विशाल अवकाशाचं दर्शन घडवणारी कळवळ्याची ‘धूळपेर’ 
ग्रंथनामा - बुक ऑफ द वीक
अतुल देऊळगावकर
  • ‘धूळपेर’चं मुखपृष्ठ
  • Fri , 02 March 2018
  • ग्रंथनामा बुक ऑफ द वीक आसाराम लोमटे Aasaram Lomte धूळपेर Dhulper अतुल देऊळगावकर Atul Deulgaonkar

गड्या आपला गाव बरा, शहर हे अनितीनं भरलेलं आहे. अहाहा, काय ते रम्य गाव! सगळी माणसं भली, गुण्यागोविंदानं संस्कृती जपत राहतात. पाणी झुळझुळ वाहतंय, पिकं डोलताहेत, शेतकरी कसे प्रफुल्लित आहेत. असे रम्य आणि मनोहर वातावरण प्रीतरंग फुलवायला सज्ज असते. एखादा दुष्ट सावकार असलाच तर त्याचा नायनाट केला की, सारं कसं गोडगोड! असा ‘भारत’ पाहून ‘इंडिया’ला हेवाच वाटायचा ना ! मग ‘गोरी तेरा गाँव बडा प्यारा’ म्हणत सुटा-बुटातला नायक गावातच येऊन ‘विकास कामं’ करायचा की!

असाच गाव मराठी साहित्यानं टिकवून धरला होता. बाजारातून मागणीही तशीच होती. या ‘यशस्वी’ साचात किरकोळ बदल करीत तोच नाटक-चित्रपटांनी घट्ट केला आणि तीच साचेबद्ध प्रतीकं जोपासली. गावातल्या प्रखर वास्तवाचा आणि गुळगुळीत प्रतिमा यांचा मेळ अजिबात लागत नव्हता. परंतु साहित्य व मनोरंजनाच्या बाजारपेठेतील भरपूर मागणीमुळे पुरवठा काही कमी होत नव्हता. ‘‘हे तद्दन खोटं आहे, ही प्रतिकं, प्रतिमा व चिन्हं निर्माण करणारे ढोंगी आहेत,’’ असं कुणी म्हणत नव्हतं. उलट त्याच चाकोरीतून जाऊन ‘तेच ते’  करत, अनेक लाभ पदरात पाडून घेत होते. वर्षानुवर्षं व्यक्त होणारं गावाचं हे प्रातिनिधिक रूप आसाराम लोमटेला मनस्वी डाचत होतं. वर्तमानाचं सुलभीकरण त्रासदायक होत होतं. सभोवतालचे प्रसंग व घटना पाहताना त्यामागील विस्तारलेल्या अवकाशाची जाणीव करून द्यायची होती. अभिजाततेचा स्पर्श असणाऱ्या कथा व कादंबरी सादर करणाऱ्या आसारामनं ‘राजा नागडा आहे’ हे सांगण्याचं धैर्य दाखवत ग्रामीण जीवन लख्खपणे समोर आणलं आहे.

आता तरी गतरंजनी वृत्ती आणि स्मरणरमणीयतेत घेऊन जाणारी धूळफेक थांबावी, यासाठी त्याने ‘धूळपेर’ या पुस्तकातील ४६ लेखांतून (निबंधातून) समकालीन ग्रामीण जीवनाविषयी बहुआयामी भाष्य केलं आहे. आव अथवा अभिर्वाव, आवेश वा अभिनिवेश यांचा लवलेश नसणारं अतिशय संयमी, प्रांजळ व नितळ कथन या आसारामच्या वैशिष्ट्यांमुळे हे लिखाण वाचकाला सहजगत्या भिडत जातं आणि अंतर्मुख करतं. आसारामची ‘इडा पिडा टळो’ (२००६) आणि ‘आलोक’(२०१०) या कथासंग्रहांनी आतून गदागदा हालवून टाकणारे दाहक अनुभव दिले होते. त्याच्या लिखाणाची जातकुळी ही प्रेमचंद, बाबूराव बागूल यांच्याशी नातं सांगते आणि बिमल रॉय यांचा ‘दो बिघा जमीन ’वा  मृणाल सेन यांचा ‘अकालरे संधाने’ पाहून येणाऱ्या अस्वस्थतेचा अनुभव देते.

