वैताग, करुणा आणि उदासी या तीन पेड्यांची पाऱ्यासारखी कविता
ग्रंथनामा - शिफारस\मराठी पुस्तक
डॉ. आशुतोष जावडेकर
  • ‘शून्य एक मी’ या कवितासंग्रहाचं मुखपृष्ठ
  • Fri , 16 February 2018
  • ग्रंथनामा Granthnama शिफारस शून्य एक मी Ek Shunya Mee पी. विठ्ठल P. Vitthal

पी. विठ्ठलच्या पहिल्याकविता संग्रहाबद्दल बोलताना मी डोंबिवलीच्या साहित्य संमेलनात म्हटलं होतं - आणि तो समोरच होता तेव्हा – की, विठ्ठलच्या कविता वाचताना एखादा धीरगंभीर पुरुष मुक्यानं पावसाळी मध्यरात्री आसवं ढाळतो आहे असं वाटतं. त्या कवितांमधलं व्यक्ती व समष्टी यांना जोडणारं आणि तोलणारं करुणेचं जे आभाळ आहे, ते निरखताना मला तसं वाटलं होतं. आणि त्याच कवीचा हा दुसरा कवितासंग्रह माझ्या पुढ्यात आहे – ‘शून्य एक मी’ अशा शीर्षकाचा. आणि तो संग्रह वाचताना मला जाणवतंय की, इथं करुणा तर आहेच; पण त्या जोडीला करुणेच्या आधीचा वैताग आहे आणि करुणेपुढची जी गडद उदासी असते तीही आहे. वरवर बघताना असं वाटू शकतं - आणि पहिल्यांदा कवितासंग्रह वाचल्यावर मला असंच वाटलेलं - की या संदर्भात कवी व्यक्तिगततेतून बाहेर झेपावतो आहे. सामाजिक नजर इथं विस्तारली आहे. नवमध्यमवर्गीयतेचा पायरव इथं आहे. ब्लर्बमध्ये प्रवीण बांदेकरांनी म्हटलंय तसं, ‘आक्रमक बाजाराच्या नव्या मूल्यांनी आपले आजवरचे जगण्यातील सत्व मिळाल्याची ‘तगमग’ ही आहे.’

आणि हे आहे सारं या कवितेत. पण तेवढंच नाहीये त्यात आणि जे आहे त्यानं या साऱ्याचे संदर्भही बदलत जाताहेत. दोन तऱ्हांनी समाज तसाही अभ्यासला जाऊ शकतो. व्यापक नजरेनं समूहांना न्याहाळत किंवा मग एकच एक माणूस - जो त्या समूहाचं मायक्रो युनिट आहे - त्याला खोदत, त्याचा अभ्यास करत. कविता ही ‘सामाजिक’ असते या विधानात हे गृहीतक कवितेत न उरता कवितेसारखा कवीचा ‘अनुभव – हुंकार’ म्हणून कवितेत उमटलेला असतो. पहिल्या वळणाच्या कविता या कृतक असतात. दुसऱ्यामध्ये अभ्यासाला आणि अनुभवाला त्या त्या कवीच्या स्वत:च्या अशा चष्म्याची जोड मिळाल्यानं सच्चेपण असतं. आणि तशा व्यापक अर्थानं विठ्ठलच्या कवितेला मला ‘सामाजिक’ असं म्हणता येतं. पुरस्कारासाठी आदिवासी निवडून कथा-कादंबरी निर्मिणाऱ्यांना कदाचित हे सारं कळणं अवघड जावं; पण म्हणूनही त्यांनी एकवार विठ्ठलचा हा दुसरा संग्रह वाचावा, म्हणजे प्रशिक्षण होईल.

बाकी कवितांवर लिहिण्याआधी दोन गोष्टी : एकतर मी ‘पी. विठ्ठल यांची कविता’ असं न संबोधता ‘विठ्ठलची कविता’ असं म्हणणार आहे. त्याच्या कवितेमध्ये जे समकालीनत्व आहे; त्याला हे संबोधन साजेसं आहे. आणि दुसरी गोष्ट : समीक्षेच्या रूढ चौकटींमध्ये मला लिहिता येऊ शकतं; पण मी ते जात्याच टाळतो आहे. कारण मला टिपाव्याश्या वाटताहेत त्या गोष्टी पाऱ्यासारख्या आहेत. लेट मी ट्राय.

