावती कर्णिक, रसिका आगाशे, अतुल पेठे, शेरनाज पटेल, सुनील शानबाग आदींच्या मुलाखती झाल्या आहेत. 

ड्रामा स्कूलची माहिती मिळवताना हे ध्यानात आलं की, अल्पावधीतच या संस्थेनं राष्ट्रीय स्तरावर आपली ओळख निर्माण केली आहे. अशा संस्था केवळ कलाकारांना घडवत नाहीत, तर रंगभूमीचा चेहरामोहरा बदलायला प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे कारणीभूत होतात. येत्या जागतिक रंगभूमी दिनाला नाटककार, कलाकार, तंत्रज्ञ यांच्यासोबतच अशा भरीव काम करणाऱ्या संस्थांचीही दखल घ्यायला हवी. 

.............................................................................................................................................

लेखिका धनश्री खंडकर अभिनेत्री आणि कथक नृत्यविशारद आहेत. गेल्या २० वर्षांपासून त्या मनोरंजन क्षेत्रात विविध जबाबदाऱ्या सांभाळत आहेत.

dhanu.dk1688@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सिनेमा हे संदीप वांगा रेड्डीचं माध्यम आहे आणि त्याला ते टिपिकल ‘मर्दानगी’ दाखवण्यासाठी वापरायचंच आहे, तर त्याला कोण काय करणार? वाफ सगळ्यांचीच निवते… आपण धीर धरायला हवा…

संदीप वांगा रेड्डीच्या ‘अ‍ॅनिमल’मधला विजय त्याने स्वत:वरच बेतलाय आणि विजयचा बाप बलबीर त्याने टीकाकारांवर बेतलाय की काय? त्यांचं दुर्लक्ष त्याला सहन होत नाही, त्यांच्यावर प्रेम मात्र अफाट आहे, त्यांच्या नजरेत प्रेम, आदर दिसावा, यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे. रेड्डीसारख्या कुशल संकलकानं हा ‘समीक्षकांवरच्या, टीकाकारांवरच्या अतीव प्रेमापोटी त्यांना अर्पण केलेला’ भाग काढून टाकला असता, तर .......