‘धूळपेर’हा दै. ‘लोकसत्ता’मधील निवडक लेखांचा संग्रह आहे. खूप वर्षानंतर असं प्रगल्भ चिंतन करणारे निबंध वाचायला मिळाले आहेत. ‘धूळपेर’मध्ये गुरांच्या बाजारापासून ते मॉलपर्यंत, स्थलांतरित मजुरांपासून ते पंढरीच्या वारीपर्यंत, नैसर्गिक अस्मानी ते सत्तेच्या सुलतानीपर्यंत, तहानलेल्या लहानग्यांपासून ते पाणीदार नेतृत्त्वापर्यंत, ढोरकष्टात पिचलेल्या ग्रामीण स्रीपासून ते चुलीतून झेपावणाऱ्या ठिणग्यांपर्यंत, सत्ताकांक्षी राजकारणापासून ते धुमसणाऱ्या चळवळीपर्यंत, भाषेच्या व्याकरणापासून ते वेदनेच्या भाषेपर्यंत असे अनेक विषय आले आहेत. साहित्य, कला, समाजजीवन, राजकारण या अंगानं हे सारे विषय सघन झाले आहेत. आपल्याला थिजवून टाकणाऱ्या बाळ ठाकूर यांच्या आर्ततापूर्ण रेखाटनांनी ‘धूळपेर’चा भाव समर्थपणे अधोरेखित केला आहे.

आकाशात घिरट्या घालणाऱ्या शत्रूंची विमानं न्याहाळत भुईसुरुंग पेरून ठेवलेल्या युद्धभूमीवर दबकत पावलं टाकणाऱ्या सैनिकासारखीच सध्या शेतकऱ्यांची अवस्था  आहे. (फक्त एवढ्याच बाबतीत किसान आणि जवान यांच्यात साम्य!) सतत कशाची तरी टांगती तलावर! भरवसा ठेवावं असं काहीही नसूनही पेरणीच्या काळातील वातावरणाविषयी आसाराम लिहितो, ‘‘मागील मोसमात विस्कटलेला सगळा हिशोब विसरून शेतकरी नव्याने कामाला लागतात. नवं काही मिळवण्यासाठी म्हणण्यापेक्षा गेलेले परत मिळवण्याच्या आशेवरच ही धडपड सुरू असते. कोणाला वर्षानुवर्षे घरावरचे छप्पर नीट करायचे किंवा भिंती खचल्यात म्हणून डागडुजी करायची असते. कोणाला लेकीबाळींचे लग्न तर कोणाला पोराबाळांना शिक्षणासाठी बाहेरगावी पाठविण्याची आशा. डोळ्यांत अशी स्वप्ने आणि वास्तव मात्र काळवंडून टाकणारे. पेरलेले उगवेल का? उगवलेले पिकेल का? आणि पिकलेले चांगल्या किमतीत विकेल का? . . .  तरीही मृगाच्या आगमनप्रसंगी सगळ्या परिस्थितीवर पाय ठेवून लोक उभे रहातात. केवळ बियाणेच नाही तर इथे जगणेच नव्याने पेरले जाते.’’

तर दुसरीकडे ज्यांच्या पायाला कधीही माती लागली नाही अशांना काळ्या आईचा लळा लागला आहे. शहरालगत सहजगत्या गाडीने जाऊन ‘वीकेंड’ घालवणारे, साऱ्या योजना, अनुदान व इतर लाभ सहज घेणाऱ्या या नवशेतकऱ्यांना, आसाराम ‘काळ्या आईची लाडकी मुले’ संबोधतो. अतिशय मोजक्या शब्दांतून तो नवश्रीमंतांची मानसिकता आणि मानभावीपणा उभा करतो. विरंगुळा, गुंतवणूक म्हणून जमीन ठेवणारे हे नवशेतकरी ‘शेती आतबट्ट्याची झाली’ ही खऱ्याखुऱ्या शेतकर्‍यांची भाषा बोलतात, तेव्हा बदललेला काळ धडकी भरवतो. त्याच वेळी मोल नाकारणाऱ्या बाजारपेठेत शेतकऱ्याची पावलोपावली अडवणूक व फसवणूक कशी होते, याचं दर्शन घडतं. व्यवहारात सदैव तोटा ठरलेलाच, कमी की जास्त एवढाच तपशीलाच भाग उरतो. हात तंग झाले की सावकार गाठावाच लागतो. काळानुसार सावकारदेखील बदलत गेले आहेत. आपल्या मनातील ठाशीव प्रतिमांसारखा सावकार आता उरला नाही. गहाण खतांचे गठ्ठे बाळगून असणारे सावकार हे स्थानिक पुढाऱ्यांशी संधान साधून व्यवसाय करत राहतात. ‘शोषक’ आणि तारणहार यांच्यातील सीमारेषा धुसर झाली आहे. सावकारी प्रतिबंधक कायदा आहे. परंतु ही व्यवस्थाच नष्ट व्हावी, असे प्रयत्न होत नाहीत. ‘दोबिघा जमीन’मधील शंभू कर्जाच्या सापळ्यातून बाहेर पडण्यासाठी शहरात रक्त ओकेपर्यंत रीक्षा ओढत रहातो, असे हजारो शंभू गावात वा शहरात अडकून राहतात.