वैताग! तिथून सुरू करतो. हा वैताग अनेक पदरी आहे या संग्रहात आणि वैताग हा नेहमी वैतागवाणा नसतो! तो सर्जक असतो - जसा इथं आहे बघा – ‘च्यवनप्राशचे चमचे अडखळतात आमच्या घशात/योगाचे रोगाचे दैनंदिन क्लासेस इकडे जोरात’, ‘सुब्बलक्ष्मीच्या सुप्रभातची भुणभुण सुरू करून द्यावी भल्या पहाटे’, ‘तर असो अडतीस वर्षे म्हणजे तसं खूप झालं जगून’, निदान ‘च्या मारी’ इतके तरी उमटेलच न ओठावर.’, किंवा ‘अशीही कल्पना करा की, आपण गांडूळ आहोत..’ अनेक तऱ्हांचा, अनेकपदरी विशुद्ध वैताग या कवितांमध्ये जसा प्रकट झाला आहे त्याला तोड नाही. मी असं म्हणतोय कारण सर्वसाधारण भारतीय कवी (आस्तिक, नास्तिक, डावे, उजवे, अपक्ष सारे) वैताग हे मूल्य वैतागवाणं आहे, असं खास भारतीय नजरांमुळे मानतात. विठ्ठल म्हणतो “वैताग आहे. त्याला कारणं आहेत. त्याचा परिहार कदाचित शक्य आहे.” (हे गौतम बुद्धाच्या दु:खस्वीकाराच्या सुत्रांसारखं वाटलं तर तुम्ही नीट विचार करत आहात - तेच माझ्या डोक्यात आहे.) पण मुळात त्यातल्या ‘वैताग आहे’ या टप्प्याकडे विशुद्धपणे आणि विस्तृतपणे या कविता बघतात.

आणि मग कवी कारणंही शोधतो अनेक. कधी बदलता अर्थ - सामाजिक मूल्य - कधी, ग्रामीण - नागर भेद, कधी जगण्यातील स्पर्धा आणि अहंकार, कधी नातेसंबंधाची जटिलता अशी अनेक कारणं या ना त्या कवितेतून समोर येतात. इथवर अनेक कवी येतात. विठ्ठल पुढे विनासायास जातो. कारण करुणेचा बळकट दोर या तगड्या पौरुषसंपृक्त भाषेचा धनी असणाऱ्या कवीकडे आहे.

वडिलांनाच कवितासंग्रह त्यानं अर्पण केला आहे. “ती. वडिलांच्या स्मृतीस... खरं तर आयुष्य खूप सुंदर असूनही तुम्हाला निर्भळ जगता आलं नाही.” अशा त्या ओळी आहेत. आणि ‘बाप घरापेक्षा थोर असतो’ ही जाणीवही. म्हणतो, ‘म्हाताऱ्या बापाचं अनादी एकटेपण’ या कवितेतही शेवटी कवी कठोर होत जातो. पण हे सगळचं संवेदन भाबडं नाही. मर्यादाही टिपत आणि मग मुलगा म्हणून अपरिहार्यपणे येणारी गोष्ट असते ती आढळते मला विठ्ठलच्या अनेक शब्दांत (फार काय सांगावं मी एकदाच भेटलोय त्याला, पण त्याच्या चष्म्याआडचे डोळे तीच गोष्ट सांभाळत आहेत असं वाटलेलं मला!) पण ही करुणा केवळ घरच्या नात्यापुरती नाही.

बोकडासारखा समाजातला एक उभा वर्गच्या वर्ग अर्हनिश बळी जातो. त्याचं चित्रण विठ्ठलनं किती प्रत्ययकारी तऱ्हेनं केलं आहे : ‘शेतकऱ्यांशी सौदा करतो खाटिक / तेव्हा तो जराही संशय येऊ देत नाही / बोकडाला... मग खाटकाचा पोरगा बोकडाचे चार पाय धरत आडोशाला नेत मानेवर पाय देतो. आणि हातातली सुरी काम करते (विठ्ठलनं हे सर्व फार जिवंत उभं केलं आहे.) पण पुढे जे करुणेचं उपनिषद आहे ते विलक्षण आहे. ‘ गवताच्या पेंढीचा कोवळा वास / त्याला भरून घ्यायचा होता खरं तर पोटात / - पण राहून गेले / मालक, खाटिक, गिऱ्हाईक सगळ्यांनाच बघायचे राहून गेले... खूप खूप राहून गेले’. यातलं जे सारं नाट्य आहे आणि त्यामागे जी कवीच्या व्यावहारिक जगण्यापलीकडून, त्याच्याही कदाचित नकळत उतरलेली प्रगाढ करुणेची जाणीव आहे, ती मला पटकन आसपास दिसत नाही. शब्द पुन्हा लिहितो : करुणा. हळहळ नव्हे - ती पैशापासरी मराठी कवितेत आहे.

