रानातून आणि वनातून :  चलो मुंबई
पडघम - कोमविप (कोकण, मराठवाडा, विदर्भ, प.महाराष्ट्र)
पार्थ एम. एन.
  • छायाचित्र : श्रीरंग स्वर्गे
  • Fri , 16 March 2018
  • पडघम कोमविप शेतकरी मोर्चा Shetkari Morcha लाँग मार्च Long March

६ मार्च २०१८ रोजी हजारो शेतकऱ्यांचा मोर्चा मुंबईच्या दिशेनं निघाला. त्यातील शेतकऱ्यांशी बोलून पत्रकार पार्थ एम.एन. यांनी १२ मार्च २०१८ रोजी ‘PARI -People's Archive of Rural India’साठी लिहिलेला लेख ‘अक्षरनामा’वर...

.............................................................................................................................................

शंकर वाघेरे आपली प्लास्टिकची पिशवी जमिनीवर टाकतात आणि काठीवर रेलून जरा श्वास घेतात. त्यानंतर ते खाली झुकतात आणि डोळे मिटून घेतात. पुढची १५ मिनिटं काही ते डोळे उघडत नाहीत. ६५ वर्षांचे वाघेरे आज खूपच अंतर चाललेत. त्यांच्या भोवती, रात्रीच्या अंधारात जवळ जवळ २५,००० शेतकरी बसले आहेत.

“आम्हाला आमच्या हक्कांसाठी लढावंच लागणार,” ते म्हणतात. इगतपुरीच्या रायगडनगर भागात मुंबई-नाशिक महामार्गावर त्यांचा मुक्काम आहे. ६ मार्च, मंगळवारी दुपारी शेतकऱ्यांचा जो विराट मोर्चा मुंबईच्या दिशेने निघाला, त्याचा हा आजचा पहिला मुक्काम. रविवारी, ११ मार्च रोजी मुंबई गाठायची असं या शेतकऱ्यांचं नियोजन आहे. आणि त्यानंतर विधानसभेला बेमुदत घेराव घालायचा – सरकारने केलेल्या फसवणुकीचा निषेध व्यक्त करायचा.

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची शेतकरी संघटना असलेल्या अखिल भारतीय किसान सभेने हा लाँग मार्च आयोजित केला आहे. या मोर्चाचे एक संयोजक आणि किसान सभेचे जनरल सेक्रेटरी अजित नवले सांगतात की केवळ बाता मारून सरकार निभावून नेऊ शकत नाही. “२०१५ मध्ये आम्ही शेतकऱ्यांचे वन जमिनीवरचे हक्क, शेतमालाला चांगला भाव, कर्जमाफी आणि अशा इतर मागण्या घेऊन निदर्शनं केली होती,” ते सांगतात. “सरकार दिलेला शब्द पूर्ण करत असल्याचा केवळ दिखावा करत आहे. या वेळी मात्र ‘करो या मरो’ असाच आमचा लढा असणार आहे.” 

मोर्चा जसजसा पुढे निघाला आहे तसं महाराष्ट्राच्या इतर भागातले – मराठवाडा, रायगड, विदर्भ आणि इतर जिल्ह्यातले शेतकरी मोर्चात सामील होण्याची अपेक्षा आहे आणि नाशिकहून १७० किमी लांब मुंबईला पोचेपर्यंत मोर्चेकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे. आता निघालेले शेतकरी नाशिक जिल्हा आणि आसपासच्या भागातले आहेत आणि यातले बरेच आदिवासी आहेत.

वाघेरे महादेव कोळी आहेत आणि नाशिक जिल्ह्याच्या दिंडोरी तालुक्यातल्या नळेगावहून आले आहेत. ते सकाळी नाशिकच्या सीबीएस चौकात पोचले – नळेगावहून, २८ किमी पायी. दुपारनंतर चौकातून मुंबईच्या दिशेने लाँग मार्चचं प्रस्थान झालं. 