‘कापूस म्हणाला उसाला’ या बहारदार लेखात ऐन कडाक्याच्या थंडीत कापूस आणि ऊस या दोन्ही सख्ख्या शेजारी पिकांनी एकमेकांशी संवाद साधला आहे. या पिकांचं अर्थ-राजकारण आणि सामाजिक परिस्थिती खुमासदार रीतीनं व्यक्त होतं. ‘कितीही झालं तरी तू राजकीय पीक बाबा, तुझी अन् आमची बरोबरी कशी होणार? असं म्हणताना कापसाच्या डोळ्यासमोर उडीद, सोयाबीन, धान असे आपलेच भाऊ होते. कापडाच्या किंमती वाढताहेत पण आपल्याला किंमत नाही. शेतकऱ्यांनी क्विंटलभर कापूस विकला तरी दिवाळीला घरादाराचेकपडे तो घेऊ शकत नाही, याचा अनुभव कापसाने घेतला होता.’ आसाराम पिकांमधून दिसणारी श्रेणीबद्धता अशी दाखवून देतो.

राष्ट्रीय नमुना सर्वेक्षणातील आकडेवारी, ‘देशातील एकूण शेतकऱ्यांपैकी अडीच एकरपेक्षा कमी क्षेत्र असणाऱ्यांची संख्या ७५ टक्के असून त्यांचं दरमहा उत्पन्न ५२४७ रुपये तर खर्च ६०२० आहे’, असं सांगते. बँकेत शेतकऱ्याला यत्किंचित पत नाही. सहज व माफक व्याज दरात कर्ज उपलब्ध होत नाही. साहजिक सावकार हाच मार्ग उरतो. दरमहा तीन ते पाच टक्के म्हणजे दरसाल ३६ ते ६० टक्के व्याजाने कर्ज घेणे भाग पडते. शेतीमध्ये तोटा, तोटा भरून काढण्याकरिता कर्ज, चक्रवाढ व्याजाचा वा चक्रव्यूह, चक्रव्यूहातून बाहेर पडण्याचा मार्ग थेट मृत्यू! आजपर्यंतची सर्व सरकारं, सर्व जातीधर्मांचे सर्व स्तरातील लोकप्रतिनिधी अणि शाही नोकर, ‘‘कुठल्याही पद्धतीची शेती करणे, हे आरोग्यास अतिशय घातक आहे. त्यामुळे असंख्य प्रकारचे शारीरिक व मानसिक विकार जडतात. कर्करोगापेक्षा कैक पटीने अधिक वेदना सहन कराव्या लागतात. अखेरीस प्राणास मुकावे लागते.’’ हा इशारा (अवैधानिक) वर्षानुवर्षे देत आले आहेत. शेतकऱ्यांना वैज्ञानिक, आर्थिक, सामाजिक, नैतिक कुठलंही पाठबळ मिळत नाही. केंद्र व राज्य सरकारांच्या धोरणातून ‘शेती सोडा’ हाच संदेश व्यक्त होत आहे. सरकार व समाज यांचा अविर्भाव  ‘शेतकरी मरो’ असाच आहे. ‘शेती म्हणजे आपत्ती’, झाली आहे. कधी दुष्काळ तर कधी अवकाळी पाऊस! ध्यानीमनी काही असताना झोपेत धोंडा घातल्यागत घात होतो. हातातलं पीक डोळ्यांदेखत निघून जातं. वरचेवर लहरी होत जाणारं हवामान आणि दुष्ट बाजारभाव यांच्यामुळे शेतकरी स्वत:चं आयुष्य संपवू लागले.

महाराष्ट्र हा शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा केंद्रबिंदू झाला. त्यावेळी शेतमजूर आत्महत्या करत नाहीत, याचा उद्घोष वारंवार केला जायचा. याच सुमारास बुलडाणा जिल्ह्याच्या आदिवासी भागातील टिटवी या गावामध्ये महात्मा गांधी रोजगार योजनेत काम करूनही दोन वर्षं मजुरी न मिळाल्यामुळे पाच मजुरांनी एकाच वेळी आत्महत्या केल्या. पुढे चौकशी सुरू झाली. ‘त्यांनी कामच केले नाही’, ‘त्यांना अती मद्यसेवनाचे व्यसन होते,’ असे निष्कर्ष निघू लागले. एकंदरीतच रोजगार हमी योजना ही गुत्तेदार व पुढारी यांच्या तावडीत सापडली आहे. सरकारी यंत्रणा दगडी झाल्यामुळे  ‘शेवट नसलेल्या गोष्टी’ सतत घडत जातात. केवळ नेतेच नाही तर अधिकारी, माध्यमे आणि उर्वरित समाजानेही शेतकऱ्यापासून तोडून घेतले असल्यामुळे कोणाला खेद वा खंत वाटत नाही.