एकीकडे हा वैताग आणि दुसरीकडे करुणा याच्यामध्ये एक सुप्त बंडखोरीही आहे. ‘सालं, उधळून लावावं सारं.’ अशा वळणाची; पण या सुसंस्कारित कवीची कविता जात्याच सौम्य आहे. यातल्या काही कवितांमध्ये कचकचित शिव्या अगदी शोभल्या असत्या. वाचताना मला वाटलं, यानं तोंडात ती शिवी लिहिताना घातली असणार. ती कागदावरही आली असती तर बरं झालं असतं, असं एकेकदा वाटून गेलं मला.

तसंच काही ठिकाणी आणि जी मोजकी आहेत - कविता केंद्रापासून दुरावते असं वाटतं. तसंच जाहिरातबाजी करणारी नव्हेच ती; पण क्वचित आवाजीही वाटते. (पहिल्या संग्रहात मला एकही कविता अशी वाटली नव्हती हेही नोंदवायला हवं.) अर्थात, ही टीका नव्हे, ही निरीक्षणं आहेत. विठ्ठलचा तिसरा संग्रह येईल तेव्हा ती पुन्हा पडताळून बघता येईल. काही बदल आहे का, असल्यास कुठल्या दिशेनं.

पण हे काय लिहितोय मी! मला यार लिहू दे त्या कवितेनं जो आनंद दिला आहे त्यावर. एक कविताही पुरते यार कवी जन्मभर आवडायला! आणि इथं तशा अनेक कविता आहेत. चाळीशीत असलेल्या अनेक वाचकांना तर या संग्रहातल्या अनेक कविता विशेष ‘रिलेट’ करता याव्यात. ‘गेली अडतीस वर्षे’मध्ये तर ते संवेदन विशेष उठावशीर तऱ्हेनं समोर येतं; ‘पण सालं आपणही आयुष्याचा आपल्या फिक्सिंग तर केलं,’ ही जी मध्यमवयीन जाणीव आहे. ती एकाच वेळी रोमँटिक आणि वास्तववादी आहे. ‘पस्तिशीत दु:खणारी दाढ’, ‘चाळीशीत ठिसूळ झालेली हाडं’ आणि ‘आयुष्यभर दमवणारा एकेक अवयवाचा स्पेशलिस्ट’ हे सारं विठ्ठलापुढे हा कवी विठ्ठल जणू आपल्या वतीनंच मांडतो. विठ्ठल माउली काही बोलत नाहीतच म्हणा; पण कवीला आकळतं की, ‘भक्तीच्या महापुरानं कधी गढूळ झालं नाही पंढरपूर... अबीर बुक्यानांही पावन व्हावं असं कोणतं सत्व दडवून ठेवलंस अभंगाच्या पावलात.’ हा प्रश्न असला तरी हे उत्तरही आहेच. आणि तोच अंतर्विरोध कवी आपल्यासमोर मांडतो आहे. आणि ही पहिलीच कविता - सगळ्या संग्रहाचं साररूप आहे ती!

‘माझ्या जगण्याची संहिता’ या शीर्षकानंच थबकायला होतं आधी. पुढे जीन्सचा वाढता साईज, ब्रँडेड बुटांची कचकच, मंदिरे ते ट्रिपल एक्स हा प्रवास, हे सारे ओळखीचे पाडाव लागतात. बघता बघता ती साधी सोपी चरणं जटील होतात. हा कवी म्हणतोय, ‘भगवदगीतेतला श्लोक संशयास्पद वाटावा अशी कोणती खजुराहो कोरली जातेय आपल्या मस्तकात...’ आणि मग धमण्या टचटचीत होतात ते वाचताना आणि तो कवितेअखेरचा प्रश्न = ‘कोणती व्यवस्था आपल्याला अंकित करत असते अखेरीस’ आणि मग आर्थिक, सामाजिक, धार्मिक आणि पारलौकिक अशा साऱ्या व्यवस्था मुदलात आपल्याला अंकीत करीत असतात याची उदास जाणीव विठ्ठल करून देतो. हीच ती करुणेपुढे दाटून राहिलेली, अवघडून उभी राहिलेली निश्चल आणि अप्रवाही अशी उदासी!

वैताग, करुणा आणि उदासी या तीन पेड्यांची वेणी बांधावी आणि चिमुरडी ‘अच्छा’ म्हणत कुठे दूर खेळायला निघूनही जावी, तशी कविता आहे विठ्ठलची. ती हातात येणारी नाही. ती पाऱ्यासारखीच आहे. त्या पाऱ्याचा स्पर्श, त्याची चकाकी, त्याचं ओघळणं याचा आस्वाद घेणं मात्र आपल्याला शक्य आहे. आणि हे काम आनंदाचं, मैत्रीचं आणि समृद्ध करणारं असं आहे!

.............................................................................................................................................