“आम्ही पिढ्या न पिढ्या आमची जमीन कसतोय, तरी आजही ती वन खात्याच्या नावावर आहे,” ते सांगतात. “[वन हक्क कायदा, २००६ नुसार आदिवासींना जमिनीचे हक्क दिले जातील असं] कबूल करूनही आमच्या जमिनी आमच्या मालकीच्या नाहीत.” वाघेरेंच्या गावात जवळ जवळ सगळे भातशेती करतात. “एकराला १२,००० रुपये लागवडीचा खर्च आहे. पाऊसपाणी चांगलं असेल तर आम्हाला १५ क्विंटल [एकरी] भात होतो,” ते सांगतात. “सध्याचा [बाजार] भाव १० रु. किलो आहे [क्विंटलमागे १००० रुपये]. आम्ही कसं निभवावं? मला जेव्हा या मोर्चाबाबत समजलं, मी ठरविलं, की मी जाणार, काय व्हायचं ते होऊ द्या.”

मी सीबीएस चौकात १ वाजता पोचलो, तेव्हा लोक अजून जमा होत होते. हळू हळू जिपा भरून शेतकरी गोळा होऊ लागले आणि माकपच्या लाल बावट्याचा समुद्रच जणू रस्त्यात लोटलाय असं वाटू लागलं. काही गड्यांनी डोक्याला रुमाल बांधले होते, बायांनी उन्हापासून संरक्षण म्हणून डोक्यावर पदर घेतला होता. बहुतेकांच्या हातात प्लास्टिकच्या पिशव्या आणि त्यामध्ये कपडे, गहू, तांदूळ, बाजरी असा सगळा आठवडाभर पुरेलसा शिधा घेतलेला होता.

अडीच वाजायला आले आणि जमा झालेल्या गडी आणि बायांनी आपापल्या पिशव्यांमधून वर्तमानपत्रात बांधून आणलेली चपाती-भाजी सोडली आणि रस्त्यातच बसून जेवणं उरकून घेतली. जवळच काही आदिवासी शेतकरी वेळ जाण्यासाठी काही पारंपरिक गाणी म्हणत होते. बाळू पवार, विष्णू पवार आणि येवाजी पिठे, तिघंही नाशिकच्या सुरगाणा तालुक्यातल्या पांगरणे गावचे. तिघांचा कार्यक्रम रंगात आला होता. तिघंही रस्त्याच्या दुभाजकावर बसलेले. रस्ता आता पोलिसांनी वाहतुकीसाठी बंद केलाय. बाळूंकडे तुणतुणं आहे, विष्णूंच्या हातात डफली आणि येवाजींनी टाळ घेतले होते. “तुम्ही काय गाताय?” मी त्यांना विचारलं. “आमचा देव खंडेराया, त्याचं गाणं आहे हे,” त्यांनी सांगितलं.

हे तिघं कलाकारही महादेव कोळी समाजाचे आहेत आणि त्यांच्या समस्याही वाघेरेंसारख्याच आहेत. “मी पाच एकर जमीन कसतो,” विष्णू सांगतात. “खरं तर जमीन माझीच आहे, पण मी वन खात्याच्या मर्जीवर अवलंबून आहे. ते कधीही येऊन मला तिथून हाकलून देऊ शकतात. आमच्या शेजारच्या गावात वन अधिकारी आले आणि जिथे शेतकरी भात पिकवतात तिथेच त्यांनी खड्डे घेऊन झाडं लावायला सुरुवात केली. त्यांच्यानंतर आता आमची पाळी आहे.”

संजय बोरास्तेही मोर्चासाठी आले आहेत. ते नाशिकहून २६ किमीवर असलेल्या दिंडोरी तालुक्यातल्या दिंडोरी गावचे रहिवासी आहेत. त्यांच्यावर ८ लाखाचं कर्ज आहे. “सरकारने आधी कर्जमाफी जाहीर केली तेव्हा मला वाटलं की आता माझी सुटका होईल,” ते सांगतात. “पण दीड लाखाची मर्यादा घालून मुख्यमंत्र्यांनी आमची क्रूर चेष्टा केली आहे.” ४८ वर्षीय बोरास्तेंनी या महिन्यात अडीच एकरावरचा लाल भोपळा काढला. “मला २ रु. किलो भावाने भोपळा विकायला लागला,” ते सांगतात. “भावच कोसळलेत आणि भोपळा नाशवंत आहे.”