मराठी कथा-कवितांत अल्लड, अवखळ, वेल्हाळ आणि पाठीवर चांदणे गोंदणाऱ्या पोरी दिसत होत्या. अशा पोरी कोणत्या गावात असतात, हे माहीत नाही. खरे तर गावातल्या असंख्य पोरींचं जगणं हे रानाशी बांधलेलंच असतं. हे रान त्यांना हसण्या बागडण्याच्या वयातच जखडून टाकतं. काहींना आपल्या लहानग्या भावाला सांभाळण्यासाठी आई-बापासोबत मोलमजुरीच्या ठिकाणी जावं लागतं. टँकरच्या मागे पळावं लागतं. एखाद्या जनावराच्या गळ्याला दावं बांधून न्यावं, तशा या मुली ढोरकष्टाशी जोडल्या जातात.अनेक पोरींचं जगणं हे मुक्या हुंदक्यांनी भरलेलं असतं. अवेळी झालेलं लग्न, कधी न समजून घेणारा जोडीदार, संसाराचा ताण, आयुष्याचाच झालेला उन्हाळा आणि माहेरचे दोर तर तुटलेले...म्हणून त्यातली एखादी गळफास घेते तर एखादी अर्ध्या रात्री विहिरीचा तळ शोधते. त्याच वेळी ‘आमच्या हाडाची काडं झाली. पण तू नकु बाबा या रानच्या कोंडवाड्यात ..’ असं म्हणत अनेक आया स्वत: झिजून आपल्या मुलींना शिकायला मदत करत आहेत. कोणत्याही गावात पायी, सायकलवर, कुठे बस स्थानकावर शिकणाऱ्या मुलींचे जथ्थे दिसतात. आसाराम म्हणतो, ‘‘जे रान आपल्याला मुक्त, हवेशीर, बेबंद वाटते, त्याच रानातून त्यांना मुक्त व्हायचे आहे. बदलाची ही खूण लकाकणाऱ्या रेघेसारखी ठळकपणे दिसू लागली आहे.’’

घामाची महती गाणाऱ्या कवनांची आसारामने झकास खरडपट्टी काढली आहे. घाम गाळणाऱ्या प्रत्येकाला समृद्धी लाभत नाही. उलट कोणाच्या तरी घाम गाळण्यावर दुसऱ्याच कोणाची तरी समृद्धी अवंलबून आहे. शेतात राबताना घामाचे लोट मातीतच जिरून जातात. रस्त्यांसाठी खडी फोडणाऱ्यांच्या व डांबर ओतणाऱ्यांच्या अंगावरून घाम निथळत असतो. बांधकामांवर, वीटभट्टीवर राबणाऱ्या छोट्या मुलांचं अंग घामानं भरून गेलेलं असतं. मुळात जी गोष्ट कमालीची कष्टप्रद आहे, ती ‘देखणी’ आणि ‘सुगंधी’ कशी असेल? प्रत्यक्षात श्रमाला प्रतिष्ठा आणि कष्ट करणाऱ्याला मोल अजूनही मिळत नाही.  ‘तुझ्या कामामधून उद्या सोन्याचे रान पिकेल असा आशावाद कितीही पेरला तरी वास्तवात हे चित्र काही उतरत नाही. ‘उष्मांक जाळण्यासाठी घाम गाळणे आणि पोट जाळण्यासठी घाम गाळणे यात मोठे अंतर आहेच; पण दोहोंत पूर्वापार संघर्षही आहे. तो समजून घेतला तर घामाला सुगंध लावण्याचा भाबडेपणा कुणी करणार नाही,’ असं जळजळीत सत्य आसाराम लिहून जातो.

‘धूळपेर’मध्ये संवेदनशील मनानं शेतीजीवनाच्या ऋतुचक्राचं केलेलं सूक्ष्म निरीक्षण आणि धारदार विश्लेषण ठायीठायी अनुभवता येतं. बैलाला मिळणारी वागणूक आसारामानं इतक्या बारकाव्यांसह सांगितली आहे. ‘‘ज्याच्या  मानेवर शेतीधंद्यातल्या राबणुकीचा भार असतो, त्यालाही एक दिवस विश्रांती मिळते. मानेवर जो निबर घट्टा पडलेला असतो, तो हळद आणि तूप लावून चोळला जातो. दुसऱ्या दिवशी स्वच्छ अंघोळ, शिंगे रंगवणे, बाशिंग बांधणे, चमकदार झुली आणि मिरवणूक. हा दिवस संपला की पुन्हा मानेवर जू आणि अधूनमधून चाबकाचे फटके. हे फक्त बैलांच्याच बाबतीत घडते असे नाही. हा संबंध थेट निवडणुकांच्या राजकारणाशीही जोडला जाऊ शकतो.’’ एका वाक्यात लेखक वाचकाला कुठून कुठे घेऊन जातो.