‘शून्य एक मी’ या कवितासंग्रहाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/client/book_detailed_view/4386

.............................................................................................................................................

लेखक आशुतोष जावडेकर लिहितात, गातात आणि दात काढतात.

ashudentist@gmail.com                                                                                                    .............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘एच-पॉप : द सिक्रेटिव्ह वर्ल्ड ऑफ हिंदुत्व पॉप स्टार्स’ – सोयीस्करपणे इतिहासाचा विपर्यास करून अल्पसंख्याकांविषयी द्वेष-तिरस्कार निर्माण करणाऱ्या ‘संघटित प्रचारा’चा सडेतोड पंचनामा

एखाद्या नेत्याच्या जयंती-पुण्यतिथीच्या निमित्तानं रचली जाणारी गाणी किंवा रॅप साँग्स हा प्रकार वेगळा आणि राजकीय क्षेत्रात घेतल्या जाणाऱ्या निर्णयांवर, देशातील ज्वलंत प्रश्नांवर सातत्यानं सोप्या भाषेत गाणी रचणं हे वेगळं. भाजप थेट अशा प्रकारची गाणी बनवत नाही, पण २०१४नंतर जी काही तरुण मंडळी, अशा प्रकारची गाणी बनवतायत त्यांना पाठबळ, प्रोत्साहन आणि प्रसंगी आर्थिक साहाय्य मात्र करते.......

या स्त्रिया म्हणजे प्रदर्शनीय वस्तू. एक माणूस म्हणून जिथं त्यांना किंमत दिली जात नाही, त्यात सहभागी होण्यासाठी या स्त्रिया का धडपडत असतात, हे जाणून घेण्यासाठी मी तडफडत होते…

ज्यांनी १९७०च्या दशकाच्या अखेरीला मॉडेल म्हणून काम सुरू केलं आणि १९८०चं संपूर्ण दशकभर व १९९०च्या दशकाच्या सुरुवातीचा काही काळ, म्हणजे फॅशन इंडस्ट्रीच्या वाढीचा आलेख वाढायला सुरुवात झाली, त्या काळापर्यंत काम करत राहिल्या आहेत, त्यांना ‘पहिली पिढी’, असं म्हटलं जातं. मी जेव्हा त्यांच्या मुलाखती घेतल्या, तेव्हा त्या पस्तीस ते पंचेचाळीस या दरम्यानच्या वयोगटात होत्या. सगळ्या इंग्रजी बोलणाऱ्या.......

निर्मितीचा मार्ग हा अंधाराचा मार्ग आहे. निर्मितीच्या प्रेरणेच्या पलीकडे जाणे, हा प्रकाशाकडे जाण्याचा, शुद्ध चैतन्याकडे जाण्याचा मार्ग आहे

ही माया, हे विश्व, हे अज्ञान आहे. हा काळोख आहे. त्याच्या मागील शुद्ध चैतन्य हा प्रकाश आहे. सूर्य, उषा ही भौतिक जगातील प्रकाशाची रूपे आहेत, पण ती मायेचाच एक भाग आहेत. ह्या अर्थाने ती अंधःकारस्वरूप आहेत. निर्मिती ही मायेची स्फूर्ती आहे. त्या अर्थाने माया आणि निर्मिती ह्या एकच आहेत. उषा हे मायेचे एक रूप आहे. तिची निर्मितीशी नाळ जुळलेली असणे स्वाभाविक आहे. निर्मिती कितीही गोड वाटली, तरी तिचे रूपांतर शेवटी दुःखातच होते.......

‘रेघ’ : या पुस्तकाच्या ‘प्रामाणिक वाचना’नंतर वर्तमानपत्रांतील बातम्यांचा प्राधान्यक्रम, त्यांतल्या जाहिरातींमधला मजकूर, तसेच सामाजिक-राजकीय-सांस्कृतिक क्षेत्रांतील घटनांसंबंधीच्या बातम्या, यांकडे अधिक सजगपणे, चिकित्सकपणे पाहण्याची सवय लागेल

मर्यादित संसाधनांच्या साहाय्याने जर डोंगरे यांच्यासारखे लेखक इतकं चांगलं, उल्लेखनीय काम करू शकत असतील, तर करोडो रुपये हाताशी असणाऱ्या माध्यमांनी किती मोठं काम केलं पाहिजे, असा विचार मनात आल्याशिवाय राहत नाही. पण शेवटी प्रश्न येतो तो बांधीलकी, प्रामाणिकपणा आणि न्यायाची चाड असण्याचा. वृत्तवाहिन्यांवर ज्या गोष्टी दाखवल्या जात, त्या विषयांवर ‘रेघ’सारख्या पुस्तकातून प्रकाशझोत टाकला जातो.......