एजाजची शौर्यकथा घडली, ते कडकडीत उन्हाळ्याचे दिवस होते
पडघम - सांस्कृतिक
बाळासाहेब राजे
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना एजाज नदाफ
  • Sat , 10 February 2018
  • पडघम सांस्कृतिक एजाज नदाफ Ejaz Nadaf राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार Republic day Brave awards

२ ऑक्टोबर १९५७ रोजी दिल्लीच्या रामलीला मैदानावर रामलीला सुरू होती. या कार्यक्रमाला पंडित नेहरू, इंदिरा गांधी, जगजीवनराम व हजारो लोक उपस्थित होते. अचानक व्यासपीठावर असलेल्या शामियान्यातून आगीचे लोट येऊ लागले. तिथं विजेच्या अनेक केबल होत्या, त्यांना आग लागली असती तर मोठा अनर्थ घडला असता. हरीश चंद्र मेहरा हा फक्त १४ वर्षाचा स्काउटचा स्वंयसेवक मुलगा पटकन शामियान्याजवळच्या २० फुटी खांबावर चढला आणि उष्णतारोधक चाकूनं त्याने आगीजवळची विजेची केबल कापली. या धडपडीत त्याचे दोन्ही हात गंभीररीत्या भाजले. हरीश चंद्र मेहराच्या धाडसानं प्रभावित होऊन तत्कालीन पंतप्रधान पंहित नेहरूंनी अशा बालकांना राष्ट्रीय पातळीवर सन्मानित करण्याचा निर्णय घेतला आणि राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्काराची सुरुवात झाली. या पुरस्काराचा पहिला मान जिवाची पर्वा न करता अनेकांचे प्राण वाचवणाऱ्या हरीश चंद्र मेहराला मिळाला. तर या वर्षीचा महाराष्ट्रातील एकमेव मानकरी एजाज नदाफ आहे.

नांदेड-नागपूर महामार्गावर अर्धापूरच्या पुढे पाच कि. मी. अंतरावर असलेलं पार्डी गाव दहावीत शिकणाऱ्या एजाज नदाफच्या शौर्यामुळं चर्चेत आहे. ३० एप्रिल २०१७ या काळ्या दिवशी बंधाऱ्यात बुडणाऱ्या दोन मुलींचा जीव एजाजनं वाचवला म्हणून या वर्षीचा राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार देऊन पंतप्रधानांच्या हस्ते त्याला सन्मानित करण्यात आलंय. त्याच्या प्रसंगावधानाचं, शौर्याचं, धाडसाचं कौतुक करणारे बॅनर गावाजवळ नांदेड-नागपूर महामार्गाच्या दुतर्फा लावलेले आहेत. रस्त्याकडेचा गॅरेजवाला एजाजच्या घराचा रस्ता दाखवत म्हणाला, “एजाजच्या घराचा रस्ता चुकलात तरी घाबरू नका, गावातला कुणीही लहान-थोर त्याचं घर दाखवील.” अरुंद गल्लीबोळांतून रस्ता शोधत गेल्यावर पिंजारवाडा लागतो. इथली अर्धीकच्ची बांधलेली घरं पाहिल्यावर कष्टकऱ्यांच्या वस्तीत आल्याची जाणीव घट्ट होते. विटा-मातीच्या भिंतींवर टिनाचे पत्रे असलेलं त्याचं खुजं घर प्रवेश करणाऱ्याला वाकायला लावतं, नम्र व्हायला लावतं. इथं वाकला नाहीत तर कपाळमोक्ष ठरलेला, नम्रपणा घेऊन गेलात तर तेच घर आणि त्या घरातील माणसं तुम्हाला भरभरून प्रेम देतात. छोट्या छोट्या दोन-तीन खोल्या असलेल्या घराचं तितकंच छोटंसं अंगण. अंगणातल्या कुरमडाला बांधलेली शेळीची करडं सुबाभळीचा हिरवागार लुसलुशीत पाला खात खात येणारा-जाणाऱ्याच्या पायात घुटमळतात.

एजाजची शौर्यकथा घडली ती अशी. ते कडकडीत उन्हाळ्याचे दिवस होते. गावाजवळच्या बंधाऱ्यात इसापूर धरणातून सोडलेल्या पाण्याचा मुबलक साठा होता. आवश्यकतेनुसार या बंधाऱ्यातलं पाणी शेतीसाठी व जनावरांना पिण्यासाठी कॅनॉलमधून सोडलं जातं. भरदुपारी आफरीन बेगम ही महिला तब्बसुम, सुमय्या, अप्सर आणि शन्नो या मुलींसह कपडे धुण्यासाठी गावाजवळच्या नदीवर गेली होती. नदीत पाणी कमी असल्यामुळे बंधाऱ्याच्या कठड्यावर त्या कपडे धुऊ लागल्या. अचानक सुमय्याचा तोल गेला आणि ती बंधाऱ्यात पडली. तिला वाचवण्यासाठी इतर तिघीजणी पाण्यात उतरल्या. पोहता न येणाऱ्या सगळ्याजणी पंचवीस - तीसफुट खोल पाण्यात गटांगळ्या खाऊ लागल्या. बुडणाऱ्या चौघींना पाहून छोट्या शन्नोनं 'बचाओ! बचाओ!' अशी आर्त किंकाळी फोडली. बघ्यांची गर्दी जमली. पण एवढ्या खोल पाण्यात उतरण्याची हिंमत कुणाची झाली नाही. काही हुशार लोक समाजमाध्यमांवर शेअर करण्यासाठी मोबाईलवर व्हिडिओ रेकॉर्डिंग करू लागले.