उन्हाळा आला की पाण्यासाठी तगमग चालू होते. दिवसभर राबून रात्ररात्र पाण्यासाठी जागावे लागते. विहिरीच्या तळाशी दोरीला बांधलेले लहानगे बालक सोडून पाणी गोळा करावे लागते. कधी टँकरखाली तर कधी तलावात वा विहिरीत चिमुकले बळी जातात. वृत्तपत्रं व वाहिन्या बातम्या करतात. मंत्र्याचे दौरे,पाणी योजनांच्या घोषणा, सारे कार्याम ठरल्यासारखे पार पडतात.तरी पाण्यासाठी भटकंती वाढतच जाते. सिंचनाचा लाभ मिळेल असे सांगून हजारो शेतकऱ्यांच्या जमिनी पाण्याखाली जातात आणि धरणांचा लाभ मोठमोठ्या शहरांना होतो. तर दुसरीकडे प्रत्येक जिल्ह्यात पाच-दहा ‘पाणीदार’तयार होतात. अवर्षण, दुष्काळ या आपत्ती हव्याहव्याशा वाटणारा, त्याची ‘इव्हेंट’ करणारा आणि ती पर्वणी साधणारा वर्ग हाच आहे. दर दुष्काळात कोट्यवधी खर्ची पडतात. ‘‘मनगटात-गळ्यात सोन्याच्या साखळ्या, पांढरेशुभ्र कडक कपडे आणि बंद काचांच्या वातानुकूलित गाड्या असे ‘भगीरथाचे नवे वंशज’ कानाकोपऱ्यात दिसतात.’’ असे टँकरलॉबीचे नेमके वर्णन केलं आहे. विहिरी, ओढे-नाले-नद्या आटल्या. त्यावर इमारती उभ्या राहिल्या. आता पाणी टंचाईत होरपळणाऱ्या गावात बाटलीबंद आणि प्लास्टिक पिशवीतील पाणी सहज उपलब्ध आहे. लोकांच्या घशाची कोरड कायम रहावी, याची तजवीज चोख केली जाते.

अगतिकतेनं पावसाची वाट पाहतानाचे आकाश हे आसारामला ‘अंगावर येणारा कोरड्या आभाळाचा चांदवा’सारखे वाटते. निवडणुकीचे वातावरण म्हणजे नुसताच ‘ढगांचा गडगडाट आणि वांझोटे आभाळ’ भासतो. या काळातील वातावरण सगळीकडून वाद्यांचा जोरजोरात कानठळ्या बसवणारा आवाज. कोण कोणाशी काय बोलतोय हे समजत नाही. कुणाशी काही बोलावेसे वाटत नाही. गोंधळ-गोंगाटाने बधिरीकरण केलेले वातावरण असते. सत्तेच्या परिघात राहणारे व तिथे जाऊ इच्छिणारे यांच्यात लढत चालू असते. सत्तेचा डौलच असा असतो का। तहान-भूक विसरून ते तिथे रममाण होतात. ‘‘सत्तेचा दरारा, धाक दिसतो, त्यापेक्षा किती तरी पटीने तो अधिक असतो. सर्वसामान्यांना दिसते ते फक्त हिमनगाचे वरचे टोक. चाळीस वर्षांपूर्वी ‘सामना’ चित्रपटाने ‘या टोपीखाली दडलंय काय?’ किंवा ‘मारुती कांबळेचं काय झालं? असे प्रश्न विचारून सत्तेला हैराण केलं होतं. केवळ टोपीने दडवले जाईल एवढे तोकडे साम्राज्यही आजकालचे पुढारी उभे करत नाहीत आणि  ‘मारुती कांबळेचं काय झालं? या स्वरूपाचे प्रश्न विचारलेच जाणार नाहीत याचाही बंदोबस्त केला जातो.’’ कमीत कमी रेषांतून चित्रकार सुरेख चित्र उभे करतो अगदी त्याच रीतीनं आसाराम अतिशय अल्प शब्दात ‘सत्तेचे पर्यावरण’उभे करतो.