गेल्या वर्षी मराठवाड्याचं वार्तांकन करत असताना तिथले शेतकरी स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी, किमान हमीभाव, सरसकट कर्जमुक्ती आणि भरोशाचं सिंचन अशा सगळ्या मुद्द्यांवर सातत्याने बोलताना मी पाहिले आहेत. नाशिकमध्ये जमलेल्या बहुतेकांसाठी या मागण्या महत्त्वाच्या असल्या तरी त्यांचा मुख्य प्रश्न आहे जमिनीवरच्या हक्कांचा. जसजसा मोर्चा पुढे सरकेल तसं त्यात सामील होणाऱ्या शेतकऱ्यांच्या मागण्याही थोड्याफार बदलत जातील. 

दुपारचे ३ वाजलेत, मोर्चाचे संयोजक जमलेल्या शेतकऱ्यांशी बोलायला सुरुवात करतात. आणि ४ वाजायच्या सुमारास हजारो लोक नाशिक-आग्रा महामार्गाच्या दिशेने झपाझप चालायला लागतात. मोर्चात सर्वात पुढे ६० वर्षांच्या रुकमाबाई बेंडकुळे आहेत. हातात लाल बावटा घेऊन त्या जोशात नाचतायत. रुकमाबाई दिंडोरी तालुक्यातल्या दोंडेगावच्या शेतमजूर, त्यांना २०० रुपये रोजी मिळते आणि आठवड्यातून तीन दिवस काम असतं. सहा दिवस मोर्चात जायचं म्हणजे ६०० रुपयांवर पाणी सोडावं लागणार. “मी स्वतः काही पिकवित नसले तरी माझ्या गावच्या शेतकऱ्यांच्या जमिनी जर गेल्या [वनखात्याकडे] तर माझं पण काम जाणारच की,” त्या सांगतात. पण सरकार ऐकणार का? मी त्यांना विचारलं. “न ऐकून काय करतील?” त्या हसतात.

नवलेंच्या म्हणण्यानुसार या अशा मोर्चांचा सरकारवर काही तरी परिणाम होतो. “आम्ही ज्या प्रश्नांबद्दल बोलतोय ते आता चर्चेत तरी आलेत,” ते म्हणतात. “किती का अटी घालेनात, सरकारला कर्जमाफी द्यावीच लागली ना. आम्ही तिला ‘लूट वापसी’ म्हणतो. आतापर्यंतच्या सरकारांनी आमच्या आधीच्या पिढ्यांचं शोषण केलंय, लुटलंय त्यांना. आम्ही ते आता थोडं थोडं परत घेतोय, इतकंच.”

मार्गावर अनेक शेतकरी टँकरमधून रिकाम्या बाटल्या भरून घेतायत. आयोजकांनीच टँकरची सोय केलीये. रायगडनगरला पोचेपर्यंत ते थांबले ते आताच. पाच तासांनी, रात्री ९ च्या सुमारास, महामार्गाच्या बाजूला, वालदेवी धरणापासनं जवळच एका मैदानात खुल्या आकाशाखाली सगळ्यांनी मुक्काम केला.

रात्रीच्या जेवणालादेखील सोबत आणलेली चपाती भाजी खाऊन झाल्यानंतर काही शेतकरी मोर्चासोबत असणाऱ्या ट्रकवरच्या स्पीकरवर गाणी सुरू करतात. लोकगीतांचा आवाज रात्रीचा काळाकुट्ट अंधार कापत जातो आणि एकमेकांच्या कमरेला हाताचा वेढा घालत अनेक पुरुष अर्धवर्तुळात पायाचा ठेका धरत नाचू लागतात.