नेमका त्याच वेळी शेताकडे जाणारा एजाज गर्दी व गोंधळ पाहून बंधाऱ्याकडे धावत आला. मागचा पुढचा विचार न करता एजाजनं पाण्यात उडी टाकली. गटांगळ्या खाणाऱ्या आफरीन बेगमला त्यानं काठावर आणून सोडलं आणि लगेच पाण्यात बुडी घेऊन गुदमरलेल्या तब्बसुमचा जीव त्यानं वाचवला. अजून दोघी सुमय्या आणि अप्सर बेपत्ता होत्या, कितीही डुबक्या मारल्या तरी त्यांचा थांग लागत नव्हता. शन्नो रडत रडत तिची बहिण अप्सर व सुमय्या दोघीही पाण्यात बुडाल्याचे सांगत होती. काही वेळानं अप्सर त्याच्या हाताला लागली. मोठ्या हिंमतीनं त्यानं तिला काठापर्यंत आणलं. एजाजचं धाडस पाहून गर्दीतल्या काहीजणांच्या अंगात बळ आलं. आणखी तिघा-चौघांनी पाण्यात उड्या टाकल्या. बंधाऱ्याच्या तळाशी एजाजची वर्गमैत्रीण सुमय्या निपचित पडली होती. इतरांच्या मदतीनं एजाजनं तिलाही बाहेर काढलं. दुर्दैवानं अप्सर व सुमय्या या अपघातात मरण पावल्या. अनियंत्रित गर्दी बघ्याच्या भूमिकेत असताना किशोरवयीन एजाजनं स्वतःच्या जिवाची पर्वा न करता आफरीन बेगम व तब्बसुमचा जीव वाचवला.

एजाजनं दाखवलेल्या धाडसाबद्दल, त्याला मिळालेल्या सन्मानाबद्दल नांदेड जिल्हा परिषदेच्या जानेवारीतल्या सर्वसाधारण सभेत त्याचं कौतुक करण्यात आलं. त्याच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याचं लक्षात येताच उपस्थितांनी लगेच वर्गणी गोळा करून चाळीस हजार रुपयांची मदत त्याला केली. ज्याचा अनुभव प्रदेश पार्डीच्या पिंजारवाड्यातून सुरू होऊन शेताच्या बांधावर संपतो, अशा एजाजसाठी दिल्लीवारी हुरळून टाकणारी होती. तिथलं राष्ट्रपती भवन, संसद भवन, इंडिया गेट, मेट्रो रेल्वे पाहताना ‘भारता’तून ‘इंडिया’त गेल्याचा फील त्याला आला. दिमाखदार प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात पुरस्कारप्राप्त मुलांच्या चमूबरोबर सहभागी होताना खूप आनंद झाल्याचं तो सांगतो. दिल्लीवारीत नागालँडचा शूरवीर चिंगाई वांगसा एजाजचा जीवलग मित्र झाला.

६ ते १८ वर्षे वयोगटातील शूर मुलांचा प्रजासत्ताक दिनाच्या पूर्व संध्येला पदक, प्रमाणपत्र आणि रोख रक्कम देऊन पंतप्रधानांच्या हस्ते गौरव केला जातो. राजधानीत प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात या बालकांची मिरवणूक काढली जाते. पुरस्कार प्राप्त बालकांचे उच्चशिक्षण पूर्ण होईपर्यंत सरकारकडून आर्थिक सहाय्य केलं जातं. वैद्यकीय व अभियांत्रिकी शाखेत राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार प्राप्त विद्यार्थ्यांसाठी काही जागा आरक्षित असतात.

एजाज राजाबाई माध्यमिक विद्यालयाचा विद्यार्थी. शाळेतील शिक्षक परशुराम पोकळकर यांनी बाल-किशोर वाचकांसाठी ‘एजाजची शौर्यकथा’ ही छोटेखानी पुस्तिका लिहिली आहे. शाळेत बसणं, घोकंपट्टी करणं, उतारेच्या उतारे खरडून काढणं त्याला कधी आवडलं नाही. त्याला शिवारात मस्त हुंदडायला आवडतं. शिवारातल्या रानवेली, पशुपक्षी हेच त्याचे सोबती आहेत. मासोळीसारखं सूर मारून पाण्यासोबत लपाछपी खेळायला त्याला आवडतं, रानातल्या पक्ष्यांसोबत शीळ घालत गप्पा मारायला त्याला आवडतं. गिनिपिग झालेली शिक्षण व्यवस्था एजाजसारख्या अनेक विद्यार्थ्यांना प्रवाहाच्या बाहेर ढकलून देण्यास जबाबदार ठरतेय का, हा वेगळ्या चर्चेचा विषय होऊ शकेल. पण शाळेत दिले जाणारे धडे विद्यार्थ्याच्या जीवनानुभवाशी निगडीत असावेत, ही अपेक्षा गैर ठरणार नाही.

