संवाद ‘प्युअर पोएट्री’, कथानक ‘प्युअर पपेट्री’, हिरॉईन ‘सेक्स ऑब्जेक्ट’, हिरो ‘सेक्सी’, अर्थात ‘सॉफ्टकोअर पॉर्न फिल्म’!
कला-संस्कृती - हिंदी सिनेमा
अक्षय शेलार
  • ‘हेट स्टोरी ४’ची पोस्टर्स
  • Sat , 10 March 2018
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti हिंदी सिनेमा Hindi Movie हेट स्टोरी ४ Hate Story IV

पटकथालेखनाचा एक अलिखित नियम किंवा संकेत काहीही म्हणा, पण तो आहे. तो म्हणजे प्रेक्षकाला पुनःपुन्हा तेच ते सांगत बसू नका. तुमच्या कथेला तुमच्या वतीनं बोलू द्या. प्रत्येक गोष्ट अनेकदा सांगत बसण्याची गरज नसते. मात्र या गोष्टीचा बॉलिवुडला अनेकदा विसर पडत आलेला आहे. आणि जोवर भट कॅम्प किंवा तत्सम (तथाकथित) चित्रपटनिर्माते चित्रपट बनवत राहतील, तोवर कदाचित हा विसर नजीकच्या भविष्यातही कायम राहिल. असो.

‘हेट स्टोरी ४’ या चित्रपटाबाबत हीच गोष्ट वारंवार दिसून येत राहते. शिवाय ती केवळ संवादातूनच नव्हे तर ‘मारा’ करणाऱ्या कथानकामधूनही समोर येत राहते. 

चित्रपटाची कथा या आधीच्या भागाहून काही फार वेगळी नाही. ताशाचा (उर्वशी रौटेला) एक ‘बॅडअॅस’ प्लॅन आणि त्या प्लॅनचे दोन बळी असलेले आर्यन (विवान भाटेना) आणि राजवीर (करण वाही) हे दोन भाऊ असा भाग मध्यंतरापर्यंत. आणि नंतर ताशा हीच खरं तर या दोघांच्या एका आधीच्या गुन्ह्याची बळी असते, असा ‘क्लासिक हेट स्टोरी’वाला ट्विस्ट. हे सगळं समजावून घ्यायला कुणा तज्ज्ञाची गरज नाही. कारण हे सगळं ट्रेलरमधून स्पष्ट झालेलंच आहे. त्यामुळे आपल्याला काय पाहायला मिळणार, अशी उत्सुकता निर्माण होण्याचं कारण राहत नाही. 

मात्र हे फिल्ममेकर्स वारंवार एकच प्लॉट उलटसुलट पद्धतीनं दाखवूनही तो चित्रपट आणि एकूणच ही किंवा अशाच इतर चित्रपटमालिका हिट का होतात? याचं उत्तर ट्रेलरमध्ये, चित्रपटात आणि अगदी पोस्टरवरही आहे. ते असं की, या चित्रपटांचे निर्माते ‘हाऊ टू ऑब्जेक्टिफाय विमेन’ नावाच्या अभ्यासशाखेतील ‘टॉपर’ आहेत. 

त्यांचा अभ्यासही दांडगा आहे. सोबतच त्यांचं लक्ष्य, टार्गेट ऑडिएन्स त्यांच्याकरिता क्लिअर आहे. आधीच्या काळात बी ग्रेड चित्रपटांमध्ये मोडले असते असे हे चित्रपट आता जास्त चकचकीत, आणि सेन्सॉरचं लक्ष तथाकथित असुसंस्कृत चित्रपटांवर असल्यानं चांगलं बॅनर आणि फार तर ‘ए’ प्रमाणपत्र घेऊन धुमधडाक्यात प्रसिद्ध होतात, तुफान चालतात! 

एकतर ‘सिल्क’सदृश्य किंवा मग थेट अगदी स्लिम, झीरो फिगर मेन्टेन असलेली मॉडेल अभिनेत्री म्हणून उभी करायची, फास्ट पेस्ड कट्सच्या माध्यमातून समोर काहीतरी उत्तान घडत आहे, असा संभ्रम निर्माण करायचा, अशा काही ट्रिक्समधून समोर एक प्रकारची सॉफ्टकोअर पॉर्न फिल्म तयार करायची, इतकी साधी सोपी युक्ती वापरली जाते. आणि याला सहजासहजी ट्रिगर होणारे भारतीय प्रेक्षक, त्यातल्या त्यात पुरुष भुलले नाहीत तरच नवल! 

तसं कथानकाला आणि अगदी चित्रपटालाही फार सिरियसली घेण्याची गरज नाही. कारण मुळात चित्रपटाचे निर्मातेच फिल्ममेकिंगला सिरियसली घेताना दिसत नाहीत. मात्र आपणच असं केलं नाही तर लोकतरी याला सिरियसली कसं घेतील?

लंडनच्या पार्श्वभूमीवर उभ्या राहिलेल्या या कथेत जेव्हा हास्यास्पद प्रकार घडत राहतात, तेव्हा ते दुर्लक्षित राहत नाहीत. हे लंडन काहीच्या काही अफाट आहे! इथं नायक-नायिका आणि इतरही लोक अचानक हिंदी बोलू लागतात. आणि विशेष म्हणजे तेथील ब्रिटिशांना ते कळतंही. आहे की नाही कमाल! शिवाय हे लोक खास भारतीय प्रकारची ‘शेम, शेम’वाले एक्स्प्रेशन देत, आपल्या शेजारच्या काकूंप्रमाणे ‘अहो, ऐकलंत का? शेजारची सुमी वरच्या फ्लोअरच्या त्या भैयासोबत पळून गेली म्हणे!’ अशा प्रकारच्या भासणाऱ्या चर्चाही करतात. 