गेल्या काही वर्षांत कंत्राटदार, नदीच्या पात्रात हैदोस घालणारे वाळूमाफिया, गोरगरिबांच्या धान्याला काळा बाजार दाखविणाऱ्या साठेबाजांनी गावावर धाक निर्माण केला आहे. या सगळ्यांना आपापले धंदे पार पाडण्यासाठी एखाद्या राजकीय नेत्याचा आधार लागतो. आपल्या नेत्याच्या निवडणुकीत जिवाचे रान केले की नेते पाच वर्षे सगळे सांभाळून नेतात. या ‘महानुभावांचं’ टोकदार उपरोधानं वर्णन करत लेखक आपल्यासमोर ते दृश्य उभं करतो. ‘‘गावाच्या फाट्यावर सगळीकडे फलकच दिसतात. त्यांवर झळकणाऱ्या छब्यांची नाना रूपे. कानाला लावलेला मोबाईल, अभिवादनासाठी उंचावलेला हात, दोन्ही हात जोडून दिसणारी आणि अंगावर येणारी विनयशीलता. कोणाच्या मनगटात सोन्याचे ब्रेसलेट, कोणाच्या गळ्यात रुळणारी व शर्टाच्या गुंडीबाहेर आलेली सोन्याची साखळी… प्रत्येकाची विशेषणंही वेगळी. ‘कार्यसम्राट’, ‘मुलुखमैदानी तोफ’, ‘बुलंद आवाज’. या सगळ्याकडे पाहताना ‘बघतोस काय रागानं, काम केलंय वाघानं’ असा धाकही असतो. त्यातच ‘बघतोस काय, मुजरा कर’, ‘नाद करायचा नाय’ यांसारख्या दटावणीनं भानावर येतो आपण.

आजचं खेड्यापाड्याचं राजकारण कोणत्या वळणावर येऊन उभं आहे, त्याचा फाट्यावर दिसणारा हा ‘एक्स-रे’च जणू. मग लोक जगण्या-मरण्याच्या प्रश्नाबद्दल बोलायला लागले की, त्यांना इतिहासात घेऊन जाणे हा सोपा मार्ग असतो. ‘बालेकिल्ला’, ‘सूर्याजी पिसाळ’, ‘गेले ते कावळे राहिले ते मावळे’, ‘औताला तुम्ही अन् गवताला आम्ही’, ‘देव्हारा इचकटून टाकिन’ अशी त्या काळातील भाषा, वाक्प्रचार, विशेषणे वाचताना ते वातावरण हुबेहूब उभे राहते. वर उल्लेख केलेली साद आणि ‘नेते…बस्स एकच वाघ.. तुमच्यासाठी काय पण’ असा प्रतिसाद असतो. प्रत्येक क्षणी छायाचित्र काढून ते ‘व्हॉटसअ‍ॅप’ वा  ‘फेसबुक’वर कधी टाकून अधिकाधिक ‘लाइक्स’ मिळवेन ही आस इथंही आहे. हीच दांडगी मंडळी ‘सामाजिक बांधिलकी’ देखील ‘दाखवत’ असतात. स्वस्त धान्याला काळ्या  बाजारात नेणारे धार्मिक उत्सवाला अन्नदान करतात. टँकरवाले यात्रेला ‘धर्मार्थ’ पाणपोई काढतात. कधी मंदिराचे छत, सभागृह बांधून आकर्षक वेष्टनातील ‘बांधिलकी’ दाखवतात.

आजही गावात बहिष्काराची झळ सोसणारे दलित आहेत. त्यांना गावात राहणे हे ‘उशाखाली सरप घेऊन झोपल्यासारखं वाटतं’ वसमत तालुक्यातील नारायण धुळे हे दुसऱ्यांच्या बांधावर शेळ्या चारत होते. तोपर्यंत सगळे ठीक होते. त्यांनी बचतीतून जमीन घेतली आणि नकळत शतू निर्माण करून घेतले. खटले चालू केले. न्यायालयाने धुळे यांच्या बाजूने निकाल दिला आणि ते जमिनीचा ताबा घ्यायला निघाले, तेव्हा त्यांना धरून त्यांचे दोन्ही डोळे चाकूने काढून टाकले. हे सांगणारी आसारामची भेदक लेखणी आपल्याला टोचू लागते, ‘‘आता खेड्यात कुठे जातीयता शिल्लक राहिलीय? आता कुठे अस्पृश्यतेचे चटके बसतात? असा प्रश्न विचारण्यारांना आसाराम सांगतो, ‘‘वरच्या जातीतल्या मुलीशी बोलण्याची सजा ही आयुष्यातूनच संपविण्यापर्यंत जाते. ‘खैरलांजी ते खर्डा’ ही अत्याचाराची न संपणारी मालिका हेच सांगते की, आम्ही महासत्तेच्या कितीही गप्पा मारीत असलो तरी दलितांच्या पदरात जे निखारे टाकले आहेत, त्याचे चटके आजही जाणवतात’’, अशा वेळी गावातील जाणकार सांगतात, ‘‘आधी लोक शिवाशीव करू द्यायचे नाहीत,पण जगू द्यायचे. आता शिवाशीव करू देतात,पण जगू देत नाहीत.’