चादर पांघरून बसलेले वाघेरे बाकीच्यांचा उत्साह बघून अचंबित झालेत. “मी तर थकून गेलोय,” ते म्हणतात. “माझे पाय दुखू लागलेत.” पुढचे सहा दिवस तुम्ही चालू शकणार का असं मी विचारताच ते म्हणतात, “अरे, म्हणजे काय... पण आता मात्र मी निजणार आहे.”

.............................................................................................................................................

पार्थ एम.एन. हे ‘पारी’चे २०१७चे फेलो आहेत. ते ‘लॉस एंजलिस टाइम्स’चे भारतातले विशेष प्रतिनिधी म्हणून काम करतात. शिवाय ते अनेक ऑनलाईन पोर्टल्ससाठीही लेखन करतात. क्रिकेट आणि प्रवास यांची त्यांना मनस्वी आवड आहे.

.............................................................................................................................................

अनुवाद - मेधा काळे. यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.

.............................................................................................................................................

हा लेख सर्वप्रथम ‘पीपल्स आर्काइव ऑफ रुरल इंडिया’मध्ये १२ मार्च २०१८ रोजी प्रकाशित झाला आहे.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

भाजपच्या ७६ पानी ‘जाहीरनाम्या’त पंतप्रधान नरेंद्र मोदींची तब्बल ५३ छायाचित्रं आहेत. त्यामुळे हा जाहीरनामा आहे की, मोदींचा ‘छायाचित्र अल्बम’ आहे, असा प्रश्न पडतो

काँग्रेसच्या ४८ पानी जाहीरनाम्यात राहुल गांधींची फक्त पाच छायाचित्रं आहेत. त्यातली तीन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत आहेत. याउलट भाजपच्या जाहीरनाम्याच्या मुखपृष्ठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीमागे बळंच हसताहेत अशा स्वरूपाचं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचं छायाचित्र आहे. त्यातली ‘बिटवीन द लाईन’ खूप सूचक आणि स्पष्टता सूचित करणारी आहे.......

जर्मनीत २० हजार हत्तींचा कळप सोडण्याची धमकी एका देशाने दिली आहे, ही ‘हेडलाईन’ जगभरच्या प्रसारमाध्यमांमध्ये गाजतेय सध्या…

अफ्रिका खंडातील बोत्सवाना हा मुळात गरीब देश आहे. त्यातच एवढे हत्ती म्हणजे दुष्काळात तेरावा महिना. शेतांमध्ये येऊन हत्ती मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान करत असल्याने शेतकरी वैतागले आहेत. याची दखल बोत्सवानाचे अध्यक्ष मोक्ग्वेत्सी मेस्सी यांनी घेतली आहे. त्यामुळेच त्यांनी संतापून एक मोठी घोषणा केली आहे. ती म्हणजे तब्बल २० हजार हत्तींचा कळप थेट जर्मनीमध्ये पाठवण्याची. अनेक माध्यमांमध्ये ही ‘हेडलाईन’ गाजते आहे.......

महाराष्ट्राच्या राजकारणाचा हा ‘खेळखंडोबा’ असाच चालू राहू द्यायचा की, त्यावर ‘अक्सिर इलाज’ करायचा, याचा निर्णय घेण्याची एकमेव ‘निर्णायक’ वेळ आलेली आहे…

जनतेला आश्वासनांच्या, ‘फेक न्यूज’च्या आणि प्रस्थापित मीडिया व सोशल मीडियाद्वारे भ्रमित करूनही सत्ता मिळवता येते, राखता येते, हे गेल्या दहा वर्षांत भाजपने दाखवून दिले आहे. पूर्वी सत्ता राजकीय नेत्यांना भ्रष्ट करते, असे म्हटले जायचे, हल्ली सत्ता भ्रष्ट राजकीय नेत्यांना ‘अभय’ वरदान देण्याचा आणि एकाधिकारशाही प्रवृत्तीच्या राजकारण्यांना ‘सर्वशक्तिमान’ होण्याचा ‘सोपान’ ठरू लागली आहे.......