शिवाय आपला बॅडबॉय गुलशन ग्रोव्हर इथल्या नायकांचा केवळ वडीलच बनला नाही, तर तिथल्या महापौरपदाच्या निवडणुकीच्या शर्यतीत म्हणे आघाडीचा दावेदार असतो! थोडक्यात सगळं फँटसी आयलंड भासवत, ‘सारं कसं छान छान’ असा मामला रंगवला गेलाय. 

कारण अगदी सुरुवातीच्या सीनपासून उर्वशी बाई, विवान आणि करण या अभिनय सम्राटांचा (आणि सम्राज्ञींचाही) अभिनय पाहून आपण धन्य होतो! शिवाय त्यावर विनोद करायची आणि शोधायची तसदीही लेखकानं घेऊ दिली नाही. (श्शी बुवा!) कारण एका सीनमध्ये तर उर्वशी बाई थेट ‘अँड ऑस्कर गोज टू’ असं म्हणतात!

यातील संवाद फार गमतीशीर आहेत. ते ऐकून ‘ढूँढो तो भगवान भी मिलता है’ टाईप फिलिंग येतं. म्हणजे वाईटात वाईट चित्रपटातही काही वेळा काहीच्या काही अफाट आणि ‘सो बॅड इट्स गुड’ क्षण पाहिले की डोळ्यात पाणी येतं. यातील असाच एक संवाद उदधृत करायचा मोह आवरत नाही. तो असा – “I'm somebody who can get anybody but I don't want nobody other than your body.’’ नुसता कमाल डायलॉग आहे हा. इतका खतरनाक आहे की, काहींना झेपणारही नाही. एकूणच यातील संवाद म्हणजे ‘प्युअर पोएट्री’ आहे. 

बाकी सिनेमॅटोग्राफी, एडिटिंग वगैरे गोष्टींबद्दल काही बोलायलाच नको. नकोसे वाटायला लावतील असे क्लोजअपस, शोभेच्या बाहुल्या बनलेल्या स्त्रियांना ‘सेक्स ऑब्जेक्ट’ म्हणून समोर आणणारं चित्रण आणि एडिटिंग हे सगळं वर्षानुवर्षं पाहून झालेलं आहे म्हणूनच नव्हे, तर आपण या माध्यमातून काय सांगू पाहत आहोत असा प्रश्न निर्माण करत फक्त कंटाळा आणतं आणि समाज म्हणून आपल्याच लाज वाटते. पण पुन्हा या चित्रपटांची शेल्फ लाइफ पाहून प्रश्न पडतो - लोक तरी हे चित्रपट का पाहतात? पण सोल्युशन लाईज विदिन द प्रॉब्लेम इटसेल्फ. निर्माते हे चित्रपट वारंवार बनवत राहत प्रेक्षकांना त्याची चटक लावून, त्यांना ‘चित्रपट हे केवळ मनोरंजनासाठी आहेत’ असा डोस देत राहतात. त्यामुळे बहुतांशी प्रेक्षक आहे तेच स्वीकारत राहतात आणि अनकन्व्हेन्शनल चित्रपटांकडे पाठ फिरवतात. आणि मग पुन्हा हेच किंवा असेच निर्माते प्रेक्षकच प्रगल्भ नाहीत म्हणत पुन्हा आपलाच कित्ता गिरवतात… आणि हे अमर्याद चक्र सुरू राहतं. दोन आठवड्यापूर्वी याच ठिकाणी लिहिलं होतं – ‘वो उनका मजाक बनाकर रखते गए, और हम तालियाँ बजाते रह गए.’ तेच आताही म्हणावंसं वाटतं.

.............................................................................................................................................

लेखक अक्षय शेलार हिंदी चित्रपटांचे अभ्यासक आहेत.

shelar.a.b.mrp4765@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

Post Comment

ramya savji

Sun , 11 March 2018

"I'm somebody who can get anybody but I don't want nobody other than your body", या संवादात 'don't' मूळ सिनेमात नाही आहे. "I'm somebody who can get anybody but I want nobody other than your body", असा खरा संवाद आहे. आपण वाचून पाहा आणि तुलना करून ठरवा. परीक्षणकर्त्याने चुकीचा संवाद दिला आहे. असो. हा लेख आणि चित्रपट दोन्ही निरर्थक वाटले, परंतु तरीही चित्रपट दोन-अडीच तास अधूनमधून नयनसुखद तरी होता. परीक्षणात तेही नाही.


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सिनेमा हे संदीप वांगा रेड्डीचं माध्यम आहे आणि त्याला ते टिपिकल ‘मर्दानगी’ दाखवण्यासाठी वापरायचंच आहे, तर त्याला कोण काय करणार? वाफ सगळ्यांचीच निवते… आपण धीर धरायला हवा…

संदीप वांगा रेड्डीच्या ‘अ‍ॅनिमल’मधला विजय त्याने स्वत:वरच बेतलाय आणि विजयचा बाप बलबीर त्याने टीकाकारांवर बेतलाय की काय? त्यांचं दुर्लक्ष त्याला सहन होत नाही, त्यांच्यावर प्रेम मात्र अफाट आहे, त्यांच्या नजरेत प्रेम, आदर दिसावा, यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे. रेड्डीसारख्या कुशल संकलकानं हा ‘समीक्षकांवरच्या, टीकाकारांवरच्या अतीव प्रेमापोटी त्यांना अर्पण केलेला’ भाग काढून टाकला असता, तर .......