मागील काही वर्षांत दळवळणाची साधने आणि माध्यमे यामुळे गाव आणि शहर यांच्यातल्या सीमारेषा पुसून गेल्या आहेत. शहरी आणि निमशहरी असं त्यांचं स्वरूप आहे. आपल्या देशात आधुनिकीकरण धड रुजलेलं नसतानाच अत्याधुनिक तंत्रज्ञान येऊन आदळलं. त्यातून गावात निर्माण झालेल्या एका विचित्र अवस्थेचं वर्णन करताना आसाराम सांगतो, ‘‘सर्व काही बदलले आहे आणि प्रगत जग अस्तित्वात आले आहे, असे म्हणावे तर पावलोपावली ठेचकाळायला लावणारे प्रश्न आहेत. सगळीकडे वाताहत झाली, असे म्हणावे तर काही कल्याणकारी खुणा दिसू लागतात. निबिड असा घनघोर अंधार नाही आणि आसमंत उजळून टाकणारी आश्वासक सकाळही नाही, अशी संधीकालाची अवस्था सर्व खेडी अनुभवत आहेत.’’ वर्तमानातील वास्तव अचूकपणे पकडण्यासाठीची तीक्ष्ण नजर लागते. हे वास्तव संवेदनशीलपणे न्याहाळत ते संयमीपणाने तरीही थेट तसेच व्यक्त करणे याला विलक्षण प्रामणिकपणा आणि धैर्य लागते. ‘‘प्रेम नक्कीच आहे म्हणून फाजील लाड चालणार नाहीत.’’ असं सांगणारे पालक, शिक्षक जसे दुर्मीळ आहेत, तसेच असा लेखक लाभणे दुर्लभ आहे.

गावातली (आणि शहरातली) दांडगाईची संस्कृती वाढीस लागत असताना त्याविरोधात किंचितही प्रतिक्रिया दिसत नाही. सार्वजनिक ठिकाणी भांडण, धडधडीत अन्याय, अशा प्रसंगीसुद्धा ‘आपला काय संबंध?’, ‘मी कशाला कडू वाळकं तोडू?’ हे ब्रीदवाक्य झालं आहे. व्यापारी वा व्यावसायिक सर्वांशी गोड बोलून धंदा वाढवतात, ही रीत सार्वत्रिक झाली आहे. अशा सर्व संचारी आणि लोकप्रिय व्यक्तींचा ‘अजातशतू’ गौरव केला जातो. कधीच भूमिका न घेणे, योग्य वेळी अलिप्तता धारण करणे, या गुणांमुळे संबंधांची साखळी मोठी होत जाते. विंदा करंदीकर यांनी ‘सज्जनाचे बळ, पायामध्ये लुळे’ अशी स्थिती सांगितलेल्या व्यक्तींची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याची आसारामला चिंता वाटते. त्यामुळे चळवळींना बळ देणाऱ्या भाषेतला जोम ओसरून चळवळी मंदावल्याची खंत त्याला वाटते. परंतु हे सांगताना कुठेही कढ न काढता, तसेच कुचेष्टा न करता, जिव्हाळा असूनही कटू सत्याला तो आपल्याला भिडवतो.

‘धूळपेर’मधील प्रत्येक निबंध हा अत्यल्प शब्दात अतिशय विशाल अवकाशाचं दर्शन घडवणारा आहे. त्यात अनेक चित्रपटांची, शोधनिबंधांची बीजं आहेत. कुठलाही निबंध कधीही वाचला तरी पुस्तक हातातून सुटत नाही. वाचल्यावर आपण होतो तसे रहात नाही. सद्यकाळातील वाढत जाणारी आत्ममग्नता आणि असंवेदनशीलता यांचं पीक पाहून आसाराम वेदनेनं व्याकूळ झाला आहे. आपलीही अवस्था सैरभैर होऊन जाते. हे वाचून आपल्या मनात बदल घडवण्याचे बी रुजेल, संभ्रम आणि कुंठित अवस्थेचे मळभ दूर होऊन प्रभात प्रसन्न होईल, साहचर्य, सहकार्य, सुसंवाद यांचं भरघोस पीक येईल, ही आस घेऊन आसारामने तर ‘धूळपेर’ केली आहे. प्रश्न आपला आहे.

.............................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/client/book_detailed_view/2453

.............................................................................................................................................

लेखक अतुल देऊळगावकर प्रसिद्ध लेखक व पर्यावरण तज्ज्ञ आहेत.

atul.deulgaonkar@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘बहिष्कृतां’च्या घरचे अन्न ‘बहिष्कृतां’प्रमाणेच उपेक्षिले गेले. त्यामुळे ‘ब्राह्मणेतर खाद्यसंस्कृती चळवळी’ने आपली ‘देशी’ बाजू जगापुढे मांडायला सुरुवात केलीय...

