“पोटगी हा हक्क आहे आणि तो मिळवायचाच!” - शहनाज शेख
सदर - रौशनख़याल तरुण
हिनाकौसर खान-पिंजार
  • शहनाज शेख
  • Thu , 01 March 2018
  • रोशनख्याल तरुण शहनाज शेख Shahanaz Shaikh

बहुतांश तलाकपीडित स्त्रियांमध्ये एक सामायिक गोष्ट काय असते. त्यांच्या पतीनं त्यांची मर्जी जाणून न घेता, किंबहुना त्यांना कसलीच पूर्वसूचना न देता थेट तलाकनामा पाठवून दिलेला असतो. काही जण पत्नीच्या तोंडावर तीन वेळा ‘तलाक’ असा उच्चार करून नातं संपल्याचं जाहीर करतात. काही तर अगदीच तंत्रस्नेही झालेले आहेत. फोन, व्हॉटसअ‍ॅप, ई-मेल करूनही तलाक देण्याचे प्रकार घडत आहेत. अशा कोणत्याही प्रकारे तलाक झाला असं पतीनं घोषित केलं की, पत्नी व तिचं माहेर हतबल होऊन हा अन्याय सहन करत राहतात. कळत-नकळत हा एकतर्फी तलाक मान्य करतात. 

बायका स्वत:ला ‘तलाकपीडित’/‘तलाकशुदा’ मानू लागतात. एकदा का तलाक मान्य झाला की, मुस्लिम पर्सनल लॉनुसार पोटगी वगैरेचा प्रश्नही बादच होतो. असं सर्रास सगळीकडं होताना दिसतं. काही वेळा बायका याविरुद्ध न्यायालयात जातातही, मात्र वकिलांच्या अपुऱ्या ज्ञानाच्या मेहेरबानीमुळे त्यांची आशा फोल ठरते. वकील कमी पडतोय याची जाणीव खचलेल्या बायकांना नसते. मग एक दिवस त्या केस हारतात आणि सगळीच उमेद हरवून बसतात. अशी नामुष्की बहुतेक जणींवर ओढवते.

मात्र शहनाज शेख या तरुणीनं तिच्या तलाक प्रकरणाशी खंबीरपणे दोन हात केले. पतीनं भलेही नोटिशीद्वारे तलाक दिला म्हणून कांगावा केला तरी आपण मुळी ‘तलाकशुदा’ नाही आहोत, यावर तिनं न्यायालयाकडूनच शिक्कामोर्तब करून घेतलं. अवघ्या अठ्ठावीस वर्षाच्या या तरुणीचं हे धाडस इतर तलाकपीडित महिलांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरणारं आहे.

लग्नाच्या वेळेस जर नियोजित वधूला प्राधान्य देऊन तिची संमती आधी घेतली जाते, तर तलाक तिच्या संमतीशिवाय कसा शक्य आहे, हा एक प्रश्न तिच्या विस्कळीत झालेल्या आयुष्याची घडी बसवण्यासाठी कामी आला. तलाकपीडित अनेक कुटुंबांनाही हा प्रश्न सतावतोच, पण शहनाजनं या प्रश्नातील अस्वस्थतेलाच आपली ढाल बनवत न्यायालयात त्यांच्याविरुद्ध लढण्याची हिंमत केली, ती ही स्वबळावर. लौकिक अर्थानं न्यायालयातील केससाठी तिच्याकडे वकीलही होता, मात्र त्याच्याकडे पुरेसं ज्ञान नव्हतं. म्हणतात ना, न शिकलेल्यापेक्षा अर्धवट शिकलेला अधिक त्रासदायक असतो. तसंच ज्ञानी नसलेल्यापेक्षा अर्धवट ज्ञान असणारा अधिक घातक असतो. शहनाजच्या वाट्याला हे घातक सत्य होतं.