त्याचं कुटुंब मोलमजुरी करून जगतंय. मालकीची दोन एकर शेती आणि वडिलांची होमगार्डची नोकरी यावर चरितार्थ चालवणं अवघड आहे. बंदोबस्ताला जाताना पोलिसाच्या गणवेशात जाणारे अब्दुल रऊफ, एजाजची अम्मी शमीम बेगम, त्याचा मोठा भाऊ इलियास इतर दिवशी मोलमजुरी करतात. मुलाच्या सन्मानाबद्दल प्रतिक्रिया विचारली असता, ‘पुरस्कार’ या शब्दाचा अर्थही माहीत नसलेली अम्मी एजाजला उराशी कवटाळत अश्रूंनी डबडबलेल्या डोळ्यानं म्हणाली, “मेरे बाबाने अच्छा काम किया. मैं बहोत खुश हुं.” एजाजला मोठेपणी सैन्यात भरती व्हायचंय. त्याच्या कुटुंबाचं उघडं दारिद्र्य, चंद्रमौळी घरटं, उर्दूमिश्रित हिंदीचा गोड लहेजा आणि त्याहून गोड आदरातिथ्य मनात साठवून मी दुसरा एजाज शोधण्यासाठी निघालो.

.............................................................................................................................................

लेखक बाळासाहेब राजे ग्रामीण भवतालाची स्पंदनं टिपणारे मुक्त लेखक आहेत.

spraje27@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

भाजपच्या ७६ पानी ‘जाहीरनाम्या’त पंतप्रधान नरेंद्र मोदींची तब्बल ५३ छायाचित्रं आहेत. त्यामुळे हा जाहीरनामा आहे की, मोदींचा ‘छायाचित्र अल्बम’ आहे, असा प्रश्न पडतो

काँग्रेसच्या ४८ पानी जाहीरनाम्यात राहुल गांधींची फक्त पाच छायाचित्रं आहेत. त्यातली तीन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत आहेत. याउलट भाजपच्या जाहीरनाम्याच्या मुखपृष्ठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीमागे बळंच हसताहेत अशा स्वरूपाचं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचं छायाचित्र आहे. त्यातली ‘बिटवीन द लाईन’ खूप सूचक आणि स्पष्टता सूचित करणारी आहे.......

जर्मनीत २० हजार हत्तींचा कळप सोडण्याची धमकी एका देशाने दिली आहे, ही ‘हेडलाईन’ जगभरच्या प्रसारमाध्यमांमध्ये गाजतेय सध्या…

अफ्रिका खंडातील बोत्सवाना हा मुळात गरीब देश आहे. त्यातच एवढे हत्ती म्हणजे दुष्काळात तेरावा महिना. शेतांमध्ये येऊन हत्ती मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान करत असल्याने शेतकरी वैतागले आहेत. याची दखल बोत्सवानाचे अध्यक्ष मोक्ग्वेत्सी मेस्सी यांनी घेतली आहे. त्यामुळेच त्यांनी संतापून एक मोठी घोषणा केली आहे. ती म्हणजे तब्बल २० हजार हत्तींचा कळप थेट जर्मनीमध्ये पाठवण्याची. अनेक माध्यमांमध्ये ही ‘हेडलाईन’ गाजते आहे.......

महाराष्ट्राच्या राजकारणाचा हा ‘खेळखंडोबा’ असाच चालू राहू द्यायचा की, त्यावर ‘अक्सिर इलाज’ करायचा, याचा निर्णय घेण्याची एकमेव ‘निर्णायक’ वेळ आलेली आहे…

जनतेला आश्वासनांच्या, ‘फेक न्यूज’च्या आणि प्रस्थापित मीडिया व सोशल मीडियाद्वारे भ्रमित करूनही सत्ता मिळवता येते, राखता येते, हे गेल्या दहा वर्षांत भाजपने दाखवून दिले आहे. पूर्वी सत्ता राजकीय नेत्यांना भ्रष्ट करते, असे म्हटले जायचे, हल्ली सत्ता भ्रष्ट राजकीय नेत्यांना ‘अभय’ वरदान देण्याचा आणि एकाधिकारशाही प्रवृत्तीच्या राजकारण्यांना ‘सर्वशक्तिमान’ होण्याचा ‘सोपान’ ठरू लागली आहे.......