स्वच्छता व शुद्धता या दोहोंना अस्पृश्यतेचा मोठा संदर्भ आहे. ज्यांना शिवायचे नाही ते अस्पृश्य. त्यांनी जवळ यायचे नाही की, शेजार करायचा नाही, हा ब्राह्मण व सवर्ण यांचा नियम. घाणीची कामं ज्यांना वर्णाश्रम धर्माप्रमाणे करायला लावली, त्यांना घाण समजून अस्पृश्य ठरवण्यात आले. साहजिकच ही माणसं कशी जगतात, काय खातात-पितात, काय विचार करतात, याची जाणीवच वरच्या तिन्ही वर्णांना म्हणजेच सवर्ण जातींना नव्हती.......

किणीकरांना सगळी दर्शने कळत होती आणि अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती काव्यात उतरवता येत होती. आणि अजून मोठी गोष्ट म्हणजे ते काव्य चार ओळींपुरते सुटसुटीत ठेवता येत होते

किणीकरांवर मानवेंद्रनाथ रॉय ह्यांच्या विचारसरणीचा मोठा प्रभाव होता. त्यांच्या नावावरूनच त्यांनी स्वतःला ‘रॉय’ हे नाव घेतले होते. रॉय यांनी 'रॅडिकल ह्यूमॅनिझम’चा पुरस्कार केला. त्या काळच्या महाराष्ट्रात अनेक नेत्यांवर, लेखकांवर आणि विचारवंतांवर रॉय ह्यांचा प्रभाव पडला होता. रॉय ह्यांनी क्रांतीचा मार्ग नाकारला असला, तरी त्या काळी तरुण असलेल्या किणीकरांना मनात कुठेतरी क्रांतीचे आकर्षण वाटले असणार.......

म्हटले तर हा ग्रामीण राजकारण उलगडून सांगण्याचा खटाटोप आहे अन् म्हटले तर शेतकऱ्यांना लुबाडणाऱ्या व्यवस्थेला पर्याय उभे करणाऱ्या पुढच्या पिढीतील शेतकरी तरुणांचा संघर्ष आहे

ही केवळ भानुदासराव पाटील, विक्रम शिंदेचीच कथा नाही, तर आबासाहेब जाधव, दिनकरराव पाटील यांच्यासारख्या लोकशाही प्रक्रियेने उदयास आलेल्या नव्या सरंजामदारांचीही गोष्ट आहे. आर्थिक संसाधनांच्या बळावर वाट्टेल तेवढा पैसा मोजून निवडणुका जिंकणारे, मतदारांचा कौल फिरवणारे आबासाहेब, दिनकरराव केवळ हैबतपुरातच नव्हे, महाराष्ट्रात सगळ्याच मतदारसंघांत दिसून येतात, पण.......

या पुस्तकातल्या ‘बिटविन द लाईन्स’ नीट वाचल्या, तर आजच्या मराठी पत्रकारितेची ‘अवनत’ अवस्था आणि तिची ‘ऱ्हासपरंपरा’ नेमकी कुठून सुरू झाली, हे लख्खपणे समजते!

आपल्या गुणी-अवगुणी सहकाऱ्यांकडून उत्तम ते काढून घेण्यापासून, समाजातल्या व्यक्ती-संस्था यांचं योगदान नेमकेपणानं अधोरेखित करण्यापर्यंत बर्दापूरकरांचा सर्वत्र संचार राहिला. त्यामुळे त्यांच्या पत्रकारितेला सत्त्व, नैतिक बळ आणि गांभीर्याची झळाळती झालर लाभत राहिली. आजच्या मराठी पत्रकारितेच्या संदर्भात त्या झालरीचा ‘थर्मामीटर’ म्हणून वापर केला, तर जे ‘तापमान’ कळतं, ते काळजी करावं, असंच आहे.......

लोकशाहीबद्दल आस्था किंवा काळजी व्यक्त करणं, ही काही लोकांचीच जबाबदारी आहे, हा समज खोडून काढायचा तर कामच केलं पाहिजे. ‘लोकशाही गप्पा’ हे त्या व्यापक कामाच्या गरजेतून आलेलं छोटंसं काम आहे

पुरेशी मेहनत करून आणि संवादाच्या सर्व शक्यता खुल्या ठेवून लोकांशी बोललं गेलं, तर प्रत्येकाच्याच आकलनात वाढ होते. आणि हळूहळू भूजलाची पातळी उंचवावी, तसं लोकशाहीबद्दलचं भान सखोल होण्याची शक्यता निर्माण होते. आपल्या भोवतीच्या गदारोळातून एकमेकांचा हात धरून, एका सजग आणि जिवंत लोकशाहीच्या मुक्कामापर्यंत मैदान मारणं आपल्याला सहज शक्य आहे. त्यासाठी एकमेकांना शुभेच्छा देणं एवढं तरी आपण करूच शकतो. ते मनःपूर्वक करू या!.......