मग काय? वकील बदलत राहण्यापेक्षा अन प्रत्येकाच्या घरी आपल्या आईबाबांची कमाई घालवण्यापेक्षा तिनं वेगळा मार्ग स्वीकारला. स्वत:च कायद्याचा अभ्यास करण्याचा आणि केसची माहिती गोळा करण्याचा मार्ग. तिच्या या अभ्यासानं तिला पूर्णपणे तारलं आणि तिचा तलाकच मुळी वैधरीत्या झाला नसल्याचं न्यायालयानं स्पष्ट केलं. पण शहनाज इथंच थांबली नाही. तिनं तिच्या पोटगीच्या अधिकाराचीही पतीला आठवण करून दिली, अर्थात तीही कायद्याच्या वाटेनं. त्यात ती यशस्वीही झाली. ‘तलाकशुदा’ हा लोकांनी मारलेला शिक्का कायदेशीररीत्या पुसून काढण्यात आणि पोटगी मिळवण्याच्या लढ्यात ती पातळ्यांवर यशस्वी ठरली. अर्थात हे तितकं सोपं नव्हतंच!

कराडच्या शहनाजनं डीएमएलटीचं (DMLT, Diploma in Medical Laboratory Technology) शिक्षण घेतलं आणि शिक्षण संपताच तिला बीएएमएस (BAMS, Bachelor of Ayurvedic Medicine and Surgery) झालेलं स्थळ चालून आलं. वधू-वराचा व्यवसाय एकमेकांना पूरक ठरत असल्यानं दोन्ही पक्षांकडून या विवाहास संमती मिळाली. २४ व्या वर्षी शहनाजचं लग्न झालं. पंधरा दिवसांनी ती तिच्या सासरच्या लोकांबरोबर पतीचं क्लिनिक बघायला गेली, तेव्हा तिला पहिला धक्का बसला. सासरच्यांनी सांगितलेलं आडनाव अन प्रत्यक्षातील आडनाव वेगळं होतं. ही एक प्रकारची फसवणूकच होती. शहनाजनं त्याबाबत सासरी जाब विचारला. परिणामी वेगवेगळ्या पद्धतीनं तिचा जाच सुरू झाला. कितीही केलं तरी आता लग्न झालंच आहे तर राहायचंच, असा विचार करून सुरुवातीला शहनाजनं सासरच्या मंडळींच्या या फसगतीकडे आणि त्यांच्या त्रासाकडेही दुर्लक्ष केलं.

मात्र पुढच्या काही दिवसांतच त्यांनी तिच्याकडे माहेराहून क्लिनिकल लॅबोरेटरी सेटअपसाठी ते चार लाख रुपये आणण्याची मागणी केली. दिवसेंदिवस पैशांसाठीचा तगादा वाढला आणि शाब्दिक छळ, मानसिक त्रास प्रसंगी मारहाणही होऊ लागली. शेवटी अत्याचार सहन न होऊन शहनाजनं पोलिस तक्रार देण्याचं धाडसं केलं, मात्र तो प्रयत्न अयशस्वी झाला.

या घटनेच्या दुसऱ्या दिवशी सासूनं तिला लिंबू सरबतातून विष दिलं आणि तासाभरानंतर सूनेनंच आत्महत्येचा प्रयत्न केला म्हणून कांगावा केला. शेजाऱ्यांनी मात्र प्रसंगावधान राखत शहनाजला इस्पितळात नेण्यासाठी तिच्या पतीला बोलावून घेतलं. त्यानंतर तिला इस्पितळात दाखल करण्यात आलं. विष प्राशनाचं प्रकरण असल्यानं पोलिस तक्रार झाली. तिला शुद्ध आल्यानंतर तिनं सासूविरुद्ध तक्रार करू नये, यासाठी पुन्हा एकदा ‘तलाक’ची भीती घालण्यात आली. तिनं तक्रार मागे घेतली नाही. शेवटी ती पूर्ण बरी झालेली नसतानाच तिला जबरदस्तीनं इस्पितळातून घरी नेण्यात आलं आणि पुन्हा तलाकचं पालपद चालू ठेवण्यात आलं. या कशालाच ती बधत नव्हती. शेवटी सासरच्यांनी तिला रमजान ईद येत असल्यानं चार दिवस माहेरी जाण्यास सांगितलं. ईदनंतरही तिला नेण्यासाठी कोणी आलंच नाही.

नुकताच सुरू झालेला संसार एकाएकी मोडू नये म्हणून सर्वोतपरी प्रयत्न करण्याची तिनेच तयारी दाखवायचं ठरवलं अन महिना-दोन महिने वाट पाहून शेवटी शहनाज स्वत:च सासरी परतली. मात्र पतीनं तिला दारातूनच हाकलून दिलं. पुन्हा कधीही येऊ नये म्हणून सुनावलं. ती खचून माहेरी परतली. यानंतर पतीनं आठ दिवसांतच रजिस्टर पोस्टानं तलाकनामा पाठवून दिला. वर पुन्हा वर्तमानपत्रातून तलाकची जाहीर नोटीस देऊन तिला व तिच्या कुटुंबियांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला. या सगळ्याचा पंचवीशीतल्या शहनाजवर नकारात्मक परिणाम झाला. ती खचली. मात्र थोड्याच दिवसांत थोडंसं सावरल्यानंतर आपण हे सगळं निमूट सहन का करायचं असा प्रश्न तिला पडला आणि तिनं याविरुद्ध उभं राहण्याचा निश्नय केला. तिनं न्यायालयात खटला दाखल केला.

लग्नासाठी जर सहमती आवश्यक आहे, तर एकतर्फी तलाक कसा मान्य करायचा, या एका प्रश्नाला घेऊन शहनाज न्यायालयात गेली. तिथं सुरुवातीला एका मागून एक नुसत्या तारखा मिळत होत्या. आता आप्तेष्ट, ओळखीपाळखीचे, वकील सगळेच जण तिला ‘तलाकशुदा‘ म्हणू लागले. शहनाजला हा ‘तलाकशुदा’ शब्द खटकू लागला. ‘ज्यात माझी संमती नाही, मला विचारणा केली नाही, अशा परिस्थितीत माझं लग्न मोडलं. मग मी घटस्फोटित असं कसं होऊ शकतं?,’ याचा छडा लावायचा तिचा निश्चय दृढ होऊ लागला.

त्यातच वकील मंडळी तिला सांगू लागली की, तू आता तलाकशुदा आहेस तर तुला मुस्लिम पर्सनल लॉप्रमाणे पोटगी मिळणार नाही. या गोष्टीची सासरच्यांना जाणीव असल्यानं ते न्यायालयाच्या आवारात तिच्याकडे पाहून हसायचे आणि या केसमुळे त्यांचं काहीच कसं बिघडत नाही म्हणून चिडवायचे. तिला मानसिक त्रास देत रहायचे. या सगळ्यामुळे नाही म्हटलं तरी शहनाजला खचायला व्हायचं. स्वत:साठी नाहीतर इतर पीडितांसाठी आपल्याला काही करता येईल का, या विचारानं तिनं एलएलबीचा (कायद्याचा) अभ्यास करण्याचं ठरवलं. स्वत:च्या केसविषयी सखोल माहितीही होईल आणि अन्य पीडितांसाठी हेल्पिंग हँड होता येईल, हा दुहेरी हेतू तिच्या मनात होता.

पहिल्याच सत्रात तिला ‘डायवोर्स अंडर मुस्लिम लॉ’ हे प्रकरण आणि शहाबानोची प्रसिद्ध केस अभ्यासायला मिळाली. या दोन्हींमुळे पुन्हा तिच्या मनात नकारात्मक भावनेनं जन्म घेतला. ६२ वर्षांच्या शहाबानोला सर्वोच्च न्यायालयानं पोटगी मंजूर केल्यानंतरही तत्कालिन शासनानं मुस्लिम महिला अधिनियम जारी केला. त्यानुसार पतीनं तलाक दिल्यानंतर तो पोटगीपासून मुक्त होतो. या सगळ्या अभ्यासामुळे तिला ९९ टक्के वाटू लागलं की, ती केस हरणार. मात्र कुठेतरी एक टक्के तिला आपण ‘तलाकशुदा’ नाही आहोत, स्वत:च्या आत्मसन्मानासाठी आपण लढलचं पाहिजे, असंही वाटत राहिलं. त्यातूनच मग तिनं अधिक माहिती गोळा करण्यास सुरुवात केली. तिच्या वकिलांना ती वेगवेगळे प्रश्न विचारू लागली, असं कसं एकतर्फी तलाक मंजूर करायचा, पोटगी का मिळणार नाही? तो एकाएकी सगळी जबाबदारी कशी झटकू शकतो? संविधानापुढे तर सर्व समान आहेत, मग इथंच का वेगळा नियम?

मात्र या प्रश्नांची वकिलालाही नीटशी उत्तर देता येत नव्हती. ते तिलाच गप्प करत व आपण २०-२५ वर्षांपासून कायदा हाताळत असल्याच सुनावत. वकिलांचं ज्ञान अर्धवट असल्याचं तिच्या लक्षात आलं. हा वकील आपल्या बाजूनं नाही तर विरोधातच केसचा निकाल लावणार हेही तिला कळून चुकलं. मात्र तिच्याकडेही पुरेशी माहिती नव्हती. त्यामुळे वकिलाचा आधार घेणं भाग ठरत होतं. यातून मार्ग काढण्यासाठी तिनं स्वत:च शरियत कायद्याचा अभ्यास सुरू केला. लॉ कॉलेजमधील एक प्राध्यापक, खैरनार यांनी तिला यासाठी मार्गदर्शन केलं. तलाकचा अभ्यास पुस्तकांबाहेर करण्याचा सल्ला दिला.

त्यातच तिला आणखी एक गोष्ट लक्षात आली की, ‘कुरआन’ हा इस्लाम धर्माचा मुख्य स्त्रोत आहे, तर त्याचाही अभ्यास करायला हवा. अभ्यासांती तिच्या लक्षात आलं, ‘कुरआन’मध्ये नमूद  केल्याप्रमाणे जर तलाक दिला असेल तरच तो वैध ठरू शकतो. चुकीच्या पद्धतीनं, गैर इस्लामी मार्गानं तलाक झाला असल्यास तो वैध ठरत नाही. तो तलाक इस्लामलाच मान्य नाही. एका वेळी तीनदा ‘तलाक’ हा शब्द उच्चारलं की, नातं तुटत नाही. कारण तो चुकीच्या पद्धतीनं दिलेला तलाक आहे. काझी आणि साक्षीदारांसमोर तीन महिन्यांच्या कालावधीत एकेकदा तलाक म्हणायचं. त्या तीन महिन्यांच्या काळाला ‘इद्दत’चा काळ म्हणतात. या काळातही पत्नी-पत्नी एकत्र राहतात. पण तिचा तलाक या पद्धतीनुसार झालेला नव्हता.

दरम्यान तिनं मोठ्या मनानं, न्यायालयाच्या प्रक्रियेनुसार समुपदेशनाचा मार्गही स्वीकारला, मात्र पतीनं पुरुषी अहंकार जोपासत त्यास सकारात्मक प्रतिसाद दिला नाही. याउलट केस सुरू असतानाच त्यानं दुसऱ्या लग्नाचा घाट घातला. तिच्या कानावर ही माहिती गेल्यावर तिनं तातडीनं वकिलाला असं करण्यापासून मनाई हुकूम घेण्यास सुचवलं. अद्याप तलाकच वैध आहे की अवैध हे ठरायचं असताना दुसरं लग्न तो कसं करू शकतो, किमान केस संपेपर्यंत तो दुसरं लग्न करू शकत नसल्याचं न्यायालयाच्या निदर्शनास आणून द्यावं व तसा हुकूम घ्यावा यासाठी ती विनवत राहिली. मात्र वकिलानं तिचं ऐकलं नाही. शेवटी नवऱ्यानं गुपचूप लग्नही केलं. आता तिच्यापुढची वाट अधिकच बिकट झाली होती. तरीही तिनं हिंमत सोडली नाही.

वकिलापुढं हतबल होण्यापेक्षा तिनं स्वत:च इंटरनेटच्या माध्यमातून वेगवेगळ्या केसेस शोधायला सुरुवात केली. उच्च आणि सर्वोच्च न्यायालयातील वैध तलाकच्या केसेस शोधून काढल्या. गैरमार्गानं दिलेला तलाक अमान्य झाल्याच्या केसेस शोधून काढल्या. या अभ्यासामुळे तिच्यात पुन्हा आत्मविश्वास निर्माण झाला. आपला तलाक हा वैध नाही आणि पतीवरच आपल्या उदरनिर्वाहाची जबाबदारी आहे, हे तिला पटू लागलं. आता ते फक्त न्यायालयात सिद्ध करायचं होतं. तिनं वकिलांना याबाबत माहिती दिल्यावर त्यांनी तिला त्यांच्या इतक्या वर्षांच्या प्रॅक्टिसविषयी सांगायला सुरुवात केली. ते तिचीच अक्कल काढू लागले. या सगळ्याचा परिणाम केसवर होऊ लागला.

शेवटी तिनं वकिलांना विनंती केली की, ‘तुमची खूप वर्षांची प्रॅक्टिस आहे अन तुम्हाला माझ्यापेक्षा अधिक कळतंही. मला हे सगळंच मान्य आहे. पण प्रश्न माझ्या केसचा आहे. त्यामुळे सहकार्य करा आणि मी केलेल्या अभ्यासाचा उपयोग करून घ्या. उलटतपासणी घेताना मी काढलेले प्रश्न विचारा.’ सुरुवातीला आढेवेढे घेणारा, तिचीच अक्कल काढणारा वकीलही थोडा खजिल झाला आणि त्यानं तिला सहकार्य करण्याची पूर्ण तयारी दाखवली. तिनं काढलेले प्रश्न त्यानं प्राधान्यानं विचारले. न्यायालयात इतर पुरावा आणि उलटतपासणीच्या वेळी तिच्या सगळ्या नोटसचा फायदा होऊ लागला. तिनं एकतर्फी दिलेला तलाक सर्वोच्च न्यायालयानं अवैध ठरवल्याच्या केसेस सादर केल्या. कलम १२५ अन्वये ती पोटगीस पात्र असल्याचंही तिनंच सिद्ध केलं.

फक्त ते सगळं मांडण्यासाठी वकील हा मध्यस्थ म्हणून वापरला. स्वत:ची केस तिनं स्वत:च्या हिंमतीवर लढवली. आणि शेवटी केस दाखल झाल्यापासून दोन वर्षं सात महिन्यानंतर म्हणजे जुलै २०१५ मध्ये केसचा निकाल आला- ‘ ‘शहनाज तलाकशुदा नाही’ असं न्यायालयानं निकालपत्रात जाहीर केलं. नवरा-शहनाजमध्ये वैवाहिक संबंध आहेत आणि पत्नी या नात्यानं ती कलम १२५ अन्वये व कौटुंबिक हिंसाचारापासून संरक्षण या कायद्यान्वयेही पोटगीसाठी पात्र ठरते. तिला पोटगी मिळण्याचा पूर्ण अधिकार आहे. गप्प न राहता स्वत: कष्ट करून तिनं केसचा निकाल पदरात पाडून घेतला. ती केस जिंकली.

आता तिच्या नवऱ्याला दुसऱ्या पत्नीकडून एक अपत्यही झालं आहे. तरीही त्याच्या डोक्यावर अद्याप टांगती तलवार आहे, ती ४९८ केसची. कौटुंबिक हिंसाचाराची. ही केस अद्याप सुरू झालेली नाही. ती शहनाजनं माघारी घ्यावी यासाठी पुन्हा दबावतंत्र आणि तडजोडीची भाषा केली जात आहे. मात्र परिस्थितीचा एकटीनं झगडा दिलेली शहनाज माघार घेणाऱ्यांपैकी नाही, हे अद्याप त्यांच्या लक्षात आलं नसावं. त्या केसमध्ये नवऱ्याकडंच संपूर्ण कुटुंब अडकलेलं आहे. अद्याप आपल्यावरच्या अन्यायाची त्यांना जाणीवच नाही, तर केस माघारी का म्हणून घ्यायची असं शहनाजला वाटतं. स्वत:च्या हिंमतीवर केसची सगळी दिशा बदलवणाऱ्या शहनाजला आता माघार घ्यायचीच नाहीये.

स्वत:च्या या अनुभवातून तावून सुलाखून निघालेली शहनाज म्हणते, “स्त्रियांनी तलाकची नोटीस आल्यानंतर खचून न जाता स्वत:च्या आत्मसन्मानासाठी उभं रहायला हवं. मुळात असा तलाकच मान्य करायचा नाही. न्यायालयात ते सिद्ध करणं आता तितकंसं अवघड नाही. अनेक बेंचमार्क केसेस आहेत, ज्यात अशा पद्धतीनं दिलेला एकतर्फी निकाल अवैध ठरवला गेलाय. आणि पत्नीची जबाबदारी ही पतीचीच असते. त्यामुळे पोटगी मागायलाही लाजायचं किंवा घाबरायचं कारण नाही. अनेकदा वकील शहाबानो केसचा दाखला देऊन पोटगी मिळणार नसल्याचं सांगतात, मात्र कौटुंबिक हिंसाचार कायदा हा कोणत्याही धर्मातील स्त्रीला पोटगीचा अधिकार देतो आणि कलम १२५ अन्वये कौटुंबिक न्यायालयातही कोणत्याही स्त्रीला पोटगी मिळू शकते हे विसरता कामा नये. स्वत: कमावत्या झालो म्हणून पतीला जबाबदारी मुक्त करण्याचं कारणच काय? पोटगी हा हक्क आहे आणि तो मिळवायचाच.”

याशिवाय “केस सुरू होताच पतीनं दुसरं लग्न करू नये यासाठी ही मनाई हुकूम घ्यायचं हे सुचवायला विसरत नाही. प्रत्येक स्त्रीला घटस्फोटच हवा असतो असं नव्हे. नांदायलाही जाण्यास काही तयार असतात, मात्र नवऱ्यानं अहंकारानं दुसरं लग्न केलं की, तिची वाट पुन्हा बंद होते आणि झालीच तरी नव्या उमेदीनं जगायचं”, असंही शहनाज सांगते.

.............................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/client/book_detailed_view/4383

.............................................................................................................................................

लेखिका हिनाकौसर खान-पिंजार या मुक्त पत्रकार आहेत.

greenheena@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

Post Comment

vishal pawar

Tue , 06 March 2018

सलाम....


Sourabh suryawanshi

Fri , 02 March 2018

खूपच छान लेख awareness is required among people...


anirudh shete

Thu , 01 March 2018

तलाक या मुद्द्यावर उत्कृष्ट विवेचन आहे ... पण पोटगी मिळण्यासाठी जेव्हढा संघर्ष केला जात आहे तेव्हढा संघर्ष शिक्षण सुधारणासाठी केला तर समस्त मुस्लिमांच्या भावी पिढ्या आपल्या ऋणी राहतील


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

जर नीत्शे, प्लेटो आणि आइन्स्टाइन यांच्या विचारांत, हेराक्लिट्स आणि पार्मेनीडीज यांच्या विचारांचे धागे सापडत असतील, तर हे दोघे आपल्याला वाटतात तेवढे क्रेझी नक्कीच नाहीत

हे जग कसे सतत बदलते आहे, हे हेराक्लिटस सांगतो आहे आणि या जगात बदल अजिबात होत नसतात, हे पार्मेनिडीज सिद्ध करतो आहे. आपण डोळ्यांवर अवलंबून राहण्यापेक्षा आपल्या बुद्धीवर अवलंबून राहिले पाहिजे, असे पार्मेनिडीजचे म्हणणे. इंद्रिये सत्याची प्रमाण असू शकत नाहीत. बुद्धी हीच सत्याचे प्रमाण असू शकते. यालाच बुद्धिप्रामाण्य म्हणतात. पार्मेनिडीज म्हणजे पराकोटीचा बुद्धिप्रामाण्यवाद! हेराक्लिटस क्रेझी वाटतो